की बोर्ड / सिंथेसायजर
की बोर्ड किंवा सिंथेसायजर (सिंथ) ह्या वाद्याबद्दल अनेक जणांना खूप कुतूहल आहे. मी गेले दहा वर्षांपासून व्यावसाईक दर्जाचा की बोर्ड वाजवत आहे. अजून माझे स्वत:चेच कुतूहल कमी झालेले नाही. तेव्हा ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांना याबद्दल किती कुतूहल असेल याची मी कल्पना करू शकतो. त्यामुळे याबद्दल अधिकारवाणीने नाही, पण अनुभवाने जे मला माहिती आहे ते सांगावे असे वाटले ते सांगतो. हे वाद्य, त्याची निर्मिती, वादन या संबंधी येणारे अनेक शब्द/व्याख्या इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन करतोय, कारण खरेतर शुद्ध मराठी मध्ये त्या मला लिहीताना (आणि कदाचित अनेकांना समजताना) अडचणी येतील.
सिंथेसायजर हे इलेक्ट्रोनिक वाद्य आहे, ज्यातून अनेक प्रकारचे आवाज वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीतून निर्माण करता येतात. यातून आवाज निर्माण न होता थेट इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतो, जो हेडफोन किंवा स्पीकर मधून ऐकू येतो. यामुळे यातून अनेक प्रकारचे आवाज हुबेहूब काढता येतात. जसे फ्लूट, संतूर, वायोलिन... वगैरे. सिंथेसायजर जरी १९५०-१९६० नंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणात वापरत आले, तरी आश्चर्य वाटेल पण पहिला सिंथेसायजर शोधला गेला होता १८७६ मध्ये !! मात्र रॉबेर्ट मूग याला सिंथेसायजर लोकप्रिय होण्याचे मोठे श्रेय जाते. १९७० नंतर सॉलिड स्टेट ट्रान्झिस्टर मुळे सहज कुठेही नेता येतील, असे सिंथेसायजर्स तयार होऊ लागले. १९८० च्या दशकात “यामाहा” सारख्या कंपन्यांनी छोटे सिंथेसायजर बनवायला सुरुवात केली. लवकरच मिडि (म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस) या सिंथेसायजर भाषेचा विकास झाला आणि त्यामुळे दोन सिंथेसायजर एकमेकात याद्वारे संवाद साधू शकले. तसेच सिंथेसायजरचे प्रोग्रॅमिंग (जसे कॉम्प्युटरचे करतात तसे) करता येऊ लागले.
सिंथेसायजर अनेक प्रकारचे असतात. मुख्य दोन प्रकार म्हणजे हौशी आणि व्यावसाईक दर्जाचे. सर्वसाधारणपणे, ज्या सिंथ मध्ये स्पीकर्स असतात, ते हौशी प्रकारात मोडतात (काही अपवाद आहेत). या प्रकारच्या सिंथ मध्ये, मर्यादित आवाज असतात तसेच त्या आवाजांचा दर्जा पण कमी असतो. उदा. कॅसिओ सीटिके सिरिज, यामाहाचे पीएसआर सिरिज. त्या मध्ये प्रोग्रॅमिंग करण्याची सुविधा बरीच कमी असते. तरीसुद्धा, आजकाल बाजारात अगदी साधारण (म्हणजे १००-१५० डॉलर्स) ते जवळजवळ व्यावसायिक दर्जाचे (१०००-१५०० पर्यंत) हौशी सिंथ मिळतात आणि ते खूपच दर्जेदार असतात. तसेच, ५०० पासून ४-५ हजार पर्यंत व्यावसायिक दर्जाचे सिंथ पण मिळतात. दोन्ही प्रकारच्या सिंथचे उपयोग वेगवेगळे असतात. हौशी प्रकारचे शिकण्यासाठी ते छोटे-मोठे प्रोग्रॅम वाजवण्यापर्यंत उपयोग होतो. मात्र मोठे म्युझिक प्रोग्रॅम करण्यासाठी दुस-या प्रकारचेच सिंथ लागतात हे अनुभवानी सांगू शकतो. उदा. रोलॅंड, कोर्ग, एलिसिस. तसेच कॅसिओ, यामाहा सुद्धा या प्रकारचे सिंथ बनवतात. व्यावसाईक दर्जाच्या सिंथ ला आवाज निर्माण करण्यासाठी वेगळा ऍम्प्लिफायर लागतो. या सर्वामुळे त्याचे बजेट चांगलेच असते. यामुळे सिंथ घेताना अनुभवी माणसांकडे जरुर चौकशी करावी अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता असते.
सिंथेसायजर साधारणत: पियानो कीबोर्ड चा वापर करुन वाजवतात. सिंथेसायजर मध्ये जे हजारो आवाज असतात, ते आपल्या सोईनुसार उपलब्ध असलेल्या अनेक बटनांपैकी एक किंवा अनेक बटनांशी जोडता येतात, जेणेकरुन ते बटन दाबल्यानंतर येणारा आवाज त्याप्रमाणे बदलता येतो. तसेच कीबोर्डच्या कोणत्या सप्तकातील कोणत्या की-रेंज मध्ये कोणता आवाज निघावा, हे सुद्धा आपण ठरवू शकतो. यालाच सिंथेसायजर प्रोग्रॅमिंग असे म्हणतात. याच प्रकारे उपलब्ध असलेले आवाज अनेकविध सेटिंग्ज द्वारा बदलून स्पेशल इफेक्ट्स पण त्यात घालता येतात जसे -एको, डीले वगैरे. तसेच काही आवाजांचे मूळ सेटिंग असे असते की, कीबोर्ड ची की दाबल्यानंतर आवाज एका विशिष्ट प्रकारे येतो पण त्या नंतर की अजून थोड्या जोरात दाबून धरल्यास आवाज बदलतो (याला कीबोर्ड भाषेत आफ्टरटच) असे म्हणतात. अर्थात मागे म्हटल्याप्रमाणे हेच आपण स्वत: साउंड डिझाईन करताना पण करु शकतो.
सिंथेसायजर च्या या अनेक प्रभावी सोईंमुळे, सिंथेसायजर वादकांवरती मोठी जबाबदारी असते. एक किंवा दोन वादकांवरती संपूर्ण मेलडीची जबाबदारी असते. त्यांनी बासरी, संतूर, वायोलीन्स, सेलो, गिटार, सॅक्सोफोन अश्या अनेक वाद्यांचे गाण्यात असलेले तुकडे अश्या सफाईने वाजवणे अपेक्षित असते की जणू ते वाद्यच वाजत आहे. मूळचे वाद्य जसेच्या तसे निघणे अशक्य असते पण वादकाने तसा आभास निर्माण करायचा असतो. यामुळेच कीबोर्ड वादकाला जरी मूळ वाद्य वाजवता आले नाही तरी चालेल पण ते कसे वाजवतात, त्याची शक्तिस्थाने, कमजोरी काय ते पाहून ते सिंथेसायजर मध्ये वाजवायचे असते. उदा. बासरी मधून एकावेळी एकच सूर निघतो हे लक्षात ठेवून कीबोर्ड असा सेट करावा लागतो की एकावेळी एकच आवाज निघेल. दुसरी की दाबताच पहिला आवाज बंद होईल. असेच सतार, सॅक्सोफोन मध्ये पण करावे लागते. तसेच या वाद्यांमध्ये मींडकाम होत असते त्यासाठी अनेक सिंथेसायजरचा मध्ये पिच-बेंडर असतो ज्याचा वापर अश्यावेळी करता येतो. सिंथेसायजरचा आवाज हा ऍम्प्लिफायर मधून येत असतो त्यामुळे तो किती मोठा ठेवायचा याचे भान सतत ठेवावे लागते. एक छोटे उदाहरण म्हणजे आम्ही सिंथ मधून संतूर वाजवत असतो. परंतु काही दिवसांपूर्वी पं.सतीश व्यास यांचे अप्रतिम संतूरवादन अतिशय जवळून बघायला मिळाले. आता या पुढे सिंथ मधून संतूर वाजवताना याचा नक्की उपयोग होईल. (मला वाटते की इथेच यंत्रापेक्षा यंत्रामागचा माणूस महत्वाचा ठरतो आणि यामुळेच रेहमानचे संगीत आणि इतरांचे तीच यंत्रे वापरुन केलेली गाणी यात केवढा तरी फरक असतो).
गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्प्युटर मधील अफाट प्रगतीमुळे सिंथेसाइजरसुद्दा कॉम्प्युटरमधून वाजवता येतात. परंतु, अजूनही ऍपल कॉम्प्युटर सारखे काही कॉम्प्युटर सोडल्यास त्याचा स्टेजवरती वापर अतिशय मर्यादित आहे. पण याचा कॉम्प्युटर वरती संगीत बनवण्यात फार मोठा फायदा होतो. या प्रकारच्या सिंथेसाइजरला सॉफ्ट-सिंथ म्हणतात ज्यामध्ये सिंथेसायजरचा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करते. त्याला आपण फक्त आपला सिंथेसायजर जोडायचा असतो. ज्या प्रकारे कॉम्प्युटर तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत आहे, त्याप्रमाणे येत्या काही वर्षांतच संपूर्णपणे सॉफ्ट-सिंथ स्टेजवरती वाजवणे अजिबात अशक्य नाही. यासाठी जो की-बोर्ड लागतो त्याला मिडि-कंट्रोलर की-बोर्ड म्हणतात, ज्यामध्ये स्वत:चे आवाज नसतात. हे कीबोर्ड सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे मिडि भाषेचा वापर करुन संदेश पाठवतात आणि सॉफ्ट्वेअर ते समजून घेऊन त्याप्रमाणे कॉम्प्युटर मधून आवाज निर्माण करते. याच प्रकारे ड्रम्स् किंवा इतर तालवाद्ये सुद्धा सॉफ्ट-सिंथ द्वारा वाजवता येतात. या प्रकारच्या सिंथ ला ड्रम सिंथेसायजर म्हणतात. या प्रकारात स्वत:चे आवाज नसलेले ड्रम-पॅड कॉम्प्युटर ला जोडून त्याद्वारे वाद्य वाजवता येते. ड्रम-पॅड अनेक भागात विभागलेले असते आणि प्रत्येक भागाला एक किंवा अनेक आवाज याप्रमाणे त्याचे प्रोग्रामिंग करता येते. याप्रकारे एकाच वेळी अनेक वाद्यांचे गुंतागुंतीची वाटणारी ताल आवर्तने वाजवता येतात तसेच वेगवेगळे वाद्यांचे गट करुन त्याप्रमाणे ते स्टेज वरती वाजवता येतात.
सिंथ वाजवताना जसे वाजवण्याची कला येणे अतिशय आवश्यक आहे, तसेच त्याच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास आणि त्याचा स्टेजवरती सफाईने वापर हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. यात जर वादकाची संगीताची समज चांगली असेल तर मग फारच छान. असे जे वादक आपल्याला बघायला मिळतात त्यांचा ह्या सर्व भागांवर चांगला ताबा असतो त्याशिवाय हे होऊ शकत नाही.
आपल्या मनात या प्रकारच्या वाद्याबद्दल थोडी उत्सुकता निर्माण झाली असेल तर हा लेख यशस्वी झाला असे म्हणेन. जाता जाता संगीत रसिकांना एक विनंती अशी, की भविष्यात कधी संगीत कार्यक्रमांना गेलात तर गाणा-यांचे नेहमी प्रमाणे कौतुक कराच पण सिंथ वाजवणा-यांकडे पण पहा आणि त्यांना चांगले काम केले तर जरुर जाऊन सांगा.
हिम्स - सही पोस्ट आणि माहिती.
हिम्स - सही पोस्ट आणि माहिती. विवेक - तुमचीही.
केदार- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकवच रे.
खुप चांगली माहिती दिलीत
खुप चांगली माहिती दिलीत लेखातुन..
सर्व कीबोर्डोत्सुक जणांना
सर्व कीबोर्डोत्सुक जणांना दुधाची तहान ताकावर भागवायला ह्याच्यावर क्लिकून पहा
http://www.bgfl.org/bgfl/custom/resources_ftp/client_ftp/ks2/music/piano...
किरणनी 'सा'च्या freqency
किरणनी 'सा'च्या freqency विषयी प्रश्न विचारला होता.. त्या संदर्भात काही पुस्तके चाळल्यावर पुढील माहिती मिळाली ती सगळ्यांसमोर ठेवतो आहे..
माहितीचा स्रोत - संगीत शास्त्र
लेखक - वसंतराव राजोपाध्ये.
प्रचलित स्वर, त्यांची कंपने व तारेवरील स्थाने.
हे कोष्टक सतारीच्या संदर्भात वापरले जाऊ शकते.. तसेच ह्यातून जे स्वर निर्माण होतील ते त्या तारेच्या संदर्भातील असतील.. ह्यातून जे स्वर निर्माण होतील ते पेटी अथवा की बोर्ड्वर नक्की कुठले असतील तेही नक्की सांगता येणार नाही... कारण तार कोणती आहे त्यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतील...
समजा एका विशिष्ठ कंपनसंख्येचा स्वर षड्ज (सा) धरला तर त्यानुसार पुढचे स्वर कसे असतील ते पुढील प्रमाणे.
षड्ज स्वराच्या ९/८ पट रे
षड्ज स्वराच्या ५/४ पट ग
षड्ज स्वराच्या ४/३ पट म
षड्ज स्वराच्या ३/२ पट प
षड्ज स्वराच्या ५/३ पट ध
षड्ज स्वराच्या १५/८ पट नी
गारेगार धन्यवाद!! मुद्दाम
गारेगार धन्यवाद!!
मुद्दाम होऊन माहिती काढून कोष्टकात भरुन इमेज पोष्ट करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल खरोखर आभारी!
त्यावरुन ग्राफ काढला तर असा दिसतोय. ह्यावरुन बर्याच गोष्टींचा उलगडा झालाय.
हा सिक्वेन्स Regular Geometric Progression नाही म्हणजे वरती जामोप्यानी सांगितल्याप्रमाणे २ स्वरांतील फरक सारखा नाही. म्हणूनच श्रुतींतील फरकही समान नसणार.
आता कसं गारेगार वाटतंय
हा सिक्वेन्स Regular
हा सिक्वेन्स Regular Geometric Progression नाही हे अगदी उघड आहे. पण दोन सलग सुरांमधे २ ^ ( १/१२ ) चा रेशो धरल्यास साधारणपणे जवळचे आकडे येतात. २ ^ ( १/१२ ) म्हणजे २ raised to ( १/१२ ). उदा. सुरुवात २४० ला सुरू केल्यास 'कोमल रे' = २४० * २ ^ ( १/१२ ), 'रे' = २४० * २ ^ ( २/१२ ), 'कोमल ग' = २४० * २ ^ ( ३/१२ ). असे करत करत 'वरचा सा' = २४० * २ ^ ( १२/१२ ) = २४० * २ ^ १ = ४८० ला येतो. या गणिताने काढलेले आकडे खालीलप्रमाणे आहेत --
सा - २४०
कोमल रे - २५४.२७
रे - २६९.३९
कोमल ग - २८५.४१
ग - ३०२.३८
म - ३२०.३६
तीव्र म - ३३९.४१
प - ३५९.५९
कोमल ध - ३८०.९८
ध - ४०३.६३
कोमल नी - ४२७.६३
नी - ४५३.०६
सा - ४८०
लवकरच श्रुतींच्या संदर्भात पण
लवकरच श्रुतींच्या संदर्भात पण लिहितो...
आणि वरचे कोष्टक अगदी साधा गुणाकार वापरुन केलेले आहे...
तारेची लांबी L
कंपन संख्या N
L X N = constant म्हणजेच straight line equation.. Y = MX + C
त्यामुळे वर काढलेला आलेख हा सरळ रेषेतच येईल... वरती दिलेले आकडे हे अंदाजे आहेत... तसेच जी सरळ रेषा मिळेल त्या वरील प्रत्येक बिंदू घेऊन जर तार वाजवून बघितली तर जो काही आवाज निघेल तो श्रवणीय असेल असे नाही. म्हणूनच हे बारा स्वर जे श्रवणीय आहेत ते निश्चित केलेले आहेत.
अकरावी बारावीचं भौतिक शास्त्राचं पुस्तक काढून बसायला पाहिजे... सगळंच विसरलोय असं वाटतय..
श्रुतींसंदर्भात थोडेसे..
एकूण २२ श्रुती मानल्या गेल्या आहेत.. आणि त्यांचे पाच प्रकारही आहेत..
सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ४-३-२-४-४-३-२ अश्या प्रकारे श्रुती विभागुन प्रत्येक श्रुत्यंतराच्या शेवटी एक स्वर असे मानले जाते म्हणजेच
१,२,३,४ सा
५,६,७ रे
८,९ ग
१०,११,१२,१३ म
१४,१५,१६,१७ प
१८,१९,२० ध
२१,२२ नी
बाकीचं लिहितो लवकरच..
२२ श्रुतींचे डिविजन
२२ श्रुतींचे डिविजन ४-३-२-४-४-३-२ असे जे दिलेले आहे, ते बहुतेक भरतमुनीनी दिलेले आहे..
यालाच काही लोक सा -प अचल आणि उरलेल्या ५ सुरांच्या ४ श्रुती असेही डिवाइड करतात.
श्रुतींमधील अंतरे सारखी नसतात. म्हणून तर श्रुतीना नॉन टेंपर्ड स्केल असे म्हणतात. ( टेंपर्ड म्हणजे इक्वी टेंपर्ड म्हणजे की बोर्डचे स्केल, ज्यात अंतर ( म्हणजे खरे तर गुणोत्तर) सारखे असते.)
पंचम षडजच्या दीडपट असतो. सा
पंचम षडजच्या दीडपट असतो.
सा १०० असेल तर शुद्ध मध्यम १३३.३३ येतो..
आणि अर्थातच पुढचा सा मागच्या साच्या दुप्पट असतो..
सा-१००
म १३३.३३
प १५० आणि
सां २००
आता सां हा प च्या बरोबर ३३.३३ % येतो...
म्हणूनच सां हा प चा मध्यम असतो...
वॉव जामोप्या धन्यवाद. उत्तम
वॉव जामोप्या धन्यवाद. उत्तम माहिती. खाचाखोचा कळण्यास मदत झाली.
पण मग आता मला एक प्रश्न हा आहे की जर स्वरांची अशी असमान विभागणी असेल तर मग आपल्याकडे काळी २ किंवा पांढरी १ अशी गायकाच्या स्वराप्रमाणे रेफरन्स 'सा' लावण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पुढील स्वरांचे गणित हार्मोनियम सारख्या वाद्यात कोलमडेल ना?
म्हणजे माझ्यासारख्या सामान्य 'कान' असणार्या माणसाला ३८४ नि ३८१ किंवा ३८८ Hz मधला फरक कळणार नाही पण तज्ज्ञांना नक्कीच त्यात त्रुटी जाणवणार. हे कसे साधते?
हार्मोनियमच्या पुढील भागावर काही पांढर्या रंगांच्या कळा असतात त्याचा काय उपयोग असतो?
चिमण, हे कोष्टक मी फार पूर्वी
चिमण, हे कोष्टक मी फार पूर्वी तयार केले होते माझ्या ठोकताळ्यांवरुन.
त्या त्या वेळच्या उपलब्ध साधनांनुसार माझी बनवलेली वाद्ये बदलत गेली
म्हणजे अगदी लहानपणी ग्लास मध्ये वेगवेगळ्या पातळीचे पाणी भरुन त्यावर चमच्याने आवाज करुन घरच्यांचे कान किटविणे
मग elecronics diploma करताना 555 IC वापरुन वरीलप्रमाणे frequencies calculate करुन त्याप्रमाणे Resistor ni Capacitor च्या values काढून PCB Design करुन एक पियानोही बनवला होता!
नन्तर quick basic मधे प्रोग्रॅम लिहून तेव्हा असलेल्या PC Speaker मधून कर्कश्श आवाज काढणे!
नन्तर त्यात सुधारणा करुन मग आपल्या Computer Keyboard चा उपयोग piano सारखा करणे. (तेव्हा सिन्थेसायझर नी कीबोर्ड ह्यांना म्हणतात ते माहितच नव्हते!) हे सगळे PC XT ni PC AT च्या जमान्यात. DOS 4.0
असो. फार वहावत गेली पोष्ट
>पण मग आता मला एक प्रश्न हा
>पण मग आता मला एक प्रश्न हा आहे की जर स्वरांची अशी असमान विभागणी असेल तर मग आपल्याकडे काळी २ किंवा पांढरी १ अशी गायकाच्या स्वराप्रमाणे रेफरन्स 'सा' लावण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पुढील स्वरांचे गणित हार्मोनियम सारख्या वाद्यात कोलमडेल ना?
शंका रास्त आहे. पण म्हणूनच पेटी बनवल्यानंतर ट्यून करवून घेतली जाते. केवळ ट्युनिंग चे काम करणारी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी दादा माणसे आहेत, पण त्यांन्नाही कान "तयार" होईपर्यंत frequency/sound meter वापरावे लागते जेणेकरून एकदा रेफरंस सा पकडला (समजा काळी एक, वा पाढरी एक) तर त्य अनुरूप पुढचे सूर (कोमल, तीव्र सकट ) बरोबर वाजतात का हे तपासले जाते.
त्यामूळे चांगली वाजवलेली अन ट्यून झालेली पेटी असेल तर कोलमडायला होत नाही.
(दुबईत पेटीतला एक महान दादा माणूस आहे त्यांन्ना जमल्यास ईथे वाचून अभिप्राय द्यायला सांगतो किंव्वा त्यांन्ना विचारून ईथे टाईपीन.. कालच घरी त्यांची मैफील झाली. आधी वरच्या पोस्ट्स वाचल्या असत्या तर तेव्हाच विचारून लिहीले असते)
वर शृतीचे दिलेल कोष्टक मुख्यतः तार वाद्यांना अगदी लागू आहे.. शिवाय २२ शृतीच दिल्या आहेत कारण आपला कान त्यातील फरक ओळखू शकतो. त्यापेक्षा कमी frequency difference असला तरी कानाला तो फरक तितकासा जाणवत नाही. सुरांची "गोलाई"/मिंड हा शब्द ऐकून माहीत असेल? त्यात नेमके हेच होते की दोन शृतीतील अंतर जे वर कोष्ट्कात दिले आहेत जसे सा वरून रे/ग वर जाताना गळ्यातून कींव्वा ACOUSTIC instrument मधून ईतरही बारीक स्वर/frequency स्पर्ष करून जाता येते.. तेव्हा स्वर गोलाकार फिरल्यागत भासतो. तिथे २२ पेक्षा जास्ती शृती वापरलेल्या असतात पण तरिही कानाला तो बारीक फरक जाणवत नाही, फक्त जसे बासरीतून एखादा स्वर गोलाकार घुमल्यागत वाटतो तसे कानाला वाटते एव्हडच.
असो. बाकी चर्चा छान चालू आहे.......
योग माझा प्रश्न तो नव्हता.
योग माझा प्रश्न तो नव्हता. म्हणजे हार्मोनियम किंवा कोणतेही मेकॅनिकल वाद्य हे ट्यून तर करावेच लागणार आणि अशी तयार कान असणारी माणसांबद्दल मी ऐकले आहे, त्यांना नक्किच इश्वरी देणगी तरी असते किंवा अतिशय परिश्रमाने असा 'कान' तयार होतो.
माझा तर गाण्यातला पुढचा स्वर कुठला असेल हे शोधण्यातच गाणे पुढे गेलेले असते एवढे करुन बरोबर स्वर मिळालाय की नाही तेही कळत नाही
पण योग मी असे म्हणतोय की एकदा ट्यून केले आणि नंतर गायक बदलला (पांढरी १ च्या ऐवजी पांढरा २ वाला आला) तर स्वरांतील फरक वेगळा असल्यामुळे ट्युनिंग पुन्हा करावे लागेल ना?
>पण योग मी असे म्हणतोय की
>पण योग मी असे म्हणतोय की एकदा ट्यून केले आणि नंतर गायक बदलला (पांढरी १ च्या ऐवजी पांढरा २ वाला आला) तर स्वरांतील फरक वेगळा असल्यामुळे ट्युनिंग पुन्हा करावे लागेल ना?
जरा विस्तारून संगणार का?
किरण, मला अजूनही तुझा प्रश्ण नेमका कळत नाहिये
गायकाची साथ संगत करताना पट्टी बदलली तर वाजवताना अडचण आहे असे म्हणायचे आहे का? ट्युनिंग हा शब्द टेक्निकल असल्याने मी वरील पोस्ट टाकली होती.
असो.
आगावपना करून किरणच्या
आगावपना करून किरणच्या प्रश्नाला उत्तर देतेय.
<<पण योग मी असे म्हणतोय की एकदा ट्यून केले आणि नंतर गायक बदलला (पांढरी १ च्या ऐवजी पांढरा २ वाला आला) तर स्वरांतील फरक वेगळा असल्यामुळे ट्युनिंग पुन्हा करावे लागेल ना?<<>>
किरण अगदी बरोबर. चांगल्या साथीच्या पेटीचं ट्यूनिंग हे एका विशिष्टं स्वरपट्टीला सा धरून केलेलं असतं. म्हणूनच पंडितजींसाठी साथीला वापरलेली हार्मोनियम किशोरीताईंसाठी वापरता येणार नाही. (पंडितजींचा आणि किशोरीताईंचा ष्ड्जं वेगळा गृहित धरलाय
)... आणि वापरत नाहीत.
हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते.
पेटीचं ट्यूनिंग हे त्याचे रिड्स घासून केलं जातं. त्याला कमीतकमी दोन तरी दिवस लागतात. त्यामुळे तबल्यासारखं किंवा सतारीसारखी एकच हार्मोनियम ट्यून करीत वेगवेगळ्या स्वरांना वापरता येणार नाही. सरळ वेगळीच हार्मोनियम वापरतात.
दाद, >सरळ वेगळीच हार्मोनियम
दाद,
>सरळ वेगळीच हार्मोनियम वापरतात.
स्केल चेंजर पेटी हा त्याला पर्याय आहे..
अप्रतीम....इतक्या सोप्या
अप्रतीम....इतक्या सोप्या भाषेत इतकी छान माहिती दिली...
दाद, मला हेच म्हणायचे होते.
दाद, मला हेच म्हणायचे होते. उत्तराबद्दल धन्यवाद.
योग, स्केल चेंजर पेटी म्हणजे काय? ते मेकॅनिकल वाद्य आहे की सिन्थेसायझर?
किरण... Scale Changer ही आपली
किरण...
Scale Changer ही आपली नेहमीची जी पेटी (संवादिनी) असते, तशीच पेटी असते. सर्व-साधारण पेटीमधे 'सुरांच्या पट्ट्या' या Fixed असतात. Scale Changer पेटी मधे 'सुरांच्या पट्ट्या' या Movable असतात. बर्याच 'संवादीनी' वादकांना एका ठराविक सुरा मधुनच वाजवण्याची सवय झालेली असते. उदा. गायक/ गायीके चा सूर जर 'काळी चार' चा असेल, आणि संवादिनी वादकाला 'पांढरी चार' मधुन वाजवायची 'सवय' असेल तर दोघांचिही 'पंचाईत' होते. अश्या वेळि Scale Changer पेटी मधे उपलब्ध करुन दिलेल्या Leverच्या आधारे 'पांढरी चार'ची पट्टी 'काळी चार'च्या ठिकाणी आणून दोघांनाही सोपे काम करता येते... गाण्याच्या मागणी प्रमाणे/ बांधणी प्रमाणे बर्याच वेळी सुर अर्ध्या मात्रेने कमी-जास्त करावे लागतात, अशावेळि Scale Changer पेटीचा खरा उपयोग लक्षात येतो...
>योग, स्केल चेंजर पेटी म्हणजे
>योग, स्केल चेंजर पेटी म्हणजे काय? ते मेकॅनिकल वाद्य आहे की सिन्थेसायझर?
अस बघ, काळी एक चा मुळचा "सा" ज्या बटणावर वाजवतो त्याला अनुसरून जे सप्तक पेटीत असते त्याला काळी एक सप्तक म्हणतात. पण याच बटणावर पांढरी १ वा पांढरी २ चा "सा" अन त्याला अनुसरून पांढरी १ वा पांढरी २ चे सतक वाजवता येण्याची सोय असलेले वाद्य म्हणजे स्केल चेंजर पेटी. (पेटीच)
मुळात काळी एक च्या "सा" वर पाढरी १ वा २ चा "सा" वाजवावाच का? याचे ऊत्तर असे आहे की एखाद्या पेटी वादकाचा हात काळी १, काळी २ किंव्वा पांढरी १, २ यापेकी कुठल्यातरि एका सप्तकात नेहेमी सफाईने फिरतो. काळी १ मध्ये बोटांची सवय असल्यावर पाढरी १ वा २ वाजवताना अडचण येवू शकते, विशेषतः साथ संगत करताना.
अशा वेळी स्केल चेंजर पेटीमूळे काळी १ च्याच सप्तकात पाढरी १, २ चे सप्तक वाजवता येते.
टेक्निकली, या पेटीत एक ठराविक बटण (पेटी च्या पुढील भागात जी दोन चार मुख्य बटणे असता तसेच) वापरून अशा प्रकारे सप्तक्/स्केल बदलता येते. म्हणून स्केल चेंजर.
स्केल चेंजर आपल्याकडे कधिही शास्त्रीय वादनात वा साथ संगतीत वापरत नाहीत कारण स्केल्/सप्तक बदलल्यावर स्वरांची सफाई आणि फ्रिक्वेंसी थोडी कॉम्प्रोमाईज होते. बंगाल मधिल गायक विशेषतः काही पंजाब मधिल गझल गायक यांन्नी स्केल चेंजर चा प्रथम वापर चालू केला.
एका वाक्यात स्केल चेंजर पेटी म्हणजे सिंथ मधिल transpose function सारखी सोय. तरी मला वाटतं जास्ती जास्त १ वा दोन सप्तकेच वर खाली करण्याची सोय पेटीत आहे (कारण आतमध्ये त्या अनुशंगाने भात्याची सोय करावी लागते ज्याला मर्यादा आहेत). सिंथ मध्ये आठ सप्तके कमी जास्ती करता येतात.
मित्रांनो: या सगळ्या इतर
मित्रांनो:
या सगळ्या इतर तांत्रिक गोष्टींचा एक वेगळा लेख बनवा की. इथे प्रतिसादामध्ये पडून राहील नाहीतर हे सगळे...
यु ट्युब वर शोधताना हा
यु ट्युब वर शोधताना हा अफलातून व्हिडीयो सापडला
ह्यात स्मरणिका नावाच्या लहान मुलीने अप्रतिम कीबोर्ड वाजवला आहे. तिची ताल, राग आणि कॉर्ड्स ची समज अतिशय उत्कृष्ट आहे. तसेच प्रत्येक गाण्याचे ट्युटोरियल तिने वेगळ्या व्हिडीयोत दिले आहे.
नुसते ऐकले तर वाटतच नाही की हे एका लहान मुलीने वाजवले आहे. जरुर बघा.
नवशिक्या कीबोर्ड वाजवायला शिकणार्यांना 'डायरेक्ट Hands on' साठी अतिशय उत्तम!
हॉले हॉले - रब ने बना दी जोडी
http://www.youtube.com/watch?v=CYVEIVdljrY&feature=related
है गुजारिश - गजनी
http://www.youtube.com/watch?v=Js_Hta4G3lU&feature=related
लोकहो.... ब-याच दिवसांनी परत
लोकहो....
ब-याच दिवसांनी परत या बाफ वरती लिहीत आहे कारण मी तेव्हा विचारले होते कि इन्टरनेट वरुन कुणाला की-बोर्ड किंवा गिटार शिकायचे आहे का तेव्हा काही लोकांनी उत्सुकता दाखवलेली होती.... तर मी त्यासाठी एक टेस्ट साईट बनवलेली आहे़
या साईट वरती सुरुवातीस टेस्ट म्हणून कुणाला सहभागी व्हायचे असेल तर कृपया - prashant@zenagestudios.com इथे मला इमेल करा.
या टेस्ट साठी तुम्हाला कोणताही खर्च येणार नाही...
प्रशांत...
अरे!! छान लेख... पाहिलाच
अरे!! छान लेख... पाहिलाच नाही.... बरंच काही चर्चासत्र सुरू आहे!! वाचेन आता... एक एक पोस्ट..
छान लेख आणि चर्चा
छान लेख आणि चर्चा
नवशिक्या कीबोर्ड वाजवायला
नवशिक्या कीबोर्ड वाजवायला शिकणार्यांना 'डायरेक्ट Hands on' साठी अतिशय उत्तम! >> अजुन काही अशी गाणी असतील तर कृपया सांगा..
वाजवायला बसलं की नीट एकही गाणं आठवत नाही...
पुन्हा पुन्हा वाचायला भाग
पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडणारा असा हा अप्रतिम लेख व अतिशय अभ्यासू, माहितीपूर्ण प्रतिसाद / चर्चा .......
मन निवलंच हे सगळं वाचून....., पण हळुहळू पचेल असे वाटते.....
सर्व जाणकारांचे मनापासून आभार.....
माझ्या ४ वरषा च्या मुलीला
माझ्या ४ वरषा च्या मुलीला सिंथेसायझर शिकवायचा आहे. तिच्यासाठी योग्य माॅडेल कुणी
सुचवु शकेल का? मला भारतात विकत घ्यायचा आहे. धन्यवाद.
मी सध्या की बोर्ड शिक त आहे
मी सध्या की बोर्ड शिक त आहे
आरोह अवरोह झालय
साध्या गाण्याचे नो टेशन्च्य शोधात आहे जसे की [ नोर्मल की बोर्ड वरच पहिजे , सारे गम वाल्या
जन गन मन
आशि सोपी गाणी हावी आहेत
बाकी मी आधी नेट वर शोधुन भुषण च्य मोबाईल मधे piano master नावाचे app वापरुन
happy birthday , london bridge is falling down , chand mera dil, jingle bel वाजवते
विसरा सिंथेसायझर आता आला
विसरा सिंथेसायझर
आता आला सीबोर्ड
Pages