की बोर्ड / सिंथेसायजर

Submitted by prashant_the_one on 27 May, 2010 - 10:31

की बोर्ड / सिंथेसायजर

की बोर्ड किंवा सिंथेसायजर (सिंथ) ह्या वाद्याबद्दल अनेक जणांना खूप कुतूहल आहे. मी गेले दहा वर्षांपासून व्यावसाईक दर्जाचा की बोर्ड वाजवत आहे. अजून माझे स्वत:चेच कुतूहल कमी झालेले नाही. तेव्हा ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांना याबद्दल किती कुतूहल असेल याची मी कल्पना करू शकतो. त्यामुळे याबद्दल अधिकारवाणीने नाही, पण अनुभवाने जे मला माहिती आहे ते सांगावे असे वाटले ते सांगतो. हे वाद्य, त्याची निर्मिती, वादन या संबंधी येणारे अनेक शब्द/व्याख्या इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन करतोय, कारण खरेतर शुद्ध मराठी मध्ये त्या मला लिहीताना (आणि कदाचित अनेकांना समजताना) अडचणी येतील.

सिंथेसायजर हे इलेक्ट्रोनिक वाद्य आहे, ज्यातून अनेक प्रकारचे आवाज वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीतून निर्माण करता येतात. यातून आवाज निर्माण न होता थेट इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतो, जो हेडफोन किंवा स्पीकर मधून ऐकू येतो. यामुळे यातून अनेक प्रकारचे आवाज हुबेहूब काढता येतात. जसे फ्लूट, संतूर, वायोलिन... वगैरे. सिंथेसायजर जरी १९५०-१९६० नंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणात वापरत आले, तरी आश्चर्य वाटेल पण पहिला सिंथेसायजर शोधला गेला होता १८७६ मध्ये !! मात्र रॉबेर्ट मूग याला सिंथेसायजर लोकप्रिय होण्याचे मोठे श्रेय जाते. १९७० नंतर सॉलिड स्टेट ट्रान्झिस्टर मुळे सहज कुठेही नेता येतील, असे सिंथेसायजर्स तयार होऊ लागले. १९८० च्या दशकात “यामाहा” सारख्या कंपन्यांनी छोटे सिंथेसायजर बनवायला सुरुवात केली. लवकरच मिडि (म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस) या सिंथेसायजर भाषेचा विकास झाला आणि त्यामुळे दोन सिंथेसायजर एकमेकात याद्वारे संवाद साधू शकले. तसेच सिंथेसायजरचे प्रोग्रॅमिंग (जसे कॉम्प्युटरचे करतात तसे) करता येऊ लागले.

सिंथेसायजर अनेक प्रकारचे असतात. मुख्य दोन प्रकार म्हणजे हौशी आणि व्यावसाईक दर्जाचे. सर्वसाधारणपणे, ज्या सिंथ मध्ये स्पीकर्स असतात, ते हौशी प्रकारात मोडतात (काही अपवाद आहेत). या प्रकारच्या सिंथ मध्ये, मर्यादित आवाज असतात तसेच त्या आवाजांचा दर्जा पण कमी असतो. उदा. कॅसिओ सीटिके सिरिज, यामाहाचे पीएसआर सिरिज. त्या मध्ये प्रोग्रॅमिंग करण्याची सुविधा बरीच कमी असते. तरीसुद्धा, आजकाल बाजारात अगदी साधारण (म्हणजे १००-१५० डॉलर्स) ते जवळजवळ व्यावसायिक दर्जाचे (१०००-१५०० पर्यंत) हौशी सिंथ मिळतात आणि ते खूपच दर्जेदार असतात. तसेच, ५०० पासून ४-५ हजार पर्यंत व्यावसायिक दर्जाचे सिंथ पण मिळतात. दोन्ही प्रकारच्या सिंथचे उपयोग वेगवेगळे असतात. हौशी प्रकारचे शिकण्यासाठी ते छोटे-मोठे प्रोग्रॅम वाजवण्यापर्यंत उपयोग होतो. मात्र मोठे म्युझिक प्रोग्रॅम करण्यासाठी दुस-या प्रकारचेच सिंथ लागतात हे अनुभवानी सांगू शकतो. उदा. रोलॅंड, कोर्ग, एलिसिस. तसेच कॅसिओ, यामाहा सुद्धा या प्रकारचे सिंथ बनवतात. व्यावसाईक दर्जाच्या सिंथ ला आवाज निर्माण करण्यासाठी वेगळा ऍम्प्लिफायर लागतो. या सर्वामुळे त्याचे बजेट चांगलेच असते. यामुळे सिंथ घेताना अनुभवी माणसांकडे जरुर चौकशी करावी अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता असते.

सिंथेसायजर साधारणत: पियानो कीबोर्ड चा वापर करुन वाजवतात. सिंथेसायजर मध्ये जे हजारो आवाज असतात, ते आपल्या सोईनुसार उपलब्ध असलेल्या अनेक बटनांपैकी एक किंवा अनेक बटनांशी जोडता येतात, जेणेकरुन ते बटन दाबल्यानंतर येणारा आवाज त्याप्रमाणे बदलता येतो. तसेच कीबोर्डच्या कोणत्या सप्तकातील कोणत्या की-रेंज मध्ये कोणता आवाज निघावा, हे सुद्धा आपण ठरवू शकतो. यालाच सिंथेसायजर प्रोग्रॅमिंग असे म्हणतात. याच प्रकारे उपलब्ध असलेले आवाज अनेकविध सेटिंग्ज द्वारा बदलून स्पेशल इफेक्ट्स पण त्यात घालता येतात जसे -एको, डीले वगैरे. तसेच काही आवाजांचे मूळ सेटिंग असे असते की, कीबोर्ड ची की दाबल्यानंतर आवाज एका विशिष्ट प्रकारे येतो पण त्या नंतर की अजून थोड्या जोरात दाबून धरल्यास आवाज बदलतो (याला कीबोर्ड भाषेत आफ्टरटच) असे म्हणतात. अर्थात मागे म्हटल्याप्रमाणे हेच आपण स्वत: साउंड डिझाईन करताना पण करु शकतो.

सिंथेसायजर च्या या अनेक प्रभावी सोईंमुळे, सिंथेसायजर वादकांवरती मोठी जबाबदारी असते. एक किंवा दोन वादकांवरती संपूर्ण मेलडीची जबाबदारी असते. त्यांनी बासरी, संतूर, वायोलीन्स, सेलो, गिटार, सॅक्सोफोन अश्या अनेक वाद्यांचे गाण्यात असलेले तुकडे अश्या सफाईने वाजवणे अपेक्षित असते की जणू ते वाद्यच वाजत आहे. मूळचे वाद्य जसेच्या तसे निघणे अशक्य असते पण वादकाने तसा आभास निर्माण करायचा असतो. यामुळेच कीबोर्ड वादकाला जरी मूळ वाद्य वाजवता आले नाही तरी चालेल पण ते कसे वाजवतात, त्याची शक्तिस्थाने, कमजोरी काय ते पाहून ते सिंथेसायजर मध्ये वाजवायचे असते. उदा. बासरी मधून एकावेळी एकच सूर निघतो हे लक्षात ठेवून कीबोर्ड असा सेट करावा लागतो की एकावेळी एकच आवाज निघेल. दुसरी की दाबताच पहिला आवाज बंद होईल. असेच सतार, सॅक्सोफोन मध्ये पण करावे लागते. तसेच या वाद्यांमध्ये मींडकाम होत असते त्यासाठी अनेक सिंथेसायजरचा मध्ये पिच-बेंडर असतो ज्याचा वापर अश्यावेळी करता येतो. सिंथेसायजरचा आवाज हा ऍम्प्लिफायर मधून येत असतो त्यामुळे तो किती मोठा ठेवायचा याचे भान सतत ठेवावे लागते. एक छोटे उदाहरण म्हणजे आम्ही सिंथ मधून संतूर वाजवत असतो. परंतु काही दिवसांपूर्वी पं.सतीश व्यास यांचे अप्रतिम संतूरवादन अतिशय जवळून बघायला मिळाले. आता या पुढे सिंथ मधून संतूर वाजवताना याचा नक्की उपयोग होईल. (मला वाटते की इथेच यंत्रापेक्षा यंत्रामागचा माणूस महत्वाचा ठरतो आणि यामुळेच रेहमानचे संगीत आणि इतरांचे तीच यंत्रे वापरुन केलेली गाणी यात केवढा तरी फरक असतो).

गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्प्युटर मधील अफाट प्रगतीमुळे सिंथेसाइजरसुद्दा कॉम्प्युटरमधून वाजवता येतात. परंतु, अजूनही ऍपल कॉम्प्युटर सारखे काही कॉम्प्युटर सोडल्यास त्याचा स्टेजवरती वापर अतिशय मर्यादित आहे. पण याचा कॉम्प्युटर वरती संगीत बनवण्यात फार मोठा फायदा होतो. या प्रकारच्या सिंथेसाइजरला सॉफ्ट-सिंथ म्हणतात ज्यामध्ये सिंथेसायजरचा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करते. त्याला आपण फक्त आपला सिंथेसायजर जोडायचा असतो. ज्या प्रकारे कॉम्प्युटर तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत आहे, त्याप्रमाणे येत्या काही वर्षांतच संपूर्णपणे सॉफ्ट-सिंथ स्टेजवरती वाजवणे अजिबात अशक्य नाही. यासाठी जो की-बोर्ड लागतो त्याला मिडि-कंट्रोलर की-बोर्ड म्हणतात, ज्यामध्ये स्वत:चे आवाज नसतात. हे कीबोर्ड सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे मिडि भाषेचा वापर करुन संदेश पाठवतात आणि सॉफ्ट्वेअर ते समजून घेऊन त्याप्रमाणे कॉम्प्युटर मधून आवाज निर्माण करते. याच प्रकारे ड्रम्स्‌ किंवा इतर तालवाद्ये सुद्धा सॉफ्ट-सिंथ द्वारा वाजवता येतात. या प्रकारच्या सिंथ ला ड्रम सिंथेसायजर म्हणतात. या प्रकारात स्वत:चे आवाज नसलेले ड्रम-पॅड कॉम्प्युटर ला जोडून त्याद्वारे वाद्य वाजवता येते. ड्रम-पॅड अनेक भागात विभागलेले असते आणि प्रत्येक भागाला एक किंवा अनेक आवाज याप्रमाणे त्याचे प्रोग्रामिंग करता येते. याप्रकारे एकाच वेळी अनेक वाद्यांचे गुंतागुंतीची वाटणारी ताल आवर्तने वाजवता येतात तसेच वेगवेगळे वाद्यांचे गट करुन त्याप्रमाणे ते स्टेज वरती वाजवता येतात.

सिंथ वाजवताना जसे वाजवण्याची कला येणे अतिशय आवश्यक आहे, तसेच त्याच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास आणि त्याचा स्टेजवरती सफाईने वापर हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. यात जर वादकाची संगीताची समज चांगली असेल तर मग फारच छान. असे जे वादक आपल्याला बघायला मिळतात त्यांचा ह्या सर्व भागांवर चांगला ताबा असतो त्याशिवाय हे होऊ शकत नाही.

आपल्या मनात या प्रकारच्या वाद्याबद्दल थोडी उत्सुकता निर्माण झाली असेल तर हा लेख यशस्वी झाला असे म्हणेन. जाता जाता संगीत रसिकांना एक विनंती अशी, की भविष्यात कधी संगीत कार्यक्रमांना गेलात तर गाणा-यांचे नेहमी प्रमाणे कौतुक कराच पण सिंथ वाजवणा-यांकडे पण पहा आणि त्यांना चांगले काम केले तर जरुर जाऊन सांगा.

गुलमोहर: 

१. PIANO / CASIO / YAMAHA वगैरे वाद्यात काळया पट्ट्यांचा २-३ २-३ असा पॅटर्न आढळतो. आपल्या पेटीत ३-२ ३-२ असा असतो>>> पेटीवर पन २-३ २-३ असाच पॅटर्न आढळतो... फक्त पेटीची लांबी मर्यादित असते.. साधारण ३ ते साडे ३ सप्तके.. म्हणजेच साधारण ३६ ते ४२ पट्ट्या.. काळ्या व पांढर्‍या मिळून...

२. एका पट्टीतल्या एका स्वराची कम्प्रता (उदा: सा), त्याच्या वरच्या पट्टीतला स्वराची कम्प्रतेच्या (Frequency) निम्मी असते.
उदा: मंद्रसप्तकातील सा ची कम्प्रता ५१२ Hz असेल तर मध्यसप्तकातील 'सा' ची १०२४ Hz तर तारसप्तकातील 'सा' ची २०४८ Hz असते.>>> हे बरोबर आहे. फिजिक्स मधील बेसिक आवाजाचा नियम आहे हा... कॉलेज मध्ये ११-१२ वीत सोनो मीटरचा प्रयोग असायचा त्याच्यात दोन सा तरी नक्कीच चेक करता यायचे...

३. एका सप्तकात (Octave) मध्ये कोमल, तीव्र व शुद्ध (flat & sharp) धरुन १२ स्वर असतात.>> हे पण बरोबर आहे.. पण हे भारतीय संगीताच्या बाबतीत म्हणता येईल.. पाश्चात्यच्या बाबतीत खात्री नाही.. त्याच्यात C# (major) scale म्हटल्यावर सगळे शुद्ध स्वरच पकडतात.. कोमल आणि तीव्र स्वर धरुन जी पट्टी तयार होते त्याला काय म्हणतात ते मलाही अजून कळालेले नाही..

प्रशांत, मस्त लेख आणि तुझी आयडीया आवडलेली आहे. लवकरात लवकर तसा व्हिडीओ तयार कर...

मी पण शिकत होतो मध्यंतरी सिंथ.. पण मग काही कारणानी खंड पडला.. मग गिटार शिकावे असे मनात आले म्हणून ते सुरु केले पण ते ही बंद केले... कारण कंटाळा.. तबला तर जवळपास ८ वर्ष शिकलो... पण सलग नसल्यामुळे तिकडेही कंटाळा.. सध्या परत काही तरी सुरु करावे असा विचार करतो आहे पण परत कंटाळा पाचवीला पूजलेलाच आहे... Sad

खुपच छान माहिती.....
शाळेत असताना ह्या वाद्याशी थोडीफार झटापट करुन मी हा छंद सोडुन दिला (इतर अनेक छंदांसारखा Wink ) आणि आज पहिल्यांदाच ह्या गोष्टीचे वाइट वाटतय Sad

सिंथेसायजरचा विषय आहे... आम्हा पेटीवाल्याना चर्चेत भाग घेणं अलाउड आहे ना? Happy

कानावर पडतील ती गाणी पेटीवर वाजवणे, असं करत आता सफाईदारपणे पेटी वाजवतो.. अर्थात सफाई फक्त सुगम गाण्यांपुरती... कव्वाली, नाट्यगीत, भजनी मंडळी,भिकारी वाजवतात तशी इ. मधली पेटी अजून न्हाई येत Sad

की बोर्डही एखादा घ्यावा म्हणतो आहे.. बघू जमेल तेंव्हा घेईन..

थोडं पेटीबद्दल ... पेटीचा शोध पॅरीसमध्ये अलेक्क्षाम्डर डिबेन याने लावला.. सन साधारणपणे १७७०.... हे वाद्य त्यानी खरे तर बायकांसाठी विकसित केले होते.. १८०० नंतर युरोपियन्स भारतात आले, त्यांच्यामार्फत पेट्या भारतात आल्या.. संध्याकाळच्या वेळी युरोपियन लोक कुटुंबियांसमवेत अंगणात पेटी घेऊन टाइमपास करत असायचे... त्यातून हे वाद्य भारतातल्या लोकानाही आवडले.. आणि १८५८ नंतर इंग्रजी सत्तेबरोबरच पेटीचीही सत्ता भारतात पसरली...

पूर्वी कीर्तनात वाद्य नसायचे... बुवा नुसतेच गोष्ट सांगायचे आणि अधून्मधून गायचेही.. पण त्यातून ते लवकर दमायचे... पेटीमुळे कीर्तनात सफाई आली.. अधून्मधून संगीत आल्याने बुवा लोकाना श्वास घ्यायला वेळ मिळू लागला आणि कीर्तनात सफाई आली, जी आजही आपण बघू शकतो.. पेटीशिवाय कीर्तन हे आज आपण कल्पनेत तरी कल्पू शकू का?

त्यानंतर , लोकसंगीत, लावणी, कजरी, भजनी मंडळी, कव्वाली, नाट्यसंगीत ,रस्त्यावरचे भिकारी, संगीत शिकणारे ( ! Happy ) लोक.... अशा सगळीकडे पेटीचे साम्राज्य पसरले...

आजचे सिंथेसायजर म्हणजे पेटीचे मॉडर्न रूप, पण हे पूर्ण खरेही नाही.. सिंथेसायजर हे एक वेगळे वाद्यच कन्सीडर करायला हवे... कीबोर्ड वाध्ये ही भारतीय संगीताला मारक मानणारेही लोक आहेत.. त्यांचेही मत चुकीचे नाही.. भारतीय संगीत हे श्रुतींवर आधारीत आहे.. आपल्या सप्तकात २२ श्रुती येतात, त्यातील ठराविक स्वर ज्या त्या रागात वापरले जातात.. पण श्रुतींमधील भेद अगदी अल्प असतात.. बर्‍याच वेळेला सामन्य माणसाला ते लक्षातही येत नाही.. त्यामुळेच श्रुतींवर आधारीत संगीत असूनही १२ च स्वर असणारी पेटीदेखील शास्त्रीय संगीतात सर्रासपणे चालून जाते... कीबोर्डमधील प्रत्येक पुढचा स्वर मागच्या स्वरापेक्षा साधारणतः ५ टक्के अधिक असतो.. हे गुणोत्तर सर्व स्वरांमध्ये सेम असते... म्हणून कीबोर्डला इक्विटेंपर्ड ( किंवा नुसतेच टेंपर्ड ) वाद्य म्हणतात.. ( याउलट, भारतीय संगीतातल्या, जवळच्या दोन श्रुतींमधील अंतर सारखे नसल्याचे दिसेल.. )

( ही माहिती डॉ. विद्याधर ओक यांच्या हार्मोनियम वादनाच्या कार्यक्रमात ऐकली आहे.. कीबोर्ड इन्स्ट्मेंट्वर हुबेहुब गाण्यातील बारीक जागाही कशा वाजवायच्या हे पहायला/ऐकायला हा कार्यक्रम अगदी उपयुक्त आहे.. )

मस्त माहिती. मला यातल जास्त काही कळत नाही.
सिंथ म्हणल्यावर मला फ्रेंड्स मधे रॉस ने वाजवलेला सिंथ आठवला! सिंथमधुन कुठलेही आवाज निघु शकतात हे तो जणु सिद्ध करत होता.... http://www.youtube.com/watch?v=yLa8Br569gA

मस्तच लेख रे.. त्या सिंथची तांत्रिक खुब्या लक्षात आल्या की वाजवायला अजून मजा येते..

सध्या आमच्या घरात आई-वडिल सिंथेसयझर शिकत आहेत.. त्यामुळे एक मस्त सिंथ आलेला आहे.. मी घरी गेलो की भरपूर वाजवत बसतो.. (मला सिंथवर फक्त शंकर-जयकिशनचीच गाणी वाजवता येतात Sad ).. सही वाद्य आहे हे..

..

टोनर क्वॉलिटी मध्ये कॉर्ग सगळ्यात सरस म्हणता येईल का? >>> अस नक्की सांगता येत नाही. प्रत्येक सिंथ वेगळा असतो...

मला सिंथवर फक्त शंकर-जयकिशनचीच गाणी वाजवता येतात >>>

टण्या - मग इतर गाणी वाजवण्यात काय अडचण आहे? गाणे हे गाणे असते....

हिम्स्कुलः आपल्याकडच्या हार्मोनियम मध्ये २-३-२-३ असाच पॅटर्न असतो.
म्हणजे एकदम डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ काळ्या पट्ट्यांच्या समूहाने सुरुवात होते तर सिन्थेसायझर वर हीच ३ च्या समूहाने सुरुवात होते. मला वाटते वरती लिहीताना मी उलटे लिहीले असावे. निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद.

जामोप्या: छान माहिती.

प्रशान्तः खरेच अशा क्लिप्स बनवता आल्या तर खूप छान होईल. निदान एखादीतरी निश्चित बनवा.

माझ्या मते पेटी किन्वा सिन्थेसायझर हा "अ‍ॅनअ‍ॅलॉग टू डिजिटल कन्वर्जन" (ADC) चा आद्य प्रकार म्हणता येईल. म्हणजे एका सप्तकातल्या ध्वनीलहरी १२ स्टेप्स मध्ये विभागल्या जातात. तर श्रुतींच्या संक्ल्पनेप्रमाणे त्याचे २२ भाग केले जातात. (माझ्या माहितीप्रमाणे हे समप्रमाणात असतात पण जामोप्यानी लिहील्याप्रमाणे काही विशीष्ट नियमाप्रमाणे ते विषम असू शकतील). मूळतः अमर्याद (Infinite) भाग असू शसणार्‍या बाबींना मर्यादित (Finite) भागात विभागण्यास सोप्या भाषेत Digitization (अंकीकृत?) म्हणता येईल. जितके जास्त भाग तितके अधिक रेझोल्यूशन.

ह्याप्रमाणे वर्गीकरण केल्यास व्हायोलीन हे अ‍ॅनॅलॉग वाद्य तर गिटार (त्यात फ्रेट्स असल्यामुळे) डिजीटल म्हणता येईल.

आपल्या कानाची ऐकण्याची जी क्षमता आहे (तीव्रता व कम्प्रता Volume & Frequency) ही नॅचरल लॉगॅरिथमिक स्केलवर आधरीत आहे. म्हणुनच आपला कान साधारणपणे २० ते २०००० इतक्या कम्प्रतेच्या ध्वनीलहरी ग्रहण करु शकतो. (जरी बरेचसे आवाज हे १ ते ३ किलो हर्ट्झ च्या आतलेच असतात)

आता काही प्रश्नः

कोणाला आपल्या मन्द, मध्य व तार सप्तकातील frequency ranges माहित आहेत का?

पाश्चात्य कीबोर्ड्स मध्ये ४-५ तर कधी कधी ७ सप्तके Octaves देखील पाहिली आहेत. त्यांचे आपल्या ३ सप्तकान्शी कसे जुळते? उत्तमातला उत्तम गायकाचा स्वरही मला वाटते २.५ सप्तकात फिरतो (चु. भु. दे. घे.) असे असताना बाकीच्या सप्तकांचा उपयोग फक्त सहयोगी संगीतासाठीच (accompaniment music)
असतो का?

मन्द सप्तक म्हणजेच खर्ज किंवा आपण खर्जातला आवाज म्हणतो ते असते का? (खर्ज म्हणजे लो फ्रीक्वेन्सी एवढे नक्की :))

तसेच मला पडलेला अजून एक प्रश्न म्हणजे, पेटी हे सुद्धा पाश्चात्य वाद्य आहे. त्याची आपल्या सा रे ग म शी सांगड कशी पडली?

आपल्या पेटीत आपण 'सा' हा स्वर पेटीतल्या कुठल्याही बटणापासून (गायकाच्या स्वराशी मिळवून) वाजवतो. मात्र कीबोर्ड मध्ये C चे स्थान नेहमीच ३ काळ्या पट्ट्यांच्या समूहाच्या पहिल्या पट्टीच्या खालची पांढरी पट्टी हे असते. नवीन कीबोर्डमधल्या सोयीप्रमाणे त्या बटणाचा स्वर transpose ही क्रिया वापरुन वर किन्वा खाली adjust करता येतो. पण मग हेच पूर्वी कसे केले जायचे? (चु. भु. द्या. घ्या.)

गीटार किंवा पियानो मध्ये Chords वाजवता येतात. (उदा: C Chord = C + E + G) आपल्याकडील संगीतात त्याचे समरुप कोणते? आपल्याकडे सूर लावताना सा-प-सा असे combination वापरतात, त्याचा ह्याच्याशी काही संबंध?

*** वरील वर्णनात बर्‍याच ठिकाणी मराठी शब्द न आठवल्याने स्वतःवर चरफडून ईंग्लीश शब्द वापरले आहेत तर काही ठिकाणी भलते(सलते)च मराठी शब्द वापरले असावेत, त्याबद्दल क्षमस्व***

प्रशांत...
माहिती बद्दल धन्यवाद... लेख वाचताना काही आठवणि जाग्या झाल्या...
>खूप वर्षां पूर्वी या वाद्याच्या प्रेमात पडलो, तो सुद्धा 'विवेक परांजपे' या निष्णात 'सिंथेसायझर' वादकामुळे... एकावर-एक असे तीन सिंथेसायझर लावून पूर्ण ऑर्केस्ट्रा सांभाळणार्‍या या कलाकाराचं आज देखिल तेवढंच कौतूक वाटत आहे...
>सर्व प्रथम पाहिलेला 'सिंथेसायझर' म्हणजे CASIO ने काढलेलं VL-1 हे 'पील्लू'. या सिंथेसायझर वर केलेला कार्यक्रम देखिल आठवतोय. कलाकार होते - अस्मादिक, विनय देसाई, महेश मुतालिक आणि ईतर...
>१९८८ मधे विनयने प्रेझेन्ट म्हणून दिलेला YAMAHA-PSS 270 (आज देखिल मी त्यावर तेव्हढ्याच प्रेमाने गाणि वाजवतोय), शंभर वाद्यांची Sound Bank असणारं हे वाद्य त्याकाळी 'कुडाळ' आणि आजुबाजुच्या गावात भयंकर फेमस झालेलं - आणि अर्थातच मी ('गाड्या बरोबर नळ्याची यात्रा' हा प्रकार).

किरण...
पाश्चात्य कीबोर्ड्स मध्ये ४-५ तर कधी कधी ७ सप्तके Octaves देखील पाहिली आहेत. त्यांचे आपल्या ३ सप्तकान्शी कसे जुळते?>> वाद्य-संगितातला कुठलाही सूर/ स्वर हा तीन सप्तकातच वाजतो. Piano किंवा Synthesizer वाजवताना डाव्या हाताने Chords आणि उजव्या हाताने Lead वाजवणे हा प्रकार चालतो, जो आपल्या ३ सप्तकांच्या 'पेटी/ संवादिनी' मधे शक्य होत नाहि...

भारतीय संगित 'स्वर' आणि 'रागा' वर आधारीत आहे, तर पाश्चात्य संगित Scale वर आधारित आहे. उदा. गाण्याची सुरुवात 'काळी दोन' मधुन होते असं सांगितलं तर आपला साथीदार बरोब्बर तो स्वर पकडून गाण्याला साथ करेल. तेच, पाश्चात्य पद्धती प्रमाणे शिकलेल्याला D# सांगुन त्याचा Major/ Minor सांगावा लागतो.
हल्लिच समजलेली गोष्ट सांगतो - भारतीय संगितातला 'भूप' राग आणि पाश्चात्य संगिता मधलं PENTATONIC Scale एकच आहे. दोन्हि मधे पाचच 'शुद्ध स्वर' लागतात. पण PENTATONIC Scale मधे परत Major आणि Minor हे दोन प्रकार आहेत. या दोन्हीमधे लागणारे 'सा' आणि 'प' तेवढेच Common आहेत, उरलेले तीन स्वर पूर्णपणे वेगळे आहेत...

...

पेटी हे सुद्धा पाश्चात्य वाद्य आहे. त्याची आपल्या सा रे ग म शी सांगड कशी पडली?

१२ स्वरांचे सप्तक ही कल्पना प्रत्येक देशात होतीच.. पण हे १२ स्वर प्रत्येक देशाचे थोड्याफार फरकाने होते.. डिजिटलच्या जमान्यात एक फ्रिक्वेस्नीला सगळे सेट केले गेले.

पूर्वी युरोपात चर्चमध्ये पियानो असायचे. प्रत्येक पियानोचे सा ( म्हणजे सी किंवा जो असेल तो) वेगळेवेगळे सेट असायचे.. फादरच्या आवाजानुसार ते असणार.

पण एकदा कुठला तरी एक राजा इजिप्तमधल्या पिरॅमिडात गेला होता.. तिथे एक दगड आहे , तो आपटला की आवाज येतो म्हणे.. तो आवाज त्याला आवडला.. त्याची फ्रिक्वेन्सी ४४० ह्र्झ भरली आणि त्याने युरोपातली सगळी वाद्ये ४४० ला सा ( म्हणजे पहिला स्वर.. ) करुन केली असे म्हणतात.

स्वर आणि त्यातली गणिते यासाठी उपयुक्त पुस्तक : २२ श्रुती अ‍ॅन्ड मेलोडियम ( डॉ. विद्याधर ओक) . पुस्तक इंग्लिश आहे.. छान आहे..

अजुन एक कल्पना - इंटरनेट द्वारा की बोर्ड किंवा गिटार शिकण्यात कुणाला स्वारस्य आहे का?

जे लोक फार लांब आहेत आणि त्यांना अजिबात काहीच सोय नसेल तर हा प्रयोग करायला काहिच हरकत नसावी.

स्काइप किंवा गूगल वापरुन करता येईल...

मला पण आवडेल .. माझ्याकडे पण की-बोर्ड आहे पण 'Logitech' चा आहे Proud
प्रशांत आणि इतर मंडळी, इथे भारतात शिकण्यासाठी कुठला की-बोर्ड चांगला पडेल? (म्हणजेच आखुडशिंगी, बहुदुधी, लाथ न मारणारी गाय वगैरे सारखं ... :))

विवेक, महेश मुतालिक म्हणजे ते मिरजेत असतात ते का?

जाणकार लोकहो, ही कॉर्ड्स काय भानगड असते? म्हणजे दोन-चार स्वर एकदम वाजवतात (जे कुठल्याच भारतीय वाद्यात वा संगीतात नसतं) इतपत माहिती आहे.. पण म्हणजे नेमकं कसं.. आपल्या सारख्या एकेक खणखणीत स्वरावर वाढलेल्यांना ते उमजत नाही म्हणुन विचारतोय..

सही लेख आहे.

माझी मुलगी ५१/२ - ६ वर्षांची झाल्यावर अचानक तिने खेळन्यातल्या सिंथवर जन गन मन वाजवून दाखविले. लगेच यामाहा सिंथ आणला. आता तिला कुठलेही हिंदी गाणे एक दोनदा ऐकल्यावर बर्‍यापैकी वाजवता येते. ( गाण लक्षात राहायला पाहिजे ना? ) पण एकदम भारी, सकाळ संध्याकाळ मुड लागला की आम्हाला खोलीतून बाहेर हाकालते अन थोड्यावेळाने बोलावून ऐकवुन दाखवते. Happy आता रितसर शिकत आहे.

आम्ही सध्या पेटी घ्यावी का सिंथवरच वाजवु द्यावे ह्या द्वंदात आहोत. कृपया सांगाल का?

टण्या... महेश मुतालिक.. बहूतेक बरोबर.. तो सांगलीचा आहे आणि मस्त गातो. मध्यंतरी एक्/दोन चित्रपटांचे पार्श्वगायनही केले होते. आता काय करतो माहीत नाही.. त्याकाळी आम्ही वाट्टेल ती वाद्य वाजवून संगीत निर्माण करायचा प्रयत्न करायचो. आमचा वाद्यवृंद म्हणजे...
एक तबला, एक पेटी (कधीकधी), एक बुलबुलतरंग, तारेत अडकवलेली कोक/पेप्सीची झाकणं, मातीच्या मडकीवर प्लॅस्टीक बांधून केलेले बोंगो... आणि कधी हाती आला तर तो Casio सिंथ... नंतर काही दिवस एक गिटार ही होतं.. पण ते वाजवता यायचं नाही म्हणून त्यावर नुसतीच बोटं फिरवून अ‍ॅक्टींग चालायची... Lol

आणि हो, हा ऑर्केस्ट्रा घेऊन आम्ही महेशला गायला लावायचो....

(विषयांतरासाठी क्षमस्व...)

केदार, सहिच..मला तरी वाटत पेटी घेउन द्या तिला. Happy

बाकी लेख मस्तच. आमच्याकडेही चालू असतच वर किरणने लिहिल्याप्रमाणे. Happy

प्रशांत...
इंटरनेट द्वारा की बोर्ड किंवा गिटार शिकण्यात कुणाला स्वारस्य आहे का?>> मी स्वतः शिकायला तय्यार आहे. कधी सुरू करताय?...

टण्या, विनय...
दोघांचाही अंदाज बरोबर आहे - महेश मुतालिक 'सांगली-मिरज'चा आहे. आयडिया 'सा-रे-ग-म-प' च्या 'पुन्हा नवे स्वप्न स्वरांचे' पर्वाचा 'उप-विजेता'. सध्या ऐकलेलं त्याचं Latest गाणं म्हणजे 'मराठी स्वाभिमान गीत'... थोडंसं विषयांतर होतंय याची कल्पना आहे...

टण्या...
ही कॉर्ड्स काय भानगड असते?>> Chords हा प्रकार Western Music मधून आलेला आहे, ज्या मुळे भारतीय संगित - विशेषतः Light Music खुपच श्रवणिय झालं.
Western Music मधे एका Octave मधे बारा स्वर प्रमाण मानले आहेत, ते असे - C, C#, D, D#, E, F, F#, G, G#, A, A#, B. या प्रत्येक स्वराची दोन Scales प्रमाण बनवलेली आहेत, ती म्हणजे Major आणि Minor. आता एक Chord वाजवण्यासाठी किमान तीन स्वरांचे Combination करावे लागते. भारतीय संगिता प्रमाणे Major Chord मधे लागणारे तीन स्वर म्हणजे - सा, ग, प आणि Minor Chord मधे लागणारे तीन स्वर म्हणजे - सा, कोमल ग, प
Western Music प्रमाणे C major scale - C, D, E, F, G, A, B, C... तेव्हा C major chordमधे लागणारे स्वर असतील - C, E, G...
Western Music प्रमाणे C minor scale - C, D, D#, F, G, G#, A#, C... तेव्हा C minor chordमधे लागणारे स्वर असतील - C, D#, G...
एखाद्या गाण्यात गायक/ गायीका ओळ गात असताना त्याच्या पार्श्वभुमीवर आपल्याला वाद्यांची सुरावट ऐकु येत असते, ती सुरावट म्हणजे बरेच वेळा या सुरेल Chords चा केलेला भरणा असतो, ज्यामुळे गाणं उघडं न वाटता व्यवस्थित भरलेलं आणि श्रवणिय होतं. Western Instrumentsवर Chords वाजवणं सोपं पडतं उदा. पेटी/ संवादिनी, अ‍ॅकॉर्डीयन, पीयानो, गीटार ई... भारतीय Instrumentsवर Chords वाजवणं खूप कठिण पडतं उदा. फ्लूट/ बासरी, व्हायोलीन, सारंगी, सतार, रुद्रवीणा ई...

धन्यवाद विवेक..
>>> भारतीय Instrumentsवर Chords वाजवणं खूप कठिण पडतं उदा. फ्लूट/ बासरी, व्हायोलीन, सारंगी, सतार, रुद्रवीणा ई... >>>> सतारीचे माहिती नाही.. पण बासरीवर कॉर्ड्स वाजवणे अशक्यच आहे ना? तसेच माउथ ऑर्गनवर गाणं भरण्यासाठी जे केलं जातं ते अप्रत्यक्षपणे कॉर्ड्सच की.. माका माहितीच नव्हता..

टण्या, कॉर्डस कोणत्या वाद्यावर वाजवता येतात त्यासाठी एकदम सोप्पी पद्धत...
ज्या वाद्यावर एकाच वेळी एका पेक्षा जास्त सूर वाजवता येतात ती वाद्य कॉर्डस वाजवण्यासाठी वापरता येतील.. जसे गिटार, मेंडोलिन, की बोर्ड, पियानो, इ. -
ते जे मोठ्ठं व्हायोलिन असतं ना उलट धरून वाजवतात ते. बहुतेक चेलो/ सेलो.. ते पण वापरतात कॉर्डस साठी..
नेहमीच्या व्हायोलिन वर पण कॉर्डस जमू शकतील पण अवघड जाईल कारण आकार.. आणि खूपच जवळ जवळ असलेले सूर.. पण अगदी निवांत वाजवायचे असेल तर प्रयत्नपूर्वक जमू शकेल..
सतारीच्या बाबतीत अपोआपच कॉर्डस वाजतील अशी सोय असते.. अर्थात त्याला कॉर्डस असे म्हणता येणार नाही पण साधारण त्याचा परिणाम तसाच होतो... म्हणजे सुरांचा भरणा ऐकू येतो...
सतारीला दोन तारांचे संच असतात एक मुख्य आणि दुसरा दुय्यम.. मुख्य संचात चार तारा असतात आणि दुय्यम संचात बहुतेक बारा तारा असतात.. ह्या सर्व तारा जर योग्य स्वरात लावलेल्या असतील तर resonance नी दुय्यम संचातल्या तारा सुंदर झंकार निर्मण करतात.. जरा विषयांतर होतय पण रहावत नाहीये म्हणून लिहिलय

हिम्स...
जरा विषयांतर होतय पण रहावत नाहीये म्हणून लिहिलय>> विषयांतर होऊन 'अ-संबद्ध' आणी 'निरुपयोगी' माहिती मिळण्या पेक्षा, 'उपयोगी आणि सु-संबद्ध' माहिती मिळणं कधीही चांगलं. माझ्याकडची 'माहिती' मी सध्या शिकत असलेल्या 'अल्प-संगित-ज्ञाना'वर आधारित होती. तुम्ही दिलेली माहिती त्या पेक्षा महत्वाची आहे...

Pages