की बोर्ड / सिंथेसायजर

Submitted by prashant_the_one on 27 May, 2010 - 10:31

की बोर्ड / सिंथेसायजर

की बोर्ड किंवा सिंथेसायजर (सिंथ) ह्या वाद्याबद्दल अनेक जणांना खूप कुतूहल आहे. मी गेले दहा वर्षांपासून व्यावसाईक दर्जाचा की बोर्ड वाजवत आहे. अजून माझे स्वत:चेच कुतूहल कमी झालेले नाही. तेव्हा ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांना याबद्दल किती कुतूहल असेल याची मी कल्पना करू शकतो. त्यामुळे याबद्दल अधिकारवाणीने नाही, पण अनुभवाने जे मला माहिती आहे ते सांगावे असे वाटले ते सांगतो. हे वाद्य, त्याची निर्मिती, वादन या संबंधी येणारे अनेक शब्द/व्याख्या इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन करतोय, कारण खरेतर शुद्ध मराठी मध्ये त्या मला लिहीताना (आणि कदाचित अनेकांना समजताना) अडचणी येतील.

सिंथेसायजर हे इलेक्ट्रोनिक वाद्य आहे, ज्यातून अनेक प्रकारचे आवाज वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीतून निर्माण करता येतात. यातून आवाज निर्माण न होता थेट इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतो, जो हेडफोन किंवा स्पीकर मधून ऐकू येतो. यामुळे यातून अनेक प्रकारचे आवाज हुबेहूब काढता येतात. जसे फ्लूट, संतूर, वायोलिन... वगैरे. सिंथेसायजर जरी १९५०-१९६० नंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणात वापरत आले, तरी आश्चर्य वाटेल पण पहिला सिंथेसायजर शोधला गेला होता १८७६ मध्ये !! मात्र रॉबेर्ट मूग याला सिंथेसायजर लोकप्रिय होण्याचे मोठे श्रेय जाते. १९७० नंतर सॉलिड स्टेट ट्रान्झिस्टर मुळे सहज कुठेही नेता येतील, असे सिंथेसायजर्स तयार होऊ लागले. १९८० च्या दशकात “यामाहा” सारख्या कंपन्यांनी छोटे सिंथेसायजर बनवायला सुरुवात केली. लवकरच मिडि (म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस) या सिंथेसायजर भाषेचा विकास झाला आणि त्यामुळे दोन सिंथेसायजर एकमेकात याद्वारे संवाद साधू शकले. तसेच सिंथेसायजरचे प्रोग्रॅमिंग (जसे कॉम्प्युटरचे करतात तसे) करता येऊ लागले.

सिंथेसायजर अनेक प्रकारचे असतात. मुख्य दोन प्रकार म्हणजे हौशी आणि व्यावसाईक दर्जाचे. सर्वसाधारणपणे, ज्या सिंथ मध्ये स्पीकर्स असतात, ते हौशी प्रकारात मोडतात (काही अपवाद आहेत). या प्रकारच्या सिंथ मध्ये, मर्यादित आवाज असतात तसेच त्या आवाजांचा दर्जा पण कमी असतो. उदा. कॅसिओ सीटिके सिरिज, यामाहाचे पीएसआर सिरिज. त्या मध्ये प्रोग्रॅमिंग करण्याची सुविधा बरीच कमी असते. तरीसुद्धा, आजकाल बाजारात अगदी साधारण (म्हणजे १००-१५० डॉलर्स) ते जवळजवळ व्यावसायिक दर्जाचे (१०००-१५०० पर्यंत) हौशी सिंथ मिळतात आणि ते खूपच दर्जेदार असतात. तसेच, ५०० पासून ४-५ हजार पर्यंत व्यावसायिक दर्जाचे सिंथ पण मिळतात. दोन्ही प्रकारच्या सिंथचे उपयोग वेगवेगळे असतात. हौशी प्रकारचे शिकण्यासाठी ते छोटे-मोठे प्रोग्रॅम वाजवण्यापर्यंत उपयोग होतो. मात्र मोठे म्युझिक प्रोग्रॅम करण्यासाठी दुस-या प्रकारचेच सिंथ लागतात हे अनुभवानी सांगू शकतो. उदा. रोलॅंड, कोर्ग, एलिसिस. तसेच कॅसिओ, यामाहा सुद्धा या प्रकारचे सिंथ बनवतात. व्यावसाईक दर्जाच्या सिंथ ला आवाज निर्माण करण्यासाठी वेगळा ऍम्प्लिफायर लागतो. या सर्वामुळे त्याचे बजेट चांगलेच असते. यामुळे सिंथ घेताना अनुभवी माणसांकडे जरुर चौकशी करावी अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता असते.

सिंथेसायजर साधारणत: पियानो कीबोर्ड चा वापर करुन वाजवतात. सिंथेसायजर मध्ये जे हजारो आवाज असतात, ते आपल्या सोईनुसार उपलब्ध असलेल्या अनेक बटनांपैकी एक किंवा अनेक बटनांशी जोडता येतात, जेणेकरुन ते बटन दाबल्यानंतर येणारा आवाज त्याप्रमाणे बदलता येतो. तसेच कीबोर्डच्या कोणत्या सप्तकातील कोणत्या की-रेंज मध्ये कोणता आवाज निघावा, हे सुद्धा आपण ठरवू शकतो. यालाच सिंथेसायजर प्रोग्रॅमिंग असे म्हणतात. याच प्रकारे उपलब्ध असलेले आवाज अनेकविध सेटिंग्ज द्वारा बदलून स्पेशल इफेक्ट्स पण त्यात घालता येतात जसे -एको, डीले वगैरे. तसेच काही आवाजांचे मूळ सेटिंग असे असते की, कीबोर्ड ची की दाबल्यानंतर आवाज एका विशिष्ट प्रकारे येतो पण त्या नंतर की अजून थोड्या जोरात दाबून धरल्यास आवाज बदलतो (याला कीबोर्ड भाषेत आफ्टरटच) असे म्हणतात. अर्थात मागे म्हटल्याप्रमाणे हेच आपण स्वत: साउंड डिझाईन करताना पण करु शकतो.

सिंथेसायजर च्या या अनेक प्रभावी सोईंमुळे, सिंथेसायजर वादकांवरती मोठी जबाबदारी असते. एक किंवा दोन वादकांवरती संपूर्ण मेलडीची जबाबदारी असते. त्यांनी बासरी, संतूर, वायोलीन्स, सेलो, गिटार, सॅक्सोफोन अश्या अनेक वाद्यांचे गाण्यात असलेले तुकडे अश्या सफाईने वाजवणे अपेक्षित असते की जणू ते वाद्यच वाजत आहे. मूळचे वाद्य जसेच्या तसे निघणे अशक्य असते पण वादकाने तसा आभास निर्माण करायचा असतो. यामुळेच कीबोर्ड वादकाला जरी मूळ वाद्य वाजवता आले नाही तरी चालेल पण ते कसे वाजवतात, त्याची शक्तिस्थाने, कमजोरी काय ते पाहून ते सिंथेसायजर मध्ये वाजवायचे असते. उदा. बासरी मधून एकावेळी एकच सूर निघतो हे लक्षात ठेवून कीबोर्ड असा सेट करावा लागतो की एकावेळी एकच आवाज निघेल. दुसरी की दाबताच पहिला आवाज बंद होईल. असेच सतार, सॅक्सोफोन मध्ये पण करावे लागते. तसेच या वाद्यांमध्ये मींडकाम होत असते त्यासाठी अनेक सिंथेसायजरचा मध्ये पिच-बेंडर असतो ज्याचा वापर अश्यावेळी करता येतो. सिंथेसायजरचा आवाज हा ऍम्प्लिफायर मधून येत असतो त्यामुळे तो किती मोठा ठेवायचा याचे भान सतत ठेवावे लागते. एक छोटे उदाहरण म्हणजे आम्ही सिंथ मधून संतूर वाजवत असतो. परंतु काही दिवसांपूर्वी पं.सतीश व्यास यांचे अप्रतिम संतूरवादन अतिशय जवळून बघायला मिळाले. आता या पुढे सिंथ मधून संतूर वाजवताना याचा नक्की उपयोग होईल. (मला वाटते की इथेच यंत्रापेक्षा यंत्रामागचा माणूस महत्वाचा ठरतो आणि यामुळेच रेहमानचे संगीत आणि इतरांचे तीच यंत्रे वापरुन केलेली गाणी यात केवढा तरी फरक असतो).

गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्प्युटर मधील अफाट प्रगतीमुळे सिंथेसाइजरसुद्दा कॉम्प्युटरमधून वाजवता येतात. परंतु, अजूनही ऍपल कॉम्प्युटर सारखे काही कॉम्प्युटर सोडल्यास त्याचा स्टेजवरती वापर अतिशय मर्यादित आहे. पण याचा कॉम्प्युटर वरती संगीत बनवण्यात फार मोठा फायदा होतो. या प्रकारच्या सिंथेसाइजरला सॉफ्ट-सिंथ म्हणतात ज्यामध्ये सिंथेसायजरचा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर करते. त्याला आपण फक्त आपला सिंथेसायजर जोडायचा असतो. ज्या प्रकारे कॉम्प्युटर तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत आहे, त्याप्रमाणे येत्या काही वर्षांतच संपूर्णपणे सॉफ्ट-सिंथ स्टेजवरती वाजवणे अजिबात अशक्य नाही. यासाठी जो की-बोर्ड लागतो त्याला मिडि-कंट्रोलर की-बोर्ड म्हणतात, ज्यामध्ये स्वत:चे आवाज नसतात. हे कीबोर्ड सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे मिडि भाषेचा वापर करुन संदेश पाठवतात आणि सॉफ्ट्वेअर ते समजून घेऊन त्याप्रमाणे कॉम्प्युटर मधून आवाज निर्माण करते. याच प्रकारे ड्रम्स्‌ किंवा इतर तालवाद्ये सुद्धा सॉफ्ट-सिंथ द्वारा वाजवता येतात. या प्रकारच्या सिंथ ला ड्रम सिंथेसायजर म्हणतात. या प्रकारात स्वत:चे आवाज नसलेले ड्रम-पॅड कॉम्प्युटर ला जोडून त्याद्वारे वाद्य वाजवता येते. ड्रम-पॅड अनेक भागात विभागलेले असते आणि प्रत्येक भागाला एक किंवा अनेक आवाज याप्रमाणे त्याचे प्रोग्रामिंग करता येते. याप्रकारे एकाच वेळी अनेक वाद्यांचे गुंतागुंतीची वाटणारी ताल आवर्तने वाजवता येतात तसेच वेगवेगळे वाद्यांचे गट करुन त्याप्रमाणे ते स्टेज वरती वाजवता येतात.

सिंथ वाजवताना जसे वाजवण्याची कला येणे अतिशय आवश्यक आहे, तसेच त्याच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास आणि त्याचा स्टेजवरती सफाईने वापर हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. यात जर वादकाची संगीताची समज चांगली असेल तर मग फारच छान. असे जे वादक आपल्याला बघायला मिळतात त्यांचा ह्या सर्व भागांवर चांगला ताबा असतो त्याशिवाय हे होऊ शकत नाही.

आपल्या मनात या प्रकारच्या वाद्याबद्दल थोडी उत्सुकता निर्माण झाली असेल तर हा लेख यशस्वी झाला असे म्हणेन. जाता जाता संगीत रसिकांना एक विनंती अशी, की भविष्यात कधी संगीत कार्यक्रमांना गेलात तर गाणा-यांचे नेहमी प्रमाणे कौतुक कराच पण सिंथ वाजवणा-यांकडे पण पहा आणि त्यांना चांगले काम केले तर जरुर जाऊन सांगा.

गुलमोहर: 

उत्तम माहिती दिलीत. सिंथेसायजर हे वाद्य म्हणजे छोटा पियानोच असे वाटत असे, तसेच बँडवादकांच्या ताफ्यात सिंथेसायजर हे मुख्य संयोजकाचे (सारखे) काम करते असे वाटल्याने पण हे कामचलाऊ वाद्य/उपकरण आहे असे वाटायचे :-(. पण नंतर या सिंथेसायजरची विस्तृत व जवळून ओळख झाल्यावर कळाले की क्या चीज है ये :-).

इथे ही माहिती दिल्याबदल धन्यवाद.

मला सिंथेसायझरवर सहज गाणी वाजवतात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि थोडासा हेवाही वाटतो Happy
छान लेख!

हे वाद्य शिकायला (म्हणजे कुठलेही गाणे वाजवता येण्यासाठी क्षमता यायला किती दिवस लागतात?)

वाह वाह !! सिंथेसायझर माझे आवडते वाद्य ! ५-६ वर्षं शिकूनही आता काहीच येत नाही, त्यामुळे आता हा लेख वाचुन परत शिकायची उबळ आलीय !
लेख मस्तच जमलाय ! बुकमार्क करून ठेवणार मी..

mansmi18 ,

सिंथेसायजर वरती किंवा कोणत्याही वाद्यावर गाणी शिकणे हे मुख्यत: जो शिकणार आहे त्याच्या सांगीतिक क्षमतेवर आणि नंतर त्या व्यक्तीच्या शिक्षकावर अवलंबून असते.

एखादी व्यक्ती इतर गोष्टीत (व्यवसाय, क्रीडा, इतर छंद) या मध्ये अतिशय तरबेज असून संगीत दृष्ट्या संपूर्ण "अशिक्षित" किंवा असमर्थ असू शकते. माझ्याकडे काही लोकं शिकायला येऊन गेले आहेत ज्यांना काही काळानंतर मी स्वत: सांगितले आहे की "हा तुमचा प्रांत नाहीये...." संगीत उत्तम समजत असूनही अजिबात न वाजवू शकणारी ही लोकं होती.. अमेरिकन आयडॉल जे बघतात त्यांना मी काय म्हणतोय ते लगेच कळेल ...

यात आणखी एक छटा आहे ती म्हणजे संगीत उत्तम समजते, एक-दोन वाद्ये पण छान वाजवता येतात पण अजिबात गाता येत नाही (किंवा याच्या बरोबर उलटे). तेव्हा, प्रत्येकांनी आपल्यात नक्की कोणती कला आहे ते पहिले तपासून बघितले पाहिजे आणि त्याप्रमाणे शिकले पाहिजे ना की आपल्याला काय जास्त आवडते. गायला खूप आवडते पण खरी गती तबल्यात असेल तर काय उपयोग नाही का?

मस्त माहिती...

कुठलेही गाणे वाजवता येण्यासाठी क्षमता यायला किती दिवस लागतात?<<< या प्रश्नाचे उत्तर बस्केने थोडेसे दिले आहे.
Techincal गोष्टी शिकायला फार वेळ लागू नये... पण आवाजाचे संगीत व्हायला.. किती वेळ लागेल कुणी सांगावे...?

वाह प्रशांत, जखम केली. थोडे नाही चांगलेच कुतूहल निर्माण झाले. ऑर्केष्ट्रा मधून हे वाद्य अनेक वर्षे ऐकतोय, पण अजिबात माहिती नव्हती. खूप वर्षांपुर्वी, एका ऑर्केष्ट्राच्या मध्यंतरात, यावर एका कलाकाराने अप्रतिम शहनाई वाजवली होती. त्याला इतका प्रतिसाद मिळाला कि, त्याला स्वतंत्र वादन करायला लावले होते.

प्रशांत,
मस्त लेख. खूप महत्वाची माहिती सोप्या शब्दात मांडली आहे. म्हणजे मला पण कळली !

माझी दोन्ही पोर सिंथेसायझर वाजवतात. त्यांचा टीचर अमेरिकन आहे पण फक्त म्युझिक नुसत वाचून वाजवण्यापेक्षा ऐकून वाजवायला शिकवतो. त्यामुळे मुलांना खूप आवडत. त्यांना आवडणारी हिंदी गाणी पण वाजवतात. सध्या "चुरा लिया है तुमने जो दिलको" चाललय. मजा येते ऐकायला. हा लेख इंग्रजीतून असता तर मुलांना नक्की उपयोग झाला असता. विचार करणार का?

हो, परदेसाईंशी सहमत. माझ्या ट्रेनिंगमधली बरीच वर्षं केवळ टेक्निकॅलिटीज शिकवण्यात गेली. ज्यामुळे थोडंसं बोर झालेलं तेव्हा आणि म्हणूनच क्लास बंद केला कंटाळून.
एकतर लहान वय, व सिंथवर गाणी वाजवत शाईनिंग मारायचे तेव्हाचे स्वप्न. पण गाणी वाजवाण्यासाठी सिंथचे बेसिक्स पण पक्के पाहीजेत (ते तेव्हा नको असायचे मग झालाच की घोटाळा.. Happy )
अर्थात पेटीच्या क्लासला गेला असाल तर थोडेफार बेसिक सारेगमप माहीत असते व त्यामुळे गाणी बसवता येऊ शकतात, पण पेटी स्टाईल! Happy
म्हणूनच प्रॉपर वाद्य शिक्ण्यासाठी एकतर भरपूर पेशन्स हवा(दादा गिटार शिकताना त्या तारा धरून धरून बोटं रक्ताळायची सुरवातीला..), थोडीफार तरी आवड हवी. संगीताचे ज्ञान असेल तर उत्तम, पण नसले तरी शिकता (कदाचित) येऊ शकेल..

प्रशांत,
कुतुहलाने तुझी प्रोफाइल बघितली. लक्षात आल की तू कोण. थिअ‍ॅट्रिक्स च्या एकांकीकेला, मुक्तिधामला तुझ म्युझिक होत ना? लक्षवेधी आणी अप्रतिम संगीत होत. That was one of the reason why that drama was so effective. असो.

हा लेख वाचून कळल की ते इफेक्ट सिंथेसायझर ने कसे तयार केले असतील.

क्या बात है प्रशांत. एकदम बढिया माहीती दिलीस रे. तु तो गिटार मास्टर भी है. उसपे भी कुछ हो जाये. Happy

मस्त !! Happy
सिंथ बद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय.. लहानपणी शिकायचा प्रयत्न पण केला होता.. पण ते अर्धवट राहिलं.. एकदम त्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या..

धन्यवाद प्रशांत Happy उत्तम माहिती.
काही सांगितीक बॅग्राउंड नसताना बेसिक्स ऑनलाईन शिकता येईल का?

@कल्पू: बरोबर आहे. मी थीएट्रिक्स ग्रुप मध्ये संगीत विभाग सांभाळतो. मुक्तिधाम पार्श्वसंगीत तुला आवडले हे ऐकून खूप बरे वाटले. केल्या कामाची पावती मिळाली की एक वेगळाच आनंद असतो.ते सर्व संगीत अर्थात संगणकावर केलेले आहे - म्हणजे सॉफ्ट-सिंथ वापरून ... हा लेख इंग्रजी मध्ये लिहिण्याची कल्पना पण छान आहे. जरूर प्रयत्न करीन.

@शँकी , सांगीतिक माहिती नसताना आणि ते पण ओंनलाईन जरा अवघड वाटते मित्रा. म्हणजे माहिती मिळेल पण ती कितपत झटकन समजेल ते ठाऊक नाही. काही गोष्टी समोर बसून व्यवस्थित प्रश्नोत्तर करून समजलेल्या ब-या -खास करून सुरुवातीच्या. मला संगीत हे थोडं पोह्ण्यासारखे वाटते. ते शिकायला जसे पाण्यातच पडावे लागते...पुस्तक वाचून येत नाही .... तसे.. Happy

@अनिलभाई , जरूर लिहू गिटार वर पण

प्रशांत लेख चांगला झालाय.
लालूला अनुमोदन. गिटारवरती देखील लिहीणार का?

सुंदर लेख, प्रशांत.
माझा लेक चांगल पेटीवादक आहे आणि सिन्थ नुकतच उचललय. त्याचा कान खूप छान तयार आहे त्यामुळे म्युझिक पिसेसचे बारकावे चटकन ध्यानी येतात. तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक त्या त्या वाद्याची शक्तिस्थानं/डिव्हायसेस ध्यानात येणं आणि ती तश्शी सिन्थमधून काढता येणं हा साधनेचा भाग आहे.
हे इतकं स्वच्छं सहज शब्दांत सांगितलयत... क्या बात है. मला पुढला सिन्थ घ्यायचा असेल तेव्हा तुमच्याशी "बोलावच" लागेल.
धन्यवाद.
अजून काही वाद्यांविषयी, तुमच्या अनुभवांविषयी जरूर लिहाच.

वा वा खूपच छान बाफ! माझ खाद्य!
मलाही सिन्थेसायझर वर हात साफ करायला आवडतं पण बाकीच्यांचे कान दुखू नयेत म्हणून ईयरफोन वापरतो Happy
अगदीच रहावले नाही की इतरांना पीडून "हे काय? ओळख बरं" पासून सुरुवात करून "साधं अमकं तमकं गाणं पण ओळखता नाही आलं ?" पर्यंत संवाद होतात. (चाणाक्ष वाचकांना इतर म्हणजे कोण ते कळले असेलच) [अतिचाणाक्ष वाचकांनी "इतरां" शी सम्पर्क साधू नये]

असो. पण माझे तांत्रिक निरीक्षणे भरपूर आहेत! कुठेही न शिकल्यामुळे ती कन्फर्म करता आलेली नाहीत मला वाटते ईथे करता यावीत. धन्यवाद.

१. PIANO / CASIO / YAMAHA वगैरे वाद्यात काळया पट्ट्यांचा ३-२-३ २ असा पॅटर्न आढळतो. आपल्या पेटीत २-३-२-३ असा असतो

२. एका पट्टीतल्या एका स्वराची कम्प्रता (उदा: सा), त्याच्या वरच्या पट्टीतला स्वराची कम्प्रतेच्या (Frequency) निम्मी असते.
उदा: मंद्रसप्तकातील सा ची कम्प्रता ५१२ Hz असेल तर मध्यसप्तकातील 'सा' ची १०२४ Hz तर तारसप्तकातील 'सा' ची २०४८ Hz असते.

३. एका सप्तकात (Octave) मध्ये कोमल, तीव्र व शुद्ध (flat & sharp) धरुन १२ स्वर असतात.

---
माझा सध्याचा प्रोब्लेम म्हणजे मला एखादे गाणे शोधुन काढता येते पण ते अचूकपणे वाजवता येत नाही.
त्यामुळे रिअल टाईम प्रमाणे वाजवता येत नाही Sad आणि नाकातोंडात पाणी गेल्याचे फीलींग येते Happy खरच छान सिन्थेसायझर वाजवणार्‍यांचा हेवा वाटतो. ह्या प्रोब्लेम साठी "प्रॅक्टिस" हा एकच उपाय आहे का?

सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून एक प्रश्न आला - जर मी कीबोर्ड वा गिटार संबंधी प्राथमिक माहितीच्या व्हिडिओ मराठी मध्ये बनवल्या तर Wink

काय म्हणता ?

सिंथेसाइझर हे माझेही खूप आवडते वाद्य आहे पण ऐकण्यापुरते.. कारण वाजवण्यातले काहीही येत नाही..

पण या वाद्याविषयी कुतुहल खूप आहे मनात..

प्रशांत,खूपच माहितीपूर्ण लेख आहे तुझा.. थोडं ज्ञानार्जन झालं.

गिटारवरही नक्की लिही आणि मराठीत क्लिप काढायची कल्पना मस्त आहे.. मनावर घे नक्की.. Happy

झकास माहिती,एकदम सोप्या पद्धतीने लिहीले आहे त्यामुळे कळले! Happy
खूप वर्षापूर्वी अदनान सामीने कुठल्यातरी सार्क प्रोग्रॅममधे सिंथ वाजवले होते,अदभुत प्रकार होता तो!

वाह! मस्त... आवडीचा विषय... आणि सिंथ वाजवणार्‍यांच्या कौतूकाबद्दल म्हणलात तेही योग्य! मला तरी मुख्ख्य गायकांपेक्षा यांचं कौतूक अधिक वाटतं. २००८ दीपावलीच्या निमित्त कार्यक्रमात मुंबईला साथीला सिंथ वर प्रथमच एक स्त्री कलाकार होत्या. आईशप्पथ! प्रोफेशनल कार्यक्रमात देखिल ईतका उत्क्रूष्ट सिंथ वाजवणार्‍या स्त्रीया फारच कमी पाहील्या आहेत...

Pages