खबरदार जर......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

२००५ चा डिसेंबर. ५० मुलं, प्रत्येकाबरोबर एक किंवा दोन्ही पालक, आणि त्यांचे नॄत्यशिक्षक असे सगळे ताफा घेऊन भारतात गेलो होतो. शिवाजीमंदीर, दिनानाथ पार्ले, बोरिवली अश्या ठिकाणी सात कार्यक्रम होते. पहिला वहिला कार्यक्रम अर्थातच शिवाजीमंदीर दादर.

बरोबर गेलेल्या आयांना बरीच कामं वाटून दिलेली होती. म्हणजे मुलींच्या तयार्‍यांपासून, त्यांचे केस, कपडे, पिना एक ना दोन. बरोबर गेलेले बाप तसे तीन चारच होते, आणि त्यांना फारसे काम सांगण्यात आलं नव्हतं. फक्त एका नाचातून मुलं (मुलगे) बाहेर आली की त्यांना तयार व्हायला काही मदत लागली तर करावी एवढीच अपेक्षा ठेवली होती. मी आणि माझी कन्या असे दोघेच गेल्यामुळे तिला मदत करायचं काम तिथल्या आयाच (इतरांच्या) करणार होत्या. मी बॅकस्टेजला कुणाची टोपी संभाळ, कुणाला हेयरस्प्रे आणून दे, असली फुटकळ कामं करायचो.

शिवाजीमंदीरला कधी नाटक, नाच काही केले असल्यास एक गोष्ट लक्षात येते की तिथे कपडे बदलायला रंगपटात फारशी जागा नाही. एका बाजूला गॅलरी आहे, तिथे समोरच्या घरांच्या गॅलर्‍या असल्याने कोणताही आडोसा नाही. ही जागा अर्थातच मुलांना (मुलगे) दिली गेली. तिथे मागेच एक लहान खोली ती मुलींना मिळाली. सर्वसाधारणपणे २५/२६ मुली, प्रत्येक मुलगी तीन/चार नाचात असल्याने एक नाच संपला की धावत येऊन कपडे बदलून दुसर्‍या नाचाचे कपडे, आणि शेवटच्या नाचात सगळेच असल्याने शेवटी सगळ्यांनाच एकत्र कपडे बदलायला लागायचे. परत पुढचा प्रयोग (दुसर्‍या नाटकाचा) असल्याने संपल्यावर जास्तीत जास्त १०/१५ मिनीटांमधे बॅगा भरून जागा रिकामी करायला लागायची, त्यामुळे धावपळ.

अमेरिकेहून आपली पोरं येणार आणि मराठी कार्यक्रम करणार याचं आजीआजोबांपासून काका, मामा, माम्या, आत्यांना इतकं कौतूक की या प्रयोगांची पुढची सगळी तिकिटं नातेवाईकांनीच घेऊन प्रयोग हाऊसफुल्ल करून टाकला. पुढे सगळेच प्रयोग हाऊसफुल झालेच.

पहिला प्रयोग संपला आणि बॅकस्टेजला ही गर्दी झाली. सगळे काका, मामा, आजोबा, आजी अगदी मनापासून आपापल्या मुलांचं कौतूक करायला आत आले. एवढ्याश्या त्या खोलीत २५ मुली (वय वर्षं ८ ते १८) आणि चार मोठ्या बायका कपडे बदलताहेत तरी लोक आत घुसले. कुणी फुलं आणलीत, कुणी मिठाईचे पुडे. मी आपला तसाच बाहेर उभा राहून माझ्या मुलीची वाट बघत राहिलो. एक गोष्ट तेव्हाच लक्षात आली, की आलेल्या लोकांना कौतुकाच्या नादात एका गोष्टींचे विस्मरण झालेय.

दुसर्‍या प्रयोगापासून मी गुरखा झालो. प्रयोग संपला की मुलींच्या खोलीचा मी रक्षक. कमीत कमी पाच मिनिटं त्यांना कपडे बदलायला दिल्याशिवाय कुणालाच आत जायला द्यायचे नाही हा निश्चय करून 'खबरदार जर...' वाल्या त्या बाल्-मावळ्यासारखा दार अडवून उभा राहिलो. भेटायला आलेल्या लोकांना हे आवडलं नाही. मग त्यांनी,

१. अहो, आम्हाला ९ ची डोंबिवली लोकल पकडायची आहे,
२. मी त्या अमक्या तमक्या मुलीची आत्या आहे.
३. फक्त एकच मिनीट भेटायला आलोय आम्ही तर तुम्ही...
४. मी आजी आहे तिची आणि हे आजोबा....

एक ना दोन. लोकं जणू काही मी आता त्यांना उभ्या आयुष्यात एकामेकाना कधीच भेटू देणार नाही असं धरून माझ्याशी वाद घालायला लागले. बर्‍याच लोकांना मी परोपरीने समजावलं की 'पाच मिनिटं थांबा. तुमच्या नातीला/भाचीला/पुतणीला मी बाहेर पाठवतो,' पण एक कुणी ऐकायलाच तयार नाही.
शेवटी मला चार चौघाना हा प्रश्न विचारावा लागला.....

'तुमची मुलगी कपडे बदलत असताना मी तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहिलेलं तुम्हाला चालेल का?'

(समाप्त)...

प्रकार: 

'खबरदार जर...' वाल्या त्या बाल्-मावळ्यासारखा दार अडवून उभा राहिलो. >>>
देसाई हेच टायटल द्या

चालेल.. बदललं..
नंद्या.. अरे बा रा बा फ वर येऊनही तुला कळलं नाही का? (विंग्रजीचा वापर शक्यतो न करणे)

Pages