ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मायबोलीवर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मायबोलीवर लिहिणार्‍यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे. त्यामुळे हे इथल्यांपर्यंतही पोचवावे असे वाटले.
तर असो....
कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी या तिघांनी अतिशय उत्तमपणे या मेळाव्याचे संयोजन (आर्थिक बाजूसकट) उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांचे आभार. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या ब्लॉगर्सनी लिहिलंच आहे. कोण कोण आले होते पासून काय काय खाल्ले इथपर्यंत सगळंच बहुतेक ब्लॉगपोस्टस मधे आलेलं आहे. तेव्हा मी त्यावर काय बोलणार अजून!
मेळाव्यानंतर घरी गेल्यावर लगेच लिहिले गेले असते तर नक्कीच सरळसोट वृत्तांतापलिकडे मीही लिहिलं नसतं आणि कदाचित ज्यांनी लिहिलंय त्यांच्याइतकं चांगलं मला लिहिताही आलं नसतं. आणि माझा आळशीपणाही होताच त्यामुळे मेळावा झाल्या झाल्या लिहायचं राहूनच गेलं.
तेव्हा आता वृत्तांतापलिकडे जाऊन मेळाव्यासंदर्भाने पुढे आलेल्या आणि मला महत्वाच्या वाटलेल्या काही गोष्टींबद्दलच मी लिहेन म्हणते.
मेळावा छान पार पाडण्यासाठी संयोजकांचे कष्ट होतेच यात वाद नाही पण त्यांनी जे ठरवलंय ते योग्य रितीने पार पडावं याची जबाबदारी आपली सगळ्यांची म्हणजे जमलेल्या सगळ्या ब्लॉगर्सची आहे. हे अर्थातच ब्लॉगर्स मेळावाच नव्हे तर कुठल्याही सभासंमेलनाच्या बाबतीत खरं आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपण ते पाळतो का? संयोजकांनी मेळाव्याची एक रूपरेषा ठरवलेली आहे. ती इमेलमधून पाठवलेलीही आहे तर त्या रूपरेषेनुसार कार्यक्रम व्हावा ही जबाबदारी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नाही का? जर पहिलं सेशन, पहिला कार्यक्रम हा केवळ ब्लॉगर्सनी स्वतःची थोडक्यात ओळख करून देण्याचा आहे तर आपण किती वेळ बोलायचं याला मर्यादा आपण घालायला नको का? की थोडक्यात या शब्दाची व्याख्या/ अर्थ आपल्याला माहीत नाहीयेत? जे सगळे विस्ताराने बोलले त्यांचं म्हणणं महत्वाचं होतं हे निश्चित. पण थोडक्यात ओळख च्या ऐवजी नंतरच्या सेशनमधे ते केलं गेलं असतं तर विस्तृत भाषणांनंतर ज्या ब्लॉगर्सच्या ओळखी झाल्या त्यांच्या ओळखींमधे आणि नंतरच्या सेशनमधेही लोकांना इंटरेस्ट राह्यला नसता का? संयोजकांनी ठरवलेल्या रूपरेषेला धाब्यावर बसवण्यात आपल्याला काय भूषण वाटतं? की हा पण एक मराठी बाणा आहे?
देवनागरी लिखाणाचे तंत्र यावर आपण सगळ्यांनी भरपूर किंवा सगळ्यात जास्त उहापोह केला. काहींना मुळाक्षरांच्या सेटसप्रमाणे किबोर्ड असल्यामुले लिखाण सोपे वाटत होते. काहींनी फोनेटिक किबोर्ड जवळ केला होता. स्पेलचेक, शुद्धलेखन इत्यादींच्या अनुषंगाने काही मुद्दे मिळाले. ते जामच तांत्रिक असल्याने माझ्या अर्थातच लक्षात राह्यले नाहीत. आणि मुळात ओळख प्रकरणांमधे खूप वेळ गेलेला असल्याने तोवर काही ऐकण्याचा पेशन्स बहुतेक संपला होता. तिथे दिली गेलेली तांत्रिक माहिती कुणी एकगठ्ठा आपल्या ब्लॉगमधे टाकली तर नीट समजून घ्यायला फार आवडेल.
पुढचा मुद्दा कॉपीराइट इश्यूचा. आपण आपल्या लेखात फोटोग्राफ्स कुठून उचलून वापरत असू तर ते तसे वापरणे हे मुळात violation आहे. तसे करणे चुकीचे आहे हीच गोष्ट बहुसंख्य ब्लॉगर्स किंवा इतरांच्या गावी नसते. फॉरवर्ड पाठवणारे किंवा काही ब्लॉगर्स हे केवळ मला आवडलं मी शेअर केलं असा सूर लावतात, त्यापुढे जाऊन आम्ही प्रसिद्धी देतोय या गोष्टींना अशी शेखीही मिरवतात. ही वृत्ती मोडण्यासाठी मुळात काहीतरी करायची गरज आहे. मराठी ब्लॉगर्स म्हणून आपण आपलं अस्तित्व उभं करत असताना या काही मुद्द्यांकडे आपण जायला हवे. कॉपीराइट संदर्भातले तांत्रिक ज्ञान महत्वाचे आहेच पण अ‍ॅटिट्यूड, वृत्ती याबद्दल पण आपण जबाबदार मराठी ब्लॉगर्स म्हणून आपल्या ब्लॉग्जमधून भाष्य करायला हवे. निदान काही ढापू लोक जे अनभिज्ञ आहेत ते तरी सुधारतील. Happy
अर्थात ह्या झाल्या तांत्रिक गोष्टी. संपूर्ण कार्यक्रमात या तांत्रिक गोष्टींपलिकडे कोणी बोलायलाच तयार नाही की काय असं वाटलं. ब्लॉग्ज मधून येणारे विषय, लिखाण यांचा मर्यादित स्कोप यावर प्रसन्न जोशीने खूप महत्वाचे मुद्दे मांडले. मराठी ब्लॉग्ज मधे मराठीपण हे ज्ञानेश्वर-तुकाराम, वपु-पुलं, गणपती-दिवाळी, वडापाव यापलिकडे जातच नाही. मराठी ब्लॉग्जमधे या पलिकडचे विषय फारसे येत नाहीत. मराठी बाहेरचं इतर साहित्य मराठीत आणलं जाणं असं फारसं काही घडत नाही. ब्लॉगला मराठी शब्द शोधण्यापुरताच आपला मराठीचा अभिमान असतो. हा असा अट्टाहास योग्य आहे का? असं काहीसं त्याचं म्हणणं होतं. मुद्दा महत्वाचा होता. पण कदाचित खूप वेळ भाषणबाजी झाल्यामुळे असेल त्या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली गेली आपण सगळ्यांकडूनच. माझ्या आसपासच्या खुर्चीवरून कशासाठी जायचं या पलिकडे? कशासाठी पहायचं यापलिकडे? अशी कूपमंडूक प्रतिक्रियाही खुसखुसताना मी ऐकली.
मुद्दा मला महत्वाचा वाटला. मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय इत्यादी. मराठी भाषेबाहेरचं काहीतरी मराठीत आणणं सोडाच महाराष्ट्रातल्याच आयुष्याबद्दल बरंच काही आपल्यापर्यंत सर्वांगाने पोचत नाहीये. आपल्याला ते शोधावसं, लिहावसं वाटत नाहीये. मराठीपणाच्या कक्षा आपल्या बुद्धीत रूंदावत नाहीयेत आणि त्यामुळे मराठीपणाचे बरेचसे पैलू आपल्याला दिसतच नाहीयेत.
आता याची कारणं म्हणायची तर मला सापडलेली ही काही कारणं...
१. इंटरनेट हा प्रकार उपलब्ध असणं, तेही अश्या प्रकारच्या लिखाणासाठी मुक्तपणे उपलब्ध असणं हे अजूनही ठराविक व्यवसायांपुरतंच आणि शहरांपुरतंच मर्यादित आहे.
२. उपलब्धता असली तरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट या संदर्भातली भीड चेपली जायला अजून वेळ आहे. हे इतर व्यवसाय आणि लहान गावे यांच्यासंदर्भात
या दोन कारणांमुळे खूप ठराविक लोकच लिहिणारे आहेत आणि त्यामुळे निश्चितच वैविध्याची कमतरता आहे.

३. आपली (माझ्यासकट आपली सगळ्यांची) कवाडं अजून बर्‍याच अंशी बंद आहेत. यापलिकडे आहेच काय/ गरजच काय याप्रकारची मानसिकता आपली सगळ्यांचीच आहे कमी अधिक प्रमाणात.
४. ब्लॉग लिहिणे हे अजूनही आपल्या ओळखीच्यांपुरते लिखाण, गंमत म्हणून लिखाण इतपतच आहे. त्याचे ते स्वरूप जोवर बदलत नाही (आपल्याकडून आणि इतर अनेक तांत्रिक पातळ्यांवर सुद्धा) तोवर त्यात गांभीर्याने दखल घ्यावी असे थोडेसेच असणार.

अर्थात ही सगळी 'कारणे' झाली. स्वतःच्या, स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!!

या मर्यादित विषयांच्या पार्श्वभूमीवर मला काही जणांचं लिखाण महत्वाचं वाटतं. त्यातले आत्ता आठवणारे हे दोन.
१. झुलेलाल उर्फ दिनेश गुणे http://zulelal.blogspot.com - दर वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जगण्याबद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या जगण्याबद्दल एक काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. एखादा प्रश्न, समस्या, नवी वाटचाल, एखादा तिढा असं काहीतरी नेहमीच्या चक्कीपेक्षा वेगळं, काहीतरी खूप महत्वाचं आणि आपल्या आयुष्यांशी अप्रत्यक्षपणे का होईना निगडीत असणारं प्रामाणिक लिखाण. परत भाषाशैली अप्रतिम आहेच.
२. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com - सुरूवातीला मायबोलीवर याचं काही वाचलं तेव्हा ब्राह्मणविरोधी/ ब्राह्मणद्वेष्ट्या विचारांपलिकडे काही दिसलं नाही. रागही आला. पण मग त्याने त्याच्या भामरागडबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, तिथल्या चालीरितींबद्दल लिहायला सुरूवात केली तेव्हा सुखद धक्का होता. सहज, उस्फूर्त आणि वेगळ्या आयुष्याबद्दलचं लिखाण. पण तरी मराठीपणातलंच(भाषा वेगळी असली तरी ते मराठीपणच), महाराष्ट्रातलंच. आपल्यापेक्षा वेगळा समाज आपल्यापुढे उभा करणारं आणि पर्यायाने आपल्याला विचारात पाडणारं.

अजूनही बरेच आहेत पण सध्या पटकन हे दोन आठवतायत.

तर असो.. मर्यादा तोडण्याच्या नावाने चांगभलं करून सध्यापुरती माझ्या किबोर्डाला विश्रांती देते. तुम्हीही थकला असाल तर उतारा म्हणून वरचे दोन ब्लॉग्ज नक्की वाचा. याला आमच्या मायबोलीवर रिक्षा फिरवणे म्हणतात. म्हणोत म्हणतात तर. मेरेको क्या!!

- नी

विषय: 
प्रकार: 

..

..

हेरंब, तुला काय वाटले हे एक तर तू मायबोलीवर लिहिले नाहीस. ही चर्चा तिथे सुरु झाली होती आणि तू संदर्भ सुद्धा तिथल्याच पोस्ट्सचा दिलास. बरं त्या पोस्ट्स आणि आमची नावं (जी काय टोपण-बिपण संतापजनक डोक्यात जाणारी नावं असतील ती) घेऊन इथे छापल्यास तर एका शब्दानेही तू मायबोलीकर किंवा मायबोली अ‍ॅडमिन ह्यांना कल्पना दिली नाहीस. तुला संदर्भ द्यायचेच होते तर नीरजाच्या ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांचे द्यायचे होते. बरं मूळ मुद्दा किंवा त्यावरच्या प्रतिक्रिया अजिबात समजून न घेता जणू काही इथे लिहिणारे आम्ही सर्व ब्लॉग जगताच्या विरुद्ध आहोत अशा थाटात लिहिले आहेस. तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती भाऊ.

जाता जाता, तानसेन-कानसेन प्रकार माहिती असेलच. आपण एखाद्या 'प्रकाशित' झालेल्या लेखनावर प्रतिक्रिया देतो ती "वाचक" म्हणून. त्यासाठी लेखक (इथे ब्लॉगर) असलेच पाहिजे असे काही नाही. स्वतःचा ब्लॉग* नसलेल्यांनी प्रतिक्रिया देऊ नयेत वगैरे मुद्दा अगदीच गैर आणि अस्थानी आहे.

* स्वत:चा ब्लॉग म्हणजे blogspot इ. वर खाते असे तू गृहित धरले आहेस का ? कारण मायबोलीवर 'रंगिबेरंगी' नावाचा जो प्रकार आहे ते 'ब्लॉग'ला दिलेले मराठी नाव आहे. तसेच ह्या अनेक ब्लॉग नसलेल्या लोकांनी वेळोवेळी गुलमोहोर/गणेशोत्सव/दिवाळी अंकांमध्ये लक्षणीय लेखन केले आहे ह्याची तुला कल्पना आहे की नाही माहिती नाही.

अजून एक- तिथे कॉपी-पेस्ट करताना अगदी शेलक्या प्रतिक्रिया टाकल्यात. मग तुम्हाला पटलेल्या प्रतिक्रिया का नाही टाकल्या ? की त्या ब्लॉगर्सची बाजु घेणार्‍या आहेत म्हणून नाही टाकल्या ? तसेच ज्यांचे ब्लॉग आहेत असे तुम्हाला आढळले त्यांची ब्लॉग जगताला माहिती असलेली नावं का नाही दिलीत म्हणजे खुल्या दिलाने ह्या लोकांना शिव्या घालणार्‍यांनी कमीत कमी एकदा जाऊन बघितले तरी असते की ही लोकं बरं-वाईट लिहितात की कसं ?

भाऊ नमसकर यांच्यासाठी

भाऊ तुमची व्यंगचित्रे वरच्या दर्जाची आहेत. संकल्पना आणि रेखन दोन्ही दृष्टीने. मराठीत चांगल्या व्यंगचित्रकारांची वानवा आहे. तुम्ही या क्षेत्रात उत्तम करीअर करू शकाल. ते करावे अशी विनन्ती आहे. विशेषतः सर्वच दिवाळी अंकात तुम्हाला खूप करण्यासारखे आहे

<< स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!! >>
पण यासाठी स्वत:च्या मनाचा "मोठेपणा" दाखवायची (तरी !) तयारी हवी , मला वाटतं काही लोकांचा अहंकार,गर्व इथे आडवा येत असेल कदाचित ...

Pages