ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मायबोलीवर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मायबोलीवर लिहिणार्‍यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे. त्यामुळे हे इथल्यांपर्यंतही पोचवावे असे वाटले.
तर असो....
कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी या तिघांनी अतिशय उत्तमपणे या मेळाव्याचे संयोजन (आर्थिक बाजूसकट) उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांचे आभार. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या ब्लॉगर्सनी लिहिलंच आहे. कोण कोण आले होते पासून काय काय खाल्ले इथपर्यंत सगळंच बहुतेक ब्लॉगपोस्टस मधे आलेलं आहे. तेव्हा मी त्यावर काय बोलणार अजून!
मेळाव्यानंतर घरी गेल्यावर लगेच लिहिले गेले असते तर नक्कीच सरळसोट वृत्तांतापलिकडे मीही लिहिलं नसतं आणि कदाचित ज्यांनी लिहिलंय त्यांच्याइतकं चांगलं मला लिहिताही आलं नसतं. आणि माझा आळशीपणाही होताच त्यामुळे मेळावा झाल्या झाल्या लिहायचं राहूनच गेलं.
तेव्हा आता वृत्तांतापलिकडे जाऊन मेळाव्यासंदर्भाने पुढे आलेल्या आणि मला महत्वाच्या वाटलेल्या काही गोष्टींबद्दलच मी लिहेन म्हणते.
मेळावा छान पार पाडण्यासाठी संयोजकांचे कष्ट होतेच यात वाद नाही पण त्यांनी जे ठरवलंय ते योग्य रितीने पार पडावं याची जबाबदारी आपली सगळ्यांची म्हणजे जमलेल्या सगळ्या ब्लॉगर्सची आहे. हे अर्थातच ब्लॉगर्स मेळावाच नव्हे तर कुठल्याही सभासंमेलनाच्या बाबतीत खरं आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपण ते पाळतो का? संयोजकांनी मेळाव्याची एक रूपरेषा ठरवलेली आहे. ती इमेलमधून पाठवलेलीही आहे तर त्या रूपरेषेनुसार कार्यक्रम व्हावा ही जबाबदारी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नाही का? जर पहिलं सेशन, पहिला कार्यक्रम हा केवळ ब्लॉगर्सनी स्वतःची थोडक्यात ओळख करून देण्याचा आहे तर आपण किती वेळ बोलायचं याला मर्यादा आपण घालायला नको का? की थोडक्यात या शब्दाची व्याख्या/ अर्थ आपल्याला माहीत नाहीयेत? जे सगळे विस्ताराने बोलले त्यांचं म्हणणं महत्वाचं होतं हे निश्चित. पण थोडक्यात ओळख च्या ऐवजी नंतरच्या सेशनमधे ते केलं गेलं असतं तर विस्तृत भाषणांनंतर ज्या ब्लॉगर्सच्या ओळखी झाल्या त्यांच्या ओळखींमधे आणि नंतरच्या सेशनमधेही लोकांना इंटरेस्ट राह्यला नसता का? संयोजकांनी ठरवलेल्या रूपरेषेला धाब्यावर बसवण्यात आपल्याला काय भूषण वाटतं? की हा पण एक मराठी बाणा आहे?
देवनागरी लिखाणाचे तंत्र यावर आपण सगळ्यांनी भरपूर किंवा सगळ्यात जास्त उहापोह केला. काहींना मुळाक्षरांच्या सेटसप्रमाणे किबोर्ड असल्यामुले लिखाण सोपे वाटत होते. काहींनी फोनेटिक किबोर्ड जवळ केला होता. स्पेलचेक, शुद्धलेखन इत्यादींच्या अनुषंगाने काही मुद्दे मिळाले. ते जामच तांत्रिक असल्याने माझ्या अर्थातच लक्षात राह्यले नाहीत. आणि मुळात ओळख प्रकरणांमधे खूप वेळ गेलेला असल्याने तोवर काही ऐकण्याचा पेशन्स बहुतेक संपला होता. तिथे दिली गेलेली तांत्रिक माहिती कुणी एकगठ्ठा आपल्या ब्लॉगमधे टाकली तर नीट समजून घ्यायला फार आवडेल.
पुढचा मुद्दा कॉपीराइट इश्यूचा. आपण आपल्या लेखात फोटोग्राफ्स कुठून उचलून वापरत असू तर ते तसे वापरणे हे मुळात violation आहे. तसे करणे चुकीचे आहे हीच गोष्ट बहुसंख्य ब्लॉगर्स किंवा इतरांच्या गावी नसते. फॉरवर्ड पाठवणारे किंवा काही ब्लॉगर्स हे केवळ मला आवडलं मी शेअर केलं असा सूर लावतात, त्यापुढे जाऊन आम्ही प्रसिद्धी देतोय या गोष्टींना अशी शेखीही मिरवतात. ही वृत्ती मोडण्यासाठी मुळात काहीतरी करायची गरज आहे. मराठी ब्लॉगर्स म्हणून आपण आपलं अस्तित्व उभं करत असताना या काही मुद्द्यांकडे आपण जायला हवे. कॉपीराइट संदर्भातले तांत्रिक ज्ञान महत्वाचे आहेच पण अ‍ॅटिट्यूड, वृत्ती याबद्दल पण आपण जबाबदार मराठी ब्लॉगर्स म्हणून आपल्या ब्लॉग्जमधून भाष्य करायला हवे. निदान काही ढापू लोक जे अनभिज्ञ आहेत ते तरी सुधारतील. Happy
अर्थात ह्या झाल्या तांत्रिक गोष्टी. संपूर्ण कार्यक्रमात या तांत्रिक गोष्टींपलिकडे कोणी बोलायलाच तयार नाही की काय असं वाटलं. ब्लॉग्ज मधून येणारे विषय, लिखाण यांचा मर्यादित स्कोप यावर प्रसन्न जोशीने खूप महत्वाचे मुद्दे मांडले. मराठी ब्लॉग्ज मधे मराठीपण हे ज्ञानेश्वर-तुकाराम, वपु-पुलं, गणपती-दिवाळी, वडापाव यापलिकडे जातच नाही. मराठी ब्लॉग्जमधे या पलिकडचे विषय फारसे येत नाहीत. मराठी बाहेरचं इतर साहित्य मराठीत आणलं जाणं असं फारसं काही घडत नाही. ब्लॉगला मराठी शब्द शोधण्यापुरताच आपला मराठीचा अभिमान असतो. हा असा अट्टाहास योग्य आहे का? असं काहीसं त्याचं म्हणणं होतं. मुद्दा महत्वाचा होता. पण कदाचित खूप वेळ भाषणबाजी झाल्यामुळे असेल त्या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली गेली आपण सगळ्यांकडूनच. माझ्या आसपासच्या खुर्चीवरून कशासाठी जायचं या पलिकडे? कशासाठी पहायचं यापलिकडे? अशी कूपमंडूक प्रतिक्रियाही खुसखुसताना मी ऐकली.
मुद्दा मला महत्वाचा वाटला. मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय इत्यादी. मराठी भाषेबाहेरचं काहीतरी मराठीत आणणं सोडाच महाराष्ट्रातल्याच आयुष्याबद्दल बरंच काही आपल्यापर्यंत सर्वांगाने पोचत नाहीये. आपल्याला ते शोधावसं, लिहावसं वाटत नाहीये. मराठीपणाच्या कक्षा आपल्या बुद्धीत रूंदावत नाहीयेत आणि त्यामुळे मराठीपणाचे बरेचसे पैलू आपल्याला दिसतच नाहीयेत.
आता याची कारणं म्हणायची तर मला सापडलेली ही काही कारणं...
१. इंटरनेट हा प्रकार उपलब्ध असणं, तेही अश्या प्रकारच्या लिखाणासाठी मुक्तपणे उपलब्ध असणं हे अजूनही ठराविक व्यवसायांपुरतंच आणि शहरांपुरतंच मर्यादित आहे.
२. उपलब्धता असली तरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट या संदर्भातली भीड चेपली जायला अजून वेळ आहे. हे इतर व्यवसाय आणि लहान गावे यांच्यासंदर्भात
या दोन कारणांमुळे खूप ठराविक लोकच लिहिणारे आहेत आणि त्यामुळे निश्चितच वैविध्याची कमतरता आहे.

३. आपली (माझ्यासकट आपली सगळ्यांची) कवाडं अजून बर्‍याच अंशी बंद आहेत. यापलिकडे आहेच काय/ गरजच काय याप्रकारची मानसिकता आपली सगळ्यांचीच आहे कमी अधिक प्रमाणात.
४. ब्लॉग लिहिणे हे अजूनही आपल्या ओळखीच्यांपुरते लिखाण, गंमत म्हणून लिखाण इतपतच आहे. त्याचे ते स्वरूप जोवर बदलत नाही (आपल्याकडून आणि इतर अनेक तांत्रिक पातळ्यांवर सुद्धा) तोवर त्यात गांभीर्याने दखल घ्यावी असे थोडेसेच असणार.

अर्थात ही सगळी 'कारणे' झाली. स्वतःच्या, स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!!

या मर्यादित विषयांच्या पार्श्वभूमीवर मला काही जणांचं लिखाण महत्वाचं वाटतं. त्यातले आत्ता आठवणारे हे दोन.
१. झुलेलाल उर्फ दिनेश गुणे http://zulelal.blogspot.com - दर वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जगण्याबद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या जगण्याबद्दल एक काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. एखादा प्रश्न, समस्या, नवी वाटचाल, एखादा तिढा असं काहीतरी नेहमीच्या चक्कीपेक्षा वेगळं, काहीतरी खूप महत्वाचं आणि आपल्या आयुष्यांशी अप्रत्यक्षपणे का होईना निगडीत असणारं प्रामाणिक लिखाण. परत भाषाशैली अप्रतिम आहेच.
२. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com - सुरूवातीला मायबोलीवर याचं काही वाचलं तेव्हा ब्राह्मणविरोधी/ ब्राह्मणद्वेष्ट्या विचारांपलिकडे काही दिसलं नाही. रागही आला. पण मग त्याने त्याच्या भामरागडबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, तिथल्या चालीरितींबद्दल लिहायला सुरूवात केली तेव्हा सुखद धक्का होता. सहज, उस्फूर्त आणि वेगळ्या आयुष्याबद्दलचं लिखाण. पण तरी मराठीपणातलंच(भाषा वेगळी असली तरी ते मराठीपणच), महाराष्ट्रातलंच. आपल्यापेक्षा वेगळा समाज आपल्यापुढे उभा करणारं आणि पर्यायाने आपल्याला विचारात पाडणारं.

अजूनही बरेच आहेत पण सध्या पटकन हे दोन आठवतायत.

तर असो.. मर्यादा तोडण्याच्या नावाने चांगभलं करून सध्यापुरती माझ्या किबोर्डाला विश्रांती देते. तुम्हीही थकला असाल तर उतारा म्हणून वरचे दोन ब्लॉग्ज नक्की वाचा. याला आमच्या मायबोलीवर रिक्षा फिरवणे म्हणतात. म्हणोत म्हणतात तर. मेरेको क्या!!

- नी

विषय: 
प्रकार: 

नी, कानोकानी मध्ये गेलीस की लॉगिन कर मायबोलीच्याच आयडीने. किंवा ऑलरेडी झालेलं असेल. ते झाले की उजव्या कोपर्‍यात वर, 'नवीन कानगोष्ट' असे दिसेल. तिथे क्लिक करून तुला हव्या त्या युआरएल्स अ‍ॅड कर.

धन्स बस्के Happy , मलाही माहित नव्हत कानोकानीत कस पोस्टायच ते

सिंडे धन्स त्या फ्री साईटस वरुन काही टेंप्लेट्स मिळाली

तिथे शक्यतो स्वानुभवच लिहिले जाणार असे मला तरी वाटते>> सिंडे वैयक्तिक अनुभव लिहणे (सुरवात तशी करणे), सतत लिहीत रहाणे आणि वर्षानुवर्षे तेवढेच लिहीणे ... Sad आणि बरेच तर अनुभव नसुन नुसतेच काय लिहीणे अपेक्षीत आहे त्यानुसार लिहिलेले असते. अनुभव तरी अस्सल असतात (असावेत).
लेखक म्हणुन सोडा, माणुस म्हणुन आपल्या वाढीसाठी अनुभव तपासुन पहायला हवेत ना?
इतक्या निरनिराळ्या क्षेत्रात लोकं काम करतात, त्यांचे जिवंत अनुभव त्यात का येत नाहीत? सगळं कसं आलबेल, जिथल्यातिथे. काहीतरी झोल आहे. जिथे फॉर्मचे बंधन नाही, जिथे वाट्टेल ते लिहीता येऊ शकते तिथेही अनुभवांची/कल्पनांची वानवा का? मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, आणि तसाच समाज असेल तर कोण काय करणार. Happy
५% ब्लॉगच फक्त वाचावेसे वाटतात.

आर्क- अनुमोदन.

जिथे फॉर्मचे बंधन नाही, जिथे वाट्टेल ते लिहीता येऊ शकते तिथेही अनुभवांची/कल्पनांची वानवा का? मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, आणि तसाच समाज असेल तर कोण काय करणार. स्मित
५% ब्लॉगच फक्त वाचावेसे वाटतात.<<
माझ्या आख्ख्या बडबडीचं सार यात आणलंस की गं रैने. Happy
अनुमोदन

पुण्याला झालेल्या ब्लॉगर्स मेळाव्याचे वृतांत वाचले होते म्हणुन या मुंबई मेळाव्याकडुन फारशा अपेक्षा नव्हत्या.(या कारणा मुळे आणि माझा ब्लॉग चित्रांचा असल्याने मी तसा तीथे उपराच म्हणुन मेळाव्याला हजर राहिलो नाही). या मेळाव्यातुन काही पुढची पाउले ठरवली गेली असतील तर ते लिहावे

>>जिथे फॉर्मचे बंधन नाही, जिथे वाट्टेल ते लिहीता येऊ शकते तिथेही अनुभवांची/कल्पनांची वानवा का?<<

लोक त्यांना आवडते लिहायला म्हणून लिहितात तर तुम्ही कोण बोलणारे? अनुभवांची/कल्पनांची वानवा असेनाका.

>>५% ब्लॉगच फक्त वाचावेसे वाटतात.<<

९५% नका वाचू

लोक त्यांना आवडते लिहायला म्हणून लिहितात तर तुम्ही कोण बोलणारे? अनुभवांची/कल्पनांची वानवा असेनाका.<<
केवळ आवडते म्हणून लिहीत असते लोक तर स्वतःच्या खाजगी वहीत लिहिलं असतं ना. लोकांनी वाचावं म्हणून सार्वजनिकरित्या लिहिले जाते. तेव्हा ते वाचून त्यावर कॉमेंट करायचा वाचकाला पूर्ण अधिकार आहे.

९५% नका वाचू<<
हे कोणीच कुणालाच सांगू नये.

हे कोणीच कुणालाच सांगू नये. >>>> ह्याला अनुमोदन. Happy

नीरजा, छान वृत्तांत लिहिला आहेस. पण मला सिंडीचं म्हणणं पटतय. मुळात सगळेजण हाडाचे साहित्यीक किंवा कलाकार नसतात. त्यांच्या कडून खूप अपेक्षा ठेवणं बरोबर आहे का? ब्लॉग लिहिणे हे डायरी लिहिणेची पुढची पायरी आहे. कागदा वर लिहायला कंटाळा येतो, समोर काँप्यूटर असतोच नेहमी, ब्लॉगर वर फुकट अकाऊंट मिळतय तर काढा ब्लॉग अश्या विचारातून कित्येक ब्लॉग "उगवलेले" आहेत. त्यातच मराठी ब्लॉग्जचं प्रमाण इंग्रजी ब्लॉग्ज पेक्षा फारच नगण्य आहे.
चांगल्याची अपेक्षा ठेऊच नये असं मी म्हणत नाहिये पण ती सगळ्यांकडूनच ठेवता येणार नाही. आणि ठेवली तर मात्र अपेक्षाभंगच वाट्याला येईल. ब्लॉगवर (तुझ्यासकट) काही उत्तम लेखक आहेत. त्यांच्याकडूनच क्रांतीची अपेक्षा ठेवली जाऊ शकते.

मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, >>>> माझ्यामते मराठी ब्लॉगविश्वाला मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणून पहाणेच चूक आहे. मराठी समाजाचा विचार करता किती लोकं ब्लॉग लिहितात? त्यात किती लोकं मराठीत ब्लॉग लिहितात ? कुठलाही निष्कर्ष काढण्यासाठी जे "सँपल" घ्यावं लागतं तेच इथे पुरेसं नाहिये. आणि शिवाय ब्लॉगर्स मधे वैचारीक दिवाळखोरी आहे असं म्हणणंही मला बरोबर वाटत नाही. बर्‍याचजणांना त्यांचे लिखितस्वरूपात विचार नीट मांडता येत नसतील कारण ते लेखक नाहित. त्यामुळे लगेच त्यांच्या वैचारीक क्षमतेवर टिप्पणी करणं खरच योग्य आहे का?

परत एकदा.. अपेक्षा ठेऊच नये असं मी म्हणत नाहिये. पण मराठी ब्लॉगिंग हे माध्यम अजुन खूप म्हणजे खूपच लहान आहे. फारतर ३/४ वर्षांपूर्वी सुरु झालेलं, ज्याची बाकीच्या मराठी माध्यमांशी तुलना होऊच शकत नाही. संख्या आणि गुणवत्ता दोन्ही बाबतीत ते evolve व्हावं लागेल अजून आणि त्याला नक्कीच वर्ष लागतील.

पराग हे सगळं दर्जाबद्दल झालं. मी त्याबद्दल म्हणतच नाहीये. माझा सध्या आग्रह वैविध्याचा. कक्षा रूंदावयचाच आहे. दर्जा थोडा उपजत आणि थोडा सरावाचा भाग आहे.

नीरजा... हो ह्यातले मुद्दे काही प्रमाणात त्याला पण लागू होतात.
एक उदाहरण देतो. तू कोकणात्ले ते आज्जी-आजोबा बघून त्यांच्यावर फोटो फिचर केलस. त्यात तू लिहिलेली वाक्य पण छान होती आणि त्याला नक्कीच लेखिक टच होता. अश्याच प्रकारचे विचार आजुबाजूची गोष्ट बघून कोणाच्या मनात आले असतील पण त्यांना तुझ्याप्रमाणे व्यक्त होता येईलच असं नाही. त्याबद्दल त्यांनी लिहायचा प्रयत्न केलाच तर त्याचा दर्जा चांगला असेलच असं नाही. आणि ह्या सगळ्यामुळे त्या व्यक्तीच्या/व्यक्तींच्या विचारांमधे वैचारीक दिवाळखोरी आहे असं म्हणणं मला बरोबर वाटणार नाही. कारण असलेले विचार व्यक्त करण्याचं माध्यम त्यांना नीट वापरता येत नाहिये.

दत्तात्रय >> ९५% नका वाचू>>> ह्याला माझं अनुमोदन नाही बर्का.. कारण पब्लिक फोरमवर आलेलं कोणतच लेखन स्वान्तसुखाय नसतं. त्यावर आलेल्या कमेंट्स तुम्हाला पटल्या नाहित तर तसं सांगा. पण वाचूच नका असं कसं म्हणणार ? आणि वाचल्याशिवाय कळणार कसं की ते लिखाण ९५ टक्क्यांमधलं आहे की ५ टक्यांमधलं ?

माझा सध्या आग्रह वैविध्याचा. कक्षा रूंदावयचाच आहे. दर्जा थोडा उपजत आणि थोडा सरावाचा भाग आहे.>> अनुमोदन नीरजा.

लोक त्यांना आवडते लिहायला म्हणून लिहितात तर तुम्ही कोण बोलणारे? अनुभवांची/कल्पनांची वानवा असेनाका.>>> अरेच्चा पण तुमचा माझ्या कमेंट वर आक्षेप का? तुम्ही तुमचे मत लिहा ना. Wink

माझ्यामते मराठी ब्लॉगविश्वाला मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणून पहाणेच चूक आहे. >> दादा, साचलेपणा पहिले कबुल केला तर त्यावर इच्छा असेल तर मार्ग सापडेल ना. कबुलच नाही केले तर उजाडायचे थांबणार थोडेच.
कारण असलेले विचार व्यक्त करण्याचं माध्यम त्यांना नीट वापरता येत नाहिये. >> नाही पटत. लेखनाचा साहित्यिक दर्जा दूरकी बात आहे, अनुभवांचा अस्सलपणा तरी ? शाळकरी निबंधापलीकडे जाणीवा का जात नाही? त्यामानाने पाकृ किंवा तांत्रिक माहिती देणारे मराठी ब्लॉग्ज चांगले असतात, विषयाशी प्रामाणिक. Happy

ह्म्म्म परागच्या मुद्द्याला उत्तर देताना मला जे म्हणायचंये तेच पोचेल असे योग्य शब्द सापडत नव्हते. पण रैनाने ते एकदम बरोबर सांगितले.
रैनाला अनुमोदन.

>> मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, >>>> माझ्यामते मराठी ब्लॉगविश्वाला मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणून पहाणेच चूक आहे. मराठी समाजाचा विचार करता किती लोकं ब्लॉग लिहितात? त्यात किती लोकं मराठीत ब्लॉग लिहितात ? कुठलाही निष्कर्ष काढण्यासाठी जे "सँपल" घ्यावं लागतं तेच इथे पुरेसं नाहिये. आणि शिवाय ब्लॉगर्स मधे वैचारीक दिवाळखोरी आहे असं म्हणणंही मला बरोबर वाटत नाही. बर्‍याचजणांना त्यांचे लिखितस्वरूपात विचार नीट मांडता येत नसतील कारण ते लेखक नाहित. त्यामुळे लगेच त्यांच्या वैचारीक क्षमतेवर टिप्पणी करणं खरच योग्य आहे का?

अनुमोदन.

रैना, 'दर्जा वाढवायला हवा, कक्षा रुंदावायला हव्यात' असं म्हणून ते होत असतं तर काय हवं होतं? Happy
मुळात पग्या म्हणतो तसं हे 'सँपल'च खूप छोटं, अननुभवी आणि मर्यादित आहे. त्यावरून कसलेच निष्कर्ष काढणं मलाही पटत नाहीये.

'दर्जा वाढवायला हवा, कक्षा रुंदावायला हव्यात' असं म्हणून ते होत असतं तर काय हवं होतं?<<
म्हणून म्हणायचंच नाही?

तसं म्हणायचं तर मग कुठलंही लिखाण 'हे आपण म्हटलंच एकदा' या खालीच येईल की. त्या समाधानापलिकडे जाणारं लिखाण, चर्चा काहीच दिसत नाही मला. ना मायबोलीवर ना इतर कुठे.

मला गेले काही दिवस हेच खुपत होतं. इतकं बोरिंग झालंय मराठी ब्लॉगविश्व.. काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करायचे! किंवा चक्क टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडायचे.. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनचा उत्तम नमुना! लेटेस्ट हॉट टॉपिक असल्याने व 'तू मला छान म्हण, मी तुला म्हणतो' अशा प्रकारच्या कंपुबाजीने(!) कमेंट्स तर बख्खळ पडतात व लेखक समाधान करून घेतो की तो लेख फार भारी जमला होता वगैरे.. Uhoh
मला ब्लॉगिंग विश्वाशी ओळख झाली तेव्हाचा काळ आठवला, ट्युलिप,अभिजीत बाठे, केतन कुलकर्णी, नीलेश गद्रे, संवेद, नंदन होडावडेकर, गायत्री नातू (नंतर नंतर यॉनिंग डॉगची बाष्कळ बडबड) इत्यादी लोकं इतकी सुंदर लिहीत होती तेव्हा.. (अजुनही ती लोकं छानच लिहीतील, पण फारशी लिहीतच नाहीत.. ) किंवा आता इतकी प्रचंड गर्दी आलीय की निसटले जाते हे लिखाण, आणि मग उरतात नुसत्याच प्राची ला गच्ची टाईप कविता किंवा फॉर्वर्डेड माल स्वतःच्या ब्लॉगवर टाकणारी जनता.. अरे ही कुठली ब्लॉग काढायची प्रेरणा? Angry

मी स्वतःला अजिबात लेखक समजत नाही, कारण मला ती कला अवगत नाहीये. गेली ३ वर्षं मी नुसती चाचपडत आहे. पण चाचपडतानाही समोर चांगले लिखाण दिसले की अजुन इच्छा होते चांगलं चाचपडायची! निदान मला लिहीते केले या पूर्वीच्या ब्लॉगविश्वाने.. मात्र हल्ली ती इच्छा मरून गेलीय एव्हढं मात्र नक्की...

मला हा मुद्दाच कळू शकत नाही की जर मला वाटतंय की हे मला स्वतःला टोचतंय आणि ते मला मांडायचंय. अजून एकाला तरी टोचेल कदाचित वाचणार्‍यापैकी इतपतच अपेक्षा आहे तर ते म्हणायचंच नाही? हे कसं काय?

(मला म्हणजे कुणालाही)

म्हणावं की. पण त्यावर उपाय
१. ज्याला जमतं त्याने स्वतः चांगलं (आणि सातत्याने) लिहीत रहावं
२. आपल्या वाचनात आलेल्या चांगल्या लिखाणाच्या लेखक/लेखिकेला आवर्जून प्रोत्साहन द्यावं
३. त्याचा प्रसार करावा
एकूण सकारात्मक काही करावं.

मुळात ब्लॉग लिहिणारे सगळेच 'लेखकू' नाहीत. (तसा बहुतांशांचा दावाही नसावा.) इतर माध्यमांत तरी कितीसं निराळं चित्र दिसतं? प्रकाशित झालेल्यांतली किती पुस्तकं आपल्याला दर्जेदार वाटतात? किती बहुरंगी अनुभवविश्वं चितारलेली दिसतात? स्वयंभू शैली दिसते? काही नवीन विचार दिसतो? ते करणारे कोणत्याही माध्यमात आणि कोणत्याही काळात मोजकेच साहित्यिक असतात.
म्हणोनि काय कवणे चालोचि नये? Happy

रैना, नी मुळातच जर प्रतिभा नसेल तर तुम्ही कक्षा रुंदावण्याची अपेक्षा करुन काही फायदा नाही असं मला वाटतं. कित्येक लोक (माझ्यासारखे) साध्या सरळ शब्दात आलेले अनुभव लिहितात. ते बघून अजून १० लोकांना 'अरे हे असं तर मी पण लिहु शकतो/शकते' असं वाटतं. ब्लॉग अकाउंट फुकट काढता येतं. त्यातुनच इतकं पीक उगवलय. बरं बहुत करुन साचेबब्द्ध आयुष्य असलेल्या लोकांच्या अनुभवविश्वात वैविध्य कुठुन येणार ? त्यात प्रतिभेची वानवा.

त्यापेक्षा जे कोणी "चांगलं"/वेगळं लिहित असेल तर त्याला प्रोत्साहन देणे आपण करु शकतो. आपल्यात तेवढी कुवत असेल (रैना आणि नी, प्लीज नोट) तर आपण काही वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करु शकतो. पण म्हणून जे हे करत नाहीयेत त्यांना वैचारीक दारिद्र्य वगैरे म्हणणे मला पटत नाही.

अरे मी टाइप करुन पोस्टेपर्यंत इथे अजून पोस्ट आल्या. स्वाती, अनुमोदन.

निदान मला लिहीते केले या पूर्वीच्या ब्लॉगविश्वाने.. मात्र हल्ली ती इच्छा मरून गेलीय एव्हढं मात्र नक्की...>>>> बस्के इतर लिहित नाहीत किंवा चांगलं काही लिहित नाही म्हणून मी पण नाही (लिहितेय किंवा लिहु शकतेय) हे मात्र काहीच्या काही हां.

वरची चर्चा वाचून मला पडलेले प्रश्न -

मुळात ब्लॉगाला साहित्यिक मूल्य असलंच पाहिजे, असं काही आहे का? माझ्या समजुतीप्रमाणे ब्लॉग = वेब लॉग.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल, तर मायक्रोब्लॉगिंगबद्दल काय मत?

सिंडी.. तू सुध्दा वेल सेड. Happy

मायक्रोब्लॉगिंगबद्दल >>>> म्हणजे काय ? मायक्रो वेब लॉग.. म्हणजे आपण फेसबूक वर जसे १ ओळीचे स्टेटस मेसेजेस लिहितो तसं? अ.ल.क. सारखं?

चिन्मय तुझ्यामते ह्या प्रश्नांची उत्तर काय ते सांग की Happy

हो, काहीच्या काही आहे म्हणून तर खटकतंय. पण असं झालंय ही माझ्याबाबतीत फॅक्ट आहे.

जसं तू म्हटलीस प्रतिभेची वानवा, अनुभवांची कमतरता हे सर्व तर आहेच माझ्यात! Happy प्लस.. समथिंग इज मिसिंग.. मी खूप प्रयत्न केला लिहीण्याचा की मला काय खुपतंय, किंवा का मला सध्या ब्लॉगविश्व आवडत नाहीये.. पण मी नाही मांडू शकत आहे शब्दात.. परत एकदा नसलेली प्रतिभा नडतीय.. जाऊदे !!

मुळात, माझ्या समजुतीनुसार, ब्लॉग ही केवळ एक खाजगी दैनंदिनी आहे. लिखाणात काय विषय असावेत, व ते कसे मांडावेत, हे पूर्णपणे त्या ब्लॉगरवर अवलंबून आहे. मी माझ्या दैनंदिनीत काय लिहावं, कसं लिहावं, हे मला वाचक सांगू शकत नाहीत. हां, जर मी 'माझ्या ब्लॉगाचं स्वरूप साहित्यिक आहे, आणि मी इथे कथा / कविता/ ललित प्रकाशित करतो आहे', असं सांगत असेन, तर वाचक त्या लेखनावर निश्चित मत मांडू शकतात. पण बहुतेक ब्लॉगर्स हे ब्लॉगाला स्वतःला अभिव्यक्त करण्याचं माध्यम समजतात. ब्लॉगाचं मूळ स्वरूप बघता त्यात चूकही काही नाही. त्यामुळे त्या ब्लॉगरांचं अनुभवविश्व जितकं समृद्ध / तोकडं असेल, त्याप्रमाणे लेखनविषय किंवा अभिव्यक्त करण्याच्या पद्धती त्यांच्या ब्लॉगांवर आढळतील.

मायक्रोब्लॉगिंग म्हणजे ट्विट्स आणि तत्सम. म्हणजे अगदी लहान ब्लॉग. केवळ काही ओळींचे / शब्दांचे.
आता मायक्रोब्लॉगिंगाला साहित्यिक निकष कसे लावायचे? कविता ट्विट करणारेही आहेतच की. पण मायक्रोब्लॉगिंगचा तो उद्देशच नाही.

मला सध्या ब्लॉगविश्व आवडत नाहीये >>> ब्लॉग विश्व आवडत नाहीये आणि तिथे कुणी चांगलं लिहित नाहीये म्हणून मला लिहायला सूचत्/जमत नाहीये ह्यात फरक आहे ना बस्के.

रच्याकने, जुन्या मायबोलीसारखी मजा आता येत नाय ब्वॉ हा सूर बरोब्बर असाच लागतो Wink

चिनुक्स,

बहुतेक ब्लॉगर्स हे ब्लॉगाला स्वतःला अभिव्यक्त करण्याचंच माध्यम समजतात. ब्लॉगाचं मूळ स्वरूप बघता त्यात चूकही काही नाही. त्यामुळे त्या ब्लॉगरांचं अनुभवविश्व जितकं समृद्ध / तोकडं असेल, त्याप्रमाणे लेखनविषय किंवा अभिव्यक्त करण्याच्या पद्धती त्यांच्या ब्लॉगांवर आढळतील.>>>
हे पटल..

सिंडी , बरोबर... तोच सूर लागतोय इथेही.. मलाही लिहील्यावर जाणवले होते.. Happy

आणि फरक म्हणशील तर आहे. किंवा विचार केलास तर नाही सुद्धा. असो.. मला फार काही समजवता येणार नाही. पण माझ्या मते तरी मला जे वाटते तेच मी लिहीले आहे. ज्यांना उत्स्फुर्तपणे लिखाण करता येते त्यांना असे प्रश्न/अडचणी पडत/येत नसतील. मला पडतात.

Pages