मिहीरचं हॉटेल.

Submitted by जीएस on 11 May, 2010 - 10:33

तीन वर्ष झाली असावीत त्या गोष्टीला. जपानमधून सुट्टीसाठी पुण्यात आलेला मिहीर म्हणाला, 'बिझनेस सुरू करायचा आहे.'
'अरे वा ! कसला ?'
'हॉटेल !'
आता हॉटेल हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटल नाही आणि वाटलं पण.
आश्चर्य वाटल नाही कारण माझ्या माहितीच्या पन्नास टक्के मंडळींच्या मनात कधी ना कधी हॉटेल सुरू करण्याची सुप्त इच्छा आहे. अगदी माझ्या सुद्धा.
आश्चर्य वाटलं, कारण मिहीरला ते खरच सुरू करायच होतं. मिहीर पुण्यातल्या एका आयटी कंपनीतला ऑनसाईट जपानी भाषातज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापक. आमच्या मायबोलीवरच्या ट्रेकिंग ग्रुपचा धडाडीचा सदस्य. तसा त्याचा हॉटेल व्यवसायाशी काही संबंध नव्हता.
'कशा प्रकारचे हॉटेल ?'
'जपानी पद्धतीचे speciality restaurant'

सुट्टीवरून मिहीर जपानला परत गेला, आणि तसे हॉटेल कसे चालवतात याचा अनुभव घ्यायला नोकरी सांभाळून तिथे कामही करू लागला. मध्ये एकदा परत आला, परत गेला, जागेचा शोध वगैरे सुरू झाला. पण असे तळ्यात मळ्यात करत राहिला तर प्रकल्प काही पुढे सरकेल असे दिसेना तेंव्हा धाडस करून मार्च ०९ मध्ये नोकरी सोडून पुण्यात सर्ववेळ हॉटेलच्या मागे लागला.

speciality restaurant चा बिझनेस प्लॅन तयार झाला, पण त्यासाठी मोठे भांडवल लागेल असे लक्षात आले. इनव्हेस्टर काही मिळेना. हॉटेल व्यवसायाचा अनुभव नव्हता हेही एक कारण असेल.
दोनतीन महिने असेच शोधात गेले, आणि आधी काहीतरी छोटे हॉटेल चालवून बघू, मग काही काळाने speciality restaurant कडे वळू असा त्याने निर्णय घेतला.

एका मिसळ जॉईंटची franchise घेण्याचे ठरवले, पुन्हा जागेचा शोध, अपा बळवंत चौकाजवळ एक छान जागा भाड्याने मिळाली. उत्साहाने सगळे काम सुरू झाले. पण अचानक ज्या सोसायटीमध्ये ते शॉप होते, त्या सोसायटीने हरकत घेतली. दुकान सोडावे लागले, आर्थिक नुकसानही झाले.

पुन्हा जागेचा शोध, व्हेज्-नॉनव्हेज हॉटेल काढावे का अशी कल्पना, ढोले पाटील रोडला एक जागा मिळाली, तिथे सोसायटीची हॉटेलला हरकत नव्हती पण नॉनव्हेजला हरकत होती. पुनश्च हरी ओम.

एक कोल्हापुरी हॉटेल franchise सारख्या तत्वावर चालवायला मिळाले, ते दोन महिने चालवलेही पण स्वतःचे हॉटेल हवे ही कल्पना काही स्वस्थ बसू देत नव्हती.

या सगळ्या काळात व्यवसायातले काही माहितगार साथीदारही मिळाले, त्यांच्यासह बिर्याणी स्पेशल चेन चा थोडा मोठा प्लॅन ठरला. सेंट्रल किचन, पाच सहा आउटलेट्स वगैरे. त्या दृष्टीने सगळी जुळवाजुळव झाली, बेळगाव, हैदराबाद.. अजून कुठुन खानसामे, टेस्टिंग झाले पण आयत्या वेळी इन्व्हेस्टर मागे हटले.

या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक वर्षाहून अधिक काळ गेला होता. जवळच्या पूंजीलाही ओहोटी लागली होती.

पण मिहीर आणि साथीदारांनी कंबर कसली, आकुर्डी एमायडीसीमध्ये थरमॅक्सच्या बाजूलाच एक चांगली जागा मिळाली आणि अक्षरशः बत्तीस दिवसात त्या जागेचा कायापालट करून 'लई भारी, कोल्हापुरी ' हे हॉटेल शनिवार, ८ मे रोजी चालू झाले. लगेच रविवारी जवळजवळ तब्बल तीनशे ग्राहकांनी गर्दी करून पसंतीची पावती तर दिलीच, पण एक जोरदार सुरूवात करून दिली.

असा प्रतिसाद आणि उत्तम दर्जा व चव बघता मिहीरचे हॉटेल बघता बघता मोठी भरारी घेईल यात शंका नाही. मिहीरला शुभेच्छा.

वरची वाटचाल आपण पाहिली तर या एक वर्षाहून अधिक काळात मिहीरला परिस्थिती, अडचणी, कदाचित अननुभवातून झालेल्या काही चुका यांचाही सामना करायला लागला, पण त्यातून मार्ग काढत, धीर न सोडता, माघार न घेता तो काम करत राहिला आणि मिहीरचे हॉटेल उभे तर राहिलेच पण दणक्यात चालूही लागले.

उद्योग करू इच्छिणारे अनेक मित्र, मैत्रिणी संपर्क साधत असतात, कुणी एक अडचण आली तरी मागे फिरतात, तर कुणाला काही अडचण तर येणार नाही ना याची आधीच खात्री हवी असते. अशा सगळ्यांनीच घेण्यासारखा जिद्द आणि चिकाटीचा एक धडा मिहीरच्या हॉटेलने दिला आहे. पुन्हा एकदा अभिनंदन.

टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. http://www.maayboli.com/node/13459 या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी मॅनहॅटन मधे वडापाव अन कटींगच्या गाडी पास्नं रात्रीच्या भुर्जी-पावच्या स्टॉल पर्यंत! >>> टाक पन्ना टाक ! आम्ही येतो फुकट चापायला Proud

मिहीर यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. Happy

हॉटेलचा व्यवसाय करणार्‍यांचं कौतुक वाटतं. कच्च्या मालाच्या 'इन्वेन्टरी'चं गणित त्यांच्याइतकं काटेकोरपणे कोणालाच पाळायला लागत नसेल, नाही का?

अरे व्वा Happy लई भारी - मिहीरला शुभेच्छा
(आयला, पण मी बघितलेला पाचेक वर्षान्पूर्वीचा टीशर्ट मधला गोन्डस मिहीर अन हा फोटूतला शिडशिडीत मिहीर, फारच फरक वाट्टोय, की मला चष्म्याचा नम्बर तपासुन घ्यायला हवा? Proud )

हे टेल्को रोडवर बर्डव्हॅलीच्या थोड अलिकडे आहे का? मला बघितल्यासारख वाट्टय, आता जायलाच हवे एकदा, ठिकाणाचा नकाशा टाका की राव! Happy

हो लिंबु, खुप बारीक झाला आहे मिहीर. त्याने केलेली प्रचंड मेहनत, धावपळ , त्याची तब्येतच सांगते. पण एकदम खुश आहे आता.

अरे जाऊन आलेल्यांपैकी कोणीतरी हॉटेलचा योग्य पत्ता लिहा की... म्हणजे ज्यांना जायचे आहे त्यांना काही अडचण येणार नाही..

पत्ता सोपा आहे, वर लिहिला आहे की... आकुर्डी एमआयडिसी मध्ये , थरमॅक्स कंपनीच्या गेटच्या बाजूला अलिकडेच.

टाटा मोटर्सवरून केएसबीचौक मार्गे आकुर्डीकडे येणार्‍या मुख्य रस्त्यावरच आहे.

जुन्या मुंबई पुणे रस्त्याने पुण्याहून आलात तर चिंचवडच्या सिग्नलला उजवीकडे एमआयडिसीमध्ये वळा, पुढे के एस बी चौकात डावीकडे वळा, आणि डावीकडे 'लई भारी, कोल्हापुरी' दिसेपर्यंत सरळ जात रहा.

एक जीटीजी ठरवा खरच तिकडे.

मिहीरला खूप खूप शुभेच्छा.
मुंबइत पण लवकरच सुरु करा तुमची शाखा. आम्ही सा.....रे खवय्ये वाट पहात आहोत.
मला हे कळत नाही आपले एवढे बरे छान छान मराठी पदार्थ आहेत. पण त्यांच मार्केटंग बरोबर होत नाही. मॉलमध्ये वगैरे बघितल तर KFC, macdonald's, nandus, subway, pizza outlets, गुजराथि, मारवाडी, मोघलाइ नाहीतर पंजाबी असच काहीतरी दिसत. त्या पलीकडे गडी जात नाही.
मि मान्य करते घरात खातो तेच परत जाउन बाहेर काय खायच. पण आपली मराठी खाद्य संस्क्रुती पण किती मोठि आहे. कोकणी, विदर्भ, कोल्हापुरी ई. पण नवीन पिढीला मराठी पदार्थ माहीतच नाहीत. (निदान मि पाहीलेल्या तरी).

मी ते हॉटेल (सध्या तरी बाहेरून) बघुन येईन अन मग नकाशा टाकेन Happy

बर, जीएस, मला एक सान्गा की मायबोलीचा टीशर्ट घालून गेल्यावर एक वाटी रस्सा एक्स्ट्रॉ किन्वा दोन पीस जास्तीचे अस्ली काही स्किम आहे का त्याची??? Wink Proud (नै, तस असेल तर यन्दा माबोचा टीशर्ट घ्यायला हवा - भले त्याला कॉलर किन्वा खिसा नसेल!)

>>>>> हो लिंबु, खुप बारीक झाला आहे मिहीर. >>>>>>>
ओहो, पण आता काळजी घ्या म्हणाव
त्या ज्ञानप्रबोधिनीसमोरच्या सामोशेवाल्यासारख म्हणतो की "जीवाला (जीवाकरता) खा!" आपलच हॉटेल आहे! Proud

मिहिरचं मन:पुर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
वर्षभर नुसत्या माबो गटगच्या ऑर्डरी घेतल्या तरी झोकात चालेल हॉटेल... Happy

आकुर्डी एमायडीसीमध्ये थरमॅक्सच्या बाजूलाच एक चांगली जागा मिळाली आणि अक्षरशः बत्तीस दिवसात त्या जागेचा कायापालट करून 'लई भारी, कोल्हापुरी>>>
आयला म्हणजे हे तर एकदमच जवळ की. Happy

मी नक्क्की जाउन येतो.
मिहिरला शुभेच्छा आहेतच. Happy

पिंची करांच एक जीटीजी इकडेच करुया.

Pages