मिहीरचं हॉटेल.

Submitted by जीएस on 11 May, 2010 - 10:33

तीन वर्ष झाली असावीत त्या गोष्टीला. जपानमधून सुट्टीसाठी पुण्यात आलेला मिहीर म्हणाला, 'बिझनेस सुरू करायचा आहे.'
'अरे वा ! कसला ?'
'हॉटेल !'
आता हॉटेल हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटल नाही आणि वाटलं पण.
आश्चर्य वाटल नाही कारण माझ्या माहितीच्या पन्नास टक्के मंडळींच्या मनात कधी ना कधी हॉटेल सुरू करण्याची सुप्त इच्छा आहे. अगदी माझ्या सुद्धा.
आश्चर्य वाटलं, कारण मिहीरला ते खरच सुरू करायच होतं. मिहीर पुण्यातल्या एका आयटी कंपनीतला ऑनसाईट जपानी भाषातज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापक. आमच्या मायबोलीवरच्या ट्रेकिंग ग्रुपचा धडाडीचा सदस्य. तसा त्याचा हॉटेल व्यवसायाशी काही संबंध नव्हता.
'कशा प्रकारचे हॉटेल ?'
'जपानी पद्धतीचे speciality restaurant'

सुट्टीवरून मिहीर जपानला परत गेला, आणि तसे हॉटेल कसे चालवतात याचा अनुभव घ्यायला नोकरी सांभाळून तिथे कामही करू लागला. मध्ये एकदा परत आला, परत गेला, जागेचा शोध वगैरे सुरू झाला. पण असे तळ्यात मळ्यात करत राहिला तर प्रकल्प काही पुढे सरकेल असे दिसेना तेंव्हा धाडस करून मार्च ०९ मध्ये नोकरी सोडून पुण्यात सर्ववेळ हॉटेलच्या मागे लागला.

speciality restaurant चा बिझनेस प्लॅन तयार झाला, पण त्यासाठी मोठे भांडवल लागेल असे लक्षात आले. इनव्हेस्टर काही मिळेना. हॉटेल व्यवसायाचा अनुभव नव्हता हेही एक कारण असेल.
दोनतीन महिने असेच शोधात गेले, आणि आधी काहीतरी छोटे हॉटेल चालवून बघू, मग काही काळाने speciality restaurant कडे वळू असा त्याने निर्णय घेतला.

एका मिसळ जॉईंटची franchise घेण्याचे ठरवले, पुन्हा जागेचा शोध, अपा बळवंत चौकाजवळ एक छान जागा भाड्याने मिळाली. उत्साहाने सगळे काम सुरू झाले. पण अचानक ज्या सोसायटीमध्ये ते शॉप होते, त्या सोसायटीने हरकत घेतली. दुकान सोडावे लागले, आर्थिक नुकसानही झाले.

पुन्हा जागेचा शोध, व्हेज्-नॉनव्हेज हॉटेल काढावे का अशी कल्पना, ढोले पाटील रोडला एक जागा मिळाली, तिथे सोसायटीची हॉटेलला हरकत नव्हती पण नॉनव्हेजला हरकत होती. पुनश्च हरी ओम.

एक कोल्हापुरी हॉटेल franchise सारख्या तत्वावर चालवायला मिळाले, ते दोन महिने चालवलेही पण स्वतःचे हॉटेल हवे ही कल्पना काही स्वस्थ बसू देत नव्हती.

या सगळ्या काळात व्यवसायातले काही माहितगार साथीदारही मिळाले, त्यांच्यासह बिर्याणी स्पेशल चेन चा थोडा मोठा प्लॅन ठरला. सेंट्रल किचन, पाच सहा आउटलेट्स वगैरे. त्या दृष्टीने सगळी जुळवाजुळव झाली, बेळगाव, हैदराबाद.. अजून कुठुन खानसामे, टेस्टिंग झाले पण आयत्या वेळी इन्व्हेस्टर मागे हटले.

या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक वर्षाहून अधिक काळ गेला होता. जवळच्या पूंजीलाही ओहोटी लागली होती.

पण मिहीर आणि साथीदारांनी कंबर कसली, आकुर्डी एमायडीसीमध्ये थरमॅक्सच्या बाजूलाच एक चांगली जागा मिळाली आणि अक्षरशः बत्तीस दिवसात त्या जागेचा कायापालट करून 'लई भारी, कोल्हापुरी ' हे हॉटेल शनिवार, ८ मे रोजी चालू झाले. लगेच रविवारी जवळजवळ तब्बल तीनशे ग्राहकांनी गर्दी करून पसंतीची पावती तर दिलीच, पण एक जोरदार सुरूवात करून दिली.

असा प्रतिसाद आणि उत्तम दर्जा व चव बघता मिहीरचे हॉटेल बघता बघता मोठी भरारी घेईल यात शंका नाही. मिहीरला शुभेच्छा.

वरची वाटचाल आपण पाहिली तर या एक वर्षाहून अधिक काळात मिहीरला परिस्थिती, अडचणी, कदाचित अननुभवातून झालेल्या काही चुका यांचाही सामना करायला लागला, पण त्यातून मार्ग काढत, धीर न सोडता, माघार न घेता तो काम करत राहिला आणि मिहीरचे हॉटेल उभे तर राहिलेच पण दणक्यात चालूही लागले.

उद्योग करू इच्छिणारे अनेक मित्र, मैत्रिणी संपर्क साधत असतात, कुणी एक अडचण आली तरी मागे फिरतात, तर कुणाला काही अडचण तर येणार नाही ना याची आधीच खात्री हवी असते. अशा सगळ्यांनीच घेण्यासारखा जिद्द आणि चिकाटीचा एक धडा मिहीरच्या हॉटेलने दिला आहे. पुन्हा एकदा अभिनंदन.

टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. http://www.maayboli.com/node/13459 या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे सायबर मिहीर म्हणून जो आयडी होता त्याचे की काय हे हॉटेल...

मिहिर व्यावसायिक भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा..

खूप मस्त बातमी. मिहीरचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. आता पुढल्या भारतवारीत कोल्हापुरीस भेट नक्की Happy

ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद जीएस.

मिहीरचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!! शक्य झाल्यास मिहिरच्या हॉटेलला नक्की भेट देईन.

खूप मस्त बातमी. मिहीरचं अभिनंदन
मायबोलीवरच्या ट्रेकिंग ग्रुपचा धडाडीचा सदस्य.
म्हणजे कोण ते सान्गा की राव.
एकदा भेट द्यायला पाहीजे होटेलला

ग्रेट.. मला खरेच हे वाचुन खुप आनंद झाला..

हे वाचताना अगदी सोप्पे वाटले तरी प्रत्यक्षात तेवढे सोप्पे नसावे.. आधी मुदलात हॉटेलसाठी जागा कुठे इथुन तयारी असताना नोकरी सोडायचे धाडस केले तेच ग्रेट. आणि अशा माणसाला साथ देणारी त्याची माणसेही ग्रेट..

all the best mihir..

हा मिहीर म्हणजे मायबोलीचा सायबर मिहीर.
हे काही फोटो ...
DSC02985.JPGDSC02982.JPG

तांबड्या-पांढर्‍या ओल्या-सुक्यावर ताव मारताना लेखक (डावीकडे) आणि हॉटेल मालक (उजवीकडे) ... Happy

DSC02978.JPG

आश्चर्य वाटल नाही कारण माझ्या माहितीच्या पन्नास टक्के मंडळींच्या मनात कधी ना कधी हॉटेल सुरू करण्याची सुप्त इच्छा आहे. अगदी माझ्या सुद्धा.>>>>>>> Lol माझ्या सुद्धा.

छान लेख. मिहीरना शुभेच्छा.
कुणाला काही अडचण तर येणार नाही ना याची आधीच खात्री हवी असते>>> अगदी अगदी. उद्योजक होणं हे (जरातरी) धडाडीचे काम, साध्या नोकरीतही कित्येकांची तीच अपेक्षा असते की कोणीतरी गॅरंटी घ्यावी.

दुसरे, मी हे केले तर माझ्या पुढील व्यावसायिक वाटचालीवर काय वाईट परिणाम होईल असा विचार कित्येक जणं करतात. कशाला होईल? त्यातुन काहीतरी तर शिकायला मिळेल ना? तो सर्व अनुभव, ते ज्ञान जाऊन जाऊन जाईल कुठे? फाजील म्हणावा इतका नाही तरी आपण स्वतःवर तेवढा तरी विश्वास ठेवला नाही, तर इन्वेस्टर आपल्यावर कशाला ठेवतील? किती तरी लोकं इन्व्हेस्टरच्या पैशाने रिस्क घेऊयात असा खुद्द इन्व्हेस्टरच्या समोरही कळत नकळत सादरीकरणात भर ठेवतात. Wink

मिहीर, खूप खूप शुभेच्छा ! नांव फारच आवडलं. लवकरच पुण्यात येणार आहे. पत्ता किंवा फोन मिळेल का ? शोधणं सोप पडेल.

मिहीरचं मनापासुन अभिनंदन अन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
जुलै मधे नक्की भेट देणार ह्या हॉटेलला! Happy

माझ्या माहितीच्या पन्नास टक्के मंडळींच्या मनात कधी ना कधी हॉटेल सुरू करण्याची सुप्त इच्छा आहे. अगदी माझ्या सुद्धा.>> माझ्या पण! एवढच नव्हे तर सायो नी मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा हॉटेलं टाकलीयेत! अगदी मॅनहॅटन मधे वडापाव अन कटींगच्या गाडी पास्नं रात्रीच्या भुर्जी-पावच्या स्टॉल पर्यंत!

Pages