घर : खरच एक गुंतवणुक आहे काय?

Submitted by निवांत पाटील on 7 May, 2010 - 13:31

आता जवळ्पास सगळ्या मित्रांनी घर घेवुन झालय. प्रत्येकाचं बजेट कमीत कमी ४० ते ५० लाखाच आहे. (नवी मुंबई आणि पुणे). उरलेले पण आता शॉपिंग करताहेत. काहिजण एकटे कमावणारे तर थोडेफार दोघे कमावणारे... ५ ते ८ लाख डाउन पेमेंट आणि बाकि हप्ता.

आता माझं मतः खरचं एवढे पैसे "गुंतवुन" घर घेण चांगला चॉइस आहे का? त्यापेक्षा भाड्याच्या घरात रहाणे बरे. समजा एका शहरात घर घेतले आणि दुसर्या ठिकाणी चांगली ऑफर आली तर निवड करताना किती गोंधळ. कसा हिशोब लावायचा? इव्हन भाड्याने दिले तरी हप्ता आणि भाडे यांचे गणित बसत नाही. बर परत विकणे आणि दुसरीकडे घेणे हे काही सोपे वाटत नाही (मायबोली वरील अनेक अनुभव वाचुन). दुसरी गोष्ट एकदा एवढी गुंतवणुक केली कि दुसर काही करतायेण्याजोग रहात नाही. मग फक्त घर बांधुन त्यात रहाण हेच साध्य आहे का आयुष्याच?

माझ्याशी चर्चा करताना मांडलेले मुद्दे: घराची किंमत वाढ्त जाते त्यामुळे ती एक चांगली गुंतवणुक आहे. (माझ्या मते विकल्याशिवाय नाही आणि किंमत वाढली तर आपण विकणार असतो का?) जेवढे भाडे भरतो तेवढ्याच पैशात आपले घर होत. (हे गणित अजुन मलातरी कळालेल नाहीय, कोणितरी समजावुन सांगाव म्हणुन हा प्रपंच).

माझ्याबाबतीत माझे गावाकडे घर आहे आणि शेवटी नोकरी करुन झाल्यावर तिथेच जाउन रहाणार आहे. त्यामुळे हे घर घेणे "गरज वाटत नाही" या सदरात येते. जर ४० ते ५० लाख भारतात मिळत असतील (वर्षाला) तर नक्किच ४० ते ५० लाखाचे घर घेणे परवडते असे मला वाटते.

तर खरोखरच कर्ज घेउन घर घेणे म्हणजे गुंतवणुक आहे का? कि मनाचे समाधान?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४०-५० लाख जास्त वाटतात खरे.. २५ एक लाख कर्ज काढून जरा तरी ठीक वाटतं..
(हे ही जास्तच आहेत.. पण ५० लाखांपेक्षा बरं)

पण म्हातारपणाकरता रहायची सोय करून ठेवावी.. शहरात असच नाही, निदान गावात तरी (जिथे परवडेल आणि रहायची वेळ आली तर रमता येईल अशा ठिकाणी)

कारण सध्याच्याच रेट नं भाडं वाढलं तर म्हातारपणी पंचाईत होऊ शकते..

हे रेन्ट व्ह. बाय क्यालक्युलेटर बघा, काही ठरवता येतं का बघा :). कधी कधी रेंटनी घर घेणं फायद्याचं दिसत असलं तरी आपल्या भावने पाई आपण घर विकत घ्यायचा निर्णय घेतो. तुमच्या केसमधे तुमचा म्हातारपणात कुठं रहायचं हा निर्णय पक्का असेल तर जिथं पैसे वाचातायत त्या ऑप्शनचा विचार करा.

गुंतवणुक आहे पण फायद्याची नाही म्हणता येणार , तेवढा पैसा बँकेत ठेवला तर आलेलं व्याज भाड्यापेक्षा जास्त असेल. मनाचं समाधान म्हणता येईल , पण सध्यातरी भारतात घर घेण्यापेक्षा अमेरिकेत घेणं स्वस्त वाटतं .

<<माझ्याबाबतीत माझे गावाकडे घर आहे आणि शेवटी नोकरी करुन झाल्यावर तिथेच जाउन रहाणार आहे.>> म्हातारपणी तुम्हाला जर पेंशन नसेल तर शहरातले घर भाड्याने देउन चांगली सोय होउ शकेल. किंवा ते घर विकले तरी खुपच चांगली रक्कम हाती येउ शकेल. घर विकुन येणारी रक्कम ही त्या रकमेची गुंतवणुक करुन येणार्‍या रकमेपेक्षा जास्त असेल असे वाटतेय. २००४ मधे विक्रीस असलेल्या घराची (पुण्यातील ) किंमत अत्ता २०१० मधे २.५ पट झाली आहे. (अगदी सेकंड हॅन्ड म्हणुन विकले तरी १.७५ ते २ पट येते ) एव्हढ्या वेगाने गुंतवणुकीतले पैसे वाढणार नाहीत असे वाटते.
शिवाय प्रीती म्हणते तसे स्वतःचे घर असणे आणि भाड्याच्या घरात रहणे हा 'भावनेचा' फरक आहेच. त्यामुळे अगदी ४०-५० लाखांचे नाही पण २५-३० लाखांचे घर ( आत्ता शहराबाहेर , खुप लाम्ब असले तरी काही वर्षात ते शहराजवळ येउ शकेल ) का घेणे फायद्याचे ठरु शकेल असे वाटते.

२००४ मधे विक्रीस असलेल्या घराची (पुण्यातील ) किंमत अत्ता २०१० मधे २.५ पट झाली आहे. (अगदी सेकंड हॅन्ड म्हणुन विकले तरी १.७५ ते २ पट येते ) एव्हढ्या वेगाने गुंतवणुकीतले पैसे वाढणार नाहीत असे वाटते.
>> मृदुला ह्याचं मुख्य कारण मला वाटतं.. तेव्हा घराच्या किमती १०-२० लाखाच्या दरम्यान होत्या..
आता आल्रेडीच किंमती जर ५० लाखापर्यंत असतील तर त्या किती वर्षात किती वाढतील हा एक मुद्दा..
त्यावर आपण व्याजापायी किती दिले असतील हा दुसरा मुद्दा.. कर्ज आहे तोपर्यंत असलेलं जॉबचं टेंशन..
हे सगळे मुद्देही विचारात घ्यावेत..
निदान निम्मे पैसे स्वतःचे घालता येत असतील तर कर्ज मॅनेजेबल राहू शकतं..

अर्थात, ह्यात पुन्हा प्रत्येकाची रिस्क टेकिंग कपॅसिटीही आली..
त्यातही पहिलं घर ही गरज असते, कारण ते काही आपण स्वतः रहात असताना विकू/भाड्यानं देऊ शकतं नाही..
दुसरं घर ही इन्व्हेस्टमेंट असू शकते...

राहत्या घराकडे कधीही "गुंतवणुक" म्हणुन बघु नये. घराची किंमत वाढली तरी आपण ते विकुन आपल्याला त्या वाढलेल्या किमतीचा लाभ घेता येतो का? नाही. आपली ऐपत बघुन (मी तर म्हणिन ऐपेतीपेक्षा थोडं कमी किमतीचं) जर घर घेतलं, तर एक तुमचं गृहकर्ज संपल्यावर तुम्हाला घराचे हफ्ते/भाडं हे कायमचे बंद होइल आणि जास्त पैसे वाचतील.

घर विकत घेणे म्हणजे इथुन आपल्याला कोणी घालवु शकत नाही ही निश्चीती विकत घेणे. मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असो. पाटील, तुमची ती सोय आहे. तेव्हा तुम्हाला कुठ्लाही पर्याय चालु शकतो.
शहरात ४०--५० लाख देउन घर/फ्लॅट विकत घेणार्‍या बहुसंख्य लोकांना तुमच्या सारखा दुसरा पर्याय नसतो.

वैद्यबुवा, इथे अमेरिकेत आपण घर घेताना घर आतुन बघायच्या आधीच Resale value चांगली येणारी नेबरहूड शोधतो. राहतं घर 'राहतं' व्हायच्या आधीच ते गुंतवणुक होतं.
आणि किंमत वाढली घराची, तर ते विकुन दुसरं थोडं लांब, थोडं लहान घर घेण्याचा पर्याय आहेच की !
तेव्हा घराकडे गुंतवणुक म्हणुन बघीतलं तर गैर काय ?
ऐपती प्रमाणे किंवा थोड कमीचं हे एकदम रास्त. नाहीतरी आपल्याला ' अंथरूण पाहून पाय पसरायचं' बाळकडू असतच.

राहत्या घराला किम्म्त नसते म्हणतात. कारण आपण ते घ्रर विकत नाही. पण रहात्या घराव्यतिरीक्त जास्तिचे घर घेउ शकलो तर मात्र ती उत्तम गुन्तवणुक ठरते.कारण घरान्चे भाव वाढतच असतात. अतिशय आवस्श्य्क असेल तर ते आपण विकु शकतो.त्याचा वर आपल्याला कर्ज ही मिळु शकते.परत ते आपण भाड्यानेही देउ शकतो.
किव्वा पुढे मागे मुलान्ना रहायला उपयोगी पडु शकते.

सुजा, प्रत्येक घराला किंमत असते. आणि गरज पडली तर राहतं घर पण विकावं लागतं. देव करो अन अशी वेळ कुणावर न येवो.

शुगोल(?) मुळात घर आपण इतकं लवकर बदलत नाही. त्यात अमेरिकेत घर घेतलत तर भारताइतकी नक्कीच घराच्या किमतीत वाढ होत नाही. ह्याऊपर राहतं घर विकताना ह्याचं कमिशन, त्याचं कमिशन करत करत पुष्कळ भुरदंड पडतो. फायदा होतो कधी कधी (भारतात जास्त होऊ शकतो) पण त्यामानानी झिक झिक खुप आहे. ह्या "डील" ( म्हणजे राहतं घर विकुन) जो काही फायदा होइल त्याच्या भरवशा वर काहिच प्लॅनिंग करता येत नाही.

अमेरिकेतील माहीत नाही. पण पुण्यातली काही निरीक्षणे.
पुण्यात २००५ च्या उत्तरार्धात घराच्या किमती एकदम वाढल्या. ते आय टीच्या प्रभावामुळे.अर्थात सगळे खरेदीदार आय टीवाले नव्हते तरी एखादा फ्लॅटची किम्मत १०लाख आहे ते घेण्यासाठी १० लोकांची लाईन आहे त्यात १५ लाख घेऊन एकच आय टीवाला आला तर त्याची किंमत त १५ च्या खाली राहात नाही. त्याकाळात आधी सामान नेऊन टाकून नन्तर खरेदीला अथवा भाड्याच्या व्यवहाराला बसलेले लोक मी पाहिले आहेत. मयूर कॉलनीत मला एक फ्लॅट १४ लखाला सांगण्यात आला. मी १३ ची ऑफर दिली (सांगितलेल्या किमतीत घेतले तर भोटपणा दिसेल व व्यवहार कळत नाही असे होईल म्हणून घासाघीस करण्यासाठी!) सौदा फिसकतला. नन्तर दोनच दिवसात तो १३.५ ला गेला. नन्तर तो तिसर्‍या सेलला ६५ लाखाला गेला ! अजूनही तिथून जाताना वेदना होतात.:)
मी दर तीन वर्षाला भाड्याचे घर बदलतो. दुसर्‍या वर्षापासून मालकाची भुणभुण सुरू होते. त्यामुळे इन्सिक्युरिटी, सामान हलवण्याचा त्रास असतोच. मनाप्रमाणे सामानाची मांडणी करता येत नाही. साधा ए.सी बसवायचा तर मालकाला विचारा ई. त्यामुळे एक परावलम्बित्व जाणवते.

सध्या बिल्डरांनी एक नवी ट्रिक सुरू केली आहे. ते म्हणजे एरिया कमी देण्याची. दोन बी एच केचा प्लॅट ६००-६५० च्या दरम्यान कारपेट असते. बेडरूम अशी की डबल बेड टाकला की त्यात हालचालही करता येत नाही. पराजप्यांनी सिंहगड रोडवर मधुकोष नावाची स्किम सुरू केली आहे. त्यात ३५ लाख ही अ‍ॅफोर्डेबल प्राईस वाटते पण सॅम्पल फ्लॅट पाहिल्यास घोर निराशा होते . टॉयलेट बाथरूम येवढे छोटेसे की चारी भिन्तीना अंग घासेल अशी भीती वाटते.

भाड्याचे घर निश्चित स्वस्त पडते पण भारतीय माणूस वास्तुशी भावनिक बांधला जातो. भाड्याचे घर सोडतानाही गलबलून येते. पुन्हा येथून उठ असे कोणी म्हणणार नाही असे फीलींग येते स्वतःचे घर असल्यावर. पण कर्जाने घर घेतल्यास त्याची किम्मत २ते ३ पट पडते. शिवाय एवढी मोठी रक्कम अनुत्पादक ठरते ते वेगळेच. व्यापारी तेवढ्याच रकमेचे एका वर्शात तिप्पट करून दाखवतात. ४०-४५ लाख भांडवल पाहिल्यावर कोणत्याही व्यापार्‍याच्या तोंडाला पाणी सुटेल अशी स्थिती आहे.

ज्याना खरोखरच रहायला जायचेय त्यांच्या दृश्टीने घर घेणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. पुण्यात कोणतीही स्किम निघाली की एका विशिष्ट समाजाचे लोक त्यात बुकींग करतात. लेक टाऊन नावाच्या कात्रजच्या सोसायटीत लोकानी २१०० ने बुकिंग केले. नन्तर इमारत पूर्ण झाल्यावर त्याची किम्मत एकदम वाढते मग ते विकून पैसे मोकळे करून घेतात. लेकटाउन मध्यी आज ४००० रु. भाव आहे आणि कोरे फ्लॅट रिसेल मध्ये ५० लाखापर्यन्त उपलब्ध आहेत. नुसते बुक केलेले.
जेवढे भाडे भरतो तेवढ्याच पैशात आपले घर होत.

हेही आता खरे नाही. आपण १ लाख दर वर्षाला भाड्यासाठी देत असू तर ४०-४५ लाख सेव करायला तितकीच वर्षे लागतील, ४० लाख ब्अ‍ॅन्केत ठेवले तर त्याचे ४०००० महिन्याला व्याज येऊ शकते. येवढ्या भाड्यात कोरेगाव पार्कला बंगला देखील मिळेल.:)पुण्यात भाडी त्यामानाने स्वस्त आहेत. पण दर महिन्याला ८-१० हजार 'फुकट' जातात असे फीलींग येते.
माझ्याबाबतीत माझे गावाकडे घर आहे आणि शेवटी नोकरी करुन झाल्यावर तिथेच जाउन रहाणार आहे. त्यामुळे हे घर घेणे "गरज वाटत नाही" या सदरात येते
हेहीखरे नाही अर्थात ते व्यक्ति परत्वे आहे. येथील बहुसंख्याना अशी डबल अ‍ॅटॅच मेन्ट नाही. त्यामुळे त्याना कोठेतरी सेटल होणे भाग आहे. गावाकडे घरे असणार्‍यांच्या बाबतीत. आपण बालपणीच्या स्मरणरंजनात असतो. आपले गावाकडचे नातेवाइक दुरावलेले असतात . तुम्ही कधी मधी जातात म्हणून तुमचे बरे स्वागत होते. पण कायमस्वरूपी तुम्ही तिथे गेलात की ते त्यांचे लोकल फन्डे काढून तुम्हाला पुरे गार करून टाकतात अगदी सख्खे भाऊ देखील. गावात आपल्या बरोबरीचे कोणी राहिलेले नसते. नवी पिढी आलेली असते ती तुम्हाला ओळखतही नाही. आपल्याच गावात आपण परके होऊन जातो. माझ्या गावात तर आता प्यायला पाणीच राहिलेले नाही. टँकर येतो. आता मी आणि बायको निवृत्तीनन्तर अपरात्री येणार्‍या टँकरच्या मागे धावू शकतो का? मुलाना तर नळाशिवाय पाणीच माहीत नाही. गावकडे तर ५-६ लाखात मस्त बागेसह घर होऊ शकते....
खेड्यातली असुरक्षितता हा एक वेगळा विषय आहे.
जर ४० ते ५० लाख भारतात मिळत असतील (वर्षाला) तर नक्किच ४० ते ५० लाखाचे घर घेणे परवडते असे मला वाटते.

वर्षाला ५० लाख? किती जणाना मिळतात ते. ? त्यांच्या दृष्टीने घर घेणे हा प्रॉब्लेमच असू शकत नाही. व त्यावर चर्चाही करण्यात पॉईन्ट नाही.

पण कायमस्वरूपी तुम्ही तिथे गेलात की ते त्यांचे लोकल फन्डे काढून तुम्हाला पुरे गार करून टाकतात अगदी सख्खे भाऊ देखील.>>>>>> Lol तुझा फॉर्म आवडायला लागलाय (मला तरी). आता उद्या लगेच भाडे तत्वावर अंडरप्यांटचा धंदा सगळ्यात सुरक्षित असली विधानं करु नकोस नाही तर मला तुझ्यावर फॉर्मावर बेट केलेले पैसे काढुन झक्कींवर लावावे लागतील. Proud छान लिहीलस. माझं एकच म्हणणं आहे. हा वरचा लिहीलेला विशिष्ट समाजाचा गेम आहे ना, तो मराठी माणसानी स्वतः शिकुन घेणे हाच एक पर्याय मला तरी दिसतो.

वैद्यजी, धन्यवाद. मधला तो झकींचा लफडा कळला नाही.

भाड्याच्या घराची दुसरी अशी कुचम्बणा . पर्मनन्ट अ‍ॅड्रेस्स असा कॉलम आला की गोची होते. ड्रायव्हिंग लायसन्स , पास्पोर्ट , ब्यांक, प्यान कार्ड, रेशन कार्ड इ. बेसिक डॉक्युमेन्ट मध्ये काय लिहावे हा प्रश्न असतो. हल्ली तर मोबाईललाही घराचा प्रूफ लागतो. त्यातले इलेक्ट्रिक मीटर तुमच्या नावावर नसते.इतर पुरावे ते मानत नाहीत. याबबतचा नन्तरचा पत्रव्यवहार जुन्या घराकडे जातो. मुलांच्या शाळेत पत्ते दिलेले असतात. घर बदलल्यास हल्ली फोन, बँक वाले पता बदलण्याचे चार्जेस लावतात. शिवाय नव्या घराचा प्रूफही लागतो. नुसत्या लीव अ‍ॅन्द लायसन्स अ‍ॅग्रीमेन्तला ते मानीत नाहीत.

पासपोर्ट इन्क्वायरीला पोलीस घरी येऊ शकतात . नेमके त्याच वेळी घर बदलले असले की पंचाइत.
अगदी अतिक्रमणात देखील स्वतःची एखादी झोपडी असली तरी माणूस 'घरंदाज' वाटतो व त्याला एक प्रकारची विश्वासार्हता येते Proud

कमीत कमी ४० ते ५० लाखाच आहे.>>
अगा बाबौ!!! Sad
त्यात ३५ लाख ही अ‍ॅफोर्डेबल प्राईस वाटते >> अजुनच मोठा अगा बाबौ!!!!

पुण्यात आणि पिंची मध्ये घराचे रेट अचानक दुप्पट तिप्पट झाले कारण मागणी जास्त होती आणि पुरवठा कमी.
समजा आता मी एक फ्लॅट घेतला ५० लाखाला (नुसत समजा हो. मी वर अगा बाबौ!! केलच आहे की) तर त्याची किम्मत वाढुन वाढुन वाढुन अशी किती वाढेल??
आणि हो सगळ्यात महत्वाच म्हणजे घराची किम्मतोवर वर्च्युअल आहे जोवर मी ते विकत नाहिये.
जर माझ्याकडे रहायला एक घर आहे आणि मी दुसर विकत घेवुन नंतर विकेन तेव्हाच ती गुंतवणुक फायदेशीर की. नुसतच मी रहात असलेल्या घराची किम्मत वर्च्युअली वाढुन मला फायदा नाहिये.
दुसर असा अनुभव आहे की निम्मे फ्लॅट बुक झाले तरी नंतरचे फ्लॅट बिल्डर बिलकुल किमंत कमी न करता विकतो. आल गिर्‍हाइक ठिक नाहीतर रेडी पजेशन विकेन (तेव्हा भाव वाढतात अस गणित असतं)
ज्याअर्थी निम्मेच फ्लॅट विकल्यावर देखील बिल्डर बिन्धास्त असतो त्याअर्थी त्याच फायद्याच गणीत तिथुनच सुरु होत असाव.
मग वाढलेले दर हा एक फसवा खेळ आहे हे लक्षात येत.
असो.
थोड विषयांतर झाल.

पुण्यातले भाव वाढण्याचे आनखी एक कारण म्हनजे टीडीआर घोटाळा. स्पर्धेत बिलडराने ३८०० रु. प्रमाणे टीडी आर घेतला. त्यात बांधकाम किम्मत अधिक म्हनजे ४८००-४९०० च्या खाली विकणे हा तोटा होता. मुलात यात पुढार्‍यांचा काळा पैसा असल्याने बराच काळ ते किमती चढ्या ठेवू शकतात. व्याज थोडेच भरावे लागते भांडवलाचे? Happy

<<आता माझं मतः खरचं एवढे पैसे "गुंतवुन" घर घेण चांगला चॉइस आहे का? त्यापेक्षा भाड्याच्या घरात रहाणे बरे>>
अरे पण भाड्याच्या घरातुन दर ११ नाहीतर २२ महिन्यानि घर सोडायची किती कट़कट होते.त्या पेक्शा कर्ज कादुन घर घेण चान्गल नाही का? भाड्याइतकेच हप्ते बसतात. पण तुम्ही स्वताच्या हक्काच्या घरात रहाता ना!
ते समाघान तुम्हाला भाड्याच्या घरात मिळत नाही रे.

एक घर राहायला व एक इन्वेस्ट्मेन्ट मध्ये घ्यावे. आपल्यासाठी नव्हे. मुलाबाळांसाठी. मुलीच्या नावावर घर असले तर तिला सिक्युरिटी असते. मला एक सल्ला हवा आहे. इथे २ बीएच के फ्लॅट शामीर पेट लेक ( रिंग रोड च्या जवळ आहेत) ते लोक पहिले १ लाख डाउन पेमेन्ट व उरलेले ९ लाख १५००० रु. महिना असे पोस्ट डेटेड चेक्स ५ वर्शांसाठी मागत आहेत. होम लोन वगैरे काही नाही. या स्कीम मध्ये काही गोम आहे काय? कि इन्वेक्स्ट करावे? १० लाखात घर रजि. कॉस्ट वेगळी. मला शक्यतो खालच्या मजल्यावरचे एक छोटे अपार्टमेन्ट म्हातारपणी राहण्यासाठी हवे आहे. १ बीएच के पण चालेल.

जर गरज असेल आणि त्या ठिकाणी जास्त काळ वास्तव्य होणार असेल तर घर घेणे कधीही फायदेशीर.. पण नोकरी फिरतीची, ३-४ वर्षात जागा बद्ल होणार असेल.. तर मग भाड्याची घर ठीक आहेत.

भाड्याची घर बदलण्यात खुप वेळ जातो, हजार कटकटी असतात, मनासारख मिळत नाही.. कधी एरिया तर कधी शेजारी वैगेरे.. दर वेळी कॉम्प्रोमाइज करावे लागते.. ब्रोकरेज, भाडे.. काय मनाला येइल ते सांगतात..त्यांच्याशी हुज्जत घालुन वेळ-पैसा फुकट जातो..
आपले घर असण्याच मानसिक समाधान असते.. लोन वर टॅक्स बेनिफिट पण जास्त मिळतो...
नंतर गावाकड जाणार हे जरी असल.. तरी ३०-४० वर्षात गावाकडची परिस्थिती पण बदलेलच कि.

वर्षाला ५० लाख? किती जणाना मिळतात ते >> होय.. मलाही हाच प्रश्ण
बाकी टोणगा यांचे पोस्ट पटले

भारतात भाडे तत्वावर घर देण्यासाठी प्रोफेशन संस्था नाहीत. त्यामुळे तिथे भाड्याने घर घेऊन राहणे ही एक डोकेदुखी आहे. याउलट, पास्चात्य जगात (नाके मुरडु नये) भाडे तत्वावर घर देण्यासाठी चांगल्या प्रोफेशनल राष्ट्रीय पातळीवर चालवल्या जाणार्‍या संस्था आहेत. त्यामुळे घर भाड्याने घेणे झिग्झिग राहत नाही. मनाप्रमाणे घर मिळणे हे दिव्यच, पण ते सुसह्य होते!

ऑस्ट्रेलियात दर सहा वा बारा महिने कराराने घर देतात. तीन तीन वर्षे ते तब्बल ७ वर्षे एकाच घरात भाड्याने राहणारे लोक पाहिले आहेत.

पुणे मुंबई सारख्या शहरात प्रोफेशनली मॅनेज्ड रियल इस्टेत एजंसी ची खास गरज आहे! (अजुन एक स्कोप..... है कोई :))एका गाळ्यात चार टपोरी धरुन बसलेले ईस्टेट येजांट नकोच! माझा वैयक्तिक अनुभव वाईट आहे. त्यांना त्यांच्याच पद्धतीने इंगा दाखवल्यावरच माझे डीपॉजिट परत मिळाले.

********
मी ११ महिन्यात ४ घरे बदलली. थोडा त्रास होतो, पण एन्जॉय! कर्ज डोक्यावर घेण्यापेक्षा बिर्‍हाड पाठीवर ठेवलेले बरे! ह्या विचाराने.

टीपः हा प्रातिनिधिक अनुभव नाही.

पुण्यात आणि पिंची मध्ये घराचे रेट अचानक दुप्पट तिप्पट झाले कारण मागणी जास्त होती आणि पुरवठा कमी.
हेही अर्धसत्य आहे असे माझे मत. याच कालात हजारो फ्लॅट गिर्हाइका अभावी पडून होते. यात आनखी एक घटकाचा प्रवेश झाला आहे तो म्हणजे काळा पैसा असलेली मंडळी. प्रभात रोड वर आता साध्या ८००-९०० च्या प्लॅटची किम्मत एक कोटीच्या आसपास आहे . केवळ वरकड रक्कम घर खरेदीत गुन्तवनारे हे लोक कोण आहेत? ८ कोटी एका फ्लॅटची किम्मत असणार्‍या स्कीमचे सर्व बूकिंग झाले म्हणे! हे फ्लॅट एकरकमी विकले जातात. त्यामुळे बिल्डरानी अ‍ॅफोर्डेबल हाउस ची कल्पनाच सोडून दिली . कर्ज काढून कट कट करणार्‍या (इथे नळ द्या अन तिथे स्विच द्या म्हणणार्‍या) भिकारड्यांशी कुठे डील करता. ? लॅविश, लक्झ्युरिअस , जिम, पूल, स्पा , इन्तेलिजन्ट होम वगैरे शब्द ऐकू येऊ लागले. बांधकामापूर्वीच पैसे मोकळे ! हाय काय अन नाय काय?
त्यामुळे धायरी ,आम्बेगाव अशा आउटस्कर्टपरिसरात ज्यांच्या जमिनी आहेत तेच बिल्डर झाले आणि अनेक शॉर्ट कट मारून अपुरे , गळके, बेकायदेशीर प्लॅट गळ्यात मारत आहेत. तक्रार करनारांवर दादागिरीचे प्रयोग सुरू झाले आहेत. खानदानी बांधकाम व्यावसायिक इन्टेलिजन्ट होम च्या नादात आहेत. ५० लाखाच्या खाली बजेट असणार्‍यांकडे ते तुच्छतेने पहात आहेत. आम्ही लोबजेट फ्लॅट बांधत नाहीत असे कुर्र्यात सांगत आहेत...

दोन नम्बरचे पैसे असलेल्या गिर्हाइकांमुळे खरा लोच्या झाला आहे...

टोणग्याचे पहिले पोस्ट मस्त आहे.

घराकडे गुंतवणूक म्हणून बघायचे का?

राहत्या घराकडे नाही बघता येत. कारण तिथे आपण राहतो, भाव कितीही वाढले तरी आपण ते विकूच असे नसते. शिवाय जर तेथील भाव वाढत असतील तर आपण विकून जिथे जाणार तिथलेही (त्याच शहरातले) भाव वाढलेलेच असणार, त्यामुळे मी विकून दुसरीकडे जाईन असे म्हणून घर घेता येत नाही. घर घेताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, ज्या दरवेळी जुळून येतील असे नाही.
राहते घर वेळप्रंसगी तारण म्हणून ठेवता येते व पैसे घेता येतात. पण अश्या वेळा फार क्वचित येतात. त्यामुळे राहते घर गुंतवणूक म्हणून रुढार्थाने पाहता येत नाही. हते आणि पहिले घर ही भावनिक गुंतवणूक असते. तिच्याकडे आर्थिक साधण म्हणून पाहता येत नाही. घर घ्यावे का नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्यामुळे तिकडे जात नाही.

दुसर्‍याघराकडे गुंतवणूक म्हणून पाहावे का?
हो. जर दुसरे घर घेण्याची ऐपत असेल तर नक्कीच. हा एक फायदेशीर व्यवहार आहे. दुसरे घर घेताना किरायाने देणे हाच एक दृष्टीकोण असल्यामुळे ते सर्वसोयींनी युक्त असावेच असे नसते. असे घर साधारण ३० एक लाखापर्यंत अजूनही पुण्यात मिळते. (सिंहगडरोडवर सध्या एक घर २८ लाखाला माझा मामेभाऊ घेत आहे.)
अश्या घरांना किराया साधारण ७.५ ते १०,००० पर्यंत मिळतो. लाखाला ९०० ते १ हजार हप्ता ह्या प्रमाणे २० लाख कर्जावर, अर्धा हफ्ता किरायात व अर्धा आपण भरु शकत असू तर १० वर्षाने हे घर फायद्यात ठरते. असा फायदा सोन्यात वा पैसे बँकेत ठेवून मिळत नाही. ४० लाखावर १० टक्के व्याज आजही मिळत नाही.
इ़कॉनॉमी जशी जशी प्रगत होत जाते तसे तसे व्याजदर कमी होत जातात. अमेरिकेत पैसे बाळगणार्‍यांना किती टक्के व्याज मिळते ते माहित असेल. भारतातही येत्या १५ वर्षात वर्षात व्याजदर ३ ते ५ टक्के पण नसतील. शिवाय महागाई दरवर्षी वाढते त्यामुळे आजच्या १००० रु ला १० वर्षांनंतर ७०० रु पण किमंत असेल की नाही हे माहित नाही. त्यामुळे पैसा हातात ठेवणार्‍यांनी ह्या गोष्टीचा जरुर विचार करावा.

(अजून आर्थिक गणित मांडायचे असतील तर मी नक्कीच मदत करेन.)
जर वर पैसे असतील तर घर घेणे म्हणून फायदेशीर ठरते.

केदार , टोणगा छान माहिती
आमच्या पार्ल्यात एकाने २००४ मधे २बीएच्के घ्यायचा म्हणुन रहाता १बीएचके विकला आणी भाड्याच्या घरात रहायला गेला.२बीएचके शोधत होता शोधत होता पण मनासारखे मिळत नव्हते. आणि झाले कि भाव इतके फटाफट वाढले की त्याला २बीएच्के काय पण १बीएचके घेण पण शक्य होत नाहीये.
बर पार्ल्यातल्या लोकान्ना पार्ल सोडायच नसत. म्हन्जे आली का पन्चाइत. त्याची मुलगी आता ९ वी त आहे.

अरे वा... खुपच छान माहिती मिळाली... खासकरुन मी जो विचार करत होतो ते काही सगळाच चुकिचा नाहीय.
केदार जोशी, केदार, टोणगा पटलं ...
माझा सांगण्याचा उद्देश हा होता कि जर वर्षाला ४० ते ५० लाख मिळत असतील तर ४० ते ५० लाखाच घर घेणे ठीक आहे.

प्रीती: calculate करुन बघितलं... पण भाड्याचे घरच परवडते. साधारण पणे ८० ते ९० % लोन असेल तर हप्त्यच्या ३०% मध्येच भाडे निघुन जाते.

घर बदलायचा त्रास: ह्याला पण २ बाजु आहेत. राहिल्यानंतर नाही आवडलं, शेजार बदलला (नाहीच जमल) नोकरीत दुसरीकडे चांगली संधी आली.... तर बांधील रहात नाही.

दुसर्या घराची कल्पना पण छान आहे. पण "गुंतवणुक" म्हणुन घर घेण्यापेक्षा जागा (पुण्या मुंबैत नव्हे) घेणे चांगले असे वाटते. (मी वेंगुर्ल्यात एक प्लॉट घेतला होता, अगदी मुंह मांगे किंमत देउन, पण त्याची किंमत आता बरीच वाढली आहे, अजुन वाढेल). जरी महिण्याला भाडे मिळत नसेल तरी हा पर्याय चांगला वाटतो. कोणी calculations केली असतील तर कृपया शेअर करा. मला वाटते घराच्या किंमती पेक्षा जागेची किंमत जास्त % वाढते. ( माझ्या गावाकडच्या घराची किंमत गेल्या १० वर्षात दुप्पट झालीय आणि जवळ्च असलेल्या प्लॉट्ची किंमत १२ पट झाली आहे आणि सध्या तो न बांधलेला शेवटचा प्लॉट Happy .)

>>इ़कॉनॉमी जशी जशी प्रगत होत जाते तसे तसे व्याजदर कमी होत जातात<<
हे वाक्य थोडं बुचकळ्यात पाडेल असं आहे.

माझ्या मते इकॉनॉमीची प्रगती होण्यासाठी व्याजदर कमी केले जातात.

Pages