गुरु बोध

Submitted by बागुलबुवा on 4 May, 2010 - 22:46

दत्तगुरुंनी चोवीस गुरु केले होते म्हणतात. अर्थात अध्यात्माच्या बाबतीत मी तसा अध्यात मध्यातच आहे म्हणा. पण आपल्या सारख्या पामरांच्या आयुष्यात एव्हढे गुरु करायची ताकद कुणाच्यात आहे. तरीही आपल रोजच आयुष्य जगताना कधीतरी कोणतरी असं भेटून जातं की त्याच्या / तीच्यापासून बरच शिकायला मिळतं, फक्त आपली शिकायची तयारी हवी.

जगता जगता जगणं शिकवून जाणारे हे क्षण तुम्ही इथे शेअर करावे म्हणून हा प्रपंच. सुरुवात माझ्यापासून.

वय होतं सतरा अठराच्या आसपास. टॅन्कमधले मासे पाळायचं वेड लागलं. चार पुस्तक वाचल्यावर ते अजूनच बळावलं. बघता बघता टॅन्क्सची संख्या वाढत गेली आणि ते अपुरे वाटायला लागले. आता विचार ठरत होता पॉन्डचा. हौद बांधण्यासाठी सगळी मदत, मोठ्या चुलत भावाने केली. वीटा, रेती, सिमेन्ट तर दिलच पण त्याचा ब्येष्ट गवंडी पण दिला.

मला काही सांगायचीही गरज पडली नाही आणि बघता बघता हौद पूर्ण झाला. मी मुद्दामहून तो थोडा जमिनीवर तर थोडा जमिनीखाली बांधून घेतला होता. बाहेरुन फिनिशिंग झाल्यावर गवंडीबुवा आत उतरले. चारही भिंतीना आतून गुळगुळीत बनवल्यावर ते तळ बनवायच्या मागे लागले. तळही बनवून झाला, फक्त त्यावर गवंडीबुंवाच्या दोन्ही चरणकमलांचे ठसे राहिले होते. आणि मी पाहिलं तेव्हा गवंडीबुवा, एका पायावर उभे राहून, दुसर्‍या पायाचा ठसा बुजवण्याच्या मागे लागले होते.

आता तीन फूट खोल हौद, तोही शोभेसाठी न बांधता उपयोगासाठी बांधलेला. पाण्याने पूर्ण भरल्यावर कोणाला दिसणार होते ते ठसे ? पण हे सांगितल्यावर बुवा भडकले. कदाचित माझ्या हिंदीमुळे असेल. पण त्यानी मला दरडावून सांगितलं "आपको चल सकता है, पर हमे नही चलेगा |"

अजूनही कधी जर तो हौद पूर्ण रिकामा केला तर तो उरलेला ठसा दिसतो आणि आपलं काम शक्य होईल तितक्या अचूकपणे करणारा तो गवंडी आठवतो. एका पायावर उभं राहून तपश्चर्या करणार्‍या एखाद्या तपस्व्यात आणि ह्या कर्मयोग्यात मला तरी काही फरक दिसत नाही.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

माझ्या बाबांचे एक स्नेही होते. मी ९ वीत असतानाची गोष्ट आहे ही. तेव्हा त्यांच वय होत ७०-७५ च्या दरम्यान. जबरदस्त हार्ट अ‍ॅटॅक मधुन नुकतेच बाहेर आलेले. आमच्या घरी आले तेव्हा त्या आजारपणाच्या, हॉस्पिटल वारिच्या, औषध पथ्य पाण्याच्या कुठल्याही त्रासिक खुणा चेहर्‍यावर नव्हत्या. वर आम्हालाच ऐकवुन गेले "अरे ७० नंतरच आयुष्य हे ग्रेस आयुष्य आहे आणि ते तसच ग्रेसफुली जगावं" मी इतक्या वर्षात त्यांच नाव विसरले, चेहराही विसरले पण हे वाक्य मात्र कोरल्यासारख लक्षात राहिल आणि त्याबरोबर त्यांचा चेहरा विसरले तरी त्यावरचे त्यावेळचे भाव मात्र अजुनही लक्षात आहेत. आयुष्यात जेव्हा कधी माझ्यावर अशी वेळ येईल तेव्हा मलाही असच म्हणता याव अशी इच्छा आहे.

>>तरीही आपल रोजच आयुष्य जगताना कधीतरी कोणतरी असं भेटून जातं की त्याच्या / तीच्यापासून बरच शिकायला मिळतं, फक्त आपली शिकायची तयारी हवी.
एक्दम पटले फक्त एक एडिशन म्हणजे त्यासाठि आपले पाय कायम जमिनीवर हवेत ....:)

अप्रतीम अम्या. आपापले काम निष्ठेने करता करता सुद्धा अध्यात्म कसे जगावे हे तुझ्या लेखातला गवंडी आणि कविता ने सांगितलेल्या किस्श्यातल्या आजोबांकडून शिकावे. Happy

लिखाणाबद्दल बोलायचं तर सुरुवात, मध्य आणि शेवट चपखल गुंफले आहेस.

<<खुप शिकायला मिळते मुलांकडुनह<<>> तूझे स्वयंपाकघरातले प्रयोग बघुन तोही शिकत असेलच की तुझ्याकडून (काय करु नये हे) Wink

भाच्चे, ग्रेसफुलच....

शिकायला खूप काही असते आजूबाजूला, आणि बरेच काही शिकवून जाणारी माणसे, फक्त शिकण्याची तयारी हवी!:)

आवडल ! हे वाचुन एक फोर्वड ईंमेल आली होती आठवली. त्यात एक शिल्पकार एक मूर्ति बनवत असतो. त्याच्या शेजारी एक हुबेहुब तशीच मुर्ति पडलेली असते. त्याला त्या मूर्ति बद्दल विचारले तर तो सांगतो की ती खराब झाली आहे कारण तीच्या गालावर एक ओरखडा उठला आहे. यावर विचारणारा म्हणतो की ही मूर्ति तर उंच अशा base वर उभी रहाणार आहे त्यामुळे कोणाला तो ओऱखडा कळणारही नाही. यावर तो शिल्पकार म्हणतो की "मला कळेल".
उत्तमतेचा ध्यास इतरांसाठी नसता जर आतून असेल तरच हे शक्य होत Happy

छोटासा आणि छान लेख अम्या!

>> अम्या.. एक ठसा का ठेवला? (ए. भा. प्र.)
कुणाची दृष्ट लागू नये म्हणून! Lol बंगल्यावर काळ्या भावल्या उलट्या का टांगतात माहितीये ना?

बराच उशीरा प्रतिसाद. पण छान अनुभव. किंवा इतका साधा अनुभव सुद्धा लक्षात ठेवुन त्याच्याबद्दल विचार करायची वृत्ती छान Happy

मुर्तीकार आणि विठ्ठलाची कथा आठवली. मुर्तीकार अथक प्रयत्नांनंतर एक अप्रतिम मुर्ती बनवतो पण विठ्ठलाच्या चेहर्‍यावरची स्मितरेषा अस्पष्टशी निसटल्याच त्याच्या लक्षात येत. राजाला ती मुर्ती प्रचंड आवडते आणि तो तीच मुर्ती मंदिरात स्थापन करण्याचा निर्णय घेतो. पण मलाफासावर दिल तरी बेहत्तर पण ही मुर्ती मी मंदीरात स्थापन करु देणार नाही अस मुर्तीकार सांगतो. राजाला त्याच आश्चर्य वाटत कारण त्याला त्या मुर्तीत काहीच कमतरता जाणवत नसते. मुर्तीकार म्हणतो जग ज्याच्यापुढे नतमस्तक होत त्याच्या चेहर्‍यावर मला जर स्मित देता आल नाही तर मी देवान दिलेल्या देणगीचा विश्वासघात केल्यासारख आहे.

अम्या छान आठवण Happy

>>>>जग ज्याच्यापुढे नतमस्तक होत त्याच्या चेहर्‍यावर मला जर स्मित देता आल नाही तर मी देवान दिलेल्या देणगीचा विश्वासघात केल्यासारख आहे.

व्वाह! शुभांगी.. मस्त गोष्ट..
फक्त.. देणगीचा विश्वासघात की अपमान??

माझ्या मुलीने एकदा मला असाच गुरुबोध दिला होता. ती साडेचार-पाच वर्षांची असतानाची गोष्ट ... कशावरून तरी मी तिच्यावर खुपच चिडले होते आणि त्यामुळे तिला चांगले दोन-तीन धपाटे मिळाले. पुन्हा माझा हात उगारलेला असतानाच रडवेल्या चेहेर्‍याने माझ्याकडे बघून ती म्हणाली : 'ममा, यु नो, मला बाळं झाली ना की मी त्यांना कधीच मारणार नाही'. बापरे, माझा हात वरच्यावरच राहिला आणि मला स्वतःचीच इतकी लाज वाटली ना. आताही कधी तरी ती ओरडा खाते पण मार बंदच झाला. मला एक खूप मोठा धडा शिकवला माझ्या समजुतदार लेकीनं.

Pages