बुट पॉलीश

Submitted by विशाल कुलकर्णी on 31 January, 2009 - 07:04

"बाबु, सिर्फ दो रुपीया लेगा. एकदम चकाचक पालीस करताय साब. पयले पालीस करवावो ..पसंद आया तो फीर पैसा देव, साब." मी लोकसत्तामधुन डोकं वर काढलं.

boot_polish.gif'एक तर दोन रुपयात पॉलीश आणि ते सुद्धा, तो आधी पॉलीश करणार...पसंतीस उतरलं तर पैसे द्यायचे.'
काही तरी वेगळाच अनुभव होता हा.

मला लगेच बोरीबंदरचे ते तथाकथीत अधिकृत पॉलीशवाले आठवले. त्यांच्या समोरच्या ठोकळ्यावर पाय ठेवले की फटदिशी पहिला प्रश्न येतो," छुट्टा है ना, बाद में झिगझिग नै मंगताय !" त्या पार्श्वभुमीवर हा सुखद वगैरे म्हणता येइल असाच धक्का होता.

मी पेपर बाजुला ठेवला, त्याच्या कडे नीट पाहीलं. जेमतेम १०-११ वर्षाचं वय. खपाटीला गेलेलं पोट.....

आत्तापर्यंत ट्रेनमध्ये बुटपॉलीश करणारी अनेक पोरं पाहीली होती. कधी सहानुभूती म्हणुन तर कधी स्वस्तात होतंय म्हणुन त्यांच्याकडुन बुटपॉलीश करुनही घेतलं होतं. या पोरांचं दिसणं अगदी सारखं असतं, अगदी एकाला झाका आणि दुसर्‍याला काढा असं. रापलेली कातडी, खपाटीला गेलेलं पोट, तोंडावर कमालीचे तेलकट भाव, केसाला मात्र वर्षानुवर्षे तेलाचा स्पर्ष नसतो, तसेच मेणचटलेले कपडे... खांद्यावर ती पॉलीशच्या सामानाची कळकट्ट पिशवी... शक्यतो तोंडात मावा किंवा तत्सम काहीतरी तंबाखुजन्य पदार्थ आणि चेहेर्‍यावर कमालीचे बेरकी भाव . त्याच अपेक्षेने मी त्या आवाजाच्या मालकाकडे पाहीलं..पण इथेच मला आश्चर्याचा पहीला धक्का बसला.

अंगावर साधेच, खरेतर थोडेसे फाटकेच म्हणता येतील असे पण स्वच्छ कपडे. अगदी एरीयलमध्ये नसतील धुतलेले पण स्वच्छ होते. पायात अंगठ्यापाशी शिवलेल्या, त्याला थोड्याशा मोठ्याच होणार्‍या रबरी सपाता.(स्लीपर) खांद्यावर तशीच एक हिरव्या रंगाची पण धुतलेली एकदोन ठिकाणी ठिगळे मारलेली पिशवी. हातात तो पॉलीशचा लाकडी ठोकळा आणि चेहेर्‍यावर चक्क प्रसन्न हास्य. त्याचा चेहरा पाहिल्यावर त्याला नाही म्हणायची इच्छाच होईना. खरेतर मी कधीच बाहेर पॊलीश करत नाही. तेवढीच बचत. Happy असा कोणी मागेच लागला तर मी त्यालाच वर निर्लज्जपणे म्हणतो," फोकटमे करेंगा क्या? तो बिचारा (मनातल्या मनात का होईना) शिव्या देत निघुन जातो. पण आता याच्या निर्मळ चेहर्‍याकडे पाहुन त्याला नको म्हणावेसेच वाटेना.

मी दोन्ही पाय त्याच्यापुढे ठेवले आणि पुन्हा वर्तमानपत्रात डोके घातले. राजेश पवारने पुर्वेला गारद करताना अर्धशतकही झळकावले होते. मनातल्या मनात आपल्या निवडसमीतीला शिव्या देत ती बातमी वाचत होतो. बघाना इतके गुणी खेळाडु इथे स्थानक स्पर्धांमध्ये सडताहेत आणि नाही नाही ते वशील्याचे तट्टु राष्ट्रीय संघात निवडले जातात.

"साबजी....!" पुन्हा समोरुन हाक आली.."आता काय बाबा !"

"साब, शेवागने कितना बनाया !"

च्यायला, हा पॊलीश करतोय की पेपर वाचतोय. पण त्याचे हात सराईतपणे चालुच होते. आधी त्याने व्यवस्थीतपणे फडक्याने बुट पुसुन घेतले होते. एका ठिकाणी थोडासा चिखल साठुन वाळला होता तो त्याने जवळच्या पत्र्याच्या तुकड्याने हळुवार खरडुन काढला होता. थोडेसे पाणी लावुन ती जागा साफ करुन घेतली आणि आता त्यावर पॉलीशचा हात मारणे चालु होते.

"नही यार, ये वो वाला क्रिकेट नही है, ये तो हमारा दुलीप ट्रॉफीका मॆच है! इसमे सहवाग नही है, सारे रणजी प्लेयर्स है!"

"साबजी, रणजी बोले तो....

"अरे यार, रणजी बोले तो..इथे मात्र मी अडकलो कारण हे सगळं हिंदीत त्याला सांगणं म्हणजे आजुबाजुला बसलेल्यांना खुसखुस करायला संधी देण्यासारखं होतं. माझं हिंदी म्हणजे अगदीच धन्य आहे..उदा. "तु चल पुढे, मै तांब्या ठेवके आत्या !"

मी क्षणभर ब्लॉक झालो. त्याला माझी समस्या कळाली की काय कोण जाणे पण त्याचं पुढचं वाक्य चक्क मराठीत होतं. मग मात्र मी त्याला मराठीत सगळं समजावुन सांगीतलं. इंटरनॅशनल क्रिकेट आणि रणजी मॅचेस, दुलीप ट्रॉफी यातला फरक समजावुन सांगीतला.

"या अल्ला, बोलेतो हमारे गल्ली क्रिकेटके माफिक है तो! ऐसाबी होताय क्या साब, वो नसीम खालाका अन्वर है ना, क्या बोलींग करताय साब !! उसको लेगा क्या ये तुम्हारा रणजीवाला ?"

आता मात्र मला राहवेना. मी लोकसत्ता बाजुला ठेवला आणि त्याच्याशी बोलु लागलो.

नाम क्या है तुम्हारा, किधर रहते हो?

"पता नै साब, जबसे समज आयी है, सब्बी लोग छोटु कैके बुलाते है, नाम का तो कुच अता पता नै! वईसे तो उल्लासनगर मे रैताय अपुन. वो इस्टेशन के बाजु वाली झोपडपट्टी मे खोली नं. ११३. खोली क्या साब अपने नसीमखाला का झोपडा है, वोईच अपना ठिकाना. कबी कबी लेट हो जाताय तो इदर किदर बी सो जाताय. अब हवालदार आके उठाताय डंडा मारके पन क्या करे, साला अपनी किस्मतच लावारीस है, तो हवलदारको क्या बोलनेका ! " दुसरा पैर रखो साब ... बोलता बोलता त्याचे हात चालुच होते.’

आता मला त्याच्यात स्वारस्य वाटायला लागले होते.

"इसका मतलब पढाई - लिखाईके नामसे तो ठणठण गोपाळच होइंगा", मी पुन्हा एकदा आपलं हिंदी पाजळलं.

"नै साब, अपुन रात के इस्कुल मे जाताय ना ! वो टीचर दीदी है ना उसनेच सिखाया मेरेकु ये सब साफ सुफ रहनेका बोलके."
तो थोडासा पुढे झुकला आणि मला पुढे झुकण्याची खुण केली, आजुबाजुची माणसे बघत होती. पण आता मला त्यांची पर्वा नव्हती, मी थोडासा त्याच्याकडे खाली वाकलो..तो माझ्या कानाशी आला आणि हळुच म्हणाला ,"साहब, मेरे बोलनेपें मत जाना, मै इतनी घटीया जबान नही बोलता. लेकीन क्या करु साफसुथरी हिंदी बोलुंगा तो मुझसे पॉलीश कौन करवायेगा? पेट के लिये करना पडता है साब? लेकीन हा, गंदगी मुझसे बर्दाश्त नही होती!"

त्याक्षणी मात्र मला माझ्या हिंदीची खरंच लाज वाटली. मी मनोमन ठरवलं की याच्याशी फक्त मराठीतुन बोलायचं. ती एकच भाषा मी स्वच्छ आणि शुद्ध बोलु शकतो ना !

"किती कमाई होते रे दररोज? तुझ्या खालाला पण पैसे द्यावे लागत असतील तुला, तिच्या कडे राहतोस ना! मग या शिक्षणासाठी कुठुन पैसा आणतोस."

"अरे साब चाह है उधर राह है, हो जाता है इंतजाम. हौर रैने का बोले तो खाला येक पैसा भी नै लेतीय, उल्टा मै कबी कबी वडापाव लेके जाताय उसके लिये तो गुस्सा करती मेरेपे. अम्माको पैसेका रुबाब दिकाताय क्या करके पुछती उनो !"

आता पॉलीश करुन झाले होते. त्याने पिशवीतुन त्याचा तो जरासा रफ असणारा, ऑर्गण्डीच्या कापडासारखा फडका काढला आणि त्याने बुटावर शेवटचा हात मारायला सुरुवात केली.

"साब, अपुनने अपनी अम्मीको नै देखा, खाला बोलती मै उसको पटरीके पास मिला था ! लेकीन मेरेको लगताय की अल्लाकोच मेरे पे तरस आ गया होयेगा जो खाला की नजर पड गयी मेरेपे. अब वोईच मेरी अम्मी है हौर वोइच अब्बा ! कबी कबी कम पडता फ़ीस का पैसा तो खालाईच देतीय ना ! हौर एकाद बार उसके पास बी नै हुवा तो टीचरदीदी भर देती है! "

मला उगाचच लाजल्यासारखं झालं. खरतर त्याच्याशी किंवा त्याच्या खालाशी, टीचरदीदीशी माझा काही संबंध नव्हता कधी येण्याची शक्यताही नव्हती पण उगाचच वाटुन गेले की ही खाला काय किंवा ती टीचरदीदी काय ही माणसं कुणाच्या नजरेतही न येता आपापल्या परीने समाजाची सेवा करताहेत आणि आपण मात्र आपल्या बिझी वेळापत्रकाचा बाऊ मिरवुन नामानिराळे होतो. किती तोकडे, खुजे असतो ना आपण.

"हो गया साब, देखो कैसा चमक रहा है !" मी एकदम भानावर आलो. पाहीलं तर गाडी बोरीबंदर स्थानकात शिरत होती. मी खिशात हात घातला, पाकीट काढले ..पाहिलं तर पाकिटात पाच ची एक नोट होती, दहाच्या दोन तीन, पन्नास ची एक आणि काही शंभराच्या नोटा होत्या. मी त्यातली पन्नासची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली.

"यार छुट्टे नही है मेरे पास! एक काम करेगा वो बुक स्टॉलपे जा और उसके पास "चंपक" करके एक बच्चोकी किताब मिलती है वो लेके आ. तेरेको छुट्टे दो रुपये मिल जायेगे मेरी किताब भी आ जायेगी. त्याने एकवेळ नोटेकडे पाहीले...

क्षणभर रेंगाळला. पण लगेच त्याने ती नोट घेतली आणि म्हणाला ,"यही रुकना साब मै अब्बी आया!"

तो जोरात बुकस्टॊल कडे पळाला. आणि मी त्या जागेवरुन हाललो.तिथुन लांब जावुन व्ही.टी.च्या तिकीट बुकिंग हॉलपाशी एका खांबाआड जावुन उभा राहीलो. तो थोड्याच वेळात तसाच धावत परत आला. मला त्या जागेवर न पाहुन गोंधळला. दोघातीघांना काही तरी खुणा करुन विचारत होता. शेवटी मी सापडत नाही म्हटल्यावर त्याने ते पुस्तक आपल्या पिशवीत टाकलं, हातातल्या चिल्लरपैकी बहुदा दोन रुपये स्वत:च्या खिशात टाकले. बाकीच्या सगळ्या नोटा तिथेच बसलेल्या आंधळ्या भिकार्‍याच्या हातावर टेकवल्या. कपाळावरचा घाम पुसला...आणि..

"ए बुट पालीस....दो रुपीया...दो रुपीया.......!"

मला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या कंजुसपणाची लाज वाटली.

विशाल

(रेखाटन: पल्लवी देशपांडे)

गुलमोहर: 

छान लिहिले आहे. असे अनुभव आले की खरेच स्वतःची लाज वाटल्याशिवाय रहात नाही.

मी आणि माझी बहिण मुंबईत असताना नेहेमी बॅगमधे छोटे-छोटे पार्ले-जी चे पॅकेट्स ठेवायचो आणि सिग्नलपाशी मुलं पैसे द्या म्हणुन मागे लागली की त्यांना ते द्यायचो. एका NGO साठी काम करणार्‍या मैत्रिणीने आम्हाला ही "आयडीया" दिली होती. कारण पैसे ह्या मुलांच्या "बॉस" कडे जातात पण खाउ दिला तर पोटात जातो. एकदा असेच एका मुलाच्या हातात पुडा ठेवला तर तो पटकन रस्ता ओलांडुन दुसर्‍या टोकाला गेला आणि एका छोट्या मुलीला आधी खाउ घातले. पोटात इतकं खळबळलं ते बघुन Sad

विशाल , खुपच छान आहे प्रसंग. आपल्या खुजेपणाची लाज वाटते आणि अजुनही जगात चांगुलपणा आहे हे पाहुन आशावादी मन सुखावते.
किती साधा प्रसंग पण त्या छोट्या मुलाचे एव्हडे मोठे मन डोळ्यात पाणी आणुन गेले.

वा, लिहीलंय ही छान, अन त्यामागचा विचारही अंतर्मुख करायला लावणारा आहे. त्याचबरोबर जगात अजूनही बरेच काही चांगले, प्रामाणिक, सत्यवादी आहे असेही वाटायला लावणारे आहे.
सिंडरेला ची पार्ले जी ची कल्पना ही स्तुत्य..करून बघायला हवी.

छान लिहिला आहे अनुभव विशाल.
वाचून अंतर्मुख व्हायला झाले..

सुन्दर आणि भीषण पण ! का एकाद्या मुलाच्या नशिबी भीक मागणं यावं? जसे चांगले असतात तसे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे पण असतात! slumdog millionaire reminds me of that!

विशाल, सुंदर. आपल्याला खुजं करणारी माणसं.... तुझ्या गोष्टीत तर एक लहान मूल.... आहेत म्हणून आपले पाय जमिनीवर आहेत, रे.
हा अनुभव आहे, की नुस्ती गोष्टं... माहीत नाही. पण जे काही आहे, ते विचार करायला लावणारं.... बहोत अच्छे!

छानच

आवडले लेखन. स्वतःबद्दल विचार करायला लावणारं.

खूपच छान!! विचार करायला लावणारं.

खूप छान. आवडलं. लिहीत राहा.

छान लिहिलंयस.

    ***
    '... जब एक कायर सडीयल डरपोक मॅक्वॅकने डकरिज की लडाई हारी थी !'

    विशाल खुप अंतर्मुख करतोय हा 'लेख'... खरंच खुप बाऊ करतो आपण आपल्या 'रुटिन' चा... तुझ्या लिखाणात एवढी सहजता आहे की... सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतय असं वाटतं ... Happy

    सगळ्यांचे आभार.
    दाद, हा अनुभवच आहे दोन तीन दिवसांपुर्वीच वाशीवरुन व्ही.टी. ला जाताना लोकल ट्रेनमध्ये घेतलेला. अर्थात प्रसंग खुलवण्यासाठी संवादाची चुरचुरीत फोडणी देण्याची लिबर्टी मी घेतलीय.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
    जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

    विशाल, छोटेसेच सुत्र तू खूप समर्थपणे मांडतोस.
    बाकी, तुला ऑरगंडी वगैरे बरेच नॉलेज दिसतंय Happy
    ************
    जे जे मजसाठी उचित, तेची तू देशिल खचित |
    हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा ||

    अश्विनी, अगं लहान असताना ऑरगंडीच्या कापडापासुन गुलाबाची फुले करायला शिकलो होतो. त्यामुळे माहीत आहे.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
    जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

    विशाल, सुंदर. खुप छान उतरवला आहेस प्रसंग...
    मला खुपदा वाटतं,आपला खुजेपण आपल्याला जाणवतो ना, तो क्षण म्हणजे आपल्याला मनात खुप खळबळ माजवतो..
    पण त्या क्षणाशी आपण झगडत बसतो.. आणि एक संधी वाया घलवतो... खुजेपणा कडुन वर जाण्यची संधी..
    आपण स्वतःलाच पटवत बसतो की माझं कसं बरोबर आहे ते.. आणि त्या झगड्यात किती क्षण घालवतो देव जाणे.. किंवा कदाचीत किती दिवस !!!
    -----------------------------------------------------------------------------
    ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
    अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
    रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
    धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

    अगदी माझ्या मनातलं बोललीस अनघा !! अशा कितीतरी संधी आपण वाया घालवतो आणि मग नियतीला दोष देत बसतो.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
    जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

    विशाल डोळ्यात पाणी आल वाचून

    सही लिहिले आहे.. Happy

    --
    आतली पणती, तेवायला अशी;
    अंधाराची कुशी, लागतेच..!!

    विशाल, माझ्या मित्रा, मी या सदरातील बरेचशे लेख वाचले, परन्तु तुझा लेख खरच॑ खुपच भावुक वाटला.
    या लेखाला प्रतिसाद देण्यास, अतिशयोक्ती नाही, पण खरेच माझ्याकडे शब्दच नाहीत. मी एवढ्च म्हणेन की, YOU ARE DOING WELL JOB. THANKS. TRY TO ANOTHER SOMETHING SPECIAL.....

    रवी......

    विशाल मित्रा लिहित रहा. तुझ लेखन संवादी आहे. स्वतःशी अन दुसर्‍यांशीही. एखाद्या मूल्याशी ते निगडित असत. वास्तववादी असत. इतरांना आणि स्वतःला भानावर आणणार असत. लिहित रहा

    http://faljyotishachikitsa.blogspot.com
    प्रकाश घाटपांडे

    विशाल खुप चांगला अनुभव आहे. मी पण परवा एका लहान मुलीला माझ्याजवळचे ऍप्पल दिले होते. लहान मुलांना जास्त खाउची गरज असते. पण तु खुप सत्य परिस्थिती लिहीली आहेस की आपण आपल्या कामाचा बाउ करतो. खुप छान.

    उत्तम लिखाण... १०१% खरं

    विशाल अंतर्मु़ख केलंस रे.....!! छान लिहिलं आहेस. तुझ्या लेखनातून तुझा स्वभाव वाचता येतो..पारदर्शी लिहितोस Happy

    मनाला आतपर्यंत भिडल, खुप सुरेख लिखाण विशाल.

    विशाल, तू रोज वाशीवरून सीएसटीला जातोस? बापरे!
    हा माझ्या एका मैत्रीणीने सांगितलेला किस्सा:
    एकदा एकीने लोकल मध्ये एका मुलीला अर्धा बिस्किटचा पुडा दिला. लगेच पुढचे स्टेशन आले होते. त्या मुलीने अर्धे बिस्किट तोंडात घातले आणि platform वर जावून कोसळली. जिने पुडा दिला तिच्याकडे बोट दाखवून म्हणे उसने दिया!!
    काय म्हणावे याला? तेव्हा सांभाळून! मी लोकलने प्रवास करायचे तेव्हा चिल्लर असली तर जरूर द्यायचे. पण खाऊ कधी चुकून दिला नाही.

    मस्त लिहिलंयस विशाल... Happy

    विशाल, खरंच अगदी हृदयस्पर्शी लिखाण.
    कधी या लोकांची नशिबं बदलणार?

    Pages