गुरु बोध

Submitted by बागुलबुवा on 4 May, 2010 - 22:46

दत्तगुरुंनी चोवीस गुरु केले होते म्हणतात. अर्थात अध्यात्माच्या बाबतीत मी तसा अध्यात मध्यातच आहे म्हणा. पण आपल्या सारख्या पामरांच्या आयुष्यात एव्हढे गुरु करायची ताकद कुणाच्यात आहे. तरीही आपल रोजच आयुष्य जगताना कधीतरी कोणतरी असं भेटून जातं की त्याच्या / तीच्यापासून बरच शिकायला मिळतं, फक्त आपली शिकायची तयारी हवी.

जगता जगता जगणं शिकवून जाणारे हे क्षण तुम्ही इथे शेअर करावे म्हणून हा प्रपंच. सुरुवात माझ्यापासून.

वय होतं सतरा अठराच्या आसपास. टॅन्कमधले मासे पाळायचं वेड लागलं. चार पुस्तक वाचल्यावर ते अजूनच बळावलं. बघता बघता टॅन्क्सची संख्या वाढत गेली आणि ते अपुरे वाटायला लागले. आता विचार ठरत होता पॉन्डचा. हौद बांधण्यासाठी सगळी मदत, मोठ्या चुलत भावाने केली. वीटा, रेती, सिमेन्ट तर दिलच पण त्याचा ब्येष्ट गवंडी पण दिला.

मला काही सांगायचीही गरज पडली नाही आणि बघता बघता हौद पूर्ण झाला. मी मुद्दामहून तो थोडा जमिनीवर तर थोडा जमिनीखाली बांधून घेतला होता. बाहेरुन फिनिशिंग झाल्यावर गवंडीबुवा आत उतरले. चारही भिंतीना आतून गुळगुळीत बनवल्यावर ते तळ बनवायच्या मागे लागले. तळही बनवून झाला, फक्त त्यावर गवंडीबुंवाच्या दोन्ही चरणकमलांचे ठसे राहिले होते. आणि मी पाहिलं तेव्हा गवंडीबुवा, एका पायावर उभे राहून, दुसर्‍या पायाचा ठसा बुजवण्याच्या मागे लागले होते.

आता तीन फूट खोल हौद, तोही शोभेसाठी न बांधता उपयोगासाठी बांधलेला. पाण्याने पूर्ण भरल्यावर कोणाला दिसणार होते ते ठसे ? पण हे सांगितल्यावर बुवा भडकले. कदाचित माझ्या हिंदीमुळे असेल. पण त्यानी मला दरडावून सांगितलं "आपको चल सकता है, पर हमे नही चलेगा |"

अजूनही कधी जर तो हौद पूर्ण रिकामा केला तर तो उरलेला ठसा दिसतो आणि आपलं काम शक्य होईल तितक्या अचूकपणे करणारा तो गवंडी आठवतो. एका पायावर उभं राहून तपश्चर्या करणार्‍या एखाद्या तपस्व्यात आणि ह्या कर्मयोग्यात मला तरी काही फरक दिसत नाही.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त अमित!
लहानपणी अशीच एक गोष्ट वाचलेली
सुतार काम करत असतो आणि लेखक आत बाहेर (हा नीट काम करेल का नाही ह्या टेंशननं ), तर सुतार सांगतो, "काळजी करू नका: बुरा काम करेगा तो मेरा हाथ बिगड जायेगा ना"

अम्या, आयुष्याच्या वळणावर असे शिक्षक पदोपदी भेटत असतातच. मी कॉलेजमध्ये असताना सोलन नंबर वन या व्हिस्कीचे प्रमोशन करायला दारूदार फिरत असे. म्हणजे दारुच्या दुकानाबाहेर बसून गिफ्ट्स ऑफर करत येणार्‍या गिर्‍हाईकांना सोलन नं १ किती चांगली दारू आहे ते सांगायचं. मी स्वतः त्या दारूची आजतागायत चव घेतली नाही तो भाग वेगळा. तर लोखंडवाल्यामध्ये आराधना वाईन्स मधे ड्युटी होती. मालक साठीच्या जवळपास. सगळ्या खिशातले असतील तेवढे पैसे काढून दारूच्या बाटलीचा जुगाड करणारे तळीराम नेहमीच पाहत असे. मालकांना म्हटल, तुमची मज्जाय. पाहीजे तेवढी दारू तिही फुकट. त्यावर ते म्हणाले, मी रोज फक्त एक पेग पितो. पार्टीला जरी गेलो आणि दारू फुकट जरी असली तरी एकच पेग. औषध म्हणून. कुठलीही गोष्ट अती केली तर वाईटच मग ती काहीही असो.' तो गुरुमंत्र आजही लक्षात आहे. Happy

बागुलबुवा | 24 February, 2012 - 22:34 नवीन
नुसता लक्षात ठेवून काय उपेग ? आयुष्यात वापरता आला पाहिजे ना तो गुरुमंत्र >>>>> Rofl

वृषभ रास - संथ, एका शांत लयीत , वेअर & टेअर न होउ देता आयुष्य जगतात. अनेक असे लोक पाहीलेले आहेत. माझा तर मंत्रच आहे - Embrace your inner sloth.

Pages