हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2010 - 06:38

आरसा नावाची वस्तू आयुष्यात अत्यंत महत्वाची असते हा सिद्धांत दीपक अण्णू वाठारे यांनी केवळ सव्वा तासात अंगिकारला होता.

पद्या आल्यानंतर त्याची कहाणी समजून घेण्यात, आश्चर्य व्यक्त करण्यात आणि त्यावर चर्चेचा गदारोळ उठवून त्याचा कंटाळा आल्यावर ढाब्याच्या कामाला लागण्यात जो काही एक तास गेला तो एक तास संपता संपता अचानक घडलेल्या एका घटनेने ढाबा हा ढाबा नसून नंदनवन आहे व त्यात एकच अप्सरा आहे ही अनुभुती अबू, गणपतचाचा, अब्दुल अन पद्या सोडून इतर सगळ्यांनी घेतली.

काजल! .......काजल लाहिगुडे नावाचे एक नखशिखांत लावण्य रामरहीम ढाब्यात प्रवेश करत असताना तिच्या पावला पावलाने ढाब्याच्या अंगणातील माती सुगंधीत होत होती.

ती कुणाबरोबर तरी नुसतीच आली असती तर गिर्‍हाईक म्हणून अर्धा तास चर्चा वगैरे झाली असती इतकेच!

पण हातात एक बॅग, गुलाबी पंजाबी ड्रेस, उन्हामुळे ओढणी डोक्यावरून घेतलेली, नवीन जागेकडे बघतानाची उत्सूक नजर आणि मुख्य म्हणजे वडिलांसोबत ... म्हणजे यशवंतसोबत येणे.. याचा अर्थ वय वर्षे चवदा म्हणजे मन्नू ते वय वर्षे बावीस म्हणजे बाळ्या या सगळ्यांना समजलेला होता.

आणि पद्याचे लग्न मोडले ही बातमी एका क्षणात दुर्लक्ष करण्याइतकी शिळी व किरकोळ झाली होती.

पोरांमधे सन्नाटा पसरला होता.

ती जसजशी जवळ येत होती, मगाचच्या क्षणाचा परिणाम तसतसा पुसला जात होता. मगाचच्या क्षणी वाटली त्याहून ती पुढच्याक्षणी अधिक सुंदर दिसत होती.

आत्ता पोरांच्या चेहर्‍याकडे पाहिले असते तर यांच्याइतके बावळट चेहरे कुणाचेही नाहीत हे कुणालाही पटले असते.

ही इथे राहणार?? ही???

मग आपलं काय? आपण कसे काय सज्जनपणे वावरू शकणार? क्षणभर तरी नजर हटेल का??

उन्हाने लालसर गुलाबी झालेला गोरा रंग, कपाळावर घर्मबिंदूंची चमचम, ओढणीतून दिसणारे भुरे लांबसडक केस, नवतारुण्याचा बहर सर्वांगावर, निमुळत्या बोटांचा चाललेला चाळा, जिभेची गरजच लागणार नाही इतके बोलके डोळे, त्यामुळे जीभ उगाचच ओठांना ओलावा देत बसलेली, दुधाची साय जरा खडबडीतच वाटेल असे ओठ आणि कशीही वळण्याची अद्भुत क्षमता असावी अशी मान!

शिल्प! ... हालत होती म्हणून जिवंत स्त्री आहे हे कळत असावं! आणि यशवंत इतके दिवस कुटुंबाला गावी का ठेवत होता याची मुलांना हुरहुर लागली होती.

चाचा - आजा यशवंत, भाभीजी नमस्ते... बेटी तो बिल्कुल परी है यशवंत.. क्या नाम है बेटा??
काजल - काजल....

काजल! सगळ्या मुलांनी मनातल्या मनात हे नाव दोन दोन तीन तीन्दा उच्चारले.

अबू - आईये भाभीजी... बैठिये... झिल्या... चाय बनाके ला...

सगळे गोल करून बसले नेहमीप्रमाणे! काजल कुणाकडेही बघत नव्हती. सगळी पोरे तिच्याकडे एकदा अन इकडे तिकडे एकदा अशी बघत होती.

चाचा - यशवंत.. यहा दोनो गाव तीन तीन चार चार किलोमीटर दूर हय... गावसे फ्यामिली लाकेबी इतका दूर कायको रखनेका... इधर एक बडा कमरा खाली करते हय... इधरच रह.. क्या??
यशवंत - जैसा आप बोलो.. बेटी तो अब पढेगी नही आगे..
अबू - क्युं?
यशवंत - ऐकत नाही...

काजल आई वडिलांचे ऐकत नसेल यावर कुणाचा विश्वासच बसेना.

चाचा - पढना तो मंगता ना बेटी.. कहांतक पढी हय तू??
काजल - दसवी
चाचा - मग?? कॉलेज नाय करणार?
यशवंत - दो साल घरमेहीच रही.. अबतक बाराव्वीमे होती.
अबू - पिंपरगावमे एक कॉलेज है.. जीपा जाती रोज यहांसे

आता यशवंतची बायको, सीमा, मधे पडली.

सीमा - कॉलेजला जायला काय नाय भाऊ.. पण आता शादी बनवायची.. घरचं सगळ शिकायला पायजे..
अबू - अरे लडकियोंको पढाना मंगता.. नय तो ससुरालमे कीमत नय रयती..
सीमा - ससुराल अच्छा हय इसका... रिश्त्यातलंच हय..

हा मात्र भलताच धक्का होता पोरांना! च्यायला! राहायला आली इथे.. अन लग्न ठरवून आली!

चाचा - शादी पक्की झाली काय?
यशवंत - हां! इसीका दूरका भाई है.. उसके लडकेसे...
चाचा - कहां पे
यशवंत - धुलिया...
अबू - धुलिया??? इतना दूर ससुराल??
सीमा - घर के अच्छे हय.. खेती नय हय.. लेकिन तिखट भोत बनाते.. तिखटमे एक नंबर हय...

यशवंत - लेकिन... प्रदीप... तुम इधर कैसे क्या???

प्रदीपची कहाणी सांगून झाली. सगळे पुन्हा उदास झाले.

तेवढ्यात चहा आला. यशवंत काजलला म्हणाला..

यशवंत - काजल.. बडोंको नमस्ते कर... ये गणपतचाचा है.. ये अबूबकरचाचा है.. ये अब्दुलचाचा है.. और ये प्रदीपभाई....

प्रत्येकापुढे तिने वाकून नमस्कार केला. आज मात्र अब्दुलला स्वतःची फारच लाज वाटली. एका चांगल्या कुटुंबातील माणूस स्वतःच्या मुलीला आपल्याला नमस्कार करायला सांगतो? काय आहोत आपण? शुद्ध आली की पुन्हा पिऊन बेशुद्ध व्हायची इच्छा असणारा एक नालायक माणूस?? आपल्याला अब्दुलचाचा म्हणतात?? आणि पद्याला आपण आता मोठ्यात गणले जातो याचा अभिमान वाटला. काजल त्याच्या दृष्टीने लहान मुलगीच होती. सोळा सतरा वर्षांची!

केवळ तीन तासात चार पोरे लावून पुर्वीची गणपतचाचाची अन त्याला लागून असलेली एक चोटी अशा दोन खोल्या रिकाम्या केल्या गेल्या अन स्वच्छ झाल्या. यशवंतचे सामान जागा ठरल्यानंतर टेंपोने येणार होते.

यशवंतने चाचाला सर्वांसमक्ष विचारले...

यशवंत - गणपतचाचा... किराया... कितना होएंगा??

सगळेच चाचाकडे बघू लागले. सगळ्यांच्या मते चाचाने एक तर भाडे माफ तरी केले असते किंवा अगदीच नॉमिनल भाडे घेतले असते. पण चाचा एक अक्षर बोलायच्या आधीच अबूबकर बोलला.

अबू - दो हजार रुपये महिना..

सगळे अबूकडे आश्चर्याने पाहू लागले. कोणत्याही परिमाणाने त्या जागेचे भाडे इतके होऊ शकले नसते.

अबू - लेकिन एक शर्त है.. ... जिस टायमपे तू ये पैसा देगा... उस टायमसे फिर बात करनेका नय हमलोगांसे... फिर हम तुम पराये होगये सब... अन्जाने... क्या???

यशवंत उठून उभा राहिला अन अबूजवळ गेला. यशवंतच्या अन सीमाच्याही डोळ्यात पाणी आले होते. यशवंतने अबूला मिठी मारली. चाचाने उठून यशवंतला थोपटले.

दिपूने विकीकडे पाहिले. हे तेच लोक होते ना?? मालेगावला दंगली करणारे?? मग आज कशी काय हिंदूंना स्वतःची जागा फुकट देत होते??? दिपूच्या चेहर्‍यावरील प्रश्न विकीला व्यवस्थित समजला होता. हल्ली दिपूपुढे बोलायची फारशी कुणाची हिम्मत नव्हती. एवढासा असून भटारखाना चालवण्यात तरबेज होता तो... मात्र.. दिपूच्या मनातला दुसरा प्रश्न कुणालाच कळलेला नव्हता...

अबूबकर जर काहीही संबंध नसताना यशवंतच्या घरच्या सगळ्यांना राहायला स्वतःची जागा फुकट देतो... तर मग... आपल्या स्वतःच्या बापाच्या घरातून आपण कसे काय हाकलले गेलो... आणि... तेही आपला कोणीच नसलेल्या मन्नूचाचाकडून..

पण हा प्रश्न इतका अकस्मात सोडवला जाईल याची कल्पनाच नव्हती कुणाला. यशवंतचे कुटुंब येऊन तीन चार तास होत नाहीत तोवर अचानक तीन पुरुष अन दोन बायका आल्या. ते तीन पुरुष कोण आहेत ते कुणाच्याच लक्षात आले नाही... पण त्या दोन बायकांना निदान दिपू तरी व्यवस्थित ओळखत होता...

आक्का.... आणि सुनंदा... महुरवाडी...!!

सुनंदा - य पोरगा हमारा हय.. दिपू.. इसको लेनेको आये...

ढाब्याचा प्रमुख कोण आहे हे माहीत नसल्याने तिने ही माहिती पद्याकडे बघत दिली. पद्या चाचाकडे बघू लागला.

चाचा - कौन है तुम लोगां???
सुनंदा - म्हउर्वाडीके रहनेवालय... ये मेरा बच्चा हय...
चाचा - तो??
सुनंदा तो क्या तो?? हम लेनेको आये... ए मुस्तफा.. आ आगे

त्यांच्यातला एक दंडेलशाही करू शकेल असा माणूस अपुढे आला अन खुन्नसमधे चाचाकडे बघू लागला.

चाचा - देखो.. तुम लोगां... मै नय जानता तुम लोग कोनय... पण ह्यं पोरगं इथलं जुनय.. तीन चार साल झाले असतील याला इथं...

सगळेच्या सगळे शांत होते. यशवंतचे कुटुंबही उत्सुकतेने पाहात होते.

सुनंदा - इसको इधर कौन लाया लेकिन??
चाचा - खुद आया ये
सुनंदा - आठ सालका बच्चा खुद आताय ढाबेपे? पागल समझाय हमको??

सुनंदा आता डाफरू लागली. तिचा आवाज चढलेला होता.

चाचा - हा आठ वर्षांचा नाय! पंधरा सोळा वर्षाचाय...
सुनंदा - हा लेकिन आठ वर्षाचा असताना घरून पळालाय
चाचा - का?

या प्रश्नावर मात्र सुनंद चूप झाली. दिपू का पळाला यावर काय सांगणार? तेवढ्यात झिल्या आला. त्याने ओळखले. ही बाई ढाब्यावर गिर्‍हाईक म्हणून आलेली होती अन दिपूशी बराच वेळ काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती. दिपूने हे त्याचे पडोसी आहेत म्हणून सांगीतले होते.

झिल्या - ये तो कल आये थे ना खाना खाने ढाबेपे..... पडोसी हय दिप्याचे

वाक्याच्या पहिल्या अर्ध्या भागाने सुनंदा सुखावत असतानाच दुसर्‍या अर्ध्या भागामुळे ती चवताळली. ओरडत म्हणाली.

सुनंदा - मां हय मै मां! इसकी मां हय.. पडोसी नय...

सगळेच सुन्न झाले होते. ध्यानीमनी नसताना दिप्याची आई आली होती.. तेही त्याला न्यायला. दिप्याचा इतिहास कुणाला आठवतही नव्हता. अगदी पहिल्या दिवशी चाचाने ओळख करून देताना 'घरसे निकालेला हय' अशी केली होती ते काळाच्या ओघात सगळे केव्हाच विसरून गेले होते.

चाचा - मा हय तो ढाबेपे आयी थी तो ढाबेपे खाना खाने कैसे आगयी?
सुनंदा - अरे मै ढुंढ रय थी इसको आठ सालसे...

दिपू थिजून उभा होता. कोणत्याही परिस्थितीत ढाबा सोडून त्याला जायचं नव्हतं. चाचा काय निर्णय घेणार याची त्याला काळजी वाटत होती.

चाचा - क्या रे दिप्या.. आईये का तुझी?

दिपूने दिलेल्या उत्तराने सुनंदाचा चेहरा खर्रकन उतरला.

दिपू - हां.... आईये... .........सौतेली....

मुस्तफा - सौतेली हाये तर काय झाला? आं? आईच्चे ना? तुला सांभाळायची ना प्यारसे? क्यों आक्का??

म्हातारी आक्का अजूनही कणखर होती. ती पुढे झाली.

आक्का - मै म्हउर्वाडी की मेन हय... ही या प्वाराची आय हय.. हम लेजानेको आये इसको...

चाचा शांतच होता अजूनही. त्याला आवाज चढलेलाही आवडायचे नाही अन चढवायलाही! पण पद्या मात्र खवळला होता.

पद्या - और इसका बाप??

सुनंदा - बाप मरगया हय...

झिल्या पुढे आला..

झिल्या - तो फिर आप किसके साथ आये थे कल?? ढाबेपे??
सुनंदा - भाय हय मेरा... तू कौन पुछनेवाला
पद्या - हा तुमचा पोरगा कशावरून पण?
सुनंदा - अरे त्यालाच विचार ना?? म्हणतोय की तोंडाने.. मा है करके...
पद्या - सौतेला मा हय तुम.. हम नय देते बच्चेको किसीकेबी हातमे...

मुस्तफा दाणगटासारखा पुढे झाला. अब्दुल दारुडा त्याची वाट अडवत म्हणाला.

अब्दुल - शांती से ले भाय... काय को झगडनेका
मुस्तफा - ए बेवडे.. तू बाजूला हो..
अब्दुल - मै तो ह्टताच... लेकिन एक बात सुनो तुम लोगां .. बच्चा आईला बघून धावत चिकटणार नाय व्हय? हालला तरी का दिप्या जागचा??

दारुड्या अब्दुलच्या डोक्यातला हा मुद्दा समस्त ढाबेकर्‍यांना पटला. बाळ्या म्हणाला..

बाळ्या - दिपू हितंच हाये तीन बरससे.. तब तुम लोगां आये नय??

सुनंदा - माहिती नव्हते रे.. ह्ये बग.. पेपरात जायराती दिल्या व्हत्या.. हा बग फोटो.. हाय की नाय?? चार वर्षांपुर्वीचा फोटोय हा... आणि हा तर त्याच्या आधीचा हाय... इतना छोटा बच्चा गुम होएंगा तो मांको कैसा लगता होएंगा? तुम सब सोच नय सकते क्या?? मा हय मा मै इसकी... मेरे गोद मे सोया है..

चाचा त्यावर एक वाक्य बोलला जे ऐकून दिपूला चाचाचा भयंकर आधार वाटला अन बाकी सगळ्यांना सुनंदाचा भलताच राग आला.

चाचा - हाकललं बी तूच होतं ना याला??

प्रकरण काही मिटेना. आता मुस्तफा आणि त्याचे दोन साथीदार पुढे झाले.

मुस्तफा - देखो सब लोगां.. ये बच्चा महुरवाडी का है.. हमारे बस्तीका है.. इसको तुम लोग भगाया.. आम्ही घेऊन जायला आलो याला.. गपगुमान आमच्याकडे पोरगं द्या..

पद्या चिडला. बाह्या मागे सारत पुढे झाला अन म्हणाला..

पद्या - नायतं काय करणार बे??

पद्या जरी कमावलेला असला तरी असल्या कामांसाठी मुस्तफा खास नियुक्त केला जायचा. त्यामुळे मुस्तफाला दमबाजीची चांगली सवय होती.

मुस्तफाने काडकन पद्याच्या मुस्काडात मारली. मग मात्र प्रचंड गोंधळ झाला. इतका वेळ शांतपणे बघत बसलेला अबूबकर पुढे झाला अन त्याने मुस्तफाची गचांडी धरली. आता सगळेच तय अवाढव्य राक्षसाला बघून मागे हटले. आक्का म्हातारी अन सुनंदा दोघींना आत्तापर्यंत गर्दीच्या मागे बसलेला अबूबकर ध्यानातच नव्ह्ता. हा दैत्य प्रकट झालेला पाहून त्यांना इथे येण्याच्या त्यांच्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला.

अबू - अबूबकर कयते मेरेको... क्या?? अबूबकर... तुम जैसा मच्छर फुंकसे उडाता मय..

असे म्हणून अबूबकरने एका हाताने त्याला धरून दुसर्‍या हाताने त्याला इतकी जोरात थप्पड मारली की मुस्तफा जागच्याजागी लुळावला.

अबू - पद्या.. याच्या *** घाल लाथ...

पद्याने अक्षरशः ते म्हणणे शब्दशः ऐकले. मुस्तफाचे डोळे पांढरे झाले. तो गुरासारखा विव्हळू लागला. बाकीचे दोघे काय करावे हे सुचत नसल्यामुळे चुळबुळत उभे होते. पळून गेलो तर सुनंदा अन म्हातारीपुढे अब्रूही राहणार नाही अन त्या वस्तीत बोंब मारतील अन आपली छी थू होईल ही भीती! इथेच थांबलो हा तर हा भयानक माणूस आपल्यालाही नेमक्या तिथेचा लाथा घालायची आज्ञा देईल.

अबूबकरने मुस्तफाला सोडल्यावर मुस्तफा जमीनीवर कोसळला अन पोटाखाली दोन्ही हात दाबून जीवघेण्या वेदना घालवायचा निष्फळ प्रयत्न करू लागला.

त्याच्या किंकाळ्यांनी यशवंतची बायको अन काजल प्रचंड भेदरल्या होत्या. मगाशी बाबांनी भाडे माफ केल्याच्या आनंदात ज्याला प्रेमाने मिठी मारई तो माणूस इतका भयंकर आहे?? काजलला अबूबकरचे नवेच रूप पाहायला मिळाले होते.. काहीच वेळामधे!

दुसर्‍या दोघांना काहीच निर्णय करावा लागला नाही. पद्याने त्यातल्या एकाच्या कानाखाली आवाज काढल्यावर अचानक त्या दोघांना 'आपली मॅनपॉवर फार म्हणजे फारच कमी आहे' याचे रास्त भान आले. पण ती किती कमी आहे हे दुसर्‍याच क्षणी जास्त चांगले समजले. पोरांनी त्या दोघांना धरले. चाचाला अबूबकरचे ते रूप अजिबात नवे नव्हते. पण चाचाचे असले रूप मात्र आजवर कुणी पाहिले नव्हते.

चाचाने खाली पडलेल्या मुस्तफाच्या नाकावर खण्णकन लाथ मारली. रक्ताचा मोठा ओघळ बाहेर पडला. मुस्तफा अर्धमेला झाला होता. सुनंदाने सगळ्यांना मिळून देऊ केलेले सहाशे रुपये अन रात्रीची दारू हे मानधन नसते घेतले तर बरे झाले असते असे फटके मिळाले होते इथे. चाचाने मग त्या दोघांच्याही पोटात एक एक बुक्की मारली. पोरांच्या ग्रिपमधून जरी ते सुटले नसले तरी लुळावत पोट दाबू लागले.

चाचा - पद्या.. वो कमरेमे डाल इन तीनोको... दादू.. जा पोलीस बोलव.... पोरं पळवायला टोळी आली म्हणाव.. ए भाभी.. ये दो बाईको पकडके उधर रखरहेले हम.. लक्ष ठेव...

आक्का म्हातारीला पळताही येत नव्हते. अन सुनंदा कंप्लीट हादरलेली असल्याने जागच्याजागीच खिळली होती. आणि यशवंतच्या बायकोला ढाब्यावर सेटल व्हायला आल्याच्या पहिल्याच दिवशी कैद्यांवर लक्ष ठेवण्याचे काम मिळाल्यामुळे उद्याच्या उद्या ही जागा सोडायचे तिने ठरवले होते.

रडत भेकत असलेल्या पाचजणांना दोन खोल्यात विभागले. दिड तासाने आलेल्या सबैन्स्पेक्टरला अबूबकरने केलेले कबाब फारच आवडायचे. रामरहीम ढाबा हे त्याचे आठवड्यातून दोनदा येण्याचे ठिकाण असायचे. आणि महिन्यातील आठ पैकी दोन वेळा फुकट जेवण मिळायचे अशी एक स्कीम त्याने स्वतःच स्वतःला लावून घेतली होती. अर्थातच त्याच्या दमबाजीने वेदनेत कळवळत असलेले तिघे अन दोन बायका कसायाने धरलेल्या मेंढरासारख्या हादरल्या.

कायद्याचा आधार घेऊन पोराला नेणे शक्य नव्हते हे एक तासाने सगळ्यांना सोडले तेव्हा सुनंदाला समजलेले होते. कारण ती दिपूची आई नव्हती. त्याचा बाप मेलेला होता. त्याला हाकललेले आहे हे महुरवाडीचे सगळे अन वडाळी भुईचे कित्येक लोक सांगू शकले असते. स्वतः दिपू घरी यायला नाही म्हणाला असता. फक्त एकच आधार होता. तो म्हणजे त्याचे वय! या वयात त्याला ढाब्यावर ठेवलाच कसा हा प्रश्न काढता आला असता. पण आहे त्यापेक्षा अर्ध्या वयाचा असताना घराबाहेर काढणारी आई आत्ता त्याला का नेत आहे हा प्रश्न निघालाच असता.

आणि एवढे सगळे करून... मुळात प्रकरण कोर्टात जाणार थोडीच होते?? एखादी कंप्लेंट करून आतल्याआतच मिटवले जाणार होते. मग मिटवामिटवीसाठी तर रामरहीम ढाब्याची ताकद महुरवाडीपेक्षा कित्येक पटींनी मोठी होती.

मात्र... !! गेटमधून चालत बाहेर पडताना सुनंदाने एकदाच वळून रडत रडत दिपूकडे पाहिले आणि..

.......... दिपू 'आई' म्हणत हमसाहमशी रडत तिच्याकडे धावला.

आई... कशीही असो.. पण आई ... आई होती त्याची ती! आणि मुख्य म्हणजे.. त्याला आई 'होती'!

तो प्रसंग वर्णन करण्यासारखा नाही. दिपूने तिच्या कंबरेला मारलेली मिठी, तिने आत्तापर्यंत झालेले सगळे सोडून देऊन त्याला घट्ट छातीशी धरून त्याचे अनेक पापे घेणे आणि.... दोघांच्याही डोळ्यातून घळघळा वाहत असलेल्या अश्रूंच्या सरी!

लांबून ढाब्यावरचे सगळे चालत तिथे पोचेपर्यंत म्हातारी आक्काही एका बाजूला खाली बसून रडू लागली होती.

आणि आज प्रथमच चाचा, अबू, अब्दुल अन पद्याच्याही डोळ्यात पाणी आले होते. बाकीच्या पोरांपैकी फक्त विकी रडत नव्हता. त्याच्या न रडण्याचे कारण दिपूला नंतर कळणार होतेच.. पण...

चाचाने पुढे होऊन दिपूच्या पाठीवरून हात फिरवला...

चाचा - बेटा..??? जायेगा अम्माके साथ क्या???

पाणीभरल्या डोळ्यांनी सुनंदाने दिपूकडे अन दिपूने चाचाकडे पाहिले.

दिपू - नय.. आज नय.. मै जायेगा.. पर बडा होके जायेगा... आईको खुष रखेंगा... है न आई? तेरा बच्चा बडा होरहा... देखा.. ये पुरा ढाबेका.. पुरा ढाबेका खाना मै बनाता.. तू कल रोटी खायी ना.. मीच बनवली होती आई... मला चाचाने अन अबूने इथे पळवून नाय आणला... मी खुद आला.. भूक लागली होती त्या दिवशी.. गाडी इथे थांबली होती... गाडीतून मी पळून आलो होतो... कारण मनीषाताईला चिडवणार्‍याला बाटली मारली म्हणुन... मग... मग चाचाने जेवण दिलं.. अबूने सगळं शिकवलं... ह्ये बघ... कितने दोस्त हय मेरेको इधर... ये विकी, समीर... ये मन्नू हय... मै आयेंगा आई.. मोठ होके आयेंगा... तू कबीबी आती रह्य इधर... तेरेको म्हौर्वाडी छोडके इधर रयनेका हय तो इधर रय.. मै पालेगा तेरेको.. मै अब बडा होगयेला है... आती क्या...

अत्यंत निराश होऊन सुनंदाने त्याला सोडले. ती पाठमोरी होऊन चालू लागली. तिल पाहून चाचा म्हणाला...

चाचा - बहेन.. जैसे तेरा बेटा हय वैसेच आमचाबी सगळ्यांचा बेटा हय.. ये ढाबेपे रयनेको आ... नय रयनेका तो कबीबी आके इससे मिलले... तुझा मुलगा आमी आमच्या मुलासारखाच सांभाळतोय बहन....

हुंदके देत सुनंदा अन बाकीचे चालू लागले तेव्हा .......

संपूर्णच्या संपूर्ण रामरहीम ढाबा अनाथ झाल्यासारखा त्यांच्याकडे पाहात होता...

आणि त्याचवेळेस...

काजल ...

पुढे होऊन एक हात दिपूच्या खांद्यावर ठेवून त्याला म्हणत होती....

"मै हूं ना... .............. रो मत"

गुलमोहर: 

आरसा नावाची वस्तू >>>
=============
ह्या भागात दिसलीच नाही पहिल्या ओळी नंतर ... Sad
बाकी चालू द्या तुमची सुपर्फास्ट एक्स्प्रेस ...
पु.ले.शु.

आरसा - खरे आपले म्हणणे! दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद! अपलोड केल्यावर माझ्या ध्यानात आले. मी ऑनलाईन लिहीत असल्याने काही घोळ होतात. मात्र ते पुढच्या भागात येणार आहे. 'सुंदर मुलगी आल्यामुळे स्वतःचे रूप वारंवार आरशात पाहायची सवय सगळ्या मुलांना लागणे' असा तो मुद्दा होता.

'बाकी लेखन चालू द्या' ही परवानगी दिल्यामुळे मलाही हुरूप आला.

आभार!

-'बेफिकीर'!

मस्त लिहिता आहात. पुढची एखादी नवी कथा प्रेमकथादेखील मस्त लिहु शकाल हे काजल आणि तिथल्या पोरांच्या वर्णनावरुन वाटलं. शुभेच्छा!

'बाकी लेखन चालू द्या' ही परवानगी दिल्यामुळे मलाही हुरूप आला >>> Lol बेफिकीर अजुन येऊदेत. मस्त फ्लो आहे.

भन्नाट आहे राव.
उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल माफी.
पण वाचन नियमित चालु आहे.
प्रतिसाद नाहि देता आला इतकच.
पु. ले. शु...............................

वाट पाहतो चातक जशी प्रत्येक एका थेम्बाची.
तशिच ओढ टिकुन ठेवा तुम्हि तुमच्या लेखाची............................

पण हातात एक बॅग, गुलाबी पंजाबी ड्रेस, उन्हामुळे ओढणी डोक्यावरून घेतलेली, नवीन जागेकडे बघतानाची उत्सूक नजर आणि मुख्य म्हणजे वडिलांसोबत ... म्हणजे यशवंतसोबत येणे.. याचा अर्थ वय वर्षे चवदा म्हणजे मन्नू ते वय वर्षे बावीस म्हणजे बाळ्या या सगळ्यांना समजलेला होता.
दिपु हवं न?