हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 3 May, 2010 - 06:55

दिप्याला न्यायला अचानक त्याची आली होती या घटनेचा परिणाम सगळ्यांच्या मनावर खोलवर झाला होता. ढाबा चालू असूनही जो तो आपापल्या मनात अंतर्मुख होऊन विचार करत होता. दिपूला न्यायला आज त्याची आई आली. तिनेच त्याला हाकलले होते. ती त्याची सावत्र आई होती. त्याला जायचे नव्हतेच. पण आई निघाली तसा तो किती रडला.

वय कितीही असले तरी आई नसण्याचे दु:ख तितकेच तीव्र असते. दिपू तर पंधरा वर्षांचा होता. त्याला आई होतीही! पण दिपू गेला नव्हता.

प्रत्येक जण भटारखान्यात वारंवार जाऊन दिपूकडे बघून येत होता. तो रडत तर नाही ना? काम करतोय की उदासवाणा बसलाय...

पण काजलला आल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक चमत्कार बघायला मिळाले होते आनि त्याच दिवशी आणखीन काही बघायला मिळणारही होते.

पहिल्यांदा अबूबकरने बाबांना फुकट जागा दिली. त्यानंतर कळले की पद्याचे लग्नच मोडले. तोपर्यंत दिपूची आई आली. ते एक मोठेच प्रकरण झाले. आणि हे सगळे चमत्कार संपतात तोवर दिपूने भटारखान्यात चालवलेला पराक्रम पाहून ती अन तिची आई थक्क झाल्या.

काय मुलगा आहे का काय? हा ढाबा चालवतो? अबूबकर आपला हे पातेले उचल, ते तिकडे कर असे करत होता. विकी का कुणास ठाऊक अबू किंवा दिपूने सांगीतल्याशिवाय हलत नव्हता अन उदासवाणा बसला होता. आणि दिपू काही झालेच नाही या थाटात वादळी वेगात पदार्थ पुरवण्याच्या मागे लागला होता. ढाबा भरलेला होता.

आणि त्याचवेळी सर्व पोरे कुतुहलाने काजललाही बघून जात होती. एकदा ती ढाब्यात बाहेर गेली. बाहेर गिर्‍हाईके बघणारी पोरेही तिच्याकडे कुतुहलाने पाहात होती. अजून कुणालाही काजलशी बोलण्याची किंवा काही चौकशी करण्याची संधीच मिळालेली नव्हती.

काजलची आई मात्र चिवड्याच्या दुकानावर बसून कुजबुजत यशवंतला सांगत होती.

"इथे राहायचंय का? सगळी मवाली पोरे! एकही बाई नाही. मी अन काजल कसे राहायचे? पिंपळगावला राहता नाही का येणार? अन हे अबू अन गणपत काय मारामार्‍या करतायत! तो अब्दुल का कोण आहे तो कसला दारुडा! बघा ना, दुसरी जागा मिळेल! तुम्ही एकटे कामाला येत जा इथे!"

यशवंतला हे मुळीच पटत नव्हते. त्याच्यादृष्टीने सगळे अतिशय चांगले होते. सगळ्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते हे त्याने पाहिले होते. एकही मुलगा मवालीपणा करणार नाही याची त्याला खात्री होती. गणपतचाचा स्वतः बालबच्चेवाला माणूस होता. यशवंत तिला 'जागा मिळेपर्यंत काही दिवस राहू' असे म्हणत होता. पण.. दोघांनाही माहीत नव्हते की ते इथे बरीच वर्षे राहणार आहेत.. आणि जाताना ढसाढसा रडणार आहेत.

अंधार पडला. यशवंतची बायको सीमा खोलीत आली. तिच्याजवळ असलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर उदबत्ती लावून तिने नमस्कार केला. यशवंतकडूनच घेतलेली चिक्की प्रसाद म्हणून ठेवली अन नंतर सगळ्या मुलांना वाटायला गेली. चिक्कीचे कुणालाच अप्रूप नव्हते. पण ही चिक्की प्रसाद म्हणून वाटली जात आहे हे कळल्यावर मुलांनी हात जोडून काहीतरी पुटपुटून चिक्कीचे तुकडे तोंडात टाकले.

आनि त्यावेळेस दादूच्या लक्षात आले... मगाचपासून विकी बोलेनासाच झाला आहे. पण आत्ता विचारण्याची वेळ नव्हती.

मात्र, सायंकाळी साडे सात वाजता आलेली बस जेव्हा थांबली तेव्हा नवाच प्रकार झाला. कॅप्टन झिल्या धावाधाव करून सगळा शो मॅनेज करत असताना एका टेबलापाशी खाडकन थांबला.

आणि मग नुसता जल्लोष झाला.

झिल्याची बहीण नाशिकहून तिच्या नवर्‍याबरोबर गुजरातला चालली होती. तिला निश्चीत कोणता ढाबा ते माहीत नव्हते. पण याच भागातील एका ढाब्यावर झिल्या कामाला आहे हे तिला माहीत होते. तीही जरा उत्सुकतेनेच बघत होती. अन तेवढ्यात मागून झिल्या त्या टेबलपाशी आला होता.

दोघांनी एकमेकांना जवळ घेतले. रेहाना! तिचे नाव! झिल्याहून चक्क तेरा वर्षांनी मोठी होती. असेल पस्तीशीची! त्यांची मुले चाचीबरोबर नाशिकलाच राहिली होती. हे दोघेच गुजरातला कुणीतरी नात्यातले वारले म्हणून चालले होते. रेहानाचा नवरा इरफानही प्रेमळ होता. त्यानेही झिल्याला मिठी मारली. झिल्या दोघांना मुलासारखाच होता. झिल्या अनाथ असला तरी दीदी असल्यामुळे त्याला अनाथपण जाणवायचे नाही.

मालेगावला असताना पाच एक वर्षांपुर्वी गल्लीच्या जवळच्या गल्लीत राहणार्‍या अबूबकर नावाच्या माणसाने पद्याबरोबर पाठवलेल्या निरोपावर भाळून झिल्या ताईला सांगून ढाब्यावर नोकरी करायला निघून आला होता. ताईने त्याला समजावले खरे, पण तिच्याही दृष्टीने पोरगं कामाला लागणं बरच होतं! पण मालेगावात का राहात नाही यावर खूप चर्चा झाली होती. शेवटी फिरायला मिळणार या झिल्याला असलेल्या मोहाबाबत परवानगी मिळाली अन खुषीखुषी झिल्या रामरहीम ढाब्यावर रुजू झाला. सुरुवातीला वर्षातून दपाचवेळा मालेगावला जाणारा झिल्या गेल्या तीन वर्षात चक्क एकदाही गेला नव्हता. कधीकधी पत्र पाठवायचा इतकेच! खरे तर भांडणे नाहीत काही नाही, पण माणसे दूर राहायला गेली की काही काळाने त्याचे वाटणारे दु:खही कमी होते अन सवयही जाते तसे झाले. रेहानाही तिच्या संसारात गढलेली होती. शेवटी नोकरीच्या निमित्ताने इरफान नाशिकला आला. एकदाच नाशिकला जाऊन झिल्या घर बघून आला होता. पण त्यानंतर नाही.

आज ध्यानीमनी नसताना बहीण दिसळ्यावर लहानपणचे दिवस आठवले. कशी ती आपल्याला चालवायची, रस्त्यातील काय काय दाखवायची! खायला द्यायची. कौतुके करायची. स्वतः शर्ट शिवून द्यायची.

मात्र, झिल्याला शाळेतच घातले नव्हते. कारण, रेहानाची नववी झाल्यानंतर आई वडील गेले अन रेहानाला काहीबाही कामे करायला लागली. गल्लीत सगळी चांगली माणसे होती. नाहीतर अशा वयात मुलांना सांभाळणार कोण?

रेहाना वर्षभरातच किरकोळ घरकामे करून महिना सातशे आठशे रुपये कमवू लागली होती. झिल्याला मोठे करणे हे तिचे आवडते कर्तव्य होते.

कष्टात दिवस काढणार्‍या रेहानाला स्वतःकडे बघायला वेळही मिळत नव्हता अन तेवढे पैसेही नव्हते. पण वय होते. तारुण्यात प्रवेश केलेल्या रेहानाचे सौंदर्य असामान्य नसले तरी दिसायला ती नीटस होती. गल्लीतील मुले मात्र तिला बहीण समजत! एक सोडून! एक मुलगा असेल तिच्याहून सात आठ वर्षांनी मोठा! पण तो तिला बहीण समजायचा नाही. त्यावेळेस त्याचे वडील सायकलवर फिरून चना चोर विकायचे. ते म्हातारे होत होते. आई नव्हतीच. मग त्या मुलाने काही ना काही कामे सुरू केली. वर्षभरात त्याने गल्लीत दुकान टाकले, चना चोरचे! मग त्यात चुरमुरे, फरसाण हेही आले. मग हळूहळू चहा आला.

दोन अडीच वर्षाचा छोटा झिल्या चाचा चाचा म्हणत त्याच्याकडून खाऊ मागू लागला. मग तोही देऊ लागला प्रेमाने! मग तो हळूहळू रेहानाच्या घरी रोज एक बर्‍यापैकी खाऊ असलेले पुडके पाठवू लागला.

चहाही मिळत असल्यामुळे दुकानावर गर्दी बरीच असायची. हळूहळू गल्लीतील पोरांना प्रकार लक्षात यायला लागला. हरकत असायचे खरे तर काही कारण नव्हते. त्या दोघांचे लग्न झाले असते तरी चालण्यासारखे होते. पण पोरांच्या लक्षात आता एक नवीन गोष्ट आली. रेहाना! ही मुलगी याला लाईन देते तर आपण काय घोडे मारले आहे? मग त्यांच्यात थट्टा मस्करी व्हायची. रेहानाला हे माहीतच नव्हते.

तिच्या मनात वेगळीच वादळे सुरू झाली होती. चहावाला रोज आपल्या घरी पुडा पाठवतो म्हणून सुरुवातीला त्याच्याकडे मायेने पाहून हसणार्‍या रेहानाला तो आवडू लागला होता. मग ती झिल्याला हळूच विचारायला लागली. 'आज चाचाने क्या दिया, क्या कहरहे थे'! झिल्या आपला बाळबोधपणे सांगायचा.

सहा महिने असेच गेले. आता रेहाना अन चहावाला बिनदिक्कत एकमेकांशी मिनिटभर थांबून बोलायला लागले. चहावाल्याला वडिलांनी गल्लीत एकट्या मुलीशी बोलू नये असे सांगीतले. रेहाना एका धनाढ्याच्या हवेलीवर स्वच्छतेचे काम करायची.

गल्लीत आता हळू आवाजात चर्चा सुरू झाली होती. इतर कुणी रेहानाशी इतके बोलत नाही, हाच बोलतो. इतर कुणी रेहानाला किंवा झिल्याला काही देत नाही, हाच देतो. वडिलांच्या कानावर चर्चा गेली तसे त्यांनी मुलाला आणखीन समजावून पाहिले. काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा तेच सुरू झाले.

आणि महिन्या दोन महिन्यातच मुहब्बत का इजहार होगया. दोन्ही बाजुंनी डोळ्यांनी 'ना हरकत' प्रमाणपत्रे दिली. भेटींमधील दिलचस्पी अन ओढीची तीव्रता बेसुमार वाढू लागली.

आणि एक दिवस झिल्या बाहेर खेळत असताना चहावाला तिच्या घरात गेलेला काहींनी पाहिला. दहा मिनिटांनी कुणीतरी पोरे जमवून रेहानाच्या घरावर थाप मारली. प्रचंड दडपणात दार उघडल्यावर चहावाल्याची धुलाई झाली. रेहानाला खूप लोकांनी झापले. ती हमसाहमशी रडत होती. चहावाला आक्रोशत होता. शेवटी त्याने 'आम्ही लग्न करणार आहोत' असे सांगीतल्यावर लोकांनी आणखीन मारले. ज्या धनाढ्याकडे रेहाना काम करायची तो मधे पडला. त्याने चहावाल्याला सज्जड दम भरला. गल्लीत राहून पोरी बाळींकडे असा बघणारा मुलगा त्यांना नको होता. संपूर्ण गल्लीने चहावाल्याच्या वडिलांची जबाबदारी घेतली. ते सज्जन होते. आदरणीय होते. मात्र याला हाकलून दिला. कपडे फाटलेले, खिशात दुकानातल्या गल्ल्यावरील सातशे रुपये, अंगावर सर्वत्र अतोनात मार खाल्याच्या खुणा, प्रचंड वेदना.. हे साहित्य गेहून चहावाल्याने मालेगाव सोडले ते कायमचेच! चहाचे दुकान आता वडील व गल्लीतला एक छोटा मुलगा असे चालवू लागले.

इरफान चांदवडचा होता.

त्याच गल्लीतील एका लांबच्या नातेवाईकाकडे तो एक दिवस आलेला असताना त्या नातेवाईकाने त्याच्या लग्नाची गोष्ट काढली. तो लाजत लाजत 'लडकी देखरहे है घरवाले' म्हणाला. रेहाना त्याला लांबून दाखवण्यात आली. इरफान अत्यंत मोठ्या मनाचा होता. त्याच्या घरचेही तसेच होते. रेहानाचा सर्वश्रुत इतिहास ऐकूनही केवळ ती अनाथ आहे हे पाहून इरफानचे तिच्याशी लग्न लावण्याचे पंधरा दिवसात ठरले.

गल्लीला रोषणाईने सजवले होते. सगळेच आनंदात होते. थाटामाटात लग्न झाले. तेव्हा इरफान बावीस वर्षांचा आणि रेहाना सोळा सतरा वर्षांची होती.

तेरा वर्षे झाली पण रेहानाच्या डोक्यातून मात्र चहावाल्याचा विचार कधीच गेला नाही. इरफानने खूप मनोधैर्य देत तिला हळूहळू रमवले. दोन मुले झाली. सगळे नाशिकला सेटल झाले. दरम्यान झिल्या ढाब्यावर कामाला लागला. इरफानने त्याला जाताना पैसेही दिले. मात्र, ते दोघेही आजवर ढाब्यावर गेलेले नव्हते. झिल्याच अधेमधे यायचा. त्याचेही येणे कमी झाल्यावर रेहानाला खूप आठवण यायची. मग ती पत्र धाडायची. त्याला मात्र झिल्या अगदी मनापासून उत्तरे द्यायचा.

अनेकदा एकांत असताना रेहानाला चहावाल्याची आठवण यायची. त्याला पडलेला मार आठवून ती कळवळायची. डोळ्यात पाणी यायचे. पण इरफान सारखा साथीदार असल्याने तिला खूप आधार होता. इरफानच्या याच स्वभावाने तिला तो देवमाणूस वाटत होता.

आणि आज ध्यानीमनी नसताना ढाब्यावर झिल्या भेटला.

अबू अन चाचाच्या आग्रहावरून इरफान अन रेहानाने अक्षरशः ज्या बसमधून आले ती सोडून दिली.

चाचा उद्या त्यांना एक ट्रॅक्स करून बॉर्डरपर्यंत पाठवून तेथून पुढे बसच्या तिकीटाचे पैसे देणार होता आणि आज हिंदू मुस्लीम काहीही न बघता अन तिथी वारही काहीही न बघता ढाबा बंद झाल्यावर मध्यरात्री राखी पोर्णीमा साजरी होणार होती. त्यानंतर अबूतर्फे सगळ्यांना कॉकटेल डिनर होते. यशवंतने सांगीतले की काजल खूप छान गाते. काजलचे गाणे ठेवण्यात येणार होते.

रेहाना रामरहीम ढाब्याची बहीण ठरलेली होती.

अनोळखी माणसाचे प्रेम मिळाले ना.... तर जगज्जेते असल्यासारखे वाटते. एव्हर एक्स्पिरिअन्स्ड??

रेहानाला आत्ता ढाब्याची राणी असल्यासारखे वाटत होते. जो तो तिच्याशी बोलून, तिचे कौतूक करून जात होता. इरफानला जावयाचा मान मिळत होता. कारण अबूने आधीच रेहानाच्या बस कंडक्टरला 'मेरी बेटी नही आयेंगी' असा प्रेमळ संदेश दिलेला होता. रोजचे कंडक्टर्स अन ड्रायव्हर्स ओळखीचेच होते. झिल्याला सुट्टी मिळाली होती. पद्या गल्ल्यावरून उतरून पुन्हा कॅप्टन झाला होता. अबू स्वतःच्या हाताने मटन बिर्याणी बनवत होता. चाचा गल्ल्यावर बसला होता. झरीनाचाची अन तिचा मुलगा रेहानाला बघायला आले होते. अब्दुल पिऊन पडला होता. त्याला शुद्ध आली की तो येणारच होता. काजल रेहानाकडेच बसली होती.

पार्टी म्हंटल्यावर पद्या अन बाळ्यामधे आधीच खाणाखुणा झाल्या होत्या. बाळ्या शिरवाडला पळाला होता. बीअर आणायला. जी रात्री चोरून प्यायची होती. अर्थात, आता पद्याला चोरून प्यायची गरज नव्हती. अबूने त्याला मोठ्यांमधे समाविष्ट करून घेतले होते.

रात्री एक वाजता हळूहळू पार्टी सुरू झाली. सीमाने आज शिरा केला होता. ढाब्यावर जाऊनच! रवा आणायला संध्याकाळीच यशवंतला तिने पिटाळलेले होते. त्यावेळेस दुकान समीरने मॅनेज केलेले होते.

आणि एकेक जण येऊन बसायला लागला. राखीआधी बहुतेकांना बाटलीची घाई होती. राखी म्हणून धागेच होते. पण ते एका ताटात ठेवलेले होते. ताई आलेली असल्याने चोरूनही झिल्या बीअर घेणे शक्य नव्हते.

आणि झरीनाचाचीला घ्यायची असूनही रेहाना अन सीमासमोर आपण घेतो हे माहीत होऊन द्यायचे नव्हते.

अबू कायमच पीतच होता. त्याच्या दृष्टीने काहीच फरक पडत नव्हता.

पण पार्टी सुरू झाली. अन एकाच तासात गप्पांना ऊत आला. मग इरफानने त्यांची कहाणी सांगीतली. झिल्या कसा ढाब्यावर आला, त्यांनी नाशिकला सेटल झाल्यावर कशी प्रगती केली वगैरे!

मग आणखीनच जोरात गप्पा सुरू झाल्या. काजलने जंजीरमधील 'दिवाने है दिवानोंको ना घर चाहिये' म्हणून दाखवले. जोरात टाळ्या मिळतायत म्हंटल्यावर तिने सुनो सजना गाऊन दाखवले. काजलचा गळा गोडच होता. गाण्याचे ज्ञान व भान दोन्हीही होते. मूड मस्त जमला होता.

आता एकमेकांना गायचा आग्रह सुरू झाला. कुणीही कसेही गायला लागले. दोन बाटल्या संपल्या तेव्हा अडीच वाजले होते. मग राखीची आठवण आली. पण त्यापुर्वी बिर्याणीची राउंड झाली. आज तर चक्क चाचानेही 'अबूची अशी बिर्याणी कित्येक वर्षात खाल्ली नव्हती' असे विधान केले. दिपू टकामका रेहाना अन इरफानकडे बघत होता. अचानक झिल्याचा भाव किती वधारलाय हे त्याला दिसत होते. सगळ्याच मुलांना वाटत होते. झिल्यावर किती बेहद्द प्रेम आहे अबू अन चाचाचे! आपल्यावरही असेल का?? या प्रश्नांची उत्तरे रामरहीम ढाबा त्या त्या वेळी देतच होता हे त्या अजाणांना समजत नव्हते.

पहाटेचे सव्वा तीन वाजले होते.

आणि अचानक विकी रडायला लागला. आत्ता सगळ्यांच्या लक्षात आले की विकी बोलतच नव्हता. एकदम सन्नाटा पसरला. रेहाना अन इरफान खूप गंभीर झाले. सगळेच गंभीर झाले होते. पाच दहा मिनिटे रडल्यावर कुणीतरी विचारले.

अबू - कायको रोता विकी... बोल ना... देख कितनी अच्छी पार्टी होरही अपनी...

विकीने डोळे पुसले. तो उठून निघून जायला लागला. त्याला कुणी अडवत कसे नव्हते हेच कळत नव्हते. काजल मात्र आत्ताही उठली.

काजल - विकीभैय्या...

एकच हाक! एकाच हाकेने थबकला विकी. काजलने मागून जाऊन त्याला स्वतःकडे वळवले.

काजल - आओ ना.. रोओ मत... क्या हुवा.. मुझे बताओ...

बहीण बहीण म्हणतात ती हीच! झिल्याला रेहानादीदी आल्याचा आनंद का झाला असावा हे विकीला एका क्षणात समजले. काजलच्या स्पर्शात अपरिचित आपुलकी होती. अशी ओलावलेली आपुलकी आजतागायत विकीने अनुभवलेली नव्हती. मंत्रावल्यासारखा तो तिच्याकडे बघत पुन्हा येऊन बसला. अन बोलायला लागला.

"खायला कायबी नव्हतं त्या दिवशी.... मी दोन पुर्‍या पळवल्या स्टॉलवरून ... आईने पायले... खूप मारलं... मी पळून गेलो... बापाने धरून आणलं पुन्हा. पण... जर तो कमवतच नसेल तर... आम्ही काय खायचं.. कशाला घालतात जन्माला?? भीक फक्त मागायला शिकवली होती... पण दिवसात भीक किती भेटंल?? वीस रुपये नायतर पंचवीस रुपये.. त्यात चौघं खाणार... भैन तर गाडीखाली गेलीच एका... रस्त्यावर हिंडणार्‍या अन खेळणार्‍या प्वारांकडे कोण आई बाप लक्ष ठेवतायत?? चोरी करायची नाय.. बर.. नाय करत.. पण भीक मागायची?? का?? तुमको हाथ पैर नय? तुम हमको जनम देके काम नय कर सकतां?? मग येता जाता कोणबी आईशी बोलायचं... झोपडीत घेऊन जायची आई.. मंग मिळायचं खायला.. पण रोज कस्काय उपाशी र्‍हायचं?? अन वर बाप तिलाबी मारणार... कोन *** आला व्हता म्हणत.. तीबी त्याला मारणार.. मी रडलो की मला मारणार दोघं... "

"एक सायब आलावता पुलीस लेके उस दिन... म्हणला .. हितनंच बॅग पळवली कोन्तरी त्याची... सर्व्या झोपड्या उलथल्या... नय मिला कुच बी.. बाप तो था ही नय घरपे... मै छोटा था... मैने जाते जाते उस आदमीको इशारा किया.. माज्या बापानी मागे गटारापलीकडे आदल्या दिवशी कायतरी खोदलं व्हतं.. मी पाहिलं होतं... मला वाटलं ते मिळालं की मला बक्षीस देंगे... "

बापाला पकडून धरून नेताना बाप लय घान शिव्या देत व्हता मला... आई तर बडवतच व्हती... फक्त .. त्या माणसाने दोन रुपये ठेवले.. तिसर्‍या दिवशी आल्यावर बाप लय प्यायला... एक झारा तापवला चुलीवर अन ... मी... मी झोपलेलो होतो... .. माझ्या.. पाठीवर पाय ठेवून मला दाबून धरला बापानं... झारा ... दंडावर ठिवला... हे... तू पुछता हय ना सम्या.. ये कायका डाग करके... ये ... तापलेला झारा ठिवलावता... त्याचा डाग हय... मला दवाखान्यातबी न्यायला तयार नवता बाप... आई मला काहीतरी लावत होती दंडाला... पण तोंडातून तीबी शिव्याच देत व्हती.."

"सकाळी मी पळालो... पुन्हा धरलं मला.. भीक मागायला पायजे व्हतो मी... मंग मी बी चावलो... मनगट फोडला बापाचा... धावत बस धरलीन हितं पोचलो.."

सुन्न शांततेचा जवळपास दोन तीन मिनिटांनी भंग करत यशवंतने विचारले...

यशवंत - पण... आज का रडलास त्यासाठी??
विकी - दिप्याकी मा आयी थी ना.. वो देखके मेरेको पता चला... आई चांगली बी असते.. म्हाईतच नव्हतं... अबूचाचा... मेरी मां अच्छी कायको नय??

भडभडून रडत यशवंतच्या बायकोने विकीला जवळ घेतले. निदान लगेच जागा शोधण्याचा तिचा विचार तरी नक्कीच रद्द झाला होता. कधीपासून तिला एक मुलगाही हवा होता... तो मिळाला होता. अबू मात्र एवढ्याश्या पोराचा हा प्रश्न ऐकून सुन्न झाला होता.

पहाटे पाचला रेहानासाठी बोलवलेली गाडी येणार होती. आणि आत्ता चार वाजता पार्टीमधे सुनसान शांतता होती. झोपायला हवे होते हेही कुणाला समजत नव्हते. पार्टी म्हणून चालू ठेवलेले लाईट जसे पद्याने उठून बंद केले ... सगळ्यांना जाणीव झाली... पार्टी संपली आहे...

अन मग राखी बांधायला सुरुवात झाली. तेवढ्यात शुद्धीवर आलेला ... अन काल रात्रभर इथे पार्टी होती हे माहीतच नसलेला अब्दुल झोकांड्या देत अन तोंडाने कुठलेतरी हिंदी जुने गाणे म्हणत तिथे पोचला...

त्याने कुणालाच नीट बघितले नाही. फक्त सगळे जागे आहेत एवढेच बघितले.

अब्दुल - क्या बे पद्या... आज जागेच सगळे? क्या हुवा क्या? .. अबे चूप कायको हय सब्..आँ??

पद्याने त्याला हाताने सावरत एका खुर्चीवर बसवले.

राख्या बांधण्याचा रेहानाचा मूड कधीच खलास झाला होता. विकीची कहाणी ऐकून तिला अन झरीनाचाचीलाही अतिशय वाईट वाटले होते. अबू अन चाचाला फक्त नमस्कार करणार्‍या रेहानाने सगळ्यांना राख्या बांधल्या. अब्दुल खूप पिऊन आलेला आहे अन काहीतरी भलतेसलते वागू शकेल हे जाणून तिने राखी बांधली नाही त्याला. तो मात्र तिच्या तोंडावर पडणार्‍या कुठल्यातरी अंधुक प्रकाशात तिच्याकडे थिजल्यासारखा बघत बसला होता.

ती त्याच्याजवळून त्याला राखी न बांधता पुढे जायला लागली तेव्हा अब्दुलने खोल गेलेल्या आवाजात तिला हाक मारली...

अब्दुल - मे... हे... रु... न... आखिर... आही गयी ना तू????

रेहानाचे दुसरे नाव मेहेरुन... मेहेरुन्निसा आहे... हे इरफानलाही माहीत नव्हते...

आणि आपल्याला लहान असताना खाऊ देणारा चाचा आपल्याच ढाब्यासमोर राहतो हे झिल्याला माहीत नव्हते...

रेहानाने त्याच्याकडे पाहिले. अंतर्बाह्य दचकली रेहाना! एकच क्षण! या क्षणावर विजय मिळवायला हवा होता..

पण नाही मिळाला..

जवळ उभे असलेले सगळे... अगदी स्वतःचा नवरासुद्धा... तिच्या लक्षात आला नाही... त्या क्षणी ती हारली.. आणि तिने खुर्चीवर बसलेल्या अब्दुलच्या मांडीवर डोके ठेवले...

आणि... कित्येक वर्षांनी रेहानाला तिचा खराखुरा प्रियकर मिळाला होता.

इरफान पुढेसुद्धा झाला नाही. त्याला एका क्षणात सगळे समजले होते. त्याला लाजही वाटली नाही. त्याला वाटला अभिमान! आपली पत्नी बिनदिक्कत दुसर्‍याच्या मांडीवर डोके ठेवून घळाघळा रडती आहे हे पाहून नवर्‍याचे रक्त उसळले असते. पण इरफान साधू होता. त्याला खर्‍या प्रेमाची किंमत माहीत होती. कोणतीही बेअब्रू न समजता तो शांतपणे बाजूला उभा राहिला होता.

आवेग! तीव्र आवेगात हमसून हमसून रेहाना रडत होती. अब्दुलच्या हातातली बाटली, त्याच्या तोंडाला येणारी दुर्गंधी, त्याच्या कपड्यांना येणारा दारूचा वास... काहीही.. काहीही आत्ता याक्षणी तिला तिरस्करणीय वाटत नव्हते...

जवळपास दोन मिनिटांनी इरफानने तिला आधार देऊन उठवले अन बघतात तर ढाब्याच्या प्रवेशद्वारातून रेहानासाठी ठरवलेली गाडी आली होती. त्या गाडीत जोरात गाणे लागले होते.

हम तुमसे जुदा हो के... मरजायेंगे रो रोके... मरजायेंगे रोरोके...

दहा मिनिटांनी बॅगा घेऊन दोघे अत्यंत निराश अन सुन्न मनाने निघाले तेव्हा एकदाच रेहानाने वळून अब्दुलकडे पाहिले. तो रडत असावा किंवा दारूच्या नशेत असावा असे वाटल्यामुळे तिने ठरवले.. पुढे कधीतरी एकदा येऊन त्याच्याशी खूप खूप बोलायचे... इरफान नक्की मान्य करेल.. अब्दुलने लग्न केलेले नव्हते हे दिसतच होते तिला... एक शब्दही न बोलता ती त्या गाडीतून इरफानबरोबर निघून गेल्याच्या क्षणीच...

अख्खा ढाबा अब्दुलकडे 'ही काय कहाणी' म्हणून धावला होता...

आणि त्याची खाली पडलेली बाटली उचलून त्याच्या हातात कोंबताना पद्या अब्दुलला म्हणाला...

पद्या - तुम कौन हो अब्दुल

मागून झिल्या म्हणाला

झिल्या - चाचा है... मेरेको खाऊ देते थे...

पण हे वाक्य कुणीच ऐकत नव्हते...

कारण त्या वेळेस पद्या गदगदून अब्दुलला हलवत होता आणि...

अब्दुल..... या जगाला... सोडून गेलेला होता..... कायमचा...

त्याने त्या दिवशी सांगीतलेली... सगळ्यांना अबूबकरसारखी वाटलेली प्रेमकहाणी......

..... खोटी मुळीच नव्हती.....

एकच ओळ मनामनांत सुन्नपणे फिरत होती...

हम तुमसे जुदा होके ..............मरजायेंगे रो रोके.... मरजायेंगे रो रोके...

गुलमोहर: 

सुपरफास्ट तूफान एक्स्प्रेस .... यंदा जरा लेट झाली वाटलं ...
देर आयद दुरुस्त आयद Happy
=================
दिप्याला न्यायला अचानक त्याची ?आली होती >>>
=================
आरसा दिसला नाही राव अजून ...
=================

.

वाचनवेडा,

तसेच सर्वच प्रतिसादक,

सर्वांचे मन;पुर्वक आभार!

प्रोत्साहनाने हुरूप आला.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

वाचनवेडा,

तसेच सर्वच प्रतिसादक,

सर्वांचे मन;पुर्वक आभार!

प्रोत्साहनाने हुरूप आला.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

रडवलंत बेफिकीर_______खरोखर !!!!!
अब्दुलची प्रेम कहानी खुप मनाला लागली खरच तो इतके दिवस या दिवसासाटी जिवत होता वाटत. जसे पोरोचा देवदास तसा रेहानाचा अब्दुल.
अजब प्रेम की गजब कहानी