हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 27 April, 2010 - 23:12

ऑक्टोबर महिन्याचा सूर्य सकाळी साडे सात पासून जमीनीचा कण कण जाळत होता. सहा महिन्यांमधे काशीनाथ का गेला असावा ही चर्चा तर राहोच, काशीनाथ निघून गेला हा विषयही निघणे बंद झाले होते. कारण नवीनच धक्का बसला होता अबूला अन चाचाला. सगळ्यांनाच!

चवदा वर्षांचं पोरगं हातात पुरेसा जोर नसल्यामुळे पातेली उचलणे वगैरे कामे एकट्याने करू शकत नसले तरीही ... एक पदार्थ नव्हता जो दिपूने करायचा ठेवला होता अन एक पदार्थ नव्हता ज्याला दिपूने आणलेली चव आजवर अबू आणू शकला होता. त्याने फक्त सर्व भाज्यांमधे किंचितच साखर व चिंच घालायला सुरुवात केली होती. अगदी मांसाहारीमधेही!

आणि आजवर दोन दोन दिवस तेच तेच रस्से गरम करण्याची सवय असलेल्या ढाब्यावर रोजच्यारोज नवा रस्सा तयार होऊ लागला.

आणि दिपू ढाब्यावर महत्वाचा ठरत असतानाच कोंडाजी चिवडा विकणार्‍या यशवंतकडून त्याला अचानक समजलं होतं!

महुरवाडी टेहरं गावापाशी असलेली एक किरकोळ वस्ती आहे. तिथे कोणतीही बस जाऊ शकत नाही. मात्र टेहरंपासून ती चालायच्या अंतरावर आहे.

आणि गेली साडे सहा वर्षे ज्या गोष्टीचा दिपू शोध घेत होता ती मिळाली तेव्हा... महुरवाडीचा आत्यंतिक तिटकारा यावा अशी त्याची मनस्थिती झालेली होती... रामरहीम ढाब्यावर दिपू हिरो ठरत होता.

काशीनाथ राहात असलेली खोली आता दिपूला एकट्याला देऊन टाकली होती. खरे तर आता गणपत आणि अबू आरामच जास्त करत होते. पद्या बहुतांशी गल्ल्यावर बसायचा. झिल्या फुलटाईम कॅप्टन झाला होता.

मात्र, अंजनाच्या खोलीत राहताना रात्री दिपू तिच्या आठवणींनी बेचैन व्हायचा! दिपूच्या डोक्यावर आता चोवीस तास वासना सवार असायची.

पद्याचे लग्न ठरल्याचे कळल्यावर सगळा ढाबा आनंदी झाला. नोव्हेंबर महिन्यात नाशिकला लग्न होते. मुलगी नाशिकचीच होती. मात्र... या सगळ्याला एक दु:खाची झालर होती.

लग्न झाल्यावर पद्या कायमचा ढाबा सोडून नाशिकला जाणार होता. कारण तिला या आडगावी ठेवणेही शक्य नव्हते आणि नाशिकमधे नवीन हॉटेल काढायला सासरे मदतही करणार होते.

आणि दिवस वेगात जात असतानाच ती रात्र आली! ज्या दिवशी पद्याला सगळ्यांनी ढाब्यावरची शेवटची पार्टी द्यायची! सेंड ऑफ!

रात्री दहालाच ढाबा बंद केला. सगळे मागच्या बाजूला गोल करून बसले होते. झरीनाचाचीने पद्यासाठी वस्तीच्या मागच्या जंगलातील एका झाडाच्या फांदीचा एक भाग आणला होता. तो म्हणे औषधी होता. ती झरीनाचाचीने त्याला दिलेली भेट होती. अब्दुल पंक्चरवाल्याने पद्याला बाटली आणली होती. यशवंत चिवडेवाल्याने शंबर रुपयांचा गॉगल आणला होता. सगळ्या पोरांनी मिळून शिरवाडहून त्याच्यासाठी एक चांगला शर्ट आणला होता.

आणि... सगळे बसलेले असूनही एक शब्दही कुणी बोलत नव्हते... एक शब्दही...!

पद्या चालला ही कल्पनाच चाचा, अबू, बाळ्या अन झिल्याला सहन होत नव्हती. झरीनाचाचीने गणपतचाचाच्या पाठीवरून हात फिरवून सांगीतले... आता रहेंगा पद्या... उसीकाच ढाबा हय... है ना पद्या??

पद्या जो मान खाली घालून बसला होता तो .. त्याच्याकडे बघवतच नव्हतं!

एकही जण दारू पीत नव्हता. शेवटी अब्दुल म्हणाला.

आज पीनेका नय है क्या??? पद्याके शादी के खुषीमे??

झिल्या भडकला... अब्दुल... तेरेको सिर्फ पीना सूझता क्या???

पुन्हा शांतता पसरली....

मग अब्दुल म्हणाला... मेरेको सिर्फ पीना नय सुझता... आज पद्या चाललाय... शादी करणारे... आज तर हसा??.. तो गेल्यावर उद्यापासून रडायचे हायेच की?? आज तर पद्याला आनंद द्या...???

झिल्याला जोरात हुंदका आला. जरी बाळ्या पद्याने सर्वात आधी आणलेला मुलगा असला तरीही झिल्याचे अन पद्याचे नाते जास्त घट्ट अन जवळचे झाले होते. झिल्याला हुंदका आलेला पाहून स्वतः पद्यालाच हुंदका आला.

गणपतचाचा म्हणाला.... ऐसा रोनेका नय बेटा...

तब्बल सात वर्षांनी पद्याला बेटा म्हणाला होता गणपत!

मग मात्र पद्याचा धीर सुटला. तो सरळ उभा राहिला अन एका भिंतीवर तोंड दाबून हमसाहमशी रडायला लागला.

आता दिपूला गांभीर्य नीट समजलं! पद्यादादा रडतोय??? कधीच पाहिलं नव्हतं असं!

मधेच समीर उठला... अरे सब लोगां रोते कायको??? ये बाळ्या है ना कलसे पद्याकी अ‍ॅक्टिंग करनेके लिये... कैसे करनेका बाळ्या??? बता ना.. परसो दिखारहा था ना तू.. मैहीच बताता... ये ऐसे करनेका...

समीरने हातवारे करत पद्याची नक्कल करायला सुरुवात केली...

अय झिल्या... गार्डन देख.... तीन नंबरला रोटी.. नरम... यांचे किती रे दादू... ओ साहेब... आतमधे ड्रिंक नाय.. गार्डनमधे... अय विक्या... इधर उधर क्या भटकरहेला है मजनूजैसा... ये साफ कर चल..

कलसे.. कलसे मै नय रहेंगा... ढाबेपे... नय रहेंगा मय... आज सब लोगां मेरे साथमे काम करो... कलसे तकलीफ देनेको .. मै... नय रहेंगा....

बोलता बोलताच समीर रडत रडत कोसळला. आता सगळेच ओलावले. झरीनाचाची ओक्साबोक्शी रडू लागली. अब्दुल तिला समजावू लागला.

प्रदीप डांगे! वय वर्षे सत्तावीस अठ्ठावीस! लाडके नाव पद्या! अख्खा ढाबा त्याने एकहाती सांभाळला होता कित्येकदा! आज स्वतःलाही सांभाळू शकत नव्हता.

आता अबू म्हणाला...अब्दुल ठीक कहता है.. आजबी रोयेंगा तो कलसे क्या करेगा सब लोगां???

चलो... पार्टी शुरू करो... पद्या ... तेरे लिये मै बीअर लाया देख... छुपछुपके पीता था ना?? हमको मालूम नय ऐसा मत समझ...

केवळ पाचच मिनिटात मगाचचा मूड कुठे गेला कोणास ठाऊक. बाळ्या अन झिल्या मात्र पिऊ शकत नव्हते. समोर चाचा अन अबू असल्यामुळे! पद्याही जरा हळूहळूच पीत होता... पण मग हास्यविनोद सुरू झाले..

अब्दुलने पद्याची बायकोवरून थट्टा सुरू केली. आता काय तू आम्हाला विसरणार, आता दिवसरात्र आपला बायकोच्या जवळ बसणार. मग यशवंत चिवडावाला म्हणाला आता पद्या ढाब्यावर कस्टमर म्हणून आला तरच भेटणार!

तीन दिवसांनी सगळ्यांनाच नाशिकला जायचं होतं! पद्याच्या लग्नाला! पण निदान पाच जणांना तरी ढाब्यावर थांबणं भाग होतं. आणि अर्थातच दिपूला थांबायलाच हवे होते. कारण भटारखाना तो बघत होता. मग त्यानंतर बारा दिवसांनी ढाब्यावर पद्या अन त्याच्या बायकोसाठी अन दोन्हीकडच्या घरच्या लोकांसाठी पार्टी ठेवायची होती. त्यादिवशी कित्येक दिवसांनी अबूबकर स्वतःच्या हातांनी बिर्याणी बनवणार होता.

पार्टी हळूहळू रंगात आली. गणपतचाचा आज जरा जास्तच पीत होता. तो नेहमीप्रमाणे गंभीरच होता. अबूबकरचा विनोदी स्वभाव प्यायला लागल्यापासून जरा कमीच झाला होता. पण ती कसर दादू अन विकी भरून काढत होते.

आता नाचगाणी सुरू झाली. झरीनाचाचीही गायली. तिला कुठलंतरी १९५८ सालचं हिंदी गाणच फक्त यायचं!

जेवायचा कुणाला मूडच नव्हता.

पहाटेचे दोन वाजले तेव्हाही गप्पाच चालल्या होत्या. पद्या त्याच्या सगळ्या आठवणी सांगत होता. अबू पद्या लहान असतानाच्या आठवणी सांगत होता. एकेक जण लवंडू लागला. सगळ्यांनाच झोप यायला लागली. मग एकेक जण उठू लागला. उठताना पद्याला मिठी मारू लागला. पण बहुतेकांना आता दारू चढल्यामुळे जरासा धीर होता. फारसे कुणी रडत नव्हते. मात्र न पिणारे झिल्या, बाळ्या अन पोरे उदास झाली होती. अगदी नवीन पोरे मन्नू अन साखरूही!

पार्टी संपताना चाचा म्हणाला.. अय पोरांन.. सकाळी बरोबर आठ वाजता दारात उभं राहायचं हा सार्‍यांनी?? काय? पद्या जायेंगा तो उसको आखिरका देखेनेके लिये सब लोगां गेट पे आयेंगे... काय??

माना हालल्या. मात्र चाचाच्या या वाक्यामुळे सगळ्यांना परत जाणीव झाली. सहा तासांनी पद्या जाणार! पण आत्ता कुणालाच साधं रडवतही नव्हतं!

पण ती वेळ आलीच नाही. कुणालाही जाग यायच्या आधीच... पहाटे साडेपाचच्या सुमारालच पद्या बॅग घेऊन चालता झाला.. अंधारात! एकदाच गेट कडे थांबून त्याने मागे पाहिले.

रामरहीम ढाबा अंधारात झगमगत होता. पण आज त्या झगमगण्यात आपुलकी उरलेली नव्हती. परकी वास्तू वाटत होती ती. डोळ्यातून सरी ओघळल्यावर पद्याने हातातली बॅग खाली ठेवली अन जमीनीवर डोके टेकून ढाब्याला नमस्कार केला. .. अन निघाला.. कुणाचाही निरोप न घेता...

निरोप घेणे जमणारच नव्हते कुणालाच! सोसणारच नव्हते.

राम रहीम ढाब्यावरचा एक अध्याय संपला होता. प्रदीप डांगे इतिहास झाला होता. अंधारात चालताना ढाब्याकडे वळून बघण्याची त्याची हिम्मतच नव्हती. न जाणो कुणी उभे असले अन आपल्याला पाहून हातबित केला तर????

सात वाजता उठलेल्या पब्लिकला उट्।अल्या उठल्याच धक्का बसला. चाचा कधी नव्हे तो हंबरडा फोडून रडला. गणपतचाचाला रडताना अबूशिवाय आजवर कुणीही पाहिले नव्हते. पोरेही रडू लागली. एकमेकांची समजून घालत नऊ वाजता पद्याशिवाय ढाबा उघडला. आज 'ढाबा ओपन' ही पाटी गेटवर ठेवायला पद्या नव्हता, रमणला ठेवावी लागली.

गिर्‍हाईके सुरू झाल्यावर मात्र जो कामाला वेग आला.. मधून मधून बोचरी आठवण सोडली तर 'पद्या नाही' यावर विचार करायलाही उसंन मिळाली नाही कुणाला. माणूस केवढाल्ली दु:खे काळाच्या अन कामाच्या ओघात विसरू शकतो हे लक्षात येत होते.

दोन दिवसांनी नाशिकला कोण कोण जाणार हे रात्री ठरत होते. चाचा, अबूबकर, अब्दुल, झरीनाचाची, झिल्या अन समीर जाणार होते. बाकीच्यांना थांबणेच भाग होते. रात्री पुन्हा बैठक झाली. मात्र त्या बैठकीत दारू नव्हती. पद्याचा विषयही काढायला कुणी धजत नव्हते. अबूने सक्त ताकीद दिली होती. पुन्हा चाचाला रडवलंत तर बघा!

एक अशुभ सावट प्रत्येकाच्या मनावर होते.

दिपूमधे मात्र वेगळेच बदल घडत होते. आजच सकाळी त्याने झरीनाचाचीला भांडी घासताना पाहिले तेव्हा तिचा पदर सरकलेला होता. आणि अंजनाने त्या रात्री इतक्या जवळ असताना स्वतःचा ब्लाऊज काढल्यावर दिपूला जसे वाटले होते तसेच आत्ताही त्याला वाटले. कितीतरी क्षण तो झरीनाचाचीकडे बघत होता. झरीनाचाची कोणत्याही स्टँडर्डने सुंदर नव्हती. पन्नाशीची काळीकुट्ट जाडजुड बाई! पण तिच्या झाकल्या अंगाचे आत्ताचे दर्शन दिपूला बेहोश करायला पुरेसे होते.

आता दिपूला नादच लागला. कांउटरवरू बाहेर येणार्‍या गिर्‍हाइकांमधील बायकांना निरखण्याचा! मुद्दाम काहीतरी कारण काढून तो आता बाहेर यायला लागला. त्याच्या अर्धवट वयाकडे दुर्लक्ष केले जायचे. पण त्याची नजर मात्र बरोबर बायकांच्या अंगावरून फिरायला लागली होती.

आता कोणतीही स्त्री आवडेल अशी त्याची परिस्थिती झाली होती.

उद्या सगळे नाशिकला निघणार होते अन आज दुपारी काहीतरीच झाले...

दिपू काउंटरवरून बघत होता. एक बाई पाठमोरी बसली होती. आत्ताच आली असावी. बहुधा तिचा नवरा टॉयलेटला जाऊन येत असावा. पण त्या पाठमोर्‍या बाईच दर्शन मात्र फारच सुखद होते.

हिरवी साडी, बरीचशी पाठ उघडी टाकणारा ब्लाऊज, वेणी, त्यात एक फूल आणि गव्हाळ रंग! स्त्रीचे वय लक्षात येत नव्हते, पण असेल पस्तीस वगैरे!

दिपू नेहमीप्रमाणे तिला पुढून न्याहाळायला म्हणून बाहेर आला. थेट गल्ल्यावर गेला. झिल्याशी दोन शब्द बोलला. दारातून लोकांची ये जा चाललेली होती. झिल्या गडबडीत होता. मग दिपू मागे वळला अन पहिली नजर त्याने त्या स्त्रीवर टाकली. मुळापासून हादरला दिपू! होता त्याच जागी थिजल्यासारखा उभा राहिला....

... कारण.. आता त्या स्त्रीसमोर एक माणूस बसलेला होता आणि...

... आणि ती स्त्री सुनंदा होती...

दिपूची सावत्र आई....

दिपूच्या वयाच्या आठव्या वर्षी त्याला जगाच्या शाळेत एकट्याला अन कायमचे पाठवणारी त्याची सावत्र आई..

हीच.. हीच ती बाई!

हिच्याच आईसारख्या स्पर्शासाठी आपण आसूसलो होतो. काकू, स्वाती ताई, मनीषाताई, झरीनाचाची सगळ्या सगळ्यांमधे जिला आपण शोधायचो ती... आपली स्वतःची आई...

हिलाच खेटून आपण झोपायचो रात्री.. बावळटच होतो आपण... ही अजूनही .. तशीच दिसते.. आणि आज आपण.. हिला बघायला बाहेर आलो????

दिपूला स्वतःची शरम वाटली. पण तो खिळल्यासारखा तिच्याकडे पहात उभा होता.

आणि अचानक.. सुनंदाचीही नजर त्याच्याकडे वळली... आणि त्या नजरानजरेतून जे संदेश एकमेकांना पाठवले गेले.. त्यांचे वर्णन करणे शक्य नाही...

खाडकन सुनंदा उठली अन क्षणात तशीच बसली. तिला अचानक जाणवले. एकदम सगळ्यांच्या समोर त्याला आपला मुलगा म्हणणे चुकीचे ठरेल. लोकांना काय माहीत असणार आहे?? पण सुनंदा सगळे विसरली होती. अवाक होऊन दिपूकडे पाहात होती. दोन तीन क्षणांनी तिने मानेनेच त्याला जवळ यायची खुण केली. दिपू बधीर झाल्यासारखा चालत तिच्या टेबलपाशी गेला. तिच्याबरोबरचा माणूस मन्नूकाका होता. किती हडकला होता आता! भलताच दारू पीत असणार! मन्नूने दीपकला पाहिले अन तो एकदम दचकला.

मन्नू - अरे?? दिप्या?? तू इधर कैसे??
दिपू - क्या होना?? व्हेज .. नॉन व्हेज..

या एकाच प्रश्नामुळे दोघांनाही समजले. दिपू इथेच कामाला होता. सुनंदाचे वात्सल्य ओतप्रोत भरलेले होते.

सुनंदा - दिपू?? मेरा दिपू??
दिपू - मै दिपू नय... आपको क्या होना...
सुनंदा - दिपूच है.. मेरा दिपू है तू.. मला माफ कर.. कर ना...

सुनंदा उठून उभी होती. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहात होते. तिने दिपूला हलकेच जवळ ओढले. सगळ्यांसमोर जास्त तमाशा करणे शक्य नव्हते. अत्यंत घुसमटत्या पद्धतीने तिला वागावे लागत होते.

सुनंदा - दिपू कैसा हय तू? याद नय आती मां की?
दिपू - ओ .. सांगा ना ऑर्डर काय हाये..?? हे बघा.. हा सम्या येतोय त्याला सांगा..

दिपू निघालेला असताना सुनंदाने त्याला अडवले अन धरून ठेवले. निदान तो कुठे असतो हे तरी आता तिला समजले होते. आता ती त्याला जाऊ देणारच नव्हती.

दिपू - सोड मला.. सोड
सुनंदा - मै तेरेको लेनेको आयी दिपू...
दिपू - इधर?? मी इथे असतो.. हे माहीत होतं??
सुनंदा - हो दिपू.. खरच न्यायला आलीय मी (सुनंदा खोटे बोलत होती)
दिपू - मग.. सात वर्षात का नाही आलीस .. न्यायला??

सुनंदाचा हात दिपूच्या खांद्यावरून खटकन सुटला. ती विदीर्ण नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. दिपूने वर्मावर बोट ठेवले होते. तिला खोटे पाडले होते. ती तशीच फाटलेल्या चेहर्‍याने बघत असताना दिपूने पुढचा प्रश्न विचारला...

दिपू - आणि... न्यायला यायचं होतं तर... मला त्या दिवशी ... हाकलून का दिलं???

खाडकन दिपू आत निघून गेला.

घळघळा रडू लागली सुनंदा! मन्नूबरोबर राहून सत्यानाश झालेला होता. पण वस्ती आता तिला तिसरा घरोबा करायची परवानगी देत नव्हती. मन्नू अफाट पीत होता. त्याच्या अंगात आता रक्ताऐवजी दारूच असावी इतका! पूर्ण हडकलेला, दोळे खोल गेलेले! काहीही काम करू शकत नव्हता. मग सुनंदालाच रानात जावं लागायचं! त्यातच मन्नू तिच्यावर संशय घेऊ लागला. दोघांची भांडणे व्हायची. मारामारीही व्हायची. पण इतकंच की.... आता मार मन्नू खायचा...

आणि अशात तिला दिपूची रोज आठवण यायची. टहेर अन मुंगसं येथे तिने खूप चौकशी केली होती. पण ती सगळी चौकशी तिने वर्षभरानंतर सुरू केली होती. तोपर्यंत ती मन्नूच्याच आनंदात एकटीच होती. त्या वर्षात तिला दिपूची आठवणही आलेली नव्हती. आणि चौकशी सुरू केल्यावर चांदवडकडून नाशिककडे जाण्याच्या दिशेला न करता मालेगावकडे जाण्याच्या दिशेवर तिने चौकशी केली होती. त्यामुळे पोलीसही काही सांगू शकले नव्हते. एक दोनदा स्थानिक पेपरात छापून आल दिपूच नाव, पण ते मालेगाव अन चांदवडच्या! दिपू वडाळी भुईला त्यावेळेस मनीषाताईकडून इंग्लिश शिकत असेल हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते.

कसाबसा दिसलेला दिपू आता यायला तयार नव्हता. तिने मनाशी ठरवले. आत्ता तमाशा करायचा नाही. मन्नूला महुरवाडीला सोडायचं! एक दोन जबाबदार माणसं घेऊन पुन्हा इथे यायच! ढाब्याच्या मालकाला सगळं व्यवस्थित सांगायचं! लागले तर पोलीसही आणायचे. आणि दिपूला घेऊन जायचं!

सुनंदा हरवल्यासारखी समोरचे पदार्थ चिवडत होती. मन्नू हपापल्यासारखा खात होता. मन्नूच्या दृष्टीने दिपूवर इतका विचार करण्यासारखं काही नव्हतं! पण आत्ता काही बोललो तर घरी गेल्यावर ही बया आपल्याला बडवेल या भीतीने तो गप्प होता.

बिल आलंच नाही. दोघे उठले. सुनंदा पाच पाच वेळा आत काउंटरकडे बघत होती. पण दिपू तिला दुसरीचकडून बघत होता हे तिला माहीत नव्हतं! मन्नूने गल्ल्यावर जाऊन पैसे द्यायला सुरुवात केल्यावर दिपू बाहेर आला व त्याने झिल्याला सांगीतलं... इनका बिल नय लो.. मै देदेगा....

सुनंदा अचानक म्हणाली.. चल ना बेटा

बेटा! सात वर्षात ही हाक त्याने अनेकजणांकडून ऐकली होती. अगदी पद्यासुद्धा कधीकधी त्याला प्रेमाने बेटा म्हणायचा. पण खुद्द आईच्या तोंडातून ती हाक ऐकण्याच भाग्य काय असतं ते मुलालाच कळतं! दिपूला आज ते भाग्य मिळालं! सात वर्षांनी! आपल आयुष्य पूर्णपणे बदलायची संधी समोर आलेली आहे अन यापुढे आपली अतिशय प्रेमाने काळजी घेतली जाईल याचा विचारही त्याच्या मनात नव्हता. त्याला बेटा या हाकेन क्षणभर द्रववले इतकेच....

सुनंदा अजूनही दिपूला जवळ घ्यायचा प्रयत्न करत होती. तो मात्र निसटत होता. शेवटी तुटलेल्या मनाने अन फाटलेल्या चेहर्‍याने मन्नूच्या मागोमाग ती बाहेर पडली तेव्हा मन्नूच्या चेहर्‍यावर बिल वाचल्याचा आनंद होता. सुनंदा बराच वेळ मागे वळून वळून पाहात होती. दिपू हॉलच्या दारातच उभा राहून दूर जाणार्‍या त्याच्या आईकडे पाहात होता. बिचारा दिपू! एकदा त्याला आई हवी होती तेव्हा आईला तो नकोसा होता. आज आईला तो हवा होता तर... आज त्याला आईची घृणा वाटत होती. अन हे सगळे चढ उतार केवळ वयाच्या पंधरा वर्षांंअधे घडलेले होते. काय असते अशा मुलांची चूक?

काहीही नसते....

ते दिसेनासे झाले तेव्हाही दिपू खिळल्यासारखा तिकडेच बघत बसला होता. झिल्याने मागून विचारले..

कौन थे रे?

खूप वेळ आवरलेले अश्रू दिपूच्या डोळ्यांतून आता घळाघळा वाहू लागले. नशीब, झिल्याला दिसले नाहीत.

तब्बल पाच, सहा सेकंदांनी धीर आल्यावर दिपूच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले... झिल्याकडे पाठ करूनच म्हणाला तो...

..... पडोसी थे..!!

एक अनाथ मुलगा... पुन्हा अनाथ झाला होता...

दुसर्‍या दिवशी सकाळीच अबू, चाचा, झिल्या, झरीनाचाची अन अब्दुल नाशिकला पद्याच्या लग्नाला जायला निघाले. पिंपळगाव (बसवंत) मधील एकाची जीप आणली होती. सगळ्याच मुलांना जावेसे वाटत होते. पण ढाबा बंद करणे शक्य नव्हते. बिचार्‍या मुलांना तरी दुसरा काय आनंद असणार? असेच कोणते ना कोणते समारंभ!

जीप आली. सगळे चहा घेत होते तोवर पोरांनी सामान जीपमधे टाकले.

ढाब्याच्या दारात सगळे जण उभे होते. नाशिकला जाणारे होते ते आता जीपमधे बसले. जीपची घरघर सुरू झाली. अब्दुल आपल्या दुकानातून बाटली घेऊन धावत येऊन जीपमधे बसला.

आणि.....

गिअर टाकायच्या आधी दादू एकदम म्हणाला...

जानेका जरूरत नय...

सगळ्यांना वाटले हा काय चक्रमसारखा बोलतोय.. चाचाने विचारले... कायको बे??

दादूने हात लांब दाखवून सगळ्यांना बघायला सांगीतले.. वो देखो....

लांबवर एक आकृती चालत येताना दिसत होती. हातात बॅग! नेहमीचाच पोपटी शर्ट!

झिल्या जीपमधून उतरून म्हणाला.... पद्या???

त्या मुलीचे दुसर्‍यावर प्रेम होते अन पद्याशी लग्न लागायच्या दोन दिवस आधी म्हणजे काल.. ती तिच्या घरातून पळून गेली होती... पद्या परत आला होता.. स्त्री या विषयावर त्याचे मत ठाम झाले होते... अत्यंत तिरस्करणीय व विश्वासास पात्र नसलेली व्यक्ती म्हणजे स्त्री...

आणि हे मत लवकरच बदलणार होते.. कारण....

त्याचवेळी...

हाफ राईस दाल मारके ची धडकन... काजल... तिच्या वडिलांबरोबर.. म्हणजे कोंडाजी चिवडावाला यशवंत बरोबर अन आईबरोबर.. ढाब्याच्या आसपास कायमची सेटल व्हायला टहेर्‍याहून निघालेली होती...

गुलमोहर: 

ओ बापरे कथा तर एकदम फुल्ल स्पीड निघालीये.. छान आहे हा भाग ही.. पुढच्या भागाची प्रतिक्षा सुरु..

तुमचे सगळेच लेखन खुपच छान आहे. ही कादंबरी पण खुपच सुंदर लिहित आहात.
सगळे भाग लवकर लिहीत असल्याबद्द्ल धन्यवाद.
तुम्हाला पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

व्वा!!! काय मज्जा येत आहे वाचायला..अप्रतीम कथा !!! आणि काय प्रचंड वेग आहे सगळ्या घटनांचा..येऊदे लवकर पुढचा भाग.

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभारी आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!