सिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन

Submitted by नरेंद्र गोळे on 25 April, 2010 - 00:14

मिरीक स्थलदर्शन

१९ मार्च २०१० ला सकाळी ०८०० वाजता आम्ही न्यू जलपैगुडी स्थानकावर उतरलो. स्थानकाबाहेर सुमोंमधे सामान लादून आम्ही हॉटेल सेंट्रल प्लाझा, सिलिगुडी येथे गेलो. नास्ता केला आणि १x२ बसमधे आपापली आसने ग्रहण करून मिरीकच्या दिशेने प्रयाण केले. हवामान काहीसे थंड होते. उत्साहवर्धक. वाटेत आम्ही एका चहाच्या मळ्यात उतरलो.

घातधर्मी वळणाच्या (लॉगरिदमिक) निमुळत्या टोपल्यांतून चहाची पाने खुडून आणणारे मजूर (स्त्रिया आणि पुरूषही) आपापल्या टोपल्या एका लहानशा लांबुळक्या छपरीमधे अंथरलेल्या मच्छरदाणीच्या कापडावर रिकाम्या करत होते. मग ताणकाट्याच्या साहाय्याने वजन करून त्यांची बोचकी बांधली जात होती. तिथे उतरून आम्ही जेमतेम गुडघ्यापावेतो उंच असणार्‍या चहाच्या झुडुपांतून फेरफटका करत होतो. तेवढ्यात आमच्या सहलप्रणेत्याने प्रश्न केला. या झुडुपांचे वय काय असेल? मग कोणी सहा महिने, कोणी पाच वर्षे तर कुणी तब्बल दहा वर्षे तरी असल्याचे सांगू लागला. तेव्हा त्यांनी त्या चहामळ्याच्या स्थापनेची घोषणा करणार्‍या पाटीवर लक्ष वेधले. १८८८. म्हणजे तो मळा १८८८ मधे लावण्यात आलेला होता. ते म्हणाले की चहाच्या झुडुपांचे वयही सामान्यतः तेवढेच असते. म्हणजे १००-१२५ वर्षे. जेमतेम गुडघ्यापावेतो पोहोचणार्‍या त्या प्रत्येक झुडुपाचे वय आमचे आज्जी-आजोबा शोभावेत असे होते. आम्ही मात्र त्या माहितीपासून अनभिज्ञ राहून, मळ्यात मुक्तपणे विहरत होतो.

मग तिथून निघून आम्ही यथावकाश जेवायच्या वेळेपावेतो हॉटेल जगजीत, मिरीक इथे येऊन पोहोचलो. जेवलो. थोडीशी विश्रांती घेऊन फेरफटका मारण्याकरता तयार झालो. असे कळले की मिरीकमधे एक तलाव पाहण्यासारखा आहे. तिथे बोटिंगही करता येते. ते पाच वाजता बंद होते. तसेच एक बुद्ध मठही आहे. मात्र तोही संध्याकाळी पाच वाजता पर्यटकांसाठी बंद करतात.

तेव्हा प्रथम तलावावर जाण्याचा निर्णय झाला. तलाव ऐटदार होता. पाणी स्वच्छ होते. नयनमनोहर आणि देखण्या देखाव्यांत तो शोभून दिसत होता. चार जणांच्या, पायडलिंग करून चालवण्याच्या बोटीस, अर्ध्या तासाचे चाळीस रुपये घेत होते. शिवाय मार्गदर्शक सोबत घेतल्यास वीस रुपये जास्तीचे. आम्ही आठ जण होतो. पैसे भरून दोन बोटी ताब्यात घेतल्या. मार्गदर्शकही घेतले. वातावरण काहीसे गारच असल्याने परिश्रम जाणवत नव्हते. साधारण अर्धा तलाव पार होत होता, तेवढ्यात आमचा मार्गदर्शक म्हणाला की पलीकडल्या तीरावर जो उत्सव सुरू असलेला दिसत आहे, तो देवीच्या नवरात्रानिमित्त होणारा देवीभागवताच्या समारोपाचा आहे. वर डोंगरावर देवीचे मंदिर आहे. तुम्हाला जायचे असेल तर तलावावरील पुलावरून जाऊन पाहून येऊ शकता.

मी त्याला विचारले की, हीच बोट आपण पलीकडच्या किनार्‍यावर उभी करू. आम्ही दहा मिनिटांत वर देवीचे दर्शन घेऊन येतो. तू इथेच थांबून राहा. आम्ही परत आल्यावर मग परत जाऊ. असे करता येईल का? तो तयार झाला. मग आम्ही दुसर्‍या बोटीवर फोन करून विचारणा केली. तिच्यावरचा मार्गदर्शक तयार होईना. तो म्हणू लागला की आपण वेळेच्या आत परतू शकणार नाही, दंड होईल. त्याला कसाबसा तयार केला. आम्ही दुसर्‍या किनार्‍यावर उतरलो. वर देवीचे दर्शन घेऊन आलो. त्याच्याही वर काही पायर्‍या होत्या तिथे एक दत्तासारखी मूर्ती दिसली. तिला चार हात होते. मस्तक मात्र एकच. पाठीमागे गाय होती. परतताना आमच्या मार्गदर्शकास विचारले तर तो म्हणाला की ती मूर्ती शिवाची आहे. त्याच्या पाठीमागे नंदी आहे. माझ्या आठवणीत मात्र नंदी कायमच शिवासमोर उभा राहत असे. दत्ताच्या पाठीमागे गाय (कामधेनू) उभी असते त्याप्रमाणे, शिवाच्या पाठीमागे नंदी उभा आहे, अशी ही एक आगळी वेगळी मूर्ती आम्ही इथे पाहिली होती. आम्ही नौकानयनतळावर परतलो तेव्हा तासभर उलटून गेलेला होता. म्हणून आमच्याकडून दंड म्हणून चाळीस रुपये प्रती नाव, जास्तीचे वसूल करण्यात आले. आम्हाला मिळालेल्या अनुभूतीच्या मानाने, त्या दंडास आम्ही अगदीच क्षुल्लक दंड समजून लगेचच भरून टाकला. मग आमच्यापैकी काहींनी घोडेस्वारीचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही हॉटेलला परतलो.

परतताना तळ्याच्या पाळीवर नेहमीच दिसणार्‍या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, टपर्‍या इत्यादी दिसू लागल्या. मात्र त्यातले खाद्यपदार्थही वेगळेच होते. विशेष लक्ष वेधून घेतले ते “मोमों”नी. मोमो म्हणजे आपण करतो तसे उकडीचे मोदक किंवा करंज्या. मात्र त्यात सारण भरतात ते भाजीचे. भाजी असते स्क्वॅश नावाच्या फळांची. तांबड्या भोपळ्यासारख्या दिसणार्‍या स्क्वॅशच्या भाजीची चव तिखट आणि रुचकर असते. खाण्याची इच्छा अनिवार होत होती. पण सहल नुकतीच कुठे सुरू होत होती. अशात, हातगाडीवर खाल्लेले पचेल न पचेल अशा शंकेमुळे, केवळ फोटोच काय ते काढले. मोमो मांसाहारीही असतात. त्याचप्रमाणे मोदक व करंज्यांसारखेच त्यांचे उकडलेले आणि तळलेले असे दोन्हीही प्रकार पुढे पाहण्यात (आणि हो, खाण्यातही) आले. मात्र मोदकासारखा गोड मोमो काही सिक्कीमभर कुठेही दिसला नाही.

हॉटेलपासून दुसर्‍या दिशेला बौद्ध मठ होता. पाच वाजून गेलेले होते. सूर्य मावळतीला आलेला होता. मठातून परतलेले लोक आम्हाला भेटत होते. डोंगरावर चढून जाऊन पंधरावीस मिनिटांत तिथे पोहोचता येते. मठ बंद झालेला असल्यास, मुंबईहून आलो आहोत असे सांगितल्यास, उघडूनही दाखवतात असे कळले. म्हणून मग वर जाण्याचा निर्णय झाला. ज्यांना कंटाळा आलेला होता ते थांबले. आमच्यातील उत्साही लोक पुढे झाले. आम्ही त्यांच्या पाठी निघालो.

डोंगरावर चढून जायला मजा आली. मठ बंद झालेला होताच. तरीही एका प्रमुख भिख्खूंना विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला तो पाहण्यास खुला करून दिला. इथले मठ हे, प्रामुख्याने धर्मप्रसाराची गुरूकुल पद्धतीने चालणार्‍या शाळाच असतात. मुख्य सभागृहात प्रवेश करताच समोरच्या बाजूच्या भिंतीलगत बुद्धाची मूर्ती. सोन्याची वाटावी अशी पिवळ्या धमक रंगाची. मूर्तीसमोर सात (आईस्क्रीमचे कप वाटावेत अशा) भांड्यांमधे पाणी ठेवलेले असते. तेलाचे दिवे तेवत असतात. सर्वत्र कमालीची स्वच्छता, टापटीप, नीरव शांतता आणि पावित्र्य. मूर्तीसमोर शे-दोनशे लोकांना आडव्या-उभ्या ओळींच्या सारणीत व्यवस्थित बसता यावे अशी जागा. प्रत्येकाला स्वतंत्रपणे मांडी घालून, जमिनीवर, बुद्धमूर्तीकडे तोंड करून बसता येईल एवढी जागा. प्रत्येकासमोर प्राथमिक शाळेत शोभतील असे उतरते चौरंग मांडलेले असतात. समोर, विद्यार्थी आणि बुद्धमूर्ती यांच्यामधे गुरू उभे राहून शिकवू शकतील अशी विस्तीर्ण जागा. चहुबाजूंच्या भिंतींवर बुद्धाच्या जातककथांमधील प्रसंग चित्रित केलेले दिसून येतात. आम्ही गेलो ती वेळ संध्याकाळची असल्याने सर्व दालन रिकामेच होते. आम्ही "बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि" असा मंत्र म्हटला आणि भारलेल्या मनाने मठाचा निरोप घेतला. मठाच्या पाठीमागच्या दरवाजातून मिरीक तळ्याचे दृश्य सुंदर दिसत होते.
.
या मालिकेतील इतर लेख खालील दुव्यांवर सापडतील.

सिक्कीम सहल-१: पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/15650
सिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15651
सिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15652
सिक्कीम सहल-४: चहाचे मळे http://www.maayboli.com/node/15653
सिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था http://www.maayboli.com/node/15654
सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन http://www.maayboli.com/node/15670
सिक्कीम सहल-७: बनझांकरी धबधबा http://www.maayboli.com/node/15678
सिक्कीम सहल-८: ऐकत्या कानांची खिंड http://www.maayboli.com/node/15686
सिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी प्रवास http://www.maayboli.com/node/15687
सिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान http://www.maayboli.com/node/15688

http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users