सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन

Submitted by नरेंद्र गोळे on 26 April, 2010 - 00:55

गान्तोक-१: शहरदर्शन

उंच पर्वतावर वसलेले असल्याने गान्तोक शहर उंचसखल जमिनीवर बांधलेल्या घरांतून नांदते आहे. शेजारच्या घरी जायचे असेल तरी कित्येकदा शे-पन्नास पायर्‍या चढाव्या-उतराव्या लागतात.

मुख्य रस्ते अरुंद आणि वर्दळीचे होते. मारूती व्हॅन, अल्टो अशा प्रकारच्या चार चाकी वाहनांनाच केवळ "टॅक्सी" म्हणून वाहतूक करण्यास परवानगी होती. टॅक्सीत केवळ चारच प्रवासी बसू शकत. उतारचढावाचे रस्ते असल्याने एखादी टॅक्सी जरी उभी राहिली, तर रस्त्यातील वाहतूक तुंबून राही. याकरता रस्त्यांवर कुठेही टॅक्सी उभी करण्यास मनाई होती. टॅक्सी विवक्षित जागीच उभी करावी लागत असे. आमच्या हॉटेलला एक गॅरेजसदृश गाळा प्रवेशद्वारानजीकच मोकळा सोडलेला होता. टॅक्सी बोलावली असता तिथेच उभी करत. रस्त्यावर नाही. पुढे असे लक्षात आले की बहुतेक घरांना तशा प्रकारची वाहने थांबवण्याची जागा असे. अशा प्रकारच्या नियमांमुळे थांब्याच्या जागा माहीत नसल्यास लांब लांब अंतरे पायीच चालावी लागतात. असेच एकदा आम्ही महात्मा गांधी रोडपासून आंबेडकर रोडपर्यंत पायी आलेलो होतो. टॅक्सीच्या शोधात. मग आमचे हॉटेल अगदीच जवळ आल्याने टॅक्सीचा नादच सोडावा लागला होता.

त्यामुळे, डाव्या बाजूच्या चित्रात दिसतात तशा प्रकारच्या जागा टॅक्स्या उभ्या राहण्याकरता निर्माण केलेल्या असत. तिथेच टॅक्सी मिळू शके. त्यांची ठिकाणे स्थानिकांकडून आधीच माहीत करून घेणे चांगले. उजव्या बाजूस घूम बुद्धमठ दिसत आहे. दार्जिलिंगमधे स्थलदर्शन करत असतांना अनेकदा आम्ही घूम बुद्धमठासमोरून, स्थानकासमोरून जात असू. घुमून-फिरून पुन्हा त्याच त्याच जागेवर पोहोचत असल्यामुळेच त्या भागाचे नाव घूम पडले असावे असा माझा संशय त्यामुळे पक्का झाला. प्रत्यक्ष घूम मठाचे दर्शन मात्र २२ तारखेस दार्जिलिंगहून गान्तोक प्रवासास निघालो तेव्हा सकाळी सकाळीच घेतले. या मठाजवळ आम्हाला स्थानिक विणीच्या विविधरंगी आकर्षक लोकरी शाली मिळाल्या. भावही माफकच होते. इथे केलेली सर्वच खरेदी उत्तम ठरली.

आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो त्या सिक्कीम रिट्रीट हॉटेलचे प्रवेशद्वार डॉ.आंबेडकर रस्त्यावर तळ मजल्यावर आहे. प्रवेशाशी उभे राहून हॉटेलकडे पाहिले असता ते दोन मजली भासते. आम्ही ज्या खोलीत राहिलो होतो त्या खोलीत जाण्याकरता स्वागत-कक्षापासून एक मजला खाली जावे लागे. खोलीतील खिडकीतून एक रस्ता दिसे. तो हॉटेलच्या पाठीमागचाच रस्ता होता. मात्र मी त्या रस्त्यावर जाऊन पाहिले तेव्हा आमची खोली दुसर्‍या मजल्यावर दिसत होती. इथे सर्वसाधारणपणे सर्वच घरांचे बांधकाम असेच असे.

अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत चालावी म्हणून जे अनेक उपाय सिक्कीम सरकारने योजलेले आहेत त्यात पुढील इशार्‍याचाही समावेश आहे. "इशाराः जो कुणी झरे आणि नाल्यांमधे केरकचरा आणि बांधकामातील मलबा इत्यादी टाकेल, त्यास रु.५,०००/- दंड किंवा सहा महिनेपर्यंतची कैद अथवा दोन्हीही होऊ शकेल. – हुकुमावरून. शहरी विकास आणि गृहनिर्माण खाते, सिक्कीम सरकार." असा सज्जड दम भरल्यावरही असले अपराध करणारे अजिबात नव्हतेच असे नाही. तरीही त्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात आटोक्यात होते असे गान्तोक शहरात पायी फिरत असता, जागोजागी जाणवत होते.

तसेच गान्तोकमधे कुठल्याही दुकानाला "दोकान" म्हणत असत. आम्ही आपले दोन कान असलेला हा कुठला प्राणी बुवा? म्हणून दुकानाला दोकान म्हणण्याच्या प्रथेची जाता-येता टिंगल करत होतो. तरीही आमच्या नागपुरी संस्कृतीत अगदी चपखल बसणारा पानाचा ठेला, गान्तोकमधेही आपला रुतबा राखून असल्याचे पाहून उगाचच काहीतरी ओळख लागल्याचा आनंद झाला. एरव्ही मुंबईत राहायला लागल्यापासून (त्यालाही आता सुमारे तीस वर्षांचा काल लोटला आहे) परंपरागत प्रकारचा पानाचा ठेला क्वचितच आढळत असे. गुटखा, खर्रा, चिंगमवालेच जास्त. नागपूरला मात्र काळाचा मुलाहिजा राखणारे नाव असणारे ठेले, कालानुरूप अवश्य पाहायला मिळतात. ज्यावेळी बोफोर्स तोफांतील गैरव्यवहार उघडकीस आलेले होते त्या काळात मला नागपुरात माझ्या घराकडेच "बोफोर्स" नामक पानाचा ठेला असल्याचा शोध लागला होता.

अशा डोंगर-उतारांवर वसलेल्या गान्तोक शहरात, मोठी सपाट अशी जाग मिळणे प्रायः दुरापास्त होते. तरीही ज्या काही मोजक्या जागी अशी प्रशस्त ठिकाणे सापडतात, त्या आहेत महात्मा गांधी मार्ग, पाल्जोर स्टेडियम आणि बुद्ध मठ. सुदैवाने या तिन्ही जागा व्यवस्थित पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. आमच्या हॉटेलपासून पंधरा-वीस मिनिटांच्या पायी चालण्याच्या अंतरावर महात्मा गांधी मार्ग असल्याने तो वारंवार जाऊन नीट पाहता आला. पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने नीट बांधलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर वाहनांना मनाई आहे. वर्षांतले केवळ काही दिवसच स्वच्छ सूर्यप्रकाशात नाहणार्‍या गान्तोक शहरात, कोवळे पिवळे ऊन पडलेले असल्याने लोक उत्सवी वातावरण असल्यासारखे बाहेर पडलेले असतील, ही आमची अपेक्षा अनपेक्षितरीत्या फोल ठरली. वर डावीकडच्या महात्मा गांधी रोडच्या चित्रात सकाळी ११०० वाजता एकही माणूस प्रकाशचित्रात प्रकटलेला दिसत नाही आहे. मात्र त्या रस्त्याच्या दुभाजकानजीक ठायीठायी ठेवलेल्या बाकड्यांवर फुरसतचंद लोक मजेत बसून विहार करत असल्याचे (पक्षी, उन्हे खात असल्याचे) दिसून येत होते. दुकाने मुख्यतः गरम कपड्यांची, प्रकाशचित्रण साहित्याची, पर्यटनविषयक आणि तत्समच दिसत होती.

पाल्जोर स्टेडियम जवळच आमचे हॉटेल सिक्कीम रिट्रिट असल्याने प्रभातफेरी-सायंफेरीत ते चहुबाजूंनी पाहता आले. महात्मा गांधी मार्गाकडून पाल्जोर स्टेडियमकडे येणारा रस्ता पीएस रोड म्हणून ओळखला जातो. याच रस्त्यावर सिक्कीम सरकारची अनेक महत्वाची कार्यालये आहेत. अनेक हॉटेल्स आहेत. याच रस्त्यावरून पाल्जोर स्टेडियमचे अतिशय देखणे विहंगम दृश्य पाहता येते.

रांका बुद्धमठाची जागाही अशीच प्रशस्त सपाट असल्याचे आढळून आले. इथेच आम्हाला लोण्याच्या दिव्यांची पुढील जाहिरात दिसून आली. "लोण्याचे दिवे बुद्धाला, धर्माला आणि संघाला पारंपरिकरीत्या अर्पण करण्यात येतात. जेव्हा आपण लोण्याचे दीप उजळतो तेव्हा आपण आपल्या कृतीचे श्रेय सगळ्याच संवेदनाक्षम जीवांच्या प्रबोधन आणि सौख्याकरता समर्पित करत असतो. प्रत्येक दिव्याची किंमत, लहान=रु.५/-, मध्यम=रु.१०/-, मोठा=रु.१००/-. या सर्व लोण्याच्या दिव्यांच्या विक्रितून मिळणारा पैसा मठाच्या इंधन आणि अन्नविषयक गरजांच्या पूर्ततेकरता वापरला जातो."
.
या मालिकेतील इतर लेख खालील दुव्यांवर सापडतील.

सिक्कीम सहल-१: पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/15650
सिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15651
सिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन http://www.maayboli.com/node/15652
सिक्कीम सहल-४: चहाचे मळे http://www.maayboli.com/node/15653
सिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था http://www.maayboli.com/node/15654
सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन http://www.maayboli.com/node/15670
सिक्कीम सहल-७: बनझांकरी धबधबा http://www.maayboli.com/node/15678
सिक्कीम सहल-८: ऐकत्या कानांची खिंड http://www.maayboli.com/node/15686
सिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी प्रवास http://www.maayboli.com/node/15687
सिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान http://www.maayboli.com/node/15688

http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users