पांढरा रस्सा

Submitted by लालू on 15 April, 2010 - 12:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो किंवा २-३ पाऊंड - मटण किंवा चिकन (हाडांसहित)
२ मध्यम आकाराचे कांदे
१०-१२ काळे मिरे
७-८ लवंगा
३-४ दालचिनीचे तुकडे (१ इन्च लांबीचे)
३-४ तमालपत्र
१ चमचा उभे कापलेले आले.(julienne cut)

चिकन/मटणाच्या तुकड्यांना लावण्यासाठी वाटण-
२ इन्च लांबीच्या आल्याचा तुकडा
५-६ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
२ मोठे चमचे - दही
मीठ

रश्श्याचे वाटण-
१ लहान वाटी - सुके खोबरे
२ मोठे चमचे - खसखस
१ मोठा चमचा - पांढरे तीळ
७-८ वेलच्या
१/२ वाटी - काजू
१ मोठा चमचा - लाल सुक्या मिरच्यांच्या बिया

इतर
मीठ
५-६ कप पाणी
१ मोठा चमचा तेल
१ मोठा चमचा तूप

क्रमवार पाककृती: 

-चिकन किंवा मटणाचे तुकडे धुवून त्याला मीठ आणि वाटलेले आले-लसूण आणि दही लावून किमान अर्धा तास मुरू द्यावे.

-रश्श्याच्या वाटणसाठी सुके खोबरे, तीळ, खसखस थोडे भाजून घेऊन त्यात वेलची, काजू, सुक्या मिरच्यांची बी घालून वाटून घ्यावे. हे वाटण बारीक व्हायला हवे. बाकीचे जिन्नस आधी कमी पाण्यात वाटून मग त्यात काजू घालून पुन्हा वाटले तरी चालेल.

- कांदे उभे पातळ चिरुन घ्यावेत. पातेल्यात तेल, तूप टाकून त्यावर मिरे, लवंगा, दालचिनी, तमालपत्र टाकून मग कांदा आणि उभे कापलेले आले टाकावे व परतून घ्यावे.

- मग मॅरिनेट केलेले चिकन वा मटणाचे तुकडे टाकून नीट सवताळून घ्यावे. त्यात पाणी टाकावे. तुकडे बुडून वर २-३ इन्च पाणी राहिले पाहिजे. मंद आचेवर शिजवावे.

- चिकन्/मटण शिजल्यावर रश्श्याचे वाटण घालून चांगली उकळी आणावी. दाट वाटल्यास थोडे पाणी घालावे व चवीप्रमाणे मीठ घालावे.

हा रस्सा नुसता प्यायला चांगला लागतो. साध्या भातावरही घेता येतो.

paandhara.jpg

प्रकाशचित्र - अनिलभाई.

वाढणी/प्रमाण: 
६ ते ८ लोकांसाठी
अधिक टिपा: 

- मटण /चिकन कुकरमध्येही शिजवून घेता येते.
- हा रस्सा अति तिखट नसतो. आवडत असल्यास मिरचीच्या बी चे प्रमाण वाढवू शकता, तसेच हिरव्या मिरच्या उभ्या शिरुन टाकता येतात.
- थोडे पाणी आणि थोडा चिकन ब्रॉथही घालता येईल.
-'मराठा दरबार पांढरा रस्सा मसाला' मिळतो. मी वापरुन पाहिलेला नाही.
- याच्या शाकाहारी प्रकारात (बटाटे, फ्लावर, दुधी इ. घालता येते (म्हणे!))

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक कोल्हापुरी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, ते न्यूट्रिला सारखं असतं ते सोया नां हो? मी असं ऐकून आहे की ज्यांना मांसाहार सोडायचा असतो ते लोकं हे खातात. कारण दिसताना ते चिकन/मटण सारखंच दिसतं. ते ह्यात घातलं तर चालू शकेल कां?

मी पनीर घालायचा विचार करत होते. माझा निषेध कोण कोण करतंय?<<<<<<मंजु,चिकन/मटणाच्या जोडीला पनीर घातलेस तर मी येइन हादडायला Proud निषेधाचं मागाहून बघता येइल Lol

खुद्द कोल्हापूरात शाकाहारी पांढरा रस्सा मिळतो (त्याशिवाय मी कसा खाल्ला असता ? )
पण हा रस्सा नुसताच असतो. त्यात काहिही घातलेले नसते. (निदान हॉटेलमधे देतात, त्यात काही नसते ) तरीपण बटाटे, पनीर वापरता येईल.
आ.डो, ते सोयाबीन चंक्स वगैरे पण मी खात नाही. कितीही समजावलं, तरी मनाला पटत नाही, कि ते शाकाहारी आहे म्हणून !!!

मंजूडी, मी ही पनीरचा ऑप्शन इथे लिहिणार होते (बटाट्यांपेक्षा बरं) पण लालुच्या मनाचा विचार करुन गप्प बसले झालं. Wink

शाकाहारी करायचा असेल तर व्हेजिटेबल ब्रॉथ घालून पहा.

हा खरं तर सूपसारखाच प्रकार आहे. चिकन मटण शिजवलेल्या पाण्यालाच चव असते. रश्श्याला ती चव येते. त्यातल्या तुकड्यांना खरं काही फारशी चव नसते. मी ते काढून कधीकधी वेगळ्या मसाल्यात घालते.

कोल्हापूरला मिळतो त्यातही तुकडे नसतात, पण दिनेश तुम्ही नक्की शाकाहारीच खाल्लाय ना? Lol

>>>>आणि सवताळून घेणे, म्हणजे काय, हे बाकि कुणाला समजणे कठीण आहे !!!
का बरं? किती नेहमीच्या वापरातला शब्द आहे हा! 'सवताळलेले चणे, स. डाळ,' असे शब्द बर्‍याचजणांनी ऐकले वापरले असतील.

बटाटे, सुरणाचे काप, फणस किंवा वाटल्या डाळींचे गोळे घालून वाटीभर वेगळा रस्सा करून खाईन. निषेधवाले निषेध करोत. Proud

लालू, आता शंका यायला लागलीय. ओपल मधे खाल्ला होता, आता त्यांच्या किचनमधे जाऊन बघायला हवे !!
मृण्मयी, हा खास कायस्थी शब्द आहे. त्यातही काहि पदार्थांसाठीच तो वापरतात.

आत्ताच चिकन घालूनच हा रस्सा केला . झक्कास झाला होता , अजिबात उरला नाहीये . Happy खूप धन्यवाद .
आता तांबड्या रश्श्याची सुद्धा कृती येऊ दे . Happy मी जुन्या मायबोलीवरची पर्टूची कृती वाचलीये , तसाच बनवायचा की काही बदल आहेत ?

लालू, हा पांढरा रस्सा पनीर, बटाटा घालून केला होता गेल्या आठवड्यात! अतिशय ''उंगली चाट के'' झाला होता. मी आता ह्या रश्शाच्या प्रेमात पडले आहे!! Happy

Pages