पुण्यातील म. सा. स. ग्रंथप्रदर्शन - २०१०

Submitted by हर्ट on 29 March, 2010 - 00:14

नंदनने सुचवल्याप्रमाणे मी इथे हा बीबी उघडत आहे जेणेकरुन त्या बीबीवर भेट न देत असलेली मंडळी चटकन इथे येऊन लिहितील.

मराठी साहित्य संमेलन, ग्रंथप्रदर्शन -२ ०१०, पुणे इथे अजून पुस्तकांची विक्री सुरु आहे का? कुणीकुणी भेट दिली? कुठली पुस्तके विकत घेतलीत? नवीन पुस्तके कुठली घेतली? नवीन काय काय होते.. हे सर्व लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रंथप्रदर्शन छान होते.. भरपूर स्टॉल्स होते.. प्रकाशकांच्या ठेल्यांपेक्षा पुस्तक विक्रेत्या दुकानांचेच ठेले अधिक चांगले होते.. सासंबद्दल नंतर सविस्तर लिहीन (आज सोमवार सकाळ Sad ).. ही मी प्रदर्शनात घेतलेल्या पुस्तकांची यादी. खानोलकर जे नव्हते ते सगळे घेतले. नारळीकर भाच्यासाठी.. पुढे जाउन तो बरा वाचक व्हावा ही इच्छा!! Happy

1. कहाणी मानव प्राण्याची – नंदा खरे
2. बहिष्कृत भारत आणि मूकनायक – बाबासाहेब आंबेडकर (केवळ १५० रुपयात A२ पानाच्या आकाराचे हे पुस्तक शासकीय मुद्रणालयाने प्रकाशित केलेले आहे आणि संग्राह्य नक्कीच)
3. Slavery – Volume I and II – Mahatmaa Jyotiba Phule (पुन्हा शासकीय मुद्रणालयः केवळ ५० रुपये)
4. बखर बिम्मची – जी ए कुलकर्णी
5. काजळमाया – जी ए कुलकर्णी
6. लांडगा आला रे आला आणि इतर गोष्टी – लिओ टॉलस्टॉय
7. यक्षांची देणगी – जयंत नारळीकर
8. प्रेषित – जयंत नारळीकर
9. वामन परत न आला – जयंत नारळीकर
10. व्हायरस – जयंत नारळीकर
11. अभयारण्य – जयंत नारळीकर
12. राखी पाखरु – चिं त्र्य खानोलकर
13. अजगर – चिं त्र्य खानोलकर
14. कोंडुरा – चिं त्र्य खानोलकर
15. त्रिशंकू – चिं त्र्य खानोलकर
16. गारंबीचा बापू – श्री ना पेंडसे
17. हद्दपार – श्री ना पेंडसे
18. आगरकर – य दी फडके
19. बेस्ट ऑफ जयवंत दळवी – संपादन सुभाष भेंडे
20. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
21. श्रीपाद अमृत डांगे – विविध विचारसंग्रह – संपादन बानी देशपांडे/रोझा देशपांडे
22. पालखी – दि बा मोकाशी
23. दुपानी – दुर्गा भागवत

मला हेवा वाटतोय तुमचा Sad
मीही काही पुस्तकं मागवली आहेत. पण स्वत: चाळून, परखून पुस्तकं घेणं यासारखा आनंद नाही. काही काही रत्नंही सापडून जातात अचानक Happy घरी आल्यावर त्या नव्या पुस्तकांना कव्हर चढवताना कित्ती मस्त वाटतं ना?
मला या आनंदासाठी मेपर्यंत थांबावं लागणार Sad

१. ज्योत्स्ना- माधुरी पुरंद-यांचा संच.अतिशय उत्तम संच आहे. डोळे झाकुन मुलांसाठी घ्याच.
२. ज्योत्स्ना + मनोविकास- लेकीसाठी अजून १०-१२ पुस्तकं (गणितातील, विज्ञानातील गमतीजमती, अरविंद गुप्तांची पुस्तकं, बिगबँग, मुलांसाठी ज्ञानेश्वर इतर इतर)
३. वाचु आनंदे- (अजून) एक संच.
४. गंधर्व, डोह- (गंधर्व सुचवल्याबद्दल टण्याचे अनेक आभार)
५. समग्र खानोलकर आणि नारळीकर टण्याने उल्लेखिलेले + दुस्तर हा घाट/थांग
६. समग्र एलकुंचवार
७. विंचुर्णीचे धडे + निरगाठी/चंद्रिके गं, सारिके गं
८. सोन्याचा पिंपळ
९. अठरा लक्ष पावलं - मोकाशी
१०. पाचट (माबोमुळे)
११) नंदा खरे- नांगरल्याविण भुई, दगडावर दगड विटेवर वीट, कहाणी उत्क्रांतीची. (आभार: स्लार्टी/चिनूक्स. पण अंताजीची बखर मिळाले नाही)
१२. मिळुन सा-याजणी अंक. (तिथे पुरुषभान नावाचे एक उत्तम पुस्तक चाळले. घ्याच.) anudon ने संयुक्तावर मिसा चे लेख टाकुन टाकुन उद्युक्त केले. Happy त्याबद्दल तिचे आभार.
१३. धामणस्कर कविता (ट्युलिप ने स्वातीला सुचवलेले Happy
१४. अनूपरागविलास १ आणि २- कुमार गंधर्व
१५. संगीतातील माणिकमोती
१६. शिक्षणप्रवाहाच्या उगमापाशी- सुचिता पडळ्कर

मेहता ४० टक्के सूट देत होते म्हणे. पाह्यले नाही.
(बाकी प्रदर्शन उत्तम होते. कार्ड चालत नसल्यामुळे गोची होते. )
इतके स्टॉल आहेत की सर्व पाहूनही होत नाही. साईटमॅप नाही त्यामुळे आपल्याला हवे असलेले प्रकाशन शोधता शोधता वाट लागते.

रैना, गंधर्व उचललेस का? Happy मस्तच.. माझ्यामुळे गंधर्वचा बराच खप झाला असावा.. प्रभुदेसाई वरुन मला आशिर्वाद देत असतील Happy मी मौजेच्या/मायबोली (आपली साईट नव्हे, पुस्तकाचे प्रदर्शन) स्टॉलमध्ये उभा राहुन लोकांना हे पुस्तक घ्या असा फुकटचा सल्ला देत होतो. एक बाई आल्या व हे अगदी आयुष्याचे सारच असते असे एका पुस्तकाबद्दल म्हणाल्या (त्या पुस्तकाच्या कव्हरवरुन ते 'सूप' असावे असे वाटले. मी त्यांना वपुंच्या पुस्तकांकडे घेउन गेलो Proud )

समग्र एलकुंचवार घेतलास म्हणजे धाडसच आहे (ते पार्टी वाचूनच एकदा गरगरलो होतो Happy )

धन्स, बी. निवडक १०त नोंदवून ठेवला आहे.

@ रैना - 'धामणस्कर कविता' म्हणजे 'बरेच काही उगवून आलेले' व्यतिरिक्त/सह अन्य कविता का?

मी खरं म्हणजे ज्ञानेश्वरी फॉर डमीज शोधत होते. डमीज बरेच दिसले. इतकी जडजड पुस्तकं होती च्यामारी की त्यापेक्षा वरीजीनल ज्ञानेश्वरी सोपी पडावी कदाचीत.
अरभाटाने खूप सुंदार कवितासंग्रह घेतलेत. अरभाट इथे यादी टाक रे.
वरील बरीच पुस्तकं माबोमित्रमैत्रीणींच्या आर्डरीनुसार आहेत.

हो टण्या, तुझ्यामुळे मी ४ तरी गंधर्व घेतलेत. Wink तुझे आभार मानायचे राहिलेच.
टण्याने गंधर्व हे अप्रतिम पुस्तक सुचवलय ते घ्याच.

हो नंदन तेच रे.

अरे हो भाषांतरीत लिटिल प्रिन्सही घेतलं इरासाठी

टण्या- मौजेच्या त्या भयंकरगर्दीच्या स्टॉलमध्ये एक बाई नव-याला पुलंपेक्षा त्यांची बायकोच चांगलं लिहीते तर समग्र सुनितादेशपांडे घेऊ असं सांगत होती. मीही चोंबडेपणा करुन तेच सांगीतलं तिच्या नव-याला.
Happy

वा!!

टण्या, प्रेषितची ही कितवी आवृत्ती आहे रे? माझ्याकडे सगळ्यात पहिली आवृत्ती आहे त्या पुस्तकाची. नारळीकरांनी २०२५ सालची परीस्थिती वर्णल्याप्रमाणे प्रत्यक्षात येईल असं खरोखरंच वाटतं नाही?

टण्या दि. बांचं तुकारामांवरचं एक पुस्तक आहे 'आता आमोद सुनासि आले' ते बरेच दिवस शोधतेय. ते दिसलं का? पालखी छान आहे. नंदा खरे यांची बरीच पुस्तकं घेतलीत असं दिसतंय. काय लिहीतात ते / त्या.. म्हणजे कथा - कादंबरी आहे की ललित - वैचारीक वगैरे.

रैना,
सोन्याचा पिंपळ सुंदर. त्यांची बाकीची ३ पुस्तकं पण छान आहेत. खानोलकर, मोकाशी म्हणजे काय विचारायलाच नको.
गंधर्व कोणाचे आहे गं?

रैना, लेखक आणि प्रकाशनाचे नावही दे की.
मी दिलेल्या यादीत (जी मी माबो वरूनच बनवली होती.:)) प्रकाशकांची नावे नसल्याने दिरांना त्रास पडला पुस्तकं शोधायला. परत तसं नको व्हायला.

ज्योत्स्ना- माधुरी पुरंद-यांचा संच.>>> या अनुवादित कथांचा संग्रह आहे का? अनुवाद आपल्या भाषेत आहेत की अगदी शब्दशः भाषांतर आहे. लेकीचं मराठी जरा हिं-म शब्दशः भाषांतरच आहे, त्यात अजून भर नको. Happy

मी नचिकेतासाठी पुस्तकं घेतली. ज्योत्स्ना प्रकाशन- पुरुषोत्तम धाक्रस यांची 'न संपणार्‍या गोष्टी'चे सात भाग आणि माधुरी पुरंदरेंची ५ पुस्तकं घेतली, चित्रासहित. त्याला जस्ट मराठीची अक्षरओळख होत आहे, पण शब्द जुळवून वाचायला आवडतात. जे येत नाहीत, ते मी वाचून दाखवते. पण एक आख्खी गोष्ट आपण एकटे वाचू शकतो, हे त्याला 'भारी' वाटतं फार Happy 'शिवाजी', 'हनुमान', 'रामायण' अशी मुद्दामच नाही घेतली. टीव्हीवर ओव्हरडोस झालाय त्यांचा. ही पुस्तकं आजूबाजूच्या मुलांच्या करामतींची, मुलांच्या विश्वातली आहेत, म्हणून मुद्दाम घेतली. विंदांचा 'अजबखाना'ही घेतलं.

भाच्यासाठीही मुद्दाम पु.ल किंवा इतिहासाचं न घेता सुधा मूर्तींचं घेतलं.

एकाच लेखकाचा समग्र संचही उपलब्ध होता. नारळीकर, सुनिताबाई, एलकुंचवार वगैरे. मस्त होते तेही. खूप पुस्तकं संपलीही होती.

उत्कर्षच्या स्टॉलवर विंदा समग्र होते. पण त्या माणसाचा (श्री. जोशी) सकाळीच मा.मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो आल्याने, त्याला पुस्तकविक्रीत काहीही रस नव्हता Angry 'अजबखाना', 'एटू लोकांचा देश' आहेत का विचारल्यावर, 'मिरासदार संपलेत' असं उत्तर मिळालं Uhoh पण ती पुस्तकं समोरच पडली होती, त्यामुळे घेता आली. आपल्यालाच गरज, नाही का?

पण प्रदर्शन भव्य होतं. उलाढाल पाच-सात कोटींवर पोचली असं म्हणतात! हे ऐकून मस्त वाटलं. साईट मॅप मात्र अत्यंत आवश्यकच आहे.

मला वाटतं हा बीबी उघडून मी स्वतःचा छळ स्वतःच करवून घेतला आहे Happy दोन चार याद्या वाचूनचं मला कसेनुसे वाटले Happy आणि या सर्वांनी तिथे जाताहेत हे सांगितले देखील नाही.. मी दिली असती काही नावे Happy

मौज प्रकाशन- गंधर्व- हे टण्याच्या आईची फाईंड आहे. बाळकृष्ण प्रभुदेसाई नावाच्या लेखकाचा हा कथासंग्रह आहे. मला तरी प्रचंड आवडला आहे.

नंदा खरे बद्द्ल स्लार्ट्याने लिहीलं होतं एकदा तेव्हापासुन शोधते आहे. मी या लेखकाची एकही ओळ वाचलेली नाही, स्लार्ट्याने सुचवल्यावर डोळे झाकुन घेतलेच पाहीजे म्हणुन घेतले आहे, वाचून यो.जा. टाकते. अंताजीची बखर कादंबरी आहे. नांगरल्यावीण भुई हा ललितलेखसंग्रह आहे.

प्राची- अनुवादित नाही. मराठीच आहे.

कोणाला उपयोगीपडेल म्हणुन
शर्मिलाफडकेंनी चिन्ह प्रकाशनाचा चिन्ह २००९ घेण्यास सुचवले होते. मला तरी सापडले नाही तिथे.

पूनम हो ना. पिशीमावशी शोधत होते इरासाठी. त्या गर्दीत काय सुचायचे नाव नाही.
ग्रंथालीच्या स्टॉल वर नंदा खरे मागीतल्यावर मालकांनी अगत्याने कुठलातरी पोलीसी कथा की गुन्हेगारीची मानसिकता हातात कोंबला, आणि घ्याच म्हणुन मागे लागले होते. अशक्य आहे. Happy

बोरकरांच्या गद्यलेखनाबद्दल मला विशेष माहीत नव्हतं, पण मटातल्या ह्या लेखाप्रमाणे त्यांची
पाच पुस्तकं (अनुवाद जमेस धरून) पुनर्प्रकाशित झाल्याचं दिसतं. कुणा भाग्यवंताला ती मिळाली का या प्रदर्शनात? Happy [दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5732780.cms]

>>> त्याला पुस्तकविक्रीत काहीही रस नव्हता 'अजबखाना', 'एटू लोकांचा देश' आहेत का विचारल्यावर, 'मिरासदार संपलेत' असं उत्तर मिळालं पण ती पुस्तकं समोरच पडली होती, त्यामुळे घेता आली. आपल्यालाच गरज, नाही का?

--- अगदी, अगदी. काही वर्षांपूर्वी दादरमधल्या एका प्रसिद्ध पुस्तकांच्या दुकानात (त्यांची पुस्तकं दुकानात असतानाही) 'अवचट? लिहितात?' असा प्रतिप्रश्न ऐकण्याचे भाग्य एका स्नेह्याला लाभले होते, त्याची आठवण झाली Happy

गंधर्व माझ्या बाबांची फाइन्ड Happy

नंदा खरे हे विवेकवादी विचारांचे (रॅशनलिस्ट) आणि पर्यायाने डाव्या विचारसरणीकडे झुकलेले एक उत्तम विचारवंत आहेत. आजचा सुधारक ह्या मासिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत.

तुम्ही सगळ्यांनी इथे वर जी यादी दिलीत त्यातली काही पुस्तकं माझ्याकडे आहेत. असं वाटलं क्षणभर तरी की उगीच आपण सगळे खर्च करतोय की काय? शेअर करता आली असती तर बरं झालं असतं. काही पुस्तकं एकदा वाचण्यासारखीच असतात किंवा एखादं पुस्तक पुन्हापुन्हा वाचणार असलो तरी लागोपाठ वाचत नाही ना आपण. असो फक्त एक विचार आला म्हणून लिहीला. माबोकरांची एक सॉलिड लायब्ररी होऊ शकते Happy

छळ! सोमवारची पावसाळी , चिखलाच्या रस्त्यांची सकाळ अन ही अशी चर्चा Sad

ज्यांनी ज्यांनी पुस्तक खरेदी बद्दल लिहिलंय त्यांना सगळ्यांना योगिनी जोगळेकरांची पुस्तके वाचायला लावावीत काय Happy

योगिनी जोगळेकर Lol
माझी पुस्तकांची यादी -
रानातल्या कविता, पावसाळी कविता, पक्ष्यांचे लक्ष थवे - महानोर. रानातल्या कविता घरी आहे, पण ह्या आवृत्तीच्या शेवटी पन्नासेक पानांची विजयाबाई राजाध्यक्षांची समीक्षा आहे म्हणून परत घेतले. 'कराकरा अंग खाजवीत गिरामिण कथा आली...'चे लगोलग सार्वजनिक वाचनही केले Happy शिवाय मलपृष्ठावर महानोरांच्या कवितावहीतल्या एक पानाचे छायाचित्र.
अमृतानुभव : ज्ञानेश्वरविरचित अमृतानुभवाचे विंदाकृत अर्वाचीनीकरण - विंदांचे अष्टदर्शने वाचल्यावर हे घेण्याची इच्छा होती.
छोरी, राधा - पाडगावकर (जिप्सी मात्र मिळाले नाही.)
आदिमाया : विंदा करंदीकरांची प्रेमकविता आणि त्यांच्या काव्यातील स्रीदर्शन- संपादक : विजया राजाध्यक्ष. यालासुद्धा विजयाबाईंची समीक्षात्मक प्रस्तावना आहे.
ध्रुपद, स्वेदगंगा, एटू लोकांचा देश - विंदा. ही उत्कर्षावर मिळाली. उत्कर्षित म्हातारा मात्र अचाट आहे. त्यांच्या पत्नी शेजारी उभ्या होत्या आणि नवर्‍याने चष्मा घालावा म्हणून आग्रह करत होत्या. त्यावर त्यांनी हट्टीपणाने 'मला चष्मा लागत नसतो' असे तुसडे उत्तर दिले. मला हसायला आले, कारण घरी आजी-आजोबांचेही अशाच छापाचे संवाद होतात. म्हणून आजीबाईंना 'तुमच्याकडेही हेच संवाद का?' असे विचारले. तर त्या लगेच 'अहो, आम्ही ऐकून घेतले. पण आता नव्या पिढीच्या मुली असले ऐकून घेत नाहीत. बदल होतोय.' असे खूप आनंदाने म्हणाल्या. त्यांना इकडील काही बाफांवर आणावे असा विचार मनात तरळला. माझ्याकडे अजबखाना आधीच आहे. पण एटू लोकांच्या देशात सरवट्यांची खंग्री चित्रे आहेत. लहानपणच्या आठवणी आख्ख्या समोर उभ्या राहिल्या. ते घेतले. तसेच उपस्थित स्त्रीवर्गास 'झपताल' वाचण्यास उद्युक्त केले Happy
दिवेलागण - आरती प्रभु. 'वाट'चे टण्याकृत सार्वजनिक वाचन. 'अश्रूंनाही म्हण वाळणारा घाम, घाल आतडीचा उरास लगाम' वगैरे. कहरच.
१०० कविता - निवड कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी निवडलेल्या ५० कवींच्या १०० कविता.
गोलपिठा - नामदेव लक्ष्मण ढसाळ.
चंद्रमाधवीचे प्रदेश - ग्रेस. आशुला तिथेच ठेवलेल्या 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे'मधले कुठलेही एक पान आख्खे वाचून दाखवायचे असे आव्हानवजा आवाहन केले. ती अर्धे पान वाचू शकली. मी अजून पाव पानावर गेलो नाहीये. तिचे अभिनंदन.
कहाणी मानवप्राण्याची - नंदा खरे.

एक संध्याकाळ अपुरी पडली. पॉप्युलर, पवनाधाम, पद्मगंधा यांच्या स्टॉलवर जायचे राहूनच गेले. प्रदर्शनांमध्ये न दिसणारे नेहमीचे यशस्वी इथेही होतेच. यावर्षी निदान दिपु चित्रे आणि वसंत आबाजी डहाकेंची तरी पुस्तके ठेवायला पाहिजे होती असे प्रकर्षाने वाटले.

हा: मेल्यानो! काय छळ आहे हा. आनंद, उत्सुकता, उत्कंठा, असूया, असुरक्षितता... अशा पायर्‍या चढतच चालले आहे की मी. Happy
पण बरीच नावे कनवटीला लावली. आता त्यांचा समाचार घेऊच. हा उपक्रम करणार्‍या लोकांचे (आंबट तोंडाने) आभार. Happy

योगिनी जोगळेकरांची पुस्तके वाचायला लावावीत.. Lol यात आणखी सुमती क्षेत्रमाडे, जोत्स्ना देवधर वगैरे अ‍ॅड करा.

टण्या, रैने, माझे पुन्हा एकदा आभार माना. Proud

यावेळचे पुस्तकप्रदर्शन फारच ऑर्गॅनाईज्ड, आणि आजवरच्या प्रदर्शनांच्या तुलनेत बर्‍यापैकी कॉर्पोरेट लुक असलेले होते. जवळपास एक लाख स्क्वेअर फुटांत पसरलेले आणि पाच कोटींच्या वर उलाढाल झालेले हे प्रदर्शन. पुढल्या वेळेस, यावेळी झालेल्या थोड्याफार चुकांची, त्रुटींची दुरुस्ती करतील, अशी आशा. उदा. साईट मॅप, प्रकाशकांची नावे आणि स्टॉल नंबर इत्यादींचा तपशील प्रवेशद्वाराशीच मिळेल अशी व्यवस्था आवश्यक होती.

मी दोन दिवस प्रदर्शनात प्रचंड फिरलो. पुस्तके मात्र कमी घेतली. (आधीच घेतलेली पूर्ण वाचून व्हायची आहेत. नेहेमीचेच दुखणे.) त्यात मेघना पेठेंची मुलाखत ऐकल्यावर त्यांच्या विचारांनी प्रचंड प्रभावित होऊन (:फिदी:) त्यांची पुस्तके, टण्याने खास सुचविल्यामुळे 'श्री. दा. पानवलकर यांची कथा' हा संपादित संग्रह, झक्कींच्या पोष्टींना मदत आणि अनुमोदन देता येण्याच्या शक्यतेमुळे ओबामावरचे पुस्तक, आणि इतर फुटकळ. टण्याने घेतली ती जयंत नारळीकरांची पुस्तके आणि जीएंच्या कथांतल्या स्थळांचा शोध घेणारे ते पुस्तक (नाव विसरलो)- ही घ्यायची राहून गेली. आता पाथफाईंडरमधून घ्यावी. अंताजीची बखर मात्र सापडले नाही.

खूप पुस्तके बघितल्यावर माझे नेहेमी होते तेच झाले. प्रचंड गोंधळ.

'रानातल्या कविता' साठी महानोरांना बरेच अपराध माफ आहेत, असं अरभाट म्हणाला. डेक्कनवरचे उत्कर्षचे दुकान हे उत्कर्षचेच का? ते म्हातारबुवा खरेच महान उत्कर्षित आहेत मग.

एटू लोकांचा देश बघून मायबोलीवरच्या काही जुन्या आठवणी आल्या. नंतर झालेल्या माय्बोलीकरांच्या जीटीजीमध्ये 'चंद्रमाधवीचा प्रदेश' मधल्या काही कविता वाचण्याचा प्रयत्न केला. शिवाय काही कवितांच्या जाहीर वाचनामुळे मजाही आली. पुस्तके सोबत असली, की कसं संपन्न, श्रीमंत वगैरे वाटत असते- याचा अनुभव घेऊन मग सारे पांगले. Happy

ता.क. - पुस्तक प्रदर्शनात चक्क मुख्यमंत्री पण आले. पुस्तके कोणती घेतली ते समजले नाही. पण प्रचंड रेटारेटी झाली. आणि 'यांना इथे कुणी बोलावले?' असा विचार करत असतानाच टण्याने ते सरळ पोलिसांसमोर म्हणूनच टाकले म्हणे.

रैने / टण्या मला हव्येत त्यातली काही पुस्तकं (वाचायला )

ही ११ मी घेतलेली -

सानियाच - नवं अशी वेळ
अपर्णाच - फॉर हिअर ऑर टू गो (खूप दिवसांपास्न वाचायच होतं)
शांता शेळके - मेघदूत
इंदिरा संत - मृद् गंध
गजल - सुरेशचंद्र नाडकर्णी
कुसुमाग्रज - निवडक कविता १ ते ५
कुसुमाग्रज - १०० कविता
आणि १८५७ चे स्वातंत्र्यसमर

***
मी गेलो तेंव्हा तिथं परिसंवाद चालू होता एकीकडे मराठी सक्तीची करावी का - करू नये असं तटक र्‍यांच मत अन् मराठी जपणे ही साहित्यीकांचीच जबाबदारी आहे असं काहीतरी चालू होतं. म्हटलं हे वाद काय आपल्याला नवीन नाहीत (माबोवर वाचतो येवढाच फरक Proud )

दुसरीकडे एक लेखक दुस र्‍या लेखकाला दिर्घकथा आवडत नाहीत म्हणजे जे त्याला येत नाही ते त्याला आवडत नाही असं काहीतरी तावातावाने बोलत (?) होते.

हे सगळं पाहून मी ग्रंथ प्रदर्शनात गेलो. बरंच झालं प्रचंड गर्दी त्यामुळं फार थोडेच स्टॉल पहाता आले. मेहतांकडूनही ४० % सुट मिळवत पुस्तकं घेतली Happy

***

मायबोलीकरांपैकी अँन्क्या भेटला. त्याच्यासोबत नाश्ता केला अन् मग ब्लॉगर अनिकेत बरोबर जेवण केल बादशाहीत..

ए हो ते खरंच आहे.
जावं की नाही उन्हाळ्याचं, लेकीला सडकुन गाडी लागते, इयरएंडींगची कामं वगैरे कारणांने विचारात होते तो शुक्रवारी साजि-याने पोस्ट टाकली की २५०च्या वर स्टॉल आहेत. मग म्हणलं मरु दे, रडगाणी काय नेहमीचीच आहेत, जावंच.आणि बरंच झालं.

अरभाटाला मी आगामी कवितेसंबंधीत कुठल्याही उपक्रमाला वॉलंटियर करते आहे. Proud
त्याला अक्षरश: पानापानावरच्या कविता पाठ आहेत. कुठलाही संग्रह काढा. स्वातीकाकुंना काँपिटीशन आहे. Happy

खूप वेळेला पुस्तक प्रदर्शनाला जायचे मला नाईलाजाने टाळावे लागते; कारण गेले की हमखास कमीत कमी हजारभर रुपयांची पुस्तके घेऊन येते- मोह आवरत नाही. आत्ताही वाचतांना वाटत होते, हे पुस्तक पाहायला हवे होते, इ.इ.

Pages