महिला दिन - सर्व्हे रिपोर्ट

Submitted by संयोजक on 22 March, 2010 - 02:44


wds5.jpg


प्रस्तावना

महिला दिन २०१० निमित्ताने 'संयुक्ता'तर्फे एक सर्वेक्षण घेतले.

संयुक्ताच्या सदस्या आणि त्यांच्या परिघातील १२२ स्त्रियांकडून ही प्रश्नावली भरुन आली. गोपनीयतेची आणि अनामिकतेची पुरेपूर काळजी घेतली होती.

प्रश्नावलीत ९ वेगळ्या सदरात (अनिवार्य प्राथमिक माहिती, शिक्षण, विवाह आणि लग्नसंस्थेबद्दलची मतं/अनुभव, कुटुंब आणि समाज, नोकरी/करियर, आरोग्य, "स्व"संकल्पना ) एकूण ८७ प्रश्न होते
त्यांपैकी ६० अनिवार्य ठेवले होते. शिवाय मैत्रिणींचे मनोगत जाणून घ्यायला पुरेपूर वाव द्यावा या हेतूने खूपसे प्रश्न शब्दमर्यादेविना open ended (खुले) ठेवले होते.

आम्ही सर्वेक्षणामध्ये एकूण ८७ प्रश्न एकूण ९ विभागांमध्ये विचारले होते. प्रत्येक विभागानुसार सर्वेक्षणाचा आढावा:
त्यासाठी पुढील दुव्यांवर टिचकी मारा.

अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक भारतीय/अभारतीय स्त्रियांनी वेळात वेळ काढून अत्यंत प्रामाणिक, पारदर्शी, आडपडदा न ठेवता उत्तरं दिली. या सर्व qualitative inputsना योग्य न्याय देता यावा म्हणून आम्ही विश्लेषण तीन भागात प्रसिद्ध केले. एक महत्त्वाचा ऐवज आपल्या हाती या विश्लेषणरुपाने देता यावा याकडे आमचा कटाक्ष आहे.

या सर्वेक्षणातील प्रश्नावली तयार करणार्‍या आणि विश्लेषण करणार्‍या स्त्रियांचे मनोगत/अनुभव/मतं आणि त्याचा प्रश्नावलीवर किंवा विश्लेषणावर प्रभाव हेही आपण तपासून पाहणार
आहोत.

प्रश्नावलीच्या उद्दिष्टांबाबत थोडासा परिचय: (हा परिच्छेद प्रश्नावलीत समाविष्ट करण्यात आला होता.)
...........
ही प्रश्नावली हा एक आरसा आहे, थोडंसं थांबून नीट न्याहाळून पहा त्यातल्या छब्या. तांत्रिक अडचणी काहीशा आहेत, त्याला दुर्दैवाने आत्ता या क्षणी इलाज नाही. आम्हालाही प्रिव्ह्यू किंवा आपली उत्तरं सेव्ह करायचे पर्याय आवडले असते. त्या समजून पुढे जाऊयात. प्रश्नावलीचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • स्थळकाळादेशापलिकडे जाऊन स्त्रीत्व या विषयावरची काही वैश्विक मतं जाणून घेणे. मराठी/ भारतीय/परदेशी स्त्रियांची मतभिन्नता तपासणे.
  • काही क्षण थांबून, विचार करुन एक स्त्री म्हणून आपली गृहितकं, आपले महत्त्वाचे निर्णय आणि त्याला कारणीभूत असणारे घटक जाणीवपूर्वक तपासून पाहणे.
  • प्रश्नावलीची विषयवार व्याप्ती जरा मोठी आहे आणि तीच या प्रश्नावलीची मर्यादा आणि तेच मर्म आहे. यातील प्रत्येक विषयावर विचारण्यासारखे शेकडो प्रश्न आहेत, पण आत्ता सुरूवातीला आपण सर्वच थोडेथोडे पाहूयात.
  • प्रश्नावलीला आलेल्या मतांचे व्यवस्थित संकलन करुन आपल्याला संयुक्तासाठी कशाप्रकारे मदत होईल, कुठले विषय चर्चेला घ्यावेत ते नीट पाहता येईल.

..........


stline2.gif


प्रतिसाद

संयुक्ताची सध्याची सभासदसंख्या १४८ आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रिया १२२, पैकी १० निश्चित अभारतीय वंशाच्या आहेत. यावरून प्रत्येक संयुक्ता सदस्येने (येनकेनकारणानी) भाग घेतला नाही असे सरळ अनुमान निघते.

तरीही प्रतिसादाची वैचारिक पातळी पाहता ज्यांनी भाग घेतला त्यांचे आभार मानायलाच हवेत. शिवाय ज्यांनी परदेशी मैत्रिणींना ही प्रश्नावली भरायला उद्युक्त केले त्यांचेही विशेष आभार मानायला हवेत कारण प्रश्नांच्या बाजावरूनच ही प्रश्नावली मुख्यतः भारतीय स्त्रियांशी निगडीत असावी असा समज होणे स्वाभाविक होते. असे असतानाही आपला अमूल्य वेळ आणि मतं त्यांनी आपल्याला दिली, जेणेकरून थोड्याप्रमाणात तरी तौलनिक अभ्यास मांडता आला, याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.

(कुठलाही उपक्रम हा पालखीसारखा असतो. वेगवेगळ्या खांद्यांवरुन ती वाहून नेली जाते. शेवटच्या भागात दिंडीतील सर्व पालखीधारकांचे नामोल्लेख आणि ऋणनिर्देश करण्यात येतील.)


stline2.gifमहत्त्वाचे काही

वाचक मैत्रिणींनो आणि मित्रांनो एक विनंती आहे- कृपया सांख्यिकींच्या कचाट्यात गिरक्या खाऊ नका किंवा त्याला अवास्तव महत्वही देऊ नका!

मराठी प्रश्नावली Web Based Form स्वरुपात मायबोलीवरच तयार करण्यात आली होती. मैत्रिणींच्या आग्रहानुसार आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे ती इंग्रजीत अनुवादीत करुन पुन्हा इंग्रजीतही टाकण्यात आली.

आलेल्या मराठी आणि इंग्रजी प्रतिक्रिया Excel मध्ये एकत्रित केल्या. विश्लेषकांनी पुन्हा एका भाषेत यातील सर्व माहिती code केली. सर्व खुल्या प्रश्नातील दोन्ही भाषेतील मजकूर त्यातल्या प्रमुख धाग्यानुसार वेगळ्या लिहून पुन्हा त्यातले संख्याबळ पाहिले. दोन/तीन/चार घटकातील परस्परसंबध पाहिले. सर्व तांत्रिक बाबींवर मात करुन/पर्याय शोधून आहे त्या सामग्रीनुसार विश्लेषण करण्यात आले आहे.

Advanced Statistical Analyses/ Data Mining Techniques यातील तज्ज्ञांची मदत घेऊन पुन्हा एकदा जास्त व्यापक स्वरूपात हे सर्वेक्षण आणि विश्लेषण करुन पहायला हरकत नाही असे विश्लेषकचमुचे (वैयक्तिक) मत आहे, आणि अजून काय जास्त चांगले करता येईल याची नम्र आणि यथायोग्य जाणीवही आहे.

निष्कर्षात बहुतांशींचे रेखाचित्र पाहून तिथेच थबकू नका, ही केवळ लिहिण्याच्या संकेताची मर्यादा आहे. तुम्हाला यातल्या अल्पसंख्यकांचाही पुरेसा परिचय होतो आहे ना ते नक्की पहा. (आणि मुख्य म्हणजे स्वतःची या विषयांवरील मतं नीट आजमावून पहा आणि आम्हाला कळवायला विसरू नका.) निष्कर्ष खरे म्हणजे दोहोंच्या मध्ये कुठेतरी आहे, तिथे पोचायची वाट नागमोडीच आहे हे मानवी अस्तित्वाचे केवढे भाग्य आहे आणि प्रवास हेच उद्दिष्ट आहे !

वाचायच्याही आधी धन्यवाद अशा प्रकारच्या उपक्रमा करिता नी चिकाटिने वेळ काढुन प्रतिसाद तपासुन निष्कर्ष काढण्याकरता Happy

क्या बात है!
टीमचे अभिनंदन.
संकल्पना खूप छान आहे. टीमने खूप श्रम घेतलेत.
येऊ द्या जोरात! Happy

तीनही विभाग वाचून झाले. खुप मेहनत घेऊन विश्लेषण केले आहे हे प्रत्येक वाक्यातून जाणवले. वाचता वाचता आपण कुठे आहोत आणि कुठपर्यंत मजल गाठायची आहे ह्याची चांगलीच कल्पना आली.

पुढचेही विभाग येऊ द्या लवकर... फार उत्सुकता लागून राहिली आहे.

वरचे चित्र सुंदर आहे. त्यात मायबोलीचेही चिन्ह घालून संयुक्ताचा लोगो म्हणून वापरण्याचा विचार करण्यात यावा. Happy

उत्तम.... टीम चे खुप कौतुक आणि अभिनंदन!

खुप मेहनत घेऊन विश्लेषण केले आहे हे प्रत्येक वाक्यातून जाणवले. वाचता वाचता आपण कुठे आहोत आणि कुठपर्यंत मजल गाठायची आहे ह्याची चांगलीच कल्पना आली<<< १००% अनुमोदन.

सर्व संबंधीतांचे अभिनंदन!
सर्व्हे तर उत्तम होताच, आता रीपोर्ट पण अतिशय छान सादर होतोय Happy

रिपोर्ट खुपच छान आहे. अतिशय कष्टाचे काम. तेही मोजक्या वेळात. सर्वांचे अभिनंदन अन सर्वांना धन्यवादही ! मस्त काम !

अतिशय अवघड असलेल्या सर्व्हेच्या या कामाचा हा इन्टरनेटवरील मराठी माध्यमाच्या साईटचा बहुधा "प्रथम" प्रयत्न निश्चितच यशस्वी झाला आहे यात शन्का नाही! Happy सहभागी सर्वान्चे अभिनन्दन Happy
मी अजुन सर्व वाचलेले नाही, पण वरील ९ विभागातील ८७ प्रश्नान्मधे "राजकीय" मतप्रणालीवर्/राजकीय विषयावर काही भाष्य करणे अपेक्षित होते का? खास करुन स्त्रीयान्ची राजकीय मते हा विषय हाताळला गेला होता का? (नसेल तर नाही, पुढच्यावेळेस जरुर व्हावा)
हे ८७ प्रश्न वाचकान्ना बघावयास मिळतील का?

वाचतो आहे.
१. 'लीव्ह-इन रिलेशनशिप'ची व्याख्या काय गृहीत धरली आहे या सर्वेक्षणासाठी?
२. स्त्रीत्व हे जीवशास्त्रीय आहे की सोशल कन्स्ट्रक्ट असा काही प्रश्न होता का?
३. अ-भारतीय वंशाच्या स्त्रीया म्हणजे नेमके काय? (स्पष्टीकरणात ख्रिश्चन धर्मीय दिसतात, पण ख्रिश्चन धर्मीय स्त्रीया तर भारतीयही असू शकतात!)

लिंबुटिंबु-
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. ८७ प्रश्नांचे प्रश्नागणिक विश्लेषण प्रसिद्ध करतो आहोत. मतप्रणालीवर या प्रश्नावलीत (विस्तारभयामुळे) एकच प्रश्न समाविष्ट केला होता- तुम्ही मतं देता का? उत्तराचे विश्लेषण प्रकाशीत करणार आहोत.
आपल्या राजकीय मतांबाबतच्या सुचनेवर जरुर विचार करु.

श्रावण-
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
१) लीव्ह-इन- रिलेशनशिप ची स्पष्ट व्याख्या मूळ प्रश्नात समाविष्ट केली नव्हती. आलेल्या प्रतिक्रियांनुसार कायद्याने विवाहबंधन स्वीकारण्यापूर्वी अथवा एक नातेस्थिती म्हणुन कधी एकमेकांसोबत काही काळ एकत्र राहून घालवला आहे यात विभागणी झाली आहे. आलेल्या प्रतिक्रियांमध्ये शारिरीक संबंधाबाबतही विचार अथवा अनुभव नमुद करण्यात आले आहेत.
२) या विषयावर संयुक्तावर अलिकडेच विस्तृत चर्चा झाली होती, त्यामुळे या सर्वेक्षणापुरते यावर प्रश्न समाविष्ट केले नाहीत. जीवशास्त्रीय दृष्ट्या अपत्यजन्माच्या अनुभवाबद्दल विस्तृत लिहायचे आवाहन केले होते - गर्भधारणा, प्रसुती याबद्दलच्या वेचक आठवणी सांगा असा एक खुला प्रश्न समाविष्ट केला होता.
३) सध्याचे राहण्याचे ठिकाण (शहर,देश), वयाची ०-२० वर्षे राहण्याचे ठिकाण, मातृभाषा, धर्म, जात, पोटजात, इंग्रजी प्रश्नावलीत Ethnicity या सर्व उत्तरांची पाहणी करुन हे निष्कर्ष काढले आहेत. उदा- White Caucasian Female, XXXX Country असे स्पष्ट उल्लेख आहेत. प्रामुख्याने अमेरिकन आणि ख्रिश्चन असे रिपोर्टमध्ये नमुद केले आहे.

- विश्लेषकचमुच्या वतीने

खादाडमावशी : आताच "कुटुंब" हया विभागाचा आढावा प्रसिध्द केलाय. बाकीच्या विभागांवरती काम सुरु झालेले आहे. जमेल तेवढ्या लवकर ते पण इथे टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बर्‍याच लोकांनी प्रश्नावली बघायला मिळेल कां म्हणून विचारले होते. ती प्रश्नावली आपण इथे पाहू शकता.

- विश्लेषकचमुच्या वतीने

मी जरा उशिराच बघतेय हे. पण खुपच चांगले सर्व्हे आहेत.
प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण उत्तम.
विश्लेषकचमुने खुप मेहेनत घेतलि आहे , त्यांचे एवढ्या चांगल्या कामासाठी आभार आणि अभिनंदन Happy

आढावा आणि निष्कर्ष पुरेसे बोलके आहेत.

प्रश्नावलीतील बर्‍याच प्रश्नांची उत्तरं 'आपण' काय लिहिली होती हे बर्‍यापैकी विसरायला झालं होतं. तरीही विश्लेषकचमूच्या मेहनतीला दाद दिलीच पाहिजे. खूप मोठं काम केलंय पूर्ण टीमने, त्यांचं कौतुक आणि अनेक अनेक आभार! Happy

Pages