सर्व्हे रिपोर्टः विभाग- अर्थकारण

Submitted by संयोजक_संयुक्ता on 30 December, 2010 - 01:24

या सदरात एकूण ५ प्रश्न होते, आणि त्यापैकी पहिला प्रश्न वगळता इतर चार प्रश्न अनिवार्य होते. आर्थिक स्वावलंबन, कौटुंबिक अर्थकारणातील निर्णयप्रक्रिया आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचे काही मोजकेच जुजबी प्रश्न या सदरात विचारले होते.

हा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.

  • पगाराच्या रक्कमेचा विनियोग कसा करता?

    प्रश्न विचारताना स्वत:च्या पगाराचा विनियोग अभिप्रेत होता, परंतू प्रश्न तसा न विचारला गेल्यामुळे उत्तरांवरून स्त्रिया स्वतःच्या पगाराचा विनियोग कसा करतात याचा ठोकताळा बांधणे शक्य झाले नाही.

    • घरखर्च: ६४ जणींनी इतर पर्यायांबरोबरच घरखर्च हा पर्याय नमूद केला. यापैकी १६ जणी सध्या विद्यार्थिनी/ गृहिणी/ नोकरीच्या शोधात आहेत. यापैकी फक्त एक मैत्रिण सध्या पूर्णवेळ नोकरीत कार्यरत आहे, म्हणजेच स्वतःच्या पगाराच्या रकमेचा विनियोग हा घटक त्यात समाविष्ट नाही. (घरखर्चात दैनंदिन घरखर्च, गृहकर्ज (१० जणींने गृहकर्जासाठी/ घरभाड्यासाठी असे नोंदवले आहे) , डे केअर (१), भारतात पैसे पाठविणे (४) यांचा समावेश केला गेला आहे). यापैकी २९ जणींनी बचत (सेव्हिंग्ज) असे नोंदवले नाही.
    • फक्त घरखर्च असे उत्तर नोंदवलेल्या स्त्रियांची संख्या ९. यांपैकी ८ कुठल्या तरी स्वरूपात नोकरी/ व्यवसाय करतात
    • ५ जणींनी प्रवास/ सुट्ट्यांसाठी खर्च करत असल्याचे नोंदवले आहे
    • घरखर्च आणि बचत - ३०
    • बचत आणि इतर पर्याय- ४४
    • घरखर्च, बचत आणि गुंतवणूक/ निवृत्ती- ६
    • १८ जणींनी गुंतवणूक/ निवृत्ती यासाठी विनियोग करत असल्याचे नोंदवले आहे. यापैकी फक्त १ परदेशी वंशाची स्त्री आहे आणि १२ स्त्रिया सध्या पूर्णवेळ नोकरीत आहेत .
    • ४ जणींनी सामाजिक कार्यासाठी देणगी असे नोंदवले आहे. या चारही जणी सध्या पूर्णवेळ नोकरीत आहेत.
    • खरेदी/ भेटवस्तू स्वतःसाठी/ इतरांसाठी- हा शब्द ५ जणींनी वापरला आहे.
    • सगळं नवरा पहातो, घरखर्चाला पैसे देतो अशा ३ प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत
    • ३८ जणींनी या प्रश्नाला उत्तर दिलेले नाही. त्यापैकी १३ जणी कुठल्या ना कुठल्या नोकरी/ व्यवसायात कार्यरत आहेत.

    नवरा व माझ्या मिळून पगाराची ४०% रक्कम घर खर्चाकरता जाते (घर भाडे, घराचे कर्ज, इतर खर्च).

    जरूरेच्या वस्तुच घेते. मुलीला पण फाजील हवे ते आणणे असे करत नाही. वेगवेगळे प्रदेश पहायला प्रवास करायला जास्त खर्चाचा विचार करत नाही. शिल्लक पैसे गुंतवले आहेत. सामाजीक मदत करायची रक्कम पण ठरवलेली आहे.

    मनाप्रमाणे करते- खरेदीसाठीच जास्तकरून

    ३०% घरगुती युटीलिटीज, घरभाडे. ७-८% ग्रोसरी + हॉटेलिंग . बाकी सर्व सेव्हींग्ज. त्यातील अगदी थोडे प्रवास.

    सध्या फारसा पगार मिळत नाही. माझ्या पगारातून मी माझे शिक्षण स्पाँसर करतेय, माझ्या आग्रहावरून. कारण मला महिन्याच्या बजेटमध्ये कोणतीही तडजोड नको होती , ज्या गोष्टींवर खर्च चालू आहेत , ते अभ्यासामुळे कमी करायला आवडले नसते .

    all financial matters are handled by husband

    दोघांचे पगार एकाच अकाऊंटमधे जमा होतात, आणि सगळे खर्च त्या सामायिक अकाऊंटमधूनच होतात.

  • सोनेनाणे, घर, दागिने, गुंतवणूक, रिटायरल स्किम्सपैकी महत्त्वाचे काय वाटते ?

    Arthakaran chart 1.JPG

    हेच जरा वेगळ्या प्रकारे पाहिल्यास असे दिसते:

    Arthakaran chart 2.JPGकाही निरीक्षणे:

    • फक्त घर हा घटक निवडलेल्या बहुतांश मैत्रिणींचा वयोगट २१- ३५ आहे. त्यातील फक्त २ जणींचा वयोगट ४६-५० मध्ये आहे.
    • घर हा घटक अजिबात न निवडलेल्या- ३७ %
    • सोनेनाणे/ दागिने हा घटक अजिबात न निवडलेल्या- ८४ %
    • सोनेनाणे आणि इतर पर्याय निवडलेल्या मैत्रिणींपैकी फक्त ४ जणी ४१च्या वरील वयोगटात मोडतात
    • फक्त सोनेनाणे महत्वाचे वाटते असे नोंदवलेली एकही स्त्री नाही
    • फक्त रिटायरल स्किम्स हा घटक निवडलेल्या ९ मैत्रिणींपैकी ६ जणी सध्या पूर्णवेळ नोकरीत आहेत. फक्त १ गृहिणी आहे. ५ जणींचे वय ४१हून जास्त आहे.
    • ५ जणींनी या प्रश्नाला उत्तर दिलेले नाही
    • प्रश्नात क्रम विचारला गेला नव्हता, तरीही काही जणींनी in the order of importance आपले मत नोंदवले आहे.

    - सध्यातरी घर!

    -गुंतवणूक, घर, रिटायरल स्किम्स. याच क्रमाने महत्त्व. बाकी सोने व दागिने दुय्यम किंवा स्थानच नाही.

    - सर्वकाही

    - अनुक्रमे गुंतवणूक, घर व रिटायरल स्किम्स

    - खरे सांगायचे तर फक्त राहण्याचे घर पुरेसे वाटते. बाकी कशातच मला रस नाही.

    - मुलासाठी कॉलेज फंड आणि आमच्यासाठी रिटायरल स्कीम

    - Retirement. of course this a recent change.

  • तुम्ही स्वतः कधी एकटीने पैसे गुंतवले आहेत का?
    • नाही- ४६ % (यात पुढील प्रतिक्रिया समाविष्ट केल्या आहेत :नाही, क्वचित कधीतरी, कधीच नाही, बहुतेक नाहीच, फक्त फीक्स डिपॉझिट केले आहेत बाकी काहीच नाही, Not Yet, Not really, लग्नानंतरच सवय लागली नवर्‍यामुळे, हो. एकदाच. जोडीदार भेटण्या आधी.)

      मागील प्रश्नाच्या उत्तराशी ताडुन पाहता, यापैकी ३७ जणींना गुंतवणूक/ २४ जणींना रिटायरल स्किम्स महत्त्वाच्या वाटतात. तरीही आपण एकटीने कधी पैसे न गुंतवल्याचे त्यांनी नोंदवले आहे याकडे विश्लेषक म्हणून आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.

      'नाही' असे उत्तर नोंदवलेल्यांपैकी ३५ जणी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या नोकरी/ उद्योगात कार्यरत आहेत, आणि १३ गृहिणी आहेत. यापैकी ४ स्त्रिया परदेशी वंशाच्या आहेत. यापैकी २ स्त्रिया अविवाहित आहेत.

    • हो- ४७.५ % (यात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाविष्ट केल्या आहेत: हो, नेहमीच गुंतवते, 'हो खूप वेळा. स्टॉक ट्रेड करते. लॉन्ग टर्म, शॉर्ट टर्म पण,' 'हो, बँकेत असल्यामुळे स्वतःची गुंतवणूक स्वतःच करत होते. ' हो नियमीतपणे, हो, नुकतंच घर घेतलं संपुर्णपणे स्वत:च्या पैशाने, हो बरेचदा मीच गुंतवते) यापैकी फक्त २ गृहिणी आहेत, ४३ जणी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या नोकरी/ उद्योगात कार्यरत आहेत. 'घटस्फोटित/विधवा ', अशी नातेस्थिती नोंदवलेल्या सर्व स्त्रियांचा यात समावेश आहे, तसेच ४ अविवाहित स्त्रियांचाही.
    • दोघे एकत्रित गुंतवतो- ६%( नाही. आम्ही दोघेही एकत्रीतपणे निर्णय घेतो. कोणीही एकट्याने निर्णय घेत नाही, गुंतवते मी, पण विचारविनिमय दोघेही करतो. हो नेहमीच. म्हणजे नवर्‍याला सांगते की इतके पैसे इथे गुंतवते आहे म्हणुन पण मीच ठरवते

  • आतापर्यंतच्या आयुष्यात एकटीने (स्वतःच्या जबाबदारीवर) खर्च केलेली सर्वात मोठी रक्कम किती ?

    आलेली उत्तरे- ११४. सोयीसाठी चलनाचा दर १ डॉलर= ४५ रुपये असा धरला आहे.

    • सर्वात जास्त रक्कम- रुपये १- २ कोटी (१)
    • नोंदवल्या गेलेली सर्वात कमी रक्कम- रुपये तीन हजार.
    • रुपये ३०००- १०,०००- १६
    • रुपये १०,०००-२०,०००- १२
    • रुपये २५,०००- ३०,०००- ३
    • रुपये ४०,०००- ५०,०००- ६
    • रुपये ५०,०००- १००,०००- १८
    • रुपये एक लाखाहून अधिक- ३०
    • ज्या सध्या पूर्णवेळ गृहिणी आहेत अशा स्रियांनी नोंदवलेली सर्वात कमी रक्कम- रुपये ५०००
    • ज्या सध्या पूर्णवेळ गृहिणी आहेत अशा स्रियांनी नोंदवलेली सर्वात जास्त रक्कम- रुपये १५०,०००
    • ज्या सध्या पूर्णवेळ नोकरीत आहेत अशा स्रियांनी नोंदवलेली सर्वात कमी रक्कम- रुपये ३०००
    • ज्या सध्या पूर्णवेळ नोकरीत आहेत अशा स्रियांनी नोंदवलेली सर्वात जास्त रक्कम- रुपये २२,५०,०००

    २४ जणींनी रक्कमेचे आकडे न देता, किंवा आकड्यांसोबतच खालील काही प्रतिक्रिया दिल्या आहेत:

    - एकटीने शक्यतोवर खर्च करत नाही. कायमच घरच्यांशी पूर्ण विचारविनीमय करुनच खर्च करते.स्वतःच्या लग्नात मी केलेला खर्च हीच सर्वात मोठी रक्कम आहे माझी खर्च केलेली. लग्नात मी जमवलेले पैसे आई बाबांना दागिने, कपड्यांसाठी दिले जेणेकरुन त्यांचे असे पैसे कमी खर्च व्हावेत.

    - फार नाही. maybe XXX. तशी मध्यम्वर्गीय वृत्ती सोडुन गली नाही

    - स्वतःच्या जबाबदारीवर कधीच नाही.

    - अजूनपर्यंत अशी मोठी रक्कम स्वतःच्या जबाबदारीवर खर्च केलेली नाही.

    - I didnt spend it just on my behalf, it was me and my husband's joint decision to spend my money on my car, our new home.

    - नाही एकटीने मोठा खर्च केलेला नाही

    - अजूनतरी नाही केली

    - all of my cars

    - खूप मोठी रक्कम खर्च करण्याची गरज पडली नाही.

    घरासाठी सर्वात मोठी रक्कम खर्च केली पण एकंदरीत बरीच. जबाबदारी नेहेमीच माझी.

    लुना घेतली होती कॉलेजमधे. त्यानंतर कधी एकटिने खरेदी करायची वेळ आली नाही.

    सगळे निर्णय दोघे मिळुन घेतो. पण जर मी स्वतःच्या जबाबदारीवर काही खर्च केला तरी नवरा काहीही आक्षेप घेणार नाही याची खात्री आहे. किंबहुना बहुतांशी खर्च मीच करते.

    बरीच मोठी

    Buying a house on loan.

    this is a funny question. my husband and I have a general understanding about money. we don't buy expensive things or big ticket items without first checking with each other. but i also don't often buy expensive things, except plane tickets.

    तसे आठवत नही पण शेअर्स मधे एकटीच्या हिमतीवर तीन -चार हजार डॉलर्स पर्यन्त नेहमीच केलेत.

    माझा सगळा पगार

    सोने खरेदी करताना..........काही लाख.

    घर घेतले पुर्णपणे स्वत:च्या जबाबदारीवर.

  • आत्तापर्यंत तुम्ही स्वतःसाठी घेतलेल्या सर्वात महाग वस्तू/कपड्यांची/दागिन्यांची किंमत किती?
    • नोंदवली गेलेली सर्वात जास्त रक्कम- रुपये ६४ लाख. यात उत्तर देणारीने 'घर' असे नमूद केले आहे.
    • नोंदवली गेलेली सर्वात कमी रक्कम- रुपये १०००
    • रुपये दहा हजार किंवा त्याहून कमी- ३० ( साडी/ साड्या/ मंगळसूत्र/ भ्रमणध्वनी/ कपडे/ कशासाठी खर्च केला ते नमूद केलेले नाही)
    • ११ ते २० हजार- २० ( साडी/ पुस्तकं/ भ्रमणध्वनी/कशासाठी खर्च केला ते नमूद केले नाही)
    • २०-५० हजार- २७ (बरबेरी बॅग/ अक्टिव्हा गाडी/ संगणक/ लॅपटॉप/ कॅमेरा/ दागिना, अंगठी/कशासाठी खर्च केला ते नमूद केले नाही)
    • ५१,००- १००,०००- १६ (हिरे/ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने/ लॅपटॉप/ कशासाठी खर्च केला ते नमूद केले नाही)
    • एक लाखाहून अधिक- १५ (कार, हिरे, दागिने, घर, कशासाठी खर्च केला ते नमूद केले नाही). हे उत्तर नोंदवलेल्यापैकी फक्त १ पूर्णवेळ गृहिणी आहे आणि ३ परदेशी वंशाच्या स्त्रिया आहेत.
    • पूर्णवेळ गृहिणी- नोंदवलेली सर्वात कमी रक्कम रुपये १०००. सर्वात जास्त रक्कम रुपये १,५०,०००. (कपडे/ कॅमेरा/ लॅपटॉप, दागिने/ कशासाठी खर्च केला ते नमूद केले नाही, आठवत नाही. पण मुळात खर्चिक स्वभाव नाही. कधी कधी तर कुठलाही खर्च करण्याच्या आधी दहादा विचार करण्याच्या सवयीचा राग येतो. महागड्या कपड्यांचा, दागिन्यांचा शौक नाही.
    • सध्या देशात स्थित असलेल्या स्त्रिया रू. १०००० वरील खर्च- ३० (आलेली उत्तरे ४३). सरासरी- ३२,५००.
    • सध्या देशात स्थित असलेल्या कोणीही 'कार' असे नोंदवलेले नाही.
    • सध्या परदेशात स्थित असलेल्या, मूळ भारतीय वंशाच्या स्त्रिया- ५९. नोंदवलेल्या खर्चाची सरासरी १.१४ लाख.
    • रुपये दहा हजाराहून अधिक खर्च- ४९


stline2.gif

काही निष्कर्ष

भारतीय वंशाच्या स्त्रियांमध्ये 'सोनेनाणे' या घटकाबाबतीत काहीसा बदल घडतो आहे असे मानायला वाव आहे. एकीकडे गुंतवणूक म्हणून सोनेनाणे हा घटक न निवडलेल्या स्त्रियांची संख्या लक्षणीय वाटते. त्याचबरोबर शेवटच्या प्रश्नाला आलेली उत्तरे आणि त्यातील दागिन्यांचा निश्चित समावेश याकडेही विश्लेषकचमु आपले लक्ष वेधू इच्छितो. 'सोनेनाणे' हे कदाचित गुंतवणूकीचे माध्यम म्हणून तितकेसे प्रभावशाली वाटत नसेल.

तसेच, वयाचा आणि गुंतवणूकीबाबत जे घटक मैत्रिणींना महत्त्वाचे वाटतात याचा निश्चित संबंध दिसून येतो. उदाहरणार्थ- निवृत्तीयोजना हा घटक मध्यमवयीन मैत्रिणींना जास्त महत्त्वाचा वाटतो.

नोकरीस्थिती या घटकाचा लक्षणीय प्रभाव, एकटीने गुंतवणूक करण्यावर थेट (आपल्यापुढे आलेल्या उत्तरांमधून आणि आलेल्या उत्तरांपुरता) दिसून येतो. कौटुंबिक अर्थकारणातील निर्णय आणि स्वतः नोकरी करणे, हाताशी स्वकमाईचे पैसे असणे यांचा थेट परस्परसंबंध आढळून येतो असे म्हणायला निश्चित वाव आहे. यात 'रस' (interest) हा घटक विचारात घेतला नव्हता. वयाचा अथवा शिक्षण या घटकाचा प्रभाव दिसून येत नाही. गुंतवणूकीची काही माध्यमे महत्त्वाची वाटत असूनही, गुंतवणूक एकट्याने करण्याला नकारार्थी उत्तरं आलेली आहेत.

नातेस्थितीचा प्रभावही एकटीने गुंतवणूक करण्यावर थेट दिसून येतो. विवाहित स्त्रियांपैकी ४८% स्त्रियांने गुंतवणूक करता का या प्रश्नाला नकारार्थी उत्तर नोंदवले आहे. बहुतांशी अविवाहित/ घटस्फोटित/ विधवा स्त्रियांने 'होकारार्थी' उत्तर नोंदवले आहे.

बहुतांशी उच्चशिक्षित (पदवीधर अथवा द्विपदवीधर) आणि मध्यमवर्गीय अथवा सुखवस्तु या आर्थिक गटात मोडणार्‍या मैत्रिणी आणि घरगुती आर्थिक ताळेबंद, जमाखर्च, गुंतवणूक, महत्त्वाचे आर्थिक निर्णय ते पूर्णत: आर्थिक स्वावलंबन या सर्वांतील निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचा सक्रीय सहभाग निश्चित कमी दिसून येतो (पण त्याचबरोबर ग्राहक म्हणून वाढता सहभाग निश्चित दिसून येतो) असे म्हणायला वाव आहे का? आपल्याला काय वाटते?

स्त्रियांचे शिक्षण कमी आणि आर्थिक वर्ग जर निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब असता तर 'अर्थकारणाचे' हेच चित्र, याच प्रमाणात दिसून आले असते का?

चिकाटीने रिपोर्ट पूर्ण केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन.
वाचून मग प्रतिक्रिया देते.

हा रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आर्थिक स्वावलंबन, स्वतः एकटीने केलेली गुंतवणूक, एकटीने घेतलेले आर्थिक निर्णय, केलेली खरेदी, त्या खरेदीची रक्कम, रिटायरमेन्ट प्लॅन्स यांच्या आकडेवार्‍या बोलक्या आहेत.

<< नातेस्थितीचा प्रभावही एकटीने गुंतवणूक करण्यावर थेट दिसून येतो. विवाहित स्त्रियांपैकी ४८% स्त्रियांने गुंतवणूक करता का या प्रश्नाला नकारार्थी उत्तर नोंदवले आहे. बहुतांशी अविवाहित/ घटस्फोटित/ विधवा स्त्रियांने 'होकारार्थी' उत्तर नोंदवले आहे. >>

हा सँपल डेटा जरी त्रोटक/ मर्यादित असला तरी निष्कर्षातील मुद्दे बर्‍याच भारतीय महिलांना लागू होतील असे वाटते.

१०० % पगार माहेरीच देते, असे सांगणारी एकही बाई नाही.. माझी बायको सर्वे करणार्‍याना भेटली नाही वाटतं.. Proud