ब्रेल लिपीतली पुस्तकं

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर ताईआत्या राहायच्या. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांतच नवर्‍यानं त्यांना माहेरी आणून सोडलं. त्यांचं माहेर तसं श्रीमंत. मोठा भाऊ डॉक्टर. पण ताईआत्या मात्र बंगल्याच्या आऊटहाउसात राहायच्या. ताईआत्या उत्तम कविता करत. संध्याकाळी आई ऑफिसातून घरी आली की ताईआत्या घरी येत. त्यांना सुचलेली कविता आई त्यांच्या वहीत त्यांना उतरवून देई. ताईआत्यांना लिहिता वाचता येत नसे. त्या अंध होत्या.

पुढे मग मी त्यांचा लेखनिक बनलो. त्यांना दिसत काही नसलं तरी त्यांच्या संवेदना अतिशय तीक्ष्ण होत्या. खूप सुंदर बोलायच्या त्या. त्यांचं हे बोलणं, त्यांच्या कविता एका डायरीत मी लिहून घेत असे. ताईआत्यांनी एक-दोन कविसंमेलनांतही कविता वाचल्याचं मला आठवतं. एकदा महनोर, पाडगावकर अकोल्याला आले होते, तेव्हा त्यांनीही ताईआत्यांच्या कवितांचं कौतुक केलं होतं. मी पाचवी सहावीत असेन तेव्हा ताईआत्यांचा नवरा त्यांना परत घेऊन गेला. अचानक त्याला ही उपरती का झाली, हे काही कळलं नाही. ताईआत्या कशा आणि कुठे आहेत, हेही नंतर कळलं नाही.

तीन वर्षांपूर्वी अकोल्यातल्या कै. काकासाहेब ठोंबरे वाचनालयात अंध वाचकांसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू झाला. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी आणि आई गेलो, आणि तिथे ताईआत्या भेटल्या. त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या परत अकोल्याला आल्या होत्या. भावाशी संपर्क नव्हताच. आपल्या १३-१४ वर्षांच्या मुलाबरोबर त्या अकोल्यातच एका खोलीत राहत होत्या. ताईआत्या गावातलं घर सोडून अकोल्यात आल्या त्यामागे एक कारण होतं. त्यांना ब्रेल लिपी शिकायची होती. त्यांच्या लहानपणी अकोल्यात अंधशाळा नव्हती. सामान्य शाळेत कोणी उभंही केलं नाही. ताईआत्या लिहावाचायला शिकल्याच नाहीत.

अकोल्यात आल्यावर त्या आधी अंधशाळेत गेल्या. संस्थाचालकांनी नियमावर बोट दाखवून त्यांना हाकलून लावलं. 'आता चाळीशी उलटली तुमची.. आता शिकून काय करणार?' हे वर ऐकवलं. ताईआत्या गप्प बसल्या. काही दिवसांनी योगायोगानं त्यांना मेंढकी सर भेटले. मेडिकल कॉलेजात प्रोफेसर असलेल्या मेंढकी सरांना ताईआत्यांनी आपली ब्रेल शिकायची इच्छा सांगितली. सरांनी ब्रेलमधल्या पुस्तकांची चौकशी केली, आणि सरांना लक्षात आलं की एकवेळ गुलबकावलीचं फूल मिळेल, पण ब्रेलमधली पुस्तकं मिळणं महाकठीण. अकोल्यात अंधशाळा असूनही अकोल्यात ब्रेलमधली पुस्तकं उपलब्ध नव्हती. सरांनी मग मुंबईला National Association of Blind, म्हणजे NABशी संपर्क साधला. भारतातल्या अंधांची काळजी घेणं, हे या संस्थेकडून अपेक्षित आहे. तीन-चार महिने पत्रव्यवहार करूनही सरांना संस्थेनं उत्तर पाठवलं नाही.

मग मेंढकी सरांना कोणीतरी संजय सरांबद्दल सांगितलं. हे संजय सर अकोला महापालिकेच्या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मोबाईल शिक्षक होते. अकोल्यातल्या (सुदृढ मुलांच्या) पाच शाळांतील ७-८ अपंग मुलांना शिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. संजय सरांच्या मदतीनं मग मेंढकी सरांनी वाचनालयात अंधांसाठी वेगळा कक्ष स्थापन केला. पुस्तकं जमवण्यास सुरुवात केली.

वाचनालयात स्वतंत्र विभाग सुरू झाला खरा, पण सहा महिन्यांत केवळ २०-२५ पुस्तकं गोळा करता आली होती. NABकडे सतत पाठपुरावा करूनही पुस्तकं मिळत नव्हती. मुळात त्यांच्याकडे मराठी पुस्तकं नव्हतीच. बहुतेक सगळी पुस्तकं हिंदी किंवा इंग्रजी. त्यातही बहुतेक सगळी वैद्यकिय किंवा धार्मिक विषयांना वाहिलेली. ही पुस्तकं वाचली जातील, असं NABला का वाटलं कोणास ठाऊक. पुण्याच्या अंधशाळेनं त्यांच्याकडची काही जुनी पुस्तकं पाठवली. तेही याहून अधिक काही करू शकत नव्हते, कारण त्यांनाही नवीन पुस्तकं मिळवणं खूप अवघड जात होतं. परिस्थिती खरंच खूप बिकट होती.

पुस्तकं मिळवण्यासाठी आणि एकंदर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी त्यावेळी मी काही अंधशाळांत जाऊन आलो. पुस्तकांची वानवा सर्वत्र होती. आनंदवनातल्या शाळेत तर १९७८नंतर एकही नवीन मासिक किंवा पुस्तक (अभ्यासक्रमाबाहेरचं) आलं नव्हतं. अकोल्यातल्या शाळेत १०० अंध मुलं शिकतात. त्यांच्यासाठी एक मोठं कपाट भरून पुस्तकं होती फक्त. यांत अवांतर पुस्तक एकही नाही. पुण्यातल्या शाळांत काही अवांतर पुस्तकं आणि मासिकं होती. पण तीही जुनी. ब्रेलमधली पुस्तकं सामान्य पुस्तकांप्रमाणे टिकत नाहीत. एका पुस्तकाचं आयुष्य जास्तीत जास्त तीन-चार वर्षं. वाचून वाचून पानांवरचे अक्षरांचे उंचवटे गुळगुळीत होत जातात. त्यामुळे सतत नवीन पुस्तकांची निकड असते.

ही पुस्तकं छापून वितरीत करण्याची जबाबदारी NABची आहे. पण पुस्तकं नियमितपणे छापली जात नाहीत. मराठी तर नाहीच नाही. कोणा देणगीदारानं पुस्तकं छापून घेतलीच तर तर बहुतकरून 'ज्ञानेश्वरी', 'तुकारामाची गाथा', 'गुरुचरित्राची पोथी' अशी पुस्तकं छापली जातात. अंधांना धार्मिक पुस्तकं भेट देण्याचं डबल पुण्य मिळत असावं कदाचित. पण शाळकरी मुलांना या पुस्तकांत काय रस? त्यांना आवडतील अशी, त्यांना सभोवतालची जाणीव करून देणारी, त्यांच्यातल्या संवेदना विकसित करणारी पुस्तकं त्यांना कधी मिळतच नाहीत. अर्थात अभ्यासक्रमात नेमलेल्या पुस्तकांचीही फार बरी स्थिती नाही. अभ्यासक्रम बदलला की २-३ वर्षं नवीन पुस्तकं शाळांना मिळत नाहीत. पुस्तकं मिळतात तेव्हा नवीन अभ्यासक्रम येण्याची वेळ झालेली असते.

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी सुनीताबाई देशपांड्यांनी स्वतःहून NABला उत्तम मराठी पुस्तकांची यादी नेऊन दिली होती. त्यांनी स्वतः लेखकांची व प्रकाशकांची परवानगी घेतली होती. त्यानंतरही ती पुस्तकं छापली गेली नाहीत. सुनीताबाईंनी मग देणगी देऊन त्या यादीतली काही पुस्तकं छापून घेऊन स्वतः महाराष्ट्रातल्या अंधशाळांना दिली होती. नंतर मात्र या पुस्तकांच्या प्रती काढल्या गेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत तर NABनं पुस्तकं छापणं बंदच केलं आहे. आता ध्वनिमुद्रिका काढल्या जातात. पण शिक्षकांना हा प्रकार आवडत नाही. मुलांना ध्वनिफिती ऐकून विषय नीट समजत नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. शिवाय ध्वनिफीत ऐकताना त्या विद्यार्थ्याचं लक्ष आहे की नाही, हे कसं कळणार? विद्यार्थ्याला ती ध्वनिफीत परत ऐकायची असेल तर? वाचनामुळे बोटांतील संवेदना विकसित होतात. ध्वनिफितीमुळे हे कसं जमणार? अशा अनेक अडचणी आहेत आणि म्हणून शिक्षकांनी या ध्वनिफिती नाकारल्या आहेत. पण NAB मात्र इमानेइतबारे या फिती शाळांनी विकत घ्याव्यात म्हणून त्यांच्या मागे लागत असतं.

यातून मग आम्ही ब्रेल शिकावं ही कल्पना पुढे आली. ब्रेल शिकून प्रत्येकानं वर्षभरात निदान एक पुस्तक लिहिलं तरी खूप, असा विचार केला आणि मी, ताईआत्या आणि मेंढकी सरांनी ब्रेल शिकायला सुरुवात केली. आठवडाभराने अजून दोघंतिघं आमच्यात सामील झाले आणि आमचा शिकवणीवर्ग सुरू झाला. महिनाभरानंतर पुरेसा सराव झाला असं वाटल्यानं मी ब्रेलमध्ये पुस्तक लिहायला घेतलं. लता मंगेशकरांचं 'फुले वेचिता'. यातली भाषा सोपी आहे, शिवाय मुलांना, मोठ्यांना लताबद्दल आकर्षण. म्हणून हे पुस्तक निवडलं. लतादिदींनीही लगेच परवानगी दिली. दोन महिन्यांत हे पुस्तक लिहून झाल्यावर दिदींनी या पुस्तकासाठी खास प्रस्तावनाही लिहून दिली.

त्यानंतर मी 'कोट्यधीश पुलं' आणि पुलंनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रं ब्रेलमध्ये लिहिली. सुनीताबाईंनी 'यापुढे भाईच्या किंवा माझ्या कोणत्याही पुस्तकासाठी परवानगी मागायची गरज नाही' असं सांगून न मागता प्रस्तावनाही लिहून दिली. आज ही तिन्ही पुस्तकं अकोल्याच्या अंधशाळेत आहेत. आमच्या ग्रुपातल्या इतर मेंब्रांनीही सामान्य ज्ञानाची, गणित व विज्ञानाची काही पुस्तकं लिहून ग्रंथालयाला दिली. गेल्या दोन वर्षांत संजय सरांनी जवळजवळ १५ लोकांना ब्रेल लिपी शिकवली आहे. आणि त्यांच्या या विद्यार्थ्यांनी एकूण २३ पुस्तकं लिहून ग्रंथालयाला दिली आहेत.

पण दुर्दैव असं की ग्रंथालयात पुस्तकं असूनही अनेकांना ही ब्रेलमधली पुस्तकं वाचताच येत नाहीत. कारण आता वाचनाची सवयच उरलेली नाही. बोटांच्या टोकांनी उंचवट्यांचा वेध घेत ब्रेलमधली अक्षरं वाचली जातात. ही संवेदना निर्माण करावी लागते. त्यासाठी भरपूर सराव लागतो. वाचनाची सवय सुटली की ही संवेदनाही नष्ट होते. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध करून देणं अधिक गरजेचं झालं आहे.

आपण कशाप्रकारे मदत करू शकतो?

१. मुंबई, दिल्ली येथील NABच्या कार्यालयांत ब्रेलमधील पुस्तकं विकत मिळतात. ही पुस्तकं विकत घेऊन आपण शाळांना देऊ शकतो. एखाद्या पुस्तकाची एकच प्रत एखाद्या शाळेला दिली तरी हरकत नाही.
भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरात व जिल्ह्याच्या ठिकाणी NABचं कार्यालय आहे. हे कार्यालय शोधून, तिथल्या कार्यवाहांना जागं करून त्यांच्यातर्फे पुस्तकं मागवता येतील. अभ्यासक्रमातील किंवा अभ्यासक्रमाबाहेरची पुस्तकं शाळांतील ग्रंथालयांना देता येतील. या पुस्तकांची किंमत अतिशय कमी असते.

NABच्या कार्यालयांत (मुंबईतील) अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयांतील आकृत्या, फलक इत्यादी विकत मिळतात. किंमत अगदी माफक असते. हे असे (खास अंधांसाठी तयार केलेले) तक्ते शाळांना देता येतील.

२. 'किशोर'सारखी मासिकं किंवा 'कालनिर्णय' ब्रेलमध्ये उपलब्ध आहे. किंमत वीस-पंचवीस रुपयांहून अधिक नाही. ही प्रकाशनं आपण अंधशाळांना भेट म्हणून देऊ शकता.

३. आपल्या ग्रंथालयात ब्रेललिपीतील पुस्तकांचा एक वेगळा कक्ष स्थापन करू शकता.

४. ब्रेललिपीत पुस्तकाची एक प्रत छापायला साधारण २००-४०० रुपयांचा खर्च लागतो. पुण्यातील हडपसर येथील अंधांना व्यावसायिक शिक्षण देणार्‍या संस्थेत किंवा आनंदवनातील अंधशाळेत पुस्तकं छापण्याची सोय आहे. आपण निदान एक प्रत छापण्याचा खर्च जरी दिलात तरी बरीच मदत होऊ शकते.

५. अनेक अंधशाळांत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ, आनंदवनातील अंधशाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट भेटकार्डं बनवतात. कोथरुडमधल्या मुलींच्या अंधशाळेतील विद्यार्थिनी मेणबत्त्या, लोणची, चटण्या, पापड अशा वस्तू तयार करतात. दर्जा उत्तम असतो. या वस्तू आपण विकत घेऊ शकता.

६. पुण्यातील अंधशाळांची माहिती http://puneblindschool.org/ या दुव्यावर मिळू शकेल. कोरेगाव पार्कातील अंधशाळेत महाराष्ट्रातील अन्य अंधशाळांचे पत्तेही मिळू शकतील. या संकेतस्थळावर आपण त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो, याबद्दल लिहिलं आहे.

७. NABतर्फे मदत करायची असल्यास http://www.nabindia.org/howcanyouhelp_support_empowerment.htm इथे सविस्तर माहिती मिळू शकेल.

८. आपल्या माहितीतील संस्था, इमारती अंधांना, अपंगांना सोयीच्या वाटतील यासाठी प्रयत्न करणे. पुण्यात 'यशदा'चा अपवाद वगळता कुठेही ब्रेललिपीत सूचना नाहीत. सर्व कार्यालये, नाट्यगृहं, चित्रपटगृहं, मोठ्या इमारती, मॉल्स यां ठिकाणी ब्रेललिपीतील सूचनाफलकांसाठी आपण आग्रह धरू शकता.

९. सर्वांत महत्त्वाची मदत आपण स्वतः ब्रेल लिपी शिकून करू शकतो. ब्रेल लिपी शिकणं अवघड नाही. साधारण महिन्याभरात नियमित सरावानं मराठी व इंग्रजी ब्रेललिपी आत्मसात करता येते. ब्रेलर (म्हणजे ब्रेल लिपीसाठीचा typewriter) किंवा ब्रेलची पाटी आणून आपण घरच्या घरी एखादं पुस्तक ब्रेलमध्ये लिहू शकतो. यामागचा चांगला हेतू ध्यानी घेऊन लेखक, प्रकाशकही आनंदाने परवानगी देतात.

पुण्यात अशी पुस्तकं लिहिणारी, लिहून घेणारी काही मंडळी आहेत. अंध विद्यार्थ्यांना योग्य तो मोबदला देऊनही काही संस्था अशी पुस्तकं लिहून घेतात. पुण्यातल्या कानिटकर आजी अनेक वर्षं हे कार्य करत आहेत. मराठीतील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं त्यांनी अशाप्रकारे अंध विद्यार्थ्यांकडून ब्रेलमध्ये रुपांतरित करून घेतली आहेत. या उपक्रमामुळे अंध विद्यार्थ्यांचंही अर्थार्जन होतं. विंदांचे तर बहुतेक सर्व काव्यसंग्रह कानिटकर आजींमुळे ब्रेलमध्ये आले आहेत. प्रत्येक काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी विंदा स्वतः पुण्यात येत. मुलांना कविता वाचून दाखवत. शिवाय निम्म्या प्रतींचा खर्च स्वतः देत असत.

यामुळे अजूनही एक फायदा होतो. ब्रेलमध्ये छापखान्यातून पुस्तकं छापून घ्यायची असल्यास त्या पुस्तकाची एक मूळ ब्रेलप्रत तयार लागते. त्यावरून मग पुढच्या प्रती छापता येतात. आपण जर स्वतः ब्रेलमध्ये पुस्तक लिहिलं किंवा लिहून घेतलं तर मग त्यावरून जास्त प्रती छापून घेता येतील.

आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, आवडलेले लेख, कविता असंही ब्रेलमध्ये लिहून आपण शाळांना देऊ शकतो.

१०. तामिळनाडूतील काटपाडी या गावी ब्रेलर विकत मिळतात. एका ब्रेलरची किंमत १२००० - १४००० रुपये असते. नाशिक व मुंबईतील NABच्या कार्यालयांत, तसंच देहरादूनच्या अंध कल्याण संस्थेत पाटी विकत मिळते. एका पाटीची किंमत ६०-२०० रुपये असते. या पाट्या आपण अंधशाळांना भेट म्हणून देऊ शकता.
परदेशात उत्तम ब्रेलर मिळतात. असं एखादं ब्रेलरही शाळेला देता येईल.

११. मॉड्युलर इन्फोटेकसारख्या संस्थांनी ब्रेलमध्ये पुस्तकं छापण्यासाठी नवीन तंत्रं विकसित केली आहेत. देवनागरी किंवा रोमन लिपीतील पुस्तकांची पानं स्कॅन करून त्यांचं ब्रेललिपीत रुपांतर केलं जातं. हे तंत्र थोडं महाग आहे. जर शक्य असेल तर हे प्रिंटर व सॉफ्टवेअर आपण एखाद्या शाळेला भेट म्हणून देऊ शकाल. जेणेकरून अंध विद्यार्थी पुस्तकं छापून अर्थार्जन करू शकतील व पुस्तकंही उपलब्ध होतील.

आज भारतात अंधांची संख्या प्रचंड असूनही त्यांच्या कोणत्याही समस्येकडे लक्ष दिलं जात नाही. ब्रेलमध्ये सूचनाफलक नसतात, पुस्तकं नसतात. संजय सरांसारख्या शिक्षकाला अनेक महिने पगारही मिळत नाही. फार थोडी अंध मुलं शाळेत जातात. गरीब घरांतील अनेक अंधांचा नशिबी भीक मागणं हाच एक पर्याय उरतो. थोडे प्रयत्न केले तर कदाचित या परिस्थितीत बदल घडवता येईल.

प्रकार: 

चिन्मय, उत्तम माहिती आणि उपक्रम. सहभागी व्हायला आवडेल. माझा मित्र स्वागत थोरात 'स्पर्शज्ञान' नावाचे पाक्षिक काढतो ब्रेल मधे.

चिन्मय,
माहिती आणि उपक्रम दोन्ही उत्तम. हातभार लावायला मनापासून आवडेल (आर्थिक आणि टंकलेखन दोन्हीत!).

'स्पर्शज्ञान' मासिक अप्रतिम आहे. त्यांच्या दिवाळी अंकाला दरवर्षी बक्षीस मिळतं. हा दिवाळी अंकही आपण शाळांना भेट म्हणून देऊ शकतो.

नमस्कार चिनुक्स,

हा धागा सापडल्यावर किती बर वाटल. माझा एक मित्र आहे. त्याला वयाच्या २८ व्या वर्षी अन्धत्व आल आहे. मी हडपसर ला जाउन आलो. त्याला आता स्वता च्या पायवर उभ करण्यासाठी आमचे प्रयत्न चालु आहेत.आम्हि खुप द्विधा मनस्थिती मधे आहोत. मला त्या सन्दर्भात जरा मार्गदर्शन हवे आहे. तुमचा मोबाइल क्रमाक देता का ? किन्वा कृपया मला +९१८०८७२७५०१० वर सपर्क करता का ?

धन्यवाद.

( अभिजीत हे फक्त प्रोफाइल मधले नाव आहे. खरे नाव मनोज आहे. तुम्हि फोन कराल अनि अभिजीत अस विचारल्यावर मी चुकिचा क्रमान्क म्हनुन फोन ठेउन टाकेन, अस होउ नये म्हणुन हा खुलासा Happy )

११. मॉड्युलर इन्फोटेकसारख्या संस्थांनी ब्रेलमध्ये पुस्तकं छापण्यासाठी नवीन तंत्रं विकसित केली आहेत. देवनागरी किंवा रोमन लिपीतील पुस्तकांची पानं स्कॅन करून त्यांचं ब्रेललिपीत रुपांतर केलं जातं. हे तंत्र थोडं महाग आहे. जर शक्य असेल तर हे प्रिंटर व सॉफ्टवेअर आपण एखाद्या शाळेला भेट म्हणून देऊ शकाल. जेणेकरून अंध विद्यार्थी पुस्तकं छापून अर्थार्जन करू शकतील व पुस्तकंही उपलब्ध होतील.
>> ह्याबद्दल अधिक माहिती देउ शकतोस का ? अगदी लगेच नसेल तर वेळ मिळेल तेंव्हा दे. हे सॉफ्टवेअर फक्त स्कॅन करते का ? आणि त्याने स्कॅन केलेले विशिष्ट प्रिंटर वर प्रिंट करायचे असे वाटतेय. software emulators नसतात का ?

मीहि टंकलेखनासाठी मदत करू इच्छितो.

असामी,

मॉड्युलर इन्फोटेकने विकसित केलेल्या तंत्रात पुस्तकाची पानं स्कॅन केली जातात, आणि या इमेजचं ब्रेलमध्ये रुपांतर होतं. मात्र त्यासाठी मंगल इ. फाँट चालत नाहीत. केवळ श्रीलिपी चालते. यासाठीचं प्रिंटरही वेगळं असतं.
यामुळे हल्ली प्रकाशक त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकाची softcopy श्रीलिपीमध्ये convert करून देतात, म्हणजे ब्रेलमध्ये छापताना त्रास वाचतो.

हा लेख वाचून मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy
अनेकांनी पुस्तकछपाईसाठी मदतीची तयारी दाखविली आहे. हडपसरच्या संस्थेत पुस्तक छापायचं असेल, तर मूळ पुस्तक हे ब्रेलमध्ये असणं आवश्यक आहे. डोळस पुस्तकाचं ब्रेलमध्ये रुपांतर करण्यासाठी एका (डोळस) पानाचे पंधरा रुपये आकारले जातात. डोळस पुस्तक जर शंभर पानी असेल, तर ब्रेलमध्ये त्याची अडीचशे - तीनशे पानं होतात. त्यामुळे पन्नास प्रतींच्या छपाईचा खर्च साधारण पंचवीस-तीस हजार होतो.

पुण्याच्या निवांत अंध मुक्त विकासालयात मॉड्युलर इन्फोटेकने विकसित केलेलं यंत्र आहे. वर लिहिल्याप्रमाणे त्यांना युनिकोड अथवा इतर कुठले फाँट चालत नाहीत. इथे छपाई पाठपोट होते. जर सॉफ्टकॉपी नसेल, तर इथले विद्यार्थी ब्रेलमध्ये रुपांतर करतात. हा खर्चही पंचवीस-तीस हजारांच्या घरात आहे.

निवांत अंध मुक्त विकासालयाच्या ग्रंथालयात बरीच पुस्तकं आहेत. तिथल्या संचालिका असलेल्या मीराताई बडवे यांना आता महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी ही पुस्तकं उपलब्ध करून द्यायची आहेत. त्यांच्या एका अंध विद्यार्थिनीने नुकतीच M.Lib ही पदवी मिळवली आहे. तिच्या मदतीनं महाराष्ट्रातल्या सर्व अंध-ग्रंथालयांचं एक नेटवर्क त्यांना स्थापन करायचं आहे. त्याआधी जिल्ह्यातल्या निदान एका अंधशाळेत कमीत कमी २५ पुस्तकं तरी असतील, अशी सोय करायची आहे.

आपण मायबोलीवर टंकलेखन करून छपाईच्या दृष्टीनं उपयोग नाही, पण जर आर्थिक मदत द्यायची असेल, तर आपण हडपसरच्या संस्थेशी किंवा निवांत अंध मुक्त विकासालयाशी संपर्क साधू शकता.

www.niwantvision.com इथे अधिक माहिती मिळू शकेल.

काही कारणांमुळे हे लिहायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. Happy

मायबोलीवर टंकलेखन करून ते आपोआप ब्रेलमधे रुपांतरीत करण्याचे तंत्रज्ञान विकसीत करण्याबद्दल मी इथे लिहलं होतं. आणि त्या दृष्टीने थोडे कामही सुरु केले होते. पण तसं करावं का असा विचार करतो आहे. वर चिन्मयने लिहल्याप्रमाणे टंकलेखन करण्यासाठी काही अंध व्यक्तिंना थोडा आर्थिक फायदा होत असेल तर अशा सोयीमुळे तो कमी होईल का आणि कुणाच्या पोटावर आपण पाय देतोय का या भितीने सध्या थांबलो आहे.

चांगली माहिती दिलीस रे चिन्मय. मी पण मदत करू इच्छितो. केदारने सुपंथचे लिहीलेच आहे. टंकलेखन वगैरे करायचे असेल तर ते पण मी करू शकतो.

चिन्मय तू लिहीतोस तसे पुस्तक लिहीण्यामुळे त्यांना मदत होईल, पण इथे लिहून आणखीही काही साध्य होईल ज्यात ते नुकसान भरुन निघेल, ते आर्थिक नसेल पण मला वाटते की इथे लिहून मदत केली तर ती फार उपयोगी होईल.

कारणे

१. आपण अनेक पुस्तकं छापणार नाही आहोत. (म्हणजे हा मुख्य व्यवसाय नसाणार)
२. असे पुस्तक इथे लिहून छापन्यामुळे खर्च कमी लागेल व जास्तीत जास्त लायब्ररीत हे पुस्तक वितरीत करता येईल. वाचणार्‍यांची संख्या पाहता हे नुकसान काहीही नसेल. ( ग्रेटर गुड)
३. इथे लिहून मदत करणारे जास्त दिसत आहेत. जर प्रोजेक्ट बारगळला तर ते देऊ पाहत असेलेली ही वेळेची बहुमुल्य मदत (डोळस लोकांनी केली तरी) उपयोगात आणली जाणार नाही.
४. कधी कधी फक्त आर्थिक मदत देउन उपयोगी नसते. तर त्यांचा भावविश्वात आपणही सामिल झालो तर मिळणारे माणसिक समाधान (दोघांनाही) हे उच्च ठरते, एक वेब बेस्ड समाज आपल्या रोजच्या गरजा जाणून असे पुस्तक लिहून आपल्या ह्या लढाईत आपल्या सोबत आहे ही जाणीव फार मोठी ठरेल असे मला वाटते. जी नक्कीच दोन चार हजारांच्या नुकसानापेक्षा जास्त आहे.
५. प्रोजेक्ट जर बारगळला तर तेल व तुप दोन्ही जाणार.

इथे सर्वांना जे मान्य होईल तेच मलाही. फक्त दुसरी बाजू नोंदवावी वाटली.

इथे आपण चर्चा आणि इतर मदत काय करणार आहोत ते चालू ठेवूया. फक्त मायबोलीवर टाईप केलेले आपोआप ब्रेलमधे रुपांतर होईल असे जे तंत्रज्ञान विकसीत/सुधारीत करणे मी चालू केले होते त्याला मी स्वल्पविराम घेतलाय. बाकी गोष्टी थांबवायची गरज नाही.

braille-2.jpg

अजय, केदार,

मायबोलीवर लिहून सध्या तरी काहीच उपयोग नाही, कारण मुळात ब्रेलची छपाईयंत्रं हे फाँट स्वीकारत नाहीत. C-DACदेखील यावर काम करत आहे. हडपसरच्या संस्थेत केवळ ब्रेलमध्ये लिहिलेलंच स्वीकारलं जातं. निवांतच्या छपाईयंत्रासाठी श्रीलिपीतून रुपांतर केलेली इमेज लागते. आनंदवनातील छ्पाईयंत्रही हे फाँट स्वीकारत नाही.

माझी कल्पना थोडी वेगळी होती. मी सुद्धा हा धागा बघून 'ट्रान्सलिटरेशन' ह्या पध्धतीने काही करता येईल का ते चाचपत होतो.

सद्य स्थितीतल्या 'युनिकोड' वरुन ब्रेल रुपांतरित करणे जमले मला - तेव्हा इथे टंकलेखन करण्यापेक्षा 'युनिकोड' असलेल्या गोष्टी ब्रेल मधे रुपांतरित करुन छापल्या तर ?

गुगल शोध (खर तर बिंग शोध) घेतला तर बरच काही सापडल. अगदी १८०० $ पासून मिळणारे प्रिंटर्स आहेत शिवाय त्यासोबत 'winbraille' हे सॉफ्टवेअर फुकट मिळते जे तुमच्या MS Office मधून थेट ब्रेल मधे छापू शकते - इतर बर्‍याच भाषा सपोर्टेड आहेत - अर्थातच मराठी, हिंदी नाही पण ते करणे फारसे अवघड नाही. शिवाय ते म्हणतायत की साध्या कागदावर पण छापता येते पण टिकाउपणा अर्थातच कमी असेल.

अजून वेळ मिळाला की लिहितो अजून.

ब्रेल मधली पुस्तके सोडुन अजुन काहि........

चिनुक्स ने लिहिल्या प्रमाने अन्ध व्यक्ति ना व्यावसायीक प्रशिक्षन दिले जाते. सध्या जे प्रशिक्षन दिले जाते त्यातले अनेक कोर्स हे outdated आहेत अस मला वाटत. कारण एका अन्ध व्यक्तिला ते कोर्सेस करुन स्वताचे घर चालवायचे असेल तर ते शक्य नाहि. आणि पुर्ण पणे स्वावलबी पण होता येणार नाहि.

उदा: खडु बनविने, टन्क्लेखन, telephone operator, सुतारकाम, गृहविज्ञान वगैरे,

पण कागदि पिशव्या बनविणे, पेपर डिश बनविने, वह्या बनविने , physiotheropy, हे कोर्सेस सध्या च्या काळात चालण्या सारखे आहेत.

पिशव्या बनविन्याचे fully automatic मशिन ८ लाखाला मिळते. आणि एकदम साधे मशिन ३५००० ला मिळते. जे वापरणे सोप्पे असते. सध्या अनेक institutions आहेत ज्या हे पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षन देतात. पण नन्तर ह्या मशिन कुठुन घ्यायच्या अस प्रश्न त्याना पडतो. ह्या मशिन अन्ध लोकाना घेउन देन्या साठि कोणाला मदत करयची इछ्छा असेल तर ते करता येइल. मतिमन्द लोक सुध्ध हे काम करु शकतात आणि त्या लोकाना त्यातुन ५००० ते ६००० रुपयाचे उत्पन्न मिळु शकते.

किन्वा कोनि जर retail chain management मधे काम करत असेल इथे किन्वा परदेशात, तर तुम्हि ह्या मेण्बत्त्या, पिशव्या, पेपर डिश साठि मागणी निर्माण करु शकता का?

एक लेडिज ड्रेस शिवायचि किमत आज बाहेर १५० ते २५० पर्यन्त आहे. अन्ध महिलाना शिवण काम करता येते. दोन चार अन्ध महिला मिळुन एक दुकान चालवु शकतात. चान्गल्या मोक्याच्या जागि एक १०X१० फुटाचा गाळा जरि कोणी देउ शकलात तरि हे करण्यासारखे आहे. साधी साधी कामे जसे फोल पिको वगैरे त्याना अगदि सहज जमते.
जर कोणी चान्गल्या मोठ्या मोठ्या manufacturing unit मधे Purchase dept or Stores मधे असाल तर कम्पनी कामगार लोक जे काम करताना हातमोजे वापरतात ते पण तुम्हि या लोकान्कडुन बनवुन घेउ शकता.

फारच छान माहिती. वाचल्या बरोबर मदत करायला आवडेल असा लेख.

मी मायबोलीची नेहमीची वाचक आहे. प्रतिसाद मात्र प्रथमच देत आहे.
मुम्बईला रहाते. आर्थिक मदत करेनच पण ईतर काही मदत करता आल्यास नक्की आवडेल. जरूर कळवा.

थर्ड आय च्या वीणाताईंची मुलाखत वाचून हा धागा आठवला परत.

मॉड्युलर इन्फोटेकने विकसित केलेल्या तंत्रात पुस्तकाची पानं स्कॅन केली जातात, आणि या इमेजचं ब्रेलमध्ये रुपांतर होतं. मात्र त्यासाठी मंगल इ. फाँट चालत नाहीत. केवळ श्रीलिपी चालते. यासाठीचं प्रिंटरही वेगळं असतं.
यामुळे हल्ली प्रकाशक त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकाची softcopy श्रीलिपीमध्ये convert करून देतात, म्हणजे ब्रेलमध्ये छापताना त्रास वाचतो. >>

हे तंत्र वापरुन एखादे पुस्तक ब्रेल मधे छापायचे असेल तर

हे सॉफ्ट्वेअर, त्यासाठी स्कॅनर, संगणक, ब्रेल छापू शकणारा प्रिंटर या गोष्टी लागतील. अशा एका सेटअप साठी साधारण किती खर्च येईल ? शिवात अकोल्यातली शाळा किंवा थर्ड आय असोसियेशन यांच्याकडे असा सेट अप दिल्यास तो पुढे स्वत:च चालवण्यायोग्य मनुष्यबळ आहे का ?

चिनूक्स, मायबोली / सुपंथ किंवा संयुक्तातर्फे एखाद्या संस्थेला अशी मदत करायची असल्यास किती खर्च येईल ? काय काय गोष्टी लागतील याबद्दल सविस्तर लिहाल का ?

ब्रेल पुस्तके प्रकाशित करणार्‍या काही संस्था आहेत का ? अशा एखाद्या संस्थेला २० ते २५ हजार रुपये देऊन शाळकरी मुलांसाठी अवांतर वाचनाची पुस्तके छापून घेऊ शकतो का ?

Pages