हरभर्‍याच्या डाळीचं पिठलं

Submitted by तृप्ती आवटी on 18 February, 2010 - 15:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी भिजवलेली हरबरा डाळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, एक वाटी कोथिंबीर, मीठ, २-३ लसूण पाकळ्या, एक-दीड कप गरम पाणी, फोडणीसाठी- तेल, मोहोरी, हिंग, हळद.

क्रमवार पाककृती: 

ह. डाळ, मिरच्या, लसूण आणि अर्धी कोथिंबीर बारीक वाटून घ्यावी. हिंग-हळद-मोहोरीची फोडणी करुन त्यात हे वाटण घालावे. वरुन गरम पाणी, मीठ, उरलेली कोथिंबीर घालावी. चांगले उकळवुन घ्यावे. गरम गरम भाताबरोबर खावे. तूप घ्यायला विसरु नये.

वाढणी/प्रमाण: 
चार मोठी माणसे
अधिक टिपा: 

१. हे पिठले भाताबरोबर खातात त्यामुळे जरा वाहते ठेवावे पण अगदी पुळुक पाणी पण नको.
२. तिखट चालत नसेल तर मिरच्या कमी घालाव्यात.
३. कधी तरी बदल म्हणून लसूण बारीक वाटण्या ऐवजी, तेलात लाल तळून घेतला तरी छान लागते हे पिठले.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हडळीच्या पिठल्याची कवटीमधे ** घेऊन हाडाच्या रवीने घुसळुन करायची कृती टाकेन लवकरच Wink

हे मला लहानपणी अजिबात नाही आवडायचं. आता खूप आवडतं Happy

डाळ वाटून करायचं पिठलं मीही पहिल्यांदाच वाचलं.

काल रात्री सेलवरून वाचताना ह. आणि डाळ मधलं टिंब दिसलंच नव्हतं. म्हटलं, कसली भयानक नावाची पाकृ सिंडरेलाने टाकली आहे. Lol

आई ग ! सिंडरेला आत्ताच जेवुन आले पण वाचुन परत भुक लागली. टिपिकल नगरी पा.कृ. आहे. आमच्याकडे होत ना बर्‍याचदा. फक्त त्यात वरुन मी तुपाऐवजी कच्च तेल घेते, कसल जबरी लागत म्हणुन सांगु.:स्मित:

ही तर पातळ वाटली डाळ आहे (कैरीशिवाय ) >>> अगं आंबेडाळीला कैरी घालतात किसून. वाटल्या डाळीला नुस्तं लिंबू पिळलं वरुन तरी मस्त, नाही पिळलं तरी मस्त.

वा.डा. मधे लसणीऐवजी आलं घालते मी.

सिंडे, हे आमटीसारखं / कुळथाच्या पिठल्यासारखं पातळ करायचं का?

कोणी काय वाचले तर कोणी काय..

मी सकाळपासुन वाचतेय त 'ह. डाळीचं पिठ' आणि काय असेल हा पदार्थ देव जाणे, नंतर वाचुया म्हणुन पुढे ढकलत राहिले. आता उघडुन पाहिले तर 'ह. डाळीचं पिठलं' दिसले..

उद्या करुन पाहायला पाहिजे

वाटलेल्या डाळीची डाळीची कढीपण छान होते. त्यात शेवग्याच्या शेंगा घालायच्या असतात. दाक्षिणात्य पद्धत आहे ती. आमच्या घरी वाटल्या डाळीचे पिठले आठवड्यातून एकदा तरी बहिण करायचीचं. एकदम छान चव लागते. मुगाच्या डाळीचे पिठले पण असेच करतात. ते हलके असते पचायला.

सिंडे, हे आमटीसारखं / कुळथाच्या पिठल्यासारखं पातळ करायचं का? >>> अगदी आमटी एव्हढं नाही पण कुळथाच्या पिठल्यासारखं. साधारण दाल-तडका नावाने जे फोडणीचं वरण रेस्टॉरंटमधे मिळतं तेव्हढं प्रवाही.

प्रतिभा, कच्च तेल घालुन ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागतं. पातीचा कांदा हवा तोंडी लावायला Happy

कधितरी बदल म्हणुन लसुण बारील वाटण्या ऐवजी, तेलात लाल केला तरी छान लागते हे पिठले.

बरी आठवण केलीस करतेच उद्या मी पण Happy

प्रतिभा, कच्च तेल घालुन ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागतं. पातीचा कांदा हवा तोंडी लावायला
- अगदि अगदि सिंडे, पातीचा कांदा जोडिला म्हणजे पंचपक्वानांचा बेत फिका त्यापुढे. Happy

सिंडरेला |
हे पिठ्ल माझी आम्बोलिची आज्जी बनवायचि. चुलिवरच पिठ्ल आणि नाचणीची भाकरि आणि उकड्या तांदळाचा भात. आइ ग्ग... त्या थंडीत हे कॉम्बिनेशन फारच छान लागायच.