मुलखा वेगळी माणसं
९७ साली नगरला मराठी साहित्य संमेलनाला जायचा योग आला. संमेलनाचे अध्यक्ष होते, ना. सं. इनामदार. संमेलन नगर कॉलेजच्या परिसरात आयोजीत केले असल्याने आणि ना. सं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असल्याने, अध्यक्षांची ओळख करून देण्याची जबाबदारी नगर कॉलेजच्याच एका इतिहासाच्या प्राध्यापकांवर सोपवण्यात आली होती.
ना. सं इनामदारांच्या कादंबर्ञा वाचून मी कसे उत्तम इतिहास शिकवतो, मला कशी वाचनाची आवड आहे, माझ्या तासाला विद्यार्थी कसे आवडीने बसतात, मी कसे रंगवून रंगवून इतिहास शिकवतो, त्यामुळे मुलांना तो अभ्यास न वाटता त्यांच्या मनात इतिहासाची गोडी निर्माण करण्यात मी कसा अत्यंत यशस्वी झालो आहे, आणि त्यामुळे मी कसा एक आदर्श प्राध्यापक आहे. इ. इ. इ.
ओळख संपली. माइक आला कार्यक्रमाचे सूत्र संचालक श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हातात, आत्ताच प्राध्यापक महोदयांनी ना. सं. इनामदारांच्या "थोडक्यात" ओळखी बरोबरच स्वतःची "सविस्तर" ओळख करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानून पुढच्या कार्यक्रमा कडे वळतो. मांडवात एकच हशा. सूत्रसंचलन इतके रंगतदार असु शकते हे त्यादिवशी पहिल्यांदाच समजले.
गाडगीळांचा हा हजरजबाबी पणा मला इतका भावला की त्यानंतर कुठेही "गाडगीळ" आणि "लाइव्ह" म्हटले की जायचेच असे सुरू झाले. त्या आधी गाडगीळ भेटले होते ते कधी साप्ताहिकांमधून मुलाखतकार या रूपात तर कधी वर्तमानपत्रातील "मुद्रा" सारख्या सदरात.
बरेच दिवसांपासून ऐकत होते गाडगीळ स्वतःचा असा एक २ अडीच तासाचा कार्यक्रम करतात. बघण्याचा योग अर्थातच येत नव्हता.
पण एखादा दिवस असतोच एकदम मस्त, सक्काळी-सक्काळी गॅलरीत २ साळुंक्या, पेपर मध्ये जाहिरात - गाडगीळांचा कार्यक्रम, तोही यशवंतरावला म्हणजे ऑफिस पासून जवळच, आणि मोफत :), प्रश्न फक्त एकच होता कार्यक्रमाची वेळ होती संध्याकाळी ५. ३० ऑफिस ला गेल्या-गेल्या तडक साहेबांचे केबिन गाठले, कुठलीही आगाऊ सूचना न देता, आणि प्रश्न टाकला मला आज संध्याकाळी थोडे लवकर जाता येईल का, कामात अत्यंत व्यस्त असलेल्या साहेबांच्या तोंडून बाहेर पडले, 'हो', आणि मी आल्या पावली मागे वळाले.
२२ जानेवारी, बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाचे नाव आहे "मुलखा वेगळी माणसं".
गाडगीळ कार्यक्रमाची सुरुवात करतात ती पुणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून. पु. ल., आचार्य अत्रे अशा महान लेखक - वक्त्यांना, वाचत -ऐकत लहानाचे मोठे झालेले गाडगीळ त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात ते एक-एक मजेदार किस्सा सांगून. [अन्यथा सदाशिव पेठी "गाडगीळ" नावाचा B.Com झालेला मुलगा हा बँकेत क्लार्क शिवाय दुसरे काही होणेच शक्य नाही - इति सुधीर गाडगीळ]
'बालगंधर्व' रंगमंदिराचा उद्घाटन सोहळा पु. लं च्या हस्ते होणार होता, त्यावेळेसच्या भाषणात पु. ल म्हणाले, "बाहेर पुरुषी आवेशातली स्त्री, आणि आत स्त्री वेषातला पुरुष, असे ठिकाण रंगभुमी ला मिळाले हे भाग्यच". [संदर्भ, बालगंधर्व च्या बाहेर असलेला राणी लक्ष्मीबाईं चा अश्वारुढ पुतळा, आणि आत असलेले बालगंधर्वांचे स्त्री वेषातले तैलचित्र]
या सगळ्या गोष्टी आपणही नेहमीच बघतो, पण हा विरोधाभास नेमक्या शब्दात टिपण्यासाठी पु. ल. च हवे.
असेच एकदा अत्रे प्रमुख पाहुणे असलेल्या सभेत, बॅ. गाडगीळ त्यांची ओळख करून देताना म्हणाले, माणूस तसा हुशार आहे, अफाट वाचन आहे, उत्तम वक्ता आहे, पण वागण्यात आणि बोलण्यात थोडी अतिशयोक्ती आहे. नंतर अत्रे बोलायला उभे राहिले. भाषणाची सुरुवात त्यांनी केली, " बॅ. गाडगीळ, आपल्या काकासाहेब गाडगीळांचे सुपुत्र" एक पॉझ घेतला आणि बॅ. साहेबांकडे बघून प्रश्न केला, "यात काही अतिशयोक्ती तर नाही ना? "
हे सगळे किस्से सुधीर गाडगीळांच्या तोंडून ऐकणे ही एक पर्वणीच आहे. पूर्णवेळ आपण खो-खो हसत तरी असतो किंवा आश्चर्यचकित तरी होत असतो. गाडगीळ म्हणतात, "तुम्ही हे जे खदखदता आहात तसे मी पूर्णं आयुष्यभर खदखदतो आहे अशा अनेक महान व्यक्तिंच्या सहवासात. आणि त्यामुळेच ताजेतवाने होण्यासाठी मला इतर कुठल्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता कधिच वाटली नाही. "
अगदी खरे आहे. आपणही संपूर्ण ताजेतवाने असतो कार्यक्रम बघून बाहेर पडताना.
आज पर्यंत भेटलेल्या १००% प्रोफेशनल व्यक्ती म्हणून गाडगीळ उल्लेख करतात, माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांचा. तर अत्यंत स्वच्छ मनाच्या म्हणून उल्लेख येतो आशा भोसले यांचा. १००% प्रामाणिक 'बोले तैसा चाले' अशी प्रतिमा असलेले अर्थातच 'बाळासाहेब ठाकरे', गाडगीळांचे लाडके व्यक्तिमत्त्व. बाळासाहेबां बरोबरची पहिली भेट गाडगीळ थोडक्यात अशी सांगतात,
दूरदर्शन साठी मुलाखत देणार का म्हणून विचारायला मातोश्री वर गेलो. सुरक्षेचे सगळे सोपस्कार पार पाडून बाळासाहेबांसमोर पोहोचलो. नमस्कार करून प्रश्न विचारला,
'साहेब तुमची मुलाखत हवी आहे, दूरदर्शन वर येणार का'.
[एक हात वर करून] ते मुलाखतीच वगैरे सोडा हो, एखादा मस्त विनोद सांगा.
बाळासाहेबांना विनोद खूप आवडतात असे ऐकले होते, मग म्हटले आलीच आहे संधी तर त्यांच्या वरचाच एक सांगावा.
एक माणूस बस स्टॉप वर उभा असतो. घाई - घाई ने दुसरा येतो आणि त्याच्या शेजारी उभा राहतो. पहिला दुसऱ्याला विचारतो,
-तुझी बाळासाहेब ठाकऱ्यांशी ओळख आहे का?
-नाही
-तुझी मनोहर जोशी शी ओळख आहे का?
-नाही
-तुझी शिवसेना विभाग प्रमुखाशी ओळख आहे का?
-नाही
-तुझी शिवसेना शहर अध्यक्षांशी ओळख आहे का?
-नाही
-तुझी एखाद्या शिवसैनिकाशी ओळख आहे का?
-नाही बुवा.
-मग जरा माझ्या पायावरचा पाय काढ.
बाळासाहेब हसले आणि म्हणाले, तुम्ही पत्रकार लोकं नेहमी आम्हालाच टार्गेट करता. सत्ताधारी पक्षाला कसे सोडता. ठीक आहे अजून एक सांगतो, असे म्हणून त्यावेळी दिल्लीत लोकप्रिय असलेला एक विनोद सांगितला.
नरसिंहरावांचे सरकार असताना विरोधी पक्षाकडून प्रश्न विचारला गेला, "२+२ किती". अर्थातच २ महिने काहीच उत्तर आले नाही. पुन्हा एकदा विचारणा झाल्यावर नरसिंहराव अर्जुनसिंग ना विचारतात, 'ये २+२ कितना होता है' उत्तर येते "वैसे तो चार होता है, फिर भी हमारे प्रदेश जाना पडेगा, लोगों से बात करनी पडेगी. फिर देखते है लोगों का क्या केहना है. फिर आप तक पहुचा देंगे. " मग नरसिंहरावांनी शरद पवारांना विचारले, पवार साहेब २+२ किती, त्यावर पवारांचा धोरणी प्रश्न "द्यायचे आहेत की घ्यायचे"
आवडला विनोद बाळासाहेबांना, पण म्हणाले, बघा इथे पण तुम्ही आम्हाला कमी लेखले, आम्ही काय सांगू नसतो शकलो का २+२ किती. आमचा उल्लेखच टाळला तुम्ही. आमचे मनोहर जोशी, मास्तर माणूस, त्यांच्यावर तरी विश्वास दाखवायला हरकत नव्हती.
आणि अचानक माझ्या तोंडून बाहेर पडले, पण उत्तर तर तुम्हीच दिले असते ना. एकदम खूश झाले बाळासाहेब या उत्तरावर आणि माझ्यावर. त्यादिवसा पासून सुरक्षेचे सगळे नियम बाजूला ठेवून 'मातोश्री' वर माझा वावर नियमित झाला.
अशा अनेक हलक्या फुलक्या विनोदांची पेरणी असलेला हा कार्यक्रम जसा-जसा पुढे जातो तसा-तसा रंगतच जातो.
लकडी पुला समोरच 'गरवारे' पुलाचा शुभारंभाचा कार्यक्रम होता. बरीच मान्यवर मंडळी जमली होती. त्याचवेळी डेक्कन वर काही खरेदी साठी आलेल्या पु. लं चे लक्ष त्या गर्दी कडे गेले. जवळ येऊन त्यांनी चौकशी केली. जमलेल्यांपैकी एकाने माहिती पुरवली
-पुलाला गरवारेंचे नाव द्यायचे आहे, त्याचा कार्यक्रम आहे.
-पु. ल म्हणाले, का रे बाबा जिवंतपणीच का द्यायचे नाव.
-मेल्यानंतर त्यांची आठवण राहावी म्हणून.
-पु. ल म्हणाले पण या पुला मुळे सगळे सायकल आणि हातगाडीवाले लोकं गरवारेंपेक्षा त्यांच्या आईचीच आठवण जास्त काढतील.
-कसे काय बुवा
या प्रश्नावर पु. ल. नि जोर लावून पायडल मारण्याची ऍक्शन केली आणि म्हणाले 'च्यामारी त्या गरवारेच्या आईच्या'. या पुलाला मोठ्ठा चढ आहे, त्या पार्श्वभूमी वर ही प्रतिक्रिया.
"पंडित भीमसेन जोशी" म्हटले की, सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातले काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार. पण "ऑटोमोबाईल" म्हटले तर कसे वाटेल. गाडगीळ सांगतात, पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेज वाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत. एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. गाडगीळ त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले 'बसा'. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती. तासाभरात ते कोरेगावभिमा ला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. गाडगीळ जीव मुठीत धरून गाडीत बसले होते आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून 'हुश्श' केले. त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
जशी पंडितजीच्या अनोळखी पैलूची ओळख नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
अजून बरेच आहे जे तुमच्या बरोबर 'शेअर' करायला आवडले असते पण तुमची कार्यक्रमाची रंगत कमी होईल अशी भीती वाटते. तर मंडळी एकदा तरी जरुर बघा माहिती, किस्से, विनोद, व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडवून दाखवणारा हा सदाबहार कार्यक्रम.
आयुष्यात मला एकाच व्यक्तीची असूया वाटली / वाटते, ती व्यक्ती म्हणजे "सुधीर गाडगीळ". केव्हढा अफाट लोकसंग्रह. किती नानाविध अनुभव. महान म्हणता येईल अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा सहवास, त्यांचा विश्वास, माया, त्यांचे आयुष्य जवळून बघण्याची संधी लाभलेले हे व्यक्तिमत्त्व मला नेहमीच 'मुलखा वेगळे' वाटते.
[ श्री. सुधीर गाडगीळ, हा कार्यक्रम खाजगी स्वरूपात पण करतात. त्यांचा फोन नं माझ्याकडे आहे, कुणाला हवा असल्यास नक्की सांगा. ]
.
.
मस्त लिहीले आहे .
मस्त लिहीले आहे .
<<आयुष्यात मला एकाच व्यक्तीची असूया वाटली / वाटते, ती व्यक्ती म्हणजे "सुधीर गाडगीळ". केव्हढा अफाट लोकसंग्रह. किती नानाविध अनुभव. महान म्हणता येईल अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा सहवास, त्यांचा विश्वास, माया, त्यांचे आयुष्य जवळून बघण्याची संधी लाभलेले हे व्यक्तिमत्त्व मला नेहमीच 'मुलखा वेगळे' वाटते.>> अगदी अगदी
लहानपणी मला पण त्यांना भेटावेसे वाटायचे. (माधुरीच्या मुलाखती वगेरे घेतात म्हणुन ) कॉलेज मध्ये त्यांची मुलगी माझ्या वर्गात होती पण मला हे अगदी थर्ड इयरला समजले नाहीतर तेव्हा एकदातरी त्यांना भेटायचा प्रयत्न केला असता.
खुप मस्त लिहिले आहे. हे सगळे
खुप मस्त लिहिले आहे. हे सगळे अनुभव छान मांडले आहेस.
माझ्याकडे त्यांचे 'लाइफस्टाइल' पुस्तक आहे. इथे कॅन्सास सिटीत त्यांचा शो बघितला होता.
मस्तच उतरला आहे लेख. काही
मस्तच उतरला आहे लेख.
काही म्हणा तुझे साहेब वेंधळे आहेत की काय ?
निबंध, 'लाइफस्टाइल' मात्र अगदी बोर आहे बर्का.
त्यांच्या गप्पा ऐकुन घेतले
त्यांच्या गप्पा ऐकुन घेतले होते गं. अजुन वाचलेच नाही. दोन दिवस वरच होतं नंतर मला वाटते माझ्या नवर्याने बेसमेंट मध्ये टाकुनही दिले असेल.
कसलं मस्त लिहीलय, खुप छान!!
कसलं मस्त लिहीलय, खुप छान!!
जपानला दोन वेळा गाडगीळांची
जपानला दोन वेळा गाडगीळांची चक्कर झाली होती. त्यावेळेस त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला होता.
मला पण त्यांच्या व्यासंग, लोकसंग्रह, अनुभव, इ. बद्दल फार मजा वाटते. खरचं अस लाईफ मिळायला हवं होतं.
लेख आवडला! गरवारेंची आई
लेख आवडला! गरवारेंची आई
हो, मी पण तेच म्हणणार होते
हो, मी पण तेच म्हणणार होते तुझ्या साहेबांबद्दल :p
मस्त लिहीलयस!
लेख मस्तच गं आरती. >>पण
लेख मस्तच गं आरती.
>>पण तुमची कार्यक्रमाची रंगत कमी होईल अशी भीती वाटते.
(कार्यक्रम कधी बघायला मीळेल माहिती नाही. तेव्हा आणखी भाग लिहिलास तरी आवडेल. )
मस्त लेख!! खरच लिही आणखीन.
मस्त लेख!! खरच लिही आणखीन. पुन्हा ऐकायला मिळालच तरी त्याची रंगत काही कमी असणार नाही.
जबरीच... पवार साहेब २+२
जबरीच...
पवार साहेब २+२ किती, त्यावर पवारांचा धोरणी प्रश्न "द्यायचे आहेत की घ्यायचे"
त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
'च्यामारी त्या गरवारेच्या आईच्या'. >> हे फारच भारी..
मस्त आहे हा कार्यक्रम, एकदम
मस्त आहे हा कार्यक्रम, एकदम त्यांच्यासारखाच, मनमोकळा !!!
छान. अजुन आवडेल वाचायला.
छान. अजुन आवडेल वाचायला.
माझ्या माहितीनुसार ह्या
माझ्या माहितीनुसार ह्या कार्यक्रमाचा २ व्हिसीडींचा संच "सुहास्य वदने" अशा नावाने सर्वत्र ऊपलब्ध आहे.
वा, छान लिहिल आहे. बघायला
वा, छान लिहिल आहे. बघायला पाहिजे हा कार्यक्रम.
"सुहास्य वदने" अशा नावाने
"सुहास्य वदने" अशा नावाने सर्वत्र ऊपलब्ध आहे >> अलुलकर मधे मिळतो हा संच.
मृण्मयी,अमृता,
या CDs मायबोली वर विक्री विभागात उपलब्ध करुन देण्या बद्दल अॅडमीन आणि गाडगीळांचे बोलणे झाले आहे. मिळतील तुम्हालाही लवकरच.
सखी आणि सिंडी, मला पुढच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार नाही हं [तुमच्या या वात्रट पणा मुळे ]
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद
आरती - रागाऊ नकोस. तू
आरती - रागाऊ नकोस. तू लिहिलेलं आवडलं पण फारच कमर्शियल वाटतात मला ते. अति सफाईदार व्यावसायिक (आणि तेवढेच.) असो. आपलं काम नीट न करणा-यांपेक्षा हे निश्चितच बरं. ओवर एक्सपोजरही झाल्यासारखं वाटतं. जुने निवेदन जसंकी 'स्मरणयात्रा' मात्र उल्लेखनिय वाटते आणि अस्सलही. अलिकडच्या कार्यक्रमात/ निवेदनात नाविन्य असं काहीच नसतं गेल्या अनेक वर्षातल्या. आत्ता सुद्धा २०१० मॅजेस्टिक गप्पांमध्ये ९०% मजकूर तोच होता वर लिहीलेला. तेच ते भाषिक विनोद/कोट्या सगळं जिथल्यातिथे असतं- कॅल्क्युलेटेड.
सुहास्य वदने सर्वत्र उपलब्ध आहे.
छान लिहीलस आरती. गाडगीळांच्या
छान लिहीलस आरती. गाडगीळांच्या माणसांच्या संग्रहाबाबत अनुमोदन.
वेल सेड रैना, त्यांच्या खुपशा
वेल सेड रैना, त्यांच्या खुपशा कोट्या, इ. जुन्या काळातल्या आहेत. मध्यंतरी पुलाखालुन बरच पाणी गेलं आहे. अलीकडच्या काळातल्या लोकांना भेटल्याचे, त्यांच्या मुलाखतींचे संदर्भ फारसे डोकावत नाहीत.
एवढ्यात त्यांनी केलेले एखाद्या कार्यक्रमाचे निवेदन ऐकण्यात नाही त्यामुळे त्याबाबत काही बोलत नाही.
जपान मधे प्रशांत दामलेची घेतलेली मुलाखत पाहिली / ऐकली, पण त्यामधे दामलेंची कारकिर्द हा विषय असल्याने इतर विषय आले नव्हते (अपेक्षितही नव्हते).
आरती, छान लिहीले आहेस. रैना,
आरती, छान लिहीले आहेस. रैना, महेशलाही अनुमोदन.
..
..
मी त्यांचा हा पहिलाच
मी त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम पहिल्यांदाच बघितला, त्यामुळेही असेल, मला एकदम फ्रेश वाटला, पण एकदा बघण्यासारखा तर नक्कीच आहे ...
अलीकडच्या काळातल्या लोकांना भेटल्याचे, त्यांच्या मुलाखतींचे संदर्भ फारसे डोकावत नाहीत >>
अलिकडच्या काळात अभ्यासपुर्ण मुलाखतींपेक्षा 'देखण्या' मुलाखतींचे प्रस्थ असल्याने असेल कदाचित.
आज वाचला लेख. मस्त झाला
आज वाचला लेख. मस्त झाला आहे....... पुन्हा कार्यक्रम कधी आहे कळाले तर सांग, जाउयात.
सकाळ घ्या की तुम्ही ....
सकाळ घ्या की तुम्ही ....
अलिकडच्या काळात अभ्यासपुर्ण
अलिकडच्या काळात अभ्यासपुर्ण मुलाखतींपेक्षा 'देखण्या' मुलाखतींचे प्रस्थ असल्याने असेल कदाचित>>>
मस्त लिहीले आहे!!
मस्त लिहीले आहे!!
आरती, छान लिहीले आहेस.
आरती, छान लिहीले आहेस.
धन्यवाद, चन्द्रकान्ता,ज्ञाती
धन्यवाद,
चन्द्रकान्ता,ज्ञाती आणि मिनी.
मस्तच . तुलनात्मक ओळख व
मस्तच . तुलनात्मक ओळख व गाडगीळांचा हजरजबाबीपणा
Pages