गाय,वाघ आणि स्त्री

Submitted by अभय आर्वीकर on 28 January, 2010 - 12:44

माझ्या वाघास दात नाही...... या गझलेतील
"गायीस अभय देण्या,वाघास दात नाही" असा मतला आहे. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभुमी उलगडण्याचा मी केलेला प्रयत्न. बघा तुम्हाला पटतेय का ते?

बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारिरीक अंगाने अबलाच.स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
आपल्या गझलेच्या मतल्याशी बाईचा संबध नसल्याने आता फक्त गायीविषयीच चर्चा करू.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गीक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही 'हत्यारे आणि ढाली' दिल्या आहेत.
उदा :- उंदराला बिळात घुसता येते,मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते,कुत्र्याला भिंतीवर नाही चढता येत.
या झाल्या उंदिर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करुन कौशल्याने अन्नमिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघु.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रुपेक्षा अधिक वेगवान पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरित्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करुन साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करुन संपुर्ण सजिव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही.विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढु शकत नाही.साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करु शकेल.
पण गायीचे काय? गाय पुर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा.(कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या ? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या ? )
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणारच. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मुलभुत मानवी स्वभावच.
गाईचे प्रेम,भुतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय,राजकिय पक्षांची कार्यालये वगैरे ठीकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दुध काढतांना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मुलभुत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल?.. गाईचे काय होईल ?.
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दुध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु.प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दुध खरेदी करणार्‍या ग्राहकांचीसंख्या किती?.
जर अशी स्थिती उद्भवली तर माणुस गाईचा त्याग करणारच.
मग गाईचे काय होईल ? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करु शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत,ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे.ना हत्तीसारखे शक्तीयुक्त सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षिण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल ?
तिला गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण ?
गायीचे जेवढे शत्रु आहेत त्या सर्वांना पराभुत करुन गायीला जिवदान,अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह,वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करु शकत नाही...................
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच...
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भुक शमविण्याची वस्तु या नजरेने पाहाणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच...
तिचे प्राण वाचवू शकेल,अभय देवु शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कूठे ?
.....गायीस अभय देण्या,वाघास दात नाही.
हा या मथल्याचा साधा,सोपा,सरळ आणि थोडक्यात अर्थ....
.
..गंगाधर मुटे
....................................................................
तात्पर्यः ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जावु शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर.............
म्हणुन गाय आणि स्त्री या दोघीत या अनुषंगाने विचार केला तर त्यांच्या व्यथा सारख्याच वाटतात मला.
...................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच...
तिचे प्राण वाचवू शकेल,अभय देवु शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कूठे ? >>>> एव्हढेच सांगीतले असते तरी चालले असते गंगाधरराव.
पण तरीही तुमच्या मतल्यामधे हे स्पष्ट होत नाही.

बाकी तुमचे स्पष्टीकरण वाचुन शिववडा चर्चा आठवली मला.

<< पण तरीही तुमच्या मतल्यामधे हे स्पष्ट होत नाही. >>
जे म्हणायचे ते शब्दात उतरले नसावे.:स्मित:
प्रकाशभाई, नेमके कुठे चुकते हे शोधण्यासाठी आटापिटा चाललाय हा.