आता गाजले की बारा...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कुणाची भारतवारी ठरलेली असो (शर्मिला) कुणी 'बदकांची रांग चाले' (तॄप्ती) किंवा कुणाला येता आले नाही म्हणून शेवटच्या क्षणाला रडू फुटले असो. बा रा चे ए. वे. ए. ठि. होणार म्हणजे होणार हे नेहमीप्रमाणे ठरलेलेच होते. आपल्याला येता येत नाही म्हणून इतरांच्या तंगड्या खेचायच्या विचाराने तॄप्तीने बर्फ पडतोय, लोक अडकलेत, हायवे बंद अशी किती तरी छायाचित्रं नेटाने नेटावर शोधून ए. वे. ए. ठि.च्या बा फ वर डकवून श्री. प्रकाश ठुबे यांच्यावर कुरगोडी करायचा प्रयत्न केला असला, तरी निरभ्र आकाश, आणि बा रा ए वे ए ठि चा मुहुर्त असल्याने

कुणाच्याच उत्साहावर दही सांडले नाही. न येणार्‍या लोकांच्या कंपूत विजय, आरती आणि संदिप या मंडळीनी स्वतःचं नांव नोंदवलं खरं पण त्याचा इतरांवर परीणाम झाला नाही. अमॄता आणि किरण यांनी घरातून बाहेर पडायचा आधी तीन दिवस 'आम्ही निघालो आहोत..' अशी पोस्ट टाकून सर्वांचा उत्साह वाढवला. ते पोचले तेव्हा जवळपास अर्धेअधिक ए. वे. ए. ठि. उलटून गेले होते त्याला आमचा नाईलाज.. या ए. वे. ए. ठि. सोहळ्याला काही लोक गटग असे म्हणून कमीपणा आणताहेत अशी अधिकॄत तक्रार झक्कीनी नोंदवून ते झक्कीच आहेत याची खात्री येण्याआधी करुन दिली त्याबद्दल आभारी आहोत. तॄप्तीचे 'बदकांची रांग चाले...Audio Format मधे मिळाल्यास इथे पोस्टण्यात येईल काळजी नसावी...

ठरल्यावेळेप्रमाणे म्हणजे ठिक ११:३५ मिनीटांनी (पाच मिनीटे इकडे तिकडे चालते आमच्याकडे) मी हॉल वर पोहोचलो तेव्हा आनंदराव आणि श्रीयूत मैत्रेयी नुकतेच येऊन टेबलं खुर्च्या मांडत होते. वेळेवर पोहोचता यावे म्हणून आनंदराव भल्यापहाटे म्हणजे ९ वाजतात निघाले होते म्हणे. वाटेत त्यांनी 'जब वी मेट' ची तबकडी ऐकली होती 'ये Point भी नोट किया जाय'.... घटनास्थळावर पोचल्यानंतरही एकदा 'मोजा रे मोजा' नामक चीज ऐकून त्यानी इमारतीत प्रवेश केला. (सकाळीच रंपा पिता यावी म्हणून की सौ. काहीतरी काम सांगेल म्हणून' ते खरं तर घरून पळाले यावर एकमत होऊ शकले नाही). मी त्यांना पाहिलं तेव्हा ते आणलेले (कागदी रुमाल), आणलेल्या (रंपाच्या बाटल्या) इत्यादी चीजवस्तू नीट लाऊन ठेवत होते (पहा नंतर येणारी छायाचित्रे). परवा निघूनही अमॄताचा पत्ता नव्हता..

मी पापलेटाची आमटी आणि भात वगैरे शिजायला ठेवले तेवढ्या आपल्या अगत्यशील यजमानीण बाई म्हणजेच मैत्रेयी आणि तिची मुलं आली. त्यानी आल्या आल्या आनंदरावाना 'दारू पिणे आरोग्यास घातक असते' असे सांगून टाकलं पण ते डरले नाहीत आणि त्यांनी (म्हणजे आनंदरावानी) सरळ बीयर बाटलीचा ताबा घेतला. आता ते तसं करतात म्हटल्यावर सौजन्य म्हणून आम्हालाही (म्हणजे मी आणि नयनिश) त्याना कंपनी द्यावी लागली. मैत्रेयीच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या मुलाने 'आपला बाप अल्कोहोलिक आहे', असं शाळेत जाहीर करून टाकल्याने आता 'आलेले आजोबा पियक्कड आहेत म्हणाला तर नवल काय?' त्यामुळे मग आम्हीही वैधानिक इशार्‍याकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं.

फोन करून कळवणार्‍यांमधे स्वात्यानी आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो असे सांगितले होतेच. तिकडे भाई समोसे तळायला म्हणून कुठे गेले होते तेही दिसत नव्हते. काही वेळात एकामागोमाग एक मंडळी पोहोचायला लागली. अमॄता बैलगाडीने निघाली की काय अशी शंका येऊ लागली कारण तिला हेलिकॉप्टरसाठी दिशा दिल्या होत्या...

भाईंच्या पाठोपाठ आमचे पेशल गेष्ट म्हणून अजय-भावना यांनी हजेरी लावली. स्वात्याची येऊन पडल्या, (पण मोती पिकलेले पाहीले नाहीत). आल्या आल्या आनंदरावांनी प्रत्येकाला एक एक तिळाची वडी देऊन (म्हणजे एका तिळाची वडी नव्हे - ते विशिष्ट शहराच्या प्रेमात असले तरी - तीळाची एक एक वडी देऊन) त्यांचे दात शाबूत आहेत याची खात्री करून घेतली. सौ ला 'सर्वांचे दात शाबूत आहे' असा रिपोर्ट देतो म्हणाले. ती वडी उत्कॄष्ट झाली होती असं भावनाने म्हणताच, तिला असलं काही सांगू नका असं पुटपुटत ते तिकडून सटकले.

सागर आणि सोनाली येऊन पोहोचलेच होते, त्यानी कॅमेराकाढून करामती करायला सुरूवात केली. कॅमेर्‍याची लेंस धरायला सोनालीला उभी करावी का याचा विचार मला करावा लागला. सागरने आणलेला कॅमेरा दोन मैलावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा फोटो काढू शकला असता याची खात्री पटली. विशाल आणि फचिन यांनी येऊन राजमलाई नामक पदार्थाचा 'राज' उघड केला आणि त्यावर चाललेली चर्चा संपुष्टात आणली. अमॄता चालत निघाली असावी एक अंदाज.

कुठे वडे, कुठे समोसे, कुठे पापलेटाची आमटी, कुठे चिकन, कुठे साबुदाण्याची खिचडी असं हादडणं चालू असताना अमॄता पोहोचली. किरणने गाडी चालवली म्हणून चुकलो असं काही तरी म्हणाली बहुतेक.
गप्पा टप्पा चालू असताना तॄप्तीची बदकं एकदम रांग मोडून गेली त्यामुळे तिला आता वेळ आहे असे कळले. हेलिकॉप्टरची सोय असल्यास मी येईन म्हणाली. पण कुणी तिचे ऐकले नाही. सकाळीच बर्फाचे फोटो टाकल्यामुळे सुड घेतला गेला. तिकडे मॄणला फोन करावा म्हणून काही नंबर फिरवले (टूक टूक करायचा इरादा होता) पण तिचा नंबर ९१ ने सुरू झाला त्याअर्थी ती भारतात असावी अश्या विचाराने तोही विचार रद्द करावा लागला.

शब्दवेध मधे मात्र फारच घोटाळे दिसत होते. इतरांना दिवाळी-फटाके असले सोपे सोपे शब्द तर आम्हाला हरताळका असले उपासाचे शब्द. त्यात काही मंडळी घरून शब्द पाठ करून आली होती. सागर पोटावर हात फिरवून 'अनरसे' या शब्दाचा क्लू देत होता. 'पहिल्यांदा सासरवाडीला गेल्यावर त्याला अनरसे दिले होते' असं सोनालीचे म्हणणे. 'त्यामुळे त्याचे पोट बिघडले होते का?' हा प्रश्न मी तिला वाईट वाटू नये म्हणुन विचारला नाही. कुठे कान ओढ (स्वतःचे) कुठे नाकाला हात लाव (स्वतःच्याच) असले प्रकार करून तो शब्द ओळखत होता. इकडे सोनाली आमच्या गटात असल्याने 'पालक' बरोबर 'शेपू' असले क्लू देत होती. मला पालक आणि पाल्य, पालक आणि पनीर, आलू आणि पालक असल्या जोड्या माहीत होत्या. पण पालक आणि शेपू??? धुळ्यात देतात म्हणे. मला आधी वाटलं ' पालक म्हणुन शेपू गळ्यात मारतात की काय?' पण नंतर कळलं. केल्याने 'एवेएठि' ज्ञानात भर पडते ती अशी. 'कशाला असल्या भाज्या खातात लोक,' इति आनंदराव. तिकडे स्वाती-देव आणि अजय-भावना या दोन दुहेरींना सगळेच शब्द फटाफट येऊ लागल्याने 'शब्दवेध' मधे बायकानी नवर्‍यांना वापरलेले सगळे शब्द (ठेवलेली नांव) त्याना आपापसात माहीत असल्यामुळे ते जिंकाताहेत असा निष्कर्श मी काढला..

मग अजयने अजून काही शब्द काढू म्हणुन जे शब्द काढले ते तर खर्‍या बाराबाफकरांची परीक्षा घेणारे ठरले. (टंच, माल, लोचट असले शब्द हल्ली वापरात दिसत नाहीत).

Who Am I नामक खेळामधे 'जब वी मेट' आणि 'मौजा ही मौजा' पर्यंत पोहोचूनही आनंदरावाना शाहीद ओळखता आला नाही. संगीतातली इतर सगळी क्षेत्र शोधून (म्हणजे गीतकार, संगीतकार, कवी इत्यादी) स्वातीला सोनू निगम शोधावा लागला. तिकडून सचिन 'तुझ्याकडे बघ, तुझ्याकडे बघ' असं सांगत होता.

त्यानंतर विशाल याने अजून एक खेळ केला पण त्यात नक्की काय करायचे होते ते मला अजूनही समजले नाही. त्यात सचिनने 'लग्न न झालेल्या लोकांनी काय काय करावे याच्या सागरकडून टीप्स घेतल्या'.
(यात मायबोलीवर काय करावे याबद्दल टीप्स होत्या.. गैरसमज नसावा).

मग भाईंनी थोडी कॉमेडी केली. मग स्वातीला गाण्याचा आग्रह. इथे तिने गाणे म्हटले ते म्हणजे 'जाऊद्याना घरी आता गाजले की बारा... ' तेव्हा त्या गाण्याने या वॄत्तांताची सुरूवात करून सांगताही करतोय...

समाप्त:

तळटीपा:
१. नयनीशने उत्तम चिकन आणले होते (असं तोच म्हणाला).
२. सचिनने उखाणे वगैरे पाठ करून तयारी केलीय, आता फक्त वधूचे नांव ठरले की तयारी पूर्ण.
३. वरील लिखाणात सर्वांची खरी नांव वापरलेली आहेत. आयडी तुम्ही ओळखायचा आहे.
४. कार्टी, आणि संदीप यांना पुन्हा एकवार माफी जाहीर करण्यात येत आहे.
५. गेल्या एवेएठिच्या अनुभवामुळे माझ्या हाती माईक येताच , मंडळी 'आता उशीर झाला' म्हणत उठली. यावर उपाय म्हणून मी हिमेशची गाणी पाठ करून पुढच्या एवेएठिला डीसी मधे सुरुवातीलाच ऐकवणार आहे.
६. मायबोलीकर पुरूषांच्या बायकानी ए. वे. ए. ठि. ला यायचे नाकारले (अपवाद अजय, भाई).
७. मायबोलीकर बायकांचे नवरे (कदाचित कुरकुरत का होईना) आले होते (अपवाद सायो, स्वाती).
८. ६ आणि ७ वरून मायबोलीकर बायका ...... आहेत (रिकाम्या जागा भरा)...
९. ११ एप्रिलच्या महा एवेएठिला डीसी ला जाण्याचे ठरते आहे. बस करा . बस करा अशी मागणी आहे. (बस म्हणजे मोठी गाडी) पुरे करा ते ए. वे. ए. ठि. नव्हे .. असा निष्कर्ष मी काढला आहे.


पुन्हा तळटीप:
१. आद्य लाडवाक्कांनी उसळ आणली होती. पण लाडू न आणल्याचा लाक्षणिक निषेध म्हणून मुळ वॄत्तांतात त्याचा उल्लेख टाळलेला आहे.
२. चेतन भगत शिव्या खात का होईना Page 3 साठी फोटो शूट करवतो (स्वतःचा) तेव्हा मला तशी शिवी घातल्यास वाईट वाटणार नाही...
३. तिळाच्या वड्या (भरपूर होत्या) आणि उत्तम झाल्या होत्या.
४. तिळाच्या वड्या खाताना हातात बीयरची बाटली नसावी असे नयनीशचे म्हणणे पडले. पण तिळगूळ आणि हळदीकुंकू' म्हणजेच संक्रांत ही मॄणवैद्यगिरी तो विसरला असावा.
५. अमॄताने पापलेटची आमटी खाल्ल्यानंतर 'झक्कींप्रमाणे ... जायची तयारी दाखवली'.. किरण पण 'ती व्यक्ती मायबोलिकर आहे का?' असं विचारून 'हो' म्हणाल्यावर 'जीवंत आहे का?' असं म्हणाला. म्हणून त्यांना नाडी तपासावी लागली.....
६. झाशीच्या राणीचा फोन आला होता म्हणे? ही कोण आहे तेच मला माहीत नाही Sad असेल असेल. मधेच कुणीतरी समीरचा फोन आला असंही म्हणालं. पण सांगणारी तात्विक निषेध मोडात असल्याने तोही विसरला गेला. मधू-वडका जास्तच चढली होती मला .. त्यामुळे असेल.
७. तुमचा अनुल्लेख झाल्या असल्यास 'तो विनाकारण होता...' असा गैरसमज करून घेऊ नये... सारखं आपलं 'आमचं सांगा आमचं सांग काय लावलंय...???'

Happy

TilguL.JPGBatali.JPGe ve e Thi.JPGgaaNe.JPG

प्रकार: 

म्हणजे झक्कींच्या आधीच्या का नंतरच्या काळातल? स्पष्ट करावं

इथे स्पष्टीकरणाची गरज नाही. कारण झक्कीच्या आधीच्या काळात 'गाणी' नव्हतीच. देवाची स्तोत्रे अत्यंत बेसूर व भसाड्या आवाजत म्हणण्याचा प्रघात होता. पुढे संत मंडळींनी इतर कवने केली, त्याची गाणी झाली. आता त्याचे रिमिक्स करून त्याच्यावर अर्ध्या उघड्या बायका, अश्लील हावभाव करत नाचतात देखील!

तर तसे काही आमच्या स्नेहसंमेलनात झाले नाही.

आळशीपणाची लक्षणं, खाकी विजारावर पांढरे मोजे Proud मी तर पुर्वी नुकतीच नोकरी लागली तेव्हा, फारशी काळजी न करता काळ्या पॅंट वर पण पांढरे मोजे घालायचो (भारतात खरं तशी फॅशन पण होती पुर्वी, कट शुज चा जमाना होता त्यावेळी साधारण ८५-९० साली बहुतेक).
एकदा हापिसातल्या एका लै (गोर्‍या)भोचक बाई नी थांबुन मला सांगितलं होतं की तुला माहित आहे का तु पांढरे मोजे घातले आहेस ते, बाजारात जाऊन काळे मोजे घेऊन ये.

Pages