सुपंथ मदतगट- सिंहावलोकन

Submitted by उपास on 19 January, 2010 - 21:03

नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नविन वर्षाचे संकल्प सोडत २००९ साल सुरु झालं आणि बघता बघता संपलं देखिल. त्यावेळी म्हणजे जानेवारी २००९ च्या पहिल्या आठवड्यात समविचारी समाजशील मायबोलीकरांनी एकत्र येऊन ’सुपंथ’ ह्या मदत गटाची स्थापना केली (मायबोलीवरचा हा बीबी - ), गेल्या वर्षभरात सुपंथला काय करायचं होतं, काय केलं, कुठपर्यंत मजल मारली ह्याचा थोडक्यात आढावा पुढे ठेवताना आम्हाला कोण आनंद होत आहे.

मायबोलीवरुन दिनेश गुणे तसेच इतर अनेकांनी ओळख करुन दिलेल्या संस्थांमुळे कुठल्या संस्थेला खरच मदत करायची आणि त्यांना खरी गरज आहे का हे शोधण तसं सोप्प गेलं. समतोल आणि निराधार (website) ह्या दोन संस्थांची आम्ही निवड केली. त्यांच्या संस्थापकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांची निकड समजून घेतली. नियमित आणि भरवश्याच्या आर्थिक मदतीचा ओघ अशा सामाजिक संस्थांना आवश्यक आहे असे लक्षात येताच, दरमहा काही रक्कम नियमितपणे देऊ असे सुपंथने त्यांना आश्वासित केले. सुपंथच्या निर्मितीच्या उद्दीष्टाशी हे अगदी सुसंगतच होते.

सुपंथची जुळवाजुळव करताना सभासदांशी संवाद साधण्यासाठी सुरुवातीलाच सुपंथचा गुगलग्रूप तयार केला आहे. दर महिन्याचे बॆंक स्टेटमेंट्स, तसेच वर्षभराचा सुपंथच्या अकाउंटचा ताळेबंद ह्या गुगल ग्रुपवरील फाइल्स सेक्शन मध्ये ठेवले जाते. दर महिन्याच्या देणगीचा तसेच घटनांचा आढावा देण्यासाठी सुपंथचा ब्लॉगबनवण्यात आला आहे.

गेल्यावर्षभरात मायबोली तसेच मायबोलीबाहेरील सुपंथच्या सभासदांनी जमेल तशी आर्थिक मदत देऊन आपला मदतगट नावारुपाला आणला, ह्या मदतगटाच्या आर्थिक पाठबळावर समतोल आणि निराधार सारख्या संस्था समाजकार्य जोमाने करत आहेत. कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता आणि निधी संकलनाचे कुठलेही उद्दीष्ट समोर न ठेवता केवळ स्वेच्छेने आर्थिक मदत करु इच्छिणाया लोकांकडून पैसे घेऊन ते ह्या सामाजिक संस्थांत वितरीत करण्याची जबाबदारी सुपंथ ने यशस्वी रीत्या पार पाडली हे नमूद करण्यात आनंद होतो. सुपंथच्या कार्यकारी मंडळाच्या वतिने केदार जोशी यांनी नोव्हें. २००९ मध्ये स्वत: निराधार बालसंगोपन केंद्रास भेट देऊन त्यांच्या कामाची पहाणी केली आहे.
लोकांकडून धनादेश किंवा बॆंक ट्रान्सफर द्वारे पैसे घेऊन आणि ह्या सामाजिक संस्थांना बॆंकेतून इ-ट्रान्स्फ़रने पैसे देऊन सुपंथ ने सगळे व्यवहार पारदर्शक ठेवले आहेत. दर महिन्याचे जमा आणि खर्च अशा व्यवहारांचा ताळेबंद सुपंथच्या सभासदांना सुपंथच्या गुगल ग्रुप मार्फत पाठवला जातो. कळवण्यास अत्यंत आनंद होतो की, आजपर्यंत सुपंथने समतोल या संस्थेस रुपये ४१,०००/- आणि निराधार या संस्थेस रुपये ७६,८५०/- इतकी मदत केली आहे.

पुढे काय?
१. सुपंथच्या कार्यकारी मंडळापैकी रश्मी ओक तसेच नवीन सभासद येत्या काही महिन्यात ह्या तसेच नवीन सामाजिक संस्थांना भेटी देतील आणि त्यांचे कामाचे स्वरुप तसेच त्यांना कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे समजून घेतील.
२. सुपंथ नोंदणीकृत करण्याचा आणि त्याबाबतीत सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
३. सुपंथचे कार्य असेच जोमाने पुढे ठेवण्यासाठी कार्यकारी मंडळ आणि सभासद क्रीयाशील राहतील असा प्रयत्न आहे.
४. सुपंथची वेबसाईट, बनवण्याचे काम सुरू असून त्यासाठी डोमेन नेम खरेदी केले आहे.

मागे वळून पाहाताना सुपंथच्या निर्मितीची उद्दीष्टे पुन्हा एकदा -
१. ज्या लहान सेवाभावी संस्था अपुर्‍या निधीसह तळागाळातील लोकांसाठी मदतकार्य करत आहेत परंतु पुरेश्या संसाधनांच्या अभावामुळे आपल्यापर्यन्त पोहोचू शकत नाहीत त्यांच्यासाठी नियमित स्वरुपाचा आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
२. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सुस्थितील व्यक्तींना ह्या कार्यात मदत करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि मासिक योजनेद्वारे नियमित मदतकार्याचा ओघ निर्माण करणे.

सुपंथचा इ-मेल - Supanth.madatgat@gmail.com

Supanth Bank Account details
Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042

आपले विश्वासू,
सुपंथ कार्यकारी मंडळ.

मदतगटाच्या अधिक माहितीसाठी संपर्क - प्रशांत उपासनी (उपास), केदार जोशी (केदार), रश्मी ओक (रमा), सरिता आठवले (सरिविना)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक लाखाचा पल्ला पार केल्याबद्दल सुपंथचे अभिनंदन. उत्तरोत्तर सुपंथची अशीच प्रगती होत राहो आणि मदतीचा ओघ सगळीकडून सतत मिळत राहो.

अभिनंदन आणि शुभेच्छा. नुसते आरंभशूर ठरला नाहीत हे सगळ्यात महत्वाचं Happy ना जाणो कदाचित सुपंथ, भविष्यात एक मोठी NGO बनेल Happy

व्वा व्वा ह्या चांगल्या कार्याला मनापासून शुभेच्छा..

उत्तरोत्तर सुपंथ अशीच प्रगती करत राहो

सुपंथचे अभिनंदन! उत्तरोत्तर सुपंथची अशीच प्रगती होत राहो आणि मदतीचा ओघ सगळीकडून सतत मिळत राहो ह्या शुभेच्छा Happy