शैलजा ज्या वेळेस कोकणांत होती त्यावेळेस योगायोगाने मीही माझ्या कुटुंबियासमवेत कोकणातच होतो. म्हणून हा कोकणसय भाग २. 
माझा जन्मच मालवणातला. नंतर काही महिन्यांनी आम्ही मुंबईत आलो. त्यानंतर दर वर्षी मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही भावंडं आजोळी जात असू. आणि मग महिना, दोन महिने कुणी कल्पनाही केली नसेल एवढी धम्माल करून पुन्हा अनिच्छेनेच मुंबईला परतत असू. मुंबईहून निघताना व्यवस्थित दिसणारे आम्ही परतताना मात्र अंगावर ठिकठिकाणी धडपडल्याच्या खूणा घेऊन परतत असू. या खूणांमध्ये काजीच्या डिंकापासून, नदीवर पोहायला गेल्यावर लागलेल्या करपांपर्यंत (खाडीत असलेल्या धारधार दगडांना करपं असं म्हणतात. पाय नुसता ठेवला तरी फाडून निघतो) सर्व प्रकारच्या आघातांचे व्रण असत. उन्हाळ्याच्या मोसमात आंबे, रातांबे, करवंद, फणस, काजू... सर्वच फळं आमच्यावर मेहेरबान असत. नुसती चंगळ.
कोकणातल्या आठवणीत लाल डब्याच्या एस टी पासून ते लाल मातीपर्यंत आणि घरामागच्या 'घाटी'पासून ते नदीवरच्या छोट्याश्या पुलापर्यंत सगळ्या गोष्टींना अगदी अढळ स्थान आहे.
नारळी - पोफळींच्या भरगच्च बागा, त्यात लपलेली ती कौलारू घरं, घरासमोरच 'खळं', खळ्यातलं तुळशीवृंदावन, सकाळपासून केलेली दिशाहीन भटकंती, कधी समुद्र, कधी नदी, कधी डोंगर, भर दुपारी डोंगर उतरताना जाळ्यामध्ये शिरून शिरून काढलेली काळीभोर करवंद, कुणाच्याही आंब्याच्या कलमांत हळूच घुसून तोडून आणलेले आंबे, सकाळी ११ च्या सुमारास हाणलेली भाताची पेज आणि अवीट चवीची फणसाची भाजी, चुलीवर तयार होणार्या जेवणाचा कधीही न विसरता येणारा तो मस्त वास, कलमांत तयार आंब्यांचा सुटलेला घमघमाट, भाजलेल्या काजीचा खरपूस वास, पावसाळ्यात प्रचंड आवाज करत वाहणारा घरामागचा 'व्हाळ'. त्याच्यावरच्या साकवावरून तोल सावरत चालताना वाटलेली भिती, खालचे अफाट वेगाने आवाज करत रोरावत धावणारे लालसर पाणी, दुपारच्या विश्रांतीच्या वेळेस 'भरडा'वर जून्या शाळेच्या आवरात बसून केलेल्या गप्पा.., आजीचा डोळा लागला असताना हळूच तिच्या खोलीत जाऊन फडताळातल्या डब्यातून पळवलेले 'खटखटे' लाडू, कधी आजीला जाग आलीच तर पळता पळता खाल्लेला तिचा लटका ओरडा, नंतर गोठ्यात जाऊन गाईबैलांच्या साक्षीने लाडवांना पोटात दिलेली जागा, संध्याकाळी नदीकिनारी, माडांच्या गर्दीत बसून शहाळी खाता खाता पाहिलेला सूर्यास्त, त्याचवेळेस सूर्यास्ताच्या अप्रतिम देखाव्याची जाणीव नसलेला पण देखाव्याच सौंदर्य आणखी वाढवणारा, पाण्यात जाळं टाकून शांतपणे मासेमारी करणारा कुणी मच्छिमार..
तिन्हीसांजेला आ़जीबरोबर देवळांत जाऊन लावलेला दिवा, परत येऊन आजोबांच्या कडक शिस्तीत म्हटलेलं शुभं करोती कल्याणम.., रात्री जेवणं झाल्यावर खळ्यात बसून पाहीलेलं तार्यांनी तुडूंब भरलेलं आकाश.. तर पौर्णिमेच्या रात्री चांदण्याच्या दुधात न्हाऊन निघालेला आजुबाजूचा निसर्ग..
हं.... असे कित्येक.. कित्येक छोटे छोटे क्षण मनांत साठवलेले आहेत.
खरच.. शैलजा म्हणते त्याप्रमाणे हे आठवणींचं जग कधीही बदलत नाही.. बदलणार नाही..
आज तिथे गेल्यावर आठवणीतल्या या गोष्टी पुन्हा शोधण्याकरता डोळे भिरभिरतात.. सगळ्याच गोष्टी सापडतात अस नाही पण अजूनही बर्याच गोष्टी सापडल्याचा आनंद होतो.
आज माझी आजी नाही, आजोबा नाहीत, मामा नाहीत पण तरीही तो सूर्यास्ताचा देखावा अजुनही तितकाच ताजा, घरं थोडीफार बदलली पण माणसांची मनं बदलली नाहीत, देवळांत आणि तुळशीवॄंदावनापूढे तिन्हीसांजेचा दिवा आजही पूर्वीसारखाच लागतो.
कोकणात गेल्यावर माझा कॅमेरा अगदी अधाशासारखा चालतो. 
यावेळच्या कोकणभेटीत टिपता आलेले काही क्षण..

चिपळूणहून पुढे जाता जाता एका वळणावर अचानक वशिष्ठी सामोरी येते. आणि मग तिचा पाहुणचार घेतल्याशिवाय तुम्ही तिथून जाऊच शकत नाही. नजरबंदी होईल असं सौंदर्य आहे या स्पॉटच.
सावंतवाडीला जाताना.. हिरव्यागर्द झाडांतून दिमाखादार वळणं घेत जाणारा देखणा मुंबई - गोवा रस्ता तुमच्या कॅमेर्याला सहजच आव्हान देतो..
रेडीला जाताना वाटेत थांबायलाच लागलं.. ही हिरवाई टिपायला.
सूर्यदेव जाताजाताही सृष्टीला परीसस्पर्श करून जातात.
रेडीचं स्वयंभू गणेशाचं देऊळ. तिथे पोहचेपर्यंत सूर्यास्त झाला होता. देवळाच्या पुढेच समुद्र आहे..
देवबागवरून दिसणारा भोगव्याचा किनारा
वाळूत खेळणारं आमचं दीड वर्षांच पिल्लू.. आर्या 

माझं आजोळ - परूळे - कौलारू घरं, तुळशीवृंदावन
गावातली पहिली ते पाचवीची शाळा..
ही गोड मुलगी वीणा.. सावंतवाडीची.. आर्याच्याच वयाची. थोड्याच वेळांत हिने आम्हा सगळ्यांना आपलसं करुन घेतलं. अगदी आर्याला सुद्धा..
हिरवीगार सुपार्यांची बाग.. आणि बागेत लपलेलं पुरुषोत्तमाचं देऊळ.
तारकर्ली नदी आणि त्यावरचा हा छोटासा पूल. सूर्यास्त अनुभवण्याचं अप्रतिम ठिकाण तर आहेच. पण चांदण्या रात्री भुरभुरणारा गार वारा आणि चमचमणारं चंदेरी पाणी हा स्वर्गिय अनुभव याच छोट्याश्या पुलावर बसून घेता येतो.
होडीतून फेरफटका -
होडीतून फिरताना असंख्य माड किनार्यावर दाटीवाटीने उभे असतात.. संचलनाला उभे असल्यासारखे
पण ते वेड लावतात हे मात्र नक्की..
आणि असे कित्येक शांततेचे क्षण अनुभवण्याकरता पुन्हा पुन्हा इथे यावेसे वाटते.
माझ्या प्रत्येक कोकण भेटीत मी या 'सनसेट पॉईंटवर' अगदी येतोच येतो.. हे आरसपानी सौंदर्य टिपण्याकरता.. डोळ्यांनी आणि कॅमेर्याने..
कोकणातून निघताना मात्र पाय अगदी पूर्वीसारखेच अडखळतात, हे एवढं ऐश्वर्य सोडून निघायचं प्रचंड जिवावर येतं. आपल्या माणसांचे निरोप घेताना मनांत कुठेतरी गलबलतं. पण निघायचच असतं. मग लगेच पुढल्याच वर्षी परत यायचे प्लॅन्स होतात तेंव्हा कुठे पाय हलतात.
कोकणातली लाल मातीही तिथल्या माणसांसारखीच.. या मातीच्या पोटातही आईची वेडी माया.
सहजा सहजी पाठ सोडत नाही. परत मुंबईला घरी येईपर्यंत सोबत करते. 









मस्त फोटो. दोन्ही मुली कसल्या
मस्त फोटो. दोन्ही मुली कसल्या गोड आहेत!
किरण्या... इतक्यां सगळां
किरण्या...
इतक्यां सगळां तुकां दिसलां, माका कसां दिसाक नाय आजून?... इतक्यांदा 'कोकणा'त जातंय, पण माका येकदाय कसां काय दिसाक नाय रे?... तुकां सांगतंय येकाक दोन चष्मे आसत माझ्याकडे आणि डोळ्यांका सगळे मिळान तीन नंबर आसत, पण येकातसुन तरी आमका असलां काय तरी दिसात तर शप्पथ...
तुझी गंमत करत होतो, नाहितर तुझ्या 'गृह-स्वामिनी' ला राग येईल...
पण खरंच सांगतो, 'निसर्ग सौंदर्य' टिपणार्या तुझ्या दृष्टीला मनापासुन 'अभिवादन'...
प्रचंड सुरेख लिहीलयस रे आणि
प्रचंड सुरेख लिहीलयस रे आणि फोटो पण जबरदस्तच
किरूचा कोकण की कोकणचा किरू?
किरूचा कोकण की कोकणचा किरू? नव्हे नव्हे हा तर लाल मातीचा लाल
सुंदर प्रचि आणि वेड लावणारं मनोगत... अप्रतिम किरू
अहाहा!!! किरु कसले देखणे फोटो
अहाहा!!! किरु कसले देखणे फोटो आहेत हे! खरंच अगदी आतपर्यंत गार वाटलं ह्या सौंदर्यानी. लिहिलंही आहेस किती सुरेख. आर्या आणि तिची मैत्रिणही गोड दिसताहेत. कोकणसय शब्दही सुंदर.
शैलजा आणि आतां तुम्ही ! मला
शैलजा आणि आतां तुम्ही ! मला तर पुनःप्रत्ययाच्या आनंदाची मेजवानीच मिळतेय !! फोटो अप्रतिम.
धन्यवाद. आणि त्या दोन गोड मैतरीणीना भरभरून आशिर्वाद.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.


पल्ली, लाजो.. नक्की करुयात कोकणांत GTG.
शैलजा, तुला रॉयल्टी नक्की देतो GTG च्या वेळेस.
शर्मिला, कौतुकाबद्दल धन्स. 'कोकणसय' हा शब्द शैलजाचा..
मस्त फोटो आणि वर्णनही पिल्लु
मस्त फोटो आणि वर्णनही
पिल्लु खूप क्युट आहे.
किरु, सहीच रे, मी गवत फार
किरु, सहीच रे, मी गवत फार राहीलो नाही पण ही सगळे फोटो अगदी माझ्याच गावतले वाटले. आणि वाइट वाटत रे इतका निसर्ग असुनही आपण तो जगासमोर नीट मांडु शकत नाही.........
गटगच्या कल्पनेला माझा फूल पाठिंबा. आंजर्ल्यात घर आहेच आपलं ,
रायगडचे डिटेल्स पाठवतो रे
किरू मस्त लिहीले आहेस रे.
किरू मस्त लिहीले आहेस रे. गावी कधी घेवून जातोयस आम्हाला. तुझ्या फ़ोटोग्राफ़ीबद्दल तर काही बोलायलाच नको. सर्वच अप्रतिम... त्यातूनही दोन मैतरीणी एकदम सरस ! मस्त यार.... धन्यवाद !
किरु झिंदाबाद. जय हो.
किरु झिंदाबाद. जय हो.
किरु मस्तच रे फोटो ! मुळात
किरु मस्तच रे फोटो ! मुळात कोकण च मस्त आहे, मी गेले होते गेल्यावर्षी कोकणात, खरय तु म्हण्तोस ते निघताना गलबलुन येतं, इतक सुंदर आजोळ आहे तुमच ,नशिबवान आहात!
खरच मला हे फोटो खुप
खरच मला हे फोटो खुप आवडले,खरंच सुंदर आहे कोकण.
पार कोंकण फिरवून घरा पर्यन्त
पार कोंकण फिरवून घरा पर्यन्त पोहोंचवलत. बालपणातल्या आठ्वणी ताज्या
झाल्या. लेक्,लेख,फोटो,वर्णन सगळंच खूप खूप खूप सुंदर.
मेल्या, माजा कसा रवला हंयसर
मेल्या, माजा कसा रवला हंयसर लिहुचा ?
ता जाउदे, नेमको वर कसो इलो ह्यो लेख ?
माका येगळाच दिसता रे लक्षाण, परत जाउचा लागताला वाटताहा...
फार छान किरु एकद मस्त...
फार छान किरु
एकद मस्त... गारगार....
नेमको वर इलो ते चांग्लोच झालो की हो असुदे.

आमालापण बघायला मिळालो... माकापण जाऊचा लागताला वाटताहा हो. येता? जाऊया
ऋयामा, कोकण आपलाच आसा....
ऋयामा, कोकण आपलाच आसा....
किरू, पुनःप्रत्ययाचा पुन्हा
किरू, पुनःप्रत्ययाचा पुन्हा एकदा आनंद ! धन्यवाद.
Pages