शैलजा ज्या वेळेस कोकणांत होती त्यावेळेस योगायोगाने मीही माझ्या कुटुंबियासमवेत कोकणातच होतो. म्हणून हा कोकणसय भाग २. 
माझा जन्मच मालवणातला. नंतर काही महिन्यांनी आम्ही मुंबईत आलो. त्यानंतर दर वर्षी मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही भावंडं आजोळी जात असू. आणि मग महिना, दोन महिने कुणी कल्पनाही केली नसेल एवढी धम्माल करून पुन्हा अनिच्छेनेच मुंबईला परतत असू. मुंबईहून निघताना व्यवस्थित दिसणारे आम्ही परतताना मात्र अंगावर ठिकठिकाणी धडपडल्याच्या खूणा घेऊन परतत असू. या खूणांमध्ये काजीच्या डिंकापासून, नदीवर पोहायला गेल्यावर लागलेल्या करपांपर्यंत (खाडीत असलेल्या धारधार दगडांना करपं असं म्हणतात. पाय नुसता ठेवला तरी फाडून निघतो) सर्व प्रकारच्या आघातांचे व्रण असत. उन्हाळ्याच्या मोसमात आंबे, रातांबे, करवंद, फणस, काजू... सर्वच फळं आमच्यावर मेहेरबान असत. नुसती चंगळ.
कोकणातल्या आठवणीत लाल डब्याच्या एस टी पासून ते लाल मातीपर्यंत आणि घरामागच्या 'घाटी'पासून ते नदीवरच्या छोट्याश्या पुलापर्यंत सगळ्या गोष्टींना अगदी अढळ स्थान आहे.
नारळी - पोफळींच्या भरगच्च बागा, त्यात लपलेली ती कौलारू घरं, घरासमोरच 'खळं', खळ्यातलं तुळशीवृंदावन, सकाळपासून केलेली दिशाहीन भटकंती, कधी समुद्र, कधी नदी, कधी डोंगर, भर दुपारी डोंगर उतरताना जाळ्यामध्ये शिरून शिरून काढलेली काळीभोर करवंद, कुणाच्याही आंब्याच्या कलमांत हळूच घुसून तोडून आणलेले आंबे, सकाळी ११ च्या सुमारास हाणलेली भाताची पेज आणि अवीट चवीची फणसाची भाजी, चुलीवर तयार होणार्या जेवणाचा कधीही न विसरता येणारा तो मस्त वास, कलमांत तयार आंब्यांचा सुटलेला घमघमाट, भाजलेल्या काजीचा खरपूस वास, पावसाळ्यात प्रचंड आवाज करत वाहणारा घरामागचा 'व्हाळ'. त्याच्यावरच्या साकवावरून तोल सावरत चालताना वाटलेली भिती, खालचे अफाट वेगाने आवाज करत रोरावत धावणारे लालसर पाणी, दुपारच्या विश्रांतीच्या वेळेस 'भरडा'वर जून्या शाळेच्या आवरात बसून केलेल्या गप्पा.., आजीचा डोळा लागला असताना हळूच तिच्या खोलीत जाऊन फडताळातल्या डब्यातून पळवलेले 'खटखटे' लाडू, कधी आजीला जाग आलीच तर पळता पळता खाल्लेला तिचा लटका ओरडा, नंतर गोठ्यात जाऊन गाईबैलांच्या साक्षीने लाडवांना पोटात दिलेली जागा, संध्याकाळी नदीकिनारी, माडांच्या गर्दीत बसून शहाळी खाता खाता पाहिलेला सूर्यास्त, त्याचवेळेस सूर्यास्ताच्या अप्रतिम देखाव्याची जाणीव नसलेला पण देखाव्याच सौंदर्य आणखी वाढवणारा, पाण्यात जाळं टाकून शांतपणे मासेमारी करणारा कुणी मच्छिमार..
तिन्हीसांजेला आ़जीबरोबर देवळांत जाऊन लावलेला दिवा, परत येऊन आजोबांच्या कडक शिस्तीत म्हटलेलं शुभं करोती कल्याणम.., रात्री जेवणं झाल्यावर खळ्यात बसून पाहीलेलं तार्यांनी तुडूंब भरलेलं आकाश.. तर पौर्णिमेच्या रात्री चांदण्याच्या दुधात न्हाऊन निघालेला आजुबाजूचा निसर्ग..
हं.... असे कित्येक.. कित्येक छोटे छोटे क्षण मनांत साठवलेले आहेत.
खरच.. शैलजा म्हणते त्याप्रमाणे हे आठवणींचं जग कधीही बदलत नाही.. बदलणार नाही..
आज तिथे गेल्यावर आठवणीतल्या या गोष्टी पुन्हा शोधण्याकरता डोळे भिरभिरतात.. सगळ्याच गोष्टी सापडतात अस नाही पण अजूनही बर्याच गोष्टी सापडल्याचा आनंद होतो.
आज माझी आजी नाही, आजोबा नाहीत, मामा नाहीत पण तरीही तो सूर्यास्ताचा देखावा अजुनही तितकाच ताजा, घरं थोडीफार बदलली पण माणसांची मनं बदलली नाहीत, देवळांत आणि तुळशीवॄंदावनापूढे तिन्हीसांजेचा दिवा आजही पूर्वीसारखाच लागतो.
कोकणात गेल्यावर माझा कॅमेरा अगदी अधाशासारखा चालतो. 
यावेळच्या कोकणभेटीत टिपता आलेले काही क्षण..

चिपळूणहून पुढे जाता जाता एका वळणावर अचानक वशिष्ठी सामोरी येते. आणि मग तिचा पाहुणचार घेतल्याशिवाय तुम्ही तिथून जाऊच शकत नाही. नजरबंदी होईल असं सौंदर्य आहे या स्पॉटच.
सावंतवाडीला जाताना.. हिरव्यागर्द झाडांतून दिमाखादार वळणं घेत जाणारा देखणा मुंबई - गोवा रस्ता तुमच्या कॅमेर्याला सहजच आव्हान देतो..
रेडीला जाताना वाटेत थांबायलाच लागलं.. ही हिरवाई टिपायला.
सूर्यदेव जाताजाताही सृष्टीला परीसस्पर्श करून जातात.
रेडीचं स्वयंभू गणेशाचं देऊळ. तिथे पोहचेपर्यंत सूर्यास्त झाला होता. देवळाच्या पुढेच समुद्र आहे..
देवबागवरून दिसणारा भोगव्याचा किनारा
वाळूत खेळणारं आमचं दीड वर्षांच पिल्लू.. आर्या 

माझं आजोळ - परूळे - कौलारू घरं, तुळशीवृंदावन
गावातली पहिली ते पाचवीची शाळा..
ही गोड मुलगी वीणा.. सावंतवाडीची.. आर्याच्याच वयाची. थोड्याच वेळांत हिने आम्हा सगळ्यांना आपलसं करुन घेतलं. अगदी आर्याला सुद्धा..
हिरवीगार सुपार्यांची बाग.. आणि बागेत लपलेलं पुरुषोत्तमाचं देऊळ.
तारकर्ली नदी आणि त्यावरचा हा छोटासा पूल. सूर्यास्त अनुभवण्याचं अप्रतिम ठिकाण तर आहेच. पण चांदण्या रात्री भुरभुरणारा गार वारा आणि चमचमणारं चंदेरी पाणी हा स्वर्गिय अनुभव याच छोट्याश्या पुलावर बसून घेता येतो.
होडीतून फेरफटका -
होडीतून फिरताना असंख्य माड किनार्यावर दाटीवाटीने उभे असतात.. संचलनाला उभे असल्यासारखे
पण ते वेड लावतात हे मात्र नक्की..
आणि असे कित्येक शांततेचे क्षण अनुभवण्याकरता पुन्हा पुन्हा इथे यावेसे वाटते.
माझ्या प्रत्येक कोकण भेटीत मी या 'सनसेट पॉईंटवर' अगदी येतोच येतो.. हे आरसपानी सौंदर्य टिपण्याकरता.. डोळ्यांनी आणि कॅमेर्याने..
कोकणातून निघताना मात्र पाय अगदी पूर्वीसारखेच अडखळतात, हे एवढं ऐश्वर्य सोडून निघायचं प्रचंड जिवावर येतं. आपल्या माणसांचे निरोप घेताना मनांत कुठेतरी गलबलतं. पण निघायचच असतं. मग लगेच पुढल्याच वर्षी परत यायचे प्लॅन्स होतात तेंव्हा कुठे पाय हलतात.
कोकणातली लाल मातीही तिथल्या माणसांसारखीच.. या मातीच्या पोटातही आईची वेडी माया.
सहजा सहजी पाठ सोडत नाही. परत मुंबईला घरी येईपर्यंत सोबत करते. 









>>कोकणातली लाल मातीही तिथल्या
>>कोकणातली लाल मातीही तिथल्या माणसांसारखीच.. या मातीच्या पोटातही आईची वेडी माया.
सहजा सहजी पाठ सोडत नाही>> खरं आहे.
मस्त!
सह्हीये!
वॉव!!! सुरेख फोटो! एक शांतता
वॉव!!! सुरेख फोटो! एक शांतता जाणवली फोटो पाहताना.. मस्त वाटलं..
तुझी लेक फारच गोड आहे!
किरु एकदम मस्त फोटोस आणि
किरु एकदम मस्त फोटोस आणि वर्णन , केवळ अप्रतिम, शेवटचा सनसेटचा तर अफलातून
कोकणातून निघताना मात्र पाय अगदी पूर्वीसारखेच अडखळतात, हे एवढं ऐश्वर्य सोडून निघायचं प्रचंड जिवावर येतं. आपल्या माणसांचे निरोप घेताना मनांत कुठेतरी गलबलतं. पण निघायचच असतं. मग लगेच पुढल्याच वर्षी परत यायचे प्लॅन्स होतात तेंव्हा कुठे पाय हलतात. >>>>>>>>> अगदी अगदी ह्या बद्दल तुला १००० मोदक
खुपच सुंदर!!! खुपच मस्त!
खुपच सुंदर!!! खुपच मस्त!
खुप्च छान. फोटो पाहताना अगदी
खुप्च छान. फोटो पाहताना अगदी शांत वाटत.
मुलही खुप छान आहेत.
अतिशय सुंदर.. लाजवाब फोटो!
अतिशय सुंदर.. लाजवाब फोटो!
सुंदर फोटो-फीचर! आजोळचं घर
सुंदर फोटो-फीचर!
आजोळचं घर आणि अंगण अविस्मरणीय!
खूप नशीबवान आहात...फोटोज
खूप नशीबवान आहात...फोटोज सुद्धा सुंदर आहेत..
वा अतिशय सुरेख लेखन अन फोटो
वा अतिशय सुरेख लेखन अन फोटो ही..अगदि घेऊन गेलास बघ तिथवर !!
आर्या गोड आहे..:)
व्वाव! आरसपानी कोकणी सौंदर्य!
व्वाव! आरसपानी कोकणी सौंदर्य! सर्वच फोटो सुंदर! शेवटुन ४था व ५वा फोटो अप्रतिम!
आर्या आणि ती वीणासुद्धा कित्ती गोड आहेत!!
अप्रतिम..
अप्रतिम..
सुंदर!!!! कोलाज मधील आर्या
सुंदर!!!! कोलाज मधील आर्या खुप छान वाटतेय.. छान लिहिलयेस
खूपच सुंदर. डोळे निवले. लेक
खूपच सुंदर. डोळे निवले.
लेक किती गोड आहे !
मेजवानी. दोन्ही लेखांची!!!
मेजवानी. दोन्ही लेखांची!!!
जबरी फोटो आहेत कि-या दोन्ही
जबरी फोटो आहेत कि-या
दोन्ही पोरी जामच गोड 
सुरेख फ़ोटोग्राफ़ी किरू खरंच
सुरेख फ़ोटोग्राफ़ी किरू
खरंच मेजवानी !!
तुझी लेक फ़ारच गोड आहे.
लेखही अगदी मस्त झालाय!
मस्त!
मस्त!
किरु, क्लास फोटोज... १ नंबर
किरु, क्लास फोटोज... १ नंबर
सनसेट चा नादखुळा आहे ...
आर्या खूपच गोड आहे
किर्या, लेका एक प्रॉमिस कर.
किर्या, लेका एक प्रॉमिस कर. आपण एकदा कोकणात एकत्र भटकायचं.
आणि आजोळी घालवलेल्या बालपणीच्या माझ्या सुटीचं वर्णन तुला कसं काय कळ्ळं बुवा?
हे वाचता वाचता मला अचानक आजीने बनवलेल्या माशांच्या आमटीचा वास आला. अगदी नॉस्टॅलजिक का काय म्हणतात तस करुन टाकलस. तु काढलेले फोटो आणि लिहिलेले शब्द यात काय सरस आहे ते सांगता येत नाहिये, पण मनाला भिडलं हे नक्की!!
किरु, अप्रतिमच लिहिलं
किरु, अप्रतिमच लिहिलं आहेस...
माझं संपुर्ण बालपण रायगड जिल्ह्यात गेलं. तेही जन्मापासुन सुरुवातीची ११ वर्ष माणगावात. माणगाव म्हणजे धड कोकण नाही आणी धड मुंबईही नाही. त्यात जेव्हा वडिलांची बदली मुरुड आणि श्रीवर्धनला झाली त्यावेळी मी ठाण्यात आलो होतो. त्यामुळे कोकणाची खरी हिरवाई कधी पुर्णपणे अनुभवताच आली नाही. माझी प्रत्येक सुट्टी ही माझ्या मामाच्या गावाला म्हणजे इथे चेंबुरमध्ये गेली आहे. पण आज तुझ्यामुळे मनाने कोकणात जाऊन आलो. आणि ते न जगलेलं कोकणातलं बालपण अनुभवता आलं.
धन्यवाद.
अनमोल क्षण आहेत रे , खुप खुप
अनमोल क्षण आहेत रे , खुप खुप खुप सुंदर फोटोज . अगदी सगळं नजरेसमोर उभं राहीलं .
फोटो आणि वर्णन तर छानच पण दोन
फोटो आणि वर्णन तर छानच पण दोन पिल्लेही क्युट आहेत.
निसर्ग, घरं सगळंच सुंदर आहे,
निसर्ग, घरं सगळंच सुंदर आहे, पण मैतरणी बेस्ट!
किर्या, मस्त फोटो आणि लेख.
किर्या, मस्त फोटो आणि लेख. माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
किरू,शैलजाच्या कोकणसयला सही
किरू,शैलजाच्या कोकणसयला सही झब्बू दिलास की हा
मस्त फोटो रे... पूनम,म्हणतेय तशी एक प्रकारची शांतता जाणवतेय फोटोत...
आर्या एकदम गोग्गो आहे किरुभाव
मस्त !! तळ कोकणात कधी जाणं
मस्त !! तळ कोकणात कधी जाणं झालं नाहिये.. आता लवकरच ट्रिप काढायला हवी..
किरू, फोटो लेख दोन्ही सुरेख.
किरू, फोटो लेख दोन्ही सुरेख. छान वाटले पहायला.
कोकणच्या सर्व फोटोंमध्ये शांततेबरोबरच एक प्रकारची स्वच्छता जाणवते मला नेहमी.
तो रेडीचा गणपती तर चांगला सुबक आणि रंगवलेला वगैरे दिसतोय... स्वयंभू का म्हणतात त्याला?
मस्त फोटो. मैतरीणी मस्तच. हे
मस्त फोटो. मैतरीणी मस्तच. हे असे कोकणसय१ व २ पाहून भारतात गेले तर इथे जायचेच ठरवलेय.. ३-४ दिवसांसाठी नाही तर पुर्ण ८-१० दिवसांसाठी ठरवलेय... गेल्या कित्येक वर्षात जेव्हा तेव्हा गेले तेव्हा धावतीच भेट होते चिपळूण गोव्याची..
किरू - खरंच डोळे निवले... आहा
किरू - खरंच डोळे निवले... आहा !!!
झक्कास लिहिलंय !!! फोटो १
झक्कास लिहिलंय !!! फोटो १ नंबर
Pages