लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी

Submitted by सिद्धा on 6 January, 2010 - 21:01

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले - मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.

फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.

मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट 'विश्वास - अविश्वास', तसेच 'कुणाशी तरी बोलायचंय' मध्ये वेळोवेळी येणार्‍या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साथ साथ विवाह संस्थेच्या वंदना कुलकर्णी यावर एक खूप चांगली लेखमाला लिहायच्या लोकसत्ता मध्ये १-२ वर्षांपूर्वी. त्यात लग्नापुर्वीचे आणि लग्नानंतरचे कौन्सिलींग इ., जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा, घरच्यांच्या दबावाला बळी पडणे इ बरेच विषय त्यांनी हाताळले होते. मला वाटते अजूनही त्या लिहीतात या विषयावर. हे लेख सापडले तर त्याची लिंक इथे देईन.

जरा थोरा मोट्यांचं ऐकुण निर्णय घेतले तर बरे पडते! नाही तर, चार बुकं शिकलो म्हणुन आमचे निर्णय आम्ही घ्यायला सक्षम वगैरे आहोत असा विचार मनात ठेवुन निर्णय घ्यायला जाल तर अडचणीत याल.

निर्णय दोघांचा दोघांनी जरी ठरवला तरी किमान चार मोठ्या लोकांचे मत विचारुन बघायला हरकत नसावी. चार पावसाळे जास्त पाहिलेल्या लोकांचा सल्ला घेणे कधीही उत्तम! म्हणजे प्रो अ‍ॅन्ड कॉन्स कळायला अन पुढील डॅमेज कंट्रोल/ डिसास्टर मॅनेजमेंट/ प्लॅनिंग ला बरे असते.

बॉटम लाईनः लग्न म्हणजे एक जुगार आहे. कोण कधी जिंकेल अन कोण कसा हरेल काही सांगु शकत नाही! सहा वर्षे सोबत राहणारे लग्नानंतर तीन महिन्यात वेगळे होतात तर लग्ना आधी दोनदाच भेटणारे शेवटपर्यंत एकमेकांना साथ देतात! सब प्रभु कि माया है:)

ह्या वर्षीच्या कालनिर्णयच्या पानांमागेही चांगले लेख आहेत ह्याच विषयावर.

लहान बहिणीचे लग्न जमायला या ना त्या कारणांमुळे उशीर होत होता, सगळे नातेवाईक फक्त प्रश्न विचारणार कोणीच स्थळ सांगून काही मदत करणार नाहीत पण उगाच आम्हालाच नावे ठेवणार की यांच्याच अपेक्षा जास्त आहेत म्हणून. तिचे २७ वे संपत आले तसतसं आईची धास्ती वाढत होती याच काळात बीपीच्या गोळ्या सुरु झाल्या ! कितीही समजावून सांगितलं तरी तिची चिंता काही मिटत नव्हती, फक्त मुलगा निर्व्यसनी असावा, स्वत:च घर असावं, उद्योग ,नोकरी काहीही चालेल एवढ्याच अपेक्षा होत्या. बहीण सावळी ,स्मार्ट होती. ती बारावीला असताना दोन तीन नात्यातल्या लोकांनी मागणी घातली होती पण शिक्षण राहीले म्हणून आई त्या वेळी नको म्हणाली होती, तेच लोक परत आमचं कसं चुकलं हे सांगत होते. ते ३ वर्षे आठवले की अंगावर काटा येतो, काय अनुभव एकेक ! एका मुलाने माहीतीत सांगितलं होतं की तो डीप्प्लोमा इंजिनियर आहे , पुण्यात काँट्रॅक्ट्स घेतो वगैरे. बघायला आला १०-१२ लोक घेउन ,जाताना त्यांना स्टँडवर सोडायला आमची सुमो गेली होती , त्या मुलाची पसंती आली पण आमच्या ड्रायवरने सांगितले की मुलगा म्हणत होता , ही २२ वी मुलगी त्याने पाहीलेली ! अन आता काहीतरी फायनल करायचं म्हणून त्याने ही पसंती दिली असं कळलं. मी इथे पुण्यात चौकशी केली असता कळले की तो जॉब करत होता कुणा इलेक्ट्रीकल काँट्रॅक्टर कडे !!
प्रत्येक वेळेला बहीण असल्या प्रसंगातून जाताना मला फार चिड यायची पण हतबल होतो, काय करणार ?
शेवटी जुळून आले एक ठीकाणी मुलगाही एकदम चांगला भेटला (म्हणजे त्यांच्या वयात योग्य अंतर असलेला, शेती, घर, स्वत:चा बिझनेस लातूरला, बहीणीपेक्षा ही स्मार्ट Happy ) आज बहीण सुखात आहे Happy आलेला दिवस जातो तसच आजचा दिवस उद्या वेगळाच, छान असतो. आम्ही जर घाई करुन त्या मुलाला फायनल केले असते तर ... पण मी सगळ्यांचा विरोध पत्करुन त्यांना नकार कळवला हे एक चांगले झाले!
एक खूप चांगला धडाच शिकलो ह्या दिवसात मी .

जामोप्या, आपला पूर्ण आदर राखूनही मला काही गोष्टी पटत नाहित.

<<हुंडा न घेता लग्न केलेला मुलगा लोभी कस<<>> हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे, निर्लोभीपणाची निशाणी नव्हे.

<<लग्नानंतर बायकोचे डोके आणि तिचा पैसा आपल्याच घरी राहील याची मुलानी दक्षता घ्यावी. >> डोके आणि पैसा जर बायकोचा असेल तर तो कुठे आणि कसा ठेवायचा हा तीचा निर्णय असला पाहिजे ना ? जर एक मुलगा म्हणून मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतो आणि त्यांच्यासाठी मी कमावलेला पैसा खर्च करतो तर एक मुलगी म्हणून आपल्या आईवडिलांसाठी तसेच करावे असे माझ्या पत्नीस वाटणे साहजिक नव्हे काय ?

<<कमावत्या बायकोमधून डोके आणि संपूर्ण पगार दोन्ही वजा केले, तर मग बायकोमध्ये शिल्लक रहातेच काय..? जे काय शिल्लक रहाते ते आणि कपड्याच्या दुकानातले बिनमुंडक्याचे लाकडाचे बुजगावणे यात फरक काय? >> एक संपूर्ण व्यक्तिमत्व. जे पैसा आणि कर्तव्य ह्यांच्या पलिकडले आहे. जी आपलं घर सोडून माझ्या साथीने जगण्यासाठी आली आहे..

असुदे, सुंदर पोस्ट.

फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते.>>>

हो होतेच. पण गंमत म्हणजे, वेड्याबागड्या मुलामुलींची, अतितापट, संशयी मुलामुलींची लग्ने करणारे आईबाप किंवा विवाहित असताना अविवाहितांना जाळ्यात पकडणारे/सर्रास परत लग्नाला उभे राहणारे यांना आपण काही चुकीचे केले आहे असे वाटतच नाही. वेडा मुलगा लग्न झाला की सुधारेल, मुलीच्या फिट्स किंवा तत्सम लग्न झाले की बंद होतील असे वाटणारे खूप असतात.

लग्न हा जुगार आणि तडजोड आहेच, पण काही अंशी तरी अशा गोष्टी टाळता येतात.

सर्वात महत्वाच दोघांच्याही (इथे घरचे ही अपेक्षित आहेत) अपेक्षा पुर्ण पणे क्लिअर असाव्यात, त्या अपेक्षांच वर्गिकरण म्हणजे प्रायोरिटि नुसार चार्ट मनामधे क्लिअर असावा. आणि तो एकमेकांसमोर लग्ना आधी मांडावा.त्याबाबतीत गोंधळ नसावा

दोघांनाही पुर्णपणे कल्पना असावी की चित्रपटात दाखवतात तस प्रेम्/लग्न्/संसार हा कथेच्या सोयीने लिखकाने लिहीलेला असतो तर प्रत्यक्षात संसार करताना तो कायम गोड गुलाबी नसुन जर थोडी फार तडजोडीची तयारी दोन्ही बाजुने असेल तर तो बराचसा अल्हाददायक होतो.

संवादाच महत्व, तडजोडीची तयारी ह्या प्राथमिक गोष्ट महत्वाच्या.

बाकी लग्न करताना - जात पात्/धर्म्/पत्रिका बघावी की नाही. नोकरी च्या दॄष्टीने कशाला महत्व द्याव, जागा वगैरे गोष्टी ह्या व्यक्ती परत्वे कमी अधीक महत्वाच्या ठरतात पण त्या त्या गोष्टींना द्यायचे क्रम आपल्या डोक्यात आधी पक्के हवेत.

@जागो तुम्ही स्वतः किंवा तुमच्या जवळच कोणी दुखावले गेले असाल अशी शक्यता धरुन तुमची पोस्ट वाचली पण तुमच दुखावले पण जमेस धरुन देखील काही मुद्दे नाही पटले जस हुंडा वाला मुद्दा आणि शेवटचा पॅरेग्राफ. अर्थात मला पटले नाहीत म्हणुन त्याला मी निषेधाच लेबल नाही लावणार लगेच. मुळात ही गोष्ट अपेक्षा (दोन्ही बाजुच्या) क्लिअर नसण्याने किंवा लग्ना आधीच त्या स्पष्ट्पणे एकमेकांसमोर न मांडण्याने झालेल्या असु शकतात. असो तुमच्या पोस्ट मुळे जसे काही जण दुखावले जातील तसेच माझ्या ह्या पोस्ट मुळे तुम्ही दुखावले जाऊ शकता तेव्हा पोस्ट फा वैयक्तीक घेऊ नका. कदाचित नीट मांडायला तुम्हाला आणि मला न जमल्याने असा गोंधळ झाला असु शकतो. हलके घ्याल अशी अपेक्षा Happy

जर एक मुलगा म्हणून मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतो आणि त्यांच्यासाठी मी कमावलेला पैसा खर्च करतो तर एक मुलगी म्हणून आपल्या आईवडिलांसाठी तसेच करावे असे माझ्या पत्नीस वाटणे साहजिक नव्हे काय ?

माझी पोस्ट तुम्ही व्यवस्थीत वाचा.. आईवडिलांची जबाबदारी घेण्याला माझा विरोध नाही... पण मिळणारा संपूर्ण पगार आईवडिलानाच द्यायचा? बरं, किती वर्षे असे चालणार? मुले असेच करतात काय? वर्किंग वुमन हॉस्टेलला बायको रहात असती किंवा समजा हीच कंडिशन उलट केली, म्हणजे मुलगा मुलीच्या घरी आहे, मुलगी मुलाचा सगळा खर्च करते आहे, अशा वेळी ती तिच्या आईवडिलाना किती पैसा देऊ शकली असती? मुलाने हा विचार करण्यात आक्षेपार्ह काय आहे? बरं, मग अशा मुली संसार करताना आधी सगळ्या चैन्या नवर्‍याच्या पैशाने करुन घेतात, आणि अचानक सात आठ महिन्यानी तिचे नोकरीचे पैसे साठले की मग बाँब टाकतात, हे असं का? आधीच अशा गोष्टी क्लीअर करता येत नाहीत?

बायकोचा पगार हा तिच्याच मालकीचा असतो, यात आक्षेपार्ह काही नाही. पण बायको मिळवती असेल, तर नवर्‍याला इन्डायरेक्ट बेनेफिट मिळत असतात... नवरा आपले इन्शुरन्सचे हप्ते मर्यादीत ठेऊ शकतो... होमलोनला सगळा हप्ता फक्त नवर्‍यानेच जरी भरायचा ठरवला तरी त्याला जास्त कर्जाचा बेनेफिट घेता येतो.. बायको नवर्‍याच्या पगाराचे डायरेक्ट बेनेफिट घेत असतेच, नवर्‍याने इन्डायरेक्ट बेनेफिटला पण मुकायचे का? मुलीचा संसार हा तिच्या माहेरच्या लोकांचे एक एक्स्टेन्शन असतो की एक स्वतंत्र संसार? हा माझा मुद्दा आहे... बरं, हे एक्स्टेन्शनच जर काढायचे होते , तर मग वर्किंग वुमन हॉस्टेलवर का नाही उभे करत? दुसर्‍याच्या घरावर कशाला?

एक संपूर्ण व्यक्तिमत्व. जे पैसा आणि कर्तव्य ह्यांच्या पलिकडले आहे. जी आपलं घर सोडून माझ्या साथीने जगण्यासाठी आली आहे..
डोकं वजा केलं ( म्हणजे ते माहेरातच राहिले असेल) तर व्यक्तीमत्व कसं शिल्लक राहिलं म्हणायचं? Happy ...

मला तर नेहमी एक प्रश्न पडत असे कि समोरची व्यक्ती मग तो मुलगा असो वा त्याचे आई-वडिल हे खरंच बोलतात हे कसं ओळखायचं.तुमची अपेक्षा पटल्याचं त्यांनी मान्य केलं आणि वेळ आल्यावर विसरुन गेले असं झालं तर?

मुलगी वा मुलगा कितीही क्लीअर व स्पष्टपणे अपेक्षा सांगोत व दिसोत( जे बोलतात तसे वागताना दिसतात ह्या अर्थाने) पण तरीही फसवणूक झालेली पाहिलीय मी.

जसे एका मुलाने पगार खोटा सांगणे,घर नसताना असणे सांगणे, नोकरी नसताना असणे सांगणे व भयंकर खराब अशी मुलाची क्रेडिट हिस्टरी. हा प्रकार एका कलीगने चक्क केला होता व त्याला त्याचे काहीच वाटते न्ह्ववते आम्हाला कूण्कूण लागले तेव्हा.
बेंचवर असताना भारतत गेला ३ महिने, पाहिजे तितक्या मुली पाहिल्या. मुलीच्या घरी सांगितले की लग्नासाठी वाढीव सुट्टी घेतलीय मग लग्न करून तिथेच आणखी ३ महिने राहिला व आला इथे. तो पर्यन्त भांडणे झालीत. एक तर काही मुलीच्या आई वडिलांना अमेरीकेतलाच मुलगा हवा अशीही मागणी असते. त्यातच मुलाची काही इथे(अमेरीकेत चौकशी करायला त्यांना वाव नसतोच कारण ह्या मुलीच्या लग्नानंतर तेच अमेरीका बघणार असतात....
बरेच प्रकार झालेत रिसेशन काळात असे.

जागो,
तुमचा संताप समजतोय पण हीच गोष्ट उलट असती तर म्हणजे कर्ज मुलाच्या आई-वडीलांचे असते आणि ते लग्न झाल्यावर ते मुलावर आले असते तर?
मला वाटते मुलाने ते फेडले असते आणि बायकोने पण त्रास सहन केला असता.
तुमच्या प्रश्नाची खोली मला नक्की माहित नाही पण लग्नासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात काहींच्या नशिबी जास्त येतात तसा हा प्रकार आहे. इथेच तर खरी कसोटी आहे.अर्थात ह्याची लग्नाआधी माहिती द्यायला हवी हे मात्र नक्की.बाकी हलके घ्या...तुम्हाला दुखवायचा हेतू नाही.

दीपूर्झा, तुमचा प्रतिसाद खूप आवडला Happy

सगळे नातेवाईक फक्त प्रश्न विचारणार कोणीच स्थळ सांगून काही मदत करणार नाहीत पण उगाच आम्हालाच नावे ठेवणार की यांच्याच अपेक्षा जास्त आहेत म्हणून>>>>>>>>> हे अगदी खरं
जवळ्जवळ सगळ्यांनाच अस अनुभव येतो.... Sad

वरपक्ष आणि वधुपक्ष हा आता पूर्वीप्रमाने राहीला नाहीये... आता आपण फक्त मुलीवर अन्याय होतो असं म्हनुच शकत नाही...मुलाकडच्यांवर होनारे अन्याय मला सध्यातरी जास्त बघायला मिळाले... बर्‍याचदा मुलीही ह्या सगळ्याला कारणीभूत असतात.. कितीही झालं तरी आपण आपल्या घरात दुसर्‍यांची लुडबुड नाही सहन करु शकत.. मग त्यात मुलीच्या माहेरकडचेही आलेच...

डोकं वजा केलं ( म्हणजे ते माहेरातच राहिले असेल) तर व्यक्तीमत्व कसं शिल्लक राहिलं म्हणायचं?>>>>> अगदी...
स्वतःच्या संसारात मुलीचे तन, मन आणि धनाने असावे ही रास्त अपेक्षा.. पण म्हनुन २०-२५ वर्षे राहीलेल्या माहेरात देखील ती थोडीफार तन, मन आणि धनाने असली तर काय हरकत आहे....

जागो, तुम्ही लग्नाला फारच व्यावहारिक पातळीवर आणून बसवताय का? मुलीला अजूनही माहेरचीच ओढ वाटते, तर तिला जीव लावण्यात सासर कुठेतरी कमी पडत असेल असं नाही वाटत?

मुलगी 'पगार' सोडल्यास 'दुसरं' काहीच नवर्‍याला देत नसते? 'तन्'-मन, सांसारिक कामे, घरकाम, स्वतःच्या जिवावर उदार होऊन स्वीकार्लेलं बाळंतपण, म्हातार्‍यांच्या देवाधर्माच्या अपेक्षा, मुला-म्हातार्‍यांची (व भारतात नवर्‍याची सुद्धा) सेवा इ. अगणित जबाबदार्‍या ती पार पाडते. मग तिचा 'खर्च' करणार्‍या नवर्‍याचा तिच्या पगारावर का डोळा?

<<<<बायकोचे रिकामटेकडे नातेवाईक, विशेषतः रिकामटेकड्या बहिणी, हा एक प्रचंड डोकेदुखीचा विषय असतो. >>>
आणि नवर्‍याचे खादाड निरुद्योगी मित्र/ भाऊ, माहेरी येऊन नाक खुपस्णार्‍या नंडा, त्यांच्या सास्वा, जावा यांनाही हाच न्याय लावायला मात्र विसरलात की!

<<<मुलीचा संसार हा तिच्या माहेरच्या लोकांचे एक एक्टेन्शन असतो की एक स्वतंत्र संसार?>>>
त्यांना आपलं मानून पहा तर, बायको ७ जन्म ऋणी राहील. आणि ती पण 'तुमच्या' माहेरच्या लोकांचे एक्टेन्शन (अर्थात सासर) स्वीकारतेच आहे ना?

तुम्ही दुखावलेले दिसता. पण लग्न हे 'जुळवलेले' नाते आहे हो, रक्ताचे नाही. टिकवण्यासाठी फार मोठी भावनिक गुंतवणूक करावी लागते. व्यावहारिक गोष्टी लग्नाआधी बोलून स्पष्ट करायला हव्यात हे बरोबरच. पण बाकीचे मुद्दे विषेश नाही पटले.

भाग्यश्री, असा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.. सगळ्या लग्नाळू मित्र मैत्रिणींना लिंक देते.

जागो, मुलाचीही फसवणूक होते, हे खरं. मी पाहिलेल्या केस मध्ये आर्थिक फसवणूक नाहीये, पण दररोजचा मानसिक त्रास आहे - त्याचे आईवडील जेव्हा अमेरिकेत आलेले, तेव्हा बायकोनं - त्यांना '९११ ला कॉल करून तुम्हाला तुरुंगातच टाकते' अशीही धमकी दिलेली होती (सासू सासरे सज्जन आहेत त्या मुलीचे - ते बिचारे पुन्हा मुलाला भेटायला म्हणूनही परत नाही आले). हीच मुलगी लग्नाआधी कशी वागत होती आणि लग्नानंतर कशी ह्यातला फरकही पाहिलाय.
पण म्हणून सरसकट सगळ्या बायकांना नावं ठेवणंही बरोबर नाही..
'बायकोनं नवर्‍याला मारणं' हा जोकचा विषय होऊ शकतो - 'नवर्‍यानं बायकोला मारणं' हा नाही - ह्याच कारण अजूनही ही बर्‍याच ठिकाणी reality आहे - ह्यातच काय ते आलं..
आपण सगळेच माणूस आहोत - आपल्याला अनेक कारणाकरता जोडीदाराची गरज पडते - ह्यात शारिरीक, मानसिक, भावनिक सगळ्याच गरजा आल्या. जेव्हा आपण एकमेकांचे differences समजून घेत (वेळप्रसंगी भांडत- पण नंतर समजावून घेत) - त्यांना accept करत जगलो तर आणि तरच आपण आनंदी होऊ शकतो. म्हणजे हे बायकोकरता नका करू, स्वतःच्या डोक्याला त्रास नको म्हणून करून बघा.
'Take it easy policy' घ्या.. हवं असेल तर बायकोच्या हातात काही महिने घरचे सगळे आर्थिक व्यवहार द्या - त्यांच त्यांना handle करायला लागलं की बदलतील त्या..
मलाही माझ्या आईबाबांच कर्ज हे माझंच कर्ज वाटतं -(त्यांच घर जर माझं असेल तर कर्ज का नाही?)
ते काहीच घेत नाहीत हा विषय वेगळा - पण त्यांना त्याचा लोड येऊ नये - त्यांना कुठल्याही क्षणी आपली मुलगी आपल्या बरोबर आहे हा विश्वास नको का? जे त्यांनी इतके वर्ष माझ्या करता केलं, ते करताना मला का जड वाटायला पाहिजे? आणि नवर्‍यानंही त्याच्या आईवडीलांशी असच वागावं - रादर वागलंच पाहिजे...

नानबा, मला हेच म्हणायचं होतं

सुस्मिता, खरय. शेवटी ही भावनिक गुंतवणूक जास्त आहे इतर कशाहीपेक्षा...

तुमचा संताप समजतोय पण हीच गोष्ट उलट असती तर म्हणजे कर्ज मुलाच्या आई-वडीलांचे असते आणि ते लग्न झाल्यावर ते मुलावर आले असते तर?

मुलाचे कर्ज त्याच्या डोक्यावरच तर असते... तो सासर्‍याच्या घरी घरजावई म्हणून राहून आपला सगळा पगार आईवडिलाना देतो म्हणाला, तर मुलीचा बाप तयार होईल का? आणि याचे उत्तर 'नाही' असेच असेल, तर माझे काहीही चुकले नाही, हेच सिद्ध होईल. Happy

मुलीचे रिकामटेकडे भाऊ बहीण.... बापरे... हा पण विचर करायक्ला लागणार का ?

रिकामटेकडे असू देत, पण बहिणी काम करणार्‍या नसल्या तरी नवर्‍याच्या घरी खाऊन पिऊन सुखात आहेत का, हा मुद्दा जास्ती महत्वाचा आहे. तो कन्फर्म करायला विसरू नका. नसेल काम करायचे त्या बायकाना तर नको करु... पण तुमची बायको सुस्थितीत आहे, म्हणून लगेच वसूली अधिकार्‍यागत त्या तुमच्या घरी येणार नाहीत, एवढे तरी बघायलाच हवे... ( माझी एक बहीण पाच वर्षे संसार करुन तिच्या वयाच्या ३० व्या वर्षी नवर्‍याच्या अपघाती निधनाने विधवा झाली..पुनर्विवाह होईपर्यंतचा काळ टेन्शनमध्येच जातो... . त्यामुळे बायकोच्या बहिणीनी पण स्वतःच्या पायावर शक्य असल्यास उभे रहावे, असे मी म्हणतो... पण आपल्या बायकोचा सगळा पगार आम्हाला द्यायचा नाही, म्हणून तू आम्हाला नोकरी करायला सांगतोस, असं त्या आणि माझी बायको मलाच सुनावतात... Happy बायको जर सुशिक्षित असेल, तर तिला पोटगीची गरज नसते, असे कायदा सांगतो...... बायकोच्या बहिणीना मात्र अशी आडकाठी नाही.. Happy धन्य धन्य रे स्त्रीमुक्ती!!!!! ' फुले आणि कर्वे यांच्यामुळे माझ्या बहिणीचे कल्याण झाले असे मी म्हणत होतो... बायको म्हणते- फुल्यानी आणि कर्व्यानी बायकाना शिकवलं ते का सासरची इस्टेट करावी म्हणून... Happy बिच्चारे फुले, रोज माझ्याकडून ( आणि आमच्या बायकोकडूनही !! ) फुलं उधळून घेतात !!!!! सासरची इस्टेट? मग बायकोचा पत्ता काय? माहेर की काय??? Happy )

जमोप्यांच्या पोस्टवरून लिहायला आठवले..कोणा मुलाने वा मुलीने स्पष्ट पणे विचारलेय का एकमेकांना कि तुझी क्रेडिट हिस्टरी कशी आहे लग्नाआधी?
मास्टर्स साठी किती कर्ज घेतलेय व किती फेडलय? Happy बहुतेक जणं हसतील पण its bitter question.

माझ्या आईच्या ओळखीत एका मुलाला एक मुलगी भेटली तिने पहिल्या भेटीत प्रामाणिकपणे सांगितले की मला अमेरीकन सिटिझन असलेल्या मुलाशी लग्न करायचेय कारण तिथे येवून शिक्षण घ्यायचेय व तिच्याकडे पैसे नाहीत व कर्ज मिळणे कठिण आहे ह्यासाठी हाच एक बेस्ट उपाय दिसतोय. तिचा प्रामाणिक पणा खरेच अचाट होता. पण पुढे तिने आणखी एक सांगितले की तिला मूल नकोय अजिबात.
आता इथे मोठा प्रपंच आला कारण ह्याला मूल हवे होते. मग फक्त तिच्या प्रामाणिक पणावर खुष होवून त्यांनी दोस्ती केली व लग्नाचा निर्णय टाळला तेव्हा. पुढे तिला सर्व इतर मुलांनी तिच्या 'प्रामाणिक पणाबद्दल' नाकारले तेव्हा ती शेवटी कसेतरी पैसे जमवून स्टुडंट विसावर आली. नुस्ती दोस्तीलाच ५ वर्षे झाली. ह्याला सुद्धा कोणी पसंत न्हवते तोवर व लग्न झाले न्हवते. मग काय धीरे धीरे प्यार हो गया.... पण ह्या सर्व प्रकाराला तब्बल ७ वर्षे लागली.... तोवर त्याचे वय ३६ झाले. प्रेम झाले,लग्न झाले मग तिचा मूलांविषयी निर्णय बदलला. आता मूलही झाले. म्हणजे तिच्याच निर्णयाने. तिच्या स्वभावात ही फरक पडला होता. स्वकमाईने केलेली गोष्टीत प्राईड असतो आता हेच ती सांगते सगळ्यांना. Happy

तेव्हा बेसीक गोष्टी आपल्याला वाटतात पण मूल असावे का नाही, कर्जे वगैरे आहेत का घेतलेली हे कसे विचारावे हा प्रश्ण असतो. money management विषयी काय aaproach आहे हे सुद्धा बरे पडते काही भांडणं टाळायला.

अमित, नानबा, सुस्मीता... खरच खूप सुंदर पोस्ट आहेत तुमच्या
बायको जर का लग्नानंतर सासरच्या सगळ्या जबाबदार्या स्विकारते तर नवर्‍याची काहीच जबाबदारी नाही का बायकोच्या माहेरच्या प्रोब्लेम्सबाबत?
थोडक्यात दोन्ही कुटुंब खर्‍या अर्थानी एकत्र आली पाहीजेत हे नक्की.

मला तर नेहमी एक प्रश्न पडत असे कि समोरची व्यक्ती मग तो मुलगा असो वा त्याचे आई-वडिल हे खरंच बोलतात हे कसं ओळखायचं.
>> अगदी अगदी..
म्हणूनच तर म्हणतात ना - साखरपुडा ते लग्न ह्या कालावधीत कमीतकमी ६ महिन्याचा कालावधी असावा.. ह्याकाळात आपला होणारा नवरा/बायको इतर लोकांशी कशी वागते (eg. वेटर) ह्यावरून त्या माणसाची ओव्हरऑल नियत कळू शकते..
-------
तुमची अपेक्षा पटल्याचं त्यांनी मान्य केलं आणि वेळ आल्यावर विसरुन गेले असं झालं तर?
>> हो - हे पण झाल्याचं दिसतं - पण बहुतेक काहीच करता येणार नाही ह्या करता.. Sad
--------
सर्वात महत्वाच दोघांच्याही (इथे घरचे ही अपेक्षित आहेत) अपेक्षा पुर्ण पणे क्लिअर असाव्यात, त्या अपेक्षांच वर्गिकरण म्हणजे प्रायोरिटि नुसार चार्ट मनामधे क्लिअर असावा.
>> अगदी छान सांगितलस कविता.
माझ्या मामानं छान उदाहरण सांगितलेलं - तो म्हणाला, समजा तुम्हाला साडी विकत घ्यायची आहे - रंग, पोत, पदर, बॉर्डर, प्रकार - ह्यात सगळच हवं तसं मिळेलच असं नाही - एक पॅकेज असतं - तडजोड करावीच लागते कुठेना कुठेतरी - ह्या साडीचा रंग अगदी मनासारखा आहे-पण काठ मोठे आहेत - अशा वेळेस आपल्याला काठ मोठे चालतील का रंग वेगळा चालेल ह्याचा विचार करावा..
आणि मग त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात जास्त पटेल ते पॅकेज निवडावं..
-------------------------
आर्थिक फरक किती आहे - आणि जास्त असेल तर आपण अडजस्ट करू शकू का - जागा किती मोठी आहे, घरात किती माणसं रहाणार - कुणावर कुठली जबाबदारी आहे का - ती पेलणं दुसर्‍याला शक्य आहे का?
एकाला पबसंस्कृती आवडते आणि दुसरा रामकृष्ण मठाचा येवढा फरक नाही ना - असेल तर आपली आवड दुसर्‍यावर लादणे, दुसर्‍याची आवड नाकारणे - असं काही होणार नाहिये ना..
आपण emotionally आणि intellectually compatible आहोत का
रक्तगट - HIV साठीची तपासणी करणं
मुलाच्या/मुलीच्या मित्रमैत्रिणींची ओळख करून घेणं - जेणे करून दुसर्‍या व्यक्तीला जास्त चांगलं ओळखता येईल - आणि कम्फर्ट बिल्ड होईल - अशा गोष्टी बघाव्यात..

यवन ते निकाह.... त्याना पुस्तक कशाला लागते? .... बायको आवडली नाही की सोडा ( किंवा न सोडताच Happy ) दुसरी करा.. एका ओळीचच पुस्तक !! Happy

मला जे म्हणायचंय ते कविताने वर योग्य शब्दांत मांडलं आहेच.

लग्नाचा, वैवाहिक जीवनाचा आणि विशेषकरून पती पत्नी नात्याचा विषय आला की जागोमोहनप्यारे एवढे का पेटतात कळत नाही.

जागोमोहनप्यारे, तुम्हाला व्यक्तीगत आयुष्यात काही समस्या असतील तर त्याचे योग्य मार्गाने निराकरण करायचा प्रयत्न करा पण सगळ्यांना एकाच तराजूत तोलायची चूक वारंवार करू नका.

देवाधर्माचंपण पाहावं लागतं आजकाल. काही कुटुंबातून देवाला रिटायर केलंय, तर काही कुटुंबातून अजूनही ४दिवस शिवाशीव, कुळधर्म - कुलाचार, पुरणा- वरणाचा स्वयंपाक, 'श्रावणी शुक्रवारला हाफ डे घे ग सूनबाई, आणि पितृपक्षात रजाच घे', 'आम्च्यासमोर जीन्स नको घालू, तुम्ही सहलीला जाल तेव्हा घाला असले कपडे', आमच्या पूजेत रोज पंचाम्रुत लागतंच अशी संस्क्रुती आहे. भांडणं होतातच या छोट्या छोट्या मुद्द्यांवरून. साखरपुड्यानंतर या गोष्टी लक्षात येतात बहुतेक. साखरपुड्यानंतर लग्न होईपर्यंत मुलगा-मुलगी या गोष्टी बोलून सोडवू शकतात. तसेच पैशाच्या गोष्टीतही सगळा पगार सासूच्या- सासर्‍यांच्या हातात द्यायचा का, कर्जं, तसेच अनुवांशिक आजाराविषयी देखील बोलून स्प्ष्ट ठरवावे. मोकळेपणाने बोलणयाने जवळ-जवळ सगळ्या मुद्द्यांवर तोडगे निघतात. <<आणि मग त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात जास्त पटेल ते पॅकेज निवडावं..>> पटलं.

मित्रमैत्रिणींनो, इथे चक्कर मारा >> ह्म्म्म ही तर फारच गहन चर्चा चालू आहे! विषय गंभीर आहे. मी नुस्तं वाचतो सध्यातरी... Proud

त्यामुळे हुंडा घेण्याची संधी मुलाना मिळत असेल तर त्यानी ती आनंदाने साधावी. ( मला मुलगी झाली तर मीही आनंदाने हुंडा देईन>>> सॅड निष्कर्ष. वाईट वाटलं वाचून. फार अगतिकतेने / उद्वेगाने बोलत असाल कदाचित पण तरीही पटले नाही.

असुदे/मनःस्विनी/सुस्मिता/नानबा/मंजु- उत्तम पोस्ट.

होणार्‍या पती/पत्नीशी बोलताना खटकणार्‍या गोष्टी नजरेपुढे येतात, पण बर्‍याचदा भीडेपोटी, संकोचामुळे, 'छे! तसं काही नसेल' असं वाटल्यामुळे त्या बोलल्या जात नाहीत. ही चूक करू नये. काही खटकलं, तर योग्य शब्दात निराकरण करून घ्यावं, ९०% वेळा आपल्याला चुकीचं वाटलं असंच उघडकीस येईल, हरकत नाही. पण १०% वेळा आपला संशय खरा असण्याची शक्यता असते. अर्थातच नातं हे जोडण्यासाठी असतं, त्यामुळे अती-चिकित्साही ठीक नाही. पण ज्या गोष्टीत तडजोड होऊच शकत नाही, तिथे उगाच गप्पही बसू नये.

Pages