घेवड्याच्या शेंगांची भाजी

Submitted by क्ष... on 30 December, 2009 - 13:59
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो घेवड्याच्या शेंगा
१ लहान कांदा
२-३ लसुण पाकळ्या
२-३ टेबलस्पून दाण्याचे कुट
चविप्रमाणे कांदा लसुण मसाला, मीठ
फोडणीसाठी - तेल(१-२ टेबलस्पून), जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. घेवड्याच्या शेंगांचे कडेचे धागे, दोन्हीबाजुची टोके काढुन टाकावेत. शेंगा उघडून नीट तपसाव्यात कारण यात कधी कधी आळ्या वगैरे असतात.
२. सोललेल्या शेंगा धुवुन निथळून बारिक (१/२ सेंटीमीटर जाडी) कापाव्यात.
३. कांदा बारीक कापावा. लसूण बत्त्याने ठेचुन घ्यावा.
४. तेलात नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यावर मंद आचेवर कांदा परतावा.
५. कांदा परतून झाल्यावर त्यात लसुण घालुन एखादा मिनीट परतावे.
६. त्यावर चिरलेल्या शेंगा घालून साधारण ४-५ मिनीटे परतावे.
७. त्यावर अगदी एखादा पळी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवुन शिजण्यास ठेवावे.
८. अर्धवट शिजले की त्यात कांदा लसूण मसाला घालावा. नीत मिसळावे आणि उरलेली भाजी शिजवावी.
९. पूर्ण शिजल्यावर त्यात दाण्याचे कूट घालून परतावे. कोथिंबीर घालून गरम भाकरी/चपाती बरोबर खावे.

वाढणी/प्रमाण: 
साधारण ४ लोकांना पुरते
अधिक टिपा: 

१. चारधारी घेवडा, काळा घेवडा, वालपापडीच्या शेंगाची अशीच भाजी करता येते.
२. कांदा लसूण मसाला नसेल तर काळा मसाला, लाल तिखट काँबीनेशन देखील वापरता येते.

माहितीचा स्रोत: 
मम्मी
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती,
काल तू करून पाठवलेली भाजी खरोखर खूप सुरेख झाली होती गं!
साधीच असली तरिहि एखादा जिन्नस वेगळा असतो,ज्यानी पदार्थ छान होतो,त्यामुळे नेहेमीचीच असली तरी मला खूप आवडली.नक्की करून बघणार आहे.आणि हो,अश्याच साध्या आणि नेहेमीच्या कृति लिहित जा Happy

एकदमच वेगळी दिसतेय, मी कधी कांदा,लसुण घालुन केली नाही, गुळ आणी चणाडाळ घालुन करते नेहमी (खरतर कितीतरी बर्ष) ह्या चवीची करुन बघेन, खरच घेवड्याची भाजी वेगळी कशी करायची मला नेहमी प्रश्ण पडायचा, आता उद्याच करुन बघते, धन्स मिनोती , पण चारधारी घेवडा काय प्रकार आहे ??

वृषाली,
तिनी तुला भाजी करुन पाठवली मग काय तू स्तुती करणारचं ना Happy
स्मिता, नक्की कुठे वेगळी दिसली तुला ही भाजी? मला तरी अगदी नेमीची फोडणी वाटली ही भाजी.

बी, अरे कांदा लसुण घेवड्याच्या भाजीला मी कधी घालुन केलेली नाही, म्हणून वेगळी , मी नेहेमी चणाडाळ गुऴ ओला नारळ घालुन करते Happy

कसं ओळखलत ह्हो तुम्ही बी?
मी नेहेमी करताना कांदा लसूण घालत नाही,मला वेगळि वाटली,आवडली,म्हणून मी प्रतिक्रीया दिली.इथे अमेरिकेत त्याच त्याच भाज्या मिळतात्,वेगळ्या चविच्या खायला छान वाटतात्,म्हणून साधीच असली तरी अप्रूप!

वृषाली तू फारच विनोदी आहेस. तू आपणहून वर लिहिलेस की तिनी तुला भाजी पाठवली मग कोण नाही ओळखणार. मीही जर मला माझ्या शेजारणीनी मला भाजी पाठवली तर अप्रुप म्हणून चवीने खाईन Happy

बी, इथे फक्त "वेगळ्या" पाककृतीच लिहिणे अपेक्षित नाही. मायबोलीवर सर्व पाककृतींचे स्वागत आहे.
तुम्हाला ही पाककृती आवडली नसेल तर ती न वापरण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे.

धन्यवाद.

मस्तय कृती. मी गोडा मसाला किंवा क्वचित सांबार मसाला घालून करते. आता अशी करून पाहीन.

मी दाण्याचं कूट देखील कधी घातलं नाही, ताजं खवलेलं खोबरं मात्र बरेचदा घालते.

मीही कांदा लसूण घालून नव्हती केली कधी. करून पाहीन आता.
मी नेहमी तिखट, मीठ, गूळ, गोडा मसाला आणि दाण्याचं कूट - अशीच करते.

घेवड्याच्या आणि गवारीच्या भाजीला फोडणीत ओवा मात्र आवर्जून घालते. त्याचा स्वादही आवडतो आणि अशा वातूळ भाज्या पचायलाही मदत. Happy