मनमोकळं-७
बॉम्बिली बिलीबॉम. मागच्या सीटवर माझ्या मैत्रिणीचा मुलगा माझ्या कानात ओरडतोय. गाडीतला स्टिरियो फुल वॉल्युमवर ठणठण चालू आहेच. बाजूलाच माझी भाची काहीतरी यो टाईप्स्स हातवारे करतेय. आवाज एका विशिष्ट पट्टीच्या वर गेल्यावर मला कुठलंच गाणं सहन होत नाही खरंतर. पण आज तो लाव्हा कानात ओतत असताना मी तो एंजॉय करतेय की काय अशी शंका येईपर्यंत शांत आहे. पुढे मैत्रीण आणि तिचा नवरा शांत गाणी आणि ढिंच्च्याक गाणी यावर वाद घालतायत. शांत गाण्यांची बाजू घेणारी मैत्रीण तावातावाने आणि ढिंच्याकची बाजू घेणारा शांतपणे. शेवटी मैत्रीण-नवर्याला पोरांचे मत घेण्याची आयडीया सुचते आणि स्टिरियोमधून पण बॉम्बिली बिलीबॉम गळायला लागतं. मी आता पार थंड. हे जीवन असार आहे च्या पलिकडे. माझं लेटेस्ट मुव्हिजचं गाढ अज्ञान बघून ते थंड. बहुधा माझी दया येऊन मैत्रीण आता यापुढं एक आपल्या टाईप गाणं आहे असा दिलासा देतेय.
आणि गुंजासा है कोई एकतारा.. सुरू होतं. "ए मी पाहिलाय हा मुव्ही. आणि हे गाणं खरंच आवडतं मला. " मी आजच्या जनरेशनच्या मधे बसण्यापुरते मार्क मिळवते. हिला बालदिनाला नेऊन आपण फार मोठी चूक करत नाहीयोत अशा अर्थाचे दोन अस्पष्ट सुस्कारे माझ्या दोन्ही बाजूनी ऐकू येतात. वय वर्षे पाच आणि सात. हो आम्ही बालदिनाला चाल्लोय. अं सॉरी बालादिन नाही, चिल्ड्रन्स डे. शाळेच्या ग्राऊंडवर नाही, सोहो’ज नावाच्या ’प्लेस’मधे. आणि तिथं गुलाबाचं फूल कोटाला लावणार्या चाचा नेहरूंवर भाषण नाहीये. तिथं चिल्ड्रन्स डे स्पेशल आहे. पपेट शो, मॅजिक शो, हॉर्स रायडिंग आणि ओ यस्स द युबिक्विटस टॅटूज. काय कशाचा मेळ आहे का? मला ’आमचे येथे आंबे, नारळ, कोकम, पर्कर व रायटेबल सिडीज मिळतील’ असल्या पाटीची आठवण येते.
पोचताक्षणी पोरं टॅटूजच्या रांगेत लागतात. मला ड्रॅगन, मला बटरफ्लाय. एखाद्या आईनं "अरे ते फ्लोरल प्रिंट किती सही आहे." म्हटलं चुकून तर "अगं आई मी काय गर्ल आहे का हातावर फ्लार काढायला?" आजच्या मुलांना किती व्यवस्थित माहित असतं त्यांना काय हवंय किंवा काय शोभतं.
स्टार्टर्स चा भरपूर मारा चालूय. ज्याकडे पोरांचं अज्जिबात लक्ष नाहीये. ती मस्तीत गुंग. आणि पालक मात्र मुलांनी खावं म्हणून डिश हातात घेऊन त्यांच्या आगेमागे फिरून शेवटी नाईलाजानं 'सगळं आवडतं असूनही खात नाहीत कार्टी’ ची इंग्लिश भाषांतरं करत हातातल्या डिशेस फस्त करतायत. जी मुलं आपल्याबरोबर आहेत त्यांची आई मी नाहीच्चे मुळी असं दाखवत बायका फिरतायत. सॉफ्ट तर सॉफ्ट म्हणून हातात ड्रिंक्स घेऊन कॉर्नर टेबल्स पकडून पुरुष मंडळींनी गप्पांचे फड टाकलेत. मधेच बायकोने फारच जोरात हाकाटी केली तर उठून काय क्य़ामेरा, गाडीत राहिलेलं एखादं सामान असं आणून पुन्हा कंटिन्यु. एका टेबलवर मास्कस ठेवलेत. स्वाईन फ्लू वाले नाही सुपर्म्यान, स्पैडरम्यान, ट्विटी चे चेहरे असलेले. लावता लावता बऱ्याच मास्कसनी माना टाकल्यात.
सॉफ्ट ड्रिंक्स मात्र भसाभसा संपतायत.
पपेट शो चालू झालाय. मुलं उठून त्या छोट्या स्टेजमागे जाऊन पपेट कोण नाचवतंय ते पहातायत. पालक कौतुकानं फोटो काढतायत.
मॅजिक शो पण रंगतो. मग म्युझिक. पोरं उठून झकास नाच करतायत. आपल्याच तालात.
मधल्या थोड्या वेळात आम्ही पोरांना घोड्यावर चढवायचा प्रयत्न करतोय. पोरी बसतायत. पोरगे मात्र नको नको पासून भोकाडापर्यंत सगळे सूर लाऊन घेतात.
त्यानंतर जेवण. म्हणजे मोठ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा आणि पोरांसाठी सगळ्यात गौण प्रोग्रॅम. "कम्मॉन मॉम यापेक्षा मॅगी चांगलं लागतं" "बट धिस डजंट टेस्ट लाईक पास्ता अंकल" हे तिथल्या लाईव पास्ता काऊंटर वरच्या शेफला. मला यच्चयावत मोठ्या माणसांशी बोलताना लाजणारी किंवा घाबरणारी आमच्या पिढीतली जन्ता आठवते. फक्त ब्राऊनी आणि आईसक्रीम या गोष्टी लगेच संपतात.
जेवण अर्धवट सोडून बहुतेक सगळी मुलं तिथं असलेल्या मोकळ्या जागेत विहरतायत. एक छोटासा लॉनचा तुकडा आहे तो पोरांनी व्यापलाय. "ममा मी लॉनवर शूज काढले तर चालेल? " हे असले प्रश्न मात्र आमच्या लाजाळू पिढीनं विचारलेले मला आठवत नाहीत. मधल्या सर्कल भोवती गरागरा पळताना ऐकू येणारं खळाखळा हास्य मात्र अगदी आमच्या लहानपणचंच. बाकी सगळ्या कार्यक्रमांपेक्षा या गोष्टी पोरं भान विसरून एंजॉय करतायत. अजूनही सगळं बदललेलं नाही तर.
जाताना गाडीत नव्या पिढीचे दोन्ही प्रतिनिधी माझ्या अंगावर जमेल तितके अवयव पसरून निद्राधीन झालेत. बालदिनाची गिफ्टस हातात घट्ट पकडून. हातावरचे टॅटूज इतक्या धावपळीत फिकट झालेत. मी विचार करतेय. मला वाटलं होतं मला आमच्या लहानपणचा बालदिन आठवून नॉस्टॅल्जिक वाटेल. पण शाळेच्या ग्राऊंडवर उभं राहून भाषण ऐकणे यापलिकडे मला काही आठवत नाही. त्यानंतर सुट्टीच असायची. ती इतर सुट्ट्यांसारखीच जायची. इथं खरंच मुलांना आवडेल असं काहीतरी करायचा प्रयत्न आहे. मुलांबरोबर पालक आहेत. खाण्यासाठी मागं पळणारे. लांबून लक्ष ठेवणारे. प्रत्येक ठिकाणी त्यांना मागं न ओढणारे. पपेटच्या पडद्यामागे जाऊ देणारे. इथं पालक म्हणजे फक्त आईवडील नाही तर तिथं असलेली सगळीच मोठी माणसं. ज्यांच्यासाठी करायचं त्यांना त्यातला आनंद मिळाल्याशी कारण. आपण पैसे आणि वेळ देऊन मुलांना काहीतरी दिल्याचं पालकांना समाधान. पण खरी मजा जेवण अर्धवट सोडून गरागरा फिरण्यात आणि लॉनवर पळण्यात आहे हे आजच्या पिढीचं आमच्या सारखंच सेम आहे हे गुपित मला कळलंय. मला कळलंय हे त्यांना मात्र माहित नाहीये. ते उद्या परत मला मॅक्डीमधे चल म्हणणार आहेत, खेळण्यांची लेटेस्ट नावं सांगून हट्ट करणार आहेत, बटन ऑपरेटेड कंपास बॉक्स, स्केट गार्ड किट असल्या गोष्टी मित्रांकडे आहेत म्हणून घ्य़ायला लाऊन एकदाही न वापरता ठेऊनही देणार आहेत. पण प्रत्येक छोट्या गोष्टीतलं कुतुहल आणि आनंद घेण्याची त्य़ांची कपॅसिटी हजारो वर्षांनंतरही तशीच असणार आहे. पण त्यांना तरी त्यांनी लहानपणी साजरा केलेला एखादा बालदिन आठवेल का? आय डाऊट!
उद्या मांडीत ताकद असेलही,
पण त्यावर विसावायला तुझ्या डोक्याला वेळ नसेल.
उद्याही हातांची बोटं तशीच फिरू शकतील,
पण तो स्पर्श लावून घेणारे गाल आणि केस असतील सैरावैरा.
तुझं बालपण तुझ्यासाठी असेल पुसट झालेलं.
पण त्या ओठांवरचे दुधाचे थेंब अजून तितकेच ठळक..
त्यांच्या मनात.
शेवट अगदी उच्च..
शेवट अगदी उच्च..
बापरे.. काय लिहीलं आहे..
बापरे.. काय लिहीलं आहे.. ;अफाट; यालाच म्हणतात असं वाटंतं आहे!!
वा.... वा.... वा... प्रतिसाद
वा.... वा.... वा...
प्रतिसाद द्यायला नेमके शब्द सुचत नाहीयेत म्हणून एवढंच...
(No subject)
Pages