मनमोकळं-७

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बॉम्बिली बिलीबॉम. मागच्या सीटवर माझ्या मैत्रिणीचा मुलगा माझ्या कानात ओरडतोय. गाडीतला स्टिरियो फुल वॉल्युमवर ठणठण चालू आहेच. बाजूलाच माझी भाची काहीतरी यो टाईप्स्स हातवारे करतेय. आवाज एका विशिष्ट पट्टीच्या वर गेल्यावर मला कुठलंच गाणं सहन होत नाही खरंतर. पण आज तो लाव्हा कानात ओतत असताना मी तो एंजॉय करतेय की काय अशी शंका येईपर्यंत शांत आहे. पुढे मैत्रीण आणि तिचा नवरा शांत गाणी आणि ढिंच्च्याक गाणी यावर वाद घालतायत. शांत गाण्यांची बाजू घेणारी मैत्रीण तावातावाने आणि ढिंच्याकची बाजू घेणारा शांतपणे. शेवटी मैत्रीण-नवर्‍याला पोरांचे मत घेण्याची आयडीया सुचते आणि स्टिरियोमधून पण बॉम्बिली बिलीबॉम गळायला लागतं. मी आता पार थंड. हे जीवन असार आहे च्या पलिकडे. माझं लेटेस्ट मुव्हिजचं गाढ अज्ञान बघून ते थंड. बहुधा माझी दया येऊन मैत्रीण आता यापुढं एक आपल्या टाईप गाणं आहे असा दिलासा देतेय.
आणि गुंजासा है कोई एकतारा.. सुरू होतं. "ए मी पाहिलाय हा मुव्ही. आणि हे गाणं खरंच आवडतं मला. " मी आजच्या जनरेशनच्या मधे बसण्यापुरते मार्क मिळवते. हिला बालदिनाला नेऊन आपण फार मोठी चूक करत नाहीयोत अशा अर्थाचे दोन अस्पष्ट सुस्कारे माझ्या दोन्ही बाजूनी ऐकू येतात. वय वर्षे पाच आणि सात. हो आम्ही बालदिनाला चाल्लोय. अं सॉरी बालादिन नाही, चिल्ड्रन्स डे. शाळेच्या ग्राऊंडवर नाही, सोहो’ज नावाच्या ’प्लेस’मधे. आणि तिथं गुलाबाचं फूल कोटाला लावणार्‍या चाचा नेहरूंवर भाषण नाहीये. तिथं चिल्ड्रन्स डे स्पेशल आहे. पपेट शो, मॅजिक शो, हॉर्स रायडिंग आणि ओ यस्स द युबिक्विटस टॅटूज. काय कशाचा मेळ आहे का? मला ’आमचे येथे आंबे, नारळ, कोकम, पर्कर व रायटेबल सिडीज मिळतील’ असल्या पाटीची आठवण येते.
पोचताक्षणी पोरं टॅटूजच्या रांगेत लागतात. मला ड्रॅगन, मला बटरफ्लाय. एखाद्या आईनं "अरे ते फ्लोरल प्रिंट किती सही आहे." म्हटलं चुकून तर "अगं आई मी काय गर्ल आहे का हातावर फ्लार काढायला?" आजच्या मुलांना किती व्यवस्थित माहित असतं त्यांना काय हवंय किंवा काय शोभतं.
स्टार्टर्स चा भरपूर मारा चालूय. ज्याकडे पोरांचं अज्जिबात लक्ष नाहीये. ती मस्तीत गुंग. आणि पालक मात्र मुलांनी खावं म्हणून डिश हातात घेऊन त्यांच्या आगेमागे फिरून शेवटी नाईलाजानं 'सगळं आवडतं असूनही खात नाहीत कार्टी’ ची इंग्लिश भाषांतरं करत हातातल्या डिशेस फस्त करतायत. जी मुलं आपल्याबरोबर आहेत त्यांची आई मी नाहीच्चे मुळी असं दाखवत बायका फिरतायत. सॉफ्ट तर सॉफ्ट म्हणून हातात ड्रिंक्स घेऊन कॉर्नर टेबल्स पकडून पुरुष मंडळींनी गप्पांचे फड टाकलेत. मधेच बायकोने फारच जोरात हाकाटी केली तर उठून काय क्य़ामेरा, गाडीत राहिलेलं एखादं सामान असं आणून पुन्हा कंटिन्यु. एका टेबलवर मास्कस ठेवलेत. स्वाईन फ्लू वाले नाही सुपर्म्यान, स्पैडरम्यान, ट्विटी चे चेहरे असलेले. लावता लावता बऱ्याच मास्कसनी माना टाकल्यात.
सॉफ्ट ड्रिंक्स मात्र भसाभसा संपतायत.
पपेट शो चालू झालाय. मुलं उठून त्या छोट्या स्टेजमागे जाऊन पपेट कोण नाचवतंय ते पहातायत. पालक कौतुकानं फोटो काढतायत.
मॅजिक शो पण रंगतो. मग म्युझिक. पोरं उठून झकास नाच करतायत. आपल्याच तालात.
मधल्या थोड्या वेळात आम्ही पोरांना घोड्यावर चढवायचा प्रयत्न करतोय. पोरी बसतायत. पोरगे मात्र नको नको पासून भोकाडापर्यंत सगळे सूर लाऊन घेतात.
त्यानंतर जेवण. म्हणजे मोठ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा आणि पोरांसाठी सगळ्यात गौण प्रोग्रॅम. "कम्मॉन मॉम यापेक्षा मॅगी चांगलं लागतं" "बट धिस डजंट टेस्ट लाईक पास्ता अंकल" हे तिथल्या लाईव पास्ता काऊंटर वरच्या शेफला. मला यच्चयावत मोठ्या माणसांशी बोलताना लाजणारी किंवा घाबरणारी आमच्या पिढीतली जन्ता आठवते. फक्त ब्राऊनी आणि आईसक्रीम या गोष्टी लगेच संपतात.
जेवण अर्धवट सोडून बहुतेक सगळी मुलं तिथं असलेल्या मोकळ्या जागेत विहरतायत. एक छोटासा लॉनचा तुकडा आहे तो पोरांनी व्यापलाय. "ममा मी लॉनवर शूज काढले तर चालेल? " हे असले प्रश्न मात्र आमच्या लाजाळू पिढीनं विचारलेले मला आठवत नाहीत. मधल्या सर्कल भोवती गरागरा पळताना ऐकू येणारं खळाखळा हास्य मात्र अगदी आमच्या लहानपणचंच. बाकी सगळ्या कार्यक्रमांपेक्षा या गोष्टी पोरं भान विसरून एंजॉय करतायत. अजूनही सगळं बदललेलं नाही तर.
जाताना गाडीत नव्या पिढीचे दोन्ही प्रतिनिधी माझ्या अंगावर जमेल तितके अवयव पसरून निद्राधीन झालेत. बालदिनाची गिफ्टस हातात घट्ट पकडून. हातावरचे टॅटूज इतक्या धावपळीत फिकट झालेत. मी विचार करतेय. मला वाटलं होतं मला आमच्या लहानपणचा बालदिन आठवून नॉस्टॅल्जिक वाटेल. पण शाळेच्या ग्राऊंडवर उभं राहून भाषण ऐकणे यापलिकडे मला काही आठवत नाही. त्यानंतर सुट्टीच असायची. ती इतर सुट्ट्यांसारखीच जायची. इथं खरंच मुलांना आवडेल असं काहीतरी करायचा प्रयत्न आहे. मुलांबरोबर पालक आहेत. खाण्यासाठी मागं पळणारे. लांबून लक्ष ठेवणारे. प्रत्येक ठिकाणी त्यांना मागं न ओढणारे. पपेटच्या पडद्यामागे जाऊ देणारे. इथं पालक म्हणजे फक्त आईवडील नाही तर तिथं असलेली सगळीच मोठी माणसं. ज्यांच्यासाठी करायचं त्यांना त्यातला आनंद मिळाल्याशी कारण. आपण पैसे आणि वेळ देऊन मुलांना काहीतरी दिल्याचं पालकांना समाधान. पण खरी मजा जेवण अर्धवट सोडून गरागरा फिरण्यात आणि लॉनवर पळण्यात आहे हे आजच्या पिढीचं आमच्या सारखंच सेम आहे हे गुपित मला कळलंय. मला कळलंय हे त्यांना मात्र माहित नाहीये. ते उद्या परत मला मॅक्डीमधे चल म्हणणार आहेत, खेळण्यांची लेटेस्ट नावं सांगून हट्ट करणार आहेत, बटन ऑपरेटेड कंपास बॉक्स, स्केट गार्ड किट असल्या गोष्टी मित्रांकडे आहेत म्हणून घ्य़ायला लाऊन एकदाही न वापरता ठेऊनही देणार आहेत. पण प्रत्येक छोट्या गोष्टीतलं कुतुहल आणि आनंद घेण्याची त्य़ांची कपॅसिटी हजारो वर्षांनंतरही तशीच असणार आहे. पण त्यांना तरी त्यांनी लहानपणी साजरा केलेला एखादा बालदिन आठवेल का? आय डाऊट!

उद्या मांडीत ताकद असेलही,
पण त्यावर विसावायला तुझ्या डोक्याला वेळ नसेल.
उद्याही हातांची बोटं तशीच फिरू शकतील,
पण तो स्पर्श लावून घेणारे गाल आणि केस असतील सैरावैरा.
तुझं बालपण तुझ्यासाठी असेल पुसट झालेलं.
पण त्या ओठांवरचे दुधाचे थेंब अजून तितकेच ठळक..
त्यांच्या मनात.

विषय: 
प्रकार: 

मस्त उतरलय, थेट मनातून कागदावर (का स्क्रीनवर म्हणू ?) आणि तिथून पुन्हा मनात.

खरंच. आपल्या वेळी बालदिनाचं महत्व नुसतं तोंडदेखलंच/शाळेतली भाषणं ऐकण्यापुरतंच होतं. त्यामानाने इथली मुलं लकी खूपच.

छान लिहिलं आहेस.

शांत गाण्यांची बाजू घेणारी मैत्रीण तावातावाने आणि ढिंच्याकची बाजू घेणारा शांतपणे.
पण प्रत्येक छोट्या गोष्टीतलं कुतुहल आणि आनंद घेण्याची त्य़ांची कपॅसिटी हजारो वर्षांनंतरही तशीच असणार आहे. >> मस्त.
त्या 'प्लेस' चं वर्णन इतकं शब्दशः केलं आहेस की डोळ्यासमोर शंभरेक मुलांची जत्रा आली! आणि मध्ये मध्ये मुद्दाम वापरलेले इंग्रजी शब्द वाचून ते बोलणारे मुलांचे आवाजही ऐकू यायला लागले! खूप सही.

संघमित्रा
खूप मस्त लिहीलयस, पालक, मुलांसकट सगळं डोळ्यापुढे जसच्या तसे उभे राहीले. खर तर मला माझ्या लहानपणी शाळेत बालदिन कसा साजरा करायचे तेच आठवत नाहीये आता, अगदी भाषणं सुद्धा आठवत नाहीयेत..

अगदी करेक्ट सुपर लिहिले आहे. मस्त. परवा आम्हाला मॉल मध्ये एक अप्रतीम बेबी जॅकेट ( व्हाइट विथ रोजेस) व टेरिबली क्युट सिल्वर सॅन्ड्ल्स दिसले मी मुलीला म्हण्ले मी घेउन ठेवू का? तुझ्या बाळाला होइल.!
तिने अतिशय वाइट चेहरा केला.

छान लिहिता हो. आमचे लहानपणि न्हाव्याकडुन जाउन आल्यावर 'बालदिन साजरा झाला' म्हणायचे.
""हिला बालदिनाला नेऊन आपण फार मोठी चूक करत नाहीयोत अशा अर्थाचे दोन अस्पष्ट सुस्कारे माझ्या दोन्ही बाजूनी ऐकू येतात. "" हे वाक्यात बलिदानाला नेउन असे पहिल्यान्दा चुकुन वाचले.

क्या बात है, क्या बात है सन्मी!

प्रत्येक छोट्या गोष्टीतलं कुतुहल आणि आनंद घेण्याची त्य़ांची कपॅसिटी हजारो वर्षांनंतरही तशीच असणार आहे. पण त्यांना तरी त्यांनी लहानपणी साजरा केलेला एखादा बालदिन आठवेल का? आय डाऊट!
>>>
हा जो सन्मी टच आहे ना... क्या बात हैच! Happy
शेवटच्या ओळीही सुंदर!

खंत आहे पण तरीही त्यातून डोकावणारा आशेचा चुकार किरण्पण आवडला. आपाल्या पिढीचं आणि या पिढीचं काहीतरी सेम आहे ना, मग ते नक्की त्यांना आठवेल, नो डाउट!
पुन्हा एकदा छान लिहिलंसं. कित्ती दिवसांनी का होईना असं छान छान लिहीत आहेस हे पाहून बरं वाटलं.

तुझं प्रत्येक लिखाण आवडतं, तसंच हेही आवडलं. Happy

चेंज इज गुड- हेच खरं. नाहीतर प्रत्येक वेळ-काळाला, प्रसंगाला, घटनांना नॉस्टॅल्जिक व्हॅल्यु कशी येईल..? आजुबाजूला कितीही काहीही बदलत असलं, तरी एखादा धागा सारखा, गुंफणारा असतोच. मग भले तो 'बदलण्याची ताकद सारखीच' असण्याचा का असेना.

आमचे सारे बालदिन शिक्षकांची न कळणारी, रटाळ भाषणे ऐकण्यात गेले. (ते बहुधा 'वरून' ठरवून दिलेल्या कार्यक्रमाबरहुकूम असायचे बहुधा). आता पॅरेंट्स-टीचर्स मिटिंगला लेक तिच्या 'मिस'ला लाजत लाजत गुलाबाचं फुल देते, अन 'हम्बली' खाली मान घालून बाजूला उभी राहते; तेव्हा आपसूकच सर घरी आले म्हणून थरथरत्या हाताने चहा देताना खळकन आमच्या हातून फुटलेली कपबशी आठवते.

वाटतं, किती बदललंय; अन अरे, 'चेंज' होण्याची 'टेंडंसी' अजिबातच नाही की बदलली..!!

सन्मे.. अगदी मनमोकळं आणि सुरेख!! नेहमीप्रमाणेच Happy

उद्या मांडीत ताकद असेलही,
पण त्यावर विसावायला तुझ्या डोक्याला वेळ नसेल.
उद्याही हातांची बोटं तशीच फिरू शकतील,
पण तो स्पर्श लावून घेणारे गाल आणि केस असतील सैरावैरा.
तुझं बालपण तुझ्यासाठी असेल पुसट झालेलं.
पण त्या ओठांवरचे दुधाचे थेंब अजून तितकेच ठळक..
त्यांच्या मनात.

लाजवाब!!

सन्मे : छान लिहिलयस. आवडलं.

माझ्या मते, 'बालदिन बदलला नाहिये, बदललोय फक्त आपण. त्याकाळी मुलं असणारे आपण आज पालक झालोय हेच खरं'

What you say ????????

लहानपण देगा देवा....
(कुमारांच्या आवाजात ऐकले असेलच)
बाकि शेवटच्या ओळी निशब्द करणार्‍या आहेत, आणि काहीशा अपरिहार्य ही !!

मस्त......... मस्त.............मस्तच!
फारच छान.

क्या बात है, मस्तच लिहलस.
शाळेतील एखादातरी बालदिन आठवतो का म्हणुन प्रयत्न करतोय पण आठवत नाहीये.
एकतर त्या दिवशी मी बुट्ट्या मारल्या असतील किंवा आमच्या शाळेत सुट्टी नसावी.

मित्रा, ज्यांच्यासाठी करायचं त्यांना त्यातला आनंद मिळाल्याशी कारण. >> अगदी अगदी!

’आमचे येथे आंबे, नारळ, कोकम, पर्कर व रायटेबल सिडीज मिळतील’ Lol
शेवटच्या ओळी तर क्लासच..>> खरंय Happy

अप्रतिम अ...प्र...ति...म.... मस्तच!!!!! Happy खूप खूप खूप छान!

Pages