ना. धों महानोर ह्यांचा मी वेगळा परिचय करुन द्यायची काहीच गरज नाही. महानोरांच्या कविता ह्या मुख्यतः निसर्गाशी संबंधित असतात. कवि आपल्या लेखनीतून निर्सगाचे त्याला भावलेले वर्णन वाचकापर्यंत नुस्ते पोहचवतच नाही तर त्यांना आपल्या सोबत त्याचा भावविश्वात घेउन जातो. त्यांचा कविता वाचताना आपल्यातील एका वेगळ्याच "मी" ची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. हा "मी" जसा निसर्गाच्या वर्णनाने आंनदतो तसाच तो अंतर्मूख झाल्याशिवाय राहत नाही.
"रानातल्या कविता" ह्या त्यांच्या पहिल्याच निसर्गकवितासंग्रहाने लोकांना भुरळ घालली. पानझड मध्येही निसर्गकविता आहे. पण ती वेगळ्या स्वरुपात. हा संग्रह केवळ निसर्गकवितेने भरलेला नाही, तर त्याला जोड आहे त्यांचा जीवनातील काही वयक्तिक प्रसंगांची, चित्रपटातून लिहीलेल्या व प्रसिद्ध झालेल्या गाण्यांची, शासनाला विचारलेल्या जाबाची , अगतीक झालेल्या शेतकर्याची व शेवटी अंनतांत विलीन होऊ पाहणार्या एका आस्तिक भक्ताची. प्रत्येक कविता एक वेगळा रंग घेउन येत, वाचताना नकळत वाचकही त्या कविता स्वःतशी जोडू पाहतो.
मला आवडलेल्या काही कविता (किंवा त्यातील काही भाग) येथे देत आहे.
खेड्याकडे चला, कोणासाठी कशासाठी?
अडाण्यांच्या हाती जोर, काळीभोर काढी
त्यांच्या पडसावुलीत लांडग्यांचा तळ
शुभ्र स्वार्थासाठी केली माणसे गढूळ.
कोणी मरो तरी ह्यांच्या आसनांचा खेळ
महात्माच्या गाथेखाली पेटविला जाळ
ह्यांचा करणीने सत्य छिन्नभिन्न झाले
भर पावसाट उभे गाव ओस झाले.
हे लिहीतानाच मात्र त्यांचा निसर्गकवितेचा विसर त्यांना पडलेला नाही. ते लिहीतात,
गडद जांभळं
भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दर्वळ
.
जाईजुईचा
गंध मातीला
हिर्व्या झाडांचा, छंद गीताला
पानांवरती सांडले मोती
ओलं आभाळ आलं भेटीला
.
किंवा
काळ्या तांबड्या मातीचा
टिळा दगडधोंड्यांना
आम्ही भरला मरठ
हिरव्या बिलोरी झांडाना
येता पावसाळी झड
न्हाली गुलालात माती
पंखपिवळ्या पानांत
थेंब थेंब झाले मोती.
असा हा निसर्ग त्यांचा कवितेतून वारंवार डोकावत राहतो, वाचकाला एका वेगळ्या विश्वात नेत राहतो. पण अचानक पुढे ही निसर्गकविता थोडी बदलते आजच्या परिस्थितीला त्यांचा कवितेतून ते मांडतात.
पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी
पाण्यविना दाही दिशा आम्ही अनवाणी
सोडोनि संसार गेलं देशांतरा कोणी
तळे मळे ओस झाले पाण्याच्या कारणी
कुठा ना ओलवा कोणा सांगावी कहाणी
कबीराचा दोहा आता जगण्याकारणी.
सांगावी वेदना कोणा ऐकेनाच कोणी
त्यांचा आसनाला नाही दु:खाची लागणी
लाख येओव मोर्चा ह्यांची मात्र पूजाअर्चा
राज्य बुडो आलो तरी वांझोटीच चर्चा
चर्चा फार झाली आता सोसेना काहिली
भित्र्या स्वातंत्र्यात आम्हा म्याय कशी व्याली?
पंढरीच्या विठोबाला ते विचारतात ..
कोरड्या शेतीची पंढरीची वाट
तुझा भिमाकाढ कारुण्याचा
ओस झाला सारा चिमना संसार
डोळ्यात अंधार पांडूरंगा
पण त्यांची कविता निराश नाही, त्यांची कविता उदास नाही, कवितेतूनच ते निसर्गाचा अविष्काराचा एक वेगळा पैलू ते मांडतात.
यमुनेचे पाणी यावे कावेरीला
तापी नर्मदेला गंगा यावी
तुझी चंद्रभागा घालून वळसा
अजिंठ्याचा देशा थांबवावी
पाण्या पावसाचे बांधून वेटोळे
अंथरावे जाळे पांडूरंगा
त्यांची कविता आशावादी आहे, 'जो जे वांछिल' च्या जवळ जाणारी आहे.
सूर्यनारायणा नित नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा.
मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला
दिव्याच्या आधार जडो त्यांचा संसाराला.
ओंजळीनं भरू देगा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची.
आबादानी होवो शेत भरु दे दाण्यांचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे.
एकूनच कविता वाचकांसाठी एक पर्वणी.
पानझड - ना. धों. महानोर
ह्याच गीत पण खुप छान
ह्याच गीत पण खुप छान आहे...पद्मजा ताइंनी गायलय...
अरे वा, महानोरांच्याच कविता
अरे वा, महानोरांच्याच कविता या ..... बस नाम ही काफी है .....