वर्‍हाडी शब्दकोश

Submitted by हर्ट on 10 November, 2009 - 12:42

नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्‍हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्‍हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!

१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही ही ही ही !!!

काही पक्षी
टीटी = टीट्वी (टिटही म्हणतात हिंदीत)
होला = पारवा (लाल जंगली पारवा)
खबुत्तर = कबुतर
टोया = बारका वेगळ्या रंगाचे मुंडके असलेला पोपट
मिठ्ठू = लाल चोचीचा हिरवा पोपट

भाताचे तूस आणि कोंडा वेगवेगळे आहेत बहुतेक. कोंड्याची भाकरी होते. तुसाची होत नाही. तूस म्हणजे टरफल. म्हणजे भात भरडल्यावर निघतात ती सालपटे. भात भरडल्यावर निघालेला तांदूळदाणा पुन्हा सडावा लागतो तेव्हा कणीमिश्रित कोंडा निघतो. (असे वाटते)

उजव्या हाताला - जेवन्या हाताले, सरक्या हाताले
डाव्या हाताला- हगोड्या हाताले, धुत्या हाताले, वायल्या हाताले
समोर - म्हावरे, मावरे
बाजूला - बाजुनं
जनावराची पेंड - ढेप
न्हावी - म्हाली (कुकडे गेलता रे?? म्हाल्याच्या दुकानी गेलतो केस भाध्र्याले)
साप-सरप
पेरू- जाम

टीना, सोन्याबापू पेटलेच एकदम!!
लै झ्याक डिक्शनरी..
टीना बोहनीच आहे शब्द, भवानी हा अपभ्रंश आहे..

टीना, सोन्याबापू,
मस्त काम Happy

ढेपेचे एक मजा.
आमचे एक मुंबईचे काका अकोल्याला आले होते. त्यांना घेऊन शेगावला गेलो. महाराजांच्या पायाशी त्यांना गुळाची ढेप वाहायची होती. त्यांचा मुलगा, म्हणजे माझा चुलत भाऊ गाडीतून खाली उतरून वाणसामानाच्या प्रत्येक दुकानात जाऊन 'गुळाची ढेप आहे का?' असं विचारी. वर्‍हाडात ढेप म्हणजे पेंड. दुकानदार अर्थातच 'नाही' म्हणे. आम्हांला कळेना, कुठल्याच दुकानात गूळ कसा नाही ते... मग मातोश्रींच्या डोक्यात प्रकाश पडला. योग्य त्या शब्दांत प्रश्न विचारला गेला. गुळाची ढेप महाराजांना लाभली.

आत्मधून आणि मृण्मयी.. धन्यवाद..

इकडे लोक राग आल्यावर बडवेल, बुकलुन काढेल अस म्हणतात त्याला विदर्भात एक सॉल्लीड्ड वाक्प्रचार आहे.. Wink
चिडल्यावर मारेल या साठी विदर्भात "अस्सा पादविन न बाबू" अस म्हणतात Biggrin

केव्हाची लिहु कि नको अस करत होती पण जाऊदे..सोन्याबापू च बघुन हुरुप आला Lol

आणखी एक शिवी आहे.. घुबडतोंडी / घुबडतोंड्या Lol

भुलली = विसरली
याद नाही = आठवण नाही
येलु/येल्लु नको = जास्त लाडात येउ नको

सोन्याबापु आपण कुतणे/कुतु नको असे म्हणतो त्याला इकड काय शब्द आहे ?

चिनुक्स हे पन लिहिले नै मी मुद्दामच..
हेंबाडे हा शब्द आम्ही मित्र्मैत्रीणीमधे अजुनही प्रचलित आहे.. त्याचबरोबर हेंबडमिचकी, गगणी असेही शब्द आहेत Lol
गेंडूळ नै गेंडूर म्हणतात = गांडूळ ला म्हणुन तो गेंडरगिटकी अस आहे..

भद्दाडा = खुप मोठा / ठळक
मुर्रा / मुर्‍हा = म्हैस

जास्त मटकून हिड़गेपणा करणाऱ्या आमच्या एका कॉलेज मैत्रिणी ला पाहुन आमची आजी एकदम म्हणाली होती

"अये बापू , कौन वह्य रे हे चोंडकी? "

अभ्यासु लोकांस जर मिळाला तर लोककवी विठ्ठल वाघ सरांचा वर्हाड़ी म्हणी असलेला थीसिस वजा संग्रह मिळवावा, विदर्भ प्रसिद्ध आहे तो भयानक तेज बोली अन ठसन (attitude का काय म्हणतात ते) त्याच्या साठी हे इथल्या म्हणी मधून सुद्धा जास्त प्रकर्षाने जाणवते, उदा नणंद अन भावजयीत त्या कधी ही विस्तव ज जाणाऱ्या नात्याला डिफाइन करणारी एका त्रस्त वैदर्भीय गृहिणी ची ही म्हण

ज्या गावात ननद वसे तिच्याच पादन्याने मायी कनीक नासे

आमची आजी अस्सल वर्हाड़ी नमुना, बोलणे अतिशय तिरके पण मनाने अतिशय प्रेमळ!! तिची एक स्टाइल होते ती कुठल्या ही नातवंडाला बोलवताना प्रथम विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या सगळ्यां पोरांची नावे घ्यायची नंतर नाही ऐकले तर कृष्ण अन राम म्हणायची अन नाइलाज झाला की तोंडचा पट्टा सोडायची

उदा

"बापू येजो रे मायापाशी म्या बुडी हाव न मले लाड करू दे रे माया ज्ञानेस्वरा!!!"

"थांब बरं माय काम करू दे मले"

"ये रे मावल्या सोपान्या ये माय मुक्त्या (आम्हीच मुक्ताबाई सुद्धा)"

"बुडे भिन नोकों करू मले काम करू दे ओ आई ओ ह्या बुडीले सांगजो व"

"अय बाप्या येतं का नाही रे फोकन्या भोसईच्या गद्धईच्या (गाढ़वीच्या)"

"आलो आजी माय माये थांब उलिशिक श्या नोको देऊ मले"

"अय बाप्या येतं का नाही रे फोकन्या भोसईच्या गद्धईच्या (गाढ़वीच्या)"

"आलो आजी माय माये थांब उलिशिक श्या नोको देऊ मले"

>>> हे वाचून पु.लं.च्या 'रावसाहेब'मधलं 'जिम्या, ये की भाड्या..' हे वाक्य आठवलं Lol

मस्त Lol वाचायला मजाही आली आणि खूप गोडही वाटतेय. सोन्याबापूंनी वाक्यातही उपयोग करून दाखवल्याने वाक्य ऐकायलाच आली थेट! मस्त! मला फार आवडतात बोली भाषा ऐकायला. बोलता येत नाही एकही (म्हणूनच कदाचित) Happy

वाकय : वाकळ अंथरायचे एक जाड अंथरुण
सतरंजी : सात्री
उशी : उस्ती
तांदूळजिरा भाजी : माठ
मावा : खर्रा , घोटा
थापा : मावट्या (अरे त्याची गोठ(गोष्ट) नोका ऐकजा लंब्या मावट्या मारते तो)
विहीर (आड़) : बावड़ी
भोंडला : भुलाबाई
गौरी चा सण : महालक्ष्मी बसवल्या म्हणतात आमच्याकडे
कोहळे : कवळे
बोबड़ा : खेबड़ा
भांगलण (शेतीतले एक मशागतीचे काम) : डवरे धरणे (सर म्या उद्या येन नै मले तुरीले डवरे देणे हाय)
जनावरे : ढोरं

अजून काही शब्दः

सुगडं- संक्रांतीला वाणात 'लुटायचं' काळ्या मातीचं मडकं

दिवलाणी: पणती

आंगारडबी: आगपेटी (हा माझा आवडता शब्द, आंगारडबीमध्ये जी धग आहे आगपेटी किंवा माचिस मध्ये जाणवत नाही)

गंज हा शब्द वर आलाय त्यावरून आठवलं: गंजुली - छोटा गंज

पातेल्याला 'तपेलं' हा शब्दही चलनात आहे: 'त' वरून ताकभातला समांतर म्हण:
'त' म्हणजे तपेलं अन 'बु' म्हणजे बुडालं

गुळपट्टी: शेंगदाणे गुळाची चिक्की

साखरपट्टी: शेंगदाणे साखरेची पांढरी चिक्की

पण या दोन्ही 'भरडभुंज्या'कडे जाऊन गरम गरम खायच्या असतात

खरमुरे: भाजलेले खारे दाणे (गरम असणे आवश्यक)

चिरंजीचे दाणे: साखरेचा काटेरी हलवा

मोगरी: कपडे धुताना कपड्यावर आपटायचं बॅटसारखं उपकरण (याला प.म. मध्ये काय म्हणतात ते माहीत नाही)

कवेलू: कौलं

बारी: रांग

मेकूड: वर एका ठिकाणी हा शब्द आला आहे. मेकूड म्हणजे नुसता शेंबूड नव्हे तर नाकातच वाळलेला शेंबूड.

आज इतकेच

अवांतर:
वर्‍हाडी भाषेतलं विनोदी लेखन हा गेल्या काही वर्षात वर्‍हाडात तरी लोकप्रिय झालेला साहित्यप्रकार आहे. विशेषत: पुरुषोत्तम बोरकरांच्या 'मेड इन इंडिया' वर आधारलेल्या आणि अकोल्याच्या दीपक देशपांडेंनी शेकड्यांनी प्रयोग केलेल्या 'मेड इन इंडिया' या एकपात्री प्रयोगाने हा प्रकार लोकप्रिय केला. बोरकरांनी नंतर अनेक वर्षे 'होबासक्या' लिहिलं. विदर्भात प्रसिद्ध होणार्‍या अनेक वृत्तपत्रांना खास लोकाग्रहास्तव असं एखादं सदर ठेवावंच लागतं इतकी त्याची मागणी आहे. या सगळ्या साहित्याचा , त्याच्या परंपरेचा आणि प्रभावाचा एकंदरच अ‍ॅकेडमिक पातळीवर अभ्यास होण्याची गरज आहे. असा अभ्यास झाला आहे की नाही मला कल्पना नाही.

नंतर अनेक लोक या प्रकारात लेखन करू लागले. सध्या टीव्हीवर लोकप्रिय असलेल्या भारत गणेशपुरेच्या एकंदर फॉर्म आणि सादरीकरणामागे ही परंपरा आहे. या प्रकारात सध्या लोकप्रिय असलेलं सदर म्हणजे नरेंद्र इंगळे यांचे दै.लोकमत अकोला आवृत्तीत दररोज प्रसिद्ध होणारं 'गुल्लेर' हे सदर. इपेपर मध्ये आपण ते वाचू शकता.

मेड इन इंडिया हे बोरकरंचं पुस्तक १९८६ च्या दरम्यान प्रसिद्ध झालं. ते आम्ही सार्वजनिक वाचन करून गडबडा लोळून वाचायचो. मध्यंतरी पुन्हा विकत घेऊन आणून वाचले. तेवढीच मजा. यार दोस्तानले फोनवरून सगये ज्योक सांगून हस्लो

यावरून काल २०१२च्या म.भा.दि.मधला 'मर्‍हाटी बोलु कवतुके' हा उपक्रम आठवला. पुन्हा तिथल्या सगळ्या पोस्टी वाचून आले. निखळ करमणूक! Lol

Pages