मज़ा कोहरेके पर्देमे है....

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सुखं दुखतात. संथ आपल्या लयीत कुणासाठी तरी जगायचं म्हणून चाललेलं आयुष्य़ एका वळणावर येऊन एक मोट्ठा श्वास घेतं. जणू त्या वळणावरच तू येणार हे माहीत असल्यासारखं झाडीतून नशीब बाहेर येतं आणि म्हणतं "आलीस? ये.. माहीतच होतं मला तू येणार हे. घे घे अजून थोडे मोट्ठे श्वास घे. पण नंतर पुन्हा लगेच चालायला नको लागूस. विचाराला बस."
विचाराला बसू? अभ्यासाला बसल्यासारखी? बरं.
" नको गं प्रत्येक गोष्टीला बरं म्हणू. तू ठरव की तुला काय करायचंय. किंवा काय करायचं होतं आणि ते झालं का?
आणि जे काही करायचं असं तुला वाटत होतं ते होऊनही तू सुखी झालीस का? "
एकदम फिल्मी होतंय हे कळतं पण तरी घडतंय तेही खरंच.
मग त्या वळणावर बसून रहावं. लांबवर दिसणारे दिवसागणिक खुजे होणारे निळसर डोंगर न्याहाळत, वरून मखमली दिसणारे आणि पाण्यासाठी शेतकर्‍यांचं रक्त आटवणारे पट्टे शेतीचे पहात.
" पाहिलंस? अगं नुसतेच डोंगर आणि शेतीचे पट्टे पहा की. सतत शुभ्रकांती खालच्या जखमा पाहिल्याच पाहिजेत का? त्या आहेत. तू काय करणारेस? करू शकत असशील तर उतर मैदानात पण नसेल जमत तर किमान तुला काय हवंय ते तरी शोध.
"सगळं आयुष्य सापेक्ष असतं राणी. भव्य सोनेरी दरवाजातून वर जाणार्‍या संगमरवरी पायऱ्यांवरून वरचा निळा घुमट पहात महालात प्रवेश करायचा म्हटला तरी या भव्यतेत आजूबाजूला
कुणीच उरलं नसल्याची जाणीव आणि लहानपणची पाय मातीत मळवत पोपटानं अर्धवट खाऊन ठेवलेले गोड पेरू हुडकत घालवलेल्या अक्ख्या दिवसांची आठवण यायलाच हवी का? मग सांग
एवढा सगळ्यात जास्त गोड पेरू सुद्धा पूर्ण न खाता तो पोपट का निघून जात असेल?
"आणि मी म्हणतेय म्हणून विचार केलाच पाहिजे असंही नाही राणी. तू तुला हवं ते कर. हायबर्नेट हो हवी तर. "
जगतेय ते आयुष्य मला नकोय. हा कंटाळा आहे का? ’बरं हे नकोय तर मग काय पुढे? ऒल्टर्नेटिव्हज आहेत का काही? मग काय करणारेस? ’ वगैरे काळजीसूचक किंवा उपहासपूर्ण प्रश्न.
" च्या..." मनातल्या मनात सुद्धा नाहीच जमणार हे.
काही नाही. मी ठरवेन जमेल तेंव्हा. किंवा नाहीही ठरवणार. सांडणाऱ्या पाण्याला आपण वाट नाही दिली करून तरी ते त्याच्या मार्गानं जातंच की.
सतत काहीतरी प्रूव्ह करा, परफॊर्म करा, काय घोळ होऊ शकतील ते आधीच पहा , चुका होऊच देऊ नका आणि झाल्याच तर पुढच्या वेळी त्या होऊ नयेत यासाठी लग्गेच नियोजन करायला लागा. हा क्वालिटी कंट्रोल व्यवसायातून आयुष्यातही शिरलाय. नकळत. बरं एवढं सगळं करून आयुष्याचं जे जे काय व्हायचं ते होतंच आहे. आणि प्रत्येक वेळी हे असे मॆनेजमेंट फंडे वापरूनही फसलेले प्रयोग पाहून नशीब आपल्याला डोळा मारून ओव्हरटेक करून निघून गेल्यावर आपल्याला कळतं की अच्छा हे आधीच उमेदवार ठरवून झालेल्या भरतीसारखं होतं तर. आपण धापा टाकत बराच वेळ पोहून किनायाला लागल्यावर समजणार की ऒल अलॊंग पाणी चार फूट होतं आणि शिवाय किनारा भलताच आहे.
मी अजून तिथंच त्या वळणावर बसून आहे. नुसतं बसण्यातला आनंद घेत. पुढं जाणारा रस्ता पहात. पोचायला कदाचित वेळ लागेल या निव्वांत बसण्यामुळं पण रस्ताही आपल्या जागी आहे आणि मुक्कामही.

अपने हाथोसे जिंदगीकी तसबीर को धुंधला बनाते हुए
उसने देखा है मुझे ..
पर वो चुप है, जो जानता है,
मज़ा कोहरेके पर्दे मे है उसके पार नही!

- संघमित्रा

विषय: 
प्रकार: 

>>मग सांग एवढा सगळ्यात जास्त गोड पेरू सुद्धा पूर्ण न खाता तो पोपट का निघून जात असेल?
हे जबरदस्त आहे हो! कायम लक्षात राहिल माझ्या. तुम्ही अगदी बरोबर लिहिलं आहे. खूप आवडलं. बाय द वे, शेवटल्या ओळी कोणाच्या आहेत?

खूपच सुरेख!
आपण धापा टाकत बराच वेळ पोहून किनायाला लागल्यावर समजणार की ऒल अलॊंग पाणी चार फूट होतं आणि शिवाय किनारा भलताच आहे.

काय अप्रतिम लिहिलं आहेस गं. माझ्या मनातलं लिहिलंस असं वाटलं मला एकदम. गेले कित्येक दिवस असा विचार मनात येत होतं पण तुझ्या सारखं इतकंसमर्पक तर जाउदेत साधं शब्दात सुद्धा उतरवायला जमलं नाही. सारखं असं वाटतंय कि नक्की हेच करायचं होतं का आपल्याला? आणि हो हेच करायचं होता तर मग करून झालं की आता पुढे काय? किंवा हे नवता करायचं तर मग काय करायचं होता? असो पण तुझ्या लेखाने वाटलं की खरंच जरा विसावू या वळणावर आणि मग बघू पुढे काय ते ...

जगण्यात क्वालिटी कंट्रोल! भयंकरच कल्पना आहे, पण वास्तवही आहे. हलकेच घुसत जाते ही कल्पना प्रत्यक्ष जगण्यात...
मी अजून तिथंच त्या वळणावर बसून आहे. नुसतं बसण्यातला आनंद घेत.
वा! हे असे दिवस कमीच होत चाललेल्या जगण्यात हे असे लेखन हेच वळण ठरते...

संथ आपल्या लयीत कुणासाठी तरी जगायचं म्हणून चाललेलं आयुष्य़ एका वळणावर येऊन एक मोट्ठा श्वास घेतं. जणू त्या वळणावरच तू येणार हे माहीत असल्यासारखं झाडीतून नशीब बाहेर येतं आणि म्हणतं "आलीस? ये.>>>
अतिशय मोहक कल्पना

अगदी खरे!!

सतत काहीतरी प्रूव्ह करा, परफॊर्म करा, काय घोळ होऊ शकतील ते आधीच पहा , चुका होऊच देऊ नका आणि झाल्याच तर पुढच्या वेळी त्या होऊ नयेत यासाठी लग्गेच नियोजन करायला लागा. हा क्वालिटी कंट्रोल व्यवसायातून आयुष्यातही शिरलाय. नकळत.

जीवनाच्या अपूर्णते मधेही एक सौंदर्य आहे. उगीच का चौदहवी का चांद वगैरे म्हणतात?
एक सुंदर गाणे आठवले बघा.
स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा..गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.......
बर्‍याच दिवसांनी काहीतरी सुंदर वाचले.या वाचनानंदासाठी आभार.

तुम्ही.सगळ्यांनी वाचलंत आणि तुमच्यापर्यंत पोचलं. किती बरं वाटलं.
स्वप्ना त्या खालच्या ओळी माझ्याच आहेत. आणि अजून एक गंमत म्हणजे मी स्वतः हे लिखाण परत वाचलं तेंव्हा मलाही सगळ्यात हेच वाक्य आवडलं, तुम्हाला आवडलेलं.
सुरुची खरंच?
किती दिवसांनी मायबोलीवर आले. पहिल्यांदा आले होते तेंव्हा सारखंच प्रत्येक वेळी काहीतरी स्वतःचं लिहूनच एंट्री करावीशी वाटते. आणि प्रत्येक वेळी वाटतं यावेळी कुणी वाचेल की नाही? काही लोकांना तरी भावेल का? प्रत्येक वेळी प्रतिसाद बघून ' लांब उडी दुसरा नंबर यत्ता तिसरी ' चं बक्षिस मिळाल्यागत आनंद होतोच. मायबोली आपल्या शाळेसारखी, गावासारखी आणि आईसारखी एकच एक.

खूप दिवसांनी आणि खूप छान. असा संवाद जगणं सुसह्य करतो. प्रत्येक गोष्ट तर्कसंगत, सुनियोजित असावी अशा अट्टाहासानं जगताना, पावलोपावली विसंगती, विरोधाभास दिसायला लागतात; अनाकलनीय, अकल्पित असं काही घडत रहातं तेंव्हा बावरायला, गोंधळायला होतं. त्यावेळी असा आश्वासक संवाद आवश्यक असतो. तो कुणाशी असतो? नशीबाशी? आपल्याच सावलीबरोबर की आणखी कुणा अद्दृश्य व्यक्तिशी? समोरचं माणूस हाही एक आभासच. खरं तर तो संवाद आपला-आपल्याशीच असतो. पण तो आपल्याबरोबरच इतरांनाही एक प्रत्यय देऊन जातो!
-बापू

अप्रतिम याशिवाय काही दुसरा शब्दच नाहीये. मी कितीतरी वेळा वाचलं आणि प्रत्येकवेळी नव्यानी पोचलं. वेलकम बॅक!

सन्मी! कुठे हरवली होतीस गं? मस्त वाटलं वाचून.
निव्वांत ऐवजी निवांत हवे. पण बसू नकोसच तू निवांत, पुढचं कधी लिहीतेस?

आपण धापा टाकत बराच वेळ पोहून किनायाला लागल्यावर समजणार की ऒल अलॊंग पाणी चार फूट होतं आणि शिवाय किनारा भलताच आहे.
>>>
मस्त!
जगण्यात क्वालिटी कंट्रोल>>> हे मी ही बरेचदा नकळतपणे करते, पण त्यातनं विशेष काही फायदा होत नाही असा अनुभव आहे Happy

सतत काहीतरी प्रूव्ह करा, परफॊर्म करा, काय घोळ होऊ शकतील ते आधीच पहा , चुका होऊच देऊ नका आणि झाल्याच तर पुढच्या वेळी त्या होऊ नयेत यासाठी लग्गेच नियोजन करायला लागा. हा क्वालिटी कंट्रोल व्यवसायातून आयुष्यातही शिरलाय. नकळत.>> :(( काय सन्गु.. रडुच आलं.

one of my most fav....

खूप आधी वाचलं होतं... प्रतिसाद इथे द्यायचा राहून गेला असावा..
Happy

>>सतत काहीतरी प्रूव्ह करा, परफॊर्म करा, काय घोळ होऊ शकतील ते आधीच पहा , चुका होऊच देऊ नका आणि झाल्याच तर पुढच्या वेळी त्या होऊ नयेत यासाठी लग्गेच नियोजन करायला लागा. हा क्वालिटी कंट्रोल व्यवसायातून आयुष्यातही शिरलाय. नकळत. बरं एवढं सगळं करून आयुष्याचं जे जे काय व्हायचं ते होतंच आहे.

जबरदस्त लेखन!!!!

आभार वाचल्याबद्दल..
आनंदयात्री, Happy

संघमित्रा,
फारच सुंदर शब्दातित केलय गं.. आणि खालच्या त्या चार ओळी बेहद्द आवडल्या..

Pages