मज़ा कोहरेके पर्देमे है....

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सुखं दुखतात. संथ आपल्या लयीत कुणासाठी तरी जगायचं म्हणून चाललेलं आयुष्य़ एका वळणावर येऊन एक मोट्ठा श्वास घेतं. जणू त्या वळणावरच तू येणार हे माहीत असल्यासारखं झाडीतून नशीब बाहेर येतं आणि म्हणतं "आलीस? ये.. माहीतच होतं मला तू येणार हे. घे घे अजून थोडे मोट्ठे श्वास घे. पण नंतर पुन्हा लगेच चालायला नको लागूस. विचाराला बस."
विचाराला बसू? अभ्यासाला बसल्यासारखी? बरं.
" नको गं प्रत्येक गोष्टीला बरं म्हणू. तू ठरव की तुला काय करायचंय. किंवा काय करायचं होतं आणि ते झालं का?
आणि जे काही करायचं असं तुला वाटत होतं ते होऊनही तू सुखी झालीस का? "
एकदम फिल्मी होतंय हे कळतं पण तरी घडतंय तेही खरंच.
मग त्या वळणावर बसून रहावं. लांबवर दिसणारे दिवसागणिक खुजे होणारे निळसर डोंगर न्याहाळत, वरून मखमली दिसणारे आणि पाण्यासाठी शेतकर्‍यांचं रक्त आटवणारे पट्टे शेतीचे पहात.
" पाहिलंस? अगं नुसतेच डोंगर आणि शेतीचे पट्टे पहा की. सतत शुभ्रकांती खालच्या जखमा पाहिल्याच पाहिजेत का? त्या आहेत. तू काय करणारेस? करू शकत असशील तर उतर मैदानात पण नसेल जमत तर किमान तुला काय हवंय ते तरी शोध.
"सगळं आयुष्य सापेक्ष असतं राणी. भव्य सोनेरी दरवाजातून वर जाणार्‍या संगमरवरी पायऱ्यांवरून वरचा निळा घुमट पहात महालात प्रवेश करायचा म्हटला तरी या भव्यतेत आजूबाजूला
कुणीच उरलं नसल्याची जाणीव आणि लहानपणची पाय मातीत मळवत पोपटानं अर्धवट खाऊन ठेवलेले गोड पेरू हुडकत घालवलेल्या अक्ख्या दिवसांची आठवण यायलाच हवी का? मग सांग
एवढा सगळ्यात जास्त गोड पेरू सुद्धा पूर्ण न खाता तो पोपट का निघून जात असेल?
"आणि मी म्हणतेय म्हणून विचार केलाच पाहिजे असंही नाही राणी. तू तुला हवं ते कर. हायबर्नेट हो हवी तर. "
जगतेय ते आयुष्य मला नकोय. हा कंटाळा आहे का? ’बरं हे नकोय तर मग काय पुढे? ऒल्टर्नेटिव्हज आहेत का काही? मग काय करणारेस? ’ वगैरे काळजीसूचक किंवा उपहासपूर्ण प्रश्न.
" च्या..." मनातल्या मनात सुद्धा नाहीच जमणार हे.
काही नाही. मी ठरवेन जमेल तेंव्हा. किंवा नाहीही ठरवणार. सांडणाऱ्या पाण्याला आपण वाट नाही दिली करून तरी ते त्याच्या मार्गानं जातंच की.
सतत काहीतरी प्रूव्ह करा, परफॊर्म करा, काय घोळ होऊ शकतील ते आधीच पहा , चुका होऊच देऊ नका आणि झाल्याच तर पुढच्या वेळी त्या होऊ नयेत यासाठी लग्गेच नियोजन करायला लागा. हा क्वालिटी कंट्रोल व्यवसायातून आयुष्यातही शिरलाय. नकळत. बरं एवढं सगळं करून आयुष्याचं जे जे काय व्हायचं ते होतंच आहे. आणि प्रत्येक वेळी हे असे मॆनेजमेंट फंडे वापरूनही फसलेले प्रयोग पाहून नशीब आपल्याला डोळा मारून ओव्हरटेक करून निघून गेल्यावर आपल्याला कळतं की अच्छा हे आधीच उमेदवार ठरवून झालेल्या भरतीसारखं होतं तर. आपण धापा टाकत बराच वेळ पोहून किनायाला लागल्यावर समजणार की ऒल अलॊंग पाणी चार फूट होतं आणि शिवाय किनारा भलताच आहे.
मी अजून तिथंच त्या वळणावर बसून आहे. नुसतं बसण्यातला आनंद घेत. पुढं जाणारा रस्ता पहात. पोचायला कदाचित वेळ लागेल या निव्वांत बसण्यामुळं पण रस्ताही आपल्या जागी आहे आणि मुक्कामही.

अपने हाथोसे जिंदगीकी तसबीर को धुंधला बनाते हुए
उसने देखा है मुझे ..
पर वो चुप है, जो जानता है,
मज़ा कोहरेके पर्दे मे है उसके पार नही!

- संघमित्रा

विषय: 
प्रकार: 

वॉव!! सही लिहीले आहे..
असं काही वाचले की जाणवते, मायबोलीवर काही लेखकांचे नाव , कितीही काळाने का होईना, जरी दिसले तरी उत्तमोत्तम मेजवानी मिळणार याची खात्री असते!

काय लिहिलयंस सन्मी!!

आपण धापा टाकत बराच वेळ पोहून किनायाला लागल्यावर समजणार की ऒल अलॊंग पाणी चार फूट होतं आणि शिवाय किनारा भलताच आहे.
>>> जस्ट टू गूड!

भारी.
बरं एवढं सगळं करून आयुष्याचं जे जे काय व्हायचं ते होतंच आहे>>> हे सगळ्यात आवडलं. हे जे होतय तेच आयुष्य आहे हेच लक्षात येत नाही. Life is what is happening to you right now.. कळतं पण वळत नाही.

सन्मे, धन्यवाद..
खूप सुरेख असं काही वाचायला दिल्याबद्दल..
आता हे असं खाद्य देऊन भूमीगत होऊ नकोस परत.. येत रहा गं.. Happy

भारी.
Exactly असच काहीबाही मनात येत होतं. तू सुंदर लिहून त्याला मूर्तरूप दिलस. धन्यवाद.

एवढं सगळं करून आयुष्याचं जे जे काय व्हायचं ते होतंच आहे >>> हे आवडलं. ती पूर्ण कॉन्सेप्टच (quality control) आवडली.

मस्त जमलय.
>>अपने हाथोसे जिंदगीकी तसबीर को धुंधला बनाते हुए
उसने देखा है मुझे ..
पर वो चुप है, जो जानता है,
मज़ा कोहरेके पर्दे मे है उसके पार नही!>>कसल सह्ही आहे हे...

मस्त. Happy

क्या बात है!

आजकाल हे सॅच्युरेशन पण फार लवकर होतं.

टेक अवे. - एवढं सगळं करून आयुष्याचं जे जे काय व्हायचं ते होतंच आहे. Happy

खुप छान लिहिलय......मलातर माझ्या मनतलेच विचार आहेत असे वाटले...खरच आहे आजकल हिच परिस्थिति आहे सगळीकडे..

वाह सन्मी , खूप दिवसांनी लिहीलंस !!

>>किनायाला लागल्यावर समजणार की ऒल अलॊंग पाणी चार फूट होतं आणि शिवाय किनारा भलताच आहे.
लाईफ ईज व्हॉट हॅपन्स व्हाईल यू आर मेकिंग अल्टरनेट प्लॅन्स असं काहीसं म्हटलय ते खरंच आहे !

सुरेख! Happy मनात चाललेल्या गोंधळाची आपण उकल करू शकलो, तर किती मस्त वाटतं नाही? पण बहुतेक वेळा ते जमतच नाही.

आणि किती दिवसांनी लिहिलंस.

सन्मे....
<<आपण धापा टाकत बराच वेळ पोहून किनायाला लागल्यावर समजणार की ऒल अलॊंग पाणी चार फूट होतं आणि शिवाय किनारा भलताच आहे.
मी अजून तिथंच त्या वळणावर बसून आहे. नुसतं बसण्यातला आनंद घेत. पुढं जाणारा रस्ता पहात. पोचायला कदाचित वेळ लागेल या निव्वांत बसण्यामुळं पण रस्ताही आपल्या जागी आहे आणि मुक्कामही.

अपने हाथोसे जिंदगीकी तसबीर को धुंधला बनाते हुए
उसने देखा है मुझे ..
पर वो चुप है, जो जानता है,
मज़ा कोहरेके पर्दे मे है उसके पार नही!
>>

हे अख्खंच्याअख्खं जब्बर्री!
आणि किती दिवसांनी उगवतेयस म्हणे?... तुला काय मी स्वतःलाही तेच म्हणते... कधीतरी भेटते तेव्हा Sad
"व्यवस्थित" जगायच्या फंदात जगायचंच विसरतो का काय?
खूप खूप आवडलं हे तुझं रस्त्याच्या मध्यावरलं काय ते...

Pages