झुरळे, पाली आम्हां सोयरी..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! भयाण!

अगोदरच्या घरात पाल नव्हती अजिबात. नवीनच घर बांधलं होतं आणि घरमालक स्वतः रहायच्या आधी मी तिथे भाडेकरु म्हणून रहायला गेले. पाल - झुरळ विरहीत घर म्हणजे एक सुखस्वप्नच प्रत्यक्षात उतरल होतं! अर्थात, त्याऐवजी मुंग्या होत्या! पण त्या चालतात, आणि त्या काळ्या होत्या. लहानपणी म्हणत असू, काळ्या देवाच्या असतात, लाल चावकुर्‍या...

पहिलं घर छानच होतं, भरपूर प्रकाश येणारं घर. बंगळुरुमधे प्रकाशमान घर मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे म्हटलं! पण मग सद्ध्याचं घर बदललं, कारण, घरमालक आता त्याच्या घरी रहायला येणार होता. हे नवं घर तस जुनं आहे, बैठं. हेही छान आहे, लहान आहे, त्यामुळे आवराआवरी आणि साफसफाई पटकन होते! जमेची बाजू. घेताना घरमालकाने नवीन रंग वगैरे काढून दिलं होतं, त्यामुळे पाली, झुरळं नसतील असं मी समजून चालले होते. पण कसलं काय! नवीन घरात सामान आणून टाकलं, व्यवस्थित लावलं, तोपर्यंत ही मंडळी दबा धरुन बसली होती की काय कोणास ठाऊक! मग एकेक झुरळं बाहेर पडायला लागली, ही एवढाली! कधी नव्हे ती मी १०-१२ झुरळं तरी मारली असतील! आणि झुरळंही मला तेवढीच अप्रिय आहेत! फक्त त्यांना माझी भीती वाटायचय ऐवजी मला त्यांची भीती वाटते! तरीपण, हिय्या करुन मारलीच! सरवायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणतात हे हेच असावं!

असो. तर झुरळं मेली, राहिलेल्यांवर हीट आणून मारलं, मग ती मेली. राहता राहिल्या पाली. स्वयंपाकघरात एक, तिथल्या ओट्यावर फुदकणारी. स्वच्छ असतो ओटा, कोणी काही शंका घेण्याआधीच सांगते! दिवाणखान्यात बहुधा दोन असाव्यात, आणि झोपायच्या खोलीत दोन. एकूण ५ आहेत, मला ठाऊक असलेल्या. तसं, आम्ही एकमेकींना टाळायचोच. त्याही अन् मीही. त्यामुळे ठीकठाक एकमेकींचा अंदाज घेऊन वावर चालायचा. काहीही केलें तरी उपयोग नसतो, पाली कुठेही जात नाहीत बहुधा.

मध्यंतरी पुण्याला घरी गेले. परत आल्यावर काही तरी वेगळे वाटले खास. माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही. नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली! अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की अजून काय झालं वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली! आत्ता झोपायच्या खोलीतली एक ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धावली! आली, आली! दुसरी कुठेय काय माहित! स्वयंपाकघरातली गुल्लच आहे! असो बापडी, आणि आज एक छोटुलंही दिसलं त्यांच! माझी शंका बरोबर होती म्हणायची! एकूण सगळ्या पालींमध्ये एक पालोबाही आहे वाटत! परमेश्वरा रे! वाचव!

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे, नायतर पालीला दिली भिंत आणि पाल घरभर पसरी, असं व्हायचं! भूतदया गेली खड्ड्यात!

काय म्हणता?

प्रकार: 

मी लहान असताना...२ रीत होती....तेव्हा लक्ष्मणरेषा म्हणुन एक कॉकरोच किलर खडु घरी होता.....त्याला मम्मी पपा घरी नसताना हात बित लावायचा नाही अशी सक्त ताकीद होती....
एकदा माझ्या पुस्तकांच्या ड्रॉवर मधुन ३-४ झुरळं बाहेर पडली...त्यांना मारायला तो लक्ष्मणरेषा खडु (हिरव्या रंगाचा) कुठुन आणु...हात लावला मम्मी ला कळ्ळं असतं तर खटिया खडी झाली असती...म्हणुन मी ड्रॉवर मधे हिरव्या खडु ने ( शाळेतल्या फळ्यावरचा ) लाईन्स मारुन ठेवल्या...
संध्याकाळी मम्मी ने ते पाहिलचं....मग सरबत्ती चालु झाली .. " असा कसा खडु घेतलास?? हात निट धुतलास का त्या नंतर?? या पुढे असा आगाउ पणा केलास तर बाबांना सांगेन .." वगैरे वगैरे....
मी एक्सप्लेनेश दिलं " अग मी झुरळांना घाबरवायला फक्त हिरवा चॉक वापरला....लक्ष्मणरेषा खडु नाही "
मम्मी ने जो डोक्याला हात मारुन घेतला आणि जी हसत सुटली.......त्या नंतर जो घरी येइल त्याला किमान आठवडाभर हा रीपोर्ट दिला जात होता,... Sad

Pages