ऑस्ट्रियाची सफर.. भाग एक (व्हिएन्ना आणि बुडापेस्ट)

Submitted by सॅम on 4 October, 2009 - 18:27

आता जाउन देखिल बरेच महिने झाले... मागच्या वर्षी मे मधे आठवडाभर सुट्टी काढुन ऑस्ट्रियाला गेलो होतो. व्हिएन्नाला माझा मावसभाउ असतो. त्यामुळे संधी मिळाली की तिकडे जायचेच होते. आपलं कोणी असेल तर सगळं कसं निवांत होतं... दोन महिने आधी भावाला फोन करुन तो आहे का ते विचारुन घेतलं आणि विमानाची तिकीटे काढली. कधी नव्हे ते जाताना ऑस्ट्रियन आणि येताना एअर फ्रान्स ची तिकिटं स्वस्तात (हे महत्वाच!) मिळाली. जरा बरं वाटलं की यावेळी सामान चेक-इन करुन नेता येइल! [१] पण त्यानंतर आठवडाभराची आखणी भावावर सोडुन दिली... ते निघण्याच्या आठवडाभर आधिपर्यंत आम्ही काही म्हणजे काहीही विचार केला नाही!

व्हिएन्ना तर बघायचं होतंच, त्याबरोबर आधी प्राग (चेक रिपब्किक) आणि बुडापेस्ट (हंगेरी) बघाव असं चाललं होतं...(म्हणजे अजुन दोन देशही झाले असते!) पण बुडापेस्टला भाऊच नेणार होता (एका दिवसात!) आणि प्राग तसं लांब पडतं. मग वाटलं ऑस्ट्रियाच नीट पाहावं. त्यामुळे साल्झबर्ग आणि इन्सब्रुक (स्वारोस्की क्रिस्टल्स् फेम) बघायचं ठरलं.

जाताना ऑस्ट्रियनच्या विमानात गरमागरम जेवण काय सही होतं, शाकाहारी पर्याय देखिल होता... सगळ्या विमानात नसतात... स्वस्त विमानात तर काहीच (फुकट) मिळत नाही. पण परत येताना बघितलं, एअर फ्रान्स मधेपण थंड आणि (फक्त) मांसाहारी जेवण! 'शाकाहारी आहे का?' हे विचारल्यावर ती फ्रेंच (हवाई) सुंदरी 'नाही' म्हणाली आणि (कुणिही नं सांगता) चक्क माझ्यासमोर ठेवलेलं ते थंड चिकन उचलुन घेतलं! शेवटी मीच म्हणालो, ठिक आहे बाइ चिकन तर चिकन... काहीतरी खायला मिळुदे.

तर, १ मे रात्री आम्ही व्हिएन्नाला पोचलो. दादा-वहिनी विमानतळावर न्यायला आले होते! इथुन आमचा आराम सुरू झाला. त्यांच्या गाडीतुन थेट त्यांच्या घरी, मग मस्तपैकी घरचं जेवण... नाहीतर एरवी विमानवळावरुन मेट्रो/बस ची सोय बघा... मग हॉटेलात चेक-इन करा... ते कसं असेल काय माहीत... मग आपल्याला काहीतरी खाता येइल असे एखादे हॉटेल शोधा... केवढ्या कटकटी! आणि ही तर सुरवात असते... मग सकाळी पर्यटन कार्यालय शोधा... हॉप ऑन बस... बर्‍याच ठिकाणांपैकी आज काय करायचं? सकाळी कुठ जायचं? आणि बरेच प्रश्ण... पण इथे दादा-वहिनीवर सगळं सोडुन आम्ही निवांत होतो.

दुसर्‍या दिवशी, ठरवल्याप्रमाणे, दादा (शनिवारी) आम्हाला व्हिएन्ना जवळची दुसर्‍या महायुद्धावेळची एक छळछावणी बघायला घेउन जाणार होता... दुसरा काहीच पर्याय नव्हता, कारण रविवारी आम्ही बुडापेस्टला जाणार होतो आणि बाकी आठवडाभर त्याला ऑफिस होते.

ही छळछावणी माउथ्हाउजन (Mauthausen)या गावी आहे. व्हिएन्नाहुन ऑटोबाह्न घेउन अडीच-तीन तासात तिथे पोहोचता येत. ऑटोबाह्न म्हणजे जर्मनी-ऑस्ट्रिया मधले हमरस्ते जिथे प्रती तास १३० कि.मी. एवध्या वेगात गाड्या जातात.. पहिल्यांदा त्या वेगाची थोडी भितीच वाटते!

जर्मनी-पोलंड इथल्या मानानी ही छळछावणी तशी मोठ्ठी नाही. पण क्रौर्य सगळीकडे तेच... जवळपास लाखभर लोकांनी इथे प्राण गमावले. आत्तापर्यंत फक्त ऐकले होते... प्रत्यक्ष बघणं हा थरारक अनुभव होता.

प्रवेशद्वार:
austria-1-concentration camp - entranse.jpg

ऑडिओ गाइड सगळं ऐकणपण शक्य झालं नाही. पोटात कालवाकालव होउ लागते... ते प्रवेशद्वार, बंदिवानांची बराक्स, गॅस चेंबर, मानेत गोळी घालायची जागा, रोगी बंघकांना एकाकी ठेवण्याची जागा सगळेच पाशवी...

गॅसचेंबर:
austria-1-concentration camp - gas chamber.jpg

असे म्हणतात की त्या छावणीबाहेरच्या गावातल्या लोकांना माहीतीही नव्हतं म्हणे इथे आतमधे काय चालते ते... खरं खोटं देव (किंवा हिटलर आणि कंपनी) जाणो. आता इथे बर्‍याच देशांनी स्मारके बांधाली आहेत.

इथुन व्हिएन्नाला परतताना ऑटोबाह्ननी घेतला नाही, तर डेन्युबच्या किनार्‍यानी तिच्याबरोबर वळसे घेत घेत निघालो. बाहेरच्या निसर्गसौंदर्यानी छळछावणीच्या आठवणी कधीच पुसुन टाकल्या. आम्ही जात होतो तो वखाउ प्रदेश वाइन साठी प्रसिद्ध आहे. [२] तिथल्याच एका खेड्यात दादानी गाडी थांबवली. इतके सुरेख खेडे मी याआधी पाहिले नव्हते.

austria-1-wakhau - village.jpg

छोटे छोटे दगडी रस्ते, बाजुला जुनी घरं. या खेड्यातुन एक रस्ता डोंगरावर जातो. वरती ११ व्या शतकातील किल्याचे अवशेष आहेत. वरुन आजुबाजुचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. विखुरलेले डोंगर, वळसे घालत जाणारी डेन्युब, मधेमधे रेखिव घरांचे समुह, द्राक्षाच्या बागा आणि दुरून ऐकु येणारे संगीत.. शनिवार संध्याकाळनिमित्त कुठेतरी वाजवले जाणारे... असे वाटत होते की तिथेच बसावे.

austria-1-wakhau - view.jpg

खाली आल्यावर त्या खेड्यात एका उंच लाकडावर काही सजावट दिसली. भावानी सांगितलं की इथली प्रथा आहे. त्याला मे-पोल म्हणतात. त्यानंतर ऑस्ट्रियात इतरत्र फिरताना बर्‍याच वेळा हे दिसले.

austria-1-may-pole.jpg

तसेच डेन्युबच्या कडेकडेने एक छोटा सायकलचा रस्ता जात होता. हा रस्ता म्हणे जर्मनी-ऑस्टिया-स्लोव्हाकिआ-हंगेरी-पुढे बाल्कन देशातुन शेवटी (डेन्युब बरोबर) काळ्या समद्रात जातो. साधारण २००० कि.मी. लांबीचा रस्ता! हौशी लोकं सायकलवर सगळं सामान घेउन प्रवास करताना आम्ही बघीतली. नदीकिनारी या लोकांसाठी खास हॉटेल (सायकल साठी विशेष सोईंसकट!) आहेत. काय काय करतील ही लोकं, काही नेम नाही. Happy

डेन्युबमधुन पर्यटकांसाठीची मोठ्ठी जहाजं देखिल चालतात.

अशाप्रकारे ऑस्ट्रियातला पहिला दिवस मजेत गेला... आता दुसर्‍या दिवशी, रविवारी, दुसर्‍या देशात! हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधे!

व्हियेन्नापासुन गाडीने तीन तासावर बुडापेस्ट. दादा आधी बर्‍याच वेळा गेला होता त्यामुळे काही चिंता नव्हती. सकाळी (शक्य तितक्या) लवकर निघालो, पुन्हा ऑटोबान्ह् पकडला. दोन तासांनी हंगेरीची सीमा लागली. हंगेरी युरोपियन संघटनेत उशिरा (२००४ साली) आलेला देश. त्यांचे चेलनही वेगळे आहे. हे माझ्यासाठि नविनच होते. मला वाटे युरोपीयन संघटनेतील सगळ्या देशांचा एकच व्हिसा (श्यांगेन) आणि एकच चलन (युरो) आहे, पण तसे नाही. युरोपात युरोपीय व्यापार समुह, श्यांगेन व्हिसा आणि युरो वापरणारे असे देशांचे (आणि अजुन बरेच) वेगवेगळे समुह आहेत. त्यामुळे काही विशेष उदाहरण तयार होतात, जसे खालील सगळे देश युरोपिय संघटनेत आहेत, पण,
- इंग्लंड मध्ये युरो चलन चालत नाही आणि त्यांचा व्हिसापण वेगळा आहे.
- आयर्लंडचा व्हिसा वेगळा आहे पण तिथे युरो वापरतात.
- तर, पोलंड, स्विडन आणि हंगेरीत व्हिसा युरोपाचा पण युरो चालत नाही.

अधिक माहितीसाठी विकी बघा...

युरो चलन वापरायचे असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काही किमान अटी पुर्ण कराव्या लागतात! अर्थातच हंगेरी त्याला पात्र नाही. आम्ही गेलो तेंव्हा एका युरोला २८० हंगेरिअन चलन मिळाले. त्यामुळे तिथल्या किंमती हजारोंमधे होत्या. खरेदी करताना सहज लाखो (हंगरियन) रुपये उडवले! इथल्या किमती (ऑस्ट्रियाच्या तुलनेत) कमी असल्याने सीमाभागातील ऑस्ट्रिअन हंगेरीत खरेदीला जातो म्हणे! बुडापेस्टला पोचल्यावर बाकी युरोपापेक्षा हा देश गरीब आहे हे लक्षात येते. सार्वजनीक स्वत्छतागृह देखिल फुकट नाही. (हा काही देश गरीब असण्याचा निकश नाही... हे आपलं माझं निरीक्षण!)

व्हिएन्नामधुन पुढे डेन्युब बुडापेस्टमधून जाते. नदीच्या एका तिराला 'बुडा' आणि दुसरीकडे 'पेस्ट' वसलेले आहे (खरचं!). आख्ख शहर पाहायचं असेल तर सितादेला वरून मस्त दिसतं. सितादेला म्हणजे किल्ला. इथेच हंगेरिअन स्वातंत्रदेवतेचा पुतळापण आहे.

budapest-from citadela.jpg

इथुन आम्ही बुडा किल्यावर गेलो. हा किल्लापण छोट्या डोंगरावर आहे. वरती किल्यात अजुनही वस्ती आहे. इथली मुख्य आकर्षणं आहेत फिशरमन्स बाश्चन, तिथले चर्च, मुख्य महाल आणि खाली दिसणारे शहर.

बुडा किल्यावरचा महाल:
budapest-ford.jpg

इथे थोडी पेटपुजा केली आणि खाली उतरुन गाडिने पलिकडल्या तिरावर, पेस्ट गावात गेलो. तिथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे हिरोज् स्केअर (राष्ट्रीय स्मारक), जगातील पहिली मेट्रो (हंगेरीयन लोकांच्या मते) आणि मिक्लोस लोगेटीचा 'अज्ञात' पुतळा. ह्या पुतळ्याने हातात एक लेखणी धरलीये. त्या लेखणीचा रंग अजुनही मुळचा पिवळा आहे तर बाकी पुतळा 'गंजुन' काळपट हिरवा झाला आहे. त्या लेखणीला हात लावणार्‍याला म्हणे थोडे शहाणपण मिळते म्हणे. म्हणून प्रत्येकाने हात लावल्याने तिथला रंग मुळचा पिवळा राहिला आहे.

budapest-anonymous.jpg

आम्हीपण थोडे शहाणपण घेउन तिथून निघालो, जगातील पहिली मेट्रो (इ.स. १८९६) बघायला. बुडापेस्टच्या मेट्रोचे बांधकाम लंडन मेट्रोच्या आधी सुरु झाले पण लंडनमधे मेट्रो पहिल्यांचा कार्यान्वीत झाली, त्यामुळे दोधेही म्हणतात की आमचीच जगातली पहिली मेट्रो! (कोणाची का असेना आपली नाहीये ना, मग आपल्याला काय फरक पडतो Wink ) तो जुना दोन-अडीच बस एवढा फलाट त्यांनी तसाच ठेवलाय. तेवढ्यात एक मेट्रो खडखडत आली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो.

budapest-metro.jpg

आता तसे सगळे बघून झालं होतं. थोडी पेटपूजा करून रात्र व्हायची वाट पाहणार होतो. त्याआधी लाखो (हंगेरीअन) रुपये उधळून स्मरणिका विकत घेतल्या. हंगेरीचे चलन निराळे असले तरी छोट्या-मोठ्या खारादेसाठी दुकानदार युरो घेतात. पण उरलेले पैसे युरोमध्ये देतीलच याची खात्री नाही.

परत निघण्यापूर्वी रात्रीचे बुडापेस्ट डोळे भरून बघितले. युरोपात कोठेही जा, सगळी ठिकाणं दिवसा आणि रात्री परत बघायलाच पाहिजेत.

रात्री, एलिझाबेथ पूल, पार्श्वभूमीला सितादेला,
budapest-night.jpg

तर असे पहिले दोन दिवस गेले. परत निघायला शनिवारच्या विमानाची तिकिटे काढली होती. म्हणजे आमच्या हातात पाच दिवस होते. ठरल्या प्रमाणे दोन दिवस व्हिएन्ना, दोन दिवस साल्झबर्ग आणि एक दिवस इन्सब्रुक करणार होतो. हॉटेल आधीच बुक केली होती. आता सोमवारी पहिल्यांदा रेल्वे स्टेशनावर जाऊन व्हिएन्ना-साल्झबर्ग-इन्सब्रुक-व्हिएन्ना अशी तिकिटे काढली.

युरोपातील प्रत्येक शहर दुसऱ्यापेक्षा वेगळे भासते. (युरोपातलंच का? तसं तर कुठलंही शहर दुसर्‍या कुठल्याही शहरापेक्षा वेगळ असतंच!) पॅरिस कसं इतकं निटनेटकं आहे की फिरताना सगळ्या गल्ल्या एकसारख्याच वाटतात. एक लेनचा रस्ता, बाजुला (असल्यास) पार्किंग आणि दोन्हिकडे दगडाच्या चार-पाच मजली इमारती, मधे छोटासा पादचारी मार्ग. सगळं आहे रेखिव पण त्यात एक तोचतोचपणा येतो. बार्सिलोना अगदी वेगळं, कुठल्याही दोन शेजारशेजारच्या इमारती एकसारख्या नसल्या पाहिजेत असा नियम आहे बहुतेक! प्रत्येक इमारतीला बाल्कनी असतेच आणि त्यांची रचनाही निरनिराळी असते. या कशातही सुत्रबद्धता नसली तरी बार्सिलोना आवडलं. व्हिएन्नापण या दोन्हीपेक्षा वेगळं. गावाच्या मध्यभागी स्टिफन्सडोम नावाचं चर्च आहे त्याच्या अजुबाजुला रस्ते अगदीच लहान आहेत. पण तेवढे सोडले तर बाकी ठिकाणी रस्ते प्रशस्त आहेत. अगदी दोन्हीकडे पार्किंग मग प्रशस्त पादचारीमार्ग आणि त्यापलिकडे जुन्या गिलावा केलेल्या इमारती. व्हिएन्नामधे मेट्रो आहेच शिवाय ट्रामही बर्‍याच आहेत. त्या ट्रामच्या तारा डोक्यावरुन जातात. त्या तारांसाठी खांब न बांधता अजुबाजुच्या इमारतींवरुन तारांनी ओढुन धरल्या आहेत तिच गोष्ट रत्यावरच्या दिव्यांची, त्यामुळे रस्त्यावरुन जाताना डोक्यावर तारांचं जाळ दिसतं. मला नेहमी वाटयचं की या तारांवर एक ताडपत्री पसरुन दिली की पुर्ण रस्ताभर मस्त शेड होईल.

austria-1-wires.jpg

कुणीतरी केलेल्या पाहाणीत व्हिएन्नात म्हणे वृद्ध/अपंग व्यक्तिंसाठी सर्वाधीक सोई आहेत. हे मात्र लगेच लक्षात येतं. प्रत्येक भूमिगत मेट्रो स्थानकात लिफ्ट आहे. नवीन ट्राम पायरी नसलेल्या आहेत (वर चढायची गरज नाही), शिवाय पुढची अपंगांसाठी सोईची ट्राम किती मिनीटात आहे हे देखिल थांब्यांवर दाखवलं जातं. तुलना पॅरिसशी करायची तर, मेट्रोमधे लिफ्ट सोडा सगळीकडे सरकते जिने देखिल नाहीत. धडधाकट माणुस देखिल बरोबर सामान घेउन जाताना असला वैतागतो Angry . अन मेट्रो बदलायची असेल तर इतकं चालावं लागतं... त्यामुळे पॅरिसमधे वृद्ध/अपंगांना बसशिवाय पर्याय नाही.

यावेळी पहिल्यांदाच वाया-मिशेलिनचे पर्यटक मार्गदर्शक (travel guide) वापरले. मस्त उपयोग झाला त्याचा. व्हियेन्नामधे भाऊच असल्याने इथेतरी आम्ही टूर घेणार नव्हतोच. कुठुन कसे जायचे आणि काय काय बघायचे ते दादानी सांगितले, बाकी सगळी माहिती त्या पुस्तकात व्यवस्थित मिळाली. शिवाय एक पायी फिरण्याचा रस्ताही त्यात असतो, तो केल्याने जुन्या व्हिएन्नातील जवळपास सगळी ठिकाणे कमी वेळात बघता आली.

व्हिएन्नामधे आम्ही खालील ठिकाणं पाहीली, यातली काही पर्यटकांमधे प्रसिद्ध आहेत तर काही माझ्या भावामुळे आम्हाला बघायला मिळाली.

- श्योनबृन महाल: पॅरिसजवळील व्हर्सायच्या (व्हर्सायचा तह फेम) महालाची आठवण करुन देणरा. समोर आडवा पसरलेला महाल, मागे लांबवर बाग, बागेत बरेच पुतळे, फस्त बागेच्या त्या टोकाला तळ्याऐवजी एक टेकडी.

austria-1-schonbrunn.jpg

त्या टेकडीवरुन आख्ख व्हियेन्ना बघता येतं,

austria-1-vienna from schonbrunn.jpg

- स्टिफन्सडोम (सेंट स्टिफन्स चर्च): व्हियेन्नाचे सगळ्यात महत्वाचे चर्च. अजुबाजूला चिक्कार पर्यटक (आमच्यासारखे). चर्चच्या एका भागाचे अजुनही नूतनीकरण चालू आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या अशा जखमा अजुनही बर्‍याच ठिकाणी बघायला मिळतात.

austria-1-stephansdom.jpg

चर्चच्या आत पहिल्यांदाच मला ऑर्गन पाइप ठळकपणे दिसले. हे पियानो आणि बासरी यांचे हायब्रीड वाद्य यानंतर ऑस्टियात इतर चर्चमधेही दिसुन आले.

austria-1-organ.jpg

- ऑस्ट्रियाची संसद: ही बाहेरुन पॅन्थिऑन सारखी दिसणारी भव्य इमारत आतुनही पाहाण्याचा योग आला. दुसर्‍या महायुद्धात याचेही बरेच नुकसान झाले होते. ऑस्ट्रियाची लोकशाही बरिचशी आपल्यासारखी (संसदीय) असली तरी बराच फरक आहे.

austria-1-parliament.jpg

आत आम्ही तीन वेगवेगळी मोठ्ठी दालने बघितली. एक बरेच जुने होते. त्याचे काचेचे छत अतिशय सुरेख होते. सुदैवाने महायुद्धात त्या छताला काही झाले नाही.

austria-1-parliament hall.jpg

- बेलवेडेर महाल: ह्या महालाच्या पुढे-मागे प्रशस्त बाग आहे. महालात एक संग्रहालय आहे पण आम्ही ते पाहिले नाही. (अजुन पॅरिसमधेली बरीचं संग्रहालयं राहिली आहेत!)

- वायनर रेसनराड: डेन्युबच्या किनार्‍याला, व्हियेन्नाच्या थोडे बाहेर एक मनोरंजन उद्यान (amusement park) आहे. तिथला १०० वर्ष जुना पाळणा प्रसिद्ध आहे. जवळपास तो 'लंडन आय' चा पूर्वज वाटतो.

- गॅसोमिटर: ह्या इमारती बाहेरुन बघायला काहितरी विचित्र वाटतात. फार पुर्वी शहरात इंधन म्हणुन नैसर्गिक वायू वापरला जात असे. त्याच्या ह्या टाक्या होत्या. तंत्रज्ञानातील बदल आणि इतर कारणांसाठी या टाक्यांचा वापर थांबवण्यात आला आणि आता त्यांचे बाहेरील स्वरूप तसेच ठेउन आतमधे मोठ्ठे शॉपिंग सेंटर उभारले आहे.

austria-1-gasometer.jpg

- स्टाड बाग: येथील जॉह्न स्ट्रॉसचा पुतळा हा फोटो काढायचे पेटंट ठिकाण आहे.

austria-1-strauss.jpg

हा स्ट्रॉस काळा की गोरा मला अजुनही माहिती नाही. हातात व्हायोलिन आहे म्हणजे संगितकार असावा. ऑस्टिया देश हा संगितासाठीही प्रसिद्ध आहे. बिथोवन, मोझार्ट झालचतर हा स्ट्रोस यांची ही कर्मभूमी. मला त्यातलं ओ की ठो कळत नाही... त्यामुळे मी काय जास्त त्यांच्या वाट्याला गेलो नाही.

- वॉहरिंग सिमेट्री: इथे बिथोवनचे थडगे आहे. तसेच मोझार्टचे स्मारक ही आहे. पहिल्यांदाच असे स्मशानातुन (दुसरं काय म्हणु?) फिरत होतो. वेगवेगळ्या प्रकारची अनेक कलाकुसर केलेली थडगी बघितली.

अशा प्रकारे आमची आर्धा प्रवास संपला... आणि हा भागही... आता पुढच्या भागात साल्झ्बर्ग आणि इंसब्रुक बद्दल. अजुन फोटो बघायची इच्छा (किंवा धमक) असेल तर पिकासावर बघता येतील, पण साल्झ्बर्ग आणि इंसब्रुक चे फोटो कृपया बघू नका!

आंतर्जालावरील माहिती-
व्हिएन्ना पर्यटन
ऑस्ट्रियन रेल्वे: OBB
व्हिएन्नामधील टूरस्

टिप [१] बाकिच्या स्वस्त विमानसेवा चेक-इन केलेल्या प्रत्येक डागामागे १० युरो घेतात! मग आम्ही सगळं सामान केबिन मधुनच नेतो... थोडक्यात काय मोजकचं सामान नेतो... आणि परत आणतो!

टिप [२] पॅरिसमधे परत आल्यावर माझ्या फ्रेंच सहकार्‍यांना वखाउ ही जगप्रसिद्ध वाइन आणली म्हणुन सांगितलं तर त्यांना हे नाव माहितच नाही! सगळे पक्के फ्रेंच, फ्रान्सच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक गल्लीतली वाइन यांना माहिती पण शेजारच्या देशातली 'जगप्रसिद्ध' वाइन नाही माहीत!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच ! युरोप मला नेहमीच भुरळ घालतं. जायचा योग कधी येईल माहित नाही. तोपर्यंत असे लेख आणि फोटो पाहूनच हौस भागवून घ्यायची ... नेहेमीप्रमाणे ! Happy
...आणि हो, छळछावणीचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला झालं....हे ही नेहेमीप्रमाणेच !

मस्त प्रवासवर्णन. लंडन-पॅरिसपेक्षा या जरा कमी मळलेल्या पायवाटा वाटल्या.
बुडा आणि पेस्ट ही माहिती नवीन होती.
गॅस चेंबरचा फोटो पाहून एक क्षणभर डोळे मिटून त्याजागी डांबले गेलेले निरपराध लोक कल्पून बघितले. अतिशयोक्ती नाही पण अंगावर शहारा आला. डोक्यात एक सेकंद मुंग्या आल्या. Sad (पुढचा खेड्याचा फोटो हा त्यावर उत्तम उतारा ठरला.) केवळ फोटो पाहून ही अवस्था, तर प्रत्यक्ष पाहताना काय वाटत असेल... आणि ५-६ दशकांपूर्वी तिथे लोकांनी जे भोगलं ते... त्याला तर सीमाच नाही Sad

सॅम. विएनातील केक चॉकोलेट्स वगैरे बद्द्ल लिही ना.

अज्ञाताचा पुतळा डिमेन्टर सारखा आहे.

ब्लु डान्युब वाल्टझ चा रचनाकार तो स्ट्रॉस तोच ना? संगीता शिवाय विएना म्हणजे लसणाशिवाय झिन्गे.(गौरीला स्मरून )

सुरेख फोटो...
आम्ही व्हिएन्नाला रहात होतो त्याची आठवण झाली. परदेशान ठिकठिकाणी राहिले पण सगळ्यात आवडती जागा व्हिएन्ना Happy तिथे आम्ही अगदी त्या स्टिफन चर्चच्या जवळ रहायचो. चालत १० मिनिटांमधे पोचता यायच तिथे. मी आणि माझी लेक जी तेव्हा २ वर्षांची होती अगदी नियमित त्या रस्त्याने फिरायला जात असु.
सदासर्वदा गजबजलेला भाग आहे तो.

मस्त रे... पुढचा भाग लिही..
ट्यूलिपच्या ब्लॉग मधून आणिआसाउंड ऑफ म्युझिक मधून साल्झबर्ग आधी पाहिलं आहे थोडं....
आता तुझ्या लेखांमधून्ही पहायला मिळेल.. Happy

धन्यवाद दोस्तांनो!

ललिता-प्रीती,
>> लंडन-पॅरिसपेक्षा या जरा कमी मळलेल्या पायवाटा
नक्कीच, खासकरुन भारतियांसाठी... तशी पर्यटकांची गर्दी इथे कमी नाही.
भारतियांसाठी युरोप म्हणजे लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, झालचं तर रोम, व्हेनिस आणि बर्लिन. आख्या ऑस्ट्रियात आम्हाला भारतिय पर्यटक मोठ्या संख्येने दिसले ते इंस्ब्रुकच्या स्वरोस्की क्रिस्टलच्या शो-रुममधे! इंस्ब्रुक शहरातही कोणी नव्हतं... फक्त दुकानात.

पुढचा भाग लवकरात लवकर लिहायचा प्रयत्न करतो.

हाय समीर, मस्त वर्णन. माझे अहो अत्ता विएन्ना मधेच आहेत. कॉन्फरन्स साठी. त्याना सांगते वेळ मिळाला तर तिथे काय काय बघायचे ते.... Happy

मस्त लेख आहे.
पण तुम्ही "प्राग" पण नक्की बघा.
ग्यालिनी (पॅरीस)बस स्ट्यांड वरुन १४ तास लागतात युरोलाइन च्या बसने.
मस्त शहर आहे.

सॅम.. मस्तच सफर घडवलीस.. धन्यवाद !
बाकी हे "पाइप ऑर्गन" म्हणजे तेच का.. जे ए.आर. रेहमान ने "रेहना तु" या दिल्ली 6 मधील गाण्याच्या शेवटी एक वाद्य वाजवले आहे
अज्ञात पुतळाची पोज मस्तच..
नि किल्ला सुंदर ! (तिकडच्या किल्ल्यांची सुस्थिती बघितली की इकडच्या किल्ल्यांची झालेली दुरावस्था बघुन राग येतो.. !! )