चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४ : आधी संवाद, मग परिसंवाद - lalita-preeti

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:40

चित्र क्रमांक ३

hilary-clinton-aamir1.jpgआधी संवाद, मग परिसंवाद

आमिर : हाय हिलरी! एकदम गॉर्ज्यस्‌ दिसतीयेस!

हिलरी : यस्स्‌! आय डीड इट!

आमिर : काय डिड इट? मी तुझं कौतुक करतोय आणि तू अजून स्वतःतच मश्गूल आहेस?

हिलरी : मला कध्धीपासून तुला भेटायचं होतं!

आमिर : का? मलाच का? मि. बच्चनना नाही? मि. एस.आर.के. ला नाही?

हिलरी : (नाक मुरडत) अरे ते दोघं तर सारखे अमेरिकेतच पडीक असतात. त्यांना काय भेटायचं?

आमिर : बाय द वे, हा ड्रेस कुठून घेतलास? रंग एकदम खल्लास आहे. ‘जो जिता वही सिकंदर’च्या ‘पहला नशा पहला खुमार’ गाण्यात पूजा बेदीनं एका शॉटमध्ये याच रंगाचा ड्रेस घातला होता. आमच्या किसींग सीनमध्ये पण तिला तोच ड्रेस घालायला सांग म्हणून मी मन्सूरच्या किती मागे लागलो होतो. पण त्यानं ऐकलं नाही माझं. तो असंच करायचा. ऐकायचाच नाही कुणाचं काही. म्हणूनच नंतर मी त्याच्याबरोबर सिनेमे करणं सोडून दिलं. तू पाहिलायस का जो जिता वही सिकंदर?

हिलरी : तो नाही पाहिलेला, पण मी ‘लगान’ पाहिला होता तुझा ऑस्करच्या वेळेला. ब्रिटीश लोकांची चांगली जिरवलेली दाखवलीयेस तू त्या सिनेमात. मला फार आनंद झाला होता तेव्हा ते बघून. कॅप्टन रसेलच्या जागी मला सारखा टोनी ब्लेअरच दिसायचा. (पुन्हा एकदा नाक मुरडत) मला रागच येतो त्या टोन्याचा! सारखा आपला माझ्या बिलूच्या पुढेपुढे करायचा...

आमिर : (रुसका चेहरा करून) आता बघ, पुन्हा तेच! मी तुझ्या ड्रेसचं कौतुक करतोय तर तू टोन्या, बिलू करत बसलीयेस... अश्यानं मी निघून जाईन इथून, बघ हं!

हिलरी : ओके! चुकलं माझं! सॉरी! या ड्रेसबद्दल विचारत होतास, ना? अरे तो पूर्वी चेल्सीसाठी आणला होता. आता तिला लांडा होतोय. पण टाकून का द्यायचा इतका महागडा ड्रेस? बिल प्रेसिडेंट असताना केलंही असतं तसं. पण आता शक्य नाही ना ते. म्हणून तो आता मी वापरतीये. अमेरिकेत सगळ्यांनी पाहिलाय चेल्सीनं हा ड्रेस घातलेला. पण इथे भारतात कुणाला कळणारे? मॅचिंग नेकलेस मात्र कुलाब्याला घेतलाय फुटपाथवर. २ डॉलर्सला फक्त! मस्त मिळाला ना? बार्गेनिंग करणार होते रे... पण उशीर झाला असता. मला माझ्या सेक्रेटरीनं सांगितलं की तू सहसा कुठल्या सार्वजनिक समारंभांना जात नाहीस म्हणून. पण तू माझ्यासाठी यायला तयार झाला होतास. म्हटलं उशीर झाला तर उगीच तुझा मूड जायचा.

आमिर : सोऽऽऽ नाईस ऑफ यू!

हिलरी : आहेच मग मी नाईस. बिलूलाही आता ते पटलंय! मला सोडून आता तो कुठ्ठंकुठ्ठं जात नाही. मी शिक्षणाशी संबंधित परिसंवादासाठी मुंबईत येतेय म्हटल्यावर तो मागे लागला होता मला पण यायचंय म्हणून.

आमिर : मग का नाही आणलंस त्याला? नॉन प्रेसिडेंट बिल क्लिंटन बघायला मिळाला असता आम्हाला.

हिलरी : त्यात काय बघायचंय? आणि सेक्रेटरी ऑफ स्टेटनं असं कुटुंब-कबिल्यासह फिरणं बरं दिसेल का चारचौघात?

आमिर : चारचौघांचा विचार आपण कश्याला करायचा? आपल्याला जे पाहिजे ते करायचं. मी बघ... ‘गजनी’ची जाहिरात करण्यासाठी न्यूज चॅनल्सच्या कॅमेऱ्यांसमोर फुटपाथवर उभं राहून लोकांचे केस कापून दिले. कुणी काहीही म्हटलं नाही!

हिलरी : (चेहरा आश्चर्यचकित करून) ग्रेटच आहेस हं तू तरी! ए, पण लोकांच्या डोक्याला हात लावायला, त्यांच्या केसांना धक्का लावताना तुला घाण नाही वाटली?

आमिर : घाण? छे! छे! अगं, तुला म्हणून सांगतो, मी किरणला सांगून आधीच ते लोक निवडून ठेवले होते. सगळे तिच्या मैत्रिणींचे नवरे होते. सगळ्यांना पहाटे घरी बोलावून आधी स्वच्छ आंघोळ करायला लावली. केस भरपूर शांपूनं धुवायला लावले.

हिलरी : आणि ते लगेच तयार झाले ते करायला?

आमिर : मग काय! त्यांना सांगितलं - गजनीची फर्स्ट डे फर्स्ट शो ची दोनदोन तिकिटं देईन म्हणून. लग्गेच तयार झाले पहाटे उठायला.

हिलरी : तुझा करिष्मा आहेच तसा! म्हणूनच तर मला तुला भेटायचं होतं! आता आपले शेकहॅन्ड करतानाचे वगैरे फोटो मी ऑर्कूट, फेसबुकच्या माझ्या अकाऊंटवर टाकणार आहे. म्हणजे मग बघ माझ्या सगळ्या मैत्रिणी कश्या जळतील!

आमिर : (हसत) गुड! आता आपली ओळख झाली आहे. मला फ्रेंन्ड्स इन्व्हिटेशन पाठव हं दोन्हीचं...

हिलरी : हो! अगदी नक्की पाठवेन. खरं तर आत्ताही लगेच मी ते करू शकते. लॅपटॉप सेक्रेटरीजवळच आहे माझा.

आमिर : आत्ता नको. आत्ता आपण इथे वेगळ्याच कामासाठी आलोय... लक्षात आहे ना?

हिलरी : (ओशाळत) अरे, खरंच की! परिसंवाद होणारे नाही का आता इथे? तुला पाहिलं आणि ते सगळं विसरूनच गेले मी...

आमिर : (खट्याळपणे) जसं मोनिकाला पाहून तुझा बिलू तुला विसरला होता..

हिलरी : (आमिरच्या हातावर चापटी मारत) नॉटीऽऽऽ!

आमिर : (इकडे तिकडे बघत) हळूहळू रिपोर्टर्स जमायला लागलेत सगळे. हातावर लाडात चापटी-बिपटी नको मारूस. त्यापेक्षा तो हात माझ्या हातात दे... हा अस्सा! आणि चल आता तिकडे सेंटर स्टेजला. परिसंवादाची वेळ झाली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy