तू...!

Submitted by श्रावण मोडक on 2 September, 2009 - 02:29

तू... तू आणि मी. आपलं तसं खरं तर काहीही नातं नाही. कारण मुळात तू आहेस हेच मी मानत नाही. पण, सभोवतालचे असंख्य जण जेव्हा तुझा दाखला देत राहतात, तेव्हा तुझं, आभासी का होईना, पण एक अस्तित्त्व तयार होत जातंच. या तुझ्या, भले आभासी का होईना, अस्तित्त्वानं आता इतकं घेरून टाकलं आहे की हे एक नातंही आपसूक तयार झालं आहे. आभासीच. पण नाकारता न येण्याजोगं...
एरवी असं काही लिहिताना सुरूवात काय आणि कशी करावी असा प्रश्न नेहमी असतोच. आज तो नाही. त्याचं कारणही हेच; 'तुझं अस्तित्त्व मान्य नाही' अशी का होईना सुरवात करता येतेच. तुझं आणि कोणत्याही आरंभाचं एक नातं असतंच नाही तरी. तसंच ते इथंही असं व्यक्त होत असावं. असो.
एकूण थोडं अंतरावरूनच हे बोलणं होणार आहे आपलं. परीघ बदलत राहील. कधी माझ्या जवळ असेल, कधी दूर... पण अंतर असेलच...

***

मागं वळून पाहतो तसं अनेक गोष्टी अनपेक्षितपणे समोर येत जातात. तशीच ही एक गोष्ट. आपली पहिली भेट शाळेतील. 'पहिली'त असतानाची. गुरूजींनी करून दिलेली ओळख. गुरूजींनी करून दिली याचा अर्थ त्यांनी सगळ्यांना काही शिकवण्यास सुरवात केली तेव्हा घेतलेली नावं अशीच ती ओळख. तेव्हा, तू आहेस, याच्यावर माझा विश्वास होता. तुझा संबंध प्रत्येक नव्या गोष्टीशी होता. मग ती अक्षरं असोत, अंक असोत, कलाकुसर असो... जे-जे म्हणून त्या वयात असतं त्याचा संबंध तुझ्याशी जोडलेलाच असायचा. नव्हे, तुझ्याशिवाय त्या गोष्टी पूर्ण व्हायच्याच नाहीत. सुरवात तूच करायची, किंवा तुझ्यापासून करायची. शेवट असा त्या गोष्टींना नसायचाच. आठवतं त्यानुसार आपली म्हणून पहिली भेट झाली होती ती काळ्या तळ्यापाशी. गावाच्या दक्षिणेला पसरलेलं हे तळं. त्याच्या काठची आंब्याची झाडं, उंबरांची झाडं. पलीकडंच पसरलेली भातशेती. वडाचीही झाडं होती तिथं. त्याच्या पारंब्यांना धरून खेळ चालायचे. त्या तळ्याची माती काळी. पण त्यातून तिथं जमणारी पोरं काहीबाही बनवत असायचीच. असंच एके दिवशी एकांच्या घरी आम्ही गेलो. तिथं तुला पाहिलं आणि भारावून गेलो. ते रूप, चेहर्‍यावरचा तो गोरेपणा, तुझे डोळे, अगदी कोरल्यासारखे. डोक्यावर काही असावं, असं आठवत नाही. पण एकूण, पुढं वय वाढल्यानंतर समजलेल्या शब्दांत सांगायचं तर, मोहक रूपडं म्हणतात ते हेच हे तेव्हा कळलं. पटो ना पटो, निदान तेव्हा तरी, पण तुझ्या त्या लोकविलक्षणतेचंच एक आकर्षण होतं. त्याचा काही भव्यदिव्य गोष्टींशी संबंध जोडत बसणार नाही. कारण तसा तो जोडण्याचं कारण नाही. अगदी तेव्हा वयानं लहान होतो म्हणून असेल किंवा आता वय वाढलेला आहे म्हणूनही असेल. भव्यदिव्य गोष्टींपेक्षा तुझा संबंध आला तो साध्यासरळ जगण्यातल्या गोष्टींशी. म्हणूनच तर हे नातं. तेव्हा असं तुझ्या-माझ्या जगण्यातील प्रत्यक्ष मानलेल्या अस्तित्त्वातून तयार झालेलं. नंतर बदलत गेलेलं...

***

अनेकदा असा प्रश्न येतो, तुझा विषय आला रे आला की, आणि त्यातही तुझं अस्तित्त्व नाकारतो तेव्हा, की तुझ्यासाठी मी काही केलंय का? नसेल तर, तुझ्या अस्तित्त्वाशी संबंध असेलच कसा, असं म्हणून सारे सगेसोयरे चूप करतात. तुझं इतकं फॉर्मल असणं शक्य नाही असं म्हणून तो विषय संपवतो. म्हणजे तुझ्यासाठी काही केलं तरच तुझं अस्तित्त्व संदर्भपूर्ण असेल वगैरे फॉर्मलपणा. पण असंही नाहीच. प्रत्यक्षात तुझ्यासाठी काही केलं आहेही. त्याची यादी नकोच. पण ते केलं ते अशाच वयात अर्थात, नंतर काही करणं शक्यच नाही.
मुळात असं होतं की, मघा म्हटलं तसं तुझा संबंध प्रत्येक वयात जे-जे नवं त्याच्याशी जोडलेलाच. नवं काही करायचं तर ते तुझ्यासाठी. तुझ्यामुळंच. तुझ्यापासूनच (निदान, त्यावेळी तरी हे पक्कं होतं). त्यामुळं तशा अनेक गोष्टी त्या काळात तुझ्यासाठी झाल्या असणार.
पण एक होत गेलं... याच काळात परीघ वाढत गेला. तुझ्या अस्तित्त्वाविषयीचे प्रश्न, अनेकदा तू समोर 'दिसत' असूनही, निर्माण होत गेले. कारणं वेगवेगळी. एक तर तुझ्याशी संबंधित सगळ्या कल्पना पावित्र्याच्या. मांगल्याच्या. नवतेच्या. विश्वासाच्या. त्या कल्पनाच असतात हे नकळतपणे मनात (की मेंदूत) घुसण्याचं वय ते. तसं ते घुसत गेलं आणि मग प्रश्न येऊ लागले. या प्रश्नांची उत्तरं मिळणार तरी कुठं? तुझा खर्‍या अर्थानं शोध इथं सुरू व्हायचा होता... पण तेही कळण्याइतकं ते वय नसतंच. म्हणून पुन्हा ना इकडं ना तिकडं...

***

असाच एक वाद रंगला एकदा. तुझ्याचविषयी. जिथं काम करायचो, तिथंही तू! ते पाहून थोडा चमकलो. इथं तू? कामाच्या ठिकाणी तुझं काय काम? पण नाही. आरंभीच म्हटलं ना? तसंच आहे हे. तुझ्या, आभासी का होईना, अस्तित्त्वाचा हा घेर इतका व्यापक असतो हे पहिल्यांदा तेव्हा उमजलं. त्याआधी तुझ्या या अस्तित्वाविषयीची समज एकूणच तोकडी होती हेही सिद्ध झालं.
तू सर्वव्यापी. पण एव्हाना तुझ्याविषयीचे समज आणि गैरसमजांचे पदर बदलत गेलेले असतात. तू आहेस किंवा नाहीस हा विषय संपलेला असतो. तुझ्या नावे जे काही चालतं ते सारं समोर येत गेलेलं असतं. मग त्याचे अर्थ लागतात. ते अर्थ आधीच्या काही प्रश्नांना अधिक टोकदार करतात. काही प्रश्नांचा अर्थही संपलेला असतो. म्हणजे, तुझ्यासाठी, तुझ्यामुळंच, तुझ्यापासून हे सारं केलंच पाहिजे का हा पहिला प्रश्न असतो. तो अधिक टोकदार होतो. आधीच तू फॉर्मालिटी पाळत नसशील हे पक्कं असतं. या नव्या संदर्भात, तुझ्याविषयीच्या मांगल्य, पावित्र्य, विश्वासाच्या कल्पना या केवळ कल्पनाच असतात हे कळतं तसं, हे सारं करण्याची गरज नाहीच असं एक उत्तर येतं. पण मग आणखी एक भाग पुढं येतो. हे सारं करणार्‍यांनी काय करायचं? त्यांच्या जगण्यात तुझ्या नसण्यानं निर्माण झालेली ही पोकळी तत्काळ कशी भरून काढायची? मग, त्यावरचं एक उत्तर येतं : ही पोकळी राहू नये म्हणूनच म्हणे तुझं अस्तित्त्व असतं. हे उत्तर स्वीकारण्याची तयारी नसते. पण ती होत जाते. कारण कक्षा रुंदावू लागलेल्या असतात. ती पोकळी आभासी नाही हे समजतं, भले तू आभासी असशील तरीही. ती पोकळी वास्तव असते. ती तत्काळ भरायची असेल तर तू असणं, भले आभासी का असेना, आवश्यक असतं हे समजत जातं. इथं तत्काळ या शब्दाला महत्त्व. म्हणून मग तुझ्यासाठी हे सारं केलंच पाहिजे का हा प्रश्न, एरवी त्याचं उत्तर नकारार्थी असूनही, निकालात निघतो. वाटतं, चला एक तर प्रश्न संपला. पण नाही. तो असा संपत नाही. तो नव्या प्रश्नाला जन्म देतो. जे करतोय ते असंच केलं पाहिजे का? काही वेगळं, नवं नाही का करता येणार?
हे असं होत राहतं कायमच. वेगळं काही असतंही, नसतंही. म्हणजे जे वेगळं केलं जातं ते त्या करण्यापुरतंच मर्यादित राहतं. तुझं अस्तित्त्व इतकं सर्वव्यापी असूनही. ती मर्यादा ओलांडण्याची बुद्धीच होत नाही. कुणालाच. ना तुझ्या अस्तित्त्वाविषयी शंका घेणार्‍यांना, ना त्याविषयी पक्की खात्री असणा्र्‍यांना. मग मात्र पुन्हा पहिल्या प्रश्नापाशी येऊन थांबावं लागतं. हे सारं करणं गरजेचं आहे का? सारं म्हणजे काय, असं कोणीही म्हणेल. त्याचं एकच उत्तर आहे - तुझ्यासाठी, तुझ्यामुळं, तुझ्यापासून कशाचाही आरंभ करायचा... ते सारं!
हे उत्तर नाहीये. हाही खरं तर एक प्रश्नच आहे. कधी तरी सोडवावा लागणारा...

***

तू आहेस की नाही हा प्रश्न मागं पडलेल्या काळातील ही एक घटना. एव्हाना प्रतिमांनी जगण्यात प्रवेश केलेला असतो. तुझीही प्रतिमा असतेच. प्रतिकृतीपेक्षा महत्त्वाची. एके दिवशी काही काम होतं महत्त्वाचं आणि या सहकार्‍यानं उशीर केला. कारण विचारलं तेव्हा बोट केलं तुझ्याकडं. म्हणे, तुझ्यासाठी वेळ लागला. कामाचा सत्यानाश झाला. एक प्रकारे विघ्नच. तसं सांगून त्या सहकार्‍याला जाब विचारला. तुझ्यापुढं सारं काही शून्य असं स्वीकारणं शक्यच नव्हतं. तुझ्या प्रतिमेकडंच बोट होतं त्याचं. तीच प्रतिमा फोडली... माणसं जे करतात, त्यात विघ्नं येतातच. विघ्नांचा प्रारंभ असतंच असेल ना? त्यालाही तूच जबाबदार असं मानून, प्रतिमा फोडली. तू नाहीस यावर झालेलं ते शिक्कामोर्तब असावं.
तेही फसवंच पण. वैयक्तिक संदर्भांपुरतं. ज्याच्यामुळं हे घडलं तो सहकारी तर तुझाच असतो. तूही, भले आभासी का होईना, त्याचाच असशील. नव्हे आहेसच. मग ते प्रतिमा फोडणंही मूर्ख ठरत जातं. तुझ्या सर्वव्यापी आभासी अस्तित्त्वानं केलेला हाही एक पराभव असतो.
तुझ्या, आभासी का होईना, या सर्वव्यापी अस्तित्त्वाचं असं ज्ञान होत जाण्यासाठी इतकं काही करावं लागतं? तुझ्याकडून, आभासी का होईना, याचं उत्तर केव्हा तरी मिळवायचं असं मनात कुठं तरी घर होतं. त्याला अर्थ नसला तरी... हा पुन्हा एक पराभवच असतो.
पराभवातून विजयाचा मार्ग जातो का? तुला तरी कसं ठाऊक असणार म्हणा... हे आमचं विश्व. तुझं नव्हेच. कारण तू नाहीसच.
तरीही व्यापून राहतोस... आभासी. वास्तवातील आभास.

***

माझ्यापुरतं बोलायचं तर, तुझा आणि मातीचा संबंध भावतो. तू प्रमुख असणं भावतं, या प्रमुखपणामुळंच कधी काळी तुझ्यामुळंच अनेकांचं जगणं सुसह्य झालेलं असतं हेही पटतं. मग तिथून तुझा इथवर हा झालेला प्रवास चक्रावून टाकतो. नुसताच चक्रावून नव्हे तर तुझं अस्तित्त्व नाकारण्याकडे घेऊन जातो. ते नाकारलं तरी, आभासाचं काय? प्रश्न कायम.
म्हणून मग ठरवलं, हे एकदा तुलाच सांगावं. तू काय किंवा तुझ्यासारखे इतर अनेक काय... ते कधीच आमच्या जगण्यात कोऑप्ट झालेले आहेत. अस्तित्व नसतानाही. आभासालाच अस्तित्त्व मानून. त्यालाही कुणाची हरकत असायचं कारण नाही. हरकत, खरं तर तुझ्याविषयीचं गार्‍हाणं म्हणूया, हेच असतं की तूही तुझ्या प्रतिमेला जागत नाहीस. तू प्रतिमेला जागावंस यासाठी जे करायला पाहिजे ना, ते कधीच कळत नाही. तू ते सांगत नाहीस. मग जे आहे ते चालू राहतं. असंच किती काळ चालू ठेवायचं? प्रश्न इतकाच आहे. तुझं अस्तित्त्व नाकारूनही तुलाच विचारलेला. कारण, आता हा आभासही वास्तविक विश्वातीलच आहे ना? कल्पनेत का होईना, तू आहेसच. नसूनही असल्यासारखा. आणि हेच तर अधिक महत्त्वाचं. कारण तसे असंख्य जण 'असूनही नसल्यासारखेच' आहेत आमच्यात. त्यांचा उपयोग नाही. निदान तू तरी, तुझ्या त्या आभासी प्रतिमेला जागून, 'नसूनही आहेस' असं होईल का?
आभासी का होईना, तू आहेस. तुझा संबंध ज्ञानाशी. विद्येशी. बास्स. या दोन गोष्टी नीट देशील का? कर्ता होशील इथं? एवढंच मागणं म्हणूया का? आपल्या नात्यातलं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

''तु''
भगवंताचे नसलेले अस्तीत्व प्रेमळ पणे मान्य असलेला छान लेख आहे .
देवाची शपथ मी नास्तीक आहे .( विनोद )

आभासालाच अस्तित्त्व मानून. त्यालाही कुणाची हरकत असायचं कारण नाही. हरकत, खरं तर तुझ्याविषयीचं गार्‍हाणं म्हणूया, हेच असतं की तूही तुझ्या प्रतिमेला जागत नाहीस. तू प्रतिमेला जागावंस यासाठी जे करायला पाहिजे ना, ते कधीच कळत नाही. तू ते सांगत नाहीस. मग जे आहे ते चालू राहतं. असंच किती काळ चालू ठेवायचं? प्रश्न इतकाच आहे. तुझं अस्तित्त्व नाकारूनही तुलाच विचारलेला. कारण, आता हा आभासही वास्तविक विश्वातीलच आहे ना? कल्पनेत का होईना, तू आहेसच. नसूनही असल्यासारखा. आणि हेच तर अधिक महत्त्वाचं.>>>मस्त! आवडला सगळाच लेख

विचार करण्यासारखे आहे. देवाचे अस्तित्व आहे की नाही की नुसताच आभास्.पण या आभासावर तर दुनिया तिकुन आहे.छान खुप बरे वाटले.

नास्तिकतेतून आस्तिक्तेचा हा प्रवास मला भावला.देव हाही सवईचा व्हावा लागतो. कुणाला लवकर सवय
लागते तर कुणाला उशीरा.