१२७०, सदाशिव पेठ, पुणे.

Submitted by विक्रमसिंह on 26 August, 2009 - 12:33

सदाशिव पेठ, पुणे. हे उच्चारले, की सगळीकडे प्रतिक्रिया ठराविक. सदाशिव पेठी, पुणेरी , वगैरे.

माझा मात्र अनुभव एकदम या प्रस्थापित कल्पनेस छेदणारा. १२७०, सदाशिव पेठ, पुणे, येथील. अगदी खरा. जन्मभर जपून ठेवावा , मनात घर करून राहिलेला असा. कुठेतरी त्याची कृतज्ञता व्यक्त करायचीच होती. म्हणूनच खरा पत्ता शीर्षक म्हणून दिलाय.

तसा मी सदाशिव पेठेत उपराच. झाले काय, मी असेन १२ वर्षाचा. माझी बहिण १० वर्षाची. आई बाबा नोकरी निमित्त खेड्यात रहायचे. पुण्याजवळच. पण माझ्या भाषेची शिवराळ प्रगति बघून बाबांनी चांगला पण धाडसी निर्णय घेतला. मुलांना शिकायला पुण्यात ठेवायचे.

योगायोगाने १२७०, सदाशिव पेठ, येथे विद्यार्थांसाठी खोल्या आहेत असे कळले. आई बाबांनी चौकशी केली, मंडळी ओळखीची निघाली. माणसे चांगली वाटली , मालकांनी लक्ष ठेवायचे कबूल केले आणि आम्ही, म्हणजे मी आणि माझी छोटी बहिण, वैजू , तेथे रहायला आलो. आई बाबा दर आठवड्याला यायचेच भेटायला.

वाडा तसा नेहमी सारखाच. तीन मजली. १०-१२ कुटुंबे रहायची. शिवाय मालक, ४ भाउ आणि त्यांची कुटुंबे. भाडेकरूंना एक एक खोली. त्याच्यातच मोरी. मालकांना प्रत्येकी दोन खोल्या. मालक आणि भाडेकरू मध्ये येवढाच फरक. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती जवळपास सारखीच. सगळे पगारदार. काटकसरीने जगणारे. वाड्यातील मंडळींचे खोलीसाठीचे मोजमाप ही मजेशीर होते. किती माणस झोपू शकतील? हे त्यांचे मोजमाप.

मोठे मालक म्हणजे बापूकाका. तेच सगळ बघायचे. त्यांचा थोडा वचक ही होता. पण आम्हा मुलांना उगाचच कधी रागवायचे नाहीत. त्यांची एक बुलेट होती. बाकी सगळ्यांच्या सायकली. आम्हाला खेळायला मिळावे म्हणून ते बुलेट सुद्धा बाहेरच ठेवत असत. त्यांचा नियम एकच. अंधार पडल्यावर क्रिकेट खेळायचे नाही.

आम्ही दोघे लहान. इतके की आम्हाला दाराला कडी व कुलुप लावायलाही खूप कसरत करायला लागायची. गॅलरीच्या कठड्यावर चढून वगैरे. हे बघून पहिल्याच दिवशी शेजारच्या वहिनी धावत आल्या. मला रागवल्या. अगदी तेंव्हापासून आख्या वाड्याने आमचे पालकत्व घेतले होते. ते अगदी चार वर्षानी वाडा सोडी पर्यंत. वैजूला तिची वेणी पण घालता यायची नाही, ते काम मालकीण बाईंचे. आईने तशी सुरवातीला प्रेमळ अटच घातली होती.

सगळ्या मोठ्या माणसांना आमचे भारी कौतूक. सारख त्यांच्या मुलांना ऐकवायचे. बघा दोघ किती लहान , पण शहाण्या सारख रहातात की नाही. आमच मित्रमंडळ मात्र जाम वैतागायचे, सारख सारख ऐकून.

समोरच्या पाटणकर खाणावळीतला डबा यायचा. पण तो नावालाच. आम्हाला दोघांना तो अजिबात आवडायचा नाही. पण का कोण जाणे वाड्यातल्या इतर मित्रमैत्रिणींना त्यातल्या भाज्या खूप आवडायच्या. मग काय, त्यांच्या आयांचा स्वयंपाक आमच्या ताटात आणि आमचा डबा त्यांच्या ताटात. वाड्यात अगदी वासावरून सुद्धा कुणाच्या घरी काय शिजतय हे कळायचे. अगदी लहानपणी गावाला असताना सगळी आळी आपले घर वाटायचे. पुण्याला एका वाड्यातच अख्खी आळी सामावलेली होती. सगळी कडे मुक्त प्रवेश. अगदी कधिही. मोठ्या सणांसाठी आम्ही आमच्या घरी जायचो. इतर वेळी आमचे सगळे सण १० घरी व्हायचे.

आमचा अभ्यास, दुखणी खुपणी, भांडणे हे सगळ वाड्याने संभाळल. थोडी सर्दी वा खोकला झाला तर संध्याकाळी घरगुती औषधे हजर. परिक्षेच्या आधी सगळ्यांचे रेडिओ बंद. शाळेच्या ट्रीपला जायचे तर उजूची किंवा चंदूची आई डबा देणार. ऐन वेळेला कोणी तरी तुटलेली बटण लावून देणार्, कोणी उसवलेली शिवण शिवणार तर कोणी सकाळच्या शाळेला उशीर होतोय म्हणून पाणि तापवून देणार, वहिनी आम्ही झोपून गेल्यावर तसाच पेटत राहिलेला स्टो बंद करणार आणि शिवाय जळलेले दुधाचे भांडे धुवून ठेवून आम्हाला पांघरूण घालून जाणार. एक ना अनेक. असंख्य छोट्या छोटया गोष्टी. आईची आठवण आली म्हणून कधी रडावेच लागले नाही. सगळ्या माउल्या आमच्यासाठी सदैव हजर.

आज सुद्धा त्या माउल्या आपल्या मुलीसारख आमच्या हिला वागवतात, माझ्या मुलांना आपल्या नातवासारखे जवळ घेतात. त्यांच्या यशाचे पेढे घेताना तेच अनेक वर्षांपूर्वी माझ्या इंजिनियर झाल्याचे पेढे घेताना दिसलेले कौतूक त्यांच्या डोळ्यात मला पुनः दिसत.

वैजू खूप वर्षानी नुकतीच वाड्यात जाउन आली. तिच्या मुलीने आमच्या तोंडून इतक्या वेळेला ऐकल होत की तिला प्रत्यक्ष पहायच होत. म्हणाली, पाच मिनिटात जाऊ म्हणून गेले आणि चार तास सुधीर कडे बसले. सगळे जण भेटायला आले होते.

माझे मित्र मोठे झालेत. वहिनी देवाघरी गेल्या. माझ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. वाडा जाउन सदनिका आल्या. सायकली जाउन गाड्या आल्या. पण आनंद यात आहे, वाड्यातली आपुलकी गेली नाही. जाणार कशी.

आम्ही लहान होतो म्हणून आम्हाला चांगली वागणूक मिळाली का? मला नाही असे वाटत. आमच्या शेजारच्या खोलीत दोन सी.ए.करणारे होते.एम्.के. आणि पाटिलबुवा. सगळे त्यांना तसेच म्हणायचे. त्यांना पण तशीच वागणूक. ती सगळी माणसच चांगली होती.

वाडयातल्या वास्तव्याने एक गोष्ट मात्र माझ्या मनावर बिंबली आहे. सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.

तो वाडाच तसा होता. अगदी ``१२७०, सदाशिव पेठ, पुणें,`` असून सुध्धा.

गुलमोहर: 

विक्रमसिंह,
मी सुधीर गाडगीळ, सध्या अमेरिकेत दौर्‍यावर आहे, त्यामुळे मायबोली वाचला. "१२७० सदाशिव पेठ" ह्या तुमच्या लेखाच्या शीर्षकाने ऊत्सुकता वाढली, म्हणून वाचला कारण मी शेजारच्या १२७१ मधला.
तुमच्या लेखामुळे माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या या गल्लीला लोणीविके दामले आळी का म्हणत? दामले लोणी विकत नव्हते, पण तुम्ही रहात असलेल्या १२७० सदाशिव या दामले वाड्याच्या दारात रोज पहाटे मावळ भागातले काही शेतकरी येउन लोणी विकत. दामल्यांच्या दारात लोणी विक्री म्हणून गल्लीला ते नाव पडले. तुमच्या व माझ्या दाराच्या समोर मुन्सिपालिटीच्या गटाराचे झाकण होते. सकाळी शाळेत जाताना ते झाकण उघडलेले असे आणि केशरी रंगाची इंजिनं गटार उपसत असत, त्यामुळे शाळेत जाण्याची गडबड असतानाही त्या गटारात डोकाउन झुरळे व गांडुळांची परेड बघितल्याशिवाय पुढे जावत नसे. मी आपल्या त्या गल्लीतले दिंडी दरवाजे असलेले सर्व वाडे आणि तेथून जाणारे फेरीवाले त्यांच्या ललकार्‍यांसह ध्वनीचित्रबध्द करुन ठेवले आहेत.
कधी पुण्यात आलात तर ती सगळी जुनी वाड्यांची दामले आळी पड्द्यावर तुम्हाला दाखवीन, कारण 'प्रसाद'चा ओक वाडा सोडून सर्व वाडे जमीनदोस्त झालेत, तेव्हा या, पहा जुना वाडा पड्द्यावर आणि अँका फेरीवाल्यांच्या आरोळ्या...
ऊदा. 'हरभरा मूंग मट्की' म्हणत पोटानी गाडी ढकलणारा कड्धान्यवाला; तांबई...... पितळयाची मोडवाला
पावसाच्या श्रावणसकाळी 'आघाडा, दुर्वा फुलीयsss...वाली' आणि पांढर्‍या बंडीत नाकावर चष्मा ठेउन 'चला विक्रमसिंह..' अशी हाका मारत तुम्हाला जेवायला बोलावणारे 'पाटणकर बोर्डिंगवाले. मग कधी येताय???

सुधीर माझ्या घरी आँस्टिनला आलाय. त्याने तुमची वाड्याची आठवण वाचली आणि भरभरा बोलत २५ वर्षांपुर्वीच्या दामले आळीतच शिरला. ऐकताना मला मजा आली म्हणून त्याचं बोलणं वरती तुमच्यासाठी नोंदवलय..
कसं वाटतय नक्की कळवा.

वाह, मस्त वाटलं वाचून Happy

अव्यक्त, मी ह्युस्टनला असतो. ह्युस्टन ला येणार असाल तर जरुर कळवा.

हे भारी आहे. सुधीर गाडगीळांचा यावर एक लेख होता वाचलेला. पुण्यात यात तेव्हा संपर्क करायला आवडेल. कालच श्रावण सुरु होणार या कल्पनेने ते 'आघाड दुर्वा फुल्लं....' भाऊ महाराज बोळातला कल्हईवाला, गंगधर मिठाईवाल्याचा गल्लीतला चिलीम ओढणारा शिराळशेठ (श्रीयालशेठ), नागोबा नरसोबा १० पैसे, लोणीविके दामले आळीतला तो खोपटातला चांभार, राजा आईसेस हे सगळे आठवले. Happy

क्या बात क्या बात. काय सुरुवात दिवसाची. Happy

प्रत्यक्ष सुधीर गाडगीळच समोर बोलतायत असं वाटलं इतकं तंतोतंत उतरवलंयत त्यांचं बोलणं अव्यक्त तुम्ही. धन्यवाद. विकाका, तुम्ही जाल ती क्लिप बघायला तेव्हा मलाही बोलवा. Happy

अरे वा ! मस्त वाटलं.

सुधीर गाडगिळांची एक कोटी मी चोरली. एका कार्यक्रमात वद्यवृंदाची ओळख करून देताना तबल्यावर बसलेल्या मुलाच्या नावाबरोबरच त्याचे गोत्रही जाहीर केले. वर म्हणाले की मध्यंतरात बरेच लोक आत येऊन चौकशी करतात म्हणून मी इथेच जाहीर करतो ! एका कार्यक्रमाचे निवेदन करताना मी ती कोटी चोरली. त्यांना धन्यवाद द्या.

हा इतका सुंदर लेख (आणि प्रतिसाद) कसा वाचायचा राहिला? मजा आली वाचताना! 510 सदाशिव पेठ हे माझं दुसरं घर आहे त्यामुळे मी पण सपेकरच Happy

माझे बालपण १४७ शुक्रवार , शिन्दे आळी इथले.
प्रायमरी शिक्शण गोडबोले बाइन्च्या "शिशु-निकेतन" मधे झाले ( शनिपाराच्या अलिकडे) . शाळेच्या समोर जोशी सुगन्धी , तिथून येंणारा सुगन्ध ; जनता बन्केच्या गएलरीच्या कठड्यावर बसणारी क्॑बुतरान्ची शाळा , भाऊ महाराज बोळातला कल्हईवाला ; फूल्वाला , हनुमान डेअरी ; ............राजा केळकर म्युझिउम ...... सगळ्या प्रतिमा अजून ताज्या आहेत.
समोरच्या भारत गायन समाजात ( ३-४ वर्शे तिथे शिकलोय) भोपे सर अन पित्रे बाई पहिल्या वर्षान्ना शिकवायला होत्या. भोपे सर रोज पर्वतीवरच्या मन्दिरात गायचे . ....

श्रावणात आम्ही फुले वेचायला जात असू सकाळी वेग वेगळ्या वाड्यान्मधे...कोणी कधी ओरडलेले आठवत नाही.
सकाळी वासुदेव यायचा गात .. मोरपिसान्ची टोपी अन चिपळ्या घेउन.....

पतन्ग उडवायला वाद्यातल्या घरान्च्या पत्र्यान्वर जायचो ...... धडपडायचो .....

काळ्या होउदा जवळ इन्द्रायणी नावाची बन्गली होती ... ती भुताची म्हणून प्रसिध्ध होती ....

किती आठवणी ....

पशुपत मी बदामी हौदाजवळचा. अगदी अगदी. हनुमान डेअरी, सावळाहरी, धर्मचैतन्य, राजा केळकर. आहाहा. शिशुनिकेतन करता पिंच.

इंद्रायणी बंगल्याच्या मागे सख्खे काका रहात असत. त्या कुप्रसिध्दीमुळे काकांकडे जातानाच टरकायची.

खुप छान लेख आणि तुमच्या आई वडलांच खुप कौतुक वाटलं! त्या काळात त्यांनी किती धैर्य एकवटुन तुम्हा दोघा मुलांना परगावी ठेवण्याचा निर्णय घेतला असेल! (सध्या मुलींना संध्याकाळी १५ मिनिट माझ्या एका मैत्रीणीकडे थांबाव लागतं तर मला खुप काळजी/वाईट/अपराधी वाटतं)
सुधीर गाडगीळ यांचा प्रतिसादही खुप मनापासून आलाय! अव्यक्त, धन्यवाद!

खूपच छान लिहीलय. तुमच्या आई वडिलान्चे कौतुक वाटतेय. योग्य त्या वेळी त्यानी काळजावर व मनावर दगड ठेऊन निर्णय घेतला आणी तुम्ही दोघानी त्याचे सोने केले.
तुमच्या लेखाला सुधीर गाडगीळान्चा प्रतीसाद बघुन आनन्द वाटला. लिहीत रहा.

विक्रमसिंह,
तो दामलेवाडा पाडून जरी ३ मजली इमारत उभी राहिली असली तरी तो वाडा पाडायच्या अगोदर शूटिंग करून ठेवलय.
त्यात तुम्हाला बापूकाकांसकट सगळे भेटतील.

वॉव! मी दामले आळीत १९८९ मध्ये राहायला गेले. त्याअगोदरचे तिचे रूप, तिथले वाडे, आधीचे आशिर्वाद मंगल कार्यालय (जिथे आमची इमारत उभी राहिली) हे जर चित्रित केले असेल तर नक्कीच आवडेल बघायला! दामले आळीतले दामले हे माझ्या वहिनीचे माहेरचे आप्त. ती त्या गल्लीत लहान असताना अनेकदा यायची. त्यामुळे तिलाही नक्कीच रस असेल हे चित्रीकरण बघायला.

अव्यक्त, धन्यवाद. माझा लेख सुधीर गाडगीळांपर्यंत पोचवल्याबद्दल आणि त्यांची प्रतिक्रीया कळवल्याबद्दल.
आम्ही त्यांना तेंव्हा सुधीरच म्हणायचो. आमच्या पेक्षा मोठे आहेत. पण आमच अड्ड्यावरच क्रिकेट बघायला त्यांना मनोहरच्या व्यापातून कधी कधी वेळ मिळायचा. :).

हा लोणी विकणारा राया म्हणजे एक धिप्पाड रांगडा मनुष्य होता. आमचा बॉल त्याच्या लोण्याच्या भांड्यात गेला तरच जरा रागवायचा.

आघाडा, दुर्वा फुलीयsss...वाली'>> याबरोबरच, "सकाळ, तरूण भारत, प्रभात, केसरी".

श्याम भागवत : चित्रिकरण पहायला आवडेल.

लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल सर्वांन्ना पुनः एकदा धन्यवाद.

ओह किती सुंदर आठवणी.. २००९ मधे कशाकाय सुटल्या वाचायच्या...
खैर देर से ही सही!!!
फार फार छान आहे लेख आणी प्रतिसाद ही तितकेच सुंदर!!!

मस्त आहे हा लेख आणि त्याखालच्या प्रतिक्रिया!! मस्त वाटलं वाचून. मलापण तो सगळा भाग, सदाशिव पेठच असं नाही, तर अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता, नारायण पेठ, लिमयेवाडी वगैरे वगैरे नुसता फिरायला आवडतो. आता तिथे गेल्यावर काही काही ठिकाणी तर काळ थांबल्यासारखा वाटतो. विशेषतः एखाद्या जुन्या निवांत दुकानातून सकाळी विविधभारतीची गाणी ऐकायला आल्यावर!!

माझ्याही काही फार सुरेख आठवणी आहेत स पे वाड्याबद्दलच्या. माझे आजोळ होते. मे च्या सुट्टीत मामाकडे रहायला जात असू.

अरे कसं काय मिसलं हे.फार सुरेख लिहिलंय!

तुमचं आणि तुमच्या आईवडीलांचं तर कौतुक आहेच, पण इतक्या लहानपणी आईवडीलांपासून दूर राहणार्‍या मुलांना मायेने बघणं, त्यांचं सगळं करणं अगदी प्रशंसनीय आहे.>>>>> +१.
बाकी पुण्याबद्दल एक सुप्त आकर्षण आहे.आता होते म्हणावं लागेल.

Pages