१२७०, सदाशिव पेठ, पुणे.

Submitted by विक्रमसिंह on 26 August, 2009 - 12:33

सदाशिव पेठ, पुणे. हे उच्चारले, की सगळीकडे प्रतिक्रिया ठराविक. सदाशिव पेठी, पुणेरी , वगैरे.

माझा मात्र अनुभव एकदम या प्रस्थापित कल्पनेस छेदणारा. १२७०, सदाशिव पेठ, पुणे, येथील. अगदी खरा. जन्मभर जपून ठेवावा , मनात घर करून राहिलेला असा. कुठेतरी त्याची कृतज्ञता व्यक्त करायचीच होती. म्हणूनच खरा पत्ता शीर्षक म्हणून दिलाय.

तसा मी सदाशिव पेठेत उपराच. झाले काय, मी असेन १२ वर्षाचा. माझी बहिण १० वर्षाची. आई बाबा नोकरी निमित्त खेड्यात रहायचे. पुण्याजवळच. पण माझ्या भाषेची शिवराळ प्रगति बघून बाबांनी चांगला पण धाडसी निर्णय घेतला. मुलांना शिकायला पुण्यात ठेवायचे.

योगायोगाने १२७०, सदाशिव पेठ, येथे विद्यार्थांसाठी खोल्या आहेत असे कळले. आई बाबांनी चौकशी केली, मंडळी ओळखीची निघाली. माणसे चांगली वाटली , मालकांनी लक्ष ठेवायचे कबूल केले आणि आम्ही, म्हणजे मी आणि माझी छोटी बहिण, वैजू , तेथे रहायला आलो. आई बाबा दर आठवड्याला यायचेच भेटायला.

वाडा तसा नेहमी सारखाच. तीन मजली. १०-१२ कुटुंबे रहायची. शिवाय मालक, ४ भाउ आणि त्यांची कुटुंबे. भाडेकरूंना एक एक खोली. त्याच्यातच मोरी. मालकांना प्रत्येकी दोन खोल्या. मालक आणि भाडेकरू मध्ये येवढाच फरक. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती जवळपास सारखीच. सगळे पगारदार. काटकसरीने जगणारे. वाड्यातील मंडळींचे खोलीसाठीचे मोजमाप ही मजेशीर होते. किती माणस झोपू शकतील? हे त्यांचे मोजमाप.

मोठे मालक म्हणजे बापूकाका. तेच सगळ बघायचे. त्यांचा थोडा वचक ही होता. पण आम्हा मुलांना उगाचच कधी रागवायचे नाहीत. त्यांची एक बुलेट होती. बाकी सगळ्यांच्या सायकली. आम्हाला खेळायला मिळावे म्हणून ते बुलेट सुद्धा बाहेरच ठेवत असत. त्यांचा नियम एकच. अंधार पडल्यावर क्रिकेट खेळायचे नाही.

आम्ही दोघे लहान. इतके की आम्हाला दाराला कडी व कुलुप लावायलाही खूप कसरत करायला लागायची. गॅलरीच्या कठड्यावर चढून वगैरे. हे बघून पहिल्याच दिवशी शेजारच्या वहिनी धावत आल्या. मला रागवल्या. अगदी तेंव्हापासून आख्या वाड्याने आमचे पालकत्व घेतले होते. ते अगदी चार वर्षानी वाडा सोडी पर्यंत. वैजूला तिची वेणी पण घालता यायची नाही, ते काम मालकीण बाईंचे. आईने तशी सुरवातीला प्रेमळ अटच घातली होती.

सगळ्या मोठ्या माणसांना आमचे भारी कौतूक. सारख त्यांच्या मुलांना ऐकवायचे. बघा दोघ किती लहान , पण शहाण्या सारख रहातात की नाही. आमच मित्रमंडळ मात्र जाम वैतागायचे, सारख सारख ऐकून.

समोरच्या पाटणकर खाणावळीतला डबा यायचा. पण तो नावालाच. आम्हाला दोघांना तो अजिबात आवडायचा नाही. पण का कोण जाणे वाड्यातल्या इतर मित्रमैत्रिणींना त्यातल्या भाज्या खूप आवडायच्या. मग काय, त्यांच्या आयांचा स्वयंपाक आमच्या ताटात आणि आमचा डबा त्यांच्या ताटात. वाड्यात अगदी वासावरून सुद्धा कुणाच्या घरी काय शिजतय हे कळायचे. अगदी लहानपणी गावाला असताना सगळी आळी आपले घर वाटायचे. पुण्याला एका वाड्यातच अख्खी आळी सामावलेली होती. सगळी कडे मुक्त प्रवेश. अगदी कधिही. मोठ्या सणांसाठी आम्ही आमच्या घरी जायचो. इतर वेळी आमचे सगळे सण १० घरी व्हायचे.

आमचा अभ्यास, दुखणी खुपणी, भांडणे हे सगळ वाड्याने संभाळल. थोडी सर्दी वा खोकला झाला तर संध्याकाळी घरगुती औषधे हजर. परिक्षेच्या आधी सगळ्यांचे रेडिओ बंद. शाळेच्या ट्रीपला जायचे तर उजूची किंवा चंदूची आई डबा देणार. ऐन वेळेला कोणी तरी तुटलेली बटण लावून देणार्, कोणी उसवलेली शिवण शिवणार तर कोणी सकाळच्या शाळेला उशीर होतोय म्हणून पाणि तापवून देणार, वहिनी आम्ही झोपून गेल्यावर तसाच पेटत राहिलेला स्टो बंद करणार आणि शिवाय जळलेले दुधाचे भांडे धुवून ठेवून आम्हाला पांघरूण घालून जाणार. एक ना अनेक. असंख्य छोट्या छोटया गोष्टी. आईची आठवण आली म्हणून कधी रडावेच लागले नाही. सगळ्या माउल्या आमच्यासाठी सदैव हजर.

आज सुद्धा त्या माउल्या आपल्या मुलीसारख आमच्या हिला वागवतात, माझ्या मुलांना आपल्या नातवासारखे जवळ घेतात. त्यांच्या यशाचे पेढे घेताना तेच अनेक वर्षांपूर्वी माझ्या इंजिनियर झाल्याचे पेढे घेताना दिसलेले कौतूक त्यांच्या डोळ्यात मला पुनः दिसत.

वैजू खूप वर्षानी नुकतीच वाड्यात जाउन आली. तिच्या मुलीने आमच्या तोंडून इतक्या वेळेला ऐकल होत की तिला प्रत्यक्ष पहायच होत. म्हणाली, पाच मिनिटात जाऊ म्हणून गेले आणि चार तास सुधीर कडे बसले. सगळे जण भेटायला आले होते.

माझे मित्र मोठे झालेत. वहिनी देवाघरी गेल्या. माझ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. वाडा जाउन सदनिका आल्या. सायकली जाउन गाड्या आल्या. पण आनंद यात आहे, वाड्यातली आपुलकी गेली नाही. जाणार कशी.

आम्ही लहान होतो म्हणून आम्हाला चांगली वागणूक मिळाली का? मला नाही असे वाटत. आमच्या शेजारच्या खोलीत दोन सी.ए.करणारे होते.एम्.के. आणि पाटिलबुवा. सगळे त्यांना तसेच म्हणायचे. त्यांना पण तशीच वागणूक. ती सगळी माणसच चांगली होती.

वाडयातल्या वास्तव्याने एक गोष्ट मात्र माझ्या मनावर बिंबली आहे. सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.

तो वाडाच तसा होता. अगदी ``१२७०, सदाशिव पेठ, पुणें,`` असून सुध्धा.

गुलमोहर: 

सदाशिव पेठेच्या गल्लीबोळांमधून फिरताना एक खास सुवास मला तरी जाणवतो. Happy आतापर्यंत शनिवार, नारायण, बुधवार, भवानी, नाना पेठ वगैरे भागातील गल्लीबोळांमधूनही बरीच हिंडले आहे. पण असा सुवास मला का कोण जाणे, तिकडे तितका नाही जाणवला. हा सुवास असतो दारच्या (किंवा बाल्कनीतल्या व आताशा फुलपुड्यात मिळणार्‍या) फुलांचा, उदबत्ती-धूपाचा, सकाळी सकाळी वरणाला किंवा आमटीला दिलेल्या फोडणीचा, गरम तव्यावर पोळ्या भाजताना येणारा तो खास खरपूस गंध, लोणकढं साजूक तूप आणि दुधाला आलेल्या उकळीचा, चहाच्या आधणाचा, कधीकधी झणझणीत रश्शाचा सुगंध... असे सर्व प्रकारचे सुगंध पोटात घेऊन त्यांपासून तयार होणारा एक जो संमिश्र दरवळ असतो तो मला सदाशिव पेठेतील घरांवरून जाताना आजही हमखास येतो. कदाचित हा गंध गतस्मृतींचाच एक भाग असावा! Happy पण त्यामुळे जी एक ऊबदार, स्नेहशील भावना मनात तयार होते ती कायम जपून ठेवावीशी वाटते.

लोकहो. धन्यवाद.
आपण चांगल्या गोष्टी शोधत रहायच्या. आपोआप भेटतात.
काय शोधतो हे महत्वाचे. आणि शोधल की सापडत. Happy

मस्त लेख, वाचून खुप छान वाटलं!

तुम्ही अन अजून काहीजण अगदी शेजारीच निघालात की! आम्ही १११२ सदाशिव मधे रहायचो, सुधीर गाडगीळांच्या वाड्यासमोर!

वर भटक्या जनावरांच्या कोंडवाड्याचा उल्लेख आलाय. आम्ही तिथे १९९५ पर्यंत होतो, तेव्हाही होता तो. नंतर तिथे हॉस्टेल झालं.
आजही भारतवारीत त्या गल्लीतून चक्कर मारायला चुकत नाही. तिथे असताना निंबाळकर तालमीच्या गणपतीच्या मिरवणूकीत नाचायला दरवर्षी असायचोच, पण तिथून मुक्काम हलवल्यावरसुद्धा मिरवणूक कधीही चुकवली नाही.
२-३ वर्षांपूर्वी एकदा मुद्दाम गणपतीच्या दिवसांत भारतवारी जमवली, आणी निंबाळकरला नाचून(?) आलो, तेव्हा काय वाटलं ते शब्दात सांगणं अवघड आहे!

असे सर्व प्रकारचे सुगंध पोटात घेऊन त्यांपासून तयार होणारा एक जो संमिश्र दरवळ असतो तो मला सदाशिव पेठेतील घरांवरून जाताना आजही हमखास येतो. कदाचित हा गंध गतस्मृतींचाच एक भाग असावा! स्मित पण त्यामुळे जी एक ऊबदार, स्नेहशील भावना मनात तयार होते ती कायम जपून ठेवावीशी वाटते. >>>>>>> काय सुंदर शब्दात मांडलंस अकु ..... अग्दी अग्दी झालं प्रत्येक शब्दाला .... Happy

मंदार, म्हणजे आपण सख्खे शेजारीच की! Happy तिथल्या जागेत २००५ पर्यंत वास्तव्य होतं माझं.

पण त्याअगोदर टिळक रोडला न्यू इंग्लिश स्कूलजवळ आणि त्याही अगोदर बादशाही बोर्डिंग शेजारी राहायचे मी. सपे नसांनसांत मुरली आहे! Happy जन्मही लिमयेवाडीतला. माझ्या जन्माअगोदर आईवडील त्याच त्या सुप्रसिध्द अशा प्र.बा.जोगांच्या जोगवाड्यात राहायचे. सपेतली लहान-मोठी स्थित्यंतरे बघतच मी लहानाची मोठी झाले. अनेक कीर्तिवंत, प्रतिभावंत व यशस्वी लोकांना सपेतल्या त्यांच्या घरी साधेपणाने, कसलाही आव न आणता वावरताना पाहिले आहे. लहान असताना शरद तळवलकरांना सकाळी अगदी वाड्याच्या दारावरून मॉर्निंग वॉकला जाताना पाहायचे. कोणी रस्त्यात थांबवून बोलू लागले की त्यांच्याशी तितक्याच सहजपणे गप्पा मारणारे शरद तळवलकर. समोरच्या अंबिका भुवनापाशीही कधी ही कलाकार मंडळी जमलेली दिसायची. यशवंत दत्त, मोहन जोशी यांसारख्या दिग्गज कलावंतांचे वाड्यात येणेजाणे असायचे. अण्णासाहेब देऊळगावकर आमचे कैक वर्षे शेजारी होते. सदाशिव पेठेत वावरणारी ही प्रतिभावंत माणसे. जवळच काशीकरांचा वाडा होता. चिं. ग. काशीकरांना भेटायला एकदा आजोबांबरोबर गेल्याचं आठवतंय. कलावंत, विद्वान, लेखक, समाजकारणी लोक सपेत अनेक ठिकाणी राहायला होते. सदाशिव पेठेने त्यांना फार काही विशेष दिलं असेल असं नाही. हां, कदाचित एक सुरक्षित व सर्वसामान्य शेजार दिला असेल. पण या लोकांनी सपेला निश्चितच काहीतरी दिलं एवढं म्हणू शकते.

@ विक्रमसिंह, छान लेख. पुन्हा सपे आणि कॉलेजचे दिवस आठवले.. २००१-२००५ राहिले तिथे आणि कधीच सो कॉल्ड पेठी अनुभव आले नाही. पण कॉलेजच्या वयातील मज्जा म्हणजे होस्टेल, पुरूषोत्तम - भरत नाटय, चरणे, सी.ए. सी एस + MPSC/UPSC क्राउड, अभिनव च्या मित्र मैत्रिणींबरोबर स्केचिंगसाठी जुने वाडे धुंडाळणे हे सगळे वेडे दिवस खूप एंजॉय केले.. होस्टेलाइटससाठी बेश्ट एरीआ आहे तो. आता एकदा गेलं पाहिजे अमृततुल्यात..

अकु अका सख्खी शेजारीण Happy

शरद तळवळकर नेहमी दिसायचे, घरासमोरुन जाताना, मंडईत इ.

माझाही जन्म सपेमधला, त्यामुळे सपे नसानसात मुरली आहे ला +१००० Happy

माझ्या जन्माअगोदर आईवडील त्याच त्या सुप्रसिध्द अशा प्र.बा.जोगांच्या जोगवाड्यात राहायचे.
>>
ह्या प्र बा जोगांविषयी या पिढीला फारशी माहिती नाही. एक इरसाल पुणेकर म्हणून ते प्रसिद्ध होते.बालरोग तज्ज्ञ डॉ जोग आणो जोग शाळेचे संस्थापक श्री जोग यांचे ते वडील. यांच्यावर खरे तर एक बीबीच होऊन जायला पाहिजे पण त्यांच्याबद्दल माहीती असणारे इथे कोणी नसेल. वास्तविक पुणेरी पाट्या ह्या गोष्टीचे ते आद्य प्रणेते. त्यांच्या घरावरच्या गमतीशीर पाट्यांनी महाराष्ट्रभर त्या पाट्यांची चर्चा सुरु झाली. भांडणे हा प्रबा जोगां चा अतिशय आवडता छंद . इतका की त्यानी त्यावर 'मी केलेली भांडणे' हे पुस्तकच लिहून टाकले. पेशाने ते वकील , त्यात सपे त्यात भांडण्याची खुमखुमी असलेले . म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा . आणि ही सगळी भांडणे 'तात्विक' म्हणजे 'प्रश्न तत्वाचा आहे' या स्वरूपाची.
मला आठवते तेम्हणजे ते असे. या जोग महोदयांना भाषणाची अतिशय हौस म्हणून त्यानी 'वसंत व्याख्यान मालेत भाषण करण्याची मागणी केली . ती अमान्य होताच त्यानी स्वतःची आणि स्वतःपुरतीच 'पसंत व्याख्यानमाला "काढली. अध्यक्श त्यांची ही छोटी मुले असत. नेहरू स्टेडिअमवर त्यानी रणजी ट्रॉफीची की कसली कॉमेन्टरीची परवानगी मागीतली ती नाकारताच बाजूच्या एका इमारतीवर जाऊन स्पीकर वगरे बसवून त्यानी कॉमेन्तरी केली . ते मनपालाही उभे रहात वाटते. एखादे वेळी निवडूनही आले असावेत. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यानी वकीली पेशातून रीतसर निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या वयाला निवृत्ती घेतलेला मी एकमेव वकील आहे असे ते अभिमानाने सांगत. त्यांच्या बंगल्याचे नावही काहीतरी गमतीशीरच ठेवले होते. त्यांची पुस्तके आता अर्थातच अनुपलब्ध आहेत. अरुंधतीस त्यांचे काही किस्से आठवत असतील तर तिने अवश्य टाकावेत. प्र बा जोग हे एक वैशिष्ट्यपूर्ण पुणेकर होते हे मात्र निश्चित ...

रॉबिनहूड Happy
प्रबा जोगांच्या भाषणांबद्दल - त्यांनी आपल्या चारचाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक 'चालता' असा मंचच बनवून घेतला होता. त्यावर बसून किंवा उभे राहून ते भाषणे देत असत असे आईवडील सांगतात. निवडणुकीलाही ते बहुतेक उभे राहिले होते. आपल्या चालत्या फिरत्या मंचावरून त्यांनी भरपूर प्रचारसभा केल्या. परंतु त्या सभांना श्रोते जास्त नसत. असले तरी ते कुतूहलापोटी आलेले असत. ती निवडणूक ते हरले हे वेगळे सांगायला नकोच!

त्यांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर जाणारा जिना लाकडी होता, व काही पायऱ्या अशक्य कुरकुरायच्या (किंवा करकर वाजायच्या)! तर, घरमालक असूनही या इसमाने तिथे खडूने लिहून ठेवले होते की जिन्याने येता-जाता आवाज करू नये वगैरे. फेरीवाल्यांसाठी 'बाहेर फुटण्याचा रस्ता' असे खडूने बाहेरच्या दिशेने जाणारा बाण दाखवून लिहिलेले. त्या वाड्यात नवीन भाडेकरू फार टिकत नसत म्हणे! माझे आईवडीलही लवकरच तिथून बाहेर पडले. पण तिथले त्यांचे शेजारी खूप चांगले होते असे ते आजही सांगतात. वाड्यात राहाणाऱ्या भाडेकरूंची आर्थिक परिस्थिती बेतास बात असायची. पण तरीही एकमेकांकडे ये-जा, सणासुदीला घरात केलेले गोडाधोडाचे शेजाऱ्यांकडे आग्रहाने पोचविणे, एकमेकांच्या लहान मुलांवर लक्ष ठेवणे, कोणी आजारी असेल तर विचारपूस, घरातील बाईमाणूस आजारी असेल तर जेवायचा डबा न विचारता पाठवणे, पोरांनी अभ्यास केला नसेल व वांडपणा करत गल्लीत भटकत असतील तर त्यांना सर्वांसमक्ष दोन दणके घालून, कान पकडून अभ्यासाला बसविणे हे प्रकार तिथेही चालत. मग तो सदाशिव पेठेतला वाडा म्हणून तिथे कोणता अपवाद नव्हता.

प्रबांच्या (पुढे प्राध्यापक म्हणून प्रसिध्दीस पावलेल्या) मुलाची मॅट्रिक (का पीडी?)ची शिकवणी आईबाबांनी घेतली होती. आई स्टॅटिस्टिक्स शिकवायची तर बाबा गणित, विज्ञान वगैरे. त्यांना आपल्या मुलाला मेडिकलला घालायचे होते. परंतु मार्क्स कमी पडले व मुलगा प्युअर सायन्सेसला गेला. नंतर तो क्लासेस, शाळा, कॉलेजच्या माध्यमातून खूप यशस्वी झाला. त्याला भेटल्यावर आईबाबा विनोदाने कायम म्हणत, "बघ, आम्ही शिकवल्यामुळे तुला मार्क कमी पडले आणि तू एवढा मोठा झालास!" आईबाबांचा हा विद्यार्थीही हसून मान डोलवायचा व विनोदात सहभागी व्हायचा! Happy

पण त्यांचा दुसरा मुलगा मेडिकलला गेला ना? प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ प्रमोद जोग त्यांचे चिरंजीवच ना? जोग हॉस्पिटलवाले ? पुष्कर जोग हा अभिनेता कॉलेजवाल्या जोगां चा मुलगा म्हणजे प्रबांचा नातू .

फेरीवाल्यांसाठी 'बाहेर फुटण्याचा रस्ता' असे खडूने बाहेरच्या दिशेने जाणारा बाण दाखवून लिहिलेले
>>
दुपारी वामकुक्षीची वेळ . बेल वाजवू नये. फेरीवाले , वर्गणी मागणारे यानी येऊ नये त्यांन्नी बाहेर फुटण्याचा की कटण्याचा रस्ता असे काही बोर्ड होते असे ऐकून आहे.

मी प्राध्यापकी करणाऱ्या, क्लासचे संचालक असणाऱ्या जोगांबद्दल बोलते आहे.

आणि हो, असे बरेच बोर्ड होते किंवा प्रबांनी ते खडूने लिहिलेले असायचे. पहाटे येणाऱ्या दूधवाल्या भैय्याने तिसऱ्या मजल्यावर हातातली दुधाची चरवी खाली ठेवताना जरा जोरात ठेवली की तळमजल्यावर प्रबांची झोपमोड व्हायची म्हणे! त्यांची वकीलीची सनदही त्यांनी दोन राष्ट्रीय नेत्यांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्यानंतर की लेखनानंतर त्यांना समज देऊन काढून घेण्यात आली होती वगैरे गोष्टी कर्णोपकर्णी ऐकल्या आहेत. एकंदर बरेच वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. Happy

गप्र प्रधान सरांच्या सपेतल्या घरी काम करणाऱ्या बाई काही महिने आमच्याकडे कामाला होत्या. मी प्रधान सरांना स्वत: कधी प्रत्यक्ष भेटले नाही. पण या बाई त्यांचे व त्यांच्या पत्नींचे खूप कौतुक करायच्या. सरांनीच जवळपास लहानाचं मोठं केलं त्यांना असं सांगायच्या. गरीब परिस्थितीत लहान वयात लग्न व वैधव्य समोर आल्यावर ही निरक्षर बाई प्रधान सरांच्या व त्यांच्या पत्नीच्या मदतीने आपल्या पायांवर उभी राहिली. धुणीभांडी, खानावळीत पोळ्या लाटणे वगैरे कामे करून उदरनिर्वाह करायची. सरांनी तिला लिहिणे, वाचणे शिकण्यासाठी खूपदा सांगितले, रागावून पाहिले, पण तिला काही ते जमले नाही. परंतु त्या भल्या जोडप्याच्या मायेने ती त्यांच्याशी कायमची बांधली मात्र गेली.

ऍड. प्र. बा. जोग, यांच्या बद्दल प्रभाकर गोडसे, यांचा अनुभव.

ऍड. प्र. बा. जोग ही पुण्यातली एक अफलातून वल्ली होती. पुण्यात होणाऱ्या जवळपास प्रत्येक निवडणुकीला ते अपक्ष म्हणून उभे राहत. "उगवता सूर्य' हे त्यांचं निवडणूकचिन्ह होतं. त्यांच्या मिश्‍किल आणि खुमासदार बोलण्याच्या शैलीमुळं त्यांच्या सभेला कायम तुडुंब गर्दी होत असे. या सभांमध्ये जोग हे बहुतेक वेळा द्वयर्थी संभाषण करून जमलेल्या श्रोत्यांना भरपूर हसवत...खरंतर जोग हे अत्यंत विद्वान, व्यासंगी, होते; पण त्यांच्या प्रचाराची पातळी मात्र त्यांच्या गुणांना साजेशी असेच, असं नाही. हमखास करमणूक म्हणून लोक त्यांच्या प्रत्येक सभेला गर्दी करत. या गोष्टीची प्रा. जोग यांनाही जाणीव होती. त्यामुळं त्यांच्या सभेच्या भाषणात उपस्थितांना उद्देशून ते हमखास म्हणत - ""तुम्ही पुणेकर मतदार फार डांबीस आहात. माझ्या सभेला करता गर्दी आणि माझ्या मतपेटीला होते सर्दी!''

रामभाऊ म्हाळगी यांच्यासारख्या अजातशत्रू आणि अभ्यासू उमेदवाराच्या विरोधात जोग निवडून येणं तसं शक्‍य नव्हतंच; परंतु तरीही ते हट्टानं उभे राहत. मागचा-पुढचा विचार न करता मनाला वाटेल ते बिनधास्त बोलत. त्यांना भीती हा शब्दच जणू माहीत नव्हता. त्यांच्या जवळपास प्रत्येक सभेचा शेवट हा "सभा उधळण्यानं' अथवा प्रक्षोभक भाषणाबद्दल त्यांना अटक होण्यानंच होत असल्यानं सभेचा अध्यक्ष होण्यास कुणीच तयार नसे. त्यामुळं ते स्वत-च्या मुलाला सभेचा अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर बसवत. प्रक्षोभक भाषणाबद्दल सभेच्या शेवटी अटक झाल्यानंतर न्यायालयात जाताना ते हातात डिक्‍शनरीच घेऊन जात असत आणि आपल्या भाषणातला जो शब्द आक्षेपार्ह म्हणून गणला गेला, त्या शब्दाचे आणखी किमान चार समान अर्थ कोर्टापुढं मांडून न्यायाधीशांनाही पेचात पाडत व स्वत-ची सुटका करून घेत!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ते स्वत-च्या मोटारीच्या टपावर, केशकर्तनालयात असते तशी, चाकांची फिरती खुर्ची ठेवत. त्या खुर्चीवर बसून, हात जोडून बसल्याजागी चारही दिशांना गोल फिरत व पुण्याच्या गल्लीबोळातून मतदारांना नमस्कार करत. असं करणारे जोग हे एकमेव उमेदवार असावेत. पुण्याचं उपमहापौरपद सलग दोन वेळा भूषणवणारीदेखील ती एकमेव खास पुणेरी वल्ली होती!

मंदार, मी सुधीर गाडगीळांच्या शेजारच्या वाड्यात रहायचो. कोंडवाड्याला अड्डा म्हणायचे व तिथेच आमचा क्रिकेटचा अड्डा असायचा.

जोगांबद्दल ऐकलेले बहुतेक सर्व अकु, प्रसाद व रॉबिन हुडाने लिहिल्या सारखेच.
पुणेरी पाट्यांचा जनक म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागेल.

हो जोगांबद्दल मी पण अनेक दंतकथा ऐकुन आहे.

बाकी सदाशिवे पेठेतील पत्त्याविषयी मी पण जुना सदाशिव वाला. बदामी हौदापाशी 'नारायण श्रीपाद राजहंस' येथे रहात होते अशी पाटी आहे त्याच्या बरोब्बर समोर. मधु आपटे पण आमच्या घरासमोरच रहात असत. वाडा म्हणले की ते सोनेरी दिवस आठवतात. आमच्या वाड्यात अनेकदा गजाननराव वाटवे पत्ते खेळायला येत असत. त्यांचा तोंडुन अनेकदा राधे सैल तुझा अंबाडा, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले ऐकले आहे. आणखी एक गाणे ते आवर्जुन म्हणायचे. तो काळ असा होता जेव्हा दंडामधे गोटी होती, आता आम्ही वृध्द झालो असे काहीतरी होते. इथे सापडेल बहूतेक. http://www.youtube.com/watch?v=c8KPLp9v6MU

मी पण जुना सदाशिव वाली मूळची. पण काही वर्षे शुक्रवारात काढली.
नंतर मग सदाशिव पेठेचा ’बंगलो’री विभाग विजयनगरात.

जोगांची नात माझ्या वर्गात होती. प्राथमिक वर्गांमधे असताना ते तिला शाळेत सोडायलाही अधूनमधून येत असत. त्यामुळे त्यांची इतर प्रसिद्धी माहीत असली तरी प्रेमळ आजोबा म्हणूनच प्रत्यक्षात पाहिले आहे Happy

जुना सदाशिव ७२२ म्हणजेच नवा सदाशिव १२७२ असा पत्ता सांगावा लागायचा त्या काळी - १९६०-७० च्या सुमारास ..... Happy

किती छान आठवणी आणि लिहिण्याची शैली सुद्धा फार छान....साधी सरळ. तुम्हाला माया लावणारी माणसे तर चांगली असतीलच पण त्यांच्या त्या प्रेमाची तुम्ही पण इतकी कदर केलीत त्यात तुमचाहि मोठेपणा आहेच.

काही भाग सदाशिवात दाखल केल्यावर मग सगळेच नंबरींग बदलले. त्यामुळे पत्रांवर लिहिताना क्रमांक आणि जुना सदाशिव की नवा सदाशिव ते लिहावे लागे.
नाहीतर जुन्या सदाशिवाचे पत्र नव्या सदाशिवाला मिळायचे. Happy

Pages