न्यास

Submitted by क्रांति on 20 August, 2009 - 14:55

या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?

भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता

रंगलेल्या मैफली उधळून जाणे
हा कुणाचा सांग अट्टाहास होता?

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता

मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

गुलमोहर: 

अप्रतिम, केवळ अप्रतिम!
क्रांती तुम्ही असेच लिहित राहावे आणि आम्ही वाचत जावे.
एक एक शब्द नजाकतीने गुंफलाय. बेहतरीन.

परत एकदा ही सुंदर गज़ल वाचायला मिळाली. धन्यवाद शशांक पुरंदरे.... अशाच जुन्या गज़ला उकरून काढत रहा! Happy

Pages