दिवाळी.. 'त्यांची'!

Submitted by आशूडी on 28 October, 2010 - 01:35

'दिवाळी' या विषयावर श्याम मनोहर, श्री.दा. पानवलकर आणि भालचंद्र नेमाडे यांनी काय लिहिले असते असा विचार करता करता तयार झालेले हे गद्य विडंबन. Happy
झक्कू हा पानवलकरांच्या 'अपील' या कथेचा कथानायक इथे थोड्या नव्या रुपात.

***
***

नोहेंबर महिना चालू आहे. मी 'नोव्हेंबर' असे लिहित नाही. कुणी मला तसे लिहावे असा आग्रहदेखील करत नाही. तो अर्धा 'व' (इथे तर पूर्णच 'व' टाईप होतोय. अर्धा व टाईप कसा करतात? मला पाय वगैरे मोडायचा नाहिय. अर्धाच व हवा आहे. बॅकस्पेस दाबला की आख्खा व गायब होतोय. पूर्ण हे एकदम येत नाही. अंशा अंशाचे मिळून पूर्ण बनते. हाताने लिहीले की अर्धा व येतो लिहीता पण कॉम्प्युटरवर नाही. हे कायाय? आपण हाताने लिहायचे का थांबवले? आता अमेरिका, युरोपात टीव्हीवर कार्यक्रम बघता बघता टायपिंग करायचे तंत्रज्ञान येईल तेव्हा एकदम संपूर्ण शब्दच उमटतील. आपल्याला तेही चालेलच.) मी बोलतानाही म्हटले नाही तरी कुणाच्या लक्षात येत नाही. बारीक बारीक गोष्टींचा आपल्याला कंटाळाच आहे. भव्य दिव्य गोष्टीनी आपल्या डोळ्यांना विस्फारण्याची दिपून जाण्याची सवयच झालेली आहे. त्यामुळे छोट्या चुका, छोटे बरोबर आपोआप निसटत राहते. छोट्या चुका असतात. छोटे बरोबर कधी ऐकल्याचे आठवत नाही. म्हणजे आपण करतो ते सारे बरोबर यासारखेच आपण करतो ते सारे मोठे असे आपल्या लोकांना वाटत असावे. त्यामुळे छोटे बरोबर असे काही कुणी म्हणत लिहीत वाचत नसेल. नोहेंबर महिना म्हणजे दिवाळी. दिवाळीत आपल्याकडे बायका घराची स्वच्छता करतात, फराळाचे नाना पदार्थ करतात, पोरांना शाळेला सुटी असते. ते किल्ला करतात. दिवाळीतच किल्ला का असावा असा प्रश्न मला पडतो. शिवाजी महाराज असताना दिवाळी होती का? मग ते बालपणी किल्ला करत असत का? किल्ल्यावर राजा म्हणून कुणाचा पुत़ळा ठेवत? ही माहिती उपलब्ध नाही. महाराजांनंतर ही प्रथा अस्तित्वात आली असेल तर तिच्या उगमाचे कारण काय? उपयोग काय? किल्ला बनवण्याचे शास्त्र असे पुस्तक आपल्याकडे नाही. कोणत्या किल्ल्याला सर्वोत्कृष्ट म्हणावे हे संभाजी बागेतल्या स्पर्धेच्या परीक्षकांना कसे कळते याची नोंद हवी. वेळ घालवण्यासाठी मुलांना मातीत खेळून द्यायचे याला काही शास्त्रीय आधार आहे का? दिवाळी संपल्यावर त्या किल्ल्याचे काय करावे? किल्ला बनवण्यातून जर कलात्मक सर्जनशील वृत्ती वाढीस लागत असेल तर नंतर मोडून टाकण्यातून आपण मुलांना विध्वंसकतेचे धडे देत आहो असा सूक्ष्म विचार न करण्यामागचे कारणही किल्ल्याच्या सुबकतेतून डोळे दिपून जाणे हेच असावे. दिवाळीत घरामध्ये फराळ, मिठाई अशा तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ असतात. एरवी वर्षभरही ते असतात पण दिवाळीत ते असावेतच असे न लिहीलेले शास्त्र आहे. अलिखित शास्त्र असे सहसा म्हणू नये. शास्त्र हे बर्‍याचदा लिहीलेले, वाचलेले असते. पण आपल्याकडे सतत 'असे शास्त्र आहे' असे म्हणतात त्याचे कारण, परिणाम कुठेही लिहीलेले सापडत नाहीत. युरोपात,अमेरिकेत शास्त्राची पुस्तके असतात ती आपली रेफरन्स बुक्स म्हणून प्रसिध्द होतात. ती वाचायला आपल्याकडे हुशार लोक लागतात. लिहायच्या भानगडीत कुणी पडत नाहीत. कुटुंबव्यवस्थेचा पाया दिवाळीत भक्कम केला जातो. सगळ्यांसाठी नवीन कपडे घ्यायचे. घरात एखादी मोठी वस्तू मोठ्या दिवाळी महोत्सवातून, त्यावर काहीतरी फ्री मिळवूनच आणायची. दिवाळी अंक आणून शेल्फ मध्ये नीट लावायचे, पुढच्या दिवाळीपर्यंत वाचायचे असतात ना! दिवाळीत घरात आनंद असतो. नवराबायकोतही सहसा भांडणे करत नाहीत.नरकचतुर्दशीच्या दिवशी रेडिओ, टीव्हीवर नरकासुरवधाची कथा ऐकायची असते. पन्नास वर्ष ऐकून नक्की कुणाच्या तपश्चर्येने कोण प्रसन्न झाले हे त्या ऐनवेळी आठवले तरी कुणाला काही वाटत नाही. दिवाळीत मोती साबणाने आंघोळ करतात. एरवी या साबणाची जाहिरातही नसते आणि कुणी कानीकपाळी ओरडल्याशिवाय मनाने आम्ही काही विकत घेत नाही. आंघोळ करताना मुलांनी फुलबाज्या उडवाव्यात. प्रसन्न तेजोमय आंघोळ वर्षातनं एकदाच असते. त्यानंतर पेपरमध्ये आनंदी कुटुंबांचे फोटो पाहायचे. तेव्हा राजकारणात, शिक्षणक्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात फारसे काही महत्त्वाचे घडत नाही बहुतेक, त्यामुळे पेपर पणत्या आणि आकाशकंदिलांनी नटून थटून येतो.गुळगुळीत पानांवरच्या जाहिराती वाचायच्या. कोणती बेस्ट ऑफर आहे यात मेंदूला शिणवायचे. आंघोळ फराळ झाले की रिकाम्या दिवसाचे काय करायचे हे इतक्या वर्षात कुणालाही सुचले नाही. म्हणून मग वेळ घालवायला लोक देवळात नाहीतर नातेवाईकांकडे जातात. तिथेही आनंदी आनंद असतो. दुपारी जेवून झोपून संध्याकाळी नवीन कपडे घालायचे. रांगोळ्या काढायच्या, पणत्या लावायच्या. लक्ष्मीपूजन करुन फटाके उडवायचे. फटाके उडवताना मुलांना जपायचे, सांभाळायचे, ओरडायचे. जीव वर खाली होऊ द्यायचा. दरवर्षी पिशवीभर फटाके आणायचे. आवाजी, रोषणाईचे. मुलांना प्रदूषणाचे महत्त्व पटवून द्यायचे. दुसर्‍या दिवशी रस्ते भरभरुन झालेला कचरा बघताना दोन सेकंदच तोंड वेंगाडायला विसरायचे नाही. घरी रात्री टीव्हीवर दिवाळी विशेष कार्यक्रम चालू असतात ते पाहायलाच हवेत. नाहीतर उद्या ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करायला आपल्याला दुसरे विषय कुठून आठवणार? आपण काही संशोधक नाही की सतत नावीन्य शोधत त्यावर चर्चा करत रहावी. आईनस्टाईनला जशी १६ वर्षांनी त्याची गणितातली चूक सापडली तशी आपल्याला सबंध आयुष्यात एकदाही नाही सापडत. १६ वर्ष ते गणित, तो प्रश्न त्याच्या सतत डोक्यात होता! आपण सतत टीव्हीविषयी बोलत असलो तरी ठामपणे हे चूक किंवा हे बरोबर असे नाही सांगू शकत. पण आपल्याला चर्चा करायला कोण रोखू शकतो? त्यातून निष्पन्न व्हावे असा काही नियम नाही. असला तरी आम्हाला तो माहित नाही. युरोप अमेरिकेत असे काही सांगत नाहीत. त्यामुळे सेलेब्रिटीजचे दिवाळी कार्यक्रम पाहायलाच हवेत. त्यांची दिवाळी कशी झाली, परधर्मीय असून परप्रांतीय असून ते आपल्याला शुभेच्छा देतायत याचे गहिवर येऊ द्यावेत, टीव्हीवरच्या मालिकांतल्या घरात पण दिवाळी असते ती पहावी. मन अगदी प्रसन्न होऊन जाते. अशा प्रसन्न मनाने इतरांनाही हसून दिवाळीच्या अशा शुभेच्छा द्याव्यात.. "ही दिवाळी तुम्हा सार्‍यांना आनंदाची, सुखासमाधानाची व भरभराटीची जावो!"

-राम बरोबर

***

अणकुचीदार पिवळ्याधमक चांदण्या अग्रावर घेतलेल्या एकसंध रेषा तीक्ष्ण सुयांसारख्या करकचून डोळ्यात घुसल्या. कोणतीही पूर्वकल्पना न देता दृष्टीपल्याड असलेल्या कुणीतरी अज्ञाताने अचानक धनुष्यातून सोडलेला बाण जसा सप्पकन नजरेसमोर यावा तसं समोरच्या गुदमरलेल्या काळ्या पटलावर क्षणभर काहीतरी चमकून गेलं. पाठोपाठ ढॉप्प असा आवाज होऊन चुरचुर्चुर करत शंभर दीडशे रंगीबेरंगी चांदण्यांनी एकच गलका केला. सोपा प्रश्न विचारला की वर्गातली सारी मुले एकाच वेळेस बोलायला सुरुवात करतात आणि गोंधळ होऊन मास्तराला काहीच नीट ऐकू येत नाही तसं काहीसं त्याचं झालं. काही उमजायच्या आत समोर साकार झालेला तो चांदण्यांचा तेजोगोल हवेत विरुन गेला. तो रस्त्याच्या कडेने नेहमीप्रमाणे पावलांचा आवाज होऊ न देता खाली मान घालून चालत होता. त्यानं डोळ्यांच्या पिंगट हिरव्या बाहुल्या बारीक केल्या अन पांढर्‍या शेंड्याची काही लांबसडक शेपूट पाठ आणि पोटाच्या मधेपर्यंत आणून खाजवलं. इतक्यात कानठळ्या बसवणारा स्फोट पाठीमागे झाला. तो झप्पकन उलटा फिरला अन कान टवकारुन सेकंदभर थांबून अंधारातच कुठेतरी टक लावली. काहीच हालचाल झाली नाही. रस्त्यावर खस्फस आवाज आला. सफेद कान हलला. झक्कूनं आपले हिरवेपिंगट डोळे किलकिले करुन रुंदावले. समोर फणश्यांचा राजू उदबत्ती घेऊन येत होता. कागदाच्या कपट्यांच्या पसार्‍यात न जळलेले फटाके शोधत होता. कागदिच्चा! गुर्रर्र.. तो जळाऊ उग्र श्वास नाकपुड्यात भरुन राहिला होता.मऊ पावलं टाकत तो रस्त्याच्या कडेशी गटारापाशी आला. स्वत:ला मोकळं करुन गटाराच्या पलीकडे कुंपणाच्या भिंतीवर झक्कूनं झेप घेतली. भिंतीवरचं तारांचं कुंपण त्याच्या काळ्या कुळीकुळीत तलम पाठीशी सलगी करत असतानाच त्यानं पाठीची आतली कमान केली आणि खाली सुळकांडी मारली. कोपरकरांच्या स्वयंपाकघरातल्या खिडकीतून निघालेला बेसनाचा खमंग वास भरुन राहिला होता. त्या स्वादिष्ट वासानं केव्हापासून रिकाम्या असलेल्या पोटाची जाणीव आणखी खोल झाली. पुढच्या दोन पायांवर मागे रेलत झक्कूनं शेपूट उंचावून 'म्यॉंव' केलं. मानेला जोरात घुस़ळत दोन्ही कान आणि नाकाच्या पोकळ्या फ्सकन उच्छवास सोडून साफ केल्या. कानांचा टाळूवर टपटप आवाज झाला. लखलखणार्‍या बंगल्याच्या गेटातल्या गजांमधून अंग चोरत बाईंच्या रांगोळीला धक्का न लावता अंधाराच्या कडेने खिडकीखाली जाऊन हाक मारल्यासारखं क्रँव केलं. त्यांनी सवयीनं 'आले रे, झक्कू!' साद दिली. नखशिखांत नटलेल्या बाई नवीन साडीची सळसळ करत पणत्यांमधून वाट काढत आल्या. हातात झक्कूची दुधाची बशी होती. ती पुढ्यात ठेवत झक्कूच्या टाळूवरनं गोजिरवाणा हात फिरवला. त्यानं सफेद कान टवकारला आणि म्यॉव केलं. "घे रे राजा, आज दिवाळीची करंजीची पुरी कुस्करलीये.. घे" त्या त्याच्या टाळूवरुन मानेवर हाताने गोंजारत राहिल्या. लपलप करत भुकेल्या झक्कूनं दिवाळीचा फराळ फस्त केला. बशी सायीसकट चाटून, निरपून खाल्ल्यावर त्यानं बाईंकडे पाहिलं. त्या गोडसं हसल्या. हसताना त्यांच्या डोळ्यांकडेला चुण्यांची गर्दी झाली. ती पाहताना झक्कूला नेहमीच गंमत वाटायची. बाईंनी जिवणी तशीच रुंद ठेवत त्याला थोपटलं. झक्कूनं मिश्या साफ केल्या आणि उठून खिडकीशेजारच्या पाईपजवळ गेला. "हं.. लोळा आता!" अतीव प्रेमानं त्याच्याकडे पाहात बाई बशी घेऊन निघाल्या. अर्धगोल आडवा होताना झक्कूनं डाव्या पंजानं सफेद कान खाजवला आणि जाणार्‍या बाईंकडे पाहत 'म्यँ ऊऊ' केलं..वळून पहात बाई म्हणाल्या, "हो रे सोन्या, दिवाळीच्या शुभेच्छा तुलाही!" दिवाळी डोळ्यात साठवत त्या अंधार्‍या कोपर्‍यात शेपूट पोटाजवळ घेत झक्कू गोल विसावला.

-मानवलकर

***

इ.स. नऊ हजाराव्या शतकातील इ. सहावीच्या 'इतिहास एकविसाव्या शतकाचा' पुस्तकातील पान क्र.४२

त्या काळात नवरात्रानंतर वर्षातला मोठा सण दिवाळी असे. तरी अजून 'दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा' उक्तीवर सांगोपांग विचार कसा झाला नाही हे भूतकाळातले एक आश्चर्य आहे. महामहोपाध्यायांच्या संशोधनावरुन असे समजते की, या काळात 'अस्तीलनस्तील्तेवढेखर्चकरा' या विषाणूची बाधा होऊन खरेदीची साथ यायची. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला उदाहरणार्थ 'मान्सून सेल्स आलाओ' मोहीम असायची. त्याची लस टोचून घेतल्यावरही दर हंगामात काही विशिष्ट वर्ग या साथीला बळी पडल्याच्या बातम्या सापडतात. त्यामुळे दुकानदार व विक्रेते यांच्यासाठी उदाहरणार्थ ग्लुकॉन डी, पारले जी यांचा खप वाढल्याचे पुरावे आहेत. दिवाळी या शब्दाची फोड दिव्य अळी अशी नसून 'दिव्यांची आळी' अशी आहे. त्यावरुनच पुढे आळीपाळीने लागणार्‍या दिव्यांच्या माळा खिडकीत लावण्याची पध्दत रुढ झाली. दिवाळी आणि रांगोळी यांचा परस्परसंबंध यमकापुरताच नसून उदाहरणार्थ रांगेतल्या दिव्यातही आढळतो. दिवाळी हा स्त्रीपुरुषआबालवृध्द श्रीमंत गरीब सर्व जातीपंथीयांनी साजरा करण्याचा उत्सव असे. तेव्हा सारे एकमेकांना खालील श्लोकातून अभिष्टचिंतन करीत असत.
"दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!"

-पेमाडे

***
***

गुलमोहर: 

धन्यवाद सर्वांना!
साजिर्‍या, अरे!! Happy आज मात्र मला चूप केलेस खरं! Happy
नितीन, हो. तेच ते कोसला वाले.
विशाल, मी पानवलकरांचे तेवढे एकच पुस्तक वाचले आहे. "श्री.दा. पानवलकर यांची कथा" नावाचे. त्यांच्याइतके बारीकसारीक तपशील मी आजवर एकाही कथेत वाचले नव्हते.
दिनेशदा, एवढी पोहोच नाही हो अजून, लांबचा पल्ला आहे. Happy
बाकी, ज्यांनी हे लेखक वाचले नाहीत तरीही विडंबन आवडल्याचे सांगितले त्या सर्वांचे मनापासून आभार! आता हे लेखक वाचून(एकेक पान तरी), पुन्हा एकदा हे वाचा, आणखी मजा येईल ही लेखी गॅरंटी! Wink
रच्याकने, किती जणांनी अर्धा 'व' लिहायचा प्रयत्न केला? Proud

पानवलकर तर भयानक जमलय Happy

ज्यांनी ज्यांनी पानवलकर वाचले नसतील त्यांनी वाचणे सोडून द्या Lol

वाचायचा प्रयत्न केला. पण लक्षात आले की आधी ते लेखक थोडे वाचले पाहिजेत. फक्त कोसलाच्या जोरावर किती कळणार Happy

पानवलकर वाचले नसतील त्यांनी वाचणे सोडून द्या >> Lol खरे आहे. मीही आजवर न वाचल्याचा पश्चात्ताप होतो आहे.

फारेंडा, अरे 'थोडे' तर जाऊच देत, पण १-२ पाने वाचली तरी कल्पना येतेच. Proud
अणकुचीदार पिवळ्याधमक चांदण्या अग्रावर घेतलेल्या एकसंध रेषा तीक्ष्ण सुयांसारख्या करकचून डोळ्यात घुसल्या. कोणतीही पूर्वकल्पना न देता दृष्टीपल्याड असलेल्या कुणीतरी अज्ञाताने अचानक धनुष्यातून सोडलेला बाण जसा सप्पकन नजरेसमोर यावा तसं समोरच्या गुदमरलेल्या काळ्या पटलावर क्षणभर काहीतरी चमकून गेलं. पाठोपाठ ढॉप्प असा आवाज होऊन चुरचुर्चुर करत शंभर दीडशे रंगीबेरंगी चांदण्यांनी एकच गलका केला.
>> हे खास पानवलकर आहेत. त्यांच्या उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार नि रुपके यांनी अक्षरशः गरगरायला होते. स्तिमित होऊन माणूस एकच वाक्य पुन्हा पुन्हा वाचत राहतो. झक्कू बोक्यासाठी वापरलेल्या 'गोल विसावला' वगैरेसारख्या साध्या साध्या शब्दसमुहांचेही नवल वाटत राहते. Happy आजच्या लेखकांत क्वचितच सापडेल हे. इथे या ललितात नेमाडे-मनोहरांसारखे 'त्रयस्थ-कोरडे'पणाने लिहिणारे लेखक आणि पानवलकरांसारख्या जागोजागी भाषेच्या फुलबाज्या, रोषणाईचा आभास निर्माण करणारे लेखक, यांचे मस्त काँबिनेशन करून त्याला 'दोन फुल एक हाफ' चा पॅटर्न दिला आहे - हे मला वैशिष्ठ्य वाटले.

आशूडे, माझ्याकडे 'फाँटफ्रीडम' सॉफ्टवेअर आहे. त्यात येतो 'अर्धा व'. त्याच्यासाठी इतके मनोहरली डेस्परेट होऊ नकोस. Proud

माझा झब्बू!!
’अंगणातल्या सडलेल्या पानावरुन वारा एखाद्या अजस्त्र जनावराप्रमाणे सरपटत गेला. कडेच्या निलगिरीच्या झाडातून बगळ्यांच्या शीटाचा कुंद, उग्र दर्प सगळ्या हवेत भरला होता. शांत्ताक्का आपले सुकलेले अंग ओढीत चार पणत्या घेउन बाहेर आल्या. जुनाट पणत्यांवर चिकट बुरा चढला होता आणि कळकट वात त्यात वेटोळे करुन पडली होती. शांत्ताक्काने मोठ्या कष्टाने वाती पेटवायचा प्रयत्न केला, त्याचवेळी वार्‍याने अचानक गिरकी घेऊन जोर पकडला आणि त्वेषाने ज्योत विझवून टाकली. एकदम आघात झाल्याप्रमाणे शांत्ताक्काचे डोळे थिजलेले, निर्जीव बनले. आज दिवाळीचा दिवस दोन पणत्या लावाव्या म्हटले तर हा पटकी झालेला वारा ते ही करु देईना, त्यांनी मनातच वार्‍याला शिव्या मोजल्या आणि तेवढ्यानेही थकवा येऊन त्या मटकन खाली बसल्या. काही फ़राळ करण्याचे त्यांच्या मनात होते पण दादूच्या फ़ाटक्या दुकानात पाउल ठेवायचे धैर्य त्यांच्यात उरले नव्हते. दादूचे ते रक्तपिती झाल्याप्रमाणे दिसणारे ते किरकिरे पोर पाहून त्यांना भडभडून येई.
तेवढ्यात फ़ाटकाचे वृद्ध दार करकरले आणि रमाकांतची आठवण एखाद्या कृष्णसर्पाप्रमाणे फ़णा उगारुन त्यांना डसू लागली. एखादे मलिन जनावर झटकून टाकावे तशी ती आठवण दुर सारण्यासाठी शांत्ताक्का तडफ़डू लागल्या.’
पी.ए. कुलकर्णी.

नविन पिढीतल छान लक्षात राहिल अस लेखन आठवतय फक्त राजन खान यांच. बहुदा मी नाव बरोबर लिहलय. एका दिवाळी अंकातली कथा दोन वर्षांनी जशीच्या तशी लक्षात राहिली आहे. पंचायत आणि त्याचा न्यायनिवाडा एका अत्यंत खाजगी घरगुती प्रश्नावरचा.

Lol सही लिहिलंय आशू.
मी ह्यातला एकही लेखक नीट वाचलेला नाहीये, पण तरीही अंदाज आला आणि वाचायला मजा आली.

आगाऊ, Lol सहीये..

पानवलकर वाचले नसतील त्यांनी वाचणे सोडून द्या >>:हाहा: सौ प्रतिशत सच और सच कहा है आपने असामी!
मनोहरली डेस्परेट >> Lol साजिर्‍या, तुझ्यामुळे मी पानवलकर वाचले म्हणून तुला स्पेशल धन्यवाद. आणि तू वर लिहीलेस ते दोन फुल एक हाफ माझ्या लिहीतानाही लक्षात आले नव्हते. पुन्हा एकदा धन्स. Happy
आगाऊ, मस्त रे! सहीच.
नितीन, नुसता अर्ध्या वाटीचा व हवाय हो त्याला जोडून काही नको, असो. साजिरा देतोय.
बाकी सर्वांनाही धन्यवाद. रैनाला अनुमोदन. येऊ द्या झब्बू. मस्त दिवाळी करु. Happy

आगाऊ, झब्बु मस्तच जमलाय!
तेवढ्यात फ़ाटकाचे वृद्ध दार करकरले आणि रमाकांतची आठवण एखाद्या कृष्णसर्पाप्रमाणे फ़णा उगारुन त्यांना डसू लागली. एखादे मलिन जनावर झटकून टाकावे तशी ती आठवण दुर सारण्यासाठी शांत्ताक्का तडफ़डू लागल्या.>> फर्मास!

झब्बु नं दोन!! Proud
सक्काळी सक्काळी सोप्यातल्या तक्क्याला टेकून नुसते बसून राहणे माझ्या जीवावर आले होते पण सैपाकघरात जाणे शक्य नव्हते. तिथे आज्जीची ’हातघाई’ची काय ती म्हणतात ती तयारी चालली होती. ऊठल्याउठल्याच तीने मला बजावले होते, ’लंप्या मला आज खूप कामे आहेत, तुझी आई येणार आहे, फ़राळ राहिला आहे, जर आत लुडबूड केलीस तर काय म्हणतात ना त्यातलॊ गत होईल, इथे सगळी कामे मलाच करावी लागतात, घरातील विद्वानांना ज्ञानदिवे पाजळण्याशिवाय काही येत नाही त्यात तुझी भर नको.’ बाबूरावला तीने आधीच सत्राशेसाठ गोष्टींची यादी देउन किट्टापाच्या दुकानी धाडला होता. ’लंपूशेट दिवाळी म्हंजे कामाची धांदल, तुम्हाला नाई कळायचे ते, तुमची मजा आहे’ असे मला ऐकवून तो जो गायब झाला तो अजुनी आलेला नव्हता.
एवढ्यात फ़ाटकातून कणबर्गी गंग्या आणि परळ्या आत आले. त्यांच्या हातात टोपण्णवार मास्तरांच्या लेंग्यासारखी ’विस्तृत’ का काय ती अशी पिशवी होती आणि त्यातून एकशेएकूण्पन्नास प्रकारचे रंगीत कागद डोकावत होते. ’लंप्या नुसतं बसून र्हायलाय बग बे’ परळ्या बोलला. त्यांनी सोप्यावर ती पिशवी उलटी केली आणि ’आमच्या घरातले तितं कंदिल करु दी नात म्हणून तुझ्याकडं जाउ म्हणून आलो बगं’ असे म्हणून खाली बसले.
- आकाश रामायण पंत

मला फक्त नेमाडे लक्षात आले, मस्त जमलेत !! बाकी मनोहर अन पानवलकरांचे माझे वाचन इल्ला !
आगावाचे झब्बू एकदम झक्कास!! Happy

पानवलकर ग्रेटच जमलेत. श्याम मनोहरपण. नेमाडे तेव्हडे जरा वाढव. डायरी येउदे, संस्कृती येउदे. मग इतिहास Proud

फुलबाजी क्षणभरासाठीच चमकते आणि मग प्राक्तनच असल्याप्रमाणे विझून जाते. लग्नाची बायको पण फुलबाजीसारखीच असते. पत्नि ही क्षणभराची चकमक आणि अनंतकाळची विझलेली फुलबाजी असते. - झोपूनजा.

त.टी.:
सूर्य, औदुंबर हे पानवलकरांचे दोन कथासंग्रह. तसेच उपरोल्लेखीत 'पानवलकरांच्या कथा' हा एक संपादित संग्रह आहे (तो साजिर्‍याकडे आहे Proud एकच कॉपी होती प्रदर्शनात ती ह्या बेट्याच्या हाती लागली)

मस्त जमलंय Happy
मज्जा आली वाचताना.. खूप हसले.

माझा एक जुनाच लेख झब्बु देते 'पेमाडे'ला !

पत्नि ही क्षणभराची चकमक आणि अनंतकाळची विझलेली फुलबाजी असते>>> यक ! टण्या, मेल्या, निषेध ! Proud

साजिर्‍या, पुस्तक पायजेल. लापि. लापि. बाकीच्यांनी माझ्यामागे रांग लावा Proud

आगाऊ- भारी Lol

Pages