पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !

Submitted by मितान on 27 October, 2010 - 10:02

आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ?

पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात.

" मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार "

" मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? "

" वादळात भरकटणार्‍यांना कोणतीच दिशा नसते. पण वादळाला दिशा देणार्‍यांची वादळंच वाट पाहात असतं "

" पाटणकरांच्या कविता मला तरी अश्लीलतेचे उदात्तिकरण करणार्‍या वाटतात. तुला का आवडतात त्या ? "

" उदगीरचे शिबीर छानच झाले. १३० प्रशिक्षार्थी संख्या होती. समारोप आणि संचलन जोरदार "

" प्रेमात पडलेय मी मायडे, आज कळाले कोवलनास्तव कण्णगिचे ते तिळतिळ तुटणे, दक्षाच्या यज्ञात सतीचे शिवशंभूस्तव विलीन होणे "

" माइ, मागच्या महिन्यात बापाला नेला पोलिसानी. पारध्याचं जिणं पापंच अस्तंय का गं ! "

" माया, बौद्धिकांच्या विषयांची यादी पाठवत आहे. वक्ते शोधून आमंत्रणं पाठवावीत."

" तुझ्याचसारखा जोडीदार मिळाल्याबद्दल अभिनंदन मायाताई, संसाराची घडी नीट बसली की पुन्हा कार्यात नव्या जोमाने उतराल याची खात्री आहे, शुभचिंतन"

" तुझ्यासारखी तरूण मुलगी मला पत्र लिहिते हे पांढर्‍या केसांचं महात्म्य समजू का ? "

" तुम्ही बुद्धट ( बुद्धिमान उद्धट ) बनत चालला आहात याची कल्पना तुम्हाला असेलच असे मी गृहीत धरते."

" शिक्षणसंस्थेचे महत्त्व पटावे असे काहीच गेल्या वर्षभरात घडले नाही. तरीही शेवटचे वर्ष म्हणून खर्डेघाशी का करावी ? "

" घरच्यांनी कमी मार्क्स मिळाल्याचं खापर आपल्या कामावर फोडलं होतं. बघा म्हणावं आता, विद्यापीठात तिसरी आले गं ! "

किती वेगवेगळे विषय, किती वेगवेगळी माणसं ! या सर्वांशी मी जोडलेली होते फक्त पत्र या माध्यमातून.
महिन्याला साधारण ४० पत्रांची आवकजावक. आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देणे, पत्रांवर क्रमांक घालून नीट फाईल करणे, साधी पोस्टकार्ड पण मार्जिन आणि दिनांक वगैरे घालून नीटनेटकी ठेवणे हा जणू छंद झाला होता. दिवसभर कॉलेज, मित्रमैत्रिणींसोबत दंगा, संघटनेचे कार्यक्रम, घरी आल्यावर घरकाम, टी व्ही, अभ्यास हे सगळे झाल्यवर मी खास माझ्या पत्रविश्वात जायची. अगदी जवळच्या मैत्रिणींच्या पत्रांची पारायणं व्हायची. लांबलचक उत्तरे लिहून व्हायची, पत्रांमधून अंगावर पडलेली कामं करण्याच्या योजना कागदावर उतरायच्या आणि मग शांत डोक्याने झोप.
पुढे स्वतःचे लग्नही पत्रातून ठरवले. पत्रांच्या संख्येत वाढ !

अगदी पाचवीत असल्यापासून मी पत्र लिहायची. त्यामुळेच कदाचित पत्र हे व्यक्त होण्यासाठीचे माझ्यापुरते सर्वोत्तम माध्यम बनत गेले. जिवाभावाच्या सख्यांशी आणि सख्याशी रोजचा फोन संवाद शक्यच नव्हता. मग त्यांच्याशी जे काही शेअर करावे वाटेल ते डायरीत पत्र लिहून ठेवत असे. जेव्हा भेट होई तेव्हा या डायर्‍यांची अदलाबदल ! आमची नाती या डायर्‍यांमधल्या पत्रांनी मजबूत केली. या पत्रांनी विचारांचा पाया मजबूत केला. स्वतःला जे वाटतंय ते दुसरीला किंवा दुसर्‍यालाही तसंच वाटतं हे कारण आत्मविश्वास वाढविण्यासाठी फार मोठे होते. संघटनेच्या कामाबाबत ज्या काही शंका असत त्यांना उत्तरं पत्रातून मिळत असत. एकेक गोष्ट, जिला तत्त्व म्हणता येईल ती अगदी घासूनपुसून लखलखीत झाल्याशिवाय स्वीकारताच यायची नाही. मला कसं जगायचं आहे, भविष्यात काय करायचं आहे याची रूपरेषा या पत्रांमधून होणार्‍या चर्चांमधून ठरत गेली. अगदी प्रत्यक्ष भेटीत होणारे आततायी वादविवाद पत्र सांभाळून घेत असे. स्वतःची भूमिका लिहून पाठवणे यात खूप संयम आपोआप येतो. कुणाला दुखवायचं असलं तरी आणि मलमपट्टी करण्यासाठीही पत्राएवढं प्रभावी माध्यम नाही. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत वेगवेगळ्या भेटीत जोडली गेलेली नाती या पत्रांने टिकवली. माणसं समजावली. अपेक्षा, अपेक्षाभंग आणि अपेक्षापूर्ती म्हणजे काय हे शिकविले. स्वतःच्या भावना ओळखायला पत्रांनी शिकविले. मनातल्या विचारांना पत्रातून वाहून दिलं की कसं बरं वाटायचं. समोरची व्यक्ती माझं म्हणणं नक्की ऐकून, समजून घेईल ही खात्री असायची. मला तुझ्या सल्ल्याची गरज आहे, मार्गदर्शन हवे आहे हे सरळ सांगता यायचे.

आज कितीतरी दिवसांनी ती पत्रं आठवली. एका पेटीत नीट गठ्ठे करून ठेवलेला माझा खजिना ! पत्रातून जोडले गेलेले सगळे लोक आजही माझेच आहेत. अधुनमधून ओर्कुट, फेसबुक वर भेटतातही, पण त्या भेटीत काहीतरी कमतरता असते. मेलमध्येही ती निखळता नाहीच. वीज नसतानाही मनातले कागदावर उतरवण्याची अधीरता म्हणून मेणबत्तीच्या प्रकाशात लिहिलेली निळ्या अंतर्देशीय पत्रावरची गडद निळ्या शाईतली पत्रं, पत्रात वाद घालताना आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ उतरवलेले पुस्तकातले उतारेच्या उतारे किती समृद्ध करून गेले, एका मैत्रिणीला मेघदूत हवं म्हणून बोरकरांनी अनुवादित केलेलं समश्लोकी समवृत्ती मेघदूत मी हस्ताक्षरात लिहून पाठवलं होतं आणि त्या लेखनाने मला किती आनंद दिला होता !, वयाने, अनुभवाने मोठ्या व्यक्तींनी कानउघाडणी करणारी पत्रं पाठवल्यावर ती पचवायला किती कागद खर्ची घातले होते ! माझे मी लग्न ठरवले हे घरात सांगितल्यावर उसळलेला भावनिक कल्लोळ घरातल्या घरात मी-बाबा, बाबा-मी, मी- आई अशी पत्रापत्री होऊन शांत झाला होता. सासूशी झालेले मतभेद पत्राने उलगडले होते, नवर्‍याशी सुरुवातीला होणारी भांडणं पत्रातून मिटली होती, परदेशात आलेले एका मित्राचे पत्र हे हजार मेल पेक्षा मोलाचे वाटले होते...

मग आता काय झाले ? पाडगांवकर म्हणतात,
पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा
पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !
ते उमगलेलं असतानाही पत्र का नाही लिहून होत ? विचारांचं ओझं होतंच, काळज्या हैराण करतातच, अगदी काधीतरी आनंदही गुदमरून टाकतो पण ही सगळी ओझी वाटून नाही घेता येत. एखाद्या तात्विक मुद्द्यावर २४-२४ पत्रं लिहून काथ्याकूट केलेल्या मनाला आज त्याची गरजच वाटत नाही. हा आळस आहे की संवेदनशीलता कमी होतेय? स्वतः व्यक्त होण्यात कमीपणा वाटतोय की समोरच्या व्यक्तीने समजून घेतले नाही तर ही भिती वाटतेय ? कदाचित मनाचा हा संरक्षक पवित्रा असावा. मनाच्या गावातले तेव्हाचे सगळे लोक आपलेच आहेत ही समजूत जपायचा हा एक अट्टहास असावा का ?
एकदा स्वतःला पत्र लिहून विचारलं पाहिजे ! पत्रांच्या गावात लवकरच एक फेरफटकाही मारला पाहिजे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मितान मस्त लिहील आहेस. Happy खुप आवडलं.
खरच मी पण विसरलेच होते पत्र लिखाण. कॉलेज मधे असताना मी आठवड्याला दोन चार पत्र लिहायचे आणि मला पण दोन चार पत्र यायची मित्र मैत्रिणींचीच. ते पोस्टमन काका मला कुठेही बघितलं की हसुन दाखवायचे आणि आज पत्र टाकलेय/ आज काहीच आलं नाही असं सांगायचे. मग काही आलं असेल तर कधी एकदा जाऊन वाचते असं व्हायचं. ते सगळे दिवस आठवले. Happy
तेव्हाच एका मैत्रिणीने "अगं तुला माहीतेय कॉम्प्युटरवरनं पण पत्र पाठवता येतात असं दादा म्हणालाय. मी पाठवणारे त्याला पत्र." असं सांगितल्यावर कसलं आश्चर्य वाटलेलं. तेव्हा ते कॉम्प्युटरच पत्र हस्तलिखित पत्रांना नामोशेष करतील असं वाटलं देखील नव्हतं.

जिवाभावाची पत्र लै लिहीली बाई, पण जिवाभावाच्या इमेल्स अजून लिहीता येत नाहीत.
रच्याकने- मराठी भाषा दिवसा निमीत्ताने भरवलेले पत्रसंमेलन जरुर पहा मायबोलीवरचे. Happy

छान
मला लहानपणीची गोष्ट आठवते त्यावेळेस पत्र लिहायची खुप आवड होती म्हणुन जुनी पत्रे घेवुन त्यावरील मजकुर पाण्याने खोडुन शिक्का खोडुन मग पुन्हा लिहीली
आत्याला दंडही पडला

मितान, छान लिहिले आहेस.

पत्रापासुन ई-पत्र हा प्रवास हा instant gratification मुळे सहज होतो. दिव्य हस्ताक्षरांचा पण हात असु शकेल. पैस्यांचाही संबंध आहे का असे एखादवेळेस वाटते, पण तो नसणार हे लगेच लक्षात येते. आपला वेळ देखिल जास्त गोष्टींमध्ये विभागलेला असतो आजकाल. ई-मेल ने सुद्धा चांगला संवाद होऊ शकतो.

पण पत्रांचे विश्व वेगळे होते हे खरे. माझा अनेक विदेशी रेडीओ स्टेशन्सशी पत्रव्यवहार होता (मी DXing करायचो). रोज एखादातरी लिफाफा यायचा. कधिकधि त्यांचे spelling चुकायचे. असे एखादे पत्र गहाळ होऊ नये म्हणुन स्वतःलाच पत्त्याचे ईकडचे तिकडचे भाग गाळुन पोस्टल ऑफीसचे "कंडीशनींग" करायचो.

मी ३-४ वेगवेगळ्या गावांम्धील शाळांमध्ये शिकलो. तिथल्या वर्गमित्रांबरोबर असलेल्या पत्रव्यवहारामुळेच आता त्यातील अनेक लोक search/facebook इत्यादी द्वारे भेटतात. दोन महिन्यांपुर्वी अशाच एका मित्राला जवळजवळ ३० वर्षांनी भेटलो.

जुन्या पत्रांचे गठ्ठे कधितरी पुस्तकरुपाने प्रसिद्ध करायचे आहेत. दर १०-१५ पत्रांमागे प्रसिद्ध करण्याजोगे एखादे पान, उतारा किंवा संदर्भ मिळायला हरकत नाही.

मस्तच लिहिलयस मितान..
खुप जुनी होस्टेल ला असताना ची पत्रं घरची, मैत्रिणींची, आठवली.. तेंव्हा छान ही वाटायचं आणि मन भरुनही यायचं
एकदम जुन्या दिवसात गेले तुझा लेख वाचुन..
खुप दिवसात खरच कोणाचं पत्र आलं नाही की मी कोणाला लिहिलं नाही.. आता लिहिन एखादं तरी...
Happy

खुप छान लिहिलंयस मितान Happy
तुला आलेल्या पत्रांमधून तुझ्या स्वभावाचा अंदाज आला... एवढ्या मनमोकळेपणाने तुझ्याशी शेअरींग झालंय, म्हणजे तू खरंच मैत्रीण म्हणून मस्त असावीस.... Happy
मी आई वडिलांपासून दूर राहते, त्यामुळे आम्ही सतत एकमेकांशी नेट, फोन वरून संपर्कात असतो, तरीही एकमेकांना आवर्जून पत्र पाठवतो. खास पत्रासाठी म्हणून मी काही गोष्टी बोलायच्या राखून ठेवते... खरंच, पत्राची सर बाकी कशालाही नाही... इ-मेलमुळे आपण ह्या फार मोठ्या आनंदाला मुकत चाललो आहोत दिवसेंदिवस...

छान लिहीलय. जुनी पत्रं मिळाली की आपण इतकी ४-५ पाने भरुन पत्र कशी लिहायचो याचे आता आश्चर्य वाटते, आता कोणाला वैयक्तिक इमेल करायची म्हटले तरी ३-४ ओळींच्यापुढे मजकुर सुचत नाही.
मायबोलीवर मराठी भाषा दिनानिमीत्त घेतलेला पत्र उपक्रम - सप्रेम नमस्कार.

सुंदर लिहिलं आहेस मितान नेहमीप्रमाणेच.
माझ्याकडे आहेत काही जुनी पत्रं. चांगली आठ दहा पानी. मजा येते मधेच कधीतरी वाचायला.

रूनी, आजकाल फोन, मेल्स, चॅटिन्ग, इ. मुळे संपर्क खुपच वाढला आहे, दूर असुनदेखील लोक दूर वाटत नाहीत, सतत काहीना काही माहितीची देवाणघेवाण चालू असते, त्यामुळे मेल्समधे सतत वेगळे काय लिहिणार हा प्रश्न पडतो. तसेच अनेक तथाकथित सुधारणांमूळे पुर्वीचा जिव्हाळा, आत्मियता लोप पावत चालली आहे. आजकालच्या पिढ्यांमधे पुर्वीएवढी नात्यांमधली ओढ राहिली आहे का ?

मितान अप्रतिम आहे सार लेखन. पत्र लेखन आणि त्याच्या गतस्मृतीमधे व्यग्र होणे ही कल्पनाच खुप छान आहे.

१२ फेब्रुवारीला आम्ही १९७९ ते १९८२ मधे एकत्र शिकलेले मित्र मैत्रीणी एकत्र भेटलो. त्याकाळात लिहलेली पत्र पुन्हा वाचली त्या काळात काढलेले कृष्ण धवल फोटो पाहिले. हा आनंदच काही वेगळा होता.

मितान.. शेवटच्या परिच्छेदातील तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न..
हा आळस नाही की असंवेदनशीलताही नाही.. स्वतः व्यक्त होण्यातला कमीपणा नाही की समोरच्या व्यक्तीने समजून घेतले नाही तर वाटणारी भितीही नाही.. मनाचा हा संरक्षक पवित्राही नाही.... अनेक वर्ष एखाद्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करताना येणारे अनुभव आपले व्यक्तिमत्व घडवीत असतात.. आपल्या नकळत आपले अंतर्मन या सार्‍याची नोंद ठेवत असते.. या प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या विचारात होणारे काही बदल आपल्यालाही कळत नाहीत... ही प्रगल्भता नकळतपणे आपल्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करते... पूर्वीच्या अनेक गोष्टीतील रस नंतर कमी होतो कारण एकतर त्यातील व्यर्थतेची नोंद आपल्या अंतर्मनाने आपल्या नकळत कायम केलेली असते किंवा ते त्यापेक्षा अधिक प्रभावी माध्यमाच्या शोधात असते... त्यामुळे इच्छा होऊनही पूर्वीच्या अनेक गोष्टी आपल्या हातून नंतर होत नाहीत.. काहीवेळा आपल्याला पहिल्यापेक्षा अधिक समाधान देणारे मार्ग मधल्या काळात सापडलेले असतात किंवा पूर्विच्या छंदांकडे लक्ष देण्याइतकी मानसिक उसंत आपल्याकडे नसते.. त्यामुळे इच्छा होऊनही त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात आणू शकत नाही... तुम्ही स्वतः शोध घेण्याचा प्रयत्न करुन बघा.... नक्की उत्तर सापडेल...

फार छान लिहीलंय मितान Happy

मलाही पत्रं लिहायला फार आवडतं. सध्या लिहीलं जात नाही, पण तीन वेळा पत्रं लिहील्याचं आठवलं हे वाचून : -
१. ८ वीत एन सी सी कँपला दुसर्‍या गावी गेल्यावर. (८ दिवस गेलो होतो... )
--- > घरातले सगळे कसे आहेत वगैरे नावासकट चौकशी केली होती.
२. माझा एकदम खास मित्र १० वी म्हणुन आमची शाळा सोडून दुसर्‍या मोठ्या गावी गेला. त्याची फार आठवण यायची. बरोबर असताना त्याला फार चिडवायचो, 'ते उगाचच करायचो..' वगैरे वाटून त्याला 'सॉरी रे.. उगाच चिडवायचो तुला... माफ कर वगैरे... लय सेंटी पत्रं लिहीली होती. तोही मस्त सेंटी उत्तरं द्यायचा.
३. कॉलेजात गेल्यावरही, घरी गाडी असुनही 'अजुन १८ पुर्ण झालं नाही, या एकाच कारणापोटी गाडी देत नाहीत..' म्हणुन घरच्यांशी भांडण...

आज हे सगळं आठवुन खुप हसलो Happy

ही कविता माहिती असेलच सगळ्यान्ना.. पण लेख वाचुन रहावत नाहीये म्हणुन टाकतेय... खूप जास्त सुन्दर लेख.. अगदी जुन्या आठवणी जाग्या करणारा.. आता पत्र लिहिलच पाहिजे अस वाटायला लावणारा.. Happy

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशान्च्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे.

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलान्टीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिन्दूतून

शब्दामधूनी नको पाठवू अक्ष्ररामधले अधीरे स्पन्दन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कम्प विलक्शण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सान्गीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मीळ्ते
पत्र त्या नन्तरचे मग वाचायाचे राहून जाते-
-इंदिरा संत

http://merakuchhsaman.blogspot.com/

छान. हल्ली कुणी इ-मेलही पाठवत नाही तर पत्र फार लांबची गोष्ट.
काही दिवसांपूर्वी नवीन घरात शिफ्ट झालो तेव्हा पत्त्यावर पत्र येते की नाही हे बघण्यासाठी मीच मला एक पोष्टकार्ड टाकले. आणखी मजा यावी म्हणून पत्र इटालियनमध्ये लिहीले. मस्त वाटले मिळाल्यावर. Happy
त्याच्या जोडीने घेतलेले पोष्टकार्ड तसेच टेबलावर पडून आहे. कुणाला पाठवणार? कुणाचाही पोष्टल पत्ता नाहिये. सगळ्यांचे फेसबुक, बझ, ट्विटर, आयडी आणि मोबाईल आहेत.

Pages