पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !

Submitted by मितान on 27 October, 2010 - 10:02

आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ?

पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात.

" मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार "

" मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? "

" वादळात भरकटणार्‍यांना कोणतीच दिशा नसते. पण वादळाला दिशा देणार्‍यांची वादळंच वाट पाहात असतं "

" पाटणकरांच्या कविता मला तरी अश्लीलतेचे उदात्तिकरण करणार्‍या वाटतात. तुला का आवडतात त्या ? "

" उदगीरचे शिबीर छानच झाले. १३० प्रशिक्षार्थी संख्या होती. समारोप आणि संचलन जोरदार "

" प्रेमात पडलेय मी मायडे, आज कळाले कोवलनास्तव कण्णगिचे ते तिळतिळ तुटणे, दक्षाच्या यज्ञात सतीचे शिवशंभूस्तव विलीन होणे "

" माइ, मागच्या महिन्यात बापाला नेला पोलिसानी. पारध्याचं जिणं पापंच अस्तंय का गं ! "

" माया, बौद्धिकांच्या विषयांची यादी पाठवत आहे. वक्ते शोधून आमंत्रणं पाठवावीत."

" तुझ्याचसारखा जोडीदार मिळाल्याबद्दल अभिनंदन मायाताई, संसाराची घडी नीट बसली की पुन्हा कार्यात नव्या जोमाने उतराल याची खात्री आहे, शुभचिंतन"

" तुझ्यासारखी तरूण मुलगी मला पत्र लिहिते हे पांढर्‍या केसांचं महात्म्य समजू का ? "

" तुम्ही बुद्धट ( बुद्धिमान उद्धट ) बनत चालला आहात याची कल्पना तुम्हाला असेलच असे मी गृहीत धरते."

" शिक्षणसंस्थेचे महत्त्व पटावे असे काहीच गेल्या वर्षभरात घडले नाही. तरीही शेवटचे वर्ष म्हणून खर्डेघाशी का करावी ? "

" घरच्यांनी कमी मार्क्स मिळाल्याचं खापर आपल्या कामावर फोडलं होतं. बघा म्हणावं आता, विद्यापीठात तिसरी आले गं ! "

किती वेगवेगळे विषय, किती वेगवेगळी माणसं ! या सर्वांशी मी जोडलेली होते फक्त पत्र या माध्यमातून.
महिन्याला साधारण ४० पत्रांची आवकजावक. आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देणे, पत्रांवर क्रमांक घालून नीट फाईल करणे, साधी पोस्टकार्ड पण मार्जिन आणि दिनांक वगैरे घालून नीटनेटकी ठेवणे हा जणू छंद झाला होता. दिवसभर कॉलेज, मित्रमैत्रिणींसोबत दंगा, संघटनेचे कार्यक्रम, घरी आल्यावर घरकाम, टी व्ही, अभ्यास हे सगळे झाल्यवर मी खास माझ्या पत्रविश्वात जायची. अगदी जवळच्या मैत्रिणींच्या पत्रांची पारायणं व्हायची. लांबलचक उत्तरे लिहून व्हायची, पत्रांमधून अंगावर पडलेली कामं करण्याच्या योजना कागदावर उतरायच्या आणि मग शांत डोक्याने झोप.
पुढे स्वतःचे लग्नही पत्रातून ठरवले. पत्रांच्या संख्येत वाढ !

अगदी पाचवीत असल्यापासून मी पत्र लिहायची. त्यामुळेच कदाचित पत्र हे व्यक्त होण्यासाठीचे माझ्यापुरते सर्वोत्तम माध्यम बनत गेले. जिवाभावाच्या सख्यांशी आणि सख्याशी रोजचा फोन संवाद शक्यच नव्हता. मग त्यांच्याशी जे काही शेअर करावे वाटेल ते डायरीत पत्र लिहून ठेवत असे. जेव्हा भेट होई तेव्हा या डायर्‍यांची अदलाबदल ! आमची नाती या डायर्‍यांमधल्या पत्रांनी मजबूत केली. या पत्रांनी विचारांचा पाया मजबूत केला. स्वतःला जे वाटतंय ते दुसरीला किंवा दुसर्‍यालाही तसंच वाटतं हे कारण आत्मविश्वास वाढविण्यासाठी फार मोठे होते. संघटनेच्या कामाबाबत ज्या काही शंका असत त्यांना उत्तरं पत्रातून मिळत असत. एकेक गोष्ट, जिला तत्त्व म्हणता येईल ती अगदी घासूनपुसून लखलखीत झाल्याशिवाय स्वीकारताच यायची नाही. मला कसं जगायचं आहे, भविष्यात काय करायचं आहे याची रूपरेषा या पत्रांमधून होणार्‍या चर्चांमधून ठरत गेली. अगदी प्रत्यक्ष भेटीत होणारे आततायी वादविवाद पत्र सांभाळून घेत असे. स्वतःची भूमिका लिहून पाठवणे यात खूप संयम आपोआप येतो. कुणाला दुखवायचं असलं तरी आणि मलमपट्टी करण्यासाठीही पत्राएवढं प्रभावी माध्यम नाही. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत वेगवेगळ्या भेटीत जोडली गेलेली नाती या पत्रांने टिकवली. माणसं समजावली. अपेक्षा, अपेक्षाभंग आणि अपेक्षापूर्ती म्हणजे काय हे शिकविले. स्वतःच्या भावना ओळखायला पत्रांनी शिकविले. मनातल्या विचारांना पत्रातून वाहून दिलं की कसं बरं वाटायचं. समोरची व्यक्ती माझं म्हणणं नक्की ऐकून, समजून घेईल ही खात्री असायची. मला तुझ्या सल्ल्याची गरज आहे, मार्गदर्शन हवे आहे हे सरळ सांगता यायचे.

आज कितीतरी दिवसांनी ती पत्रं आठवली. एका पेटीत नीट गठ्ठे करून ठेवलेला माझा खजिना ! पत्रातून जोडले गेलेले सगळे लोक आजही माझेच आहेत. अधुनमधून ओर्कुट, फेसबुक वर भेटतातही, पण त्या भेटीत काहीतरी कमतरता असते. मेलमध्येही ती निखळता नाहीच. वीज नसतानाही मनातले कागदावर उतरवण्याची अधीरता म्हणून मेणबत्तीच्या प्रकाशात लिहिलेली निळ्या अंतर्देशीय पत्रावरची गडद निळ्या शाईतली पत्रं, पत्रात वाद घालताना आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ उतरवलेले पुस्तकातले उतारेच्या उतारे किती समृद्ध करून गेले, एका मैत्रिणीला मेघदूत हवं म्हणून बोरकरांनी अनुवादित केलेलं समश्लोकी समवृत्ती मेघदूत मी हस्ताक्षरात लिहून पाठवलं होतं आणि त्या लेखनाने मला किती आनंद दिला होता !, वयाने, अनुभवाने मोठ्या व्यक्तींनी कानउघाडणी करणारी पत्रं पाठवल्यावर ती पचवायला किती कागद खर्ची घातले होते ! माझे मी लग्न ठरवले हे घरात सांगितल्यावर उसळलेला भावनिक कल्लोळ घरातल्या घरात मी-बाबा, बाबा-मी, मी- आई अशी पत्रापत्री होऊन शांत झाला होता. सासूशी झालेले मतभेद पत्राने उलगडले होते, नवर्‍याशी सुरुवातीला होणारी भांडणं पत्रातून मिटली होती, परदेशात आलेले एका मित्राचे पत्र हे हजार मेल पेक्षा मोलाचे वाटले होते...

मग आता काय झाले ? पाडगांवकर म्हणतात,
पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा
पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !
ते उमगलेलं असतानाही पत्र का नाही लिहून होत ? विचारांचं ओझं होतंच, काळज्या हैराण करतातच, अगदी काधीतरी आनंदही गुदमरून टाकतो पण ही सगळी ओझी वाटून नाही घेता येत. एखाद्या तात्विक मुद्द्यावर २४-२४ पत्रं लिहून काथ्याकूट केलेल्या मनाला आज त्याची गरजच वाटत नाही. हा आळस आहे की संवेदनशीलता कमी होतेय? स्वतः व्यक्त होण्यात कमीपणा वाटतोय की समोरच्या व्यक्तीने समजून घेतले नाही तर ही भिती वाटतेय ? कदाचित मनाचा हा संरक्षक पवित्रा असावा. मनाच्या गावातले तेव्हाचे सगळे लोक आपलेच आहेत ही समजूत जपायचा हा एक अट्टहास असावा का ?
एकदा स्वतःला पत्र लिहून विचारलं पाहिजे ! पत्रांच्या गावात लवकरच एक फेरफटकाही मारला पाहिजे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मितान, खरय पुर्वीची पत्रातली मजा वेगळीच होती. माझ्या लहानपणी आम्ही जपून ठेवलेली नातेवाईकांची पत्रे घर बदलण्याच्या नादात हरवली तेव्हा कोणी काळिज कापून नेल्यासारखे वाटले होते.
आपला पत्ता कळवा, पत्र पाठवायला आवडेल.

छान लेख. मी पण आत्ता आत्ता पर्यंत सगळी पत्र जपून ठेवली होती. (त्यात काहि मायबोलीकरांची पण होती. ) अजून असतील, घरी गेल्यावर शोधायला हवीत.
आमच्या अजाण वयात तर पत्रमैत्रीचे भारीच फॅड होते. त्या काळात अनेक देशांतील मित्रमैत्रिणी जोडल्या होत्या.

सुंदर लिहीलय. मी पण भुतकाळात गेले Happy पोस्ट कार्ड लिहिताना एकही काना कोपरा न सोडणे, नवीन नवीन डिझाईनचे लेटरपॅड शोधणे, त्यावर लावायला स्टिकर्स Happy . कॉलेजमधे असताना रोज पोस्टमनची वाट पहाणे.
मस्त लिहिलय Happy

मितान खूप सुरेख लिहिलं आहेस गं. तो शेवटचा आख्खा पॅरा खूप सुंदर उतरलाय.

मैत्रिणीसाठी डायरी लिहून ठेवायची आयडिया आवडली.

आजकाल फक्त कुठल्या तरी लग्नाच्या, मुंजीच्या पत्रिका, टेलिफोनची, वीजेची बील, आणि क्रेडीट कार्डांची स्टेटमेंट्स एवढ्याच गोष्टी पत्रपेटीत बघायला मिळतात... पोस्टकार्ड, अंतरदेशीय पत्रे कालबाह्य झाल्यासारखे वाटायला लागलय.. कालच घरात एक नविन पोस्टकार्ड आलेलं बघितलं.. होतं काय तर बँकेच्या निवडणूकीच एका उमेदवारानी केलेल्या प्रचाराचं पत्र... जवळपास इनलॅण्डचा मजकूर एका पोस्टकार्डात बसवला होता..
माझे एक काका आजोबा अशीच पत्र पाठवायचे.. पोस्टकार्डावरचा मूळ रंग शोधायला लागायचा कारण एकाच पत्रात अनेक विषय तर असायचेच पण कुठल्यातरी विषयाला धरून एखादी कविताही मिळायची... त्यांची आलेली जुनी पत्र शोधायला पाहिजेत आता...

खूप नेमकं आणि छान लिहिलंय. << हा आळस आहे की संवेदनशीलता कमी होतेय? >> अगदी नेमका प्रश्न. पत्रांची गोडी अवीट असते. तुमच्यासारखीच मीही जुनी पत्रे जपून ठेवली आहेत. वाचताना नॉस्टॅल्जिक व्हायला होतं !

मितान छान लेख गं.

तुझ्या लेखात भोसला मिलेटरी स्कूलचा उल्लेख आलाय. मी तिथे विंटर कॅम्प करत असताना घरी भरपूर म्हणजे दिवसाला एक या रेटनी पत्र पाठवली आहेत. त्यातले एक तर आरशात न बघता मिरर इमेजमध्ये लिहिले होते.

मितान... मस्तच लेखन Happy

अधुनमधून ओर्कुट, फेसबुक वर भेटतातही, पण त्या भेटीत काहीतरी कमतरता असते. मेलमध्येही ती निखळता नाहीच >> खरय.. मी काहि जास्त पत्र लिहीली नाहीत.. पण मित्राशी एक वर्षे पत्रव्यवहार केला.. नि खरच तेव्हाची मजा काहि औरच !!

सर्वांचे मनापासून आभार.
महेश, पत्ता कळवते Happy
दिनेशदा, तुम्ही तुमच्या काळात पत्रमैत्रीचं वेड होतं असं म्हणताय.. मी हे १२ वर्षांपूर्वीचं लिहिलंय. आज अनेक शाळांमधून पत्रमैत्री हा एक उपक्रम असतो आणि मुलांना तो अफाट आवदतो हे ही मी पाहिलय.
प्रीती, अगदी डिट्टो Happy सुंदर कागद आणि पेन या आजही माझ्या फार फार लाडक्या वस्तू आहेत. आजही लहान मुलांसारखी मी वेगवेगळ्या डायर्‍या नि लेटरपॅड नि शाईपेनं जमवते Wink
शैलजा, सिण्डी,हिमस्कूल, सुरेखा,एक फूल्,ऊर्मी, रुणुझुणू,मामी, स्वाती, स्वाती२,ज्योति, चिंगी, यो रॉक्स, तुमच्या अशा छान छान प्रतिक्रीयांमुळे अजून लिहायला हुरूप येतो. Happy

इथे पत्रमैत्री क्लब काढावा काय ?

धन्यवाद मितान,
मी शाळेत असताना नागपुरच्या एका माझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलाबरोबर पत्रमैत्री चालू केली होती. दुर्दैवाने आता तर त्याचे नावही आठवत नाही. आणि सारीच पत्रे हरवल्यामुळे आता काहीच शिल्लक नाहीये.

मस्तच ग मितान! मी पण मला आलेली शाळेपासुनची सगळी पत्र अशीच जपुन ठेवल्येत Happy
ओर्कुटवर येतात ते फक्त "स्क्रॅप".. पण आठवणींचा खजिना कायमस्वरुपी पत्रातुनच रहातो.

मस्त लिहिलं आहेस खरंच.. मीही चिकार पत्र लिहायचे.. आम्ही मैत्रिणी वाढदिवसाला एकमेकींना लेटरपॅड भेट द्यायचो, छोटे स्टिकर घ्यायचो, आजूबाजूला लावायला वगैरे. मी आणि एक मैत्रिण तर रोज भेटायचो, तरी एकमेकींना पत्र लिहायचो! एका दूरच्या भावाशी अशी पत्रातूनच जवळिक होती.. दोन पत्रमित्रही होते.. परदेशात असताना आईचं, बहिणीचं पत्र नुसतं दिसलं कीच डोळे गळायला लागायचे! मज्जा आली सगळं आठवून. पत्र लिहून टाकल्यावर त्याचं उत्तर यायची उत्कंठा, त्यात जे काही उत्तर असेल ते अपेक्षेनुसार असेल की नाही ह्याची उत्सुकता.. मस्त असते ती फेज. माझ्या एका मैत्रिणीनं तिच्या पत्रमित्राशी लग्न ठरवलं होतं, ते आम्हाला जामच एक्सायटिंग वाटलं होतं Happy

मी ईमेल्सही खूप मोठ्या लिहिते.. काही लोक तितकंच मोठं आणि मस्त उत्तर देतात, काही लोक अगदी संक्षिप्त, काही देतच नाहीत Sad असो, पण मस्त लिहिलंयस..

मस्त लिहिलं आहे...
माझ्या बाबांकडे साठा आहे पत्रांचा.. त्या काळात आईनी ,आजोबांनी त्यांना लिहिलेली..
माझ्याकडे पत्र नाहीयेत पण ईमेल्स आहेत ... मी ईमेल्स खूप मोठ्या लिहिते.. नंतर वाचताना जाम मज्जा येते .. Happy

मस्तच लिहिलयस मितान Happy
पत्रलेखन ही एक मला अजुनही न जमलेली गोष्ट. बरोबर ह्याच्या उलट माझं अर्ध अंग. तिला पत्र लेखनाची अफाट हौस. अगदी दिवसाला एक या प्रमाणे मला पत्र लिहायची ती ही ४-५ पानी. या उलट मला पोस्ट कार्डसुद्धा खुप मोठं वाटायचं.

छान लिहिलयस Happy आजकाल पत्र लिहिलीच जात नाहीत, माझ्या कडची पत्र मी अजून जपून ठेवलीयत. कधी तरी काढून वाचायला इतक मस्त वाटत,

मितान.. नार्वे , बेल्जियमला जाऊन पत्रांची पत्रांची आठवण आली काय.. ?

सुंदर लिहिलं आहेस.खूप आवडलं.

स्मिते..अनुमोदन.. आजकाल पत्र लिहिलीच काय? पण कोरी पत्र सुद्धा पहायला मिळत नाही. हल्ली जनरल स्टोअर्स मधे पण विकत नाहीत ती. Uhoh

मितान खूप छान लिहिलयंस.
अगं मी सुद्धा अशीच खूप पत्रं जपून ठवली आहेत. आत्ता काढून वाचताना खूप मजा येते. कधी कधी वाटते...अरे जग किती बदललंय. ...(खूप का ही निसटंत चालल्याचं फीलिंग येतं. )

Pages