झकरांदा

Submitted by दिनेश. on 28 October, 2010 - 03:56

झकरांदा ची आणि माझी पहिली भेट, आजही आठवतेय. लेक व्हिक्टोरियाच्या काठावरचे ते रम्य गाव किसुमु.
वर्षाचे बारा महिने तिथे एकच मौसम, रात्री थंडी, दिवसा थोडेसे गरम आणि संध्याकाळी पाऊस. पाऊस पडणार तो पण सहा साडेसहा नंतर. त्या आधीच गाव सगळे आवरुन घरी निवांत बसलेला. रस्त्यावर कुणीच नाही.

अशीच पावसाची हलकी सर बरसून गेली. हवेत सुखद गारवा. सरत्या ऑगष्टचे दिवस. पावसानंतरच्या उघडीपीत मी घराबाहेर पडलो होतो. जरा वाकडी वाट करुन गावच्या मध्यवर्ती क्रिडांगणात पोहोचलो. गावात सामसुम.
नेहमीच्या हिरव्यागार कुरणात आज निळाजांभळा गालिचा अंथरला होता, आणि सभोवती फ़ेर धरुन होते, ते जकरांदा.
निळ्या जांभळ्या मोहोरानी निळ्या आकाशाशी स्पर्धा करत.
एरवीच्या हिरव्या नाजूक पानांचा मागमूस नाही. सगळे झाड तलम निळाईने नटलेले. आणि त्यापैकी एकेक फूल गिरक्या घेत घेत खाली येत होते. तरीहि त्यात प्राजक्ताचे रुदन नव्हते कि बकुळीचे समर्पण. मूळात धरणीला इतके अर्पून झाडाचे वैभव कुठेही ऊणे झालेच नव्हते. झाडाजवळ तर या निळाईचा अक्षय ठेवाच होता जणू.

जमिनीवर या फ़ूलांचाच गालिचा. हलक्या वार्‍याचा झुळुकिने अलगद खालीवर झुलणारा.
झाडावरच्या, हवेतल्या आणि जमिनीवरच्या फुलांचा रंग असाच ताजा तवाना.
उभ्या उभ्या माझ्या अंगावर त्या फ़ुलांची बरसात. त्यात कुठेही खोडकर पणा नाही, सुगंधी जखमा नाहित. अंगावर मोरपिस फ़िरवावे तितका नाजूक तलम अनुभव.

आणि त्यात त्या फुलांचा सुगंध. रातराणीसारखा घायाळ करणारा नाही कि कस्तूरीसारखा नादवणारा नाही. मूळात तो घेण्यासाठी काहि प्रयासच करावे लागत नाहीत. श्वास घ्यायला का प्रयास पडतात ?

मी असाच स्तब्ध उभा. पायतळी, आसमंतात आणि डोक्यावरही त्याचेच अस्तित्व निळाईचे. फुलोरा कुठे संपला, आणि आभाळ कुठे सुरु झाले, हेच कळू नये.

हा रंग नजरेलाही सुखावणारा. संधिप्रकाशात नेहमीचा जांभळा आधी लुप्त होतो, पण हा तर जणू स्वयंप्रकाशी निळा.
अथांग, निळ्या आभाळाचा निळा, डोळे मिटले तरी नजरबंदी करणारा, मीरेच्या कृष्णासारखा. सर्व व्यापणारा.

कैसे हो तूम कृष्णकन्हाई,
तूम तो मुझको, देख रहे हो
मुझको देते नही दिखाई

या झकरांदाचा मला ध्यासच लागला आहे. खरे तर याचे मूळ ठिकाण, आहे दक्षिण अमेरिका. अमेरिका ते ऑष्ट्रेलिया सगळीकडे याचा प्रसार झालाय. मी ही झाडे नायजेरिया, भारत आणि न्यू झीलंड इथे बघितली आहेत.
आपण मराठीत त्याचे नीलमोहोर असे नाव ठेवलेय. कोल्हापुरला महावीर उद्यानात आहेत हि झाडे. पण याचे सर्वांगाने फ़ुलणे बघितले ते केनयातच.
केनयात कोपर्‍या कोपर्‍यावर तो दिसतो. एरवी हिरव्या गर्दीत वेगळा ओळखू येत नाही. पण एकदा फ़ूलू लागला कि दिड दोन महिने, नजरबंदी करत राहतो. रस्त्याच्या कडेने, रस्त्याच्या मधे तो आहेच. फ़ूले रस्त्यावर झुलत असतात. उभ्या केलेल्या गांड्यांची सजावट करत असतात.

नायजेरियात तो जरा अंग राखूनच फूलतो. फूलांचे तूरे असतात त्यावेळी झाडावर पानेही असतात. हिरव्यागार रंगाच्या पार्श्वभूमीवर हा रंग खुलूनही दिसतो. न्यू झीलंडमधेही तो असाच फूलतो. पण ज्याने त्याचे असे फूलणे बघितलेय, त्याला हे रुप, अजिबात रुचणार नाही.

केनयात त्याचे कौतूक आहे. इथे झकरांदा अवेन्यू आहे. इथल्या पेंटिग्जमधे त्याला अढळ स्थान आहे. तसे याचे काही औषधी उपयोग आहेत, असेही नाही.
पण निखळ आनंद देणे, एवढाच कशाचा तरी उपयोग असावा, हे पुरत नाही का आपल्याला ?

हा निखळ आनंद मी मनमुराद लूटतो आहे. रस्त्यावर, घराच्या गच्चीतून, घराच्या प्रत्येक खिडकीतून,
त्याचे दर्शन होत आहे. रात्रीच्या शांतवेळी, त्याचे सुंगधी निरोप येताहेत. काळ्या रात्रीतून निळी स्वप्ने !!

jacaranda (2).JPGjacaranda.JPGjacaranda (6).JPGjacaranda (4).JPGjacaranda (7).JPGjacaranda (5).JPG

या लेखाची प्रेरणा : बेडेकर आणि आडो यांचे फॉल कलर्स.
या झाडाचे शास्त्रीय नाव Jacaranda mimosifolia. नेटवर याचे यापेक्षा सुंदर फोटो उपलब्ध आहेत.

गुलमोहर: 

सुरेख एकदम..

एखाद्या फुलाचा क्लोजप टाका ना... मुंबईत आहेत ही झाडे??? हा रंग पाहिल्यासारखा वाटतो म्हणुन विचारते.

मस्तच!!
लहानपणी आमच्या घराबाहेर याचे एक उंच झाड होते आणि त्यावर पिवळेधम्मक सुर्यपक्षी मध प्यायला यायचे त्याची आठवण आली.

कसला सुरेख रंग आहे ह्या फुलांचा.... नीलमोहोर हे त्याचं नावही तसंच नाजूक आहे! मला आवडतात ही फुलं बघायला.... आपल्याकडे पण खूप ठिकाणी दिसायला लागलाय हा! पण त्याच्यावर आपल्याकडचे पक्षी घरटी करत नाहीत इ. इ. ऐकलंय. शोभेला म्हणून छान आहे.

दिनेशदा,
सुंदर... हा नीलमोहर निश्चीतच वेड लावतो. सॅन डियेगो ला आमच्या संकुलात खूप झाडे होती याची.. मस्त मंद सुवास असतो अन अनेक पक्षी वगैरे येवून हजेरी लावून जात असत. त्यांचे ते फेवरेट झाड होते.
मला ती फुले नेहेमी गोकर्ण/धतुरा सारखी वाटायची..

या झाडाचा विस्तार विरळ असतो, म्हणून पक्षी घरटी बांधत नसावेत. इथेही घरटी नसतात.
पण या झाडावर मधमाश्यांसारखे किटक खूप दिसतात आणि त्यांच्या मागे आपल्या वेड्या
राघूसारखे पक्षी लागलेले असतात.

मला वाटते आपल्याकडे हे झाड नवीन असल्याने, आधी मधमाश्यांना याची ओळख करुन घावी
लागेल. मग पक्षी येतील.

तरीहि त्यात प्राजक्ताचे रुदन नव्हते कि बकुळीचे समर्पण. मूळात धरणीला इतके अर्पून झाडाचे वैभव कुठेही ऊणे झालेच नव्हते. झाडाजवळ तर या निळाईचा अक्षय ठेवाच होता जणू.

>>>>> किती समर्पक वर्णन केलयत तुम्ही दिनेशदा! सुंदरच. सर्व लेखच अतिशय तरल उतरलाय.

फोटो तर अप्रतिम! काय निराळाच रंग आहे हा. मला वाटतं हा असा रंग निसर्गात फार कमी दिसतो. मला तर आत्ता केवळ कमळ आणि रानटी कोरांटी आठवतेय की जी या रंगात असते.

खरंय. काय रंग दिसतो तो अद्भूत. सरळ उठुन मुजरा करावसं वाटणारं झाड.
ऑडेन म्हणतो ' I thought that love would last forever, I was wrong.. ' असे अमलताश, चेरीफुले आणि जकारंदा चा बहर ओसरून गेल्यावर वाटते अक्षरश. Happy
इनफॅक्ट ऑडेनची आख्खी कविताच या झाडांच्या बहराच्या खेळाला समर्पक वाटते. Funeral Blues - W. H Auden.

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख आणि फोटो Happy

मूळात धरणीला इतके अर्पून झाडाचे वैभव कुठेही ऊणे झालेच नव्हते. झाडाजवळ तर या निळाईचा अक्षय ठेवाच होता जणू.>>> सुंदरच Happy Happy

फोटो तर अप्रतिम! काय निराळाच रंग आहे हा. मला वाटतं हा असा रंग निसर्गात फार कमी दिसतो. मला तर आत्ता केवळ कमळ आणि रानटी कोरांटी आठवतेय की जी या रंगात असते.>>>>मामींना, १०० मोदक Happy Happy

मीही अजुन पाहिलं नाही. Sad

झाड, लेख आणि प्रकाशचित्रे सर्वच सुंदर. मुंबईत ही फुले पाहिल्यासारखे वाटतेय.
याचा उच्चार झकरांदा आहे का? वसंत बापटांची जॅकरांडा नावाची एक कविता आहे.

दिनेशदा, लेख आणि फोटो मस्तच Happy
जॅकरांडा/नीलमोहोर हे झाड नवीन नसावे.. पुण्यात तरी मी पाहतीय खूप वर्षं! >>> मी पण पाहिलंय हे झाड पुण्यात, फुले खुपच छान दिसतात याची.

मुंबैत हायकोर्टाच्या आवारात अन मला वाटते युनिवर्सिटीच्या मागल्या बाजूला पण याची झाडे आहेत, पार्ल्यात पण पाहिल्याचं आठवतंय.
यू मेक मी वंडर , जॅकरांडा अशी एक रंगाची जाहिरात पण असायची फार पूर्वी.

सुरेख रंग अन सुरेख, सुलक्षणी झाड .

अप्रतिम निसर्ग....... आणि तो कॅमेर्‍यात व इतक्या तरल शब्दांत व्यक्त करण्याची तुमची कला तेवढीच ग्रेट!!
रोज नुसतीच " दिसणारी " झाडं तुमचे लेख वाचल्यापासून " जाणवायला " लागली आहेत !

अतिशय सुंदर लेख आणि फोटो. धन्यवाद.
झाड तर आवडतेच खुप. पण एवढा छान फुललेला मी कधी पाहिला नव्ह्ता.
दिनेशदा कोल्हापुरात नागाळा पार्क मधे हि हे झाड होतं काही वर्षापूर्वी.

Pages