झकरांदा

Submitted by दिनेश. on 28 October, 2010 - 03:56

झकरांदा ची आणि माझी पहिली भेट, आजही आठवतेय. लेक व्हिक्टोरियाच्या काठावरचे ते रम्य गाव किसुमु.
वर्षाचे बारा महिने तिथे एकच मौसम, रात्री थंडी, दिवसा थोडेसे गरम आणि संध्याकाळी पाऊस. पाऊस पडणार तो पण सहा साडेसहा नंतर. त्या आधीच गाव सगळे आवरुन घरी निवांत बसलेला. रस्त्यावर कुणीच नाही.

अशीच पावसाची हलकी सर बरसून गेली. हवेत सुखद गारवा. सरत्या ऑगष्टचे दिवस. पावसानंतरच्या उघडीपीत मी घराबाहेर पडलो होतो. जरा वाकडी वाट करुन गावच्या मध्यवर्ती क्रिडांगणात पोहोचलो. गावात सामसुम.
नेहमीच्या हिरव्यागार कुरणात आज निळाजांभळा गालिचा अंथरला होता, आणि सभोवती फ़ेर धरुन होते, ते जकरांदा.
निळ्या जांभळ्या मोहोरानी निळ्या आकाशाशी स्पर्धा करत.
एरवीच्या हिरव्या नाजूक पानांचा मागमूस नाही. सगळे झाड तलम निळाईने नटलेले. आणि त्यापैकी एकेक फूल गिरक्या घेत घेत खाली येत होते. तरीहि त्यात प्राजक्ताचे रुदन नव्हते कि बकुळीचे समर्पण. मूळात धरणीला इतके अर्पून झाडाचे वैभव कुठेही ऊणे झालेच नव्हते. झाडाजवळ तर या निळाईचा अक्षय ठेवाच होता जणू.

जमिनीवर या फ़ूलांचाच गालिचा. हलक्या वार्‍याचा झुळुकिने अलगद खालीवर झुलणारा.
झाडावरच्या, हवेतल्या आणि जमिनीवरच्या फुलांचा रंग असाच ताजा तवाना.
उभ्या उभ्या माझ्या अंगावर त्या फ़ुलांची बरसात. त्यात कुठेही खोडकर पणा नाही, सुगंधी जखमा नाहित. अंगावर मोरपिस फ़िरवावे तितका नाजूक तलम अनुभव.

आणि त्यात त्या फुलांचा सुगंध. रातराणीसारखा घायाळ करणारा नाही कि कस्तूरीसारखा नादवणारा नाही. मूळात तो घेण्यासाठी काहि प्रयासच करावे लागत नाहीत. श्वास घ्यायला का प्रयास पडतात ?

मी असाच स्तब्ध उभा. पायतळी, आसमंतात आणि डोक्यावरही त्याचेच अस्तित्व निळाईचे. फुलोरा कुठे संपला, आणि आभाळ कुठे सुरु झाले, हेच कळू नये.

हा रंग नजरेलाही सुखावणारा. संधिप्रकाशात नेहमीचा जांभळा आधी लुप्त होतो, पण हा तर जणू स्वयंप्रकाशी निळा.
अथांग, निळ्या आभाळाचा निळा, डोळे मिटले तरी नजरबंदी करणारा, मीरेच्या कृष्णासारखा. सर्व व्यापणारा.

कैसे हो तूम कृष्णकन्हाई,
तूम तो मुझको, देख रहे हो
मुझको देते नही दिखाई

या झकरांदाचा मला ध्यासच लागला आहे. खरे तर याचे मूळ ठिकाण, आहे दक्षिण अमेरिका. अमेरिका ते ऑष्ट्रेलिया सगळीकडे याचा प्रसार झालाय. मी ही झाडे नायजेरिया, भारत आणि न्यू झीलंड इथे बघितली आहेत.
आपण मराठीत त्याचे नीलमोहोर असे नाव ठेवलेय. कोल्हापुरला महावीर उद्यानात आहेत हि झाडे. पण याचे सर्वांगाने फ़ुलणे बघितले ते केनयातच.
केनयात कोपर्‍या कोपर्‍यावर तो दिसतो. एरवी हिरव्या गर्दीत वेगळा ओळखू येत नाही. पण एकदा फ़ूलू लागला कि दिड दोन महिने, नजरबंदी करत राहतो. रस्त्याच्या कडेने, रस्त्याच्या मधे तो आहेच. फ़ूले रस्त्यावर झुलत असतात. उभ्या केलेल्या गांड्यांची सजावट करत असतात.

नायजेरियात तो जरा अंग राखूनच फूलतो. फूलांचे तूरे असतात त्यावेळी झाडावर पानेही असतात. हिरव्यागार रंगाच्या पार्श्वभूमीवर हा रंग खुलूनही दिसतो. न्यू झीलंडमधेही तो असाच फूलतो. पण ज्याने त्याचे असे फूलणे बघितलेय, त्याला हे रुप, अजिबात रुचणार नाही.

केनयात त्याचे कौतूक आहे. इथे झकरांदा अवेन्यू आहे. इथल्या पेंटिग्जमधे त्याला अढळ स्थान आहे. तसे याचे काही औषधी उपयोग आहेत, असेही नाही.
पण निखळ आनंद देणे, एवढाच कशाचा तरी उपयोग असावा, हे पुरत नाही का आपल्याला ?

हा निखळ आनंद मी मनमुराद लूटतो आहे. रस्त्यावर, घराच्या गच्चीतून, घराच्या प्रत्येक खिडकीतून,
त्याचे दर्शन होत आहे. रात्रीच्या शांतवेळी, त्याचे सुंगधी निरोप येताहेत. काळ्या रात्रीतून निळी स्वप्ने !!

jacaranda (2).JPGjacaranda.JPGjacaranda (6).JPGjacaranda (4).JPGjacaranda (7).JPGjacaranda (5).JPG

या लेखाची प्रेरणा : बेडेकर आणि आडो यांचे फॉल कलर्स.
या झाडाचे शास्त्रीय नाव Jacaranda mimosifolia. नेटवर याचे यापेक्षा सुंदर फोटो उपलब्ध आहेत.

गुलमोहर: 

मूठभर मांस चढलं रे माझ्या अंगावर. आपल्याकडे आहेत हि झाडे, पण अशी फूलत नाहीत.
पण आपल्याकडचे पळस, पांगारा, कुसुंब, बहावा पण असेच फुलतात.
या रंगाचे म्हणाल, तर आपल्याकडे गायत्री आणि वांगीवृक्ष यांना या रंगाची फूले येतात. गायत्री मुंबईत, राणीच्या बागेत, आणि फोर्टमधल्या टॅमरिंड लेनमधल्या चर्च च्या आवारात आहे.
वांगीवृक्षाला मोठी पंचकोनी फूले येतात. या दोन्ही झाडांची फूले गडद निळी ते शुभ्र अशी रंग बदलतात.

दिनेशदा, मस्त लेख आणि फोटोज. ह्या किसुमु गावातला बारमाही मौसमसुध्दा आवडला. वर्षभर संध्याकाळचा पाऊस. वा! रिटायरमेन्टनंतर रहायला मला तरी हे गाव छान वाटतंय. Happy

दिनेशदा,
तुमच्या मुळेच तर आम्हाला ही दुर देशातली वेगवेगळी झाडं,माती यांची ओळख होतेय, बघायला मिळतं..!
हे तुमचं निसर्ग प्रेम पाहुन आपल्या आयुष्यात अनेक झाडे लावणारी माणसं किती महान असतील याची कल्पना मला यायली लागली आहे ..
Happy

रात्रीच्या शांतवेळी, त्याचे सुंगधी निरोप येताहेत >>
दिनेशदा, ही फुलं खरच सुगंधी आहेत? मी इतक्या वर्षात कधी अनुभवलं नाही.. Sad

आहा... जॅकरांडा...
माझ्या आधीच्या घराच्या शेजारी होता. झाड तिच्या परसात, फुलं माझ्या अंगणात असं डील होतं. पण ते एका अर्थी बरच होतं. ती मलेशियन बया तोंडानं पुटपुटत अंगण झाडायची सकाळी पाच्-सहा पासून... जॅकरांडाच्या तळाशी काय चार फुलं असतिल... तर तिथेही धसाफसा... ती जे काही पुटपुटत होती ते अथर्वशीर्षं नक्कीच नसणार.
मला जांभळं सूख होतं. चहाचा कप घेऊन अनेक सकाळ जांभळी भिरभिर बघत घालवल्यात...
किती सुंदर आठवणी जाग्या केल्यात, दिनेशदा.

" आणि त्यात त्या फुलांचा सुगंध. रातराणीसारखा घायाळ करणारा नाही कि कस्तूरीसारखा नादवणारा नाही. मूळात तो घेण्यासाठी काहि प्रयासच करावे लागत नाहीत. श्वास घ्यायला का प्रयास पडतात ?"

" रात्रीच्या शांतवेळी, त्याचे सुंगधी निरोप येताहेत. काळ्या रात्रीतून निळी स्वप्ने !!"

काय सुरेख लिहिलय....मस्तं. खूप आवडलं

Pages