व्यक्ति तितक्या देव

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

LAMAL, विषय: देव, १६ Oct. २०१०

काही लोकांकरता देव सखा असतो, काहींकरता मित्र, अनेकांकरता आधार तर इतरांकरता नसतोच. अजुनही प्रकार आहेत पण आपण त्या सर्वात शिरु शकणार नाही. पण देव हा प्रकार या पेक्षा कितितरी क्लिष्ट आहे. लोकांना, आजच्या आणि आधिच्या, या संकल्पनेबद्दल काय वाटायचे, काय वाटते याचा आढावा घ्यायचा प्रयत्न करु या, आणि त्या अनुशंगानी आपल्याला बदलायला हवे का ते पाहुया.

देवाचा सर्वात महत्वाचा संबंध अर्थातच धर्माशी आहे. धर्म हा विश्वाच्या सुरुवातीपासुन नव्हता, पहिल्या मानवा आधी नक्कीच नव्हता. त्यामुळे एका अर्थी त्या आधी देवालाही अस्तित्व नव्हते. वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या मानवांनी विविध धर्मांना जन्म दिला. हे निदान थोडेफार द. मा. मिरासदारांच्या भुताच्या जन्माप्रमाणे असणार. आधी निसर्गदत्त असलेले देव उत्क्रांत होऊन आजच्या धर्मांच्या देवांमध्ये रुपांतरीत झाले. या दरम्यान अनेक स्थित्यंतरे झाली.

हिंदु धर्माबाबत बोलायचे झाल्यास वेद, उपनिषदे व नंतरच्या रचनांकडे पाहता येईल. वेद हे मुख्यत्वेकरुन संलग्न कवितांचे संग्रह आहेत. त्यानंतर आलेल्या उपनिषदांमध्ये जास्त सुसुत्रता जाणवते. बृहदारण्यक उपनिषदात साकल्य याज्ञवल्क्याला देवांच्या आकड्याबद्दल खोदुनखोदुन विचारतो (III.IX.1). ३३०६ पासुन सुरु करुन, ३३ (ज्यात वसु, रुद्र, आदित्य इत्यादी आले), ६, ३, २, दीड, करत करत १ पर्यंत याज्ञवल्क्य पोचतो. त्यानंतर जेंव्हा तो घर सोडुन जायला निघतो (IV.V.15) तेंव्हा त्याची एक बायको, मैत्रेयी, त्याला विचारते की मुक्ति मिळवण्याचा मार्ग काय आहे. यावर 'नेति, नेति' हे उत्तर देतांना याज्ञवल्क्य सांगतो की आपल्या बाहेर काही नाही हे जाणवले कि मुक्तिचा मार्ग मोकळा होतो. छंदोग्य उपनिषदातील आरुणीचा त्याच्या पुत्राला, श्वेतकेतुला, केलेला 'तत्वमसि' चा उपदेष तर अद्वैतवादाचा कळस आहे. तुमच्या बाहेरील देवाची गरज नाही, त्या परम् ईश्वराची देखिल नाही कारण तुम्हीच तो आहात.

पण या पातळी पर्यंत पोचायला खुप काळ जावा लागतो. Raymond Smullyan 'Is God a Taoist' मध्ये म्हणतो की त्या काळालाच Devil म्हणता येऊ शकेल. बाल्यावस्थेत असलेले धर्म स्वत:चा प्रसार करण्याकरता नको ते प्रकार वापरतात. ओरीसातला एक ख्रीश्चन बनलेला आदिवासी हताशपणे सांगत होता की हे लोक आम्हाला बाकी गोष्टी देतात ते ठीक आहे पण आमचे सगळे देव घेऊन त्याबदल्यात एकच देव देतात हे काही बरोबर नाही. लोकांनी आपले देव स्वत:पुरते मर्यादीत ठेवले असते तर कुणाला नास्तीक बनायची गरजच पडली नसती. तसेही बहुतांश लोक इतर धर्मांच्या देवांना मानतच नाहीत. डॉकीन्स म्हणतो त्याप्रमाणे नास्तीक फक्त एक पाऊल पुढे जातात. देवाधर्मावरुन जी युद्धे होतात त्यात लोक न मरते तर तो अत्यंत हास्यास्पद प्रकारांमध्ये गणला गेला असता. रीच जेनी या विनोदखोराने तर धार्मीक युद्धांबद्दल म्हंटले आहे की दोन्ही पक्ष कुणाचा काल्पनीक मीत्र जास्त मोठा आहे यावरुन एकमेकांना मारत असतात.

लोकांना देव हवासा का वाटत असेल याची अनेक कारणे पुढे केली जातात उदा. अज्ञान, भिती, उत्क्रांती वगैरे. मनुष्याच्या काही दशकांच्या आयुष्यात आसपासच्या परिस्थितीत खुप फरक पडत नसला तरी एकाच धर्माच्या त्याच त्या देवांमध्येही फरक पडतो. काही पुराणे विष्णुची महती सांगतात तर त्याचीच जागा पुढे शिव घेतो आणि त्याही पुढे देवीचे महात्म्य वाढते. पण एका जन्मात मात्र लोक बदल करुन घ्यायला धजत नाहीत. विज्ञानात जसे एखादी थेअरी चुकली असेल तर ईतर वैज्ञानीक ते दाखवुन देतात आणि पुढील पाऊले टाकणे सोपे जाते. देवाच्या बाबतीत मात्र तसे कधी होतांना दिसत नाही - जरी वेगवेगळ्या शतकांमध्ये वेगवेगळे विचार असले तरी. याचे एक कारण long term mortgage प्रमाणे असावे. जन्मभर थोडी थोडी भक्ति करत रहा आणि त्या बदल्यात मृत्युनंतर अमरत्व मिळवा. खरेतर केवळ पृथ्वीवर अधिपत्य असलेला देव फार काही मोठा असु शकत नाही, आणि पृथ्वीपलिकडील सजिवसृष्टीबद्दल बोलण्याइतके धर्म डोळस नाहीत.

देव आपल्यात असतो की देवात आपण असतो? देव आणि आपण एकच की देवाचा आणि आपला काही भाग समान असतो? की आपल्यात आणि देवात काहीच समान नसते? अशा प्रकारची अनेक प्रतिरुपे बनवता येतील. त्यात पुन्हा बर्याच भानगडी आहेत. उदा. मी म्हणजेच देव असलो, आणि तुम्ही म्हणजे देखिल देव असलात, आणि देव एकच असला, तर तुम्ही आणि मी एकच. उलटपक्षी, जर माझ्या आणि देवात काही भाग समान असेल तर देवाचा तोच भाग तुमच्यात पण समान असेल? असल्यास देवाचा बाकी भाग काय करतो? नसल्यास तुमचा आणि माझा देव वेगळा झाला. असे बरेच प्रकार शक्य आहेत. खाली चित्रांमध्ये काही दाखविले आहेत. केवळ दोन व्यक्तिंपलिकडे देखिल सर्व प्रतिरुपे अतिशय क्लिष्ट होतात - द्वैत, अद्वैत, सगळीच. वर उल्लेखलेल्या 'Is God a Taoist' मध्ये Raymond Smullyanने या प्रकारची एकाच व्यक्तिकरिताची एक दोन उदाहरणे खुप मनोरंजक पद्धतिने मांडली आहेत.

'Breaking the Spell' या पुस्तकात Daniel Dennett याने पुरोहितांना जाझ संगीतकारांची अतिशय चपखल उपमा दिली आहे. पश्चिमात्य संगीत जसे लिहिल्या गेले आहे तसे पुन्हा वाजवायचे असते. जाझ मध्ये मात्र भारतीय शास्त्रीय संगीताप्रमाणेच त्या सुरांमध्ये राहुन इकडे-तिकडे फिरायची मुभा असते. विविध पुरोहीत देवाला आपल्या मर्जीनुसार नाचवत असतात. 'फु प्रित्यर्थे अक्षदाम् समर्पयामि' प्रमाणे समोरील लोक व परिस्थिती पाहुन त्यांची पुजा व विधी सांगायची पद्धत बदलते.

विज्ञानाचा भर गृहितिके कमी करण्याकडे असतो तर देवाशी संबंधीत गोष्टींचा कल obfuscation कडे असतो. जर लोकांनी प्रश्न विचारु नये असे वाटत असेल तर नियम तितकेच क्लिष्ट हवे. मनुस्मृतीत काळ्या दुभत्या गायीच्या ब्राम्हणाला केलेल्या दानाची महती आहे. एका ठिकाणी म्हंटले आहे कि तशीच गाय द्यायला हवी. पुढचेच वाक्य आहे की तशी नसेलच तर कोणत्याही रंगाची दुभती(च) गाय द्यावी. मग पुढे तशीही गाय नसेल तर काय करावे ईत्यादी.

बृहदारण्यक उपनिषदात गार्गी याज्ञवल्क्याला विचारते (III.VI.1)की जर पुर्ण जग पाण्यावर आहे तर पाण्याचे जग कशावर आहे. वार्याच्या जगावर. आणि वार्याचे? वातावरणावर. असे करत करत एका मागुन एक कोश याज्ञवल्क्य उलगडत जातो: सुर्य, चंद्र, तारे, ईंद्र, प्रजापति, ब्रम्हन्. तरी गार्गीचे प्रश्न संपतच नाहीत. शेवटी याज्ञवल्क्य धुक्याचे ब्रम्हास्त्र काढतो: गार्गी ब्रम्हन् बद्दल फाजील प्रश्न विचारु नको नाहीतर तुझे शिर धडावेगळे होईल.

प्रश्नांना ज्याप्रमाणे देवापुढे स्थान नसते तसेच नियमांच्या बदलालाही. पण काही लोकांना हे लवकर उमगते. कॅलिफोर्नीआचा विनोदकार ईमो फिलिप्स म्हणतो: 'लहानपणी मी सायकल दे अशी देवाची प्रार्थना करायचो. पण मला कळले की देवादारी नियम वेगळे असतात. म्हणुन मी एक सायकल चोरली आणि मला माफ कर अशी देवाची प्रार्थना केली'. चांगुलपणाचे नियम हे लादलेले नसावेत, ते आतुनच यायला हवेत. अनेकांचा, खास करुन आस्तिकांचा, असा गैरसमज असतो की नैतिकता ही केवळ ईश्वराचे अस्तित्व मान्य करुनच येऊ शकते आणि सर्व नास्तिक हे जात्याच अनैतिक असतात. यासंदर्भात थॉमस नाजेल म्हणतो: 'नुसतेच देव नाही असे मी म्हणत नाही, आणि अर्थातच तो असु नये अशी माझी ईच्छा आहे. त्याही पुढे जाऊन मी असे म्हणतो की मला देव असु नये असे वाटते कारण तसल्या प्रकारच्या विश्वात मला जगायचेच नाही.' आजकाल देशभक्तिपण बरेचदा देवाधर्माशी जोडली जाते. पण जसे नैतिकता आणि देवाचा संबंध नाही त्याचप्रमाणे देशाभिमान आणि देवाचे देखिल अर्थातच काही नाते नाही. याचे भगतसींगा पेक्षा मोठे उदाहरण असु शकत नाही. फाशीच्या दिवशी सुद्धा भगतसिंगाने नमते घेतले नाही व देवाचा आधार घेतला नाही. पण त्यामुळे त्याच्या देशभक्तीत फरक पडला नव्हता.

खरंतर देव आपल्यालाही आवडतच नाही. आपल्या मनातला देव आपण आपल्या सोयीप्रमाणे धोपटत असतो. जरा का कुठे गुगल किंवा फेसबुकने तुमची वैयक्तीक माहिती साठवली तर तुमचा तिळपापड होतो. पण परमेश्वर पहात असतांना मात्र सर्व दैनंदीन कृत्ये निर्लज्जपणे करता येतात. देव हा केवळ सोयीचा टेकु असतो. थोडा जरी सुसंबद्ध विचार केला तरी हे जाणवेल. या लेखाचे शिर्षक व्याकरणदृष्ट्या खटकले असेल. व्यक्ति तितक्या देव. तिथे जो विचार करता आला तीच सुसुत्रता थोडी पुढे नेली तर बरेच काही साध्य होईल.

देवाधर्मासंबंधीत या सर्व आंधळ्या प्रकारांमुळे ऋग्वेदातील नासदीय सुक्त (X.129) माझे सर्वात लाडके आहे. विश्वोत्पत्तीबद्दल त्यात कयास आहेत आणि शेवटी निरागसपणे म्हंटले आहे की हे सर्व कोणी निर्माण केले हे केवळ तोच जाणतो जो सातव्या स्वर्गात वास करतो, किंवा कदाचीत तोही जाणत नसेल कारण त्याची निर्मीती देखिल तर नंतरच झाली असणार. हा जो सुदृढ संशय आहे तो सर्वांनी सर्व बाबतीत वापरला तर पृथ्वीवर देव अवतरायला वेळ लागणार नाही.
---------------
References:
'A Sourcebook of Indian Philosophy' Eds. S. Radhakrishnan and Charles A Moore
'Breaking the Spell' Daniel Dennett
'The Tao is silent' Raymond Smullyan
'Myths and symbols of Indian Art and Civilization' Heinrich Zimmer
-------------------------------------------------------------------------------------
gm1.pnggm2.pnggm3.pnggm4.pnggm5.pnggm6.png

प्रकार: 

सॉरी, पूर्ण आणि नीट न वाचताच लिहितोय. पण जे वाचल तेव्हढ मनापासून पटलं आणि आवडलं. पूर्ण वाचून, मनून परत लिहीनच.

छान लिहिलंयस Happy हाच लेख तयार होतोय असं त्यादिवशी पुपुवर म्हणाला होतास का?

आपल्या मनातला देव आपण आपल्या सोयीप्रमाणे धोपटत असतो>> अनुमोदन.

पण परमेश्वर पहात असतांना मात्र सर्व दैनंदीन कृत्ये निर्लज्जपणे करता येतात. देव हा केवळ सोयीचा टेकु असतो. थोडा जरी सुसंबद्ध विचार केला तरी हे जाणवेल. या लेखाचे शिर्षक व्याकरणदृष्ट्या खटकले असेल. व्यक्ति तितक्या देव. तिथे जो विचार करता आला तीच सुसुत्रता थोडी पुढे नेली तर बरेच काही साध्य होईल. >>> Happy

एव्होल्युशन्सचे डायग्राम्स आत्तातरी डोक्यावरुन गेलेत. माझ्या बुद्धीचा दोष Happy परत सावकाशीने पाहीन.

असा सुदृढ संशय असेल तर देव संकल्पना आणि विज्ञान यातला फरक राहणार नाही, कारण हा संशयच सर्व शास्त्रीय प्रगतीचे मूळ आहे.
काही प्रश्न-
या इव्होल्यूशन्स मागील फॅक्टर्स/फोर्सेस काय असू शकतात? जसे की जी३२ सारखे काहीतरी इवॉल्व होणे आपल्याला संतसाहित्यात दिसून येते.
जी४ आणि जी५ च्या पॉसिबल इव्होल्यूशन्स काय आहेत/ असू शकतात?

येस्स आगाऊ, इव्होल्युशन्सबद्दल इथे जास्त विस्तृत चर्चा झाली तर बरं होईल Happy तुकड्या तुकड्यात चर्चा झाली तरी मी अस्चिगला विनंती करेन की एखाद्या पोस्टमधे ती एकत्र करुन ठेव.

धर्म नंतर अस्तित्वात आला पण त्याआधी स्रुष्टीकर्ता नव्हता असे नाही . खरे पहाता धर्म हा भय आणि प्रलोभन यातूनच जन्माला आले आहेत. अमुक एक गोष्ट नाही केली तर शिक्षा मिळेल किंवा अमुक एक गोष्ट केली तर फळ मिळेल या संकल्पनेतून धर्म जन्माला आले . आणि यात देवापेक्षा धर्माला जास्त महत्त्व आले.त्यामुळे सद्यपरिस्थिती पहाता एकच म्हणावे लागेल " GOD has no religion and religions have no GOD"

इव्होल्युशन डायग्रॅम अजून नीट कळालेली नाही. माबुदो!
देव हे ''गण'' मानले गेल्याने ''तितक्या'' हा शब्द खटकत नाही.
बाकी लेख पटला व आवडला! Happy

>> लोकांनी आपले देव स्वत:पुरते मर्यादीत ठेवले असते तर कुणाला नास्तीक बनायची गरजच पडली नसती
>> देव हा केवळ सोयीचा टेकु असतो.
>> सुदृढ संशय
१००% खरय. मस्त लेख. आकृत्या नीट कळाल्या नाहीत... परत बघिन.
आपल्याकडच्या देवाची / जागृत देवस्थानाची आणि देवळातल्या अमाप गर्दीची मला तिडिक येउ लागली आहे. पण कोणाशीही चर्चा करताना - जरी ती व्यक्ती देवळात खेटे घालत असली तरी - त्या गर्दीतले आपण नाहीच असा आव आणुन चर्चा केली जाते. त्यांचा देव शेवटी 'God of the gaps' वाल असतो नाहितर 'स्वतःची भावनीक गरज' वाला.
मला नेहमी हा प्रश्ण पडतो की, खरच देवाची भावनीक पातळीवर गरज असते का? मला असं वाटतं की, लोकांना गरज वाटवे कारण लहानपणापासुन तसं सांगण्यात येतं. जसं एखादं जागृत देवस्थान कितिही घाणेरडं असलं तरी भक्ताला तिथे प्रसन्न वाटतं कारण तसं त्याच्या मनावर बिंबवलेलं असतं... तुला काय वाटतं, खरच भावनीक गरज असते?

त्या आकृत्या २००७ च्या ऑक्टोबर मध्ये मायबोली ऑल टाईम टॉप टेन मध्ये स्थान मिळालेल्या देवासंबधीच्या V and C च्या वेळी तयार केल्या होत्या. लेख त्यांच्याशिवाय वाचला तरी चालु शकतो. Happy

(G3) हे प्रतिरुप अद्वैतवाद दर्शविते. G31, G32, G33 ही त्याची २ व्यक्तिंकरत असलेली extensions आहेत. G31 मध्ये दोघांचे देव पुर्णपणे वेगवेगळे आहेत. हा झाला वैयक्तिक अद्वैतवाद. G32 मध्ये दोघांचा देव एकच आहे. हा झाला संपुर्ण अद्वैतवाद. शेवटी दोघांच्या देवात काही समानता (साधर्म्या पलिकडील) आहे (म्हणजे व्यक्तिंचा देखिल तेवढा भाग समान असावा लागेल) (G33) हा झाला विशीष्ठ अद्वैतवाद. [रंगावरुन कोणता भाग देव व कोणता मानव हे कसे ओळखायचे ते वर दिलेले आहे.] २ व्यक्तिंच्या पलिकडे जर हे न्यायचे असेल तर G311 मध्ये त्याच रंगाचे अजुन एक वर्तुळ येईल, G321 मध्ये काहीच फरक पडणार नाही, G331 मध्ये intersect होणारे अजुन एक वर्तुळ येईल. हे प्रतिरुप (अद्वैतवाद) सोपे असल्याने याच्या जास्त चिंध्या झाल्या नाहीत. G1 व G2 आणखी एकाच पायरीनंतर किती पसरतात ते वरती दिसतेच आहे. ज्याप्रमाणे भौतीक शास्त्रात 3-body problem अतिशय कठीण आहे त्याचप्रमाणे कोणत्याही देवाचे प्रतिरुप २ व्यक्तिंपलिकडे sustain करणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. पण हो, तो तसा पुर्णपणे स्वतंत्र विषय आहे.

उत्तम लेख व माहिती. पूर्वी निसर्गाच्या चक्राबद्दल फारशी माहिती नव्हती तेव्हा त्यांना देव मानण्यात आले. जसे वरुण, वारा अग्नी असे आहे का? वादळ आले कि वार्‍याचा प्रकोप, वणवा पेटला कि अग्निचा, पाउस जास्त झाला कि वरुण देवाचा?

ती चित्रे मला पण नाही समजली.

छान लेख. खुप आवडला.
सुरुवातीच्या आकृत्या कळल्या. खरतर एकदम मजाच वाटली विचार करताना.
पण पुढच्या जरा क्लिष्ट आहेत त्या परत एकदा शांततेत बघेन.

लेख अभ्यासपुर्ण आहे. आवडला. इतरांप्रमाणेच इव्होल्युशन डायग्रॅम अजून नीट कळालेली नाही. यावर आणखी एक विस्तृत लेख यावा.

डॉ. पुष्पा त्रिलोकेकरांचं "देवाची जन्मकथा" किंवा अशाच काहिशा नावाचं पुस्तक आहे त्यात देवांच्या मुर्ती विशिष्ठ प्रकारेच का निर्माण झाल्या? त्याची सांस्कृतिक बाजू काय होती? अमुकच देव अमुकच प्रदेशात का जास्त पुजले गेले वगैरे समाविष्ट केलेले आहे.

नानबा थँक्स लेख वर आणल्याबद्दल, मी आधी वाचला नव्हता.
Aschig छान लेख, खरे तर एका एका परिच्छेदवर सेपरेट लेख होऊ शकतो.
आकृत्या एरक्या लक्ष देऊन पहिल्या नाहीत, पण लेख वाचल्यावर अजून काही स्पष्टीकरनाची गरज वाटली नाही.